राजर्षी शाहू महाराज
- 26 Jun 2021
- Posted By : study circle
- 2790 Views
- 5 Shares
शाहू महाराज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”राजर्षी शाहू महाराजांच्या“ वर अनेक प्रश्न विचारले जाता. राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य, त्यांच्याशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, त्यांनी केलेले कायदे, त्यांच्यावर परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास
* राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
राजर्षी शाहू महाराज आणि स्त्री शिक्षण
* छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेले, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारे राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती साजरी झाली.
१) आधुनिक महाराष्ट्राच्या विबोधतेचा काळ म्हणून आपण फुले, शाहू, आंबेडकर कालखंडाकडे पाहतो. आधुनिक महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या सुधारकांकडून आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायांकडून पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात समाजसुधारकांची मांदियाळीच निर्माण झाली. या मांदियाळीत राजर्षी शाहू महाराजांचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते. छत्रपती असूनही समाजक्रांतिकारक बनलेला, आपल्या राजदंडाचा वापर जनतेच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारा असा हा लोकराजा होता. आपले छत्रपतिपद, अधिकार, आपले वेगळेपण हे आपल्या समाजाला उन्नत करण्यासाठी वापरणार्या शाहू महाराजांच्या कार्याचे अनेक पैलू आहेत. त्यांच्या प्रत्येक पैलूतून दीनदुबळे व शोषित घटकांबद्दलची तळमळच प्रतित होते. मग, ते मागासवर्गीय असोत, भटके विमुक्त असोत किंवा स्त्रीवर्ग असो.
२) राजर्षी शाहूंच्या परिवर्तनवादी विचारांच्या संकल्पनेत व्यापक सामाजिक समतेची उत्स्फूर्त जाणीव होती. या जाणिवेतूनच त्यांनी स्त्री उद्धाराचे कार्य हाती घेतले. स्त्रीदास्याची शृंखला खंडित करायची असेल, तर प्रथम स्त्रीवर्ग शिक्षित झाला पाहिजे, याची जाणीव महात्मा फुल्यांप्रमाणे शाहू महाराजांनाही झाली आणि मग स्त्री शिक्षण हा त्यांच्या सुधारणावादी कारभाराचा एक भागच बनला. कोल्हापूर संस्थानचा कारभार हातात येताच शिक्षण प्रसाराचे व्रत त्यांनी घेतले आणि सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. या प्राथमिक शिक्षणावर ते संस्थानच्या उत्पन्नातून दरवर्षी १ लाख रुपये खर्च करत होते. पुढे हा खर्च ३ लाखांवर गेला. यासाठी त्यांनी श्री. परांजपे हे शिक्षणमंत्री नेमले होते.
३) राजर्षी शाहूंच्या शिक्षण प्रसाराच्या या सर्व खटाटोपामध्ये स्त्री शिक्षण समाविष्ट होते. शाहू महाराजांनी डोंगरी, ग्रामीण व मागासलेल्या भागांमध्ये मुलींसाठी शाळा काढल्या. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या ४-५ वर्षांत त्यांनी भुदरगडसारख्या सह्याद्री लगतच्या मागासलेल्या भागात मुलींच्या शाळा स्थापन केल्या. ज्या ठिकाणी मुलींच्या स्वतंत्र शाळा नाहीत, अशा ठिकाणी मुलींनी शाळेत येऊन मुलांच्या बरोबरीने एकत्रित शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी उत्तेजन दिले. मुलींना शिक्षित करण्यासाठी समाजातील जातिभेदाचा विळखा सैल होण्याची वाट न पाहता त्यांनी चांभार व ढोर मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढून त्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. मुलींच्या शिक्षणात शिक्षकांनी अधिक रस घ्यावा म्हणून मुलांच्या शाळेत पास होणार्या मुलींच्या संख्येवर त्या शिक्षकांना बक्षिसे देण्याची अभिनव कल्पना महाराजांनी राबवली.
४) प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीतही शाहू महाराजांनी विशेष लक्ष घातले आणि १९१९ मध्ये एक खास हुकूम काढून जाहीर केले की, मागासलेल्या जातीतील शिक्षण घेऊ इच्छिणार्या प्रौढ स्त्रियांच्या राहण्या-जेवण्याची सर्व व्यवस्था दरबारकडून मोफत केली जाईल. हुषार मुलींनी पुढील शिक्षण घ्यावे, यासाठी महाराजांनी दरबारतर्फे अशा मुलींसाठी शिष्यवृत्त्या ठेवल्या. आपली कन्या आक्कासाहेब महाराजांच्या विवाहाप्रीत्यर्थही महाराजांनी प्रत्येकी ४० रुपयांच्या पाच शिष्यवृत्या ४ थीच्या वार्षिक परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणार्या विद्यार्थिनींसाठी सुरू केल्या. अशा शिष्यवृत्त्या त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर गुजरातमधील मुलींसाठीही चालू केल्या.
५) शाहू महाराजांनी मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावरच भर दिला असे नाही, तर त्यांना उच्च शिक्षण देण्याकडेही लक्ष दिलेले दिसते. अत्रिकाबाई डॅनियल बेकर या ख्रिश्चन मुलीला उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्याला पाठवले. राधाबाई सूर्यवंशी, ताराबाई खानोलकर यांच्यासह पाच मुलींना त्यांनी उच्च शिक्षणासाठी मुंबईला पाठवले. कृष्णाबाई केळवकर यांना मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये पाठवून त्यांना डॉक्टर बनवले. पुढे याच कृष्णाबाईंना महाराजांनी उच्च वैद्यकीय अभ्यासासाठी इंग्लडलाही पाठवले. ही इतिहासाला ज्ञात असलेली शाहूंच्या प्रोत्साहननाने उच्च शिक्षण घेतलेल्या स्त्रियांची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
६) शाहू महाराजांचा स्त्रीच्या उन्नतीविषयीचा द़ृष्टिकोन स्त्री कर्तृत्वाला आकाश मिळवून देणारा होता. त्यांनी कोल्हापुरात फिमेट ट्रेनिंग स्कूल सुरू केले आणि तेथे रखमाबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. रखमाबाईंनी आपली निवड सार्थ ठरवत कोल्हापूर संस्थानातील स्त्री शिक्षणाच्या कार्याला गती दिली. शिक्षणाधिकारी असणार्या मिस लिटल निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी महाराजांनी याच रखमाबाईंची नेमणूक केली.
७) सर्व स्तरांतील स्त्रियांना केवळ शिक्षणाची दारे खुली करून महाराज थांबले नाहीत, तर स्त्रिच्या राजकीय सहभागाचीही त्यांना आवश्यकता वाटत होती. म्हणून त्यांनी १८९५ मध्ये मुंबईला भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला कृष्णाबाई व रखमाबाई केळवकर या दोन विद्वान भगिनींना स्वयंसेविका म्हणून कोल्हापुरातून पाठवले.
८) शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाचा परिघ त्यांची स्नुषा इंदुमतीदेवी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इंदुमती ११ व्या वर्षी विधवा झाल्या. तेव्हा सर्व राजकुटुंबाचा रोष पत्करून महाराजांनी त्यांना शिक्षित करायचे ठरवले. शाहूंसारखा कर्ता सुधारक व पोलादी मनाचा सासरा इंदुमतींच्या पाठीशी उभा राहिला. इंदुमतींच्या शिक्षणाची सोय त्यांनी सोनतळीला केली. त्यांच्याबरोबर चार वेगवेगळ्या जातींतील मुलींचीही शिक्षणाची सोय केली. विशेष म्हणजे, त्यात एक ख्रिश्चन मुलगीही होती. महाराजांनी इंदुमतींना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर त्यांना जीवनातील अनंत आव्हानांना सामोरे जाता यावे म्हणून सारथ्य, शिकार, अश्वारोहण, मोटार ड्रायव्हिंग अशा अनेक गोष्टी शिकवल्या. इंदुमतींचे आयुष्य म्हणजे शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणविषयक कल्पना राबवण्याची उत्तम प्रयोगशाळा होती. इंदुमतींना डॉक्टर करण्याची महाराजांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या लेडी हार्डिंग्ज झनाना मेडिकल कॉलेजमध्ये इंदुमतींचे अॅडमिशनही केले होते; पण दुर्दैवाने हा संकल्प पूर्ण होण्याआधीच महाराजांचे निधन झाले.
९) शिक्षणाचे वंगण घातल्याशिवाय स्त्री जीवनाच्या परिवर्तनाचे चाक फिरणार नाही, हे शाहू महाराजांनी ओळखले होते; पण त्यांना याचीही जाणीव होती की, स्त्री जीवनात क्रांती घडवून आणण्यासाठी जहाल सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता आहे. स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्यायचा असेल, तर फक्त तीला शिक्षित करून चालणार नाही, तर त्यासाठी आपल्या राजदंडाचा वापर करून स्त्रीदास्य विमोचनाचे कायदेच केले पाहिजेत. म्हणून त्यांनी स्त्रीउद्धाराचे पाच कायदे करून सामाजिक क्रांतीच्या प्रांगणामध्ये आपले पाऊल टाकले.
१०) १९१७ मध्ये शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा आपल्या संस्थानात केला. हिंदू धर्मशास्त्रांनी व सामाजिक बंधनांनी विधवा स्त्रीस पुनर्विवाहास बंदी घातली होती. ही बंदी कायदेशीर मार्गाने दूर करून महाराजांनी स्त्रीच्या पुनर्विवाहाचा मार्ग मोकळा केला. नुसताच हा कायदा करून महाराज थांबले नाहीत, तर आपली स्नुषा इंदुमतींसमोरही त्यांनी पुनर्विवाहाचा पर्याय ठेवला होता. स्त्री उद्धाराबरोबरच राष्ट्राच्या एकात्मतेला पुष्टी देणारा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कायदा शाहू महाराजांनी १९१९ मध्ये केला. त्याकाळी आंतरजातीय - धर्मीय विवाह करणार्यांचे विवाह बेकायदेशीर व संतती अनौरस ठरवली जात होती, तरीही धाडसाने एखाद्या स्त्रीने असा विवाह केलाच, तर तीला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत असे. म्हणून महाराजांनी हा कायदा करून असा विवाह करणार्यांचे विवाह व संतती दोन्हीलाही कायदेशीर मान्यता दिली. या कायद्याचे एक विशेष म्हणजे, यातील एका कलमात महाराजांनी १८ वर्षांवरील मुलीस जोडीदार निवडण्यासाठी पालकांच्या परवानगीची गरज नाही, असे म्हटले आहे. स्त्री स्वातंत्र्याचा ऐलान करणारे हे कलम आहे. येथेही सुधारणेची सुरुवात महाराजांनी स्वत:च्या घराण्यापासून केली. त्यांनी आपल्या जनक घराण्यातील बहिणीचा चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर घराण्यात करून दिला. १०० वर्षांपूर्वी समाजमनावर मात करून असे विवाह घडवून आणताना महाराजांना कोणत्या दिव्यातून जावे लागले असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
११) स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा तिसरा कायदा शाहू महाराजांनी केला, तो म्हणजे स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा. हा कायदा करायला स्वतंत्र भारतात २००५ वर्ष उजडावे लागले. या कायद्यात महाराजांनी स्त्रियांना क्रूरपणे वागविण्याचे बंद करण्याबद्दल नियम दिले आहेत. या क्रूरपणाच्या वागणुकीत त्यांनी स्त्रीचा केवळ शारीरिक छळच नव्हे, तर मानसिक क्लेश देणेही शिक्षेस पात्र मानले आहे.
१२) शाहू महाराजांनी स्त्रीला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य दिले, तसेच तीला नको असणार्या जोडीदारापासून बंधनमुक्त होण्याचे स्वातंत्र्यही दिले. १९१९ मध्ये काडिमोड कायदा करून महाराजांनी जातपंचायतीच्या लहरीवर चालणारी काडिमोड पद्धत बंद केली आणि स्त्रीला घटस्फोटाचा अधिकार दिला.
१३) अनेक कायदे करून शाहू महाराजांनी स्त्रीच्या हातात संरक्षणाचे एक हत्यारच दिले. एका एत्तदेशीय राजाने आपल्या संस्थानात इंग्रज सरकारहून प्रगत कायदे केले, ही गोष्ट भारताच्या इतिहासात क्रांतिकारक ठरावी अशी आहे. स्त्रीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचणार्या पद्धती त्यांनी हुकूम काढून बंद केल्या. १९२१ मध्ये शिमग्याच्या सणात स्त्रियांबद्दल बिभत्स भाषा वापरण्याचे बंद करण्याबद्दल त्यांनी हुकूम काढला. मराठा समाजामध्ये असणार्या स्त्रियांच्या घोशा, पडदा पद्धतीचा निषेध करत ते म्हणतात की, या पडदा पद्धतीने स्त्रियांमधील विरत्वाचे गुण नष्ट होतात. शाहू महाराजांचा स्त्री प्रश्नाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन स्त्रीच्या अस्मितेच्या सर्व कक्षांना स्पर्श करणारा होता आणि या द़ृष्टिकोनातूनच त्यांनी स्त्री उद्धाराचा ध्वज आपल्या हाती घेतला.
सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
२६ जून २०२१ / प्रा. डॉ. मंजुश्री पवार
कामगारांचे हितकर्ते राजर्षी
* समाजातील कष्टकरी, कामगार आणि शोषित, पीडित यांच्याविषयी शाहू छत्रपतींना आंतरिक कळकळ होती. या घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी कृतीशील आदर्श घालून दिला. शाहू छत्रपती स्वतःला अगदी अभिमानाने शेतकरी किंवा मजूर कष्टकरी म्हणवून घेण्यात धन्यता मानताना आढळून येतात. कानपूर येथील अखिल भारतीय क्षत्रियांच्या सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना १९ एप्रिल १९१९ रोजी ते म्हणाले होते, “मी तुमच्यापैकीच आहे, मला मजूर अगर शेतकरी समजा. माझे वाडवडील हाच धंदा करीत होते. जे काम माझे पूर्वज करीत होते तेच काम करणार्या लोकांचा अध्यक्ष होण्याकरीता मला आज बोलाविले आहे, याबद्दल अत्यानंद होत आहे.”
* घाम गाळून आपला जीवननिर्वाह चालविणार्या वर्गाबद्दल अपार करुणा आणि जिव्हाळा असणार्या शाहूराजेंच्या उक्ती आणि कृतीमध्ये नेहमीच कमालीची एकवाक्यता दिसते. राजवाड्यापेक्षा दीनदुर्बलांच्या झोपड्यांमध्ये शाहू छत्रपतींचा जीव अधिक गुंतलेला दिसतो. दरबारामधल्या मानकर्यांपेक्षा राबणार्या मजुरांची सर्व हारांची काळजी घेणे, राबणार्यांचे जीवन अधिक सुखसमाधानाचे करणे यामध्ये त्यांना अधिक स्वारस्य होते. या संदर्भात त्यांच्या जीवनातील काही प्रसंग आणि कष्टकर्यांसाठी केलेले काही कायदे केवळ प्रातिनिधिक उदाहरणे म्हणून लक्षात घेता येतील.
* कोल्हापूर संस्थान आणि आजूबाजूच्या प्रदेशात गुर्हाळामध्ये उसाचे रस काढण्यासाठी लोखंडी घाणा वापरत. अनेकदा त्यावर काम करताना मजुरांचे अपघात होत, जबर दुखापत व्हायची. काही वेळा बोटेही गमवावी लागत, म्हणून शाहू छत्रपतींनी राज्यकारभार हाती घेऊन वर्ष होण्याआधीच, २९ मे १८९५ रोजी दरबारामार्फत पुढील जाहिरात प्रसिद्ध केलेली होती. “घाण्यामध्ये हात सापडणार नाही, अगर सापडलाच तर त्यास इजा होणार नाही, अशा तर्हेची त्यात काही यांत्रिक युक्ती तारीख १ जानेवारी १८९६ च्या आत कोणी शोधून काढल्यास ज्याची युक्ती सोपी, थोडक्या खर्चात होणारी पसंत अशी ठरेल त्यास चांगले बक्षीस देण्यात येईल”.
हाताला काम, घामाला दाम -
* १८९६-९७ मध्ये कोल्हापूर प्रदेशातल्या दुष्काळात ७५ मैलांचे रस्ते करून घेऊन शाहू छत्रपतींनी कदाचित महाराष्ट्रातील पहिली रोजगार हमी योजना राबवणार्या हातांसाठी कार्यवाही करून दुष्काळग्रस्त लेकुरवाळ्या बायाबापड्यांना मदत केली. त्यांच्या मुलांच्या कामाच्या ठिकाणी सांभाळासाठी खास शिशुगृहे उघडण्यासही ते विसरले नव्हते.
* भारतात ब्रिटिश सरकारने अपघातात सापडून शारीरिक इजा झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्वरुपात नुकसानभरपाईचा सविस्तर कायदा १९२३ मध्ये लागू केला; परंतु त्याही आधी २९ जून १९०१ रोजीचा करवीर सरकारचा, खाणीतल्या कामगारांच्या कामाची परिस्थिती आणि वेतन पद्धती याबाबत सविस्तर माहिती मालकांनी पाठवावी म्हणून प्रसिद्ध केलेला वटहुकूम उपलब्ध आहे. त्यामध्ये खाणकामगारांच्या अपघातांची माहिती देण्याची सक्ती केलेली दिसते.
* लहान-मोठ्या हॉस्पिटलमधून डॉक्टरांच्या बरोबरीने काम करणार्या परिचारिका अजूनही उपेक्षित आहेत. शाहू छत्रपतींनी ४ जानेवारी १९१७ रोजी या परिचारिकांचा मेहनताना कसा द्यावयाचा यासंबंधी सविस्तर ठराव केलेला आढळतो. त्यामध्ये नर्सेसना थांबवून घेतल्यास जेवण व इतर वस्तू दिल्या पाहिजेत, हे जसे नमूद केले आहे, तसे परिचारिकांनी बक्षिसे घेण्यासाठी भांडण करण्याचे नाही, हेही सांगितले आहे!
* महात्मा फुले यांचे बिन्नीचे शिलेदार असणारे भारतातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे आणि शाहू छत्रपतींचा परस्पर परिचय होता की नाही, याबाबत इतिहास काही बोलत नाही; परंतु मुंबईमध्ये १८९३-९४ मध्ये झालेली हिंदू-मुस्लिम दंगल शांत करून दोन्ही धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण करण्यात लोखंडे यांचा पुढाकार होता. शाहूराजे कोल्हापूरच्या गादीवर बसल्यानंतर पुण्यात सार्वजनिक सभेने त्यांचा जो सत्कार केला, त्यास उत्तर देताना मुंबईमधील हिंदू-मुस्लिम दंगल मिटविण्यासाठी दोन्ही धर्मांच्या नेत्यांना ते कळकळीची विनंती करतात, असे अनुमान केले तर ते चुकणार नाही, असे वाटते. लोखंडे यांच्या मृत्यूनंतर म्हणजे १८९७ मध्ये मुंबईच्या कामगारांचे नेतृत्व लोकहितकर्ते सी. के. बोले यांच्याकडे आले. त्यांच्या जोडीला बहुजनी आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी अर्जुन केळुसकर, हरिश्चंद्र तालचेकर, भिवाजी रामजी नरे, शिवराम वामन पाटील आदी कामगार नेते होते. त्यांच्या सहकार्याने बोले यांनी १९०९ मध्ये कामगार हितवर्धक सभेची स्थापना केली होती. या संस्थेशी शाहू छत्रपतींचा संबंध आला. यातील हरिश्चंद्र तालचेकर हे कोल्हापूर शाहू मिलचे मुंबईचे प्रतिनिधी होते.
* शाहू छत्रपती अभ्यासू वृत्तीने युरोपमधील कामगार चळवळीवर लक्ष ठेवून होते. इंग्लंडसारख्या देशात राजेशाही कारखानदार पद्धतीला म्हणजेच भांडवलशाहीला पाठिंबा दिला असताना शाहू छत्रपती मात्र कामगारांच्या बाजूने उभे असल्याचे दिसतात. त्यांचे आणि बोले यांची मैत्री वाढल्याचेच दिसते. बोलेंच्या संयमी, संघर्षवादी नेतृत्वाखाली कामगार हितवर्धक सभेचे कार्य जोमाने सुरू होते. १० नोव्हेंबर १९१८ रोजी त्यांनी परळमध्ये कामगारांची सभा बोलावली होती. त्याला १० हजार कामगार व इतर मागासवर्गीय हजर होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी कामगारांसंबंधी व्यापक विवेचन केले होते. ते पुढीलप्रमाणे- “मुंबई शहर हे व्यापार व उद्योगधंदा याबाबतीत सुप्रसिद्ध आहे. धनिकांचे भांडवल व कारखानदारांचे व्यवस्थापन चातुर्य यावरच हा व्यापार व उद्योगधंदा अवलंबून आहे, अशी आजपर्यंत इकडच्या प्रांती समजून होती. पाश्चात्य देशात भांडवलवाले व मजूर असे दोन वर्ग आहेत. तिकडेही भांडवलदार लोकांची मजूरदार लोकांवर बेसुमार सत्ता चालते; पण आता मजूरदार लोकांनी आपले संघ बनविले आहेत. गवताच्या एकेका काडीची ताकद जास्त नसते; पण अशा अनेक काड्यांचा वेठ वळला तर त्याने हत्तीलाही बांधता येते. मजूरदार लोकांना विलायतेत मजुरी वाढवावी एवढ्याकरीताच झगडावे लागते. तेथील समाजामध्ये कोणत्याही दर्जास पोहचण्यास जन्मसिद्ध अडचणी मुळीच नाहीत. त्यामुळे ते उच्च वर्गात सहज रीतीने मिसळतात. तशी स्थिती आमच्या इकडे नाही. विलायतेत मजूरदार लोकांच्या संघांना बरेच महत्त्व आले आहे. पार्लमेंटसारख्या संस्थात व प्रधान मंडळात त्या लोकांतीलच प्रतिनिधी शिरले असून ते आपल्या वर्गाच्या हिताचे योग्य रीतीने संरक्षण करीत आहेत.” पुढे ते सांगतात, “आपल्या मुलाबाळांस शिक्षण देऊन, आपले आरोग्य वाढविण्याचे प्रयत्न करून आपली उन्नती आपणच करून घेतली पाहिजे. दुसरा आपल्याकरिता काही करील, अशी अपेक्षा करणे केव्हाही कमीपणाचे आहे ही गोष्ट अहर्निशी लक्षात ठेवा”.
* परळमधील यशस्वी सभेनंतर शाहू छत्रपतींच्या विनंतीनुसार बाबासाहेब बोलेंनी लोकसंघ (पीपल्स युनियन) या संस्थेची स्थापना करून त्याचे कार्यवाह झाले. त्यांच्या जोडीला रामचंद्र विठ्ठल वंडेकर, परशरामराव शिंदे, दामोदर सावळाराम यंदे, भास्कर जाधव, हरिश्चंद्र तालचेरकर आदी बहुजन समाजातील नेते काम करीत होते. मागास वर्ग आणि कामगार वर्गाची आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक अशी सर्वांगीण प्रगती साधणे हाच लोकसंघाचा प्रमुख उद्देश होता. शाहू छत्रपतींनी या लोकसंघाला ५००० रुपयांची देणगी जाहीर करून, त्यापैकी १००० रुपये बोले यांच्याकडे लगेच सुपूर्द केले होते.
* १९१८चा नोव्हेंबर महिना शाहू छत्रपतींचा मुंबई येथेच मुक्काम होता. ते कामगारांत मिळून-मिसळून त्यांच्याशी सुसंवाद करीत होते. याच महिन्याच्या २४ तारखेला लोकसंघाच्या स्थापनेनंतर मुंबईमध्ये ग्रँट रोडवर शाहू छत्रपतींची कामगार आणि मागासवर्गीयांना मार्गदर्शनासाठी दुसरी सभा झाली. त्यामध्ये भारतीय कामगारांना ते संघटित होण्याचे कळकळीचे आवाहन करताना दिसतात. “येथे इंग्लंडप्रमाणे मजुरांचे संघ झाले पाहिजेत व सर्वांस हक्क काय आहेत ते कळले पाहिजेत. भांडवलवाल्यांत ब्राह्मण व वैश्य वृत्तीच्या लोकांचा भरणा विशेष आहे. त्यांना दाबात ठेवल्याशिवाय मजुरांची उन्नती होणे कठीण आहे.” थोडक्यात, शाहू छत्रपती आणि लोकहितकर्ते बोले या उभयंतांमध्ये दिवसेंदिवस सहकार्य वाढलेलेच दिसते.
* शाहू छत्रपतींनी हाती घेतलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला बाबासाहेब बोले जसा मनःपूर्वक सक्रिय पाठिंबा देत होते, तसे शाहू छत्रपती बोले यांच्या कामगार-कल्याण चळवळीत प्रत्यक्ष सहभागी होत होते. त्यामधून त्यांचे कामगार वर्गासंबंधी असणारे प्रेम दिसून येत होते.
सौजन्य व आभार : दैनिक सकाळ
२५ जून २०२१ / डॉ. रमेश जाधव
डॉ. विलियम वानलेस यांचा प्रेमविवाह
* लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि त्यांचे मित्र सेवाव्रती डॉ. विलियम वानलेस व यांनी आपल्या मैत्रीतून मिरज आणि कोल्हापूरच्या जनतेची सेवा केली होती.
* ५ डिसेंबर १९०७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी डॉ. वानलेस व लिलियन हेवन्स यांचा विवाह लावून दिला होता. यावेळी मिरज ते कोडोली या दरम्यान शाहू महाराजांनी स्वत: सजवलेल्या रथाचे सारथ्य केले होते. दुसर्या संस्थानातील म्हणजे मिरज संस्थानात मिशनरीचा दवाखान्यात सेवा बजावणार्या डॉक्टरसाठी शाहू महाराजांनी हे केले होते.
१) १८५२ पासून कोल्हापुरात अमेरिकन मिशनरीच्या कार्यास सुरुवात झाली होती. कोल्हापुरातील मिशनरीच्या अंतर्गत सांगली येथे १८८४ साली उपकेंद्र काढण्यात आले. यानंतर या ठिकाणी गरीब, दीन दुबळ्या पीडित लोकांची सुश्रुशा करण्यासाठी दवाखाना काढण्याचा निर्णय झाला.
२) १८८९ साली सांगलीत दवाखाना स्थापन करण्यात आला. याठिकाणी मूळचा कॅनडाचे रहवासी असणारा व नुकतीच वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झालेला नवखा तरुण डॉ. विलियम वानलेस आपली पत्नी मेरी वानलेस हिच्या सोबत सांगलीत दाखल झाला. प्रभू येशुच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे दीन दुबळ्याची सेवा करणे हीच ईश्वर सेवा मानून या दयाळू डॉक्टराने आपली सेवा बजावण्यास सुरुवात केली. पुढे डॉ. वानलेस यांनी आरोग्यदायी आणि पोषक वातावरण असलेल्या मिरजेची मुख्य दवाखान्यासाठी निवड केली. मिशनरीच्या रुग्णालयाची मुख्य इमारत त्यांनी इथे बांधली व मिरजेतच स्थायिक झाले.
३) डॉ. वानलेस यांनी या क्षेत्रात आपले नाव कमावले. या नावाचा गवगवा कोल्हापूर पर्यंत झाला. डॉक्टरांची ख्याती शाहू महाराजापर्यंत पोहचली होती. तसेच कोल्हापूर संस्थानचे राजे शाहू महाराज यांची व त्यांच्या लोकहित कार्याची ओळख डॉ. वानलेस यांना होती. शाहू महाराज शिकारीसाठी नेहमी जत, विजापूरला जात असत. जाताना त्यांचा संपूर्ण ताफा मिरजेतून जात असे.
४) १९०३ पासून ते महाराजांच्या मृत्यू पर्यंत डॉ. वानलेस हे महाराजांचे फॅमिली डॉक्टर होते. राजांच्या घरातील महत्त्वाची माणसे आजरी पडली तर महाराज त्यांना डॉ. वानलेस यांच्याकडे उपचारासाठी पाठवत. तर कधी डॉक्टर स्वत: कोल्हापूरला तपासणीसाठी येत असत.
५) डॉ. वानलेस यांची पत्नी मेरी या परिचारीका होत्या. १९०६ साली कॉलर्याने मेरी वानलेस यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूचे दु:ख विसरण्यासाठी त्यांनी स्वतःला कामात वाहून घेतले. कामाच्या ताणातून डॉ. वानलेस गंभीररित्या आजारी पडले. या बाबतची माहिती अमेरिकन मिशनरीला देण्यात आली. त्यांनी ताबडतोब डॉ. जॉन होम्स यांना मिरजेत पाठवले. मेरी वानलेस यांचे जाणे आणि डॉक्टरांचे आजारी पडण्याने शाहू महाराजही व्यथित झाले होते.
६) मेरी वानलेस यांचे निधन झाल्याने येथे मुख्य परिचारिकेची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे मिरजेतून कोल्हापूर मिशनरीकडे नर्स बाबत विचारणा करण्यात आली. कोल्हापूर मिशनरीत ६ महिन्यांपूर्वी नव्या परिचारिका लिलियन हेवन्स रुजू झाल्या होत्या. हेवन्स या अत्यंत हुशार आणि कुशल परिचारिका होत्या. अमेरिकेत असताना त्यांच लग्न झाल होत. पण, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या नवर्याचे निधन झालं. हे दु:ख विसरण्यासाठी आणि ईश्वराची सेवा करण्यासाठी ही तरुणी मिशनरीकडून कोल्हापुरात काम करण्यासाठी आली होती. कोल्हापूरच्या मिशनरीने मिरजेतील दवाखान्याची अवस्था पाहून त्वरित लिलियन यांची रवानगी मिरजेला केली.
७) डॉ. वानलेस खूपच आजारी होते. डॉ. होम्स यांनी दवाखान्याची जबाबदारी घेतली होती. लिलियन यांनी केलेल्या सुश्रूशामुळे डॉ. वानलेस लवकरच बरे झाले. त्यांनी पुन्हा रुग्णांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतले. यावेळी त्यांच्या सोबतीला लिलियन होत्या. तिच्या साथीत त्यांना मेरीच्या दुःखाचा थोडासा विसर पडू लागला होता. हीच भावाना लिलियन यांची डॉक्टरांच्या प्रती होती. दोघेही तसे समदु:खी, दोघांनाही त्यांचा संसार अर्ध्यात सोडावा लागला होता. आता एकमेकांच्या साथीने त्यांना पुन्हा संसार सुरु करण्याची संधी आली होती. पण, अमेरिकन मिशनरीचा यास विरोध होता. त्यामुळे दोघांनाही आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार होता. यामुळे दोघेही प्रेमी पुन्हा व्यथित झाले होते.
८) हा सर्व प्रकार छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहचला होता. मेरी यांच्या निधनानतंर डॉ. वानलेस यांच्या जीवनात नव्या तरुणीच्या येण्यामुळे डॉक्टरांचे आयुष्य पुन्हा नव्याने उभे राहणार होते. पण, मिशनरीच्या विरोधामुळे शाहू महाराजही चिंतित होते.
९) शेवटी ५ डिसेंबर १९०७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी सजवलेल्या रथातून डॉ. वानलेस व लिलियन हेवन्स मिरजेहून यांना पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणार्या कोडोलीला आणले आणि तेथे कोडोली मिशनचे प्रमुख डॉ. ग्रॅहाम यांच्या हस्ते ख्रिश्चन परंपरेनुसार दोघांचे लग्न लावले. लग्न पार पडताच शाहू महाराजांनी त्याच रथातून नवदाम्पत्यांना कोल्हापुरातील आपल्या न्यू पॅलेसला आणले. तेथे त्यांची सरकारी पाहुणे म्हणून खास पाहुणचार केला. भारी कपडे आणि आभुषणे देऊन नवदाम्पत्यांना आहेर करण्यात आला. दुसर्या दिवशी सकाळी शाहू महाराज नवदाम्पत्यांना घेऊन मिरजेला आले. स्वत: महाराजांनीच हा विवाह घडवून आणल्याने मिशनरीनेही या लग्नास मान्यता दिली.
मेडिकल हबची पायाभरणी -
१) मिरज मिशनच्या रुग्णालयासाठी शाहू महाराजांनी अनेक देणग्या दिल्या. डॉ. वानलेस यांच्या पाठीशी शाहू महाराज सदैव खंबीरपणे उभे राहिले. या मैत्रीच्या जोडगोळीमुळेच मिरजेत मेडिकल विश्व उभे राहिले.
२) महाराजांची इच्छा होती की डॉ. वानलेस यांनी कोल्हापुरात यावे. डॉक्टरांनी आपल्या दरबारी सर्जन व्हावे अशी इच्छा शाहू महाराजांनी व्यक्त केली होती. पण, या भल्या माणसाने अगदी शाहूमहाजांचा आदर ठेवत फक्त दीन दुबळ्यांची सेवा करता यावी यासाठी दरबारी सर्जन होण्याचे नाकारले. यावर शाहू महाराज नाराज झाले नाहीत. उलट त्यांना त्यांच्या मित्राचा आणखी अभिमान वाटू लागला. सर्व सुखे पायाशी लोळण घालत असताना ते नाकारणं आणि जनसेवा पत्करणं हे कुणी देवमाणूसच करू शकतो.
३) कोल्हापुरात ही चांगला दवाखाना सुरु करण्याची विनंती महाराजांनी डॉ. वानलेस यांना केली. यासाठी महाराजांनी कोल्हापुरातील कावळा नाका येथे असणारे मिलटरी हॉस्पिटल, तेथील बंगला व १३ एकरांची जागा डॉ. वानलेस यांना रुग्णालयासाठी दिली. शिवाय रुग्णालय उभारणीसाठी १३ हजारांची रक्कम ही दिली. तिथे रुग्णालयाची उभारणी झाली व त्यास शाहू महाराजांनी डॉक्टरांची दिवंगत पत्नी यांचे मेरी वानलेस असे नाव दिले. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी आपल्या मित्राच्या पहिल्या पत्नीच्या नावे एक स्मारकच बनवले.
४) डॉक्टरांकडून उपचार करुन घेण्यासाठी शाहू महाराज मिरजेला जात राहिले. तिथे गेल्यावर राहता यावे म्हणून त्यांनी मिशन हॉस्पीटल जवळच मिरज संस्थानकडून जागा घेतली आणि तिथे राहण्यासाठी बंगला बांधला. फक्त डॉक्टरांकडे जाता यावे, त्यांचा सहवास लाभावा यासाठी महाराजांनी हे केले. पुढे तो बंगलाही शाहू महाराजांनी डॉ. वानलेस यांनाच दिला. मिरजेत वंटमुरे कॉर्नरला शाहू महाराजांचा हा बंगला या इतिहासाची साक्ष देत आहे.