आठवणींची शिदोरी...
- 31 Jan 2022
- Posted By : vaishali
- 307 Views
- 1 Shares
आठवणींची शिदोरी...
आपलं महाराष्ट्र राज्य ज्याचा आपल्या सर्वांना रास्त अभिमान आहे. विकसित करणार्या बदलत्या काळास पुढे वाटचाल करण्याची येथील मनोवृत्ती जितकी पुरोगामी आहे, तितकीच खोल सांस्कृतिक आणि वैचारिक मूल्ये इथल्या मातीत रुजलेली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी आत्मसन्मान संवेदनशील अशा स्वयंभू विचारांची बीजे या मातीत रोवली. ज्ञानेश्वर, तुकाराम, सावता माळी, मुक्ताई, नामदेव अशा थोर संतांनी या मातीत जन्म घेऊन तिला आपल्या ज्ञानाने व आचरणाने पावन केले. महात्मा फुले, सावित्रीबाई, आगरकर, गोखले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब यांच्यासारख्या कृतीशील विचारवंतांनी छत्रपतींच्या विचारांची पाझर आधुनिक काळात खोलवर पसरवली.
ज्या महाराष्ट्रात लावणी बहरली, तिथेच ओवींनी सुद्धा दिशा दाखवली. बाळासाहेब यांच्या ठाकरी भाषेवरही लता व आशा ताईंनी सुरेल बरच ताण ही महाराष्ट्रात विचलित पावली. एकीकडे पुलंची मिश्कील लेखणी तर दुसरीकडे डॉ. आंबेडकरांचे, विद्वत्तापूर्ण लेखन एकीकडे शाहिरी बाणा तर दुसरीकडे उद्यमशीलता या सगळ्या गुणांनी नटलेल्या या महाराष्ट्राने देशाला साहित्य संमेलनांची गोडी लावली. गाडगेबाबांनी स्वच्छतेची मोहिम देशास सर्वप्रथम महाराष्ट्रात हाती घेतली.
अशा या महाराष्ट्रावर संत विचारांचा आणि पुरोगामीत्वाचा तसेच कष्ट करुन समाजाचे ऋण फेडणार्या थोरा मोठ्यांचा वरद हस्त 20 व्या 21 व्या शतकातही कायम राहिला. नारायण मेघाजी लोखंडेंनी कामगार चळवळ उभारली, तर किर्लोस्कर, टाटा या सारख्यांनी उद्योजकतेचे संस्कार महाराष्ट्रावर केले. यशवंतराव चव्हाणांनी राजकारणात नेमस्त वृत्तीने आणि तर शरदरावांनी चाणक्य नीती च्या सहाय्याने राज्याला देशास अग्रसर ठेवले. तिथेच बाळासाहेबांनी भूमिपुत्राला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिला. आर. आर. पाटील यांनी राजकारणात राहून समाज सुधारणेचा वसा घेतला. यांच्याच बरोबर आजही आपल्या मध्ये असणारे पोपटराव पवार, अण्णा हजारे, सदानंद मोरे अशी अनेक मंडळी आहेत जी महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहेत.
स्टडी सर्कल परिवार स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की डॉ. आनंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परीक्षांची चळवळ उभारताना अनेक थोरामोठ्यांचे मार्गदर्शन या चळवळीला लाभले. विशेषत: 2010 नंतर स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक विचारवंत प्रशासक, राजकीय नेते, समाजसुधारक, तज्ञ यांची वैचारिक मूल्ये तरुणाईपर्यंत पेाचवून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकसित चालना दिली.
यापैकी गेल्या काही वर्षात नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी,न्या. बी. डी. शिंदे, आर. आर. पाटील आपल्याला सोडून गेले याची खंत आहेच, पण आपण या थोरामोठ्यांसोबत संवाद साधला, त्यांना प्रत्यक्ष पाहिले, त्यांच्या पाया पडलो हा आनंद आयुष्यभर राहील.
अशाच दोन आगळ्या वेगळ्या व्यक्ती ज्यांनी स्वत:च्या आयुष्यात असंख्य कष्टांना तोंड दिले. समाजाला विशेषत: युवावर्गाला नितांत व निरागस प्रेम दिले, सकारात्मक मूल्यांचे संस्कार दिले आणि युवा वर्गाच्या अडीअडचणी जाणून त्यांना आसरा दिला, माया दिली. स्वत:च्या पायांवर उभे राहण्यास सक्षम केले अचानक आपल्याला सोडून गेले..... अगदी पोरकं झाल्याची अनुभती महाराष्ट्राच्या युवा वर्गा सोबत आम्हांला सुद्धा झाली.
आई स्वरुप सिंधुताई सपकाळ ज्यांना स्वत:च्या लोकांनी वार्यावर सोडलं तर त्या महाराष्ट्राच्या तमाम अनाथ मुला मुलींच्या आई झाल्या. मोल मजुरी करणारा अशिक्षित मुलगा असो अथवा कोट्यावधींचा व्यवसाय करणारा उद्योजक असो, त्यांच्यासाठी सारखेच होते. प्रत्येक जण त्यांच लेकरु होत. त्या कोणाला ओळखू दे अथवा न ओळखू दे डोळ्यात तीच माया, आवाजात तीच काळजी. त्यांच्या सभोवताली जसं केवळ मायेची सावली आणि आनंदाचा उजेड यांनाच परवानगी होती. त्यांच्या कुशीत कोणी येऊन रडू लागलं तरी पाचच मिनिटात त्यांचे अश्रू पळून जायचे आणि तो हिंमतीनं पुढे जायला तयार असायचा.
2013 साली, नाशिक मध्ये घेतलेल्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात त्यांच्याशी स्टेजवर संवाद साधायची संधी तर मिळालीच पण बॅकस्टेज सुद्धा त्यांचा वावर आणि त्यांच्या मायेची जादू अनुभवायला मिळाली.
त्यांचे नवरा बायकोच्या परस्पर नात्यविषयीचे शब्द आजही मला प्रेरणा देतात. त्या म्हणालेल्या -“नवरा आणि बायको म्हणजे सायकल जी दोन चाकं हायत बघ. पुढचा चाक नवरा आणि मागचा चाक बायको. आता तुम्ही आजकालच्या पोरी म्हणाल बायको मागच चाक का पुढच का नाही ? तर ऐक बाळे, सायकलची सीट कुठ असती ? मागच्या चाकावर, पैडल ? मागच्या चाकावर, ब्रेक कोणत्या चाकाला लावला तर सायकल थांबती ? मागच्या. फक्त पुढच्या चाकाला ब्रेक लावला तर उलटती ना?? सायकल ची चेन मागे .......... एवढच काय तर वजन उचलायला कॅरियर बी मागेच असते की नाय ? मग पुढच्या चाकाला काय हाय तर हँडल आणि घंटी. त्यांच्यानेच सायकल पुढे जाती अस दिसत पण खर काम कुठ हाय ...... माग ना ? नवरा बायकोचं बी तसच आहे बघ...... नवरा धडाडीने संसाराची सायकल पुढ कवा नेईल? जेव्हा बायको मागच्या चाकावानी धीर, गंभीर, सांभाळून घेणारी असल ....... एवढ साधं हाय बघ ......“
आजही त्यांचे हे शब्द कानात ऐकू येतात आणि आपल महत्त्व पटत तसेच जबाबदारीची जाण होते.
माईंच्या मुलाखती नंतरच डॉ. अनिल अवचट मुलांशी संवाद साधणार होते. त्यांनी सुद्धा अतिशय शांतपणे अगदी मित्रासारखे ताणतणाव व्यवस्थापन, निर्व्यसनी जीवन, विविध कलाकुसरांना जोपासण्याचे महत्त्व पटवून सांगितले. जेव्हा व्यसनाधीनते विषयी बोलले तेव्हा त्यांची युवकांसाठीची तळमळ आणि मुक्तांगण मधील परिस्थिती कथन करताना वाया जात असलेल्या युवा उर्जे विषयीचे त्यांचे दु:ख त्यांच्या डोळ्यात दिसत होते. हृदयस्पर्शी कविता, किस्से आणि जोक्स च्या माध्यमातून तब्बल दीड तास त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये अनेक विषयाय सखोल आणि सहज हात घातला. सर्वांसाठी ते बाबा होते पण वागायचे मात्र मित्रासारखे.
असे हे माई आणि बाबा काही महिन्यांच्या अंतरावर आपल्याला सोडून गेले याच दु:ख आहेच. पुन्हा अशी मायाळू माई आणि वाहून घेणारा बाबा मिळण्याचे सौभाग्य महाराष्ट्राच्या नशिबी आहे की नाही माहित नाही. पण त्यांचे अनुयायी म्हणून त्यांची नि:स्पृह सेवा भावना जिवंत ठेवण्याची जबाबदारी मात्र प्रत्येकाच्या खांद्यावर आहे.