अजिंठा लेणी

  • अजिंठा लेणी

    अजिंठा लेणी

    • 16 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 262 Views
    • 0 Shares
     अजिंठा लेणी
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसाया घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात अजिंठा लेण्यांचा शोधव त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.

    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -

    १.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा (प्राचीन व आधुनिक) - कान्हेरी, एलिफंटा, अजिंठा, वेरूळ येथील लेणी, लोणार सरोवर, महाराष्ट्रातील किल्ले इत्यादी.
        दृश्य कला - चित्रकला व वास्तुशिल्प

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    अजिंठा लेण्यांचा शोध
     
    *   डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनामुळे अजिंठ्याच्या संशोधनाला कलाटणी मिळाली. तत्पूर्वी गिल, ग्रिफिथनंतर अजिंठ्यात र्हेंरगहॅम आल्या व त्यांनी टेम्पराच्या तंत्राने चित्रे नकलली, तसेच पुस्तकेही लिहिली होती. युरोपमध्ये देखील भित्तिचित्रकलेची परंपरा होती. पुनरुज्जीवन काळामध्ये त्या परंपरेलाही पुन्हा नवीन उजाळा आला. पण अजिंठा लेण्यांमधील चित्रांनी युरोपीय अभिरुचीला एक निराळे साक्षात्कारी दर्शन लाभले.
     
        ख्रिस्तिआना हेरिंगहॅम -
     
    *   जॉन ग्रिफिथच्या चित्रांमुळे आणि पुस्तकामुळे अजिंठ्याबद्दलची उत्सुकता चांगलीच चाळवली गेली होती. ख्रिस्तिआना हेरिंगहॅम या एक नाणावलेल्या चित्रकार होत्या. पण चित्रकारीइतकाच त्यांचा जीव महिलांना निवडणुकीत मतदान अधिकार मिळावा यासाठी चाललेल्या चळवळींमध्ये देखील गुंतला होता. अनेक चित्रसज्जांमध्ये चित्रांची आवृत्ती बनवण्याचे काम त्या करत. त्या काळात जलरंगासोबतीने अंड्याचा पांढरा बलक किंवा दुधापासून मिळणारे चीजसारखे ‘कॅसें’ मिसळून रंग वापरले जात. ही रीत प्राचीन आहे. तिला टेम्परा पद्धती म्हणतात. या पद्धतीला पुनश्‍च उजाळा देणारा प्रघात काही चित्रकारांनी सुरू केला होता. अशा चित्रकारांनी ‘सोसायटी ऑफ पेंटर्स इन टेम्परा’ अशी संस्थासुद्धा काढली होती.
     
    *   ख्रिस्तिआना हेरिंगहॅम या‘सोसायटी ऑफ पेंटर्स इन टेम्पराया संस्थेच्या संस्थापकांपैकी. ‘वुइमेन्स गिल्ड ऑफ आर्ट्स’ संस्थेच्याही त्या संस्थापक होत्या. त्या काळी ब्रिटिश म्युझियमच्या ‘छपाई आणि रेखाटन’ विभागाचा लॉरेन्स बिनयॉन हा प्रमुख होता. बिनयॉन याने दिलेल्या सूचना आणि प्रोत्साहनामुळे भारतातील प्राचीन चित्रकलेकडे हेरिंगहॅम यांचे लक्ष वेधले गेले. १९०६ साली त्यांनी प्रथम बुद्धाच्या भव्य मूर्तीचे मोठे रेखाटन केले. बिनयॉन त्यामुळे प्रभावित झाला. बिनयॉनच्या प्रोत्साहनामुळे १९०९-१० सालच्या हिवाळ्यात सहा आठवडे आणि पुन्हा १९१०-११ साली हिवाळ्यातले तीन महिने अजिंठ्याला त्या मुक्काम ठोकून राहिल्या. त्याकाळात अजिंठा परिसर निजामशाहीत होता. पण ‘ब्रिटिश म्युझियम’मुळे निजामाची ‘मेहेरबान परवानगी’ आणि ‘संरक्षण’ मिळाले. तिथली भौगोलिक स्थिती, गैरसोयी आणि सुविधांचा अभाव, रोजचा तीन साडेतीन तासांचा जिकिरीचा प्रवास या अडचणी होत्याच. सहकार्‍यांच्या कामाची देखरेख, त्यांना सूचना सुधारणा देणे तर सतत चालू होतेच. पण त्याच जोडीने सहकारी आजारी पडणे, मग त्यांची शुश्रूषा, भेट देणार्‍या पाहुण्यांचे आगतस्वागत एवढे सगळे झपताल त्या उत्साही जिद्दीने सांभाळत होत्या. त्यांचा एक फ्रेंच सहकारी चार्लस म्यूलरने या छावणीची रोजनिशी लिहिली आहे. त्यात तो म्हणतो, “दिवसाची भाजणारी भट्टी असो की रात्रीची बोचरी थंडी, वटवाघळांच्या विष्ठेने माखून निघाल्या, डोळ्यात घाण पडून वैताग झाला तरी यांचा दुर्दम्य उत्साह काही मागे हटत नसे. मचाणावर शिडीवर चढून प्रतिकृती रेखाटण्यात, रंगविण्यात काही बाधा पडत नसे”. त्यांच्या प्रकल्पातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना लाभलेले सहकारी! अवनीन्द्रनाथ टागोर (रवीन्द्रनाथांचे पुतणे) यांच्या साहाय्यामुळे कलकत्ता स्कूल ऑफ आर्टमधील पाच विद्यार्थी त्यांच्या चमूत दाखल झाले. त्यातले दोघे जण पुढे भारतीय चित्रकलेतील नव-पुनरुज्जीवनाचे दिग्गज म्हणून ख्याती पावले. पहिले म्हणजे असितकुमार हलधर आणि दुसरे नन्दलाल बोस! (शांतिनिकेतनमध्ये ‘अरे वृक्ष खालून वर वाढतात, ती गती पकडायला आपली नजर आणि हातपण तसा गेला पाहिजे’ असं सत्यजीत रायना शिकविणारे!)
     
    *   हेरिंगहॅमनी आपल्या ‘प्रतिकृती चित्र’ संग्रहाच्या सोबत एक निबंधवजा टिपण लिहिले आहे. ‘ए नोट ऑन दि हिस्टरी अँड कॅरॅक्टर ऑफ पेंटिंग्ज’. रॉबर्ट गिल आणि जॉन ग्रिफिथप्रमाणेच या चित्रकर्तीलादेखील मोठा विस्मय वाटला. दृश्यातले वातावरण, त्यातली विविध‘वंशी’ माणसे, प्राणी, वनस्पती यांचे आकार, निरनिराळ्या कथनातले रेखाटन करताना त्यांचे बदललेले शारीरिक प्रमाण, भाव व्यक्त करण्यासाठी रेखलेली बोटे, हात, डोळे, उभे राहण्याची किंवा बसण्याची ढब, जनावरांच्या डोळ्यातील भाव, त्यांची हालचाल सुचविणारी ठेवण, चित्रणात उतरवलेली रेषांची गती ही अनोळखी शैलीची द्योतके त्यांनी मुद्दाम नोंदलेली आहेत. त्यांनी म्हटले आहे या चित्रकारांना अंगविन्यास चितारण्याची कला कमालीची अवगत आहे. प्राणी असोत वा व्यक्ती, त्यांचे उठणे-बसणे चालणे, हातवारे, हावभाव, त्यातले सौंदर्य त्यांनी अपार जाणलेले आहे. हे सगळे ज्या लीलया केले आहे त्यावरून चित्रकारांची तालीम फार उच्च दर्जाची आहे हे सहजी कळून येते. पानाफुलांचे रेखाटन अतीव सुंदर आहे. चित्रांमध्ये पाहताक्षणीच गोचर होणार्‍या अनेक गती आहेत काही रंगसंगती तर फार विविध आणि विशेष रोचक आहेत.
     
    *   अर्थातच हेरिंगहॅम यांची रंग वापराची परंपरा गिल वा ग्रिफिथपेक्षा निराळी आहे. त्यांच्या हुकमी टेम्परा पद्धतीने ही चित्रे बनविलेली आढळतात. ग्रिफिथच्या ग्रंथाप्रमाणेच हेरिंगहॅमची पुस्तके देखील आंतरजालावर उपलब्ध आहेत- अर्काईव्ह.ऑर्ग
     
        अराई काम्पो  -
     
    *   अजिंठा चित्रांची प्रतिकृती घडविण्याला असाच आणखी एक प्रकल्प साकार झाला होता. गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकूरांनी अराई काम्पो नावाच्या जपानी कलाकाराला निमंत्रण देऊन बोलावले होते. जपानी शैली आणि चित्रपद्धती शिकविण्यासाठी! १९१६ ते १९१८ या दोन वर्षांमध्ये त्याने जपानी कागदांवर या चित्रांच्या गिरविलेल्या प्रती करून घेतल्या. ही रेखाचित्रे तोक्यो इम्पिरिअल म्युझियममध्ये ठेवली गेली. पण १९२३ साली भूकंपामध्ये त्या नाश पावल्या! गिल आणि ग्रिफिथची चित्रे आगींमध्ये भस्मसात झाली होती. जणू ‘जे काही उपजते ते लय पावते’ हे ‘अनित्यतत्त्व’ अजिंठा प्रतिकृती चित्रांच्या भलतेच हात धुवून मागे लागले होते !!
     
        डॉ. वॉल्टर स्पिंक -
     
    *   चित्रकारांइतकाच इतिहास संशोधकांना अजिंठ्याचा चुंबक सतत खेचत राहिला आहे. त्या संशोधनाचा, त्यामधल्या वर्णनांचा आणि वादविवादांचा पसारा फार मोठा आहे. पण त्यामधला एक शोधप्रवास मोठा विलक्षणीय आहे. त्याचे कर्ते डॉ. वॉल्टर स्पिंक. अजिंठा लेण्यांपैकी ५ लेणी पूर्ण चित्रांकित लेणी आहेत. तीन अर्धवट म्हणावी अशी आहेत. १३ लेण्यांत जेमतेम सुरुवात म्हणावी एवढीच प्रगती आहे.
     
    *   अजिंठा लेणी सुमारे इसवी सन ४५० ते ६५० या काळात टप्प्याटप्प्याने घडत गेली अशी इतिहासकारांची धारणा होती. पण डॉ. वॉल्टर स्पिंक यांच्या संशोधनाने या समजुतीला आरपार छेद दिला आणि विवादांचा भोवरा उफाळला. स्पिंक यांनी अजिंठ्याचे केलेले निरीक्षण अगदी छोट्यामोठ्या तपशिलांनी बहरलेले आहे. त्यांच्या लिखाणामध्ये (आणि सोबतच्या रेखाटन व चित्रसंग्रहामध्ये), अतिसूक्ष्म अशा तपशिलांपासून नजीकच्या घटोत्कच लेण्यामधल्या शैलीचे असलेले साधर्म्य, बदामी लेणी आणि घारापुरी लेणीमधले शिल्पशास्त्रीय भेद, त्यांचा कालक्रम ठरविण्यात आलेला विपरीतपणा, म.म.वि.वा. मिराशींच्या ताम्रपट / शिलालेख वाचनातून साकारणारे कालदर्शन, दण्डीकृत दशकुमारचरितातील वर्णन अशा भल्यामोठ्या पटावरचे त्यांचे संशोधनपर लिखाण आहे आणि मुख्य म्हणजे या सगळ्या अवाढव्य व्यापाची सांगड घालणारे तर्कसूत्र आहे. त्यांनी काढलेला निष्कर्ष भलताच खळबळजनक ठरला. अगदी ढोबळ स्वरूपात सांगायचे तर त्यांचे प्रतिपादन असे आहे -
     
    *   वाकाटक साम्राज्याचा सम्राट हरिषेण याचे राज्य कलिंगापासून कोकणपर्यंत पसरले होते. पण त्याच्या १७ वर्षाच्या राजवटीअखेरीला अश्मक राज्यांच्या धुरीणांनी कट करून हरिषेणाचा मृत्यू घडवून आणला. पण या बंडाळीच्या धामधुमीमध्ये युद्धाचे सावट असूनदेखील घाईगर्दीने या लेण्यांची निर्मिती चालू राहिली. या घाईगडबडीचे पडसाद देखील या अद्वितीय कलाकृतीमध्ये आढळतात. परिणामी हरिषेणाच्या १७ वर्षांच्या राजवट काळात आणि तीदेखील अखेरीच्या धामधुमी वर्षांसकट अजिंठ्याची लेणी निर्मिली गेली. असे अप्रतिम लेणे घडविणारे कलावंत त्या काळात पुरेशा बळाने आणि संख्येने उपलब्ध होते. कार्यरत होते. भित्तिचित्रांमध्ये दिसणारे सुवर्णवैभव हे त्या काळातले आहे. आणि त्यांच्या निर्मितीचा कालावधी २०० वर्षे नसून अवघा २० वर्षांइतका आहे! हा अर्थात त्यांच्या जटिल युक्तिवादाचा ‘एकश्‍लोकी रामायण’सारखा त्रोटक सारांश आहे.
     
    *   स्पिंक यांनी जवळपास ७० वर्षीय कारकीर्द अजिंठा इतिहास आणि कला आणि संलग्न अध्ययनात व्यतीत केली होती. अजिंठ्यावरील संशोधनाचे सात खंड आहेत. वर अगदी त्रोटक सारांशाने दिलेला निष्कर्ष त्यांच्या ‘खंड दोन’मध्ये सविस्तरपणे मांडलेला आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    ११ जून २०२१ / प्रदीप आपटे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 262