हाफकिन इन्स्टिट्यूट
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 153 Views
- 0 Shares
हाफकिन इन्स्टिट्यूट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’आरोग्य’ या विषयावर अनेक प्रश्न विचारले जातात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सार्वजनिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना, उपयोजित माहिती, मुद्दे, घटक, प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (3) : मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक : 1.4 आरोग्य -
* जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) - उद्देश, रचना, कार्य आणि कार्यक्रम. भारताचे आरोग्यविषयक धोरण, योजना आणि कार्यक्रम. भारतातील आरोग्य सेवा यंत्रणा. भारतातील आरोग्यविषयक महत्त्वाची आकडेवारी. भारतातील आरोग्यविषयक घटक आणि समस्या (कुपोषण, माता मर्त्यता दर, इ.). जननी बालसुरक्षा योजना, नॅशनल रूरल हेल्थ मिशन, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (पीएमएसएसवाय)
• (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
हाफकिन संस्था
• सप्टेंबर 1896 साली मुंबईत प्लेगची साथ आली होती. या आजारावर औषधच उपलब्ध नव्हते. अनेकांचे बळी गेले. परंतु प्लेगमुळे वैद्यकीय संशोधन क्षेत्राला चालना मिळाली. हाफकिन संस्था ज्याच्या नावे आहे, ते डॉ. वाल्देमार हाफकिन हे मूळचे रशियन ज्यू. सन 1893 मध्ये त्यांनी कोलकात्यात डॉ. लुई पाश्चर यांच्या सहकार्याने कॉलराची लस तयार केली. त्यांच्या या कामगिरीने प्रभावित झालेले मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सॅडहर्स्ट यांनी डॉ. हाफकिन यांना मुंबईला पाचारण केले. हाफकिन मुंबईत आले तेव्हाच मुंबईत भारतातील पहिली जीववैद्यकीय संशोधन आणि लस निर्मिती संस्था ‘हाफकिन’ची पायाभरणी झाली.
• 1896 रोजी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजमधील फ्रेमजी दिनशॉ पेटिट प्रयोगशाळेच्या एका खोलीत कारकून व तीन नोकर यांच्या सोबत डॉ. हाफकिन यांनी प्लेगवरील लसीच्या संशोधनाला सुरुवात केली. अवघ्या 3 महिन्यांत त्यांनी लस तयार केली. आता ज्याप्रमाणे लोक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास काहीसे घाबरतात, त्याकाळीही लोक प्लेगची लस घेण्यास घाबरत होते. लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी हाफकिन यांनी स्वतःला चारवेळा लस टोचून घेतली. भारतातील संशोधनावर आधारित तसेच भारतात निर्माण केलेली ही पहिली लस! लोकांच्या मनात लसीविषयी विश्वास वाढावा म्हणून इस्माईली इमाम आगा खान यांच्यासह अन्य मान्यवरांनी सार्वजनीकरीत्या लस टोचून घेतली. पहिल्या 3 महिन्यांतच 11 हजार लोकांना ही लस देण्यात आली. डॉ. हाफकिन यांच्या या कामगिरीमुळे इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाने हाफकिन यांच्या सन्मानार्थ ‘कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर’ हा पुरस्कार दिला आणि पुढे लसनिर्मितीला आणखी चालना मिळाली.
• जागेची गरज भासू लागल्याने सुरुवातीला मलबार हिल, त्यानंतर नेपिअन सी रोडवरील एका बंगल्यात प्रयोगशाळा स्थलांतरित झाली. त्यानंतर पुन्हा आगा खान यांनी माझगाव येथे दिलेल्या जागेत ती हलवण्यात आली.मात्र तिथेही जागा अपुरी पडू लागल्याने परळ गावातील जुन्या राजभवनाची आलिशान वास्तू डॉ. हाफकिन यांना प्लेग संशोधन प्रयोगशाळेसाठी उपलब्ध करून देण्यात आली. येथे संशोधनाचे काम जोमाने सुरू झाले.
• 1902 मध्ये लसीकरणादरम्यान पंजाबमध्ये 19 नागरिकांना धनुर्वात झाला. त्याबद्दल डॉ. हाफकिन यांच्यावर ठपका ठेवण्यात आला तेव्हा देश-विदेशातील संशोधन व वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. हाफकिन यांना पाठिंबा दिला. 1906 साली त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. संस्थेचे नामकरण ‘हाफकिन’ संस्था झाले. मात्र डॉ. हाफकिन पुन्हा संस्थेत रुजू झाले नाहीत.
• 1925 साली मुंबई जीवाणू प्रयोगशाळेचे संचालक मॅकी यांच्या प्रस्तावानुसार डॉ. हाफकिन यांच्या स्मरणार्थ प्रयोगशाळेचे नाव ‘हाफकिन’ संस्था असे ठेवण्यात आले. लसीकरणाची पद्धत शिकण्यासाठी भारतातील विविध संस्थानिकांनी त्यांच्या डॉक्टरांना मुंबईत धाडले. संस्थेने भारतासह परदेशातही लसीचा पुरवठा केला.
• ‘हाफकिन’ संस्थेत हिवताप, घटसर्प, विषमज्वर, रेबीज यावर संशोधन सुरू राहिले. दुसर्या महायुद्धाच्या वेळी सीमेवरील अनेक सैनिकांना टायफॉईड झाला होता. त्यावेळी हाफकिनची लस कामी आली होती. यथावकाश संस्थेच्या कार्यकक्षा संशोधन ते परीक्षण ते प्रशिक्षण अशा रुंदावत गेल्या.
• 1918 जूनमध्ये पहिल्या महायुद्धाच्या अंतिम टप्प्यात म्हणजे जगभर एन्फ्ल्युएन्झाची साथ आली. त्यावेळी संस्थेने लसीची निर्मिती केली.
• 1920 मध्ये सर्पदंश व विंचूदंश यावर उपाय शोधण्यासाठी संशोधन सुरू झाले.
• 1924 मध्ये देशात प्रथमच स्थानिक औषधी वनस्पतींवर संशोधन सुरू झाले.
• 1930 साली प्लेगच्या साथीची तीव्रता कमी झाल्यामुळे संस्थेचे काही विभाग बंद करण्यात आले. तरीही प्लेगच्या लसीची निर्मिती सुरूच होती.
• 1930 मध्ये डॉ. हाफकिन यांचे स्वित्झर्लंड येथे निधन झाले. पण संस्था आणि डॉ. हाफकिन यांचे नाव अजरामर झाले.
• 1938 साली संस्थेत देशातील पहिले सर्पालय सुरू झाले. सर्पदंशावरील पहिली लस संस्थेत बनली. प्लेग, कॉलरा, रेबीज, गॅस-गँगरीन, घटसर्प यावर उपचार करण्यासाठी व रोगप्रतिबंधक अशा विविध लसींची निर्मिती संस्थेमध्ये सुरू झाली. लष्करासाठी ग्लुकोज सलाईन, मॉर्फिन, पेनिसिलीन, आदींचे उत्पादन केले. सैनिकांसाठी जंतुनाशक मलमपट्टी, शस्त्रक्रियेच्यावेळी भूल देणारे औषध, डास मारण्याचा फवारा, भेसळीचे परीक्षण आदी नवीन उपक्रम सुरू झाले. अगदी अन्नधान्य, दूध - तूप आदींचे पोषणमूल्य व शुद्धता तपासण्याचे कामही संस्थेकडे आले.
• 1946 साली संस्थेत आठ विभाग होते. या सर्व विभागात अधिकारी व कर्मचारी भारतीय होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्था भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या साहाय्याने कार्यरत होती. नंतर ही संस्था राज्य सरकारच्या अखत्यारित आली. लस व औषधांची निर्मिती, परीक्षण, प्रशिक्षण आदी कामे सुरू होती. परीक्षणाच्या या कामातूनच देशातील पहिल्या अन्न व औषध प्रशासनाची स्थापना झाली. आजही उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने संस्था मद्यार्क परीक्षणाचे काम करीत आहे
• तोंडावाटे देण्यात येणार्या पोलिओ लसीच्या निर्मितीचे श्रेय हाफकीन संस्थेकडे जाते. राज्य सरकारने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात संस्थेच्या उत्पादन विभागाचे रूपांतर ‘हाफकिन’ जीव-औषध निर्माण महामंडळ या शासकीय उपक्रमात केले. संशोधन आधारित उद्योग निर्मितीचा ‘मेक इन इंडिया’चा हा पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो.
• 1998 मध्ये ‘बर्ड फ्लू’ व ‘स्वाईन फ्लू’ साथीच्या वेळी संस्थेने मोलाचे योगदान दिले.
• 2016 साली डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी संस्थेला ऊर्जितावस्था यावी यासाठी पथदर्शी प्रस्ताव सादर केला होता.
• कोरोना लसीचे हाफकिनमध्ये उत्पादन केले जाणार असले तरी मुळात कोरोना लस उत्पादन आणि हाफकिनचा थेट संबंध नाही. हाफकिनमध्ये स्वतंत्र असे बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि.ची स्थापना करण्यात आली आहे. उत्पादनाच्या माध्यमातून संशोधन अशी संकल्पना होती. त्यायोगे संशोधनाला निधी मिळत राहील, अशी अपेक्षा होती.
सौजन्य : दैनिक पुढारी
जयंत होवाळ /15 मे 2021