सरस्वती सन्मान पुरस्कार 2020

  • सरस्वती सन्मान पुरस्कार 2020

    सरस्वती सन्मान पुरस्कार 2020

    • 10 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 224 Views
    • 0 Shares

     सरस्वती सन्मान पुरस्कार 2020

              30 मार्च 2021 - मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला 2020 चा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला. शरणकुमार लिंबाळे हे महत्त्वाचे कवी, आत्मकथनकार, कथाकार, कादंबरीकार, समीक्षक व विचारवंत आहेत. जातीव्यवस्था आणि सामाजिक उतरंड यावर लिंबाळे यांनी सुरुवातीपासून आपल्या लेखणीने प्रहार केला आहे. त्यांच्या नावावर 40 पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. त्यांचे साहित्य भारतातील भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.  भारतीय परिप्रेक्ष्यातील दलित लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या समग्र साहित्यात आंबेडकरी विचारधारा आविष्कृत होते. दलितांचे दाहक जीवन, त्यांच्या जगण्यातील भीषण वास्तवता, संघर्ष यामधून साकारू पाहणारे भविष्य, परिवर्तनवादी चळवळींना येत असलेले अपयश, समकालात समाजामध्ये बोकाळत चाललेल्या सामाजिक व राजकीय प्रश्र्नांवरील परखड भाष्ये त्यांच्या साहित्यातून प्रतित होतात.
     
    सरस्वती सन्मान ठळक  नोंदी -
     
    1) सरस्वती सन्मान पुरस्काराचे स्वरूप 15 लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह आहे. 
     
    2) दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. 
     
    3) भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात नमूद 22 भाषातील साहित्यकृतींचा पुरस्कारासाठी विचार केला जातो.  दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. 
     
    4) सरस्वती सन्मानासाठी, पुरस्कार वर्षाच्या 10 वर्षे आधीपर्यंतच्या काळात प्रकाशित पुस्तकांचा विचार केला जातो.
     
    5) पुरस्काराची सुरुवात : 1991
     
    6) पहिला पुरस्कार विजेते  : हरिवंशराय बच्चन (हिंदी भाषेतील 4 खंडातील आत्मचरित्र)
     
    7) मराठी भाषेत याआधी विजय तेंडुलकर व महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. 

    घटनाक्रम -
     
    1) 1 जून 1956 मध्ये शरणकुमार लिंबाळे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात असलेल्या हन्नूर या गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावी, तर माध्यमिक शिक्षण चुंगी, चपळगाव या ठिकाणी झाले. 
     
    2) बी.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एम.ए.चे शिक्षण घ्यायचे होते. परंतु, दरम्यानच्या काळात त्यांना अहमदपूर (जि. लातूर) येथे टेलिफोन खात्यात नोकरी मिळाली.
     
    3) आकाशवाणी सोलापूर केंद्रात नोकरी करत असताना दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य बनसोडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 
     
    4) डॉ. ल. रा. नसिराबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठातून त्यांनी ‘दलित साहित्याच्या समीक्षेचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन पूर्ण करून पीएच.डी. प्राप्त केली. 
     
    5) 1986 ते 1992 या दरम्यान ते सोलापूर आकाशवाणी केंद्रावर ते उद्घोषक होते. 
     
    6) पुढे ते यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे प्राध्यापक व विविध केंद्रांचे संचालक म्हणून कार्यरत राहिले. ते 2016 मध्ये सेवानिवृत्त झाले.
     
    7) त्यांचे अक्करमाशी हे आत्मचरित्र प्रचंड गाजले.
     
    8) 2018 मध्ये ‘सनातन’ ही कादंबरी दिलीपराज प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रसिद्ध झाली. ही कांदबरी मुघल व ब्रिटीश कालखंडातील इतिहासावर प्रकाश टाकते. या कादंबरीतून लिंबाळे यांनी पारंपरिक संस्कृती व आधुनिक संस्कृती यांच्यातील संघर्ष चितारलेला आहे. ”गो हत्या केली म्हणून ज्यांची हत्या केली त्यांना... ” या कादंबरीच्या अर्पणपत्रिकेतील वाक्यातून समकालातील सांस्कृतिक दहशतवाद अभिव्यक्त होतो.  रायनाक महार, सिदनाक महार, गोविंद महार यांची यशोगाथा सर्वश्रुत आहे. कोरेगाव-भीमाच्या लढ्यात याची ऐतिहासिक प्रचिती आलेली आहे. हाच मूळ गाभा केंद्रस्थानी ठेवून लिंबाळे यांनी ‘सनातन’ ही कादंबरी लिहिलेली आहे. कोरगाव-भीमाच्या लढाईच्या शतकमहोत्सवी टप्प्यावर या कादंबरीचे लेखन केल्याचे लिंबाळेंनी मनोगतात मांडलेले आहे. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली या देशातील मूळनिवासी असलेल्या दलित, आदिवासींचे ऐतिहासिक कार्यकर्तृत्व नाकारले जाते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात दलित व आदिवासींच्या योगदानाचा फारसा उल्लेख आढळत नाही, ही उणीव दूर करण्याचा या कांदबरीतून लिंबाळे यांनी प्रयत्न केला आहे. 

    महत्त्वाचे मुद्दे -
    1) 2004 मध्ये इचलकरंजी येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
     
    2) 2010 मध्ये बार्शी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. 
     
    3) 2011 साली नांदेडमध्ये  झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे होते.
     
    4) 2018 मध्ये नांदेड येथे झालेल्या 12 व्या अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 
     
    5) 2019 साली भोसरी (पुणे) येथे भरलेल्या 20 व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना ’प्रा. रा.ग. जाधव साहित्यसाधना पुरस्कार’ दिला गेला.

    डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची ग्रंथसंपदा -
     
    1) त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात दलित साहित्याचे मुखपत्र ‘अस्मितादर्श’ या त्रैमासिकातून केली. 
     
    2) कथासंग्रह - ‘हरिजन’, ‘रथयात्रा’, ‘उद्रेक’ 
     
    3) कादंबर्‍या  - ‘उचल्या’, ‘भिन्नलिंगी’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘दंगल’, ‘रामराज्य’, ‘ओ’ आणि ‘सनातन’ 
     
    4) आत्मकथने - ‘अक्करमाशी’, ‘बारामाशी’ आणि ‘राणीमाशी’ 
     
    5) समीक्षा ग्रंथ - ‘ब्राह्मण्य’, ‘दलित’, आत्मकथा - एक आकलन’, ‘वादंग’ आणि ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ 
     
    6) संपादने - ‘शतकातील दलित विचार’, ‘दलित प्रेमकविता’, ‘प्रज्ञासूर्य’, ‘गावकुसाबाहेरील कथा’, ‘रिपब्लिकन पक्ष : वास्तव आणि वाटचाल’, ‘भारतीय दलित साहित्य’, ‘विवाहबाह्य संबंध : नवीन द़ृष्टिकोन’, ‘साठोत्तरी मराठी वाङ्मयीन प्रवाह’, ‘सांस्कृतिक संघर्ष’ 
     
    7) कवितासंग्रह - ‘उत्पात’, ‘श्र्वेतपत्रिका’, ‘धुडकूस’ 
     
    8) अनुवाद - त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथनाचा अनुवाद अनेक भाषेत झालेला आहे. ऑक्सफर्ड पब्लिकेशन यांनी याचा इंग्रजी अनुवाद ‘द आऊट कास्ट’ या नावाने केला आहे. 

    शरणकुमार लिंबाळे यांनी लिहिलेली महत्त्वाची  पुस्तके -
     
    1) अक्करमाशी, 
    2) उद्रेक, 
    3) पुन्हा अक्करमाशी, 
    4) ओ, 
    5) गावकुसाबाहेरील कथा, 
    6) झुंड, 
    7) दंगल, 
    8) दलित आत्मकथा - एक आकलन, 
    9) दलित पँथर, 
    10) दलित प्रेमकविता, 
    11) दलित ब्राह्मण, 
    12) दलित साहित्य आणि सौंदर्य, 
    13) दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र,
    14) प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र), 
    15) बहुजन, 
    16) ब्राह्मण्य, 
    17) भारतीय दलित साहित्य, 
    18) भिन्नलिंगी, 
    19) राणीमाशी, 
    20) रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल, 
    21) वादंग, 
    22) विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन, 
    23) शतकातील दलित विचार,
    24) साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह, 
    25) सांस्कृतिक संघर्ष, 
    26) साहित्याचे निकष बदलावे लागतील, 
    27) हिंदू, 
    28) ज्ञानगंगा घरोघरी

Share this story

Total Shares : 0 Total Views : 224