GS-1 पेपर : सामान्य विज्ञान
- 01 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 1132 Views
- 1 Shares
GS-1 पेपर : सामान्य विज्ञान
स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सामान्य विज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बर्याच विद्यार्थ्यांना या घटकाचा आवाकाच लक्षात येत नाही. या घटकावरील प्रश्नांचा मुख्य उद्देश म्हणजे उमेदवार त्याच्यासभोवती घडणार्या विविध घटना आणि प्रक्रियांचे बुद्धिवादी तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून आकलन करू शकतो की नाही हे तपासणे हा आहे. गेल्या काही वर्षात या टॉपिकवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. त्यातील बरेच प्रश्न प्रदूषण आणि देशापुढील विविध पायाभूत समस्या सोडविण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान अशा उपयोजित स्वरूपात विचारले जातात. तसे पाहिले तर हा अभ्यासक्रम खूपच विस्तृत आहे, तरीही सामान्य विज्ञानाचा अभ्यास करताना मानवी आरोग्य, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अणुतंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींवर भर द्यायला हवा.
एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत या घटकावर सुमारे 20 ते 30 प्रश्न विचारले जातात.
1) सामान्य विज्ञान विषयाची व्याप्ती व स्वरूप
उमेदवाराची विचारशैली बुद्धिवादी आहे की नाही तसेच दैनंदिन जीवनात भेडसावणार्या समस्या आणि अडचणींचे तो शास्त्रीय पद्धतीने आकलन करतो की नाही, दैनंदिन जीवनाबाबत त्याच्यात किती जिज्ञासा आहे, तो किती चतुर आहे, त्याची विश्लेषण क्षमता व वास्तवतेवर भर देण्याची वृत्ती तपासण्यासाठी विज्ञानातील पुढील घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात -
1) पदार्थ विज्ञान
2) रसायनशास्त्र
3) प्राणी विज्ञान
4) वनस्पती विज्ञान व कृषी
5) अणू विज्ञान
6) अवकाश विज्ञान
7) आरोग्य विज्ञान व आहारशास्त्र
8) माहितीतंत्रज्ञान व संगणक
9) जैवतंत्रज्ञान
10) आधुनिक तंत्रज्ञान.
सामान्य विज्ञानामध्ये जास्त भर हा मूलभूत विज्ञानावर असला तरी विविध क्षेत्रात संशोधनाद्वारे विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्या क्षेत्रातील भारताची प्रगती यावर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे भारताने गेल्या 70 वर्षात केलेली विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती येथे महत्त्वाची ठरते.
2) सामान्य विज्ञान विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे
1) भौतिकशास्त्र -
भौतिक शास्त्रातील प्रश्न हे पुढील मुद्यावर भर देणारे असतात - मूलभूत संकल्पना, ध्वनी, उष्णता, प्रकाश, विद्युत, चुंबकत्व आणि किरणोत्सार यांचा दैनंदिन जीवनातील वापर, लेसर, अतिसंवाहकता, नॅनो टेक्नॉलॉजी, ऊर्जा-पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा साधने सौर, वारा, जैववायू, जीववस्तुमान, भूऔष्णिक व इतर नवीकरणयोग्य ऊर्जा ऊर्जास्रोतांचे तंत्रज्ञान, जैववायू (बायोगॅस), औष्णिक वीज कार्यक्रम.
2) रसायनशास्त्र -
नागरी लोकसेवा पूर्वपरीक्षेतील सामान्य विज्ञानातील रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम हा शालेय स्तरावरचा असून त्यामध्ये रसायनशास्त्रातील विविध संकल्पना, दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी मूलद्रव्ये, संयुगे, मिश्रणे, औषधे, रसायने, खते, स्फोटकद्रव्ये, आम्ले यासारख्या पदार्थांचे गुणधर्म आणि वैशिष्ट्ये यावर प्रश्न विचारले जातात. रसायनशास्त्रावरील प्रश्न हे मानवी जीवनाशी संबंधित असणार्या आहारातील विविध घटक, कृषी क्षेत्रात वापरली जाणारी खते आणि संजीवके, प्रदूषणास कारणीभूत ठरणारे हरितवायू, दैनंदिन जीवनात वापरली जाणारी विविध आम्ले, अल्कली, धातू आणि त्यांची संमिश्रे यावर विचारले जातात.
2012 साली दोहा येथे 18 वी कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही पर्यावरण परिषद पार पाडली. तत्पूर्वी रिओ दी जानेरो येथे पृथ्वी परिषद पार पडली होती. या दोन्ही परिषदांत जगाला भेडसावणार्या अनेक प्रदूषण विषयक समस्यांची चर्चा झाली. त्यामुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषणास कारणीभूत घटक आणि त्यांची रासायनिक रचना यांची चांगली तयारी करावी.
3) जीवशास्त्र -
जीवशास्त्रातील प्रश्न हे मुख्यत्वे प्राणी विज्ञान, वनस्पती विज्ञान, जनुक विज्ञान, या विषयातील महत्त्वाच्या मुद्यावर असतात. या घटकाची तयारी करताना पर्यावरणशास्त्रातील मुद्याशी त्यांची सांगड घालावी. पर्यावरण आणि सामान्य विज्ञान या दोन्ही अभ्यास घटकांचा एकत्रित अभ्यास केल्यास चांगले गुण मिळू शकतात.
प्राणीविज्ञानामध्ये प्राण्यांचे वर्गीकरण, धोक्यात असलेल्या प्रजाती, मानवी जीवनास उपयुक्त ठरणारे प्राणी, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्यव्यवसाय यांचा अभ्यास करावा. प्राण्यांपासून मनुष्याला होणारे आजार विशेषतः बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू आणि त्यावरील संशोधन यावर प्रश्न विचारले जातात.
वनस्पती विज्ञानांमध्ये वनस्पतीचे वर्गीकरण, महत्त्वाच्या वनस्पती, कृषी विज्ञान, वनस्पतीतील चयापचयन, औषधी वनस्पती, विषारी वनस्पती, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उपयुक्त वनस्पती, वनशास्त्र यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसेच पेशी व ऊतीविषयक माहिती, आनुवंशिकता, बायोटेक्नॉलॉजी, कृषी, याबाबतची माहिती मिळवावी. विशेषत: पुढील मुद्यावर भर द्यावा -फलोत्पादन - फळांचे प्रकार व लागवड, फळप्रक्रिया उद्योग, पोषणमूल्य. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय- जनावरांचे प्रकार व संकरित जाती, पशुखाद्य,दुग्धव्यवस्थापन व उत्पादने.
4) मानवी जीवशास्त्र व आरोग्य विज्ञान -
सामान्य विज्ञानात सर्वात जास्त भर हा मानवी जीवशास्त्र व आरोग्य विज्ञान या उपघटकावर असतो. मानवी जीवशास्त्रामध्ये मनुष्याच्या शरिरातील विविध संस्था विशेषतः पचन संस्था, उत्सर्जन संस्था, रुधिराभिसरण, रक्त, उत्सर्जन संस्था आणि चेतासंस्था यांचा सविस्तर अभ्यास करावा. अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब विकार, कर्करोग यासारख्या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यास कारणीभूत घटक, त्याचे निदान करण्याच्या पद्धती, उपचार आणि पुनर्वसन याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. आहारशास्त्रामध्ये समतोल आहार, कुपोषण, ट्रान्सफॅटस, जनुकीय पिके, जीवनसत्त्वांची कमतरता/आधिक्य यासारखे मुद्दे महत्त्वाचे आहेत.
3) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप
विज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो, यासंबंधी प्रश्न विचारले जातात. मूलभूत संकल्पना, सिद्धांत, शास्त्रज्ञ, शोध, संस्था, उपकरणे यावर प्रश्न विचारले जातात. देशाला भेडसावणार्या पुढील समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणार्या तंत्रज्ञानावर प्रश्न विचारले जातात -
1) पर्यावरण समस्या
2) लोकसंख्या समस्या
3) शैक्षणिक समस्या
4) लोकस्वास्थ्य
5) ऊर्जा समस्या
6) गृहनिर्माण समस्या
7) परिवहन समस्या
8) संपर्कविषयक समस्या
9) अन्नधान्य समस्या
4) परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा
विज्ञानाच्या विविध घटकांतील मूलभूत संकल्पना, त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोजन, त्यासंदर्भातील सनावळ्या व आकडेवारी, विविध घटकातील प्रगती, त्यासंबंधी कार्यरत शासकीय यंत्रणा आणि उपाययोजनात्मक कार्यक्रम इ. बाबींची वस्तुनिष्ठ तयारी केल्यास अधिक गुण प्राप्त करणे शक्य होते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्य यांमधील महत्त्वपूर्ण आणि मूलभूत उपघटकांची तयारी आवश्यक आहे. त्यासाठी साधारणपणे दहावीपर्यंतच्या विज्ञानाच्या पुस्तकांतील महत्त्वाच्या बाबींचे वाचन उपयुक्त ठरते. त्यामधील महत्त्वाच्या संज्ञा, सूत्रे यांची तयारी काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. मूलभूत विज्ञानाच्या तयारीसाठी आधीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे उपयुक्त ठरते. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी खालील घटकांवर भर द्यावा -
1) भौतिकशास्त्र - ध्वनी, प्रकाश, उष्णता, विद्युत चुंबकत्व, लेसर, नॅनो टेक्नॉलॉजी, ऊर्जा इत्यादी.
2) रसायनशास्त्र - अणुरचना, कार्बन संयुगे, पेट्रोलियम पदार्थ, दैनंदिन जीवनात वापरातील विविध संयुगे.
3) आरोग्यशास्त्र - आहारविज्ञान, मानवाला होणारे रोग, मानवाच्या शरीरातील कार्यपद्धती.
4) भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती - अवकाश तंत्रज्ञान, अण्वस्त्र तंत्रज्ञान, भारताचा क्षेपणास्त्र कार्यक्रम, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, कृषी विज्ञान, इत्यादी.
भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगतीचा अभ्यास करताना पुढील मुद्यावर भर द्यावा -
1) शास्त्रज्ञ, शोध, संस्था व संकल्पना
2) उपकरणे आणि तंत्रज्ञान
3) भौतिकशास्त्रातील प्रगती
4) अवकाश व आण्विक विज्ञानाची प्रगती
5) रसायनशास्त्रातील प्रगती
6) मानवी आरोग्यशास्त्र व जीवशास्त्रातील प्रगती
7) संगणक व माहितीतंत्रज्ञान
5) संदर्भ साहित्य
सदर विषयाची तयारी करताना शालेय स्तरावरील आठवी ते दहावीच्या सामान्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यविज्ञान यांचा अभ्यास करावा. या अभ्यासाद्वारे उमेदवाराला विज्ञानातील विविध संकल्पनांची माहिती होऊ शकते. ही माहिती जाणून घेतल्यानंतर तिचा दैनंदिन जीवनात कसा प्रत्यय येतो, याबाबतची माहिती विविध मासिके आणि वर्तमानपत्रात आलेल्या माहितीवरून जाणून घ्यावी. येथे युपीएससीच्या विविध परीक्षांत विज्ञानावर विचारलेल्या प्रश्नांचा आधार घ्यावा त्यातून विज्ञान, तंत्रज्ञानाशी संबंधित उपयोजित प्रश्न कशाप्रकारचे विचारले जातात हे लक्षात येते.
भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जी. अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या ‘टार्गेट 3 बिलियन्स‘ या पुस्तकात जगातील उपेक्षित जनतेला विकासाचे लाभ मिळवून द्यावयाचे असतील तर विविध पायाभूत सुविधांच्या विकासात विज्ञानाचा वापर कसा प्रभावीपणे करता येतो हे सुरेखपणे नमूद केले आहे.
स्टडी सर्कलचे स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ मासिक आणि मुख्य परीक्षेच्या विज्ञान-तंत्रज्ञान पुस्तकामध्ये याबाबतची सखोल माहिती देण्यात आलेली आहे, त्यांचा अभ्यास करावा.