सुएझ कालवा
- 01 Apr 2021
- Posted By : study circle
- 1971 Views
- 2 Shares
सुएझ कालवा
23 मार्च 2021 रोजी एव्हरगिव्हन या तैवानी कंपनीचे, एकाचवेळी 20 हजार कंटेनर वाहून नेणारे 400 मीटर लांबीचे एव्हरगिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज इजिप्तमधील सुएझ कालव्यात रुतले आणि त्याच्यापाठची 400 जहाजे 29 मार्च पर्यंत खोळंबली होती. दरम्यान पश्रि्चम आशिया आणि युरोप यांच्या दरम्यानची मालवाहतूक, तेलवाहतूक ठप्प झाली. अत्यावश्यक साहित्यपुरवठा खंडित झाला होता. एक जहाज किंवा एक लढाई जगाच्या व्यापारात अडचणी निर्माण करू शकते, हे यातून दिसून आले.
सुएझ कालव्याबाबत माहिती देणारा लेख प्रकाशित करीत आहोत -
एमव्ही एव्हर गिव्हन
1) चीनहून मालवाहतूक करणारे एमव्ही एवर गिव्हन नावाचे महाकाय कंटनेर जहाज ( 400 मीटर लांब आणि 60 मीटर रुंद ) सुएझच्या कालव्यात मधोमध अडकून पडल्याने जलवाहतूक ठप्प (23 ते 29 मार्च) झाली होती.
2) एव्हर गिव्हन हे कंटेनर जहाज चीनहून नेदरलँड्समधील रॉटरडॅम बंदराच्या दिशेने जात होते. हिंदी महासागरातून युरोपमध्ये जाण्यासाठी ते सुएझ कालव्यातून मार्गक्रमण करत होते. 23 मार्च रोजी तेवफिक बंदरावर पोहोचले. हे जहाज 31 मार्च रोजी नेदरलॅण्ड्समधील रोटरडॅममध्ये पोहोचणे अपेक्षित होते.
3) एव्हर गिव्हन सुएझ कालव्यातून जात असताना अचानक आलेल्या 55 किमी. प्रतितास वेगाच्या वाळूच्या वादळाने भरकटल्यांने कालव्याच्या दोन टोकांमध्ये अडकले. जहाजावरील यंत्रे अचानक बंद पडल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजू कालव्याच्या काठांवर आदळल्या व ते ग्रेट बिटर लेक येथे निमुळत्या भागात उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर अडकले गेले. सुमारे 5 हजार लोकसंख्येच्या मँशेट रुगोला गावाजवळ ही घटना घडली. सुएझ कालव्याच्या निमुळत्या भागात आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात अडकून पडल्यामुळे मोठी सागरी वाहतूक कोंडी झाली होती.
4) या जहाजाचा आकार 4 फूटबॉल मैदाना इतका आणि उंची 10 मजली इमारतीएवढी आहे.
5) या मालवाहू जहाजाचे वजन 18,300 कंटेनरमुळे 2.25 लाख टनावर पोहोचले होते.
6) एव्हर गिव्हन हे जहाज एव्हरग्रीन मरिन कॉर्पोरेशनचे आहे. ही कंपनी तैवानची आहे. जपानच्या मालकीचे हे जहाज असले तरी त्याच्यावर पनामाचा ध्वज होता.
7) एव्हर गिव्हन हे जगातील सर्वांत मोठ्या मालवाहू जहाजांपैकी एक असून, एका वेळी 20,000 कंटेनर्स वाहून नेण्याची त्या जहाजाची क्षमता आहे.
8) या जहाजावर बहुतांश कर्मचारी हे भारतीय आहेत. तसेच शिपची कॅप्टन इजिप्तची आहे. या जहाजावर काम करणार्या 25 भारतीय कर्मचार्यांपैकी 3 मुंबईचे, काही तामिळनाडू, काही आंध्र प्रदेश तर काही उत्तर भारतातील.
• जागतिक अर्थकारणावरील परिणाम -
1) सुएझ कालव्यात एव्हरगिव्हन अडकल्याने जलवाहतूक ठप्प होऊन मोठे नुकसान झाले. कालव्याच्या दोन्हीही बाजूला चारशेवर जहाजे दोन्हीही बाजूला अडकल्याने मोठा पेच निर्माण झाला. सुएझ कालवा वाहतुकीला बंद झाल्याने जहाज व कंटेनर उद्योग, त्यांचा विमा काढणार्या कंपन्यांपासून ते शेतकरी, उद्योजक आयातदार, निर्यातदार चिंताक्रांत झाले होते. जहाज अडकल्याचा सर्वाधिक फटका युरोपला बसला.
2) अगदी शेळ्या, जनावरे यांच्यापासून ते कोरोनातून सावरू पाहणार्या देशांतील कारखानदारी, औषधउद्योगाला लागणारा कच्चा माल, खनिज तेल यापासून ते फर्निचर, खनिजे, विविध प्रकारच्या वस्तू हे सगळे होते. महाराष्ट्रातून निघालेली शेकडो कोटी रुपयांची 1800 कंटेनरमधील द्राक्षे आणि 50 कंटेनरमधील कांदादेखील या कोंडीत अडकला. विविध जहाजांवर दोन लाखांवर जनावरे अडकून पडल्याने त्यांच्या जगण्याचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता.
3) इजिप्तमधील सुएझ कालव्यात अडकलेल्या 400 मीटर लांबीच्या मालवाहू जहाजामुळे जगभरात दररोज सुमारे 73 हजार कोटी रुपयांचे नुकसान.
4) सुवेझ कालवा बंद झाल्याने खनिज तेलाच्या किमती 6 टक्क्यांनी वाढल्या होत्या.
5) पोर्ट कंजेशन (बंदरात जहाजांची गर्दी) परिस्थितीत 55 हजार टीयूई (कंटेनर क्षमता) मालाच्या हिशोबाने 2 दिवसात आशियाहून युरोपला जाणारा 110 टीयूई माल अडकून पडला होता.
• एव्हर गिव्हन जहाजाची सुटका -
1) 29 मार्च रोजी भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन काही बोटींच्या मदतीने रुतलेले एव्हर गिव्हन जहाज हलवण्यात आले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने 10 बोटी हे जहाज बाजूला काढण्यासाठी पाठवल्या होत्या.
2) हे जहाज कालव्यात आडवे अडकल्याने वे रेतीत रुतल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान कामाला लावण्यात आले होते. जहाजाच्या तोंडानजीकची रेती मोठ्या प्रमाणात खणून काढण्यात आली. यासाठी स्मिट साल्व्हेज या डच कंपनीचे तंत्रज्ञ बोलावण्यात आले. टग बोटीच्या साहाय्याने एव्हर गिव्हनला ओढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मोठी भरती आल्यानंतर हे जहाज वर उचलले गेले आणि पाण्यात ते वर येऊन तरंगायला लागले.
3) 29 मार्चच्या स्प्रिंग टाईडची मदत- पृथ्वीच्या भोवती फिरत असताना अशी स्थिती येते ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. हा चंद्र नेहमीच्या आकारापेक्षा मोठा दिसतो. चंद्राच्या या अवस्थेला सुपरमून असे म्हणतात. या दरम्यान गुरुत्वाकर्षण जास्त असते आणि त्यामुळे समुद्राला भरती येते. यावेळी पाण्याचा स्तर हा नेहमीच्या स्तरापेक्षा किमान एक ते दीड फूट वर वाढतो. अशी स्थिती महिन्यातून दोन वेळेस येते. याला स्प्रिंग टाईड असे म्हणतात. 29 मार्च 2021 रोजी पौर्णिमेला सुएझ कालव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भरतीमुळे पाण्याची पातळी वाढल्याने जहाज थोडे वर तंरगू लागले आणि अभियंत्यांना जहाज खेचण्यासाठी त्याची मोठी मदत झाली.
• सुएझ कालव्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये -
1) पनामा आणि सुएझ कालवे जगातील कृत्रिमरीत्या बांधलेले सर्वात मोठे कालवे आहेत.
2) जगाच्या नकाशाच्या मध्यठिकाणी सुएझ कालवा निर्माण करण्यात आला आहे. सुवेझ कालव्याची भौगोलिक परिस्थिती पहाता, याला चोक पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
3) इजिप्तमध्ये असलेला सुएझ कालवा हा रेड सी (लाल समुद्र) आणि मेडिटेरेनियन सी (भूमध्य समुद्र) यांना जोडणारा एक अरुंद जलमार्ग आहे.
4) हा कालवा 1859 मध्ये बांधण्यात आला आणि 1869 सालापासून याद्वारे वाहतूक सुरू आहे.
5) या कालव्यामुळे आशिया व पूर्व आफ्रिकेतील जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा न घालता अटलांटिकमध्ये प्रवेश करता येतो. युरोपातून आशियाकडे जाणार्या बोटींना आफ्रिका खंडाला जवळपास 9000 किलोमीटर लांब वळसा घालून जावं लागायचं. मात्र, हा कालवा झाल्याने हे 9000 किमी अंतर कमी झालं.
6) सुवेझ कालवा मार्गाने लंडन आणि मुंबई यांच्यातील अंतर 7,178 किलोमीटरने कमी झाले. इंधनखर्च कमी झाला आणि व्यापाराला मोठी चालना मिळाली.
7) सुएझ कालव्याचं एक टोक उत्तरेला बुर सैद शहराजवळ आहे, तर दक्षिणेकडील टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ आहे.
8) सुएझ कालवा सध्या इजिप्तद्वारे चालवला जातो. वसाहतवादी ब्रिटनच्या ताब्यातून इजिप्तने तो घेतला, त्याचे राष्ट्रीयीकरण केले.
9) 2010 साली विस्तार व अद्ययावतीकरणाचे मोठे काम पूर्ण झाल्यानंतर कालवा 193.3 किलोमीटर लांब, 24 मीटर खोल आणि 2015 मीटर रुंद झाला. कालव्यामधून जाणार्या जहाजांना कमाल 77.5 मीटर्सची रुंदी मिळू शकते.
10) सुएझ कालवा सुमारे पावणेदोनशे वर्षांच्या इतिहासात पाच वेळा वाहतुकीला बंद झाला होता.
11) 1967 मध्ये अरब-इस्राईल युद्धाला तोंड फुटले आणि इजिप्तने 7 वर्षे कालवा वाहतुकीला बंद केला. जून 1975 मध्ये तो सुरू झाला.
12) 2004 मध्ये या कालव्यात खनिज तेलाचे जहाज भरकटल्याने वाहतूक 3 दिवस ठप्प होती.
13) सुएझ कालव्यामुळे आतापर्यंत दोन युद्ध झाली. दोन्ही युद्धे दुसर्या महायुद्धाच्यानंतर लढण्यात आली.
• सुएझ कालव्यातील वाहतूक आणि व्यापार -
1) सुवेझ कालवा सागरी मालवाहतुकीचा कणा समजला आतो. जगभरातील एकूण व्यापाराचा विचार करता त्याचा दहावा हिस्सा हा सुएझ कालव्यातून होतो. तसेच या कालव्यातून जगातला सुमारे 15 टक्के जलव्यापार चालतो. जगातील खनिज तेलाचा 10 टक्के व्यापार येथून होतो.
2) दररोज या कालव्यातून 9.50 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीच्या वस्तूंची वाहतूक होत असते.
3) हा कालवा कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने व एलएनजी शिपमेंट्ससाठी मोक्याचा मार्ग आहे. मध्यपूर्वेच्या देशातून युरोपात इंधन आणलं जातं. सुवेझ कालवा आणि सुमेड पाईपलाईनच्या माध्यमातून सागरी मार्गाने होणार्या तेलाच्या व्यवहारातील 9 टक्के आणि 8 टक्के नॅचरल गॅसची ने-आण होते.
4) या कालव्यातून जगातील 30 टक्के शिपिंग कंटेनर वाहतूक करतात.
5) सुवेझ कालव्यातून दरवर्षी 19 हजार जहाजातून 120 कोटी टन मालाची ने-आण केली जाते.
6) 2010 सालापासून उपलब्ध आकडेवारीनुसार, कालव्यातून दररोज 47 जहाजे जातात.
7) सुएझ कालव्यातून, भारताच्या 200 अब्ज डॉलरच्या मालाची वार्षिक वाहतूक उत्तर व दक्षिण अमेरिका, युरोपसह जगाच्या अन्य भागासाठी होते. यात औषधे, कपडे, फर्निचर, मशिनरी, विविध प्रकारचे सुटे भाग, हातमागाची उत्पादने अशी उत्पादने असतात.
8) युरोप आणि आशियातील व्यापार जुना आहे. दोन्ही खंडातील व्यापार प्रामुख्याने समुद्राच्या मार्गाने होत आलाय. युरोपीय देशांना चीन आणि भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी आफ्रिकेला वळसा घालून यावं लागायचं, हा मार्ग खूप दूरचा आणि खर्चिक होता. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑप गूड होपला वळसा घालून येण्यास जहाजांना अनेक महिन्यांचा कालावधी लागायचा. त्यामुळे व्यापार्यांना अशा मार्गाचा शोध होता जो कमी वेळात आशियापर्यंत पोहोचवेल.
• इजिप्तचे अर्थकारण व सुएझ कालवा -
1) इजिप्तच्या जीडीपीचा 4 टक्के हिस्सा हा सुएझ कालव्यातून जाणार्या जहाजांमधून येतो.
2) 2020 या एका वर्षांत इजिप्त सरकारने या कालव्याद्वारे 5 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावले होते.
3) सुएझ कालव्यातील मालवाहतूकीतून इजिप्तला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो.
4) इजिप्तला दररोज टोल टॅक्सच्या रूपातून 67,200 कोटी रुपये मिळतात. एव्हर गिव्हन च्या वाहतूक कोंडीमुळे दरतासाला इजिप्तचे 2800 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. इजिप्त या टॅक्सच्या माध्यमातून दर तासाला 2800 कोटी रुपये कमावतो.
• जागतिकीकरणाने समुद्री मार्गावरील पुढील मोक्याच्या खाड्या, कालवे ट्राफिक जाम वाढत आहे -
1) प्रशांत आणि हिंद महासागर यांना जोडणारी मलाक्का,
2) एजियन आणि काळ्या समुद्रामधली बोसपोरस,
3) अरेबियन आखाताजवळील होर्मूझ,
4) अरेबियन द्विपकल्पाजवळील बाब-एल-मंदेब या खाड्या
5) प्रशांत आणि अॅटलांटिक महासागर यांना जोडणारा पनामा कालवा
6) भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा सुएझ कालवा
• सुएझ कालव्याचा इतिहास -
1) इजिप्तच्या राजाने आंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवासाचा विचार करून नाईल नदी आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा पश्चिम आणि पूर्व कालवा काढलेला होता. नंतर त्याची म्हणावी अशी दुरुस्ती आणि काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे कालांतराने तो कालवा निरुपयोगी ठरला.
2) 15 व्या शतकात व्हेनेशियानांनी, 17 व्या शतकात फ्रेंचांनी सुएझ परिसरात भूमध्य समुद्र आणि सुएझ आखात यांना कालवा काढून जोडता येईल, अशी कल्पना मांडली होती. मात्र, ही याचा पाठपुरावा घेतला गेला नाही, त्यामुळे ही कल्पना कल्पनाच राहिली.
3) 18 व्या शतकाच्या अखेरीस पहिला नेपोलियन (1769-1821) इजिप्तच्या मोहिमेवर असताना त्याला तांबडा समुद्र आणि भूमध्य समुद्र जोडण्याची कल्पना सुचली. पण, भुमध्य समुद्राच्या तुलनेत तांबड्या समुद्राची पाण्याची पातळी मोठी असल्यामुळे प्रत्यक्ष अशा कालव्यातून जलपाशांमुळे वाहतूक करणं अशक्य आहे, असे अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे कालव्यामध्ये लॉक चेंबर्स बनवण्याची गरज वाटू लागली. योजना बनून तयार होण्यास लागणारा कालावधी लक्षात घेता ही योजना नेपोलियनला सोडून द्यावी लागली. पण, पुढे 50 वर्षांनी हा गैरसमज दूर झाला आणि फ्रान्सने येथे कालवा बनवण्यास सुरुवात केली.
4) 1830 मध्ये इजिप्तच्या राजदरबारी एक मुत्सदी फ्रेंच अभियंत्याने म्हणजेच फर्डिनान्ड द लेसेप्स (1805-94) ही नेपोलियनची ही कल्पना शक्य आहे, असं सागून इजिप्तचे राज्यपाल सैद पाशाकडून सवलती मिळविल्या आणि फ्रान्स हा कालवा बांधण्यासाठी तयार आहे, असे इजिप्तला सांगितले.
5) 1854 मध्ये इजिप्तमध्ये फ्रान्सचे माजी राजदूत फर्डिनेंड डी लेसीप यांनी इजिप्तच्या ऑटोमन गर्व्हनर यांच्यासोबत एक करार केला होता. त्यासाठी इस्थमस ऑफ सुएझवर 100 मैल लांबीचा कालवा बांधण्याचा प्रस्ताव होता. यासाठी अभियंत्यांच्या आंतरराष्ट्रीय टीमने नियोजन केले.
6) 1858 मध्ये सुएझ कालवा कंपनी तयार करण्यात आली. कालवा बांधण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही 99 वर्षापर्यंत कालव्यातील वाहतूक संचलित करण्याचा अधिकार या कंपनीला देण्यात आला. फ्रान्स आणि इजिप्तची चांगली मैत्री होती. इजिप्तलाही याठिकाणी कालवा बनवण्याचं महत्व पटलं होतं. त्यामुळे फ्रान्ससोबत 99 वर्षांचा करार करत इजिप्तने कालव्याची निर्मिती करण्यास सुरुवात केली. ब्रिटेनने या कालव्याला जोरदार विरोध केला. त्यावेळी आफ्रिकेला वळसा घालून जाणार्या मार्गावर ब्रिटनचा ताबा होता. त्यामुळे ब्रिटनला भीती होती की यामुळे त्याचं महत्व आणि मक्तेदारी कमी झाली असती. तसेच भारतावरील त्याची पकड सैल झाली असते. त्यामुळे ब्रिटनने या कालव्याच्या विरोधात प्रचार करण्यास सुरुवात केली. तरी फ्रान्सने इजिप्तच्या मदतीने कालव्याचे काम सुरु केले.
7) 1859 एप्रिल मध्ये या कालव्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यावेळी फारशी यांत्रिकी साहित्य, उपकरणे नव्हती. त्यामुळे कामगारांनी हाताने या कालव्याचे बांधकाम केले. त्यानंतर युरोपमधून आलेल्या कामगारांकडे चांगली उपकरणे होती. कालव्याचे बांधकाम सुरू असताना कॉलराची साथ पसरली होती.
8) 1869 मध्ये या कालव्याचे बांधकाम पूर्ण झाले. बांधकाम (1859-69) सुरू करताना कालवा 25 फूट खोल आणि 72 फूट रुंद होता. या कालव्याच्या निर्मितीमुळे समुद्री प्रवासामध्ये क्रांतीकारी बदल झाला. यापूर्वी लागणारा महिन्यांचा कालावधी आठवड्यांवर आला होता. असे असले तरी सुरुवातीच्या काळात या कालव्यातून खूप कमी जहाजे जात होती. सुएझ कालव्याच्या निर्मितीसाठी 9.24 कोटी डॉलर खर्ची पडले.
9) 1872 दरम्यान इजिप्तच्या प्रशासकावर कालव्याच्या निर्मितीमुळे आर्थिक संकट कोसळलं. याचा लाभ घेत ब्रिटनने इजिप्तकडून (ऑटोमन गर्व्हनर) कालव्याचे 43 टक्के शेअर खरेदी केले, त्यामुळे कालव्यावर ब्रिटेन आणि फ्रान्सची मालकी प्रस्थापित झाली. जास्त शेअर्स असल्याने ब्रिटनने इजिप्तवरील आपलं वर्चस्व जाहीर केलं व सुएझ कालव्याची संपूर्ण मालकी ब्रिटनकडे आली.
10) 1875 मध्ये ग्रेट ब्रिटन हा सुएझ कालवा कंपनीचा सर्वात मोठा शेअरहोल्डर होता.
11) 1876 मध्ये हा कालवा आणि चांगल्याप्रकारे बांधण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर या कालव्यातून जलवाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली.
12) 1882 मध्ये ब्रिटनने इजिप्तवर ताबा मिळवला. विदेशी शक्तींचा प्रभाव वाढल्याचं लक्षात येताच इजिप्तच्या लोकांनी विद्रोह केला. पण, ब्रिटनने फ्रान्सच्या मदतीने इजिप्तचा हा विरोध मोडून काढला आणि इजिप्तच्या मोठ्या भागावर ताबा मिळवला.
13) 1936 मध्ये इजिप्त स्वतंत्र झाला. मात्र, कालव्याचा अधिकार ब्रिटनकडे कायम होता. दुसर्या महायुद्धानंतर इजिप्तने कालवा झोनमधून ब्रिटीश सैनिकांपासून स्वातंत्र्याची मागणी केली. दुसर्या महायुद्धादरम्यान जर्मनी आणि इटलीने कालव्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ब्रिटनने अमेरिकेच्या मदतीने हा प्रयत्न हाणून पाडला. याच काळात 99 वर्षांचा फ्रान्ससोबतचा करार संपल्याने इजिप्तने कालवा परत देण्याची मागणी केली. मोठ्या नाखूषीने फ्रान्स आणि ब्रिटनने कालव्यावरील ताबा सोडला. दुसर्या महायुद्धानंतर इंग्लंड इजिप्तवर दडपण आणू पाहत होतं. पण, इजिप्तने चेकोस्लोव्हाकिया आणि रशियाबरोबर मैत्री केली. त्यामुळे इंग्लंड आणि अमेरिकेने आस्वान धरणास देण्यात येणारी आर्थिक मदत बंद केली.
14) 1956 साली इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दुल नासर यांनी 99 वर्षांचा करार संपण्यापूर्वीच सुएझ कालव्याचे राष्ट्रीयकरण करून टाकले. कालव्यातून मिळणारी जकातची रक्कम आस्वान धरणासाठी वापरण्यास सुरुवात केली.
15) 1956 मध्ये फ्रान्स व इंग्लंडने आंतरराष्ट्रीय वाहतुकीची सबब देत इस्त्राईलला सोबत घेऊन इजिप्तवर आक्रमण केलं. इस्त्राईल कालव्यातून वाहतूक करण्यास बंदी घातल्याच्या रागातून इस्त्राईलने इजिप्तच्या सिनाई प्रदेशावर हल्ला चढवला. दोन्ही देशात घमासान युद्ध झालं. इस्रायलने हल्ला केला आणि ब्रिटीश आणि फ्रेंच सैनिकांनी कालवा परिसराचा ताबा घेतला. शेवटी संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि रशिया यांच्यामुळे युद्ध मागं घेणं तिघांना भाग पडलं. सर्व देशांना इजिप्तने कालव्याचे केलेले राष्ट्रीयकरण मान्य करावे लागलं.
16) अरब-इस्रायल युद्ध
17) 1967 मे मध्ये राष्ट्रपती गमाल अब्दुल नासिर यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तने इस्रायलच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढवायला सुरूवात केली. इस्रायलसोबत कोणत्याही तर्हेचा संघर्ष उद्भवलाच, तर या शेजारी देशाला पूर्णपणे उद्धवस्त करण्याचा त्यांचा हेतू होता.
18) 5 जून 1967 ला सीरियानेही इस्रायलला नेस्तनाबूत करण्याच्या धमक्या द्यायला सुरूवात केली. अनेक आठवडे तणाव कायम राहिल्यानंतर निर्वाणीची लढाई सुरु झाली. इस्राईलने इजिप्तवर बॉम्ब हल्ला केला आणि त्यांच्या हवाई दलाचं 90 टक्के नुकसान केलं. सीरियाच्या हवाई दलाचीही अवस्था इस्रायलनं अशीच केली होती.
19) इजिप्त, सीरिया आणि जॉर्डनचं इस्रायलसोबत युद्ध सुरू झालं होतं आणि दोन्ही बाजूंच्या गोळीबारामध्ये सुएझ कालव्यात 15 व्यापारी जहाजं अडकली होती. इतिहासामध्ये हे युद्ध सहा दिवसांचं युद्ध म्हणूनच ओळखलं जातं. कारण 6 दिवस हे युद्ध चाललं होतं. सुएझ कालवा बंद करण्यात आला होता. कालव्यात अडकलेल्या 15 जहाजांपैकी एक बुडालं आणि उरलेली 14 जहाजं पुढची 8 वर्षं तिथेच कैद होऊन अडकली होती. सुएझ कालव्यात त्यावेळी अडकलेल्या जहाजांना कोणाचाही निशाणा बनायचं नव्हतं. त्यामुळे त्यांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घ्यावा लागला.
20) इस्त्रायलने सिनाई प्रांतावर हल्ला केला. त्यांनी सुएझ कालवा ब्लॉक केला आणि ठिकठिकाणी सुरुंग बॉम्ब पेरले. त्यामुळे पुढील पाच वर्षे हा मार्ग पूर्णपणे बंद होता. इजिप्त आणि इस्रायलच्या सैन्यांमध्ये फ्रंटलाइन म्हणून हा कालवा होता. या अरब आणि इस्त्राईल युद्धात सुएझ कालव्याचं प्रचंड नुकसान झालं.
21) 10 जून 1967 ला तिन्ही अरब देशांच्या पराभवानंतर हे युद्ध संपलं. इजिप्तनं सुएझ कालव्याचा रस्ता बंद ठेवला आणि तिथे अडकलेली 14 जहाजं बाहेर पडू शकली नाहीत. इजिप्तने तिथे स्फोटकं लावली व तो मार्ग बंद झाल्याने इस्रायल येण्या-जाण्यासाठी सुएझ कालव्याचा वापर करू शकला नाही.
22) सुएझ कालव्याचा रस्ता बंद करून इजिप्त पाश्चिमात्य देशांना एक संदेश देऊ पाहत होता. पाश्चात्य देश इस्रायलचं समर्थन करतात, असा इजिप्तचा समज होता. तेलाचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात अडथळा निर्माण करून अमेरिका आणि युरोपला मध्य पूर्वेबद्दलची भूमिका बदलण्यास भाग पाडू असं इजिप्तला वाटत होतं. मात्र इजिप्तचा हा समज प्रत्यक्षात आला नाही. सुएझ कालव्याची नाकाबंदी चांगलीच ताणली गेली. आपण कमकुवत नाहीये, हेच दाखविण्याचा दोन्ही बाजूंचा प्रयत्न होता.
23) 1973 साली योम किप्पुरची लढाई झाली. इजिप्त आणि सीरियानं इस्रायलवर हल्ला केला. हा हल्ला ज्यू कॅलेंडरमध्ये सर्वांत पवित्र मानल्या गेलेल्या दिवशी केला गेला. योम किप्पुरच्या लढाईनं सर्वच पक्षांना चर्चेसाठी एकत्र यावं लागलं. संयुक्त राष्ट्राच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही देशांनी जैसे-थे स्थितीवर येण्याचं मान्य केलं. युद्ध संपलं पण कालवा पुन्हा सुरु होण्यास 2 वर्षे लागली. कारण तेथील सुरुंग बाँब्सना निष्क्रिय करण्यास खूप वेळ लागला. इजिप्त आणि इस्त्राईल यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने वाटाघाटी करण्यास सुरूवात झाली. त्यातून पुन्हा कालव्याचं पुन: बांधकाम करण्यास सुरूवात झाली.
24) सुएझची कोंडी योम किप्पुरच्या युद्धाने फुटली. सुएझ कालव्याचा मार्ग खुला केला जावा, यावर तडजोड झाली. सुएझ कालवा बंद ठेवून कोणाचंच काही भलं होणार नाही, हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. नासर यांचे उत्तराधिकारी अन्वर अल् सादात यांच्या नेतृत्वाखाली इजिप्तनं आपला जुना निर्णय बदलला. बुडवलेली जहाजं तसंच स्फोटकं हटविण्यामध्ये वर्षभराचा वेळ गेला
25) 5 जून 1975 ला इजिप्तचे राष्ट्रपती अनवर अल-सादत यांनी शांततेचे प्रतिक म्हणून सुएझ कालवा पुन्हा एकदा वाहतुकीसाठी सुरू केला. ज्या दिवशी अरब-इस्रायल युद्ध सुरू झालं होतं, तोच हा दिवस होता. पुढे इजिप्तनं कालव्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलं.
26) 25 एप्रिल 1979 मध्ये अमेरिकेच्या मदतीने इजिप्त आणि इस्त्राईलमध्ये शांततेचा तह (कँप डेव्हिड) झाला आणि कालव्याची सुरुवात इस्त्राईलची जहाजे सोडण्यातून झाली.