CSAT पेपर तयारी : भाग (4)
- 16 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 853 Views
- 0 Shares
व्यक्ती अंतर्गत कौशल्य व संवादकौशल्य
या घटकावर MPSC च्या आत्तापर्यंतच्या एकाही परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला नाही, पण तो येणार्या परीक्षांत विचारला जाऊ शकतो. तसेच या घटकातील संकल्पनांचा उपयोग हा निर्णयक्षमतेवरील प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधणे आणि उतार्यांचे आकलन करण्यासाठी होऊ शकतो. शिवाय मुलाखतीच्या तयारीसाठी सदर घटक खूपच महत्त्वाचा आहे.
’आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्य’ या घटकामध्ये उमेदवाराचा स्वभावविशेष आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील बारकावे तपासले जातात. प्रशासकीय सेवेत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वातील काही कौशल्यांचा विशेष उपयोग होऊ शकतो, त्यामुळे उमेदवारामध्ये ती विकसित झाली आहेत का, हे तपासण्यास प्रश्न विचारले जातात.
उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाशी तसेच त्याच्या अभिवृत्तीशी संबंधित बाबीवर काही प्रश्न विचारून, त्याची प्रशासकीय साक्षरता तपासल्यास तो अधिकारी होण्याच्या मानसिकतेचा आहे की नाही याची चाचपणी करणे सोपे जाते. या घटकाशी संबंधित सर्व मुद्दे, संकल्पना या लोकप्रशासन, मानसशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र - यासारख्या अभ्यास विषयातील आहेत. या विविध अभ्यास विषयांच्या संदर्भात त्या सर्वांचा सखोल अभ्यास करणे येथे अपेक्षित नसले तरी अधिकारिपदावर कार्यरत असताना उपयुक्त ठरणारी कौशल्ये आत्मसात करताना व्यक्तिमत्त्वाशी संबंधित काही प्रवृत्ती, संकल्पना यांची ओळख असावी लागते. या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी अशा बाबी उपयुक्त ठरतात.
1) आंतरवैयक्तिक कौशल्याची व्याप्ती व स्वरूप
या घटकात दोन बाबींचा समावेश असतो -
1) व्यक्तीव्यक्तींमधील परस्परसंबंध.
2) समूहाचा एक सदस्य म्हणून असणारे परस्परसंबंध.
सनदी अधिकारी हा एकाच वेळी विविध घटकांशी संवाद साधत असतो - जनता, हाताखालील कर्मचारीवर्ग, वरिष्ठ अधिकारी. या प्रत्येक घटकाची मानसिकता, हितसंबंध, विचारपद्धती वेगवेगळी असते. त्यांच्याशी संबंध साधताना त्यासाठी काही मूलभूत मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे -
1) प्रत्येक घटकाशी (विशेषतः) त्यांच्या मातृभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करणे.
2) भाषेवर एका किमान स्तरावरचे प्रभुत्व हवे. संवाद साधताना योग्य शब्द व वाक्ये निवडावीत. संवाद गरजेपेक्षा जास्त लांबवू नये.
3) श्रवण (Listening), विचारणा (Asking) आणि आढावा (Summarizing) याला प्रभावी संवादाचा त्रिकोण म्हणतात.
4) एखाद्या घटकाशी संवाद साधताना घटकाची मानसिक जडणघडण, सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक व शैक्षणिक परिस्थिती, इतिहास, समस्या याबाबत किमान माहिती मिळवून जागरुक राहणे.
5) संवादातून नेमके काय साधायचे,त्याची स्पष्टता हवी.
6) समोरच्या व्यक्तीच्या संवादाद्वारे आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, याची जाणीव हवी.
7) अधिकार्याने चांगला श्रोता (Listener) असायला हवे.
8) प्रत्यक्ष संवाद साधून गैरसमज दूर करावेत, कोणतीही गोष्ट कधीही गृहीत धरू नये.
9) अधिकार्याने देहबोलीचा योग्य वापर करावा.
10) अधूनमधून संवाद प्रक्रियेचा आढावा घेतल्यास संवाद कोणत्या दिशेने जात आहे, याचे भान राहते.
आंतरवैयक्तिक कौशल्य - एखाद्या व्यक्तीस नेतृत्वशैली, तिने विकसित केलेल्या संपर्कजाळ्याद्वारे तसेच सांघिक प्रयत्नांद्वारे आंतरवैयक्तिक कौशल्ये विकसित करता येतात-
1) योग्य परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता
2) अधिकारांचे हस्तांतरण करून समन्वय व नियंत्रण साधण्याचे कौशल्य.
3) सांघिक कार्य करण्याची वृत्ती विकसित करणे. ‘टीमवर्क‘ करताना जी सहकार्यवृत्ती, निर्णय निर्धारण व अधिकारांचे हस्तांतरण करण्याची क्षमता निर्माण होते.
4) परस्पर लाभासाठी व्यक्ती, संस्था व संघटनाशी प्रभावी व अर्थपूर्ण संबंधाद्वारे कार्यक्षम संपर्क जाळे निर्माण करणे.
5) सकारात्मक व रचनात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार करून इतरांना व स्वत:ला प्रेरणा देणे.
6) निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकार्याने समूहाला प्रेरणा देऊन प्रभावीपणे कार्यरत ठेवावे.
संवाद कौशल्य -
दैनंदिन व्यवहारात एकमेकांशी संवाद साधताना काही नियमांचे पालन करावे लागते. मनात आलेले बोलून टाकावे हे खरे असले तरी बोलताना काही तारतम्य बाळगणे आवश्यक असते. अधिकार्यास दररोज वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्तींसमवेत काम करावे लागते. यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून बोलताना काही नियमांचे पालन करावे.
1) अधिकार्याच्या संवादास स्पष्टोक्ती असावा. त्याने स्वत:च्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे अनेकदा निर्माण होणारे गैरसमज टाळता येतात.
2) भाषिक कौशल्ये - ही क्षमता विकसित करताना त्यात योग्य शब्दांचा वापर व प्रभावी वाक्यरचना असावी. संभाषणात स्पष्टता व नेमकेपणा हवा. आवश्यक तेथे समर्पक उदाहरणांचा वापर करावा.
3) स्मितहास्य - सतत सकारात्मक व उत्साही मुद्रा राहील याची काळजी घ्यावी.
4) उत्तम श्रोता - इतर व्यक्तींच्या म्हणण्याकडे/बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.
5) गुणग्राहकता - इतरांनी केलेल्या चांगल्या वृत्तीचे कौतुक करावे आणि गुणग्राहक वृत्ती विकसित करावी.
6) सुसंवाद - समूहात असताना सहकार्य, सुसंवादी पद्धतीने कार्य करणे, इतरांना सतत प्रोत्साहित करणे.
7) नेतृत्व गुण - सदर कौशल्य जाणीवपूर्वक विकसित करणे.
8) संघर्षाचे निराकरण - जेव्हा जेव्हा विवाद वा संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्याचे निराकरण करणे.
9) विनोद बुद्धी - तणाव निवळण्यासाठी विनोद बुद्धीचा प्रसंगी वापर करणे.
10) संपर्क जाळे - परस्पर लाभासाठी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून प्रभावी संपर्क जाळे निर्माण करावे.
संभाषणाबाबत महत्त्वाचे मुद्दे -
1) सर्वप्रथम आवाजावर ताबा मिळवणे आवश्यक असते. उच्च पट्टीतील आवाज फार काळ ऐकणे कठीण असते, त्याच्या सोबत काम करणार्या लोकांना त्रास होण्याचा धोका असतो. यासाठी हळू आवाजात आणि सामान्य पट्टीत बोलावे. एखाद्याच्या जवळ असाल तर हळू आवाजात बोलावे. सामूहिक संभाषण करत असताना मोठ्या आआवाजात बोलावे.
2) काही लोकांना वेगाने बोलण्याची सवय असते. यामुळे एखादे वाक्य परत बोलावे लागते. वाक्याचा शेवट आणि त्यातील महत्त्वाचे शब्द यांचे इतरांना आकलन होण्यासाठी सावकाश बोलावे.
3) एकाच लयीत बोलणे कंटाळवाणे होते. लहान मुलांशी, हाताखालच्या लोकांशी, वरिष्ठ अधिकार्यांशी बोलताना स्वरात बदल करावा लागतो. अन्यथा आपल्या बोलण्यास लोक कंटाळतात व बोलण्याकडे लक्ष देण्याचे टाळतात.
4) आपला प्रत्येक शब्द समोरच्याला समजणे आवश्यक असते. बोलण्यात स्पष्टता असणे गरजेचे असते. आपला प्रत्येक शब्द कानापर्यंत जाऊन त्याचे आकलन होणे गरजेचे असते. समोरच्या व्यक्तीने कान टवकारून ऐकण्यापेक्षा, आपण स्पष्ट शब्द बोलणे सोयीचे असते.
5) ज्यावेळी मोठ्या यंत्रणेत काम केले जाते त्यावेळी अधिकार्यामूळे मोठा शब्दसंग्रह असायला हवा. आजूबाजूची वरिष्ठ मंडळी अधिकार्याची वेगवेगळी शब्दसंपदा तपासत असावेत. त्यासाठी सतत वाचन, लेखन, मनन करणे आवश्यक असते.
6) बोलताना चुकीचे शब्द वापरले जात नाहीत ना याकडे लक्ष द्यावे. एखादा चुकीचा शब्द अवमान ठरू शकतो. बोलण्यापूर्वी पूर्ण विचार करून संवाद साधावा.
7) एखाद्या संघाचे नेतृत्व करताना समोर उभे राहून बोलावे लागते. कोणाशीही बोलताना नजर चुकवून बोलणे टाळावे. डोळ्यात डोळे घालून बोलल्याने बोलणार्या व्यक्तीबाबत विश्वासार्हता वाटू लागते.
8) बोलताना चेहर्याचे हावभाव व हातवारे संवाद पुरक ठरतील याकडे लक्ष द्यावे.
2) आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्यासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे
या घटकामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या अडथळ्यांवर उमेदवार कशाप्रकारे मात करतो हे पाहिले जाते. तसेच प्रशासकीय सेवेत विशेष उपयोग होऊ शकणारे स्वभावविशेष व बारकावे एखाद्या उमेदवारात किती प्रमाणात विकसित झाले आहेत, हेही तपासले जाते. या घटकातील प्रश्नांना कोणतेही एक असे अचूक/बरोबर उत्तर नसले तरी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा कल कोणत्या गुणवैशिष्ट़यांकडे झुकणारा आहे हे त्याद्वारे तपासले जाते. यामध्ये पुढील वर्तन वैशिष्ट्याचा समावेश होतो -
1) स्वत:चे विचार व भावना स्पष्टपणे शब्दात व्यक्त करणे.
2) स्वत:च्या निर्णयाचे योग्य शब्दात समर्थन करता येणे.
3) सर्वांना बरोबर घेऊन जातना सहकार्यांशी व कनिष्ठ अधिकार्यांशी मिळून मिसळून वागणे.
एखादी व्यक्ती, तिचा कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि योग्य वेळेस अचूक निर्णय घेण्याची क्षमता या गुणांच्या बळावर प्रशासकीय सेवेत यशस्वीपणे काम करू शकते.
सर्वांना बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती प्रशासनास हवी, याचा अर्थ मितभाषी आणि लोकांत कमी मिसळणारी व्यक्ती प्रशासकीय सेवेस अपात्र आहे, असा नाही. पण अशा व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तीला प्रशासकीय सेवेत स्वत:स जुळवून घेणे थोडे अधिक कष्टप्रद वाटू शकते. येथे उमेदवार प्रशासकीय सेवेतील जबाबदार्या व आव्हाने पेलण्यास समर्थ आहे किंवा नाही हे तपासले जात असल्याने त्यांनी स्वत:ला या सेवेतील कामाच्या व प्रक्रियांच्या योग्यतेचे बनवण्यासाठी विचार करावा. त्यानुसार स्वतःच्या दृष्टिकोनात व एकंदरीत व्यक्तिमत्त्वात आवश्यक बदल करणे हे उमेदवारांचे ध्येय असले पाहिजे.
अधिकारी म्हणून यशस्वी होण्यासाठी उमेदवारासाठी पुढील बाबी महत्त्वाच्या आहेत -
1) वैयक्तिक क्षमता (पर्सनल क्वालिटीज)
2) पूरक कौशल्य (सॉफ्ट स्कील्स)
3) व्यावसायिक कौशल्य (प्रोफेशनल स्कील्स)
प्रशासनात कार्यरत असताना उमेदवाराच्या वरील क्षमतांच्या कार्यकुशलतेत इतर गोष्टी अंतर्भूत आहेत. या गोष्टी व्यावसायिक पातळीवरच नव्हे तर वैयक्तिक व सामाजिक पातळीवरही व्यक्तिमत्त्व विकसित करतात. अशी कौशल्ये आत्मसात केली तर ‘परफेक्शनिस्ट’ (सर्वांगसुंदर व्यक्तीमत्व) बनण्याचा मार्ग सुकर होतो.
1) वैयक्तिक क्षमता -
प्रत्येक व्यक्तीत स्वत:चे अंगभूत गुण व क्षमता उपजतच असतात. त्यामुळे चारचौघांत त्याची स्वतंत्र ओळख निर्माण होते. अनेकदा अशा वैयक्तिक क्षमतांना आपण ‘गॉड गिफ्ट’ म्हणूनही संबोधतो. पण हे गॉड गिफ्ट टिकवून ठेवणे, त्याचा विकास करणे हे शेवटी प्रत्येक व्यक्तीच्याच हातात असते चांगला अधिकारी म्हणून गणले जाण्यासाठी या गुणांचा वापर होतो. एक चांगली अधिकारी व्यक्ती म्हणून खाली नमूद केलेल्या 10 गुणांना आत्मसात केले पाहिजे -
1) सकारात्मक दृष्टिकोन (पॉझिटिव्ह अॅटिट्यूड)
2) आत्मविश्वास (सेल्फ बिलिफ)
3) प्रामाणिकपणा (ऑनेस्टी)
4) एकाग्रता (इंटिग्रिटी)
5) सातत्य (कन्सिस्टन्सी)
6) आदर (रिस्पेक्ट)
7) विश्वासार्हता (रिलायाबिलिटी)
8) कष्ट करण्याची तयारी (हार्डवर्क)
9) तळमळ(डेडिकेशन)
10) कामाचा वेग (स्पीड)
2) पूरक कौशल्ये (सॉफ्ट स्कील्स) -
सध्याच्या युगात शैक्षणिक पात्रतेबरोबरच सॉफ्ट स्कील्स, प्रशासनातील प्रवेश व प्रमोशनसाठी आणि एकूणच व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यक्तीच्या सवयी, दृष्टिकोन आणि खुबी यातून सॉफ्ट स्कील्स आकाराला येतात. ज्या व्यक्तींना वरिष्ठ पातळीपर्यंतचा प्रवास करायचा आहे, त्यांना सॉफ्ट स्कील्सशिवाय प्रगती करणे अवघड आहे. या सॉफ्ट स्कील्सचा 3 प्रकारच्या आहेत -
(अ) कॉर्पोरेट स्कील्स
(ब) एम्प्लॉयबिलिटी स्कील्स
(क) लाइफ स्कील्स.
अ) कॉर्पोरेट स्कील्स : कलेक्टर, सचिव, अधीक्षक, एमडी, सीईओ, संचालक या पातळीवरील या स्कील्सविषयी उमेदवाराने जागृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याला वरिष्ठ अधिकार्यांप्रमाणे वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता आणि तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणताना केले जाणारे सहकार्याची कला अवगत होते. या स्कील्समध्ये पुढील बाबींचा समावेश होतो -
1) राजकीय संवेदनशीलता
2) व्यावसायिक व वाणिज्यिक जागरूकता
3) योजनापूर्ण व्यवस्थापन
4) फंड स्रोत व नियोजन
5) माहिती व्यवस्थापन
6) संघटना व नियंत्रण
7) टीम बिल्डिंग
8) संवाद व प्रोत्साहन
9) नेटवर्किंग व जनसंपर्क
10) बदल करणे व स्वीकारण्याची वृत्ती.
ब) एम्प्लॉयबिलिटी स्कील्स - कामातील परफॉर्मन्ससाठी व एकूणच प्रगतीसाठी पुढील बाबी अधिकार्यासाठी महत्त्वाच्या असतात -
1) कामाविषयी सजगता
2) कामाच्या ठिकाणी स्पष्ट संवाद
3) संघटित काम व नेतृत्व
4) आत्मविश्वास व स्वत:हून पुढे येऊन सहभाग घेणं
5) समस्यांवर विचारविनिमय व त्या सोडवण्याची कुशलता
6) कोणत्याही परिस्थितीशी सहजपणे जुळवून घेण्याची वृत्ती
7) टीकेला सामोरं जाण्याची तयारी
8) चौकटीबाहेरचा विचार करण्याची कुवत व उत्साह.
नेतृत्वाचा संबंध केवळ आघाडीवर राहणे हा नसून या संज्ञेत सहकार्याची भावना, उत्तम नियोजन व व्यवस्थापन, निर्णय क्षमता व थेट (व्हर्बल) मौखिक संवाद साधण्याची स्पष्टता यांच्याशी निगडित आहे. या एम्प्लॉयबिलिटी स्कील्स अंगीकारताना हळूहळू इतर गोष्टीही आत्मसात केल्या जातात.
क) जीवन कौशल्ये (लाइफ स्कील्स) - प्रशासनात उच्च पदावर नोकरी करताना केवळ तिथला परफॉर्मन्स महत्त्वाचा नसतो, तर एक व्यक्ती म्हणून वैयक्तिक जीवनातही उमेदवार कसा आहे, इतरांशी वागण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे महत्त्वाचे असते. थोडक्यात, समाजातली उमेदवाराची प्रतिमा, प्रशासन क्षेत्रातील यशासाठीही महत्त्वाची असते. लाइफ स्कील्सचा संबंध डोके, हृदय, हात व आरोग्य यांच्याशी व त्या अनुषंगाने वर्तनाशी असतो. लाइफ स्कील्स ही व्यक्तिमत्त्वाशी आणि नैसर्गिकरीत्या व्यक्तिमत्त्व विकासाशी निगडित असते.
डोके : कोणतीही गोष्ट करताना ती विचारपूर्वक केली जाते. उदा. नोंदी ठेवणे, विविध गोष्टींचा पुनर्वापर, नियोजन/संघटन, लक्ष्य निश्चित करणे, कामातील विचारप्रक्रिया अधिक प्रगल्भ करण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी शिकणे, चिकित्सक विचारशक्ती, निर्णय क्षमता.
हृदय : हृदयाचा संबंध अर्थातच भावनेशी तदअनुषंगाने इतरांशी नाते निर्माण करणे आणि काळजीपूर्वक जपणे याच्याशी आहे. अधिकारी माणसांशी जोडले जाण्याच्या प्रक्रियेत अनेक बाबी समाविष्ट आहेत. त्यातील पहिली बाब म्हणजे त्यांचे विचार, त्या विचारातील मतभेद स्वीकारणे, वादविवादातून निर्णयाप्रत पोहोचणे, सामाजिक कौशल्य, सहकार्याची भावना त्यातून संवाद वृत्तीविकसित करणे, इ. या वर्तनातून निर्माण होणारे नाते जपणे ही वृत्ती. विचारांची देवाणघेवाण, मतांचा आदर, सहानुभूती, इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना, याद्वारे नाते जपण्याची क्रिया घडत जाते.
हात : हात याचा शब्दश: अर्थ न घेता मदत, सहकार्याची वृत्ती असा अर्थ अपेक्षित आहे. कामाच्या ठिकाणी टीमवर्कला प्राधान्य देणे तसेच सामाजिक जाणिवेने विविध सामाजिक कार्यात सहभागी होणे, त्यातून आपल्यापरीने योगदान देणे गरजेचे असते.
आरोग्य : केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. तणावमुक्त आणि निरोगी आयुष्य सुदृढ विचारांची निर्मिती करते. त्यातून वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे कॉर्पोरेट जगतातच नव्हे तर संपूर्ण समाजात असे व्यक्तिमत्त्व आदरणीय ठरते.
3) व्यावसायिक कौशल्य -
प्रशासकीय व कॉर्पोरेट क्षेत्रात शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रोफेशनल स्कील्सचा आवश्यकतेनुसार वापर करणे सध्याच्या काळात गरजेचे झाले आहे. नोकरी-व्यवसायात रोजच्या रोज काम करताना, प्रोफेशनल्स स्कील्सचा वापर ठिकठिकाणी करावा लागतो. अर्थात, प्रत्येक विभागानुसार या स्कील्समध्ये फरक पडू शकतो. आसपास घडणार्या गोष्टींशी, बदलांशी जुळवून घेणे आणि त्यानुसार स्वत:मध्ये बदल करणे, यातून प्रोफेशनल स्कील्सचा विकास होतो.
संवाद-संभाषण कौशल्य
संभाषण कलेला व्यक्तिमत्त्वामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यातून व्यक्ती आपले विचार प्रकट करू शकते. कोणतीही कला व्यक्तीकडे उपजत नसते, तर ती साध्य करण्यासाठी परिश्रम घेऊन ती विकसित करावी लागते. तद्वतच संभाषण कला विकसित होण्यासाठी व्यक्तीकडे ज्ञान व भाषेवरील प्रभुत्व असणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रभावी संभाषण कला अतिशय महत्त्वाची आहे. नुसत्या संभाषण कलेच्या जोरावर चर्चिलने दुसरे महायुद्ध जिंकले, असे म्हटले जाते.
व्याख्या : संवाद कला म्हणजे एखाद्या व्यक्तीची भाषेद्वारे प्रभावीपणे विचार प्रकट करणेची कला होय. संवाद कलेमध्ये खालील गोष्टी आवश्यक आहेत -
1) आवाज : आवाज ही जरी नैसर्गिक देणगी असली तरी त्यावर प्रयत्नाने नियंत्रण मिळवता येते. चांगल्या संभाषण कलेसाठी व्यक्तीकडे दुसर्यास ऐकू जाईल इतका स्पष्ट आवाज असणे आवश्यक आहे. खणखणीत आवाज सुधारता येतो. भाषणामध्ये त्यातील शब्द व वाक्यांच्या अर्थाप्रमाणे आवाजातील चढउतार करणे परिणामकारक ठरते.
2) शब्दाचे उच्चार : शब्दांचे उच्चार जर योग्य पद्धतीने केले नाहीत तर त्याचा अर्थ दुसर्या व्यक्तीस समजत नाही. असे संभाषण प्रभावी होत नाही म्हणून शब्दांच्या उच्चारांना संभाषणामध्ये महत्त्व आहे. शब्दांचे उच्चार स्पष्ट व शब्दकोशामध्ये दिल्याप्रमाणे केले पाहिजे. यासाठी मोठ्या आवाजात इंग्रजी पुस्तके वाचावित.
3) शब्दसंग्रह : शब्दसंग्रहाशिवाय व्यक्तीचे भाषेवर प्रभुत्व होत नाही. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके वाचावीत. एकाच अर्थाचे भरपूर शब्द जमवावेत. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व संपादन होते. स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचणे यासाठी खूप उपयुक्त ठरते.
4) बोलताना योग्य ठिकाणी थांबणे : बोलताना योग्य जागी थोडे थांबत थांबत बोलले तर ऐकणार्या व्यक्तीला त्या वाक्याचा अर्थ स्पष्टपणे कळतो. वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कांही हे करीत असताना भाषा ओघवती ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे.
5) ज्ञान : भाषा कितीही ओघवती असली व शब्दसंग्रह समृद्ध असला तरी ज्या विषयावर बोलायचे आहे, त्या विषयाचे ज्ञान सुध्दा चांगले असले पाहिजे ज्ञान व बोलण्याची कला या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. चांगले ज्ञान असले की भाषासुद्धा आपोआपच ओघवती होते.
7) पटवून देण्याची कला : संभाषण कलेतील हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कलेमुळे व्यक्तीची भाषा प्रभावशाली दिसते व त्याचे व्यक्तिमत्त्व प्रभावी वाटते. एखादा मुद्दा पटवून द्यायचा असेल तर तो तर्कशुद्ध पद्धतीने मांडावा लागतो. त्यात दिलेली माहिती शास्त्रीय आधारावर असेल तर मुद्दा पटविणे सोपे जाते.
8) विनोद : संभाषणामध्ये विनोद हे वातावरण निर्मितीसाठी केले जातात. त्यामुळे श्रेात्यांमध्ये एक आनंदी व उत्साही वातावरण निर्माण होऊन व ते संभाषण ऐकण्यासाठी उत्सुक होतात. विनोदामुळे अपरिचित व अप्रसिद्ध वक्ता देखील श्रोत्यांशी जवळीक निर्माण करुन जातो. संभाषण ऐकताना काही ठरावीक काळानंतर श्रेात्यांना कंटाळा येतो. संभाषणातील एकाग्रता व आवड कमी होते. अशावेळी क्षणिक विनोद केल्यास श्रोते पुन्हा उत्साहित होऊन संभाषण आवडीने ऐकू लागतात. विनोदाच्या माध्यमातून एखादा तात्त्विक विचार श्रोत्यांना सहजपणे पटवून देता येतो.
9) देहबोली : देहबोली म्हणजे शारीरिक हालचालीतून विचार व भावना प्रकट होणे. या हालचाली नकळत होत असतात. व्यक्तीच्या मनामध्ये जे विचार चाललेले असतात त्याप्रमाणे त्याच्या शरीराच्या अवयवांची हालचाल होत असते. या अवयवांमध्ये हात, पाय, डोळे, चेहरा यांचा समावेश जास्त होतो, बसण्याच्या व उभ्या राहण्याच्या पद्धतींचा सुध्दा देहबोली मध्ये अभ्यास केला जातो. देहबोलीचा सखोल अभ्यास केल्यास दुसर्याचे मनात काय विचार चालले आहेत हे समजते.
10) म्हणी : म्हणी या दैनंदिन व्यवहारातील अनुभवावरून तयार केल्या जातात. त्यात मार्मकिता, विनोद व पटवून देण्याची क्षमता असते. म्हणी योग्य ठिकाणी, योग्यवेळी व योग्य अर्थाने वापरल्यास भाषण प्रभावी होते, कारण त्यातून ज्ञान व अनुभव प्रकट होत असतात. उदा. उंटावरून शेळ्या हाकणे, या म्हणीचा अर्थ माणसाने प्रत्येक काम दूर अंतरावरून न करता, स्वत:च्या प्रत्यक्ष नियोजनाखाली केले पाहिजे.
सादरीकरण - स्वत:ची मते बनवणे व ती उत्तमरीत्या सादर करता येणे ही दोन पूर्णत: भिन्न अशी कौशल्ये आहेत. त्यातील सादरीकरणाचा भाग हा जितका आंतरवैयक्तिक कौशल्यांवर आधारित आहे तितकाच, किंवा कांकणभर जास्तच संभाषण कौशल्यावर अवलंबून आहे. कोणत्याही संभाषणाचा मुख्य आधार म्हणजे योग्य शब्द व त्यांचा योग्य ठिकाणी वापर. प्रशासकीय अधिकार्यासारख्या व्यक्तीला राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांपासून ते सामान्य नागरिकापर्यंत सर्वांशी संवाद साधण्याचे कौशल्य असावे लागते. म्हणून उत्तम संवादकौशल्य म्हणजे छापील, पुस्तकी भाषा बोलता येणे नव्हे, तर ज्या व्यक्तीशी आपण संवाद साधत आहोत त्या व्यक्तीला चटकन समजेल, संवादादरम्यान तिचा अवघडलेपणा वाटणार नाही, तसेच गरजेनुसार समोरच्या व्यक्तीस प्रतिसाद देण्याचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याची प्रक्रिया होय.
वैयक्तिक संवाद - अशाप्रकारचे संभाषण कौशल्य विकसित करण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे उत्तम वक्त्यांच्या शब्द निवडीतील प्राधान्याकडे बारकाईने लक्ष देणे व स्वत: संभाषण करताना जाणीवपूर्वक शब्द निवडणे. जिथे-जिथे संवाद औपचारिक स्वरूपाचा असतो, तिथे अभिवादनांची आणि ठरावीक शब्दसमूहांची ओळख हवी. मुळातच संभाषणामधील अभिवादनांचे महत्त्व समजून घ्यावयास हवे. आयुष्यात वापरली जाऊ शकणारी इंग्रजी अभिवादने (गुड डे, थँक्स, गुड मॉर्निग) ही संभाषणांची सुरुवात अतिशय उत्तमरीत्या करून देतात. विशेषत: जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला फार चांगले ओळखत नसतो तेव्हा अशा अभिवादनांचा आवर्जून उपयोग करावा. जशी ही अभिवादने संभाषणांच्या सुरुवातीस उपयोगी पडतात तशीच संभाषणांच्या शेवटी देखील त्यांचे विशिष्ट स्थान असते.
समूहाशी संवाद - एका व्यक्तीशी संवाद साधणे व अनेक व्यक्ती असलेल्या गटांशी संवाद साधणे ही दोन भिन्न कौशल्ये आहेत. यामध्ये पुढील विविध प्रसंगांचा समावेश असतो -
1) गटचर्चा
2) पत्रकार परिषद
3) प्रतिनिधिमंडळाबरोबर संवाद
4) एखाद्या नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल अशा ठिकाणी लोकांबरोबरचा संवाद.
5) समारंभामध्ये दिली जाणारी भाषणे. (स्वागत, समारोप, उद्घाटन प्रसंग)
गटचर्चा - गटचर्चेमध्ये दुसर्या व्यक्तीने मांडलेल्या मुद्द्याला धरून आपले म्हणणे मांडत असताना, दुसर्याचे मत पटल्याचे दर्शवणारी वाक्ये जसे की, ’मला हा मुद्दा पूर्ण मान्य आहे. मला फक्त त्यात छोटीशी भर घालायची आहे..’ अशाप्रकारे मांडणी करावी. किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध मत आपण मांडत आहोत, अशावेळेस ते आदरपूर्वक सांगावे. थोडक्यात भाषिक कौशल्य महत्त्वाचे ठरू शकते. विषयाशी सुसंगत मुद्द्यांबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाविषयी सकारात्मक भूमिका तयार करण्यासाठी भाषा हा महत्त्वाचा घटक आहे.
गटचर्चेमध्ये एक प्रकारची सहजता असणे अपेक्षित आहे. त्यासाठी गटचर्चेतील ठरावीक संवाद प्रत्यक्षात कसे घडतील याचा बारकाईने विचार करणे, ते प्रसंग डोळ्यांसमोर उभे करणे व कल्पणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. अशावेळेस माहिती अथवा भावना पोहोचवणे याला प्राधान्य दिल्यास भाषेचे दडपण जाणवणार नाही व योग्य शब्दांचा, वाक्यरचनांचा वापर करणे सरावाचे होऊन जाते.
संवादकौशल्याची तयारी म्हणून इंग्रजी टी.व्ही. वाहिन्यांवर होणार्या गटचर्चा पाहाव्यात. औपचारिक भाषेबरोबर उत्तर-प्रत्युत्तर कसे दिले जाते याच्या निरीक्षणाकरता या माध्यमाचा उपयोग होतो. तसेच वृत्तपत्रे, मासिके यांमधून येणार्या मुलाखती वाचणे फायद्याचे ठरते. यांमध्ये प्रश्न विचारणार्याची शैली, उत्तर देताना वापरली जाणारी भाषा याचा अभ्यास करावा. उत्तर देणारी व्यक्ती एखाद्या मुद्द्यावर भर देण्यासाठी कोणत्या शब्दसमूहांचा वापर करते, याचे निरीक्षण करावे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, स्वतःच्या चुकीबद्दल दिलगिरी, दुसर्याच्या यशाबद्दल निखळ आनंद, पाल्याच्या भवितव्याची चिंता, प्रतिनिधी मंडळाबरोबर बोलताना मुद्देसूदपणा या सर्व संवादांचे अनेकपदरी पण साध्या, वापरातील इंग्रजी-मराठीमधून सादर करता येणे, हे संवादकौशल्याचे खरे उद्दिष्ट आहे.
3) आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्यासंदर्भात प्रश्नांचे स्वरूप
या घटकावरील प्रश्न सोडवत असताना, आयोग या प्रश्नातून माझ्यामधील कोणते गुणवैशिष्ट्य तपासून बघत आहे याचे भान असणे अतिशय गरजेचे आहे. असा दृष्टिकोन, चौफेर अवांतर वाचन, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये विविध स्तरांवरील रस, देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्या घडामोडींबद्दलची माहिती, स्वतःचे अभ्यासपूर्ण बनवलेले मत शब्दांत व्यक्त करण्याचा सराव, यासारख्या अनेकविध गोष्टी व उपक्रमांमधून स्वत:मध्ये बाणवला जाऊ शकतो.संवाद कौशल्य व आंतरवैयक्तिक कौशल्य या घटकाची बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ परीक्षापद्धतीमधून चाचणी घेणे हे एक आव्हान आहे. आयोगाला कोणत्या गुणसमूहाची चाचणी अपेक्षित आहे हे समजून घेताना ‘गुड गव्हर्नन्स‘ हा प्रशासनाचा पाया बनला आहे, हे लक्षात घेऊन त्यासाठी पूरक स्वभाव वैशिष्ट्ये शोधणारे प्रश्न विचारले जाऊ शकतात.
या घटकातील प्रश्न तीनप्रकारे विचारले जाऊ शकतात-
1) व्यक्तीव्यक्तींमधील संवादकौशल्यांवर आधारित प्रश्न
2) समूह कार्याप्रतीचा कल (Teamwork Aptitude)
3) नेतृत्वगुण चाचणी (Leadership Aptitude)
वरील प्रत्येक घटकावरील काही नमुना प्रश्न -
1) व्यक्तीव्यक्तींतील संवादकौशल्य - यात काही प्रसंग अथवा प्रश्नावल्यांचा वापर केला जातो व प्रत्येक प्रतिसादासाठी विशिष्ट गुण दिले जातात.
सूचना : खालील प्रश्नांची उत्तरे पुढील पर्यायातून एकाची निवड करून द्या.
(a) नेहमी
(b) बर्याचवेळा
(c) कधीतरी
(d) कधीच नाही
1) चर्चेदरम्यान इतरांना माझे म्हणणे सर्वांना कळत आहे की नाही याचा मी आढावा घेतो. (उत्तर : a)
2) मला एखादा मुद्दा कळला नाही, तर मी प्रश्न विचारतो. (उत्तर : a)
2) समूह कार्याप्रतीचा कल - यामध्ये एका समूहाचा सदस्य म्हणून उमेदवार कसे वागतो किंवा सदस्य म्हणून त्याच्यामध्ये काय गुण व अवगुण आहेत, याची चाचपणी केली जाते. उमेदवार व्यक्तिगत पातळीवर किंवा एकेकटे काम करतो, त्यावेळी कामावर पूर्णपणे त्याचे नियंत्रण असते व परिणामांची जबाबदारीदेखील पूर्णपणे त्याची असते. मात्र ज्यावेळी एका समूहाचा सदस्य म्हणून तो काम करतो. त्यावेळी पुढील गुणांची आवश्यकता असते - परस्परचर्चेने कामाची व्यूहरचना ठरवणे, आपली टोकाची मते गटावर न लादणे, सर्व सदस्यांना सोबत घेऊन चालणे, उत्तम संवादकौशल्य असणे, इत्यादी. गुण तपासण्यासाठी सामान्यत: एखादा प्रसंग देऊन त्यावर प्रश्न विचारले जातात. येथे काही प्रसंग किंवा प्रश्नावल्यांचा वापर केला जातो. प्रश्नांच्या उत्तरांसाठी काही पर्याय दिलेले असतात. पर्याय निवडीला 0 ते 10 यांसारखे गुण दिले जातात. एकूण गुणांवरून उमेदवार प्रभावी गटसदस्य बनू शकतो का, याचा अंदाज बांधला जातो.
सूचना : खालील प्रश्नांची उत्तरे शोधताना पुढील पर्यायातून एकाची निवड करून द्या.
1) समूहाने ठरवलेली उद्दिष्टे गाठता येत नसतील, तर तुमचा दृष्टीकोन काय असतो?
(a) इतरांच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो.
(b) माझ्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतो.
(c) गटप्रमुखाला दोष देतो.
(d) नवीन उद्दिष्टे ठरविणे
(उत्तर : d)
2) तुमच्या गटातील सहकार्याच्या तुलनेत तुम्ही कमी पडत असाल, तर तुम्ही काय करता?
(a) मला जमेल तेवढे करतो.
(b) सोबतच्या सदस्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो.
(c) सोबतच्या सदस्याला माझ्याइतके काम करण्याची विनंती करतो.
(d) राजीनामा देऊन दुसरीकडे नोकरी शोधेन.
(उत्तर : b)
येथे योग्य उत्तराला 2.5 गुण, तर अयोग्य उत्तराला 0 गुण दिले जातात. त्याव्यतिरिक्त इतर प्रतिसादाला 1.5 व 1 असे गुण मिळतात.
3) नेतृत्वगुण चाचणी - सनदी सेवांसाठी निवडले जाणारे अधिकारी हे प्रत्यक्ष जबाबदारीच्या पदावर काम करताना छोट्या मोठ्या गटाचे नेतृत्व करीत असतात. एका गटाचा नेता म्हणून काम करताना त्याच्यामध्ये पुढील विशिष्ट गुण असणे गरजेचे असते - आपल्या गटाचे ध्येय परस्परचर्चेने ठरवणे, ध्येय प्राप्त करण्यासाठीची व्यूहरचना ठरवणे, गटाच्या सदस्यांमधील गुण व दोष हेरून त्यानुसार त्यांच्यामध्ये कामाची वाटणी करणे, गटातील विविध सदस्यांमध्ये उद्भवणार्या समस्या, मतभेद यांचे परस्पर - चर्चेने निराकरण करणे, गटातील संवादवाहिन्या निकोप, निरोगी व मुक्त ठेवणे, संकटकाळी स्वत: पुढाकार घेऊन सर्व गटाला कार्यान्वित करणे, गटाचे मनोधैर्य सतत उंचावणे, इत्यादी. हे गुण तपासण्यासाठी एखाद्या प्रसंगावरील प्रश्न किंवा विशिष्ट विधानांना आपल्याकडून मिळणारा प्रतिसाद याद्वारे चाचणी केली जाते.
सूचना : खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा -
(a) पूर्णपणे सहमत
(b) बराचसा सहमत
(c) बराचसा अहसमत
(d) पूर्णपणे असहमत
1) माझ्या कार्यालयातील प्रत्येक कर्मचार्याच्या खाजगी अडचणींची मला जाणीव आहे. (उत्तर : a)
2) माझी चूक इतर गटसदस्यांसमोर स्वीकारणे मला कमीपणाचे वाटते. (उत्तर : d)
3) कनिष्ठ कर्मचार्यांना प्रशिक्षण व समुपदेशन केल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत फरक पडेल असे मला वाटत नाही. (उत्तर : c)
याशिवाय प्रश्नांचे सर्वसाधारणपणे स्वरूप पुढीलप्रमाणे असू शकते -
• सांघिक कामात प्राधान्य ठरवण्याकरिता समूहातील प्रत्येकाचे मत विचारात घेणे आवश्यक आहे का?
1) पूर्ण मान्य
2) कामाच्या संदर्भावर अवलंबून
3) पूर्ण अमान्य
4) सांगू शकत नाही.
स्पष्टीकरण : या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय 2 किंवा 3 आहे, असे अनेकजणांना वाटू शकते, परंतु या प्रश्नामधून अधिकारी म्हणून विशेष गुण व्यक्तीकडे आहेत का नाही, याचा शोध घेतला जात असतो व अधिकार्याकडे याबाबत असलेले हे गुणवैशिष्ट्य म्हणजे दुसर्याच्या मताला किंमत देणे, गटातील सर्वांना समान वागणूक देणे. एखाद्याचे मत विचारात घेणे व दुसर्याच्या मतानुसार निर्णय घेणे यातील फरक उमेदवारास माहीत असणे आवश्यक आहे. वरील प्रश्नाच्या संदर्भात यांचा संदर्भ घेतल्यास पर्याय 1 योग्य उत्तर आहे.
4) आंतरवैयक्तिक कौशल्य आणि संभाषण कौशल्याची परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा
या घटकासाठीची अत्यंत महत्त्वाची तयारी म्हणजे आपल्या सभोवतालचे खोलात जाऊन निरीक्षण करण्याची क्षमता अंगी बाणवणे. समस्या सोडवण्याकरिता त्या विषयातील ज्ञानाबरोबरच मनुष्य म्हणून संवाद साधण्याचे जे कौशल्य आपल्याकडे आहे त्याचा प्रभावी पद्धतीने वापर करणे, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
या घटकावरील प्रश्नात वैयक्तिक स्वरूपाचे अडथळे यावर उमेदवार कशाप्रकारे मात करेल हे बघितले जात असल्याने प्रश्नातच उपयुक्त ठरणारे स्वभावविशेष व व्यक्तिमत्त्वातले बारकावे उमेदवारात किती प्रमाणात विकसित झाले आहेत हे तपासले जाते. तसेच सहकार्यांशी व कनिष्ठ अधिकार्यांशी मिळून मिसळून वागणे, स्वत:च्या भावना स्पष्टपणे शब्दात व्यक्त करता येणे, स्वत:च्या निर्णयाचे योग्य शब्दात समर्थन करता येणे, स्वत:च्या निर्णयाचे योग्य शब्दात समर्थन करता येणे अशाप्रकारची व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये तपासली जातात.
कोणतीही व्यक्ती कामाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि योग्य वेळेस अचूक निर्णय घेण्याची क्षमता या गुणांच्या बळावर प्रशासकीय सेवेत यशस्वीपणे काम करू शकते. याचमुळे या घटकातील प्रश्नांना कोणतेही एक बरोबर असे उत्तर नसले तरी उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचा कल कोणत्या गुणवैशिष्ट्यांकडे झुकणारा आहे हे तपासले जाते. यातूनच उमेदवार प्रशासकीय सेवेतील जबाबदार्या व आव्हाने पेलण्यास समर्थ आहे किंवा नाही हे पाहिले जाते. म्हणूनच स्वत:ला या सेवेतील कामाच्या व प्रक्रियांच्या योग्यतेचे बनवण्यासाठी विचार करण्याच्या दृष्टिकोनात व एकंदरीत व्यक्तिमत्त्वात आवश्यक बदल करणे हे उमेदवारांचे ध्येय असले पाहिजे.
आयोग या प्रश्नातून माझ्यामधील कोणते गुणवैशिष्ट्य तपासून बघत आहे याचे भान असणे अतिशय गरजेचे आहे आणि असा दृष्टिकोन अनेकविध गोष्टी व उपक्रमांमधून स्वत:त बाणवला जाऊ शकतो. त्यासाठी पुढील बाबींवर भर द्यावा - चौफेर अवांतर वाचन, सामाजिक व राजकीय क्षेत्रांमध्ये विविध स्तरांवरील रस, देशातील व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणार्या घडामोडीबद्दलची माहिती, स्वत:चे अभ्यासपूर्ण बनवलेले मत मोजक्या शब्दात व्यक्त करण्याचा सराव.