GS-1 पेपर : जगाचा व भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
- 27 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 4882 Views
- 18 Shares
GS-1 पेपर : जगाचा व भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल
महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल या घटकावर सर्वसाधारणपणे 15 ते 20 प्रश्न विचारले जातात.
1) विषयाची व्याप्ती व स्वरूप
पूर्वपरीक्षेच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमात पुढील घटकांचा समावेश आहे - भारताचा व जगाचा -प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक-भूगोल. MPSC परीक्षेत महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक व प्राकृतिक भूगोलाचाही अभ्यास करावा लागतो. येथे भूगोलाच्या मूलभूत माहितीबरोबरच त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम महत्त्वाचा आहे. जगभर होणार्या भूराजकीय घडामोडी, नैसर्गिक आपत्ती, आपल्या राष्ट्रपती व पंतप्रधानांनी ज्या देशांचे दौरे केले किंवा ज्या देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आले त्या देशांचा भूगोल, विविध परिषदांची ठिकाणे व वातावरणातील बदल - यांच्याशी संबंधित मुद्यांचा अभ्यास येथे महत्त्वाचा ठरतो.
1) जगाचा प्राकृतिक भूगोल - जगाचा प्राकृतिक, आर्थिक व सामाजिक भूगोलाचा अभ्यास विस्तृत स्वरूपाचा आहे. येथे पुढील घटक अभ्यासावेत -
- सूर्यमाला आणि विश्व, पृथ्वी : रचना व प्राकृतिक जडणघडण, भूरूपविकास नियंत्रित करणारे घटक
- वातावरण : संरचना, सौर उत्सर्जन व उष्मा समतोल
- हवामानाचे घटक : तापमान, वायुदाब, ग्रहीय व स्थानिक वारे, मान्सून, वायुराशी आणि पुरोभाग व चक्रीवादळे व हवामान प्रदेश
2) जगाचा सामजिक भूगोल - यामध्ये पुढील मुद्यांचा समावेश होतो - जागतिक लोकसंख्येची वाढ, वितरण व घनता. लोकसंख्या एक साधनसंपत्ती. लोकसंख्येची संरचना - वेगवेगळ्या देशातील स्त्री - पुरुष प्रमाण, साक्षरता, वयोगटानुसार लोकसंख्येचे प्रमाण, ग्रामीण व नागरी लोकसंख्येचे प्रमाण - वसाहती, शहरीकरण प्रक्रिया व समस्या
3) जगाचा आर्थिक भूगोल - यामध्ये पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत - आर्थिक भूगोल व त्याचे आधुनिक युगात महत्त्व, प्रमुख आर्थिक क्रिया, जगातील वेगवेगळ्या देशांत प्राथमिक द्वितीयक, तृतीय व चतुर्थक व्यवसायांत गुंतलेल्या लोकांचे प्रमाण. नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे व ऊर्जा साधनसंपत्ती - वितरण, महत्त्व व विकास
4) भारताचा प्राकृतिक भूगोल - परीक्षेत या घटकावर जास्त भर असतो. त्यातील महत्त्वाचे मुद्दे -
1) भारतीय उपखंडाची उत्क्रांती व भूरूपवर्णन, महत्त्वाचे भूरूपकीय प्रदेश
2) भारताचे शेजारील राष्ट्राच्या, हिंद महासागर, आशियाच्या व जगाच्या संदर्भातील मोक्याचे ठिकाण.
3) भारताचा रचनात्मक भूगोल व मुख्य रचनात्मक (फिजिओग्राफिक) विभाग - पर्वत व डोंगर
4) हवामान, पर्जन्यमान व तापमान
5) पर्जन्यवृष्टी, भारतीय मान्सूनचे तंत्र, पावसाचे पूर्वानुमान, अवर्षण व पूर
6) नद्या व धरणे, जलसिंचन, पूर महापूर, दुष्क़ाळ
7) वनसंपत्ती, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने व व्याघ्र प्रकल्प
5) भारताचा सामाजिक भूगोल - भारतीय सामाजिक व सांस्कृतिक विविधता जगाच्या दृष्टिने कुतुहलाची बाब आहे. या घटकांत पुढील मुद्यांचा समावेश होतो - लोकसंख्या, स्थलांतराची कारणे व परिणाम, ग्रामीण व शहरी वसाहती, शहरीकरण प्रक्रिया व समस्या
6) भारताचा आर्थिक भूगोल - भारताच्या आर्थिक भूगोलासंदर्भात पुढील घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो - खनिज संपत्ती, उद्योगधंदे, वाहतुकीचे जाळे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, शेती व प्रक्रिया उद्योग, पर्यटन.
1) नैसर्गिक साधनसंपत्ती - कृषी, मृदा, पीके, वनोत्पादने
2) खनिजे व ऊर्जा साधनसंपत्ती - वितरण, महत्त्व व विकास
3) पर्यटन - धार्मिक पर्यटन, वैद्यकीय पर्यटन, इको पर्यटन, संरक्षित वने
4) राजकीय विभाग व प्रशासकीय विभाग
2) भूगोल विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे
1) जगाचा प्राकृतिक भूगोल -
प्राकृतिक भूगोल हा भूगोलाचा गाभा असल्याने सर्व मूलभूत संकल्पना त्यात समाविष्ट होतात. हा घटक पूर्णतः संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. संकल्पनात्मक बाबींबरोबरच उपयोजित घटक व चालू घडामोडींचा संदर्भ जोडून (विशेषतः भूकंप, पूर, त्सुनामी, चक्रीवादळे) या प्रकरणाचा अभ्यास करावा. या घटकामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाच्या रचनेपासून महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमधील सर्व घटक अभ्यासताना भूरूपशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, तसेच महाराष्ट्र व भारताच्या प्राकृतिक रचनेसंबंधी संकल्पनांचा अभ्यास करावा.
जगाच्या प्राकृतिक भूगोलात पुढील मुद्यांवर भर असतो - पृथ्वीची अंतर्रचना, वातावरण, खंड व महासागर यांचे वितरण, जागतिक हवामान विभाग, नद्या, पर्वत शिखरे, खडकांचे व मातीचे प्रकार, पृथ्वीचे परिवलन व परिभ्रमण, विश्व व खगोलशास्त्र, भौगोलिक वैशिष्ट्ये इत्यादी.
प्राकृतिक भूगोलात खगोलीय व सामान्य भूगोलाचे पुढील घटकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे -
सूर्यमाला - सूर्याविषयी सविस्तर माहिती त्याच्या पृष्ठभागाचे व अंतर्गत तापमान, सूर्यकुलाची उत्पत्ती व त्या संबंधीचे एक तारका व द्वितारका सिद्धांत, लाप्लासच्या तेजोमेघ, कॉकियरचा उल्का, जीन्स व जेफरीज यांचा भरती सिद्धांत, डॉ. आल्फव्हेनची विद्युतचुंबकीय परिकल्पना, प्रा. होईल व डॉ. जयंत नारळीकर यांचा स्थिर स्थिती सिद्धांत अभ्यासणे आवश्यक आहे. तसेच ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्काविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
पृथ्वी एक ग्रह - सूर्यमालेतील जीवसृष्टी असलेला व सध्या आपले निवासस्थान असलेल्या पृथ्वीची सर्वांगीण माहितीवर आधारित प्रश्न विचारले जातात. पृथ्वीच्या अभ्यासात तिचा आकार, त्रिज्या, आकार, व्यास, विषुववृत्तीय व धु्रवीय परीघ, क्षेत्र पृथ्वीवरील भूमिखंडे व महासागर त्यांचे वितरण व वैशिष्ट्ये. पृथ्वीवरील अक्षवृत्ते रेखावृत्ते, बृहदवृत्ते त्यांचे महत्त्व. पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचा उपग्रह चंद्र भरती ओहोटी, चंद्रकला, भरती ओहोटीचे परिणाम, ग्रहणे त्यांचे प्रकार यासंबंधीच्या आकृती व त्याची वैशिष्ट्ये इ. उपघटक यामध्ये समाविष्ट आहेत. तसेच कालगणना विविध देशातील कॅलेंडर्स म्हणजे पंचांगाचाही अभ्यास यांत समाविष्ट आहे.
पृथ्वीच्या गती - परिवलन, परिभ्रमण व त्यांचे परिणाम स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, त्यावरील उदाहरणे.
मृदावरण - मृदावरणाची निर्मिती, खडकांचे प्रकार, वितरण भूमीस्वरूपे वर्गीकरणे, खडक खनिजे, भूहालचाली त्यांचे प्रकार मंदगतीच्या भूहालचालीमुळे निर्मित भूरूपे, भूकंप ज्वालामुखी, कारणे, परिणाम अपक्षय, क्षरण व संचयन मृदा निर्मिती व प्रकार.
जलावरण - महासागराची तळरचना, सागरजलाच्या हालचाली व सागरजलाचे गुणधर्म, तापमान व क्षारता, लाटा प्रकार, भरती-ओहोटी, सागरी प्रवाह निर्मिती कारणे व परिणाम, सागरी संपत्ती
वातावरण - अर्थ व व्याख्या वातावरणाचे मुख्य थर व घटक, त्याची निर्मिती व महत्त्व. हवा व हवामान, सौरशक्ती तिचे वितरण व औष्णिक संतुलन (उष्णतेचा ताळेबंद) तापमानाचे वितरण, तापमानाची विपरितता, तापमान कक्षा, वायुदाबाचे क्षितिज समांतर वितरण व उभ्या दिशेतील वितरण, समदाब रेषांची वैशिष्ट्ये वायुदाब आणि ग्रहीय वारे, स्थानिक वारे, जेटवारे, आवर्त व प्रत्यावर्त. आर्द्रता वितरण व महत्त्व, वृष्टीचे प्रकार, पर्जन्य प्रकार व जगातील पर्जन्याचे वितरण, वायुराशींचे प्रकार, वायुराशींच्या सीमा, हवामानाचे वर्गीकरण.
वातावरणातील विविध घटक व प्रक्रिया - यातील सर्व मुद्दे पूर्णतः संकल्पनात्मक असून त्यांचा अभ्यास करताना क्रमवार एकेक मुद्दा समजावून घेऊन त्याचे नीट वाचन करावे. वातावरणाच्या विविध घटकांचे महत्त्व व भूमिका याच्याशी संबंधित ‘औष्णिक संतुलनाचा’ मुद्दा आहे. औष्णिक संतुलनावर वातावरणाचे तापमान पट्टे आधारित आहेत. वातावरणीय तापमान पट्ट्यांवर वातावरणीय दाबपट्ट्यांची निर्मिती अवलंबून असते. वातावरणीय दाब पट्ट्यांवर ग्रहीय वार्यांची निर्मिती अवलंबून असते.त्यानंतर मान्सून, वायुराशी व सीमा, आवर्त यांचा अभ्यास करावा. प्रत्येक मुद्दा समजण्यासाठी आधीच्या मुद्यांचा सखोल अभ्यास करावा.
हवामान - या घटकाअंतर्गत पुढील मुद्यावर भर द्यावा - एखाद्या अक्षवृत्तावरील विशिष्ट ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षभर निरनिराळी असण्याची कारणे, उंचीनुसार तापमान कमी न होणारा वातावरणाचा थर, वातावरणाचे विविध थर व त्यांची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची, विविध अक्षवृत्ते व वाहणारे वारे. हवामानाचा दाब बदलण्यास कारणीभूत घटक व उंचीपरत्वे सरासरी तापमानात होणारी घट. 2.5 हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेली महाराष्ट्रातील ठिकाणे, वृष्टीचे प्रकार व त्यासाठी आवश्यक स्थिती यांच्या जोड्या, नैऋत्य मान्सून पावसाचे भारताच्या एकूण पावसातील योगदान. तापमानानुसार होणारे वनस्पतीचे लाँग डे, शॉर्ट डे, न्यूट्रल डे अशाप्रकारचे वर्गीकरण, शाश्वत शेतीसाठी उपयुक्त घटक. वायुराशी, सीमा, मान्सूनच्या अंदाजाचे तंत्र, अवर्षण, हवामान विभाग, महाराष्ट्राचे कृषीवायू हवामान विभाग, दुष्काळ व पाण्याचे दुर्भिक्ष्य, डीपीएपी, कृषी, औद्योगिक व घरगुती क्षेत्रासाठी पाण्याची मागणी.
2) जगाचा सामाजिक भूगोल -
लोकसंख्या - जगातील विकसित व विकसनशील देशातील लोकसंख्येविषयीच्या समस्या, अतिरिक्त, न्यूनतम व पर्याप्त लोकसंख्येची संकल्पना, लोकसंख्या संक्रमण व इतर सिद्धांत, स्थलांतराचा इतिहास, स्थलांतराचे मुख्य प्रकार, स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, स्थलांतराची विविध कारणे व त्यांचे नैसर्गिक, सामाजिक लोकसंख्या रचनेवरील व पर्यावरणावरील परिणाम. वेगवेगळ्या देशातील लोकसंख्या धोरण.
मानवी वंश - वंशाचा अर्थ आणि व्याख्या मानवी वंशाचे वर्गीकरण, मुख्य वंशाची वैशिष्ट्ये, जगातील वंशीय समूह व त्यांचे वितरण, वांशिक समूह, वंशभेद निर्मूलीकरण जमातीचा अर्थ, जमातीची लोकसंख्या, जमाती किंवा आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये, आदिवासी समुदायातील परिवर्तन. जगातील प्रमुख जमाती, धर्मानुसार जागतिक लोकसंख्येचे वितरण, पर्यावरण व संस्कृती, लोकसंख्या व समाज कल्याण, जगातील प्रमुख सांस्कृतिक विभाग.
वस्त्या - वस्त्यांचा भूगोल, ग्रामीण व नागरी वस्त्या ग्रामीण व नागरी वस्त्यांचे स्थान, स्थिती, प्रकार, आकार, अंतर व अंतर्गत रचना, वस्त्यांचे वर्गीकरण, नागरी वस्तीचे आकृतिबंध आकृतिबंधाच्या संदर्भातील समकेंद्र वर्तुळ सिद्धांत, वर्तुळ विभाग सिद्धांत, बहुकेंद्र सिद्धांत, नगर - ग्रामीण संक्रमण पहा व शहराचं प्रभाव क्षेत्र, मध्यवर्ती स्थान सिद्धांत आणि वस्त्यांची श्रेणी, वस्त्यांचे प्रारूप किंवा आकृतिबंध तसेच ग्रामीण व नागरी वस्त्यांच्या प्रश्नांच्या अभ्यासाचा समावेश सामाजिक भूगोलाच्या शाखेत केला जातो.
3) जगाचा आर्थिक भूगोल -
नैसर्गिक साधनसंपत्ती - अर्थ व व्याख्या, साधनसंपत्तीचे वर्गीकरण, जगातील वनांचे प्रकार, वितरण व महत्त्व, खनिज संपदा उत्पादन, वितरण, साधनसंपत्तीचे संधारण. जगातील शेतीचे मुख्य प्रकार, स्थलांतरित शेती, सखोल उदरनिर्वाहाची शेती, यांत्रिक शेती, मळ्याची शेती, मिश्रशेती, मंडईबागायती, शेतीतील उत्पादने पशुपालन मच्छीमारी क्षेत्रे. प्रमुख उद्योगधंदे, जगातील औद्योगिक प्रदेश, आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूक जगातील आंतर खंडीय लोहमार्ग, आंतरराष्ट्रीय जलमार्ग व नळमार्ग सुवेज व पनामा कालवा त्यांचे आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या दृष्टीने फायदे तोटे.
4) भारताचा प्राकृतिक भूगोल -
भारताची विविध प्राकृतिक वैशिष्ट्ये ही भारतीय हवामानाचे स्वरुप निर्धारित करतात. परीक्षेच्या दृष्टीने हा घटक सर्वाधिक महत्त्वाचे आहे, कारण भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था भारतीय मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचा उदय, त्याचे विविध सिद्धांत, त्याचा प्रवास, वितरण या बाबी अभ्यासाव्या. विशेषत: मान्सूनच्या निर्मितीचे आधुनिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. हा सर्व भाग संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. त्यातील एल निनो, ला निना, दक्षिणी दोलनाचा सिद्धांत इ. मुद्दे बारकाईने अभ्यासावेत. भारतातील पर्जन्यविषयक समस्या, अवर्षण, पूर यांचा अभ्यास करावा. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण व त्यातील स्थल-कालानुसार विचलन यावर आहे. भारताच्या हवामानाचा संपूर्ण संकल्पनात्मक अभ्यास (विशेषतः मान्सूननिर्मिती) करावा. भारतातील पर्जन्याशी संबंधित समस्या, पूर व अवर्षण, त्यांच्या निर्मूलनासाठी शासकीय कार्यक्रम व योजनांचा अभ्यास अपेक्षित आहे.
5) भारताचा सामाजिक भूगोल -
लोकसंख्येचे स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम, ग्रामीण व नागरी वसाहती, त्यांच्या समस्या हे घटक अभ्यासावेत. या घटकाच्या तयारीसाठी लोकसंख्येची सर्वसमावेशक माहिती अभ्यासावी. जनगणनेतील एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, नागरीकरण, स्त्री-पुरुष प्रमाण, जन्म व मृत्यू दर, बालमृत्यू दर, मातामृत्यू दर अशा महत्त्वपूर्ण आकडेवारीवर भर द्यावा. नागरीकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्यांच्या योजनांचा अभ्यास करावा. सद्यःस्थितीतील समस्या व त्यावरील शासकीय योजनांचे स्वरूप, त्रुटी, समित्या, सुधारणा, इत्यादी तपशील वाचावा.
नागरीकरण हा मुद्दा वस्ती भूगोलाशी संबंधित आहे. जागतिकीकरणाच्या अंमलबजावणीनंतर गेल्या 20 वर्षांमध्ये भारतातील नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे. पायाभूत सुविधांची कमतरता, सांडपाणी - घनकचरा विल्हेवाटीची समस्या, वाहतूक व्यवस्थेवरील ताण, ऊर्जेचा तुटवडा, घरांचा प्रश्न, झोपडपट्ट्यांची निर्मिती, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण इ. समस्या उद्भवत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये या समस्या प्रकर्षाने आढळत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास व त्यावरील उपाय यांची माहिती असणे आवश्यक आहे.
6) भारताचा आर्थिक भूगोल -
पुढील बाबी आर्थिक भूगोलासंदर्भात महत्त्वाच्या आहेत -
1) जमिनीचे प्रकार व गुणधर्म, पीक व पिकांचे प्रकार, शेती प्रकार आणि मशागत पद्धती
2) पिकांच्या संकरित जाती व उत्पादकता, खते, लागवड पद्धती व पिकावरील रोग
3) मृद संधारण व जलसंधारण, जलस्रोताचे प्रकार व जल व्यवस्थापन
4) सिंचनाच्या पारंपरिक व आधुनिक पद्धती, सिंचनाशी संबंधित उपकरणे, एकक व इतर संकल्पना
5) पंचवार्षिक योजनांतील सिंचन क्षेत्राची प्रगती, सिंचनासंबंधीचे आयोग, प्रकल्प
6) साधनसंपत्ती, उद्योगधंदे, वाहतूक, दळणवळ, व्यापार.
वरीलप्रमाणेच महाराष्ट्राच्या भूगोलाचा इयत्ता 9 वी व 4 थीच्या पुस्तकातून अभ्यास करावा.
3) भूगोल विषयावरील प्रश्नांचे स्वरूप
भारताच्या भूगोलावर विचारले जाणारे प्रश्न हे प्रामुख्याने भूगोलासंबंधीच, परंतु सामान्यज्ञानाचा संदर्भ असलेले दिसून येतात. उदा. जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र कोणते? कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात? गुरू ग्रहाचे चार मुख्य उपग्रह कोणी शोधले? क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा व छोटा जिल्हा कोणता?, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? हे प्रश्न लक्षात घेऊन अशाच प्रकारे विचारल्या जाऊ शकणार्या माहितीचा अभ्यास करावा. त्यासाठी तक्ते व कोष्टकांचा मोठ्या प्रमाणात वापर करावा.
प्राकृतिक रचना, हवामान, कृषी, वन, खनिजसंपत्ती, उद्योगधंदे, लोकसंख्या, आर्थिक भूगोल याविषयी प्रश्न विचारले जाणारे प्रश्न हे पारंपरिक माहिती, चालू संदर्भ आणि सामान्यज्ञानासंबंधी विचारलेले जातात.
या घटकावरील बरेच प्रश्न नकाशावर विचारले जातात, म्हणून भारत व जगाच्या विविध नकाशांचा अभ्यास केल्यास अवघड प्रश्नांची उत्तरे देणे सोपे जाते.
4) परीक्षाभिमुख तयारी व अभ्यासाची दिशा
भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो. त्यासाठी जगातील शेतीप्रणाली, उद्योगधंदे, जंगल, मासेमारी, खनिजसंपत्ती यांचे तक्ते बनवावेत. भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास नकाशासहित करणे आवश्यक आहे. माहिती संकलित करताना प्रमाणित पुस्तके वाचून टिपणांच्या स्वरूपात नोट्स काढाव्यात, तक्ते बनवावेत.
हा घटक अभ्यासताना एखादा प्रदेश निवडून त्या प्रदेशाचे हवामान, प्राकृतिक स्वरूप, पर्जन्यमान, नद्या, मृदा, पीकपद्धती, खनिजे, उद्योग, दळणवळणाच्या सुविधा व इतर पायाभूत सुविधा, मानवी वस्ती, विविध क्षेत्रांत आढळणार्या जाती-जमाती, शहरीकरणाचे प्रमाण आणि पर्यावरणविषयक घटकांची सर्वांगीण तयारी करावी. अलीकडील काळात जागतिक तापमानवाढ, हवामानबदलाची समस्या, त्याविषयी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढाकार यावरदेखील प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे एखाद्या कारणामुळे एखादा प्रकल्प चर्चेत असल्यास त्याविषयी माहिती संकलित करून ठेवावी.
पुढील विविध घटकासंबंधीची वस्तुनिष्ठ माहिती संकलीत करावी - सर्वात पहिले, सर्वात शेवटचे, नद्यांचे उगम, पर्वतांची उंची, घाटांची रचना, नद्याकाठची शहरे, जंगले, किल्ले, थंड हवेची ठिकाणे. वरील सर्व घटकांच्या याद्या व नकाशे तयार केल्यास अभ्यास अधिक काळ स्मरणात राहतो. विविध खाणी, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग, विमानमार्ग, शासनाचे नवे प्रकल्प यासारख्या अनेक परीक्षाभिमुख माहितीचे एकत्रीकरण केल्यास प्रभावी पद्धतीने अभ्यास करता येतो आणि अभ्यासातील अचूकताही वाढविता येते.
नकाशा वाचन : भूगोलाचा अभ्यास हा नकाशा वाचनाद्वारे अधिक रसपूर्ण व सुलभ बनविता येतो. त्यामुळे भूगोलातील प्रत्येक घटक वाचताना समोर नकाशा असेल याची खबरदारी घ्यावी. आवश्यक तेथे कोर्या नकाशांचा वापर करून विविध स्वरूपाची माहिती त्यात भरून ठेवावी. नकाशा वाचन केवळ भूगोलासाठीच नव्हे तर चालू घडामोडींची तयारी करण्यासाठीदेखील अत्यंत उपयुक्त ठरते. भूगोलाचे काही प्रश्न सरळ नकाशावर विचारले जातात, म्हणून नकाशावाचन करण्याची सवय असेल तर असे प्रश्न सोडवणे जास्त सोपे जाते.
जगाचा भूगोल : जगाचा भूगोल अभ्यासताना सर्वप्रथम नकाशावरील महत्त्वाचे भाग मार्क करून त्याचा अभ्यास करावा. उदा. निरनिराळ्या देशातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, महत्त्वाची सरोवरे इ. नंतर जगाचा अभ्यास. खंडाप्रमाणे केल्यास जास्त सोपा होतो. उदा. अमेरिकेचा अभ्यास करताना दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांतील पर्वतश्रेणी, नदीप्रणाली, विविध सरोवरे, त्यांचा दक्षिण उत्तर क्रम, खनिज संपत्ती, निरनिराळे प्रकल्प, महत्त्वाची शहरे असा अभ्यास करावा. जगाचा भूगोल अभ्यासताना अॅॅटलास (नकाशा) सोबत असणे आवश्यक आहे. एखादा भाग पाठांतर करण्यापेक्षा तो नकाशात कुठे आहे हे जर शोधले तर अभ्यास लवकर लक्षात राहते व अभ्यास मनोरंजक होतो.
भारताचा भूगोल : हिंदी महासागर व भारताचे दक्षिण आशियामधील स्थान यावर चालू घटनांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ शकतात - चीनच्या सेशल्स बेटावरील नाविक तळाची स्थापना, स्ट्रिंग्ज ऑफ पर्ल्स पॉलिसी. भारताचा प्राकृतिक विभाग अभ्यासताना हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा त्यांची विभागणी, हिमालय पर्वतातील महत्त्वाच्या खिंडी, हिमालयातून उगम पावणार्या नद्या, त्यावरील निरनिराळे प्रकल्प, मैदानी प्रदेश, त्यांचे वितरण, भारताचा पठारी प्रदेश, पठारावरील निरनिराळ्या डोंगररांगा, पूर्वघाट, पश्चिम घाट, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा अभ्यास करावा. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना भारतीय मान्सून, त्याचा उदय, पावसाचे वितरण, भारतीय हवामानावर एल् निनो ला-निना यांचा प्रभाव, अवर्षण पूर यांचा अभ्यास करावा.
प्राकृतिक भूगोलात डोंगररांगा, त्या डोंगररांगेतील महत्त्वाची शिखरे त्या डोंगररांगा कोणत्या राज्यात पसरलेल्या आहेत, इ. चा अभ्यास करावा. नदीप्रणाली अभ्यासताना त्या नद्यांवरील विविध प्रकल्प, पीकप्रणाली, मृदा, हवामान, खनिज संपत्ती, वाहतूक व्यवस्था, विविध शहरे व पर्यटन केंद्र यांचा सविस्तर अभ्यास करावा.
तसेच हा अभ्यास करताना तो भारताचा राज्यवार अभ्यास करावा. गेल्या दोन वर्षांत भारतात काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्या यांचा अभ्यास केल्यास चालू घडामोडींचादेखील अभ्यास होतो.
शक्यतो भारताचे कोरे नकाशे घेऊन त्यावर राज्यवार नोट्स तयार केल्यास अधिक उत्तम, कारण परीक्षेच्या काळात कमी वेळेत या विषयाची उजळणी पूर्ण होते. आर्थिक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, त्यांचे वर्गीकरण, ऊर्जासाठे, त्यांचे उत्पादन, राज्यवार वर्गीकरण, विविध प्रकल्प, आयात-निर्यात यांची माहिती, त्यांचा क्रम यांचा अभ्यास नकाशाच्या मदतीने करावा.
भारतीय सामाजिक व आथक भूगोलाचा अभ्यासात 2001 व 2011 च्या जनगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्यूदर, माता मृत्यूदर या मुद्यांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात आथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूक व्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा. देशातील वस्तीप्रणाली, ग्रामीण व नागरी वस्त्या, त्यांच्या समस्या यांचा अभ्यास करावा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे राज्यवार अभ्यास करताना राज्यातील विविध जाती-जमाती लक्षात ठेवाव्यात.
21 व्या शतकात, जागतिकीकरणाच्या अंमलबजावणीनंतर भारतात पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. परकीय चलनप्राप्तीचा तो एक खात्रीलायक मार्ग आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याने पर्यटन, विशेषत: परकीय पर्यटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न अभ्यासावेत. विविध राज्यांचे पर्यटन राजदूत, घोषवाक्ये, पर्यटन प्रकल्प व योजना, महत्त्वाची ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची ठिकाणे, निसर्ग पर्यटन स्थळे आणि भारताच्या वाढत्या वैद्यकीय पर्यटनाची माहिती अभ्यासावी.
5) संदर्भ साहित्य
1) पाचवी ते दहावीपर्यंतची सीबीएससी बोर्डाची पुस्तके (एनसीईआरटी)
2) भारताचा भूगोल - एच. के. डोईफोडे, स्टडी सर्कल प्रकाशन
3) स्पर्धा परीक्षा भूगोल-एच. के. डोईफोडे, स्टडी सर्कल
4) भारताचा भूगोल (इंग्रजीत) - माजिद हुसेन
5) जगाचा भूगोल : जिओग्राफी थ्रू मॅप्स - के. सिद्धार्थ
6) इंडिया इयर बुक