छत्रपती संभाजी महाराज
- 16 May 2021
- Posted By : study circle
- 5770 Views
- 11 Shares
छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठयांच्या गादीवर आलेले दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज (14 मे 1657-11 मार्च 1689) होय.
♦ 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे शिवाजीराजे व महाराणी सईबाई यांच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्मास आला. सखूबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या तीन मुलींच्या पाठीवर जन्मास आलेल्या या पुत्राचे नाव राजमाता जिजाऊंनी संभाजी ठेवले.
♦ 1659 साली संभाजी राजे 2 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी त्यांच्यावर खूप माया केली होती.
♦ संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. शंभूराजे जसे तलवारबाजीत निपूण होते, युद्धकलेत निष्णात होते, राजकारणात मुत्सद्दी होते, तसेच ते बौद्धिक क्षेत्रात महाविद्वान होते.
♦ केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसात केले. केशवभटांनी त्यांना दंडनीती व प्रयोगरूप रामायण ऐकविले. शिवाय राजपुत्रास आवश्यक असे घोडयावर बसणे, शस्त्रविदया, तालीम, तिरंदाजी वगैरेंचे शिक्षण दिले.
♦ 1664 च्या पुरंदर तहात शिवरायांनी संभाजीराजांच्या नावाने मोगलांची मनसब स्वीकारली. पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी शंभूराजे मोगलांच्या गोटात ओलीस गेले. त्याप्रसंगी संभाजीराजांचे धैर्य, निर्भीडपणा, बाणेदारणा, स्वाभिमान, हजर जबाबीपणा, चातुर्य, सौजन्यशीलता, समयसूचकता याचे वर्णन समकालीन निकोलाओ मनुचीनी केलेेले आहे.
♦ 1665 - संभाजीराजांचा विवाह पिलाजीराजे शिर्के यांची कन्या राजसबाईबरोबर झाला. तिचे नाव येसूबाई ठेवण्यात आले. येसूबाईपासून कन्या भवानीबाई (1678) आणि पुत्र शिवाजी (1682- छत्रपती शाहू) ही दोन अपत्ये संभाजीराजांना झाली. चंपा ही त्यांची दुसरी राजपूत पत्नी. तिला माधोसिंग व उधोसिंग हे दोन मुलगे झाले. दुर्गाबाई ही आणखी एक पत्नी असल्याचा उल्लेख उत्तरकालीन कागदपत्रांत येतो.
♦ 1666 साली पंचहजारी मनसबदार असणारे संभाजीराजे छत्रपती शिवरायांसोबत आग्य्रास गेले. आग्र्यातील शिवरायांचा पाच महिन्यांचा सहवास शंभूराजांना संयम, धाडस, चातुर्य व बुद्धिमत्ता देणारा ठरला.
♦ 12 सप्टेंबर 1666 रोजी औरंगजेबाच्या हातावर तुरी देत शिवाजीराजे राजगडावर, तर सुरक्षेच्या कारणास्तव शंभूराजे मथुरेत राहिले.
♦ 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजी राजे सुखरूपपणे पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजी राजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते.
♦ 5 नोव्हेंबर 1667 - उत्तरार्धात संभाजीराजे मोगलांची मनसबदारी स्वीकारण्यासाठी औरंगाबादला गेले व परतले.
♦ 1667 साली शिवरायांनी शंभूराजांना गुजरात मोहिमेवर पाठविले होते. त्याप्रसंगी संभाजीराजे आपल्या सैनिकांशी कसे वागले, याचे वर्णन फ्रेंच लेखक अॅबे कॅरे यांने केलेले आहे. संभाजीराजे आपल्या ज्येष्ठ सरदारांशी अत्यंत आदराने वागतात. सहकारी सैनिकांना अत्यंत प्रेमाने वागवितात. जखमी सैनिकांची स्वत: विचारपूस करून त्यांना आस्थेने मदत करतात. संभाजीराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांच्या विनयशील आणि प्रेमळ स्वभावाचेही अॅबे कॅरे वर्णन करतो.
♦ 26 जानेवारी 1671 पासून संभाजीराजे स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले. परंतु वेळोवेळी त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान झाले. त्यांना 1671-74 दरम्यान राज्यकारभाराचा अनुभव यावा, म्हणून महाराजांनी महादजी यमाजी हा वाकेनिवीस दिला. 1672 पासून त्यांनी प्रत्यक्ष लढाईत भाग घेतल्याचा उल्लेख आढळतो.
♦ 1671 साली संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी आपल्या वडिलांच्या गुणवत्तेचे प्रतिभाशाली भाषेत वर्णन केलेले आहे. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. संभाजीराजांना आपल्या पराक्रमाचा, विद्वत्तेचा अहंकार नव्हता, बडेजाव नव्हता.
♦ प्राच्यविद्या पंडित शरद पाटील यांच्या मते, संभाजीराजांनी केवळ संस्कृतच नव्हे तर हिंदी, पर्शियन, इंग्रजी भाषेवरदेखील प्रभुत्व संपादन केलेले होते. त्यांनी ‘नखशिख’, ‘नायिकाभदे’ आणि ‘सातसतक’ हे तीन हिंदी ग्रंथ लिहिले होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या शिष्टमंडळाबरोबरच ते रायगडावर इंग्रजीमध्ये बोललेले आहेत. यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे महाबुद्धिमान, विवेकी राजकारणी होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संभाजीराजांनी राज्यकारभार केला.
♦ 1672 मध्ये पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्यासोबत संभाजी यांनी कोलवान येथे विजय अभियानात पहिल्यांदाच मराठा सेनेचे नेतृत्व केले होते.
♦ दक्षिण दिग्विजयाप्रसंगी शिवरायांनी कोकणची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती. प्राच्यविद्या पंडित शरद पाटील म्हणतात, की संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले नसते, तर मंत्र्यांनी तेव्हाच त्यांचा घात केला असता. संभाजीराजांना पकडून आग्य्राला पाठवा, असे दिलेरखानाला औरंगजेबाचे फर्मान असतानादेखील दिलेरखानाने संभाजीराजांना निसटून जाण्यास वाट दिली, असे समकालीन कृष्णाजी अनंत सभासद सांगतो. निसटल्यानंतर शिवाजीराजे-शंभूराजांची भेट पन्हाळगडावर झाली. त्याप्रसंगी संभाजीराजे शिवरायांना म्हणतात, दूधभात खाऊन तुमच्या पायाची सेवा करेन, पण राज्याची वाटणी नको, यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे सत्ताभिलाषी किंवा स्वराज्यद्रोही नव्हते.
♦ 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.
♦ नोव्हेंबर 1676 - छ. शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या स्वारीवर जाताना संभाजीराजांना शृंगारपूरला राहण्याची अनुज्ञा दिली. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.
♦ 23 मार्च 1678 - शृंगारपूरला त्यांनी कलीची उपासना केली आणि नंतर कलशाभिषेक करून घेतला. शृंगारपूरला संभाजी असताना त्यांचे मंत्र्यांशी खटके उडत होते.
♦ नोव्हेंबर 1678 - छ. शिवाजी महाराज कर्नाटकच्या स्वारीवरून (एप्रिल-मे 1678) परतल्यावर त्यांनी संभाजी राजांना सज्जनगडावर जाण्याचा आदेश दिला.
♦ 13 डिसेंबर 1678 - संभाजीराजे सज्जनगडावरून माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि स्वराज्यातून शत्रूपक्ष दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले.
♦ 3 मार्च 1679 - मराठ्यांनी चढाईचे धोरण स्वीकारून कोप्पळचा किल्ला जिंकून घेतला. मसूदखान आणि दिलेरखान एक झाले, पण शिवाजी महाराजांची आक्रमणे त्यांना थांबविता येईनात. तेव्हा दिलेरखानाने संभाजींना पुढील महत्त्वाच्या मोहिमांत आपल्याबरोबर घेऊन प्रथम स्वराज्यातील भूपाळगडचा किल्ला जिंकून घेतला.
♦ 17 एप्रिल 1679 - दिलेरखानाने भूपाळगड जिंकला, 700 माणसे कैद केली. त्यांतील प्रत्येकाचा एक एक हात कापून त्यांना सोडून दिले. त्यानंतर संभाजी व दिलेरखान काही ठाणी घेऊन, मंगळवेढे जिंकून विजापूरच्या बाजूस गेले. त्यांनी जालगिरी, तिकोटा, होनवड या मार्गाने अथणी गाठली.
♦ 21 डिसेंबर 1679 - दिलेरखान व संभाजी यांत मतभेद - दिलेरखानाचा विजापूरचा वेढा अयशस्वी झाला; तेव्हा शहाजादा मुअज्जमने दिलेरखानावर ठपका ठेवला आणि औरंगजेबाकडे तक्रार केली. दिलेरखानाने विजापूरहून माघार घेऊन भोवतालच्या प्रदेशातील प्रजेवर अनन्वित अत्याचार करण्यास प्रारंभ केला. दिलेरखानाच्या मनातील कपटकारस्थान करण्याचे बेत जाणून संभाजीराजे दिलेरखानाच्या अथणी येथील छावणीतून निसटले आणि विजापूरमार्गे पन्हाळ्यास आले
♦ 13 जानेवारी 1680 - पन्हाळगडावर पिता-पुत्रांची गाठ पडली. शिवाजी महराजांनी संभाजींना एकूण सर्व राज्यातील गड, कोट, किल्ले, उत्पन्न - खर्च इत्यादींचा तपशील समजावून दिला आणि त्यांस राज्यकारभारात अधिक भाग घेता यावा, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
♦ 4 फेब्रुवारी 1680 - सज्जनगडावरून शिवाजी महाराज रायगडास परतले.
♦ 7 मार्च 1680 - रायगडावर राजारामांचे मौंजीबंधन झाले.
♦ 15 मार्च 1680 - राजारामांचा विवाह झाला. समारंभानंतर काही दिवसांनी शिवाजी महाराज आजारी पडले
♦ 3 एप्रिल 1680 - छ. शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी संभाजी राजे पन्हाळ्यावर होते.
♦ 21 एप्रिल 1680 - शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोयराबाई आणि कारभारी मंडळातील काहींनी पुढाकार घेऊन राजारामांचे मंचकारोहण केले आणि छ. संभाजी महाराजांस पकडण्यासाठी हंबीरराव मोहिते व प्रल्हाद निराजी यांस पाठविले पण तेच संभाजीराजांना पन्हाळ्यावर जाऊन मिळाले. छ. संभाजी महाराजांनी आपल्या विरोधातील हिरोजी फर्जंद, जनार्दनपंत हणमंते, मोरोपंत पिंगळे इत्यादींना कैदेत टाकले, तसेच अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी यांना अटक केली.
♦ 18 जून 1680 - संभाजी राजे रायगडास पोहोचले आणि जुलैमध्ये त्यांनी स्वतःस मंचकारोहण.
♦ त्यावेळी मोरोपंत आदींना सोडले पण थोड्याच दिवसांत मोरोपंत मरण पावले, तेव्हा त्यांचा मुलगा निळोपंत यास मुख्य प्रधानपदी नेमले. नंतर काही दिवसांनी रायगडावर संभाजीराजांविरूद्ध आणखी एक कट उघडकीस आल्याने त्यांनी अण्णाजी दत्तो व बाळाजी आवजी, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जंद यांना परळीखाली कैद करून ठार मारले. कर्नाटकात शामजी नाईक पुंडे यास अटक केली.
♦ 1680 नोव्हेंबर - सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजीराजांनी आवजी पंडित या धूर्त वकिलास इंग्रजांशी बोलणी करण्याकरिता मुंबईला पाठविले. त्याने पूर्वीचा तह पाळावा, नाही तर राजे इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारतील, असे सांगितले. त्यावेळी सिद्दीने आपले आरमार बंदराबाहेर नांगरले परंतु नंतर सिद्दीने मराठयांना न जुमानता चाचेगिरी व लूटमार आणि इंग्रजांच्या साहाय्याने मराठयांच्या मुलखाची नासधूस करण्यास सुरूवात केली, तेव्हा संभाजीराजांनी सिद्दीच्याच उंदेरीवर हल्ले चढविले (जुलै 1681). इंग्रजांच्या संमतीने हे सारे चालले आहे, असे समजून त्यांची जहाजे ताब्यात घेऊन त्यांना दम भरला.
♦ 16 जानेवारी 1681 - रायगड येथे विधिवत राज्याभिषेक करून घेतला. रायगडावर स्थिरस्थावर झाल्यानंतर संभाजीराजांचा बहुतेक काळ शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्यात गेला. त्यांची एकूण कारकीर्द नऊ वर्षांची त्या सबंध काळात सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज, वाडीकर सावंत, दळवी यांच्याशी त्यांना मुकाबला करावा लागला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांनी नाउमेद न होता स्वराज्याचे रक्षण करण्याचे महान कार्य केले.
♦ मराठा साम्राज्याच्या 15 पट असणार्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. औरंगजेब सुमारे पाच-सात लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. पोर्तुगीज, आदिलशहा, सिद्दी आणि स्वराज्यातील मंत्री अशा अनेक शत्रूंविरुद्ध संभाजीराजांना लढावे लागले. याप्रसंगी संभाजीराजे फक्त 23 वर्षांचे होते. पण न डगमगता त्यांनी सुमारे 9 वर्षे मोगलांना सळो की पळो करून सोडले. मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान लिहितो, संभाजी हा मोगलांसाठी वडिलांपेक्षा (शिवरायांपेक्षा) दहा पटीने तापदायक होता.
♦ 13 नोव्हेंबर 1681 - औरंगजेबाचा मुलगा अकबर पित्याविरूद्ध बंड करून दुर्गादास राठोडच्या मदतीने संभाजीराजांच्या आश्रयास आला. त्याने राजांबरोबर काही मोहिमांत भाग घेतला पण औरंगजेबाच्या दक्षिणेतील तीव्र प्रतिकारामुळे तो फेबुवारी 1687 मध्ये इराणकडे रवाना झाला. राजांचे अकबराशी संबंध अखेरपर्यंत औपचारिकच होते. त्याचा फारसा उपयोग झाला नाही. शिवरायांनी दक्षिण भारत जिंकला, त्याप्रमाणे उत्तर भारत जिंकण्याचे नियोजन संभाजीराजांनी केले होते.
♦ 1681 ते 1689 या अल्प कारकीर्दीत शिवकाळातील सर्व गड किल्ल्यांचे रक्षण करीत, फोंड्याजवळ मर्दनगड नावाचा किल्ला उभारत साष्टी, पारसिक या ठिकाणी नवीन किल्ल्यांच्या बांधकामाचा प्रयत्न केला. रायगडापासून दूर असणार्या तामीळ राज्यातल्या कावेरी नदीपात्रात त्वेषाने घोडा फिरवणारे, कर्नाटकचे राज्य दुप्पट करणारे, पोर्तुगीज व्हॉइसरॉयला पळवून लावणारे, मोगल, आदिलशहा, इंग्रज यांना न घाबरणारे संभाजीराजे एकुलते एक होते.
♦ एकीकडे शंभूराजे मुघलांशी अनेक आघाड्यांवर लढत होते. तर दुसरीकडे व्यापाराला प्रोत्साहन देत होते. इंग्रज, डच, फ्रेंच यांना व्यापार वाढीसाठी सवलती देत, गुलामांची खरेदी-विक्रीची पद्धत लिलावात काढली.
♦ छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरु झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून वाक्य कोरले आहे.
♦ जंजिरा, चौल, तारापूर, फोंडा, सांतु इस्तेव्हंव, खेळणा, बाणावर व श्रीरंगपटण या आघाड्यांवर आणि 1688 च्या शिर्क्यांबरोबर झालेल्या युद्धात ते जातीने हजर होते.
संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ -
♦ छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. ते कुशल संघटक होते. छ. शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांनी अष्टप्रधानांव्दारे राज्यव्यवस्था चालू ठेवल्याचे दिसते मात्र कवी कलशाची त्यांनी छंदोगामात्य या नवीन पदावर नियुक्ती केली. वतनाचे निवाडे, किल्ल्यांची निगराणी तसेच जमिनीचे महसूल पूर्वापार पद्धतीने चालत होते, तेच त्यांनी पुढे चालू ठेवले. आयात-निर्यात कर तसेच खंडणी व चौथाईची वसुली व्यवस्थितपणे झालेली दिसते. संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती -
1) सरसेनापती - हंबीरराव मोहिते
2) पेशवे - निळो मोरेश्र्वर पिंगळे
3) मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
4) दानाध्यक्ष - मोरेश्र्वर पंडितराव
5) चिटणीस - बाळाजी आवजी
6) सुरनीस (सचिव) - आबाजी सोनदेव
7) डबीर (सुमंत)- जनार्दन पंत
8) वाकेनवीस - दत्ताजी पंत
♦ छांदोगामात्य - कवी कलश
♦ मुजुमदार (अमात्य) - अण्णाजी दत्तो
- संभाजी महाराजांची मुद्रा - ’श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते । यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ॥’
- संभाजी राजे आपल्या कार्यकाळात एकूण 120 युद्धे लढले. या 120 पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते.
- संभाजीराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. गोवा जिंकण्यासाठी मांडवी नदी पार करून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोर्तुगीज घाबरून सेंट झेविअरच्या शवापाशी जाऊन धावा करू लागले. बर्हाणपुरावर हमला करून औरंगजेबावर वचक निर्माण केला.
- रात्रंदिन युद्धमोहिमेवर असणार्या संभाजीराजांनी राजधानीची जबाबदारी महाराणी येसूबाईंकडे दिली होती. त्यांच्या नावाचा शिक्का ‘श्री सखी राज्ञी’ देऊन त्यांना कुलमुखत्यावर केले आणि स्वराज्याचे सर्वाधिकार त्यांना दिले.
- त्यांनी आपल्या सर्व सावत्रमातांना अत्यंत सन्मानाने वागविले. धाकटे सावत्रबंधू राजाराम महाराजांना प्रेमाने वागवले. त्यांचे तीन विवाह संभाजीराजांनी लावून दिले. राजारामाची महाराणी ताराबाईंना युद्धकला-राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. स्वराज्यातील, परराज्यातील महिलांचा आदर सन्मान केला.
- संभाजीराजे म्हणतात, जो प्रयत्नवादी असतो, तो पुरुषसिंह असतो आणि ज्यांचा देवावर विश्वास असतो, त्याला दुबळा म्हणतात. यावरून स्पष्ट होते, की संभाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता. ते विज्ञानवादी होते.
- संभाजीराजांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतसारा माफ केला. त्यांना संकटसमयी आधार दिला. गरिबांना न्याय दिला. सरंजामशाहीला पायबंद घातला.
♦ 1687-88 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी पुनर्वसनासाठी कौलनामे दिले. व्यापार्यांना सवलती देऊन महसुलात वाढ करण्याचा प्रयत्न केला. सैनिकी व्यवस्थेत घोडदल, पायदळ, तोफखाना तसेच समुद्रावरील शत्रूशी लढण्यासाठी कार्यक्षम नौदल निर्माण केले. छ. संभाजी महाराजांकडे धैर्य, शौर्य आणि धडाडी हे सेनापतीला आवश्यक सर्व गुण होते. काही लढायांतील त्यांचे नेतृत्व विलक्षण चापल्याचे आणि प्रशंसनीय आहे.
पोर्तुगीज , इंग्रज आणि संभाजीराजे -
♦ संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही.
♦ छ. संभाजी महाराज राज्यावर आल्यानंतर पोर्तुगीजांनी स्नेहाचे संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. अकबराचे पोर्तुगीजांशी असलेल्या मैत्रीच्या संबंधांमुळे तहाच्या वाटाघाटीत त्यांनी त्यास मध्यस्थ म्हणून घेतले होते.
♦ 1681 - जंजिर्याची मोहीम निर्माण झाली. या वेढयात राजांनी स्वतः पुढाकार घेतला होता. खाडी भरून काढण्यासाठी अचाट कल्पना लढवून सैन्याला मार्ग सुकर व्हावा म्हणून त्यांनी 669 चौ. मी. रूंद आणि सु. 27 मी. लांब जंजिर्याची खाडी दगड, लाकूड, कापसाच्या गाठी यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केला परंतु खवळलेल्या समुद्रामुळे तो निष्फळ ठरला, तरीसुद्धा हा अयशस्वी वेढा पुढे आठ महिने चालला. 1682 च्या फेबुवारीच्या अखेरीस राजे आणि अकबर जंजिर्याच्या आघाडीवरून माघारी आले. समुद्रातील या लढाईमुळे संभाजीराजांनी आपले नौदल आणि आरमार मोठया प्रमाणात वाढविले. त्यातूनच पुढे प्रसिद्ध आंगे घराण्याचा उदय झाला.
♦ 1682 - संभाजीराजांनी अंजदीव बेटावर स्वारी केली. त्यामुळे पोर्तुगीज आणि संभाजीराजे यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. पोर्तुगीजांनी मोगलांना सर्वतोपरी मदत देण्यास सुरूवात केली होती आणि दोघांच्या संगनमताने संभाजीराजांस पराभूत करण्याचे कारस्थान शिजू लागले.
♦ 1682 च्या जून-जुलैमध्ये संभाजीराजांनी चौल (चेऊल) व रेवदंडयास वेढा दिला, बरेच दिवस तो चालला. संभाजीराजांनी उत्तर कोकणातील दोन किल्ले जिंकून घेतले (1683), तसेच जुनी साष्टी व बारदेस येथेही चढाई केली. त्यांनी चौलचा वेढा उठवावा, म्हणूनच पोर्तुगीजांनी फोंडयावर हल्ला केला.
♦ 1683 च्या डिसेंबरमध्ये मराठयांनी पोर्तुगीजांची अनेक गावे घेऊन फोंडा लढविला. सहा महिन्यांनंतर चौलचा वेढा उठविला. फोंडयाच्या लढाईत येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी यांनी मोठा पराकम गाजविला. शेवटी दक्षिणेत मोठी मोगली फौज घेऊन शाहआलम येत आहे, ही बातमी येताच 1684 च्या सुरूवातीस फोंडे येथे पोर्तुगीजांशी तह केला. या तहाच्या वाटा-घाटीत कवी कलशाची भूमिका मुख्य होती आणि अकबर यास मध्यस्थ नेमले होते.
♦ 1684 साली छत्रपती संभाजी महाराज व हेन्री ग्यारी यांच्यात झालेल्या तहातील एक कलम आहे, 'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'.
♦ छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणार्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केला.
♦ 1685 - संभाजीराजांनी उंदेरी घेण्याचा प्रयत्न केला. दंडाराजपुरी घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्नही झाला. सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांवर दडपण आणले परंतु यातही त्यांना फारसे यश आले नाही. संभाजीराजांनी खंदेरी इंग्रजास देण्याचा विचार मान्य केला नाही आणि सिद्दीलाही शेवटपर्यंत खंदेरी, पद्मदुर्ग, कुलाबा जिंकता आले नाही.
♦ दरम्यान शाहआलमच्या समाचारासाठी ते गोव्यातून माघारी आले. तत्पूर्वी औरंगजेबाचा वकील शेख महंमद हा गोव्यात पोहोचला होता. त्याने पोर्तुगीजांनी संभाजीविरूद्ध युद्ध पुकारावे, अशी बादशहाची इच्छा असल्याचे सांगितले. तेथील गोव्याच्या गव्हर्नरने (विजरई) इतर सर्व अटी मान्य केल्या परंतु संभाजीराजांशी सलोखा असल्यामुळे मराठयांशी युद्ध करण्याचे नाकारले.
♦ संभाजीराजांची उभी कारकीर्द औरंगजेबाविरूद्ध लढा देण्यात गेली -
♦ संभाजीराजांनी गोवळकोंडेकर आणि विजापूरकर यांना मोगलांविरूद्ध वेळोवेळी मदत केली.
♦ 1681 - संभाजीराजांच्या फौजांनी बृहाणपूर लुटले. औरंगाबादच्या सभोवतालचा मुलूख लुटला. त्याच सुमारास दक्षिण कोकणात शाहआलम आणि तळकोकणात हसन अलीखान उतरले. शाहआलमचा पराभव मराठयांनी केला. हसन अलीखान तळकोकणातून कल्याण-भिवंडीकडे गेला. रणमस्तखान कोकणात उतरला, तेव्हा संभाजीराजांनी त्यास प्रतिकार केला.
♦ 1682 मध्ये खानजहान बहाद्दूराने सातारा प्रांताची मोहीम काढली.
♦ 1682 - प्रामुख्याने मराठी राज्य बुडवावे तसेच आदिलशाही व कुत्बशाही पादाकांत करावी अशा निश्चयाने आणि बंडखोरी करून संभाजीच्या आश्रयास आलेल्या आपल्या अकबर या मुलाचा सूड घ्यावा या उद्देशाने औरंगजेब दक्षिण हिंदुस्थानात औरंगाबादेस आला. त्याला आदिलशाही व कुत्बशाहीचे अनेक नामवंत सरदार भेटले. मोगलांनी मराठयांचा पाडाव करण्यासाठी आदिलशाहाला सैन्याच्या खर्चासाठी 9 लाख रूपये दिले.
♦ 1682 साली औरंगजेबाने मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी 15 पटींनी मोठे होते. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. येथे मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना साडेसहा वर्षे लढावे लागले. सं
♦ 1683 मध्ये मोगलांनी साल्हेर-मुल्हेर घेतले आणि रामसेज व त्रिंबकगडास वेढे दिले.
♦ एप्रिल 1684 - मराठयांचे राज्य जिंकण्यास विजापूरकरांचा फारसा उपयोग होत नाही, हे लक्षात येताच औरंगजेबाने शिकंदर आदिलशाहकडे फर्माने पाठविली. त्यात प्रमुख अट, ‘संभाजीची मित्रता व सख्य बाह्यातकारी व अंतर्यामी करून सोडून देणे व सर्वांनी एकदिल होऊन संभाजींचा निर्मूळ फडशा पाडण्याकरिता विचार करणे ’ ही होती. पण मराठयांविरूद्धच्या मोहिमेत मोगलांना सर्व आघाडयांवर अपयश येत होते.
♦ ऑक्टोबर 1684 - संभाजी, शिकंदर आदिलशाह आणि अबुल हसन कुत्बशहा यांत एकजूट होईल, असा संशय औरंगजेबास आला, म्हणून औरंगजेबाने आदिलशाहीवर स्वारी केली. या चढाईचा प्रतिकार करण्यासाठी दक्षिणेतील तीन सत्ताधीश एकत्र आले. संभाजीराजे, आदिलशाह आणि कुत्बशहा यांचा गट तयार होऊन या त्रिकूटाने मोगलांशी सामना देण्याची तयारी केली. संभाजीराजांनी मार्च 1685 मध्ये मदत पाठविली. डिसेंबर महिन्यात हंबीरराव मोहिते सैन्यासह विजापुरात दाखल झाले. संभाजीराजे व गोवळकोंडयाचा सुलतान हे संकट सर्व दक्षिणीयांवर आहे, असे समजून वागत होते. दोघेही आदिलशाही सुलतानास मदत करीत होते.
♦ 1685 मध्ये मराठयांनी धरणगाव लुटले आणि वर्हाड प्रांतात धुमाकूळ घातला. मोगलांच्या या आक्रमणाचा संभाजीराजांनी चांगलाच प्रतिकार केला.
♦ 1686 - मोगली फौजांनी कोल्हापूर, मिरज, पन्हाळा या भागांत आक्रमण करण्यास सुरूवात केली.
♦ 1687 - वाईजवळ हंबीरराव मोहिते आणि सर्जाखान यांत लढाई होऊन त्यात हंबीरराव मरण पावले.
♦ औरंगजेबाने कुत्बशहास आक्रमणाची धमकी दिली आणि काही अटी मान्य करावयास लावल्या. त्यांची पूर्तता झाली नाही, हे पाहून आक्रमण केले. मादण्णा व आकण्णा या दोन विश्वासू , पराक्रमी व कार्यक्षम मंत्र्यांचा विश्वासघाताने खून झाला. परिणामतः औरंगजेबाने 12 सप्टेंबर 1686 रोजी आदिलशाही संपुष्टात आणली आणि त्यानंतर 22 सप्टेंबर 1687 रोजी गोवळकोंडा हस्तगत करून कुत्बशाही राज्याचा शेवट केला आणि आपली सर्व शक्ती संभाजीराजांवर केंद्रित केली.
♦ रामसेज, साल्हेर, माहुली इ. अभेदय किल्ले औरंगजेबाने लाच देऊन हस्तगत केले. तसेच दळवी-देसायांप्रमाणेच संभाजीराजांकडे असलेल्या नोकरांना, अधिकार्यांना जहागिरी, मन्सब यांचे आमिष दाखवून त्यांना आपल्याकडे वळवून घेतले, सेवेतही ठेवले. या फितुरांमुळे संभाजींचा शेवट झाला.
♦ 1687 ते 89 पर्यंतच्या संभाजीराजांच्या हालचालींसंबंधी विशेष तपशील मिळत नाही. या काळात मोगलांनी सर्व बाजूंनी संभाजीराजांस वेढले असले तरी सातारा विभागातील सातारा, परळी, निंब, चंदनवंदन, कर्हाड, माजगाव, मसूर हे, तर दक्षिण कोकणातील संगमेश्वर, राजापूर, पन्हाळा, मलकापूर, खेळणा, शिरोळे, फोंडे, कोपल हे आणि कुलाबा, खंदेरी, राजकोट, सागरगड, पद्मदुर्ग, चौल हे उत्तर कोकणातील प्रदेश 1689 च्या सुरूवातीपर्यंत मराठयांकडेच होते.
♦ 1689 साली संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्र्वर येथे बोलावले. 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के व नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्र्वरावर हल्ला केला. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मावळ्यांनी प्रयत्न केले. जोत्याजी केसरकर व नंतर अप्पा शास्त्री यांनी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला. रायप्पा महार यांनी बहादूरगडावर महाराजांना वाचवण्याचे धाडस केले यात त्यांना वीरमरण आले.
♦ 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने संभाजीराजांना तुळापूर-वडू (बु.) या ठिकाणी अत्यंत निर्दयीपणे ठार मारले. सनातनी धर्ममार्तंड आणि औरंगजेब यांच्या क्रूर, निर्दयी मनोवृत्तीने संभाजीराजांचा घात केला.
संभाजीराजांची उदार धार्मिक लोकनीति -
♦ छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या.
♦ संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कर्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्र्वरचे वेदमूर्ती राम भट, कर्हाडचे शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली.
♦ संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्र्वर इ. देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या.
- ’समयनय’ हा नीतिपर ग्रंथ संभाजी राजेंनी गागाभट्टांकडून लिहून घेतला होता (1681).
- ’धर्म कल्पलता’ हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला (1682).
- अॅबे कॅरे या फ्रेंच पर्यटकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. त्याने संभाजीराजांना जवळून पाहिले होते. तो म्हणतो, संभाजींसारखा पराक्रमी, बुद्धिमान आणि सुंदर राजपुत्र मी भारतात पाहिला नाही. संभाजीराजे जगले असते, तर उत्तर भारत जिंकला असता, इतके ते शूर, पराक्रमी, दूरद़ृष्टीचे प्रजावत्सल राजे होते.