GS-1 पेपर : चालू घडामोडी

  • GS-1 पेपर : चालू घडामोडी

    GS-1 पेपर : चालू घडामोडी

    • 25 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 1049 Views
    • 2 Shares

     GS-1 पेपर : चालू घडामोडी


          राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात सुरुवातीलाच नमूद केले आहे की, “दिलेल्या विषयातील आणि उपविषयातील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास उमेदवाराने करणे अपेक्षित आहे.”तसे पाहिले तर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये ‘चालू घडामोडी’ हा विषय अनिवार्य व हमखास गुण मिळवून देणारा आहे. 

    1) चालू घडामोडी विषयाची व्याप्ती व स्वरूप
          चालू घडामोडी हा घटक तसा खूप विस्तृत आहे. अलीकडे वाढत असलेली स्पर्धा पाहता, असे दिसून येते की बहुतांश विद्यार्थ्यांची गुणसंख्या ‘चालू घडामोडी’ मुळे घसरते. हा विषय अभ्यासात किचकट, मोठा आवाका असलेला आणि ज्याबाबत अंदाज बांधता येत नाही, असा आहे. पण जरी तो अनिश्चित वाटत असला तरी रोज किमान 1 तास या विषयाचा अभ्यास केला तर विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा काळात या विषयाची विशेष तयारी करण्याची गरज भासत नाही. 

          चालू घडामोडींची व्याप्ती - 
          चालू घडामोडी हा पूर्वपरीक्षेमध्ये स्वतंत्रपणे समाविष्ट केलेला महत्त्वाचा घटक आहे. या स्वतंत्र घटकाबरोबरच पूर्व परीक्षेतील इतर घटकांतदेखील चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एकूण 100 प्रश्नांपैकी जवळ जवळ 40-50 प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असतात. म्हणूनच हा घटक पूर्वपरीक्षेतील मध्यवर्ती घटक ठरतो. तसेच कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास  नियोजनाची सुरुवात या घटकातील अभ्यासक्रमाच्या आकलनापासूनच होते.
          नागरी लोकसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात यासंबंधी पुढील उपघटक आहेत -
    1) राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी
    2) आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी
          उमेदवारास पूर्वपरीक्षेपासून मुलाखतीपर्यंत चालू घडामोडींचा सतत अभ्यास करावा लागतो. चालू घडामोडीवरील प्रश्न हे दैनंदिन जीवनात घडणार्‍या राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक, सामाजिक, पर्यावरणविषयक घटकावर भर देणारे आढळतात. याद्वारे उमेदवाराची विश्लेषणक्षमता मोठ्या प्रमाणावर तपासली जाते. एखाद्या मुद्याबाबत फक्त माहिती वाचून चालत नाही, तर त्यासाठी माहितीचे विश्लेषण करणेसुद्धा आवश्यक आहे. 

          सामान्यज्ञान - 
          सामान्यज्ञान हा विषय चालू घडामोडीचाच भाग आहे. असे असले तरी त्याचे वर्णन एखाद्या विशिष्ट पाठ्यक्रमिक  परिभाषेत करण्यात येत नाही, कारण त्याची मर्यादा निर्धारीत नसते. मात्र या घटकाची तयारी करणे सोपे असते. जगातील किंवा देशातील सर्वात छोटे, सर्वात मोठे, सर्वात प्रथम, पुरस्कार, नेमणुका, व्यक्ती, स्थळे, नृत्य, चित्रपट, पुस्तके, खेळाडू, संस्था - याबद्दलचे प्रश्न येथे विचारतात. 
          यासाठी पुढील घटकांची माहिती संकलित करण्यावर भर द्यावा - महत्त्वाच्या निवडणुका, नियुक्त्या, बडतर्फी, निधन, विविध पुरस्कार-सन्मान, गाजलेली पुस्तके, लेखक-लेखिका, विविध क्रीडास्पर्धा त्यांचे निकाल, चर्चेतील प्रकल्प, स्थळ वा ठिकाण, नैसर्गिक आपत्ती, प्रभावित क्षेत्र वा ठिकाण, विविध कारणांसाठी नेमलेले आयोग, समित्या, त्यांचे अहवाल व शिफारशी, भारताच्या नेत्यांनी इतर देशांना दिलेल्या भेटी, इतर राष्ट्रप्रमुखांच्या भारतभेटी, आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांच्या परिषदा, विविध करार, त्यासंबंधी भारताची भूमिका, काही देशांत घडलेल्या उलथापालथी, इ. 

          चालू घडामोडीबाबत महत्त्वाचे टॉपिक्स -
    1) आंतरराष्ट्रीय घडामोडी - युनो व आंतरराष्ट्रीय संघटना
    2) राष्ट्रीय घडामोडी - संरक्षण, राजकीय व प्रशासकीय, घटनादुरुस्ती, कायदे व शासकीय धोरणे, मोहीमा
    3) औद्योगिक-आर्थिक घडामोडी -विकासकामे व योजना, कृषी व ग्रामीण विकास
    4) सामाजिक व शैक्षणिक घडामोडी - महिला व उपेक्षित घटकासंबंधी विविध समित्या, कायदे, योजना
    5) भौगोलिक व पर्यावरण घडामोडी - नैसर्गिक आपत्ती संबंधीच्या घटना, स्थळे
    6) कला व सांस्कृतिक घडामोडी - चित्रपट, संगीत, नृत्यनाट्य
    7) वैज्ञानिक व खगोलशास्त्रीय घडामोडी - अणुविज्ञान, अवकाशविज्ञान, जैवतंत्रज्ञान, आयटी क्षेत्त्राचे प्रगती
    8) क्रीडा घडामोडी - विविध स्पर्धा, खेळाडू व त्यांचे पराक्रम
    9) विविध समित्या, परिषदा व करार, प्रमुख नेत्यांचे दौरे
    10) पुरस्कार व नेमणुका, व्यक्ती व स्थळे, संस्था व मुख्यालये
    11) पुस्तके व साहित्य, दिनविशेष, सर्वात मोठे / छोटे / सर्वप्रथम

    2) चालू घडामोडी विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे 
          चालू घडामोडीचा अभ्यास करताना त्यांचे विविध प्रकारे वर्गीकरण करून त्यांचा अभ्यास करावा. अभ्यासक्रमातील इतर घटक म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण व सामान्य विज्ञानाशी संबंधित चालू घडामोडी येथे खूप महत्त्वाच्या असतात.

    अ) भौगोलिक चालू घडामोडी -
    1) भारताचे स्ट्रॅटेजिक स्थान
    2) आर्थिक भूगोल
    3) लोकसंख्या भूगोल
    4) पर्यावरण भूगोल
    5) हवामान परिवर्तन
    6) जल व्यवस्थापन 
    7) नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन

    ब) राजकीय चालू घडामोडी -
    1) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये
    2) राजकीय यंत्रणेतील बदल
    3) स्थानिक स्वराज्य संस्था
    4) प्रसार माध्यमांची भूमिका
    5) निवडणूक प्रक्रिया
    6) राजकीय पक्ष व दबाव गट
    7) समाजास उपयुक्त कायदे
    8) सार्वजनिक सेवा व सार्वजनिक खर्च नियंत्रण

    क) सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक घडामोडी -
    1) शैक्षणिक संस्था, शिक्षण व व्यवसाय शिक्षण
    2) आरोग्य व आहार - अन्नसुरक्षा, कुपोषण, शोध, औषधे
    3) मानवी हक्क व ग्राहक सरंक्षण
    4) उपेक्षित घटकांच्या समस्या व विकास
    5) आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटनाची भूमिका

    ड) औद्योगिक व आर्थिक चालू घडामोडी -
    1) अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास
    2) पायाभूत संरचनेचा विकास
    3) उद्योग
    4) आर्थिक सुधारणा
    5) आंतरराष्ट्रीय व्यापार
    6) दारिद्य्र व रोजगार निर्देशन
    7) लोकवित्त व वित्तीय संस्था

    इ) पर्यावरण, खगोलशास्त्रीय व वैज्ञानिक घडामोडी-
    1) ऊर्जा व स्रोत समस्या
    2) संगणक व माहितीतंत्रज्ञान
    3) अवकाश तंत्रज्ञान
    4) जैविक अभियांत्रिकी
    5) अणुविज्ञान व अण्वस्त्रधोरण

    3) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप  
          चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाआधारे अभ्यासाची चौकट विकसित करता येते. त्यानुसार साधारणतः पुढील तीन प्रकार चालू घडामोडीशी संबंधी असल्याचे लक्षात येते -
    1) स्वतंत्र चालू घडामोडींचा विभाग 
    2) राज्यव्यवस्था, भूगोल, पर्यावरण, अर्थव्यवस्था, विज्ञानतंत्रज्ञान या घटकांतील चालू घडामोडी 
    3) सामान्यज्ञानासंबंधीच्या चालू घडामोडी

          अभ्यास सुलभ व्हावा यासाठी चालू घडामोडींशी संबंधी सर्व घटकाचे दोन प्रकारे वर्गीकरण करावे -
    अ) राजकीय, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, भौगोलिक, खगोलशास्त्रीय, सांस्कृतिक, वैज्ञानिक, क्रीडा, पुरस्कार असे प्रमुख विभाग. 
    ब) प्रत्येक विभागाअंतर्गत जागतिक, राष्ट्रीय व प्रादेशिक असे तीन स्तर.

          पुढील महत्त्वपूर्ण घटकांविषयीची सर्वसमावेशक व अद्ययावत माहिती नियमितपणे संकलित करावी -
    1) राजकीय-प्रशासकीय घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    2) आर्थिक व औद्योगिक घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    3) विज्ञान तंत्रज्ञान व खगोलशास्त्रीय घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    4) भौगोलिक, पर्यावरण व कृषीविषयक घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    5) सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    6) सांस्कृतिक व कला विषयक घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक    
    7) क्रीडाक्षेत्रविषयक घटना : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    8) प्रकाशझोतातील व्यक्ती : नियुक्ती, पुरस्कार, निधन - जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    9) महत्त्वाचे दिवस, पुस्तके : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक
    10) सामान्यज्ञान व स्थळे : जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक 

          विद्यार्थ्यांनी या घटकांना मध्यवर्ती मानून चालू घडामोडींची तयारी करावी. अभ्यासासाठी घेतलेल्या नोंदवहीचे 10 विभाग करून त्या त्या विभागांतर्गत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींची अचूक नोंद ठेवावी. या घटकाचा अभ्यास आपल्या तयारीच्या पहिल्या दिवसापासून सुरू करावा.
          दुसर्‍या प्रकारेही मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करता येते, कारण चालू घडामोडींवरील प्रश्न शक्यतो, खालील मुद्यांच्या अनुषंगाने विचारलेले असतात - (1) आंतरराष्ट्रीय घडामोडी, (2) राष्ट्रीय घडामोडी, (3) प्रादेशिक घडामोडी. 
          या तीनही मुद्यांवर विचारले जाणार्‍या प्रश्नांचे स्वरूप पुढीलप्रमाणे ही वर्गीकृत करता येते -
     
          1) शासकीय घडामोडी - 
          आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/ किंवा प्रादेशिक स्तरावर राजकीय वर्तुळात होणार्‍या बदलांच्या अनुषंगाने हे प्रश्न विचारले जातात. उदा. श्रीलंके विरुद्ध युनोच्या मानवी हक्क परिषदेचा प्रस्ताव, अफगाणिस्तानातून नाटो सैन्याची माघार, पाकिस्तान व भारतातील संसदीय निवडणूका, चीन मधील सत्तांतर, दक्षिण सुदानची निर्मिती, विधानसभा/लोकसभा निवडणुका, सत्ताबदल, परिणाम, विविध राज्यातील पक्ष, त्यांचे अध्यक्ष इ.

          2) संघटनाविषयक घडामोडी - 
          जागतिक संघटनामध्ये औद्योगिक संलग्नतेच्या आधारे स्थापन झालेल्या संघटना व त्याबाबत अद्ययावत माहिती यावर प्रश्न विचारले जातात. उदा. ब्रिक्स, रियो 2012, रोहा परिषद, जी-8, जी-20, जी-77, जागतिक व्यापार संघटना, ओपेक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन, सार्क, इब्सा इ. या सर्व संघटनांचे सदस्य देश, झालेल्या बैठका, घेण्यात आलेले निर्णय/करार, अध्यक्ष, घोषित वर्ष इत्यादींबाबत साधारणपणे प्रश्न विचारलेले असतात.

          3) अर्थविषयक घडामोडी -
          अ) आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींमध्ये विविध देशांनी जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज, राष्ट्रांमधील मंदी, याचा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, चलनाचे होणारे अवमूल्यन या सर्व घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
          ब) राष्ट्रीय आर्थिक घडामोडीमध्ये - भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प, पुरस्कारांवर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. अर्थसंकल्प, त्यातील महत्त्वाच्या तरतुदी, पंचवार्षिक योजनांवरील खर्च, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न, राजकोषीय तूट अशा सर्व संकल्पनांचा सखोल अभ्यास करावा.
          क) प्रादेशिक आर्थिक घाडमोडींमध्ये - घटक राज्याचा अर्थसंकल्प, विविध योजनांवरील खर्च, तूट, राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा, करपद्धती व बदल या सर्वांवर आधारित अद्ययावत माहिती संग्रही असावी. माहिती आकडेवारीशी संबंधित असल्याने वारंवार सराव केल्याने स्मरणात राहील.

          4) विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रातील  घडामोडी - 
          विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन संशोधन, त्याची मानवी जीवनावर होणारा परिणाम, प्रकाशझोतात असलेले शास्त्रज्ञ, त्यांचे शोध, खगोलशास्त्रातील प्रगती, अवकाश संशोधन केंद्रे त्यांच्या मोहिमा, संगणक क्षेत्रातील घडून येणारी क्रांती, अणुचाचण्या व परिणाम, अणुकरार, सहभागी देश या सर्वच मुद्यांवर बारकाईने मायक्रो-नोट्स काढून त्याचे वाचन करावे.

          5) साहित्य क्षेत्रातील घडामोडी - 
          वैचारिक क्रांती घडविणारे एक प्रभावी साधन म्हणून साहित्य क्षेत्राकडे (पुस्तके, ग्रंथसंपदा, काव्य, कादंबर्‍या, ललित ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, वेद) बघता येईल. यासाठीच त्या-त्या वर्षी चर्चेत असलेली पुस्तके, त्यांचे लेखक, त्यांची इतर ग्रंथसंपदा, हाताळलेले विषय या सर्व घटकांचा सविस्तर अभ्यास करावा. उदा. आशिष त्रिपाठीची ट्रॉलॉजी, टार्गेट 3 बिलियन - एपीजे अब्दुल कलाम, हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ - भालचंद्र नेमाडे, रिव्होल्यूशन 20-20 : चेतन भगत.

          6) क्रीडाविषयक घडामोडी - 
          सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने क्रीडा संबंधित माहिती महत्त्वाची समजली जाते. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उदा. ऑलिम्पिक स्पर्धा, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, टेनिस स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा याबाबत स्पर्धांचे स्थळ, सहभागी देश, विजेता-उपविजेता संघांची नावे, स्पर्धेदरम्यानचे विक्रम या सर्व गोष्टींची नोंद करून ठेवावी, म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचता येईल. मानाच्या समजल्या जाणार्‍या चारही ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धांची माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

          7) नवीन नेमणुका - 
          विशिष्ट क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या पदांवर होणार्‍या नवीन नेमणुकांवर विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे लक्ष ठेवावे. उदा. मानवाधिकार आयोग, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघटनेचे सचिव, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर इ.

          8) पुरस्कार/सन्मान/पदव्या/किताब - 
          अ) आंतरराष्ट्रीय पुरस्कार : नोबेल पुरस्कार, रेमन मॅगसेसे पुरस्कार, ऑस्कर पुरस्कार, पुलित्झर पुरस्कार, बुकर पुरस्कार, अ‍ॅबेल, आंतरराष्ट्रीय शांतता व नि:शस्त्रीकरण पुरस्कार याबाबत मागील दोन वर्षांपासून पुरस्कार विजेत्यांची नावे, पुरस्काराचे स्वरूप, विजेत्यांचे कार्य, पारितोषिक देणारी संस्था यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
          ब) राष्ट्रीय पुरस्कार : भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, ज्ञानपीठ पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार.

          9) संकीर्ण -
    1) केंद्र/राज्यातील विविध समस्यांवर विचार करण्यासाठी नेमलेल्या समित्या, त्यांचे अध्यक्ष, अहवाल.
    2) सरकारने देशाच्या/प्रदेशाच्या विकासासाठी अमलात आणलेल्या विविध योजना, खर्च त्यामागची प्रेरणा, त्यात आघाडीवर असलेले राज्य उदा. निर्मल ग्राम योजना, रोजगार हमी योजना.
    3) विविध संघटना, राष्ट्रीय स्तरावर घोषित केलेले वर्ष, त्यामागची कारणे.
    4) राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील घोषित केलेले दिन. उदा. 25 जानेवारी - मतदार दिन.
    5) निधन : राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाने एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या व्यक्तींच्या अवकाशात लीन झाल्याच्या बातम्या, त्यांचे कार्यक्षेत्र, जीवित अथवा मरणोत्तर जाहीर पुरस्कार.
    6) कृषीविषयक संशोधन-विकसित केलेले नवीन वाण इ.
    7) विविध क्षेत्रातील ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवडल्या गेलेल्या व्यक्तींची नावे.
    8) राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे ऑपरेशन
    9) त्या-त्या वर्षी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने  महत्त्वाचा निर्णय दिला असेल तर त्या न्यायाधीशाचे नाव व निकाल.
    10) राज्याराज्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) उभारणी, प्रदेश संख्या.
    11) जनगणना, आधार कार्ड योजना

    4) परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा 
          चालू घडामोडींचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पूर्व, मुख्य व मुलाखत या तीनही टप्प्यांत चालू घडामोडी हा घटक गुण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे सुरुवातीपासून या घटकाची नियमित तयारी करण्यावर भर हवा. अभ्यास पुरेसा व परीक्षाभिमुख व्हावा यासाठी प्रत्येक घटकाची सर्वांगीण माहिती उपलब्ध होईल हे पाहावे. अभ्यासक्रमातील इतर घटकाशी संबंधी अद्ययावत घडामोडींवर भर द्यावा, कारण आयोगाला उमेदवाराने अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील आणि उपविषयातील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. याबाबत आयोगाची सूचना पुढीलप्रकारची आहे-
          1) उमेदवारांनी नमूद केलेल्या विषयांतील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.
          2) प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे स्वरूप व दर्जा अशाप्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल व विविध विषयातील उमेदवाराच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.
          चालू घडामोडींचा अभ्यास करताना दररोज वर्तमानपत्रांचे वाचन करणे आवश्यक असून त्यातील महत्त्वाच्या मुद्यांची टाचणे लिहून काढणे उपयुक्त ठरते. साधारणपणे रोज 1 तास यासाठी देणे आवश्यक असून शक्य झाल्यास पुढील वर्तमानपत्रांचा आधार घ्यावा - टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, लोकसत्ता, फ्रंटलाईन, इंडिया टुडे, द इकॉनॉमिक्स, योजना व कुरुक्षेत्र. ‘वुई पीपल‘ व ‘बिग फाईट‘ हे एनडीटीव्ही आणि सीएनएन-आयबीएनचे कार्यक्रम पाहावेत.
          चालू घडामोडीवर यापूर्वीच्या परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप विचारात घेऊन अभ्यासाची दिशा ठरवावी. माहितीचे नियमित, सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक संकलन, त्यातील अचूकता व अद्ययावततेची हमी, नियोजित उजळणी आणि प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव या अभ्यास धोरणाच्या आधारे चालू घडामोडींची प्रभावी तयारी करता येते. 
          माहिती संकलन : सर्व संदर्भातून मिळणार्‍या माहितीचे संकलन करण्यासाठी ‘चालू घडामोडी’ विषयासाठी दैनंदिनी ठेवावी. त्यात तारखेनुसार विविध क्षेत्रातील अद्ययावत माहिती संकलित करावी. एखाद्या घटनेवर सर्वांगीण माहिती संकलित करण्यावर भर दिल्यास त्या घटकावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आल्यास त्याचे उत्तर देणे शक्य होते. उदा. जनलोकपाल विधेयकाची माहिती संकलित करताना पुढील बाबीवर भर द्यावा- लोकपाल व त्याबाबत राज्यघटनेतील कलमे व घटनादुरुस्ती (116 वे घटनादुरुस्ती विधेयक), लोकपाल संस्था सुरु करणारे जगातील पहिले राष्ट्र, जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने लोकपाल संस्थेचा उदय, लोकपाल विधेयक, जनलोकपालाची संकल्पना, पारित झालेले विधेयक, लोकायुक्ताची संस्था व देशातील संख्या, या संस्थेचे अस्तित्व असलेली पहिले व शेवटचे राज्य, लोकपाल विधेयकातील लोकायुक्तासंबंधी तरतुदीवरून झालेला वाद, चर्चेतील लोकायुक्त, भ्रष्टाचाराची समस्या, त्यासाठीची उपलब्ध यंत्रणा, त्यातील उणिवा, त्यावर मात करण्यासाठी पुढे आलेल्या उपाययोजना व प्रस्ताव, इत्यादी.
          नकाशा व छायाचित्रासह माहिती संकलन : व्यक्तींचे, स्थळांचे नाव लक्षात राहण्यास अवघड वाटत असल्यास त्याची छायाचित्रासह माहिती लिहिल्यास ती चांगली स्मरणात राहते.
          मासिके व वर्तमानपत्रांचे वाचन : दररोज किमान 2 दर्जेदार वर्तमानपत्रांचे वाचन करून त्यातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या नोंदवहीत तारखेवार लिहून ठेवाव्यात. दर्जेदार मासिक (सरकारी योजनांची माहिती देणारे योजना मासिक व इतर) वाचन करणे.
          रेडिओ/टीव्हीवरील दैनंदिन बातम्या : या बातम्यांतील महत्त्वाच्या घटना श्रवणशक्तीद्वारे व चलचित्राद्वारे स्मरणात ठेवण्यास मदत होते.
          सभा/संमेलन/कार्यक्रम/परिषदा : आपल्या शहरात किंवा आसपास होणार्‍या सभा, संमेलन, कार्यक्रम,याबाबत जागरूक राहिल्यास त्याचा फायदा नक्कीच होतो.
          मोजक्या पुस्तकांचे व काव्यांचे वाचन : किमान चर्चेत असलेल्या मोजक्या पुस्तकांचे, काव्यांचे वाचन आवर्जून करून त्याचा गर्भितार्थ समजून घ्यावा.
          गटचर्चा : हा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे, यामुळे एखादवेळेस आपल्या वाचनातून सुटलेली बातमी इतरांपर्यंत पोहोचू शकते.
          नियमित उजळणी : विविध संदर्भसाहित्यातून संकलित केलेल्या चालू घडामोडींची नियमितपणे उजळणी करावी. त्यासाठी उजळणीचे वेळापत्रक तयार करावे. 
          प्रश्नांचा सराव : चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा सराव करण्यावर भर दिल्यास विविध स्वरूपाची माहिती स्मरणात ठेवणे सुलभ जाते, कारण चालू घडामोडींविषयी प्रश्न विशिष्ट घटकांना लक्षात ठेवून विचारले जातात. 

    5) संदर्भ साहित्य 
          चालू घडामोडी घटकाच्या तयारीसाठी नेमके कोणते संदर्भसाहित्य वापरायचे याविषयी नेहमीच संभ्रम आढळतो. त्यादृष्टीने स्टडी सर्कलची स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ व जनरल नॉलेज ही 2 मासिके, नोकरी मार्गदर्शक व्यवसाय हे साप्ताहिक, मराठीतील एखादे वर्तमानपत्र, लोकराज्य व योजना ही मासिके, यांचा सातत्त्याने वापर करावा. केवळ परीक्षेच्यावेळी एखाददुसर्‍या बाजारू पुस्तकावर अवलंबून न राहता प्रारंभापासूनच प्रमाणित संदर्भाचा वापर करून सर्वसमावेशक तयारी करण्यावर भर दिल्यास हा घटक विद्यार्थ्यांच्या अंतिम यशाला सहायक ठरू शकतो. 
          चालू घडामोडींवर अद्ययावत माहिती पुरविणार्‍या अनेक वेबसाइट उपलब्ध आहेत - mystudycircle.in, www.thecalibre.co,  www.GK.com, www.newshunt.com तसेच वेळोवेळी शासन www.India.gov.com या वेबसाइटवर प्रसिद्ध करीत असलेल्या जाहिराती, सूचनांचे बारकाईने वाचन करावे. 

Share this story

Total Shares : 2 Total Views : 1049