CSAT पेपर तयारी : भाग (7)

  •  CSAT पेपर तयारी : भाग (7)

    CSAT पेपर तयारी : भाग (7)

    • 21 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 590 Views
    • 0 Shares

    सर्वसाधारण बुद्धिमापन


          एमपीएससीच्या  गेल्या 2 पूर्वपरीक्षांत यावर 6 प्रश्न होते. 
           प्रशासकीय सेवेच्या राजमार्गावर जाण्यासाठी बौद्धिक क्षमता सर्वोत्तम असावी लागते. बुद्धिमत्ता ही ईश्वराने दिलेली देणगी आहे, पण ती अपरिवर्तनीय मुळीच नाही. एखादा ग्रामीण भागातील साधारण हुशार असलेला विद्यार्थी शहरी विभागात आल्यानंतर योग्य ती संधी मिळाल्यास, योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास, त्यास ज्ञानपोषक वातावरण मिळाल्यास तो आपली बौद्धिक क्षमता सर्वोच्च पातळीवर नेऊ शकतो. 
          बुद्धिमापनाचे प्रश्न विचारण्याचा मूळ हेतू हाच असतो की, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो. या चाचणीद्वारे त्याची स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, मेंदूची आकलनशक्ती, जागृतता, विश्लेषण क्षमता व तर्कशक्ती समजून घेता येते. सरावाने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण स्वत:चा बुद्ध्यांक वाढवू शकतो. बौद्धिक क्षमता चाचणीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्या वापरल्या जातात. 
     
    1) सर्वसाधारण बुद्धिमापनाची व्याप्ती व स्वरूप 
          बुद्धिमत्ता म्हणजे फक्त गणिताची कोडी सोडवणे नव्हे तर बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन, संवेदन, स्मरणशक्ती आणि अनुमान. बुद्धिमत्ता म्हणजे क्षमता प्राप्त करून घेण्याची क्षमता. बुद्धिमत्ता म्हणजे जीवनातील प्रश्न सोडविण्याची क्षमता. 
          या विभागावर विचारल्या जाणार्‍या प्रश्नांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो -
           मालिका पूर्ण करणे.
           समान संबंधांची जोडी पूर्ण करणे
           दिलेल्या घटकातील विसंगत घटक शोधणे
           सांकेतिक भाषेतील सांकेतिकीकरण व नि:सांकेतिकीकरणावरील प्रश्न
           आकृत्यांमधील रिकाम्या जागा शोधणे
           आकृत्यांची (त्रिकोण, चौकोन, चौरस, आयात इ.) संख्या मोजणे
           वेन आकृत्यांचा वापर करून विविध घटकांतील परस्पर संबंध स्पष्ट करणे
           दिशाबोध (दिशाज्ञान चाचणी)
           नातेसंबंधांवर आधारित प्रश्न
           रांगेतील क्रम व मोजणी यांवरील प्रश्न
           दिनदर्शिका, घड्याळ, वय यांवरील प्रश्न 
           तुलनेने अधिक काठिण्यपातळी असलेले कूट प्रश्न

    2) सर्वसाधारण बुद्धिमापनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे 
          बुद्धिमापन चाचणीचा निश्चित असा अभ्यासक्रम नसला तरी विविध प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून काही प्रमाणात अभ्यासक्रम ठरवता येतो. या घटकावरील प्रश्नांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात -
          1) शाब्दिक बुद्धिमत्ता (Verbal Reasoning) - यास सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी असेही म्हणतात. शाब्दिक बुद्धिमत्ता या प्रकारात सामान्य क्षमता चाचणी, अंकगणित, विश्लेषण क्षमता व तर्कशास्त्रीय युक्तिवाद यावर आधारित प्रश्न विचारले जातात, तर अशाब्दिक बुद्धिमत्तेमध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. प्रस्तुत अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे लक्षात घेता येतो.
     
          2) अशाब्दिक बुद्धिमत्ता (Non-Verbal Reasoning) - यात पुढील घटकांचा समावेश होतो -
           घन व सोंगट्यावर आधारित प्रश्न मोठ्या घनास रंगवून लहान घनात तुकडे करणे व सोंगट्यांच्या स्थितींवर आधारित प्रश्न विचारले जातात.
           मालिकापूर्ती : यात आकृत्यांची मालिका दिलेली असते. त्या मालिकेतील आकृत्यांतील संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती पर्यायांमधून शोधावयाची असते. 
           समान संबंध : यामध्ये चार आकृत्यांपैकी कोणत्याही तीन आकृत्या दिलेल्या असतात. पहिल्या व दुसर्‍या आकृतीत जो संबंध असतो तोच संबंध तिसर्‍या व चौथ्या आकृतीत असतो. प्रथम दिलेल्या जोडीतील आकृत्यांमधील संबंध पाहावयाचा असतो. त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती पर्यायांमधून निवडायची असते.
           विसंगत आकृती शोधणे : यामध्ये काही आकृत्यांचा समूह असतो. त्यापैकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्यांमध्ये विशिष्ट समान गुणधर्म आढळतो. त्या गुणधर्मास अपवाद असणारी आकृती हे उत्तर असते.
           आरशातील प्रतिमा व जलप्रतिबिंब : एखादी आकृती आरशात कशी दिसेल अथवा तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
           अपूर्ण आकृती पूर्ण करणे : यामध्ये पूर्ण आकृतीचा काही भाग पर्यायांमधून शोधावयाचा असतो.
           लपलेली आकृती शोधणे : यात पर्यायातील एक आकृती प्रश्नआकृतीत समाविष्ट असते. ती शोधण्यावर प्रश्न विचारतात.

    3) सर्वसाधारण बुद्धिमापनावरील प्रश्नांचे स्वरूप 
          परीक्षेला बसलेला उमेदवार विचारलेल्या प्रश्नांची किती लवकरात लवकर उत्तरे देऊ शकतो याची चाचणी घेतली जाते. इतर कोणत्याही घटकापेक्षा बुद्धिमत्ता चाचणी या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. तो वेळ वाचविण्यासाठी विविध क्लृप्त्या, सूत्रे वापरणे व प्रश्न सोडविण्याचा सराव करणे गरजेचे असते.  
          या घटकातील संख्यांवर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उमेदवाराने गतिमान आकडेमोड करणे आवश्यक असते. त्यासाठी पाढे पाठ असणे, वर्ग, घनसंख्या यांचे पाठांतर असल्यास उमेदवाराला त्याचा निश्चितच फायदा होतो.या घटकाची तयारी करण्यासाठी उमेदवाराने शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षांपासून सुरुवात करावी. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. उमेदवाराने प्रश्नांचा भरपूर सराव केल्यास तसेच अचूकतेवर भर देऊन वेळेचे नियोजन केल्यास या घटकावरील सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे देणे शक्य होते.
          अभ्यासक्रमात खालील घटकांचा समावेश होतो -
          1) संख्यांवर आधारित प्रश्न - यात प्रामुख्याने पुढील उपघटकांचा समावेश होतो.
     
          अ) संख्यामालिका पूर्ण करणे - यावरील नमुना उदाहरणे-
          1) 13, 15, 17, 19, 21, ..?
          उत्तर : 23 (हा 2 च्या फरकाने वाढणारा संख्यागट)
     
          2) 2, 3, 5, 7, 11, 13, 17 ..?
          उत्तर : 19 (हा क्रमाने येणार्‍या मूळ संख्यांचा गट आहे.)
     
          3) 1, 8, 27, 64, 125, ..?    
          उत्तर : 216 (क्रमसंख्येचा तिसरा घात या सूत्राने व्यक्त)
         
          ब) विजोड पद ओळखणे - या संख्यागटाचा विचार करताना सर्व संख्यांमध्ये काही समान गुणधर्म आहेत का, ते तपासले जाते.
          उदा. 1996, 2000, 2004, 2008, 2010
          उत्तर : 2010
          संख्यागटात 2010 हे वर्ष सोडून सगळी वर्षे ही लीप वर्षे आहेत.
     
          क) सम संबंध ओळखणे - दोन संख्या किंवा शब्द यांच्यात काही संबंध असू शकतो, ते संबंध ओळखून दुसर्‍या संख्येशी तो ओळखता येणे. यावरील नमुना उदाहरण -
          1) जर 40 : 80 तर 80 : ?
          उत्तर : 160
          (संख्यागटात दुपटीचा संबंध आहे.)
     
          ड) संख्यागटाशी जुळणारे पद ओळखणे - संख्यागटाचे वैशिष्ट ओळखून दिलेल्या पर्यायातून योग्य जुळणारी संख्या निवडणे. यावरील नमुना उदाहरण -
          1) 9, 16, 25, 36, ?
          1) 61            2) 62            3) 63            4) 64    
          उत्तर : 64 असून येथे वर्गसंख्यांचा गट आहे.
     
          इ) चौरसातील किंवा वर्तुळातील संख्यांची मांडणी - यावरील नमुना उदाहरण -
          3      ?      56
          9      7      63
          8      10     21
          1) 70            2) 80            3) 9            4) 95  
          उत्तर : 70
          7 x 9 = 63,            7 x 8 = 56,            7 x 10 = 70
     
          2) शब्दसंग्रहावर आधारित प्रश्न - यात प्रामुख्याने पुढील उपघटकांचा समावेश होतो. हे प्रश्न तुलनात्मकदृष्ट्या सोपे असतात. येथे आकलनक्षमतेची तपासणी होते.
          अ) क्रम लावणे - कौन बनेगा करोडपती’ या मेगाशोमध्ये प्रवेश घेण्यासाठी ’क्रम लावणे’ या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. यात विचारलेल्या शब्दाचा योग्य तो क्रम लावणे महत्त्वाचे असते. 
          1) बसणे, चालणे, उपडे वळणे, उभे राहणे. 
          स्पष्टीकरण : यात बालकाचा विकासक्रम लक्षात येतो. जसे लहान बाळ सुरुवातीला उपडे वळते, त्यानंतर ते बसायला शिकते, नंतर उभे राहण्याची प्रक्रिया सुरू होते व शेवटी ते चालायला शिकते.
     
          ब) विसंगत पद ओळखणे - सारखेच गुणधर्म असलेल्या समूहातून विसंगत घटक ओळखणे.
          उदा. झाडे, फुले, पाने, केळे.
          स्पष्टीकरण : केळे हा शब्द सोडून इतर सर्व शब्द अनेकवचनी आहेत.
     
          क) समान संबंध ओळखणे - दोन घटकांतील समान संबंधांवर आधारित उर्वरित घटकातील संबंध शोधायचा असतो.
          उदा. खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?
          1) घोळका            2) जथ्था            3) मंडळ            4) गट
          उत्तर : जथ्था
     
          3) वर्णमालिकेवर आधारित प्रश्न - प्रश्नात इंग्रजी अक्षरांची एक मालिका दिलेली असते. प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा नियम असतो. यासाठी सर्वप्रथम इंग्रजी वर्णमाला लिहून काढावी व प्रश्न सोडवावेत.
     
          4) कूटप्रश्न - कूटप्रश्न हे आपल्या आकलन व तार्किक क्षमतेवर आधारित असतात. त्याचे उपप्रकार दिशांवरील प्रश्न, नातेसंबंध, दिनदर्शिकेवरचे प्रश्न व वयावर आधारित प्रश्न.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 590