CSAT पेपर तयारी : भाग (2) आकलन क्षमता
- 15 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 737 Views
- 1 Shares
1) आकलन क्षमता
कल चाचणीत उमेदवारांची ज्ञानशक्ती/स्मरणशक्ती/बुद्धिमत्ता इत्यादी तपासण्यापेक्षा त्याच्या आकलन व तर्कशक्तीचे परीक्षण केले जाते. येथे उमेदवारास अनोळखी असलेले पॅरेग्राफ दिले जातात. त्यांचा विषय, प्रसंग, संदर्भ आणि गर्भित अर्थ समजून घेऊन उतार्यातील मुख्य विचार आत्मसात करणे आवश्यक असते. तसेच येथे माहितीवजा उतारे किंवा विधाने देऊन त्याचे आकलन उमेदवारास कितपत झाले आहे, हे तपासताना उमेदवाराचे विविध विषयाबाबतीतील पूर्वज्ञानही तपासले जाते.
आकलनावर आधारित प्रश्न हा सर्व स्पर्धा परीक्षांचा एक अविभाज्य घटक आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे,अशा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या प्रकारची पदे उमेदवार भूषवतात, त्यामध्ये पदोपदी वेगवेगळे निर्णय घेणे अपेक्षित असते आणि असे निर्णय घेताना उपलब्ध माहितीचा योग्य उपयोग करून घ्यावा लागतो. ही माहिती अनेकदा लिखित स्वरूपात (अहवाल, अधिनियम, प्रशासकीय नियम, विविध योजना, पत्र, मसुदा) असते. तेव्हा अशी माहिती वापरता येण्यासाठीची आकलनक्षमता असणे, योग्य तो मजकूर वापरता येणे, ही अशी पदे भूषवताना अतिशय गरजेची कौशल्ये आहेत.
पेपर-2 च्या प्रश्नप्रत्रिकेत विद्यार्थ्यांचे सामान्य आकलन तपासणारे अनेक उतारे (सुमारे 8 ते 10) असतात. या उतार्याचे नेमके वाचन करून त्यातील विविध शब्दांचा शब्दश: अर्थ आणि मथितार्थ लक्षात घ्यावा लागतो. उतार्यातील विषयात कशाची चर्चा केली आहे? त्यासंबंधी लेखक/लेखिकेची अथवा निवेदकाची नेमकी भूमिका कोणती आहे? त्यांनी भूमिकेच्या समर्थनार्थ दिलेली उदाहरणे व दाखले कोणते? त्यातून कोणता आशय व्यक्त होतो, इत्यादी मूलभूत प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनाउतार्याचे नेमके आकलन करण्यास लागते. तसेच परिच्छेदाखाली दिलेल्या प्रश्नांचा अर्थ आणि रोख अचूकपणे लक्षात घेण्याची क्षमतादेखील तेवढीच महत्त्वाची आहे. प्रश्नाखालील चार पर्यायांचे तुलनात्मक आकलन करून अचूक पर्याय निवडण्याची क्षमता निर्णायक ठरते. वाचन, विचार, विश्लेषण आणि अर्थनिर्णयाची मूलभूत क्षमता येथे तपासली जाते. सदर उतारे हे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, साहित्य-संस्कृती-कला, इतिहास, धर्म-तत्त्वज्ञान आणि विज्ञान अशा विविध क्षेत्रांशी संबंधित असतात. त्यामुळे आपले आकलन विस्तारण्यासाठी सकस, दर्जेदार आणि विविध स्वरूपाचे वाचन करणे महत्त्वपूर्ण ठरते.
2) संवादकौशल्य आणि व्यक्तीअंतर्गत कौशल्य (आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्य)
ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा समाजातील इतर व्यक्तीशी संबंध येतो त्यावेळी तो प्रभावी करण्यासाठी तिच्याकडे अंतरव्यक्तिगत कौशल्य असावे लागतात. व्यक्ती व्यक्तीतील आंतरक्रिया ही संदेशवहनामुळे होत असते. त्यामुळे संवादकौशल्यालाच अनेकदा व्यक्तीअंतर्गत कौशल्य म्हटले जाते. असे असले तरी व्यक्तीअंतर्गत कौशल्य ही संकल्पना संवादकौशल्यापेक्षा व्यापक असून त्यामध्ये संवादकौशल्यासहित व्यक्तीची वर्तणूक, सवयी, दृष्टिकोन, देहबोली आणि जीवनपद्धती यांचा समावेश होतो. प्रशासनात काम करताना एखाद्या अधिकार्याला त्याच्या हाताखाली कार्यरत व्यक्ती, सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद साधावयाचा असेल तर त्याला विविधप्रकारे प्रत्येकाशी असलेले त्याचे वर्तन निर्धारित करावे लागते, त्यासाठी त्याला जी कौशल्ये उपयोगी पडतात त्या सर्वास प्रशासनासाठी लागणारे आंतरव्यक्तीगत कौशल्य म्हणता येईल. एखाद्याचे व्यक्तीअंतर्गत कौशल्य हे सामाजीकरणाच्या प्रक्रियेस जन्मापासूनच विकसित होत असते. कुटुंब, शेजार, समवयस्कांचा गट, मित्रमंडळी, शाळा, प्रसारमाध्यमे व इतर घटकांचा व्यक्तीअंतर्गत कौशल्याच्या विकासावर मोठा परिणाम होत असतो. आंतरवैयक्तिक संवाद व संभाषण कौशल्याद्वारे विद्यार्थ्यांच्या आकलनाबरोबरच योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता तपासली जाते. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील संवादरूपाने दिलेल्या उतार्यातील अभिकर्त्यांचा प्रतिसाद कसा आहे, ते परस्परांचे मत समजून घेतात का, संभाषणासाठी योग्य भाषेचा वापर करतात का, त्यांच्याकडे इतरांचे ऐकण्याची वृत्ती आहे का, अशा समर्पक प्रश्नांच्या आधारे या कौशल्याची तपासणी केली जाते.
• उत्तम आंतरवैयक्तिक व संभाषण कौशल्य असणे (वैयक्तिक पातळीपासून विविध गट स्तरांवर संभाषण साधता येणे.)
• कुशल प्रशासकास ज्या दैनंदिन आव्हानांना अतिशय खंबीर व समर्थपणे सामोरे जावे लागते त्यासाठी आवश्यक कौशल्यांची व गुणसमुच्चयाची चाचणी CSAT पेपरमधून घेतली जाते. म्हणून ही परीक्षा देणार्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासक बनण्यासाठी आवश्यक किमान कौशल्यसंच या दृष्टीने या परीक्षेकडे पाहणे आवश्यक आहे.
3) निर्णयप्रक्रिया व समस्या सोडविण्याची कुवत
एखाद्या घटनेसंबंधी निर्णय घेण्यासाठी उमेदवाराकडे प्रभावी कल्पनाशक्ती, अन्वेषण क्षमता आणि दूरदृष्टी असणे आवश्यक असते. दिलेल्या परिस्थितीत एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांपैकी संयुक्तिक पर्याय अचूकपणे शोधणे ही उमेदवाराची महत्त्वाची प्रशासकीय व्यवस्थापकीय क्षमता मानली जाते. विशिष्ट गटाशी, समूहाशी किंवा विशिष्ट क्षेत्रातील प्रवाहाशी जुळवून घेताना निर्णय प्रक्रिया महत्त्वाची ठरते. प्रशासकीय अधिकार्याला शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, वाहतूक, लेखा, कृषी, सिंचन, दूरसंचार, परराष्ट्रसंबंध, अर्थकारण, निवडणुका, यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक बाबींसंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्या क्षेत्रातील संबंधित व्यक्ती व घटक वर्तमानकाळातच नव्हे तर भविष्यकाळातसुद्धा प्रभावी होऊ शकतात. त्यामुळे तीक्ष्ण बुद्धी, सारासार विचार करण्याची कुवत आणि भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती असलेले उमेदवार या घटकावरील प्रश्न सहज सोडवू शकतात. थोडक्यात, शंका समाधान करण्याची जिज्ञासा उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.
निर्णय घेण्याची कुवत ही एक प्रकारची बौद्धिक क्रिया असते. समोर उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायातून एकाची अचूक निवड करून त्यानुसार संबंधित समस्येवर कार्यवाही करावयाची असते. निर्णय घेण्यापूर्वी उमेदवाराला समस्येची उकल करण्यासाठी उपलब्ध पर्यायांचे विश्लेषण करणे आवश्यक असते. तसेच निर्णय घेताना उमेदवाराला पहिल्यांदा निर्णयाबाबतची उद्दिष्टे ठरवावी लागतात. त्यानंतर निर्णयासंबंधी पर्यायांचा योग्य क्रम ठरवावा लागतो. त्या प्रत्येक पर्यायाच्या जमेच्या बाजू तपासून त्रुटी लक्षात घ्याव्या लागतात आणि संबंधित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणता निर्णय अचूक हे पाहावे लागते. दैनंदिन जीवनात आपण रोज साध्या साध्या गोष्टीबाबत निर्णय घेत असतो आणि एखाद्या व्यक्तीच्या उद्दिष्ट, इच्छाशक्ती, जीवनपद्धती, मूल्ये यांचा त्याच्या अशा निर्णयक्षमतेवर परिणाम होत असतो.
• एखादा निर्णय आवश्यक माहिती असल्याशिवाय व सखोलपणे विचार केल्याशिवाय होऊ शकत नाही, असा निर्णय योग्य प्रक्रियेद्वारा घेण्याकरता माहिती संकलनाची गरज अधोरेखित होते.
• जलद, अचूक प्रशासकीय निर्णय घेता येणे (माहितीचा योग्य वापर करून, सर्व प्रशासकीय टप्पे पूर्ण करीत अशा प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता किंवा त्यास परवानगी नाकारणे.) हे कार्यक्षम अधिकार्याचे महत्त्वाचे काम असते.
• माहिती युगात माहितीचे संकलन, तिचे पद्धतशीर वर्गीकरण व मांडणी आणि त्यावर आधारित निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
• एखाद्या समस्येबाबत उपलब्ध माहितीचा आवाका प्रचंड असतो. एकटी व्यक्ती ही माहिती एकहाती संकलित करू शकत नाही. अशा वेळेस प्रशासकीय संरचनेमधील विविध घटकांना या निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे अपरिहार्य होते. म्हणूनच प्रशासकास उपलब्ध संसाधने व यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करून या माहितीचे संकलन करवून घेणे गरजेचे असते.
• माहिती संकलन हे समस्या सोडवणुकीतला पहिला टप्पा आहे. यानंतरचा सर्वात आव्हानात्मक टप्पा म्हणजे या संकलित माहितीतून अत्यावश्यक माहिती बाजूला काढून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ, जलद निर्णय घेण्याची क्षमता. ही सर्व माहिती प्रशासकांकडे विविध अहवालांच्या स्वरूपात सादर केली जात असते. अनेकवेळा शेकडो पानांचे असणारे हे अहवाल - तक्ते, सारणी, स्तंभालेख व त्याचबरोबर अनेक पानांचे लिखित मजकूर यांनी ओतप्रोत भरलेले असतात. अशा वेळेस दिलेल्या मजकुरातून आवश्यक मजकूर ओळखता येणे, त्याचे उत्तम आकलन होणे व या सगळ्याची सांगड तक्ते व सारण्या यांच्यातील सामग्रीशी घालता येणे हे अतिशय कौशल्याचे काम ठरते.
4) तर्कसंगत विचार आणि विश्लेषण क्षमता
प्रशासकीय अधिकारी हा बुद्धिवादी दृष्टिकोनातून विचार करणारा, तसेच समोर असलेल्या परिस्थितीचे किंवा निर्माण झालेल्या समस्येचे विश्लेषण वस्तुनिष्ठपणे करणारा असावा लागतो. अनेक उमेदवारांना असे वाटते की हा घटक बँकिंग किंवा मॅनेजमेंट परीक्षेत विचारल्या जाणार्या प्रश्नासारखा असेल, पण युपीएससीच्या परीक्षांचे स्वरूप पाहता युपीएससी दुसर्या एखाद्या आयोगाच्या परीक्षा पद्धतीचे अनुकरण करीत नाही. येथे विचारले जाणारे प्रश्न हे उमेदवाराला गोंधळात टाकणारे असतात आणि तो ते प्रश्न किती प्रभावीरीत्या आणि कमी वेळात विचार करून दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवितो हे तपासले जाऊ शकते. यासाठी सराव आवश्यक आहे. या घटकावरील प्रश्नात अनेक विधाने दिली जातात. त्या विधानाशी निगडित निष्कर्ष पर्यायात अंतर्भूत केले जातात. येथे विद्यार्थ्यांने दिलेली माहिती गृहीत धरून तर्काच्या आधारे योग्य निष्कर्षांपर्यंत पोहोचणे अभिप्रेत असते. त्यासाठी विचार व कल्पनाशक्तीला गतिमान करणे अत्यावश्यक ठरते. वेळेचा घटक लक्षात ठेवून अशा प्रश्नांची कमीत कमी वेळेत उकल कशी करता येईल, याचा सतत विचार करावा लागतो. यासाठी दिलेल्या माहितीचे अचूक, योग्य वाचन व आकलन आणि योग्य निष्कर्षांपर्यंत पोचण्याची क्षमता उपयुक्त ठरते. भरपूर सरावाद्वारे या घटकांची प्रभावी तयारी करता येते.
• वस्तुनिष्ठ, तार्किक दृष्टिकोनातून परिस्थितीचे विश्लेषण करता येणे (विविध प्रकारच्या प्रकल्पांची गरज, त्या प्रस्तावांमधील संभाव्य अडचणी व संधी, प्रस्ताव मांडणार्यांची संख्या व त्यातून मिळणारे दूरदर्शी फायदे यांची तुलना इत्यादी.)
5) सामान्य मानसिक अभियोग्यता (बुद्धिमत्ता चाचणी )
सामान्य बुद्धिमापन चाचणीद्वारे अतिशय क्लिष्ट परिस्थिती समजून घेऊन, असलेल्या अनुभवाची सांगड घालून त्यावर उपाय योजण्याची उमेदवाराची क्षमता स्पष्ट होऊ शकते.
या घटकातील भाषिक व अंकगणितीय युक्तिवाद चाचण्यांद्वारे उमेदवाराकडे प्रत्यक्ष (कामावर) कार्यरत असतानाचे आवश्यक कौशल्य तपासता येते, तर अमूर्त कल चाचणीद्वारे उमेदवाराची कल्पनाशक्ती व वैचारिक सामर्थ्य तपासले जाते.
या चाचणीमध्ये वर्णमालेतील अंकगणितातील विविध संकल्पनांच्या साहाय्याने प्रश्न विचारून उमेदवाराची प्रश्न सोडविण्याची गती आणि कौशल्य तपासले जाते. एखादा आलेख किंवा आकृती देऊन त्यावर विविध प्रश्न विचारले जाऊन उमेदवाराची सामग्रीचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता तपासली जाते.
येथे उमेदवाराकडे असलेली, काल्पनिक/मानसिक आकृत्या, चित्रे तसेच प्रतिमा यांची कल्पना करून त्यांची हालचाल, क्रम, यासंबंधीचे ड्रॉइंग लक्षात घेऊन त्याची बौद्धिक क्षमता तपासली जाते. तसेच द्विमिती आकृत्या पाहून त्याबाबत त्रिमितीय संकल्पना लक्षात घेऊन निष्कर्ष काढण्याची पद्धत तपासली जाते. येथे उमेदवारांना एखाद्या चित्राचे किंवा आकृतीचे वेगवेगळे घटक विस्कटून दिलेले असतात. ते कल्पनेने एकत्र करून कमीत कमीत वेळात जोडण्याचे उमेदवाराचे कौशल्य महत्त्वाचे असते. तसेच उमेदवारांना आकार किंवा शेप मॅचिंग, ग्रुप प्रोटेक्शन, घन/घनायत वरचे प्रश्न, आरसा व पाण्यातील प्रतिमांवरचे प्रश्न, कंबाइनिंग शेप, यावरील प्रश्न सोडवावे लागतात. प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या देऊन प्रश्न आकृत्यांचे एक वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याला संबंधित उत्तर आकृतीतील पर्याय शोधावा लागतो. त्यामुळे या चाचणीद्वारे उमेदवाराची विचार करण्याची क्षमता तसेच संकल्पना स्पष्टता लक्षात येऊ शकते.
बुद्धिमापन चाचणीच्या संदर्भात वर्णमाला, संख्याश्रेणी, विविध स्वरूपाच्या आकृत्या, नातेसंबंधावरील प्रश्न इ. विविध स्वरूपाच्या घटकाचा अर्थ लक्षात घेऊन त्यावरील प्रश्नांचा नियमित सराव करावा. विविध उदाहरणांची उकल केल्यामुळे बरेच ठोकताळे आणि उकलपद्धती व प्रक्रिया पक्क्या करता येतात. म्हणून नियमित, विविधांगी आणि विपुल उदाहरणांचा सराव हाच या घटकावर प्रभुत्व मिळवण्याचा राजमार्ग आहे.
6) आधारभूत सांख्यिकी क्षमता (मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण)
या घटकावरील प्रश्नाद्वारे उमेदवाराकडे असणारे अंकज्ञान तसेच विशिष्ट बाबींची वास्तविकता व सत्य जाणून घेण्यासाठी एखाद्या विषयाशी संबंधित दिलेले तक्ते, आलेख यांचे आकलन करून निष्कर्ष काढावी. याबाबत कौशल्य तपासले जाते. आयोगाने या अभ्यासक्रमामध्ये पुढील घटकांचा समावेश केलेला आहे - 1) अंक/संख्या आणि त्यांच्यातील संबंध, 2) ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड (इयत्ता 10वी चा दर्जा), 3) डेटा इंटरप्रिटेशन - तक्ता, आलेख, चार्ट., 4) डेटा सफिसिएन्शी (इयत्ता 10वी स्तर). या घटकाची तयारी करताना उमेदवाराने आकडेमोड करताना कॅलक्युलेटरचा वापर करण्याची सवय सोडून द्यावी.
संख्याज्ञान व त्यावरील क्रिया याबाबत विविध प्रश्न विचारले जातात. या चाचण्या विशेषतः उमेदवाराला ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने समस्यांची उकल करावा लागते, धोरणे ठरवावी लागतात, नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो किंवा अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, तेथे उपयोगी पडतात. अंकगणितीय घटकात बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकार, वर्गमूळ-घनमूळ, सरासरी प्रमाण इ. मूलभूत अंकगणितीय प्रक्रियांचा नियमित अभ्यास आणि त्यावर आधारित विविध स्वरूपाच्या उदाहरणांची उकल करून यावर प्रभुत्व मिळवता येईल.
सामग्री स्पष्टीकरण (Data interpretation) व सामग्रीचा पुरेपणा (Sufficiency) - येथे उमेदवाराला दिलेली माहिती, काही आकृत्या आणि चित्रे यांचे विश्लेषण करावे लागते. त्याद्वारे त्यांची तार्किक क्षमता तपासली जाते. सामग्री, फ्लो चार्ट, आकृत्या, आलेख किंवा चित्रे या सर्वांचे आकलन करून त्यात असलेली विशिष्ट रचना लक्षात घेऊन उमेदवार किती सकारात्मक आणि वेगाने विचार करू शकतो हे तपासण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरते.
• किमान गणितीय संकल्पनांची ओळख - गुणोत्तर व प्रमाण, शेकडेवारी आणि सरासरी या तीन घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. सामग्रीच्या आकलनावरील प्रश्न सोडवत असताना या तीन घटकांतील संकल्पना उपयुक्त ठरतात.
• सामग्रीचे आकलन व त्याच्याशी निगडीत संकल्पनांशी ओळख (तक्ते, सारणी, स्तंभालेख, वृत्तालेख) - स्तंभालेख, जोडस्तंभालेख आणि वृत्तालेखावरील प्रश्न सोडविण्याकरिता अनेक क्लृप्त्यांचा वापर करावा.
• मूलभूत संख्याज्ञानामधील संकल्पनांचा वापर करून बुद्धिमत्ता चाचणी घटकातील प्रश्न सोडवणे.
• गणितीय संकल्पनांचे उत्तम आकलन व भरपूर सराव हे या घटकामध्ये अचूकता आणण्याचे सूत्र.
• सामग्रीचा पुरेपणा यातील प्रश्नांचे अचूक उत्तर मिळविताना विवेचनाबरोबर निर्णय क्षमता महत्त्वाची ठरते.
7) इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य
नागरी सेवा कलचाचणीतील इंग्रजी भाषेच्या आकलनासंदर्भात इंग्रजीचे ज्ञान महत्त्वाचे आहे, कारण काही उतारे केवळ इंग्रजी भाषेतून दिलेले असतात. येथे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न असल्याने पेपरमधील इंग्रजी भाग वाचून दिलेल्या अचूक पर्यायाची निवड करायची असते. त्यामुळे किमानपक्षी इंग्रजी वाचून त्यातील आशय समजण्याइतपत इंग्रजीचे ज्ञान इंग्रजी भाषेतील विविध बातम्या, पुस्तके, मजकूर यांचे अवगत करणे अत्यावश्यक ठरते. येथे शब्दांचे अर्थ, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्यरचना यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. नियमित वाचन व भरपूर सरावाच्या माध्यमातून कोणत्याही विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य वाढवता येते.