GS-1 पेपर : भारताचा आधुनिक इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ

  • GS-1 पेपर : भारताचा आधुनिक इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ

    GS-1 पेपर : भारताचा आधुनिक इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ

    • 25 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 3282 Views
    • 6 Shares

     

     GS-1 पेपर : भारताचा आधुनिक इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ

          घटना, व्यक्ती, स्थळ, काळ हे इतिहासाचे आधार मानले जातात, पण इतिहास म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे वर्णन नव्हे, तर त्या घटनांची पार्श्वभूमी, संबंधित प्रक्रिया व त्या घटनांचे तत्कालीन व दीर्घकालीन परिणाम या बाबींचा त्यात परामर्श घेतलेला असतो, हे ध्यानात घेऊन पूर्व परीक्षेतील इतिहासातील ढोबळमानाने घटनाक्रम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पूर्वपरीक्षेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक या तीनही विभागांना समान न्याय देणे अत्यावश्यक असले तरी जास्त भर भारताचा आधुनिक इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ यावर असल्याचे दिसते. 
          विशेषत: आधुनिक भारताचा इतिहास ते ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, भारतातील गव्हर्नर जनरल्स व व्हाईसरॉय, सामाजिक आणि आर्थिक जागृती, भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व वाढ, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी, मुस्लीम लीग, भारताचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्योत्तर भारत, या संबंधीच्या ऐतिहासिक घटनांचा अभ्यास परीक्षेस पूरक ठरतो.

    1) इतिहास विषयाची व्याप्ती व स्वरूप 
          अभ्यासक्रमात नमूद केलेल्या इतिहास विषयाची व्याप्ती ही तशी जास्तच आहे. भारताच्या इतिहासाचे प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत व आधुनिक भारत असे भाग पडतात. आयोगाने इतिहासाचा अभ्यासक्रम सविस्तर दिलेला नसला तरी मागील पेपरमधील प्रश्नावरून त्याची प्रचिती येऊ शकते.
          प्राचीन भारताचा अभ्यास करताना सिंधू संस्कृती, बौद्ध धर्म, जैन धर्म, भागवत पंथ, भक्ती चळवळ, सुफी चळवळ यांचा अभ्यास करावा. मौर्य, कुशान, सातवाहन, वाकाटक, गुप्त, चालुक्य, वर्धन, राष्ट्रकूट, पांड्या, चोळ, चेरी, इ. घराण्यांच्या राजवटीच्या काळातील, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास अभ्यासावा.
          स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्त्वाच्या घडामोडी हा घटक समकालीन जीवन व त्यातील विविध प्रश्नांशी निगडित असल्यामुळे या क्षेत्रात घडणार्‍या चालू घडामोडींचे संकलन अत्यावश्यक ठरते. त्यासाठी स्टडी सर्कलच्या दोन्ही मासिकांचा व परीक्षाभिमुख नियतकालिकांचा नियमित वापर करावा. 

    2) इतिहास विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे
    अ) भारताचा इतिहास (प्राचीन व मध्ययुगीन) -
          भारताचा इतिहास तसा सिंधू-हडाप्पा संस्कृतीपासूनचा मानला जातो. त्यानंतरच्या विविध राजवटीतील देशाचा सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी महत्त्वाच्या आहेत.
          मध्ययुगीन इतिहासात पुढील राजवटी महत्त्वाच्या आहेत - दिल्लीची मुसलमानी (सुलतानशाही व मुघल) राजवट (1192 ते 1847), यादव घराणे, विजयनगरचे साम्राज्य, मराठेशाही. येथे सिंधू संस्कृती, वैदिक काळ, बौद्ध धर्म, जैन धर्म, भागवत पंथ, भक्ती चळवळ, सुफी चळवळ आणि इतर आर्थिक घटनांबाबत प्रश्न विचारले जातात.

    ब) भारतीय स्वातंत्र्य चळवळ (1857-1947) -
          स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित इतिहासाची समग्र तयारी करण्यासाठी अभ्यासक्रमाचे पुढील 3 भागात सुसंगत वर्गीकरण करावे - 1) ब्रिटिश सत्तेची स्थापना, 2) प्रबोधन काळ-सामाजिक आणि आर्थिक जागृती, 3) भारतीय स्वातंत्र्याचा लढा-भारतीय राष्ट्रवादाची निर्मिती व वाढ, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी. येथे राजकीय,प्रशासकीय,आर्थिक घडामोडींसहित विविध नेत्यांची कामगिरी व त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. 
          ब्रिटिश सत्ता स्थापना व प्रबोधन काळ - 1818 ते 1947 पर्यंतचे भारतातील आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे, रेल्वे, पोस्ट, तारायंत्र, उद्योग, जमीन सुधारणा, सामाजिक-धार्मिक सुधारणा आणि या घडामोडींचा समाजावर झालेला परिणाम यावर प्रश्न विचारले जातात. येथे ब्रिटिशांची थेट सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात विकास पावलेल्या शासकीय-प्रशासकीय-आर्थिक यंत्रणेमुळे निर्माण झालेला बदल अभ्यासावा. विविध क्षेत्रात कोणते बदल झाले,कोणत्या सुधारणा आणि उपाययोजना हाती घेण्यात आल्या, त्यांचा प्रवर्तक कोण, त्या सुधारणांची गुणवैशिष्ट्ये कोणती व त्यांचा समाजावर झालेला प्रभाव, अशारीतीने त्यांचा एकत्रित अभ्यास करता येतो. 
          1857 पर्यंतचे ब्रिटिश सत्तेचे स्वरूप हे भारतात निर्णायकपणे वर्चस्व स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांनी स्वीकारलेल्या धोरणांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. यात युरोपियन सत्तांचे भारतातील आगमन ते 1857 पर्यंतचा कालखंड यावर भर द्यावा. ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करताना फ्रेंच, डच, पोर्तुगीज या सत्तांबरोबरच मराठे, हैदर, बंगाल व पंजाबचे शासक या स्थानिक सत्तांशी संघर्ष करावा लागला. या युद्धांची कारणे, युद्धात सहभागी सत्ता व व्यक्ती, युद्धाची ठिकाणे, वर्ष, युद्धोत्तर तह, युद्धाचे परिणाम व विविध इतिहासकारांनी संबंधित युद्धाविषयी व्यक्त केलेली मते इ. बाबींचा अभ्यास करावा. 
          घटनात्मक सुधारणा व ब्रिटिश प्रशासन - ब्रिटिश प्रशासनाची माहिती संकलित करताना ईस्ट इंडिया कंपनीसाठी ब्रिटनच्या संसदेने केलेले कायदे, भारतातील महसूल, सैन्य, पोलीस, न्यायप्रशासन यात विविध काळात झालेल्या सुधारणा यावर भर द्यावा. ब्रिटिशकालीन भारतात झालेल्या घटनात्मक सुधारणांचा विचार करताना सर्वात महत्त्वाचा भर या कायद्यांतर्गत केल्या गेलेल्या तरतुदीवर द्यावा. तसेच या राजकीय सुधारणांच्या काळात असणारे भारतमंत्री,  व्हाईसरॉय, राष्ट्रीय सभेशी निगडित नेतृत्वाने या कायद्यांबाबत केलेली विधाने, विश्लेषण आणि या कायद्यांची वैशिष्ट्ये इ. बाबींचा सविस्तर अभ्यास करावा. या प्रकरणातील कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास करावा.
          1858 चा कायदा, मोर्ले-मिटो कायदा 1909, माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायदा 1919, 1935 चा भारत सरकार कायदा व 1947 चा स्वातंत्र्याचा कायदा, यांचा अभ्यास करावा. 1857 चा उठाव, सामाजिक व धर्म सुधारणा, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित समूहाच्या चळवळी, राष्ट्रवाद, ब्रिटिश प्रणीत सुधारणांस दिलेला प्रतिसाद, गांधीयुग, स्वातंत्र्यलढ्यातील विविध नेत्यांचे योगदान हे उपघटक महत्त्वाचे आहेत.  
          महसूल प्रशासनाचा विचार करताना कायमधारा, रयतवारी, महालवारी यासारख्या पद्धती कोणी? कधी? कोणत्या प्रदेशात सुरू केल्या. त्यांतील महसूल दर, त्यांचे परिणाम इ. बाबी अभ्यासाव्यात. त्याचबरोबर तैनाती फौज व संस्थानांच्या विलीनीकरणाचे धोरण अभ्यासावे. भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे व दळणवळणाच्या नव्या साधनांचा प्रसार झाला. शासन पुरस्कृत सामाजिक सुधारणा घडून आल्या. परिणामी,  समाजात सामाजिक व सांस्कृतिक बदल घडून आले. याबाबत सविस्तर माहिती संकलित करावी. रेल्वेच्या विकासाचा विचार करत असताना रेल्वे विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी शासनाने स्थापन केलेले विविध आयोग, राष्ट्रीय नेत्यांनी रेल्वेविकासाबाबत व्यक्त केलेली मते यांचा अभ्यास करावा. अशाप्रकारे इतर उपघटक - शिक्षण प्रसार, वृत्तपत्रे/छापखाना, उद्योग विकास या घटकांचा अभ्यास करावा. 
          भारताचा स्वातंत्र्यलढा - या कालखंडातील अनेक घडामोडी, व्यक्ती, संस्था, परस्परविरोधी मते असणारे विविध प्रवाह अभ्यासावेत. थोडी गुंतागुंत असणारा हा (अभ्यासाचा) कालखंड आहे. 1857 ते 1947 पर्यंतच्या भारताच्या इतिहासातील राष्ट्रवादाचा उदय  व विकास, जमातवादाचा विकास, राष्ट्रीय सभेला समांतर आदिवासी, शेतकरी आंदोलने, कामगार व डावी चळवळ, संस्थानातील प्रजापरिषदा व त्यांची आंदोलने इ. घटना अभ्यासताना या काळात झालेल्या घटनात्मक सुधारणांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.
          राष्ट्रवादाचा विकास - 1857 चा उठाव, राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ, जहाल कालखंड, बंगालची फाळणी, होमरूल चळवळ, लखनौ करार, गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या चळवळी, आझाद हिंद सेना इ. प्रमुख घडामोडी.
          राष्ट्रीय सभेस समांतर चळवळी - 1857 नंतरचे आदिवासी, शेतकरी उठाव, कामगार चळवळ, हिंदू-मुस्लीम धर्मांधतेचा विकास, युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पक्ष, आंबेडकरांची अस्पृश्यता उद्धाराची चळवळ व दृष्टिकोन, क्रांतिकारक चळवळ, डावी चळवळ व संस्थानातील चळवळी.

    क) स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास (1947-90) -
          इतिहास विषयाच्या रुंदावणार्‍या कक्षा लक्षात घेऊन स्वातंत्र्योत्तर भारतातील घडामोडींमध्ये राष्ट्रीय चळवळीतील स्त्रियांचा सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीप्रश्नविषयक चळवळी, पर्यावरण विषयक आंदोलने यावर भर द्यावा. सध्या सर्वत्र इतिहास समकाळाशी जोडण्याचा प्रयत्न होत असल्याने येथे राजकीय घडामोडींबरोबरच सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनावर भर द्यावा. 

    3) इतिहासावरील प्रश्नांचे स्वरूप
          या घटकावरील प्रश्नांचे एकंदर स्वरूप पाहिल्यानंतर असे दिसते की, सदर प्रश्न हे बहुतांशी माहितीवजा असतात. या घटकावर फारच कमी प्रश्न संकल्पनात्मक अथवा विश्लेषणात्मक स्वरूपाचे असतात. प्रश्नांचे स्वरूप ‘वस्तुनिष्ठ’ असते. इतिहास या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा सराव करणे गरजेचे आहे. परीक्षेच्या आधी किमान 3000 प्रश्नांचा सराव झाल्यास पूर्वपरीक्षेसाठी त्याची हमखास मदत होऊ शकते.
          प्रागैतिहासिक (Prehistory) व प्राचीन विभागातील सांस्कृतिक घटकावर फार कमी प्रश्न विचारले जातात. मध्ययुगीन इतिहासावरील प्रश्न मुख्यतः सुलतान काल (गुलाम घराणे ते लोधी घराणे), मुघल काल (बाबर ते औरंगजेब) व या संपूर्ण कालखंडातील साहित्य, कला, संस्कृती व समाज या उपघटकांवर प्रश्न विचारले जातात. मध्ययुगीन इतिहासाचा आवाका तसा खूप मोठा नाही, त्यामुळे चांगल्या पुस्तकांच्या मदतीने चांगले गुण मिळू शकतात.
          सनावळ्या -
          ऐतिहासिक घटनांशी संबंधित सनावळ्यांची भीती घेऊ नये. परीक्षेतील सनावळ्यांवर आधारलेले प्रश्न हे एकूण प्रश्नांच्या तुलनेत मर्यादित असतात. वारंवार वाचन व रिव्हिजन केल्यानंतर या सनावळ्या लक्षात राहतात. तक्ते, कोष्टके आणि छोट्या डायर्‍यांचा आधार घेऊन संकलित केलेल्या माहितीचे सूत्रबद्ध व सुलभ वर्गीकरण करावे आणि संकलित केलेल्या माहितीची वारंवार उजळणी होते. प्रश्नांची संख्या व रोख पाहिल्यास एक बाब लक्षात येते, की अभ्यासक्रमाचा आवाका जरी व्यापक असला तरी प्रामुख्याने 1857 ते 1947 याच काळातील घडामोडींवर जास्त भर दिलेला असतो. 
          एखादाच प्रश्न हा तारीख, वर्ष अथवा सनावळ्याबाबत विचारला जातो. प्रश्न विचारताना 1857 चा उठाव, वंगभंग चळवळ, असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन, क्रांतिकारी संघटना, भारताची फाळणी इ. निवडक बाबींवर भर दिलेला दिसतो. सततच्या वाचनानंतर या तारखा व वर्षे आपोआप स्मरणात राहतात. त्यामुळे सनावळ्यांची अनाठायी भीती बाळगण्याची गरज नसते व नाही.

    4) इतिहासाची परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा 
          ‘इतिहास’ हा विषय भूतकाळातील घडामोडींवर आधारित आहे. त्यामुळे भारताच्या गेल्या पाच हजार वर्षांचा इतिहास अभ्यासताना समजून-उमजून घटनाक्रम लक्षात घेण्यासाठी जास्तीत जास्त घटनावजा माहितीसहित प्रत्येक घटकांची वर्गीकरणात्मक सूक्ष्म माहिती लक्षात ठेवावी लागते. 
          अभ्यास करताना प्रथम या विषयातील प्रक्रिया समजून घेण्यावर भर द्यावा. त्यानंतर व्यक्ती, स्थळ व काळ या वस्तुनिष्ठ बाबींची तयारी करावी. वस्तुनिष्ठ स्वरूपाची माहिती विचारली जात असली तरी अभ्यास करताना तो व्यापक असावा. माहितीस विश्लेषणाची जोड दिल्यास अभ्यास आनंददायी व यशदायी ठरतो.
          इतिहासात अनेक घटना, ठिकाणे, दिनांक, व्यक्ती, संस्था-संघटना, नियतकालिके, वृत्तपत्रे, ग्रंथ यांचा संदर्भ वारंवार येतो. राष्ट्रीय सभेची महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे अध्यक्ष, त्या ठिकाणी संमत केलेले विविध ठराव इ. अथवा राष्ट्रीय चळवळीशी संबंधित विविध नेते, त्यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी सुरू केलेल्या संस्था, वृत्तपत्रे इ. चे सविस्तर वाचन व त्या आधारे पद्धतशीर नोट्स तयार कराव्यात.
          आधुनिक इतिहासाचे महत्त्वाच्या घटनांनुसार वेगवेगळे टप्पे पाडावेत. यानुसार नोट्स तयार कराव्यात. तक्ते, कोष्टके व छोट्या डायर्‍यांचा आधार घेऊन संकलित केलेल्या माहितीचे सूत्रबद्ध व सुलभ वर्गीकरण करून त्यांची वारंवार उजळणी करावी. राजकीय नेते, अधिकारी, सुधारक व्यक्ती, संस्था, त्यांचे कार्य यांचा अभ्यास करावा. ब्रिटिश गव्हर्नर व व्हॉईसरॉयची कारकीर्द, त्यांनी केलेली कामे, कायदे व त्यांच्या काळातील महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय चळवळी इ. बाबींचे कोष्टक तयार करून बारकाईने अभ्यास करावा. स्वातंत्र्योत्तर काळातील संस्थानांचे विलीनीकरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षण सुधारणा यावरही प्रश्न विचारले जातात. 

    5) संदर्भ साहित्य 
          या विषयाचा आवाका जरी प्रचंड असला तरी काही ठरावीक संदर्भग्रंथांचे सतत वाचन करावे. सुरुवातीला हा अभ्यास शक्यतो आठवी ते दहावी पर्यंतच्या शालेय पुस्तकातून करावा. विशेषतः 10 वी, 11 वी व 12 वीसाठीची NCERT ची पुस्तके वाचावीत. ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी अगदी सातवीच्या NCERT पुस्तकांपासून सुरुवात केली तरी चालेल. त्यानंतर इतर संदर्भग्रंथांना हात घालावा.
          इतिहास अभ्यासासाठी पुढील पुस्तके महत्त्वाची -
    - स्टडी सर्कल प्रकाशनाचे भारताचा व संपूर्ण इतिहास
    - मराठी विश्वकोश खंड-12 (भारत)
    - इंग्रजी भाषेतील बिपन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एनसीईआरटीची इतिहासाची पुस्तके. 
          प्राचीन भारत (Ancient India) -
    1) प्राचीन भारताचा राजकीय इतिहास - प्राचार्य आठवले (मूळ लेखक - हेमचंद्र रॉयचौधरी)
    2) प्राचीन भारताचा सांस्कृतिक इतिहास - प्रा. गायधनी व माहुरकर
          मध्ययुगीन भारत (Medieval India) -
    1) मध्ययुगीन भारत का इतिहास - I, II,III - जे. एल. मेहता
    2) Medieval India-I, II - Satish Chandra (English)
     
          आधुनिक भारत (Modern India) -
    1) आधुनिक भारताचा इतिहास - सुमन वैद्य व शांता कोठेकर
    2) Freedam Struggle of India - Bipan Chandra
    3) Modern Indian History - Grover and Grover

Share this story

Total Shares : 6 Total Views : 3282