अंतराळातील स्पर्धा
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 84 Views
- 0 Shares
अंतराळातील स्पर्धा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’अवकाश विज्ञान’ या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ’अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रा’ शी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, उपयोजित माहिती, मुद्दे, घटक, प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (4) : अर्थव्यवस्था, कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान विकास
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : 3.3 अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान -
• भारतीय अंतराळ अभ्यास - धोरणे व कार्यक्रम, अंतराळ मोहिमा, इस्रो, भारतीय कृत्रिम उपग्रह, प्रस्तावना, कार्यतत्त्व, उपयोजन, उदा - दूरदर्शन प्रसारण, दूरसंचारण, हवामान अंदाज, जीपीएस, आपत्ती पूर्वानुमान, शिक्षण. उपग्रह प्रक्षेपक, अवकाश कचरा.
• (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
मस्क-बेजोस स्पेस वॉर
• एलन मस्क आणि जेफ बेजोस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मस्क यांनी बेजोसना ‘कॉपीकॅट’ म्हटले होते. ‘अॅमेझॉन’ची एकाधिकारशाही मोडून काढली पाहिजे, असेही मस्क यांनी म्हटले होते. दुसरीकडे बेजोस यांनी मस्क यांच्या मंगळावरील मानवी वसाहतीच्या संकल्पनेची नेहमीच टर उडवलेली आहे.
• एके काळी अंतराळ संशोधन क्षेत्रात विविध देशांच्या सरकारी संस्थांची मक्तेदारी होती. मात्र आता या क्षेत्रातही खासगी कंपन्यांचा शिरकाव झाला आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धाही निर्माण झालेली आहे. ‘अॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेजोस यांनी 2000 मध्ये ‘ब्लू ओरिजिन’ ही अंतराळ कंपनी स्थापन केली. ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी 2002 मध्ये ‘स्पेस एक्स’ कंपनीची स्थापना केली. मंगळावर मानवी वसाहत स्थापन करणे हे त्यांचे ध्येय आहे. त्यासाठी अंतराळ प्रवासाचा खर्च कमी यावा हा हेतू त्यामागे होता. धडाडीचे ब्रिटिश उद्योजक सर रिचर्ड ब्रान्सन यांनी अंतराळ पर्यटनाच्या हेतूने 2004 मध्ये ‘व्हर्जिन गॅलेक्टिक’ ही कंपनी स्थापन केली. सध्याच्या काळात खासगी क्षेत्रातील या तीन बड्या अंतराळ कंपन्या आहेत. याशिवाय नॉर्थरॉप ग्रुमन इनोव्हेशन सिस्टीम्स आणि सिएरा नेवाडा कॉर्पोरेशनसारख्या अन्यही काही कंपन्या आहेत. मात्र सध्या जगभरात दोनच कंपन्यांची चर्चा आहे ती म्हणजे ‘स्पेस एक्स’ आणि ‘ब्लू ओरिजिन’. या दोन्ही कंपन्यांच्या मालकांमधील चुरस आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे जाहीर प्रयत्न यामुळे त्यांचे हे ‘स्पेस वॉर’ जगासमोर आले आहे.
• ‘नासा’ची डिस्कव्हरी, एंडेव्हर व अॅटलांटिससारखी अंतराळयाने 2011 मध्ये निवृत्त झाल्यानंतर या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेकडे एकही अंतराळयान उरले नाही. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे अंतराळवीर किंवा रसद पोहोचवण्यासाठी रशियाच्या ‘सोयूझ’ यानावर अवलंबून राहावे लागत होते. अशा वेळी ‘स्पेस एक्स’चे ‘ड्रॅगन’ हे यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिलेच खासगी क्षेत्रातील यान ठरले. 2012 मध्ये हे यान ‘आयएसएस’वर पोहोचले. याशिवाय ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन 9’ या रॉकेटचाही ‘नासा’कडून वेळोवेळी उपयोग सुरू झाला. पुनर्वापर करता येणारे किंवा उभ्या स्थितीत जमिनीवर उतरणारे रॉकेटही ‘स्पेस एक्स’ने विकसित केले. ‘नासा’ आणि ‘स्पेस एक्स’ची अंतराळ क्षेत्रातील अशी साथ जुनीच आहे. त्यामुळे नासा’ने ‘स्पेस एक्स’ला 2.9 अब्ज डॉलर्सचे नवे कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे त्यामध्ये फारसे नवल नव्हतेच. मात्र या स्पर्धेत बेजोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ही होती व तिला हे महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले नसल्याने बेजोस यांची निराशा होणेही साहजिकच होते. हे कॉन्ट्रॅक्ट होते 2024 मध्ये अमेरिकन अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाणारे नवे यान विकसित करण्याचे.
• ‘अपोलो’ मोहिमानंतर ‘नासा’ या मोहिमेत प्रथमच आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. ‘स्पेस एक्स’ला हे कंत्राट मिळाल्यानंतर ‘ब्लू ओरिजिन’ने गव्हर्न्मेंट अकौंटॅबिलिटी कार्यालयात ‘नासा’विरुद्ध रीतसर तक्रार केली. ‘नासा’ने शेवटच्या क्षणी लिलावाबाबतच्या अटी बदलल्या असल्याबाबतची ही तक्रार होती. त्यावर मस्क यांनी बेजोस यांची खिल्ली उडवत ‘ये आपके बस की बात नही’ अशा थाटाचा शेराही मारला! ‘ब्लू ओरिजिन’बरोबरच अन्य एक कंपनी ‘डायनेटिक्स’नेही ‘नासा’विरुद्ध तक्रार केली. त्यामुळे ‘नासा’ने आता या दोन कंपन्यांचा वाद मिटवल्यावरच ‘स्पेस एक्स’ला निधी देण्याचे ठरवले आहे. यानिमित्ताने अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या-दुसर्या स्थानावर येत असतानाची मस्क व बेजोस यांची चुरस या क्षेत्रातही कशी तगडी आहे हे दिसून आले.
• ही चुरस किंवा कुरघोडी जानेवारी 2021 मध्येही दिसून आली होती. ‘स्पेस एक्स’ने जगाला अधिक वेगवान आणि स्वस्त इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ ही योजना सुरू केलेली आहे. त्यामध्ये हजारो सॅटेलाईटसचे एक जाळे निर्माण करून जगातील अगदी दुर्गम भागातही वेगवान व स्वस्त इंटरनेट पुरवले जाणार आहे. ही सर्व सॅटेलाईटस् एकमेकांना जोडलेली असतील व ती पृथ्वीच्या खालील कक्षेत स्थापन केलेली असतील.
• मे 2018 मध्ये हा दशकभराच्या काळात सुरू राहणारा 10 अब्ज डॉलर्सचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘स्पेस एक्स’ने सुरू केला. असे अनेक सॅटेलाईटस् अंतराळात सोडलेले आहेत. ते पृथ्वीच्या आधीपेक्षाही खालील कक्षेत आणण्याची परवानगी मस्क यांनी अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडे मागितली होती. त्याला जेफ बेजोस यांनी जोरदार आक्षेप घेतला. ‘स्टारलिंक’प्रमाणेच त्यांनीही इंटरनेट सुविधेसाठी क्युपर सॅटेलाईटसची योजना आखलेली आहे. त्यामधील उपग्रहांची ‘स्टारलिंक’च्या उपग्रहांशी धडक होण्याचा किंवा अन्य समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले होते.
• 2013 मध्ये ‘स्पेस एक्स’ने नासाचे लाँचपॅड वापरण्याची परवानगी मागितली होती त्यावेळीही ‘ब्लू ओरिजिन’ने त्याला लेखी हरकत घेतली होती. 2014 मध्ये ‘ब्लू ओरिजिन’ला ‘ड्रोन शिप्स’चे पेटंट मिळाले. त्यावेळी ‘स्पेस एक्स’ने हे पेटंट अनधिकृत ठरवले होते.
सौजन्य : दैनिक पुढारी
सचिन बनछोडे /15 मे 2021
चीनच्या जुराँग रोव्हरचे मंगळावर यशस्वी लँडिंग
• 15 मे 2021 रोजी चीनच्या ‘नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन’ चा जुराँग हा सहा चाकी रोव्हर मंगळाच्या उत्तर गोलार्धातल्या युटोपिया प्लॅनेशिया पठारावर यशस्वीरीत्या उतरला. मंगळाच्या कक्षेतून पृष्ठभागापर्यंतचा 9 मिनिटांचा खडतर प्रवास जुराँगने यशस्वीरीत्या पार पाडला.
• मंगळावर यशस्वीपणे रोव्हर उतरवणारा चीन हा अमेरिकेनंतर जगातील दुसरा देश आहे. सात महिन्यांच्या अंतराळ प्रवासासह तीन महिने मंगळाच्या कक्षेतील प्रवासानंतर चीनचे जुराँग रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर स्थिरावले. संरक्षक कवच (कॅप्सूल), पॅराशूट आणि रॉकेटचा वापर करून हे लँडिंग करण्यात आले.
• तियानवेन-1 ऑर्बिटर मधून जुराँग रोव्हर 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात मंगळाच्या कक्षेत पोहोचला होता. मंगळावरच्या युटोपिया पठाराचा हाय रिझोल्युशन छायाचित्रांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात आला आणि त्यानंतर लँडिंगसाठीची सुरक्षित जागा ठरवण्यात आली.
• या रोव्हरच्या मदतीने चिनी शास्त्रज्ञ मंगळावरील भूप्रदेशाचा तसेच वातावरणाचा 90 दिवस अभ्यास करणार आहेत.