छत्रपती शिवाजीराजे भोसले

  •  छत्रपती शिवाजीराजे भोसले

    छत्रपती शिवाजीराजे भोसले

    • 20 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 13304 Views
    • 9 Shares

    छत्रपती शिवाजीराजे भोसले

    (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) 

            युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगल, आदिलशाही, कुतुबशाही आणि स्वकीयांच्या छाताडावर स्वतंत्र राज्य स्थापन केले.  छत्रपती शिवाजीराजे भोसले (19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले.

    छत्रपती शिवाजी महाराज  -
    जन्म - 19 फेब्रुवारी 1630, शिवनेरी किल्ला, पुणे
    • मृत्यू - 3 एप्रिल 1680, रायगड
    • राजवट - 6 जून 1674 ते 3 एप्रिल  1680
    • शिवकाल - शिवाजी महाराजांचा जन्म (1630) ते औरंगजेबाचा मृत्यू (1707) ह्या 77 वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात.
    • राजधानी - रायगड किल्ला
    • राज्यव्याप्ती -
    - पश्रि्चम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डोंगररांगांपासून नागपूरपर्यंत
    - आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत
    • राजमुद्रा व ब्रीदवाक्य - प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते (ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि सार्‍या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल)  छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली.  ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. 
    • चलन - होन, शिवराई, (सुवर्ण होन, रुप्य होन)
    • उत्तराधिकारी - छत्रपती संभाजीराजे भोसले
    • वडील - शहाजीराजे भोसले
    • आई - जिजाबाई

    • शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले.  
    • आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. 
    • आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2,000 सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून 1 लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. 
    • राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
    • महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. 
    • शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो.
    • छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख ’शिवशंभू’ असा होतो.
    • छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात - ”छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणार्‍या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू 1680 मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होत राहिला.” 

    कुटुंब व बालपण 
              छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म मराठवाड्यातील भोसले वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी, पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी  1630 रोजी  झाला.  
    • त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म 1627 मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि निश्रि्चत केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने  शिवरायांची ही जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. 
    • इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. 
    • एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ’शिवाजी’ ठेवले गेले. 
    • शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली. 
    • शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देर्‍हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी 5 वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. 

    शहाजीराजे भोसले -
    • शहाजीराजे सुरुवातीस अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी 1620 पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली.
    • 1624 - भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही शहाजी राजांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.
    • 1629 - निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले. त्यामुळे नाराज होऊन शहाजींनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. 
    • 1636 -  मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने 1636 मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (1627-56) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली होती. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते 1636 मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने  शहाजी राजांना पुण्याची जहागिरी बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. 
    • 1638- विजापूरच्या सैन्याने बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले. 
    • शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांने पुढे तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.

    जिजाबाई भोसले -
    • जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. 
    • हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.

    स्वराज्याचा श्रीगणेशा -
    • शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. 
    • आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर (1646-47) शिवाजीराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वीरीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद होते.
    • शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. 

    पत्नी - 
    • शिवाजी महाराजांना 8 पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
    1) सईबाई निंबाळकर 
    1659- सईबाई  मरण पावल्या.
    2) सोयराबाई मोहिते 
    • 1681- सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत मरण पावल्या.
    3) पुतळाबाई पालकर 
    • 1680 - पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. 
    4) लक्ष्मीबाई विचारे 
    5) काशीबाई जाधव 
    1674 - काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या.
    6) सगणाबाई शिंदे 
    7) गुणवंतीबाई इंगळे 
    8) सकवारबाई गायकवाड
    • 1707- सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. 
     
    मुलगे -
    महाराजांना सईबाईपासून संभाजी (1657-89) व सोयराबाईपासून राजाराम (1670-1700) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. 
    1) छत्रपती संभाजी भोसले 
    2) छत्रपती राजारामराजे भोसले 

    मुली -
    1) अंबिकाबाई महाडीक 
    2) कमळाबाई (सकवारबाईची कन्या) 
    3) दीपाबाई 
    4) राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी) 
    5) राणूबाई पाटकर 
    6) सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी) 

    सुना -
    1) संभाजीच्या पत्नी येसूबाई 
    2) राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते) 
    3) जानकीबाई 
    4) राजसबाई  (पुत्र संभाजी - 1698-1760)
    5) अंबिकाबाई (सती गेली)
    6) सगुणाबाई 

    नातवंडे -
    1) संभाजीचा मुलगा - शाहू 
    2) ताराबाई - राजारामाची मुले - दुसरा शिवाजी 
    3) राजसबाईची मुले - दुसरा संभाजी 

    पतवंडे -
    1) ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले.
    2) दुसर्‍या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर 3रा शिवाजी) (कोल्हापूर) 

    आदिलशाहीशी संघर्ष 
            1647 साली भोरजवळ निवडक मावळ्यासहीते शिवाजी म्हाराजांनी रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतली. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर (समकालीन कागदपत्रांनुसार नेतोजी पालकर), तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात. 

    • पहिली स्वारी, तोरणगडावर विजय 1647 - 17 वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड (प्रचंडगड) जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड) आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. 
    • महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू ताब्यात आणली. तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. 
    • जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. 
    • मराठी स्वराज्याच्या मोहिमेत महाराजांच्या विरुध्द लढणार्‍या विजापूरच्या सैन्यात फलटणकर, निंबाळकर, घाटगे, बल्लाळ हैबतराव ही मंडळी होती. त्यावेळी महाराजांच्या सैन्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरव चोर इ. निष्ठावान मंडळी होती. 
    • 1648 - आदिलशहाने सुमारे 5000 फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. याच लढाईत मुसे खोर्‍याचे देशमुख बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मत्यू झाला. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ‘सर्जेराव’ ही पदवी दिली. मावळातील वतनदार मंडळी ही महाराजांच्या कार्याकडे कशी ओढली जाऊ लागली, हे या मोहिमेवरून दिसून येते.
    • राज्यविस्तारपुढील सहा वर्षांत (1647-53) शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. 

    शहाजीराजांना आदिलशहाकडून अटक  1648 -
    • 1648 - शिवाजीराजांच्या यशस्वी स्वार्‍या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले  आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. 
    या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (1648 अखेर). सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबक्ष हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला.
    • 1649 - शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला. शहाजींची सुटका होऊन त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.
    • 1654 - शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.

    जावळी प्रकरण  1656 -
    • आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी  1656 साली महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला. 
    • विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणार्‍या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली.

    पश्रि्चम घाटावर नियंत्रण -
    • राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. 1659 पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्रि्चम घाटातील आणि कोकणातील  40 किल्ले जिंकले होते. 
    • प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.
    • 1656 - मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (4 नोव्हेंबर 1656) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा विजापूरच्या गादीवर आला. 
    • शिवाजी महाराजांनी मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. 
    • 1657 - दुसरा अली आदिलशहा औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली. मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला. हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. 
    • 1657 - शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी  कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (24 ऑक्टोबर 1657).
    • 1658 - महाराजांनी माहुलीचा किल्ला काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे, असे त्यास कळविले. फेब्रुवारी 1658 मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगर्‍याकडे जाण्यास निघाला आणि 21 जुलै 1658 मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.

    अफझलखानची स्वारी 1659 
            कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. तसेच आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे 1659 साली  विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. 1649 पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती.  
    • विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचा अफझलखानाने प्रयत्न केला.
    • अफझलखान हा विजापूरहून एप्रिल 1659 मध्ये मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह मोहिमेवर निघाला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले, अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकराची कैद आणि जबर दंड ही प्रकरणे याच काळातील होत.
    • 1659 - महाराज अडचणीत असताना सईबाई वारल्या; तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची तयारी केली.
    • अफझलखानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतांत पसरले होते. त्यामुळे त्याच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल, याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडसारख्या तळावर जाऊन लढा द्यावा, तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही, याची त्याला खात्री वाटेना; म्हणून त्याने महाराजांच्याकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले.
    • अफझलखानाने पाठविलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवींद्र परमानंदाने आपल्या शिवभारत काव्यात संस्कृतमध्ये अनुवादित केली आहेत. पत्रांवरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे, याबद्दल संशय रहात नाही. अफझलखानाने महाराजांना कळविले, तुम्ही राजचिन्हे धारण करीत आहात. तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रराव मोर्‍यांच्या जावळी या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते बलाने काबीज केलेत आणि जावळी घेऊन मोर्‍यांना सत्ताहीन केले. निजामशाहीच्या अस्तानंतर आमच्या आदिलशहांनी निजामशाहीच्या ताब्यातील मुलूख हस्तगत केला होता, तोही तुम्ही आपल्या अखत्यारित आणला आहे.
    • कल्याण, भिवंडीचा प्रांत आम्ही मोगलांकडे परत केला होता, तो हे शहाजी राजांच्या पुत्रा, तुम्ही बळकाविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्माशास्त्री आणि प्रतिष्ठित लोक यांना तुम्ही त्रास देत आहात. त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले, असेही म्हटले जाते. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप ताब्यात ठेवला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून द्यावा. मोगालांना पुणे, कल्याण, भिवंडी आदी प्रदेश देऊन टाकावेत. चंद्रराव मोर्‍यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावळी मोर्‍यांना परत करावी आणि आदिलशहाला शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील तेव्हा हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले, तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नगरी आणि भीमा व नीरा यांच्यामधला प्रदेश महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले व मुलूखही देऊन टाक.
    • पुढे अफझलखानाने आपल्या लष्करी बलाची क्षमता व प्रौढी सांगताना त्यात लिहिले होते, आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले 6 प्रकारचे सैन्य मला ताबडतोब (युद्धास) उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करू इच्छिणारे मूसाखान इत्यादी (सरदार) मला या कामी प्रोत्साहन देत आहेत.
    • महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.
    • अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावर भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.  
    • महाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफझलखान हे दोघेही परस्परांच्या हेतूंविषयी साशंक होते, असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती.
    • घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जय्यत तयारीनिशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडकडे जाताना महाराजांनी अफझलखान आणि त्याचा सरंजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफझलखानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर 10 शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली, तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परमानंदाने शिवभारतात महाराजांना अंबाबाईची कृपादृष्टी लाभली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला इ. वर्णन केले आहे.भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. 
    • शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता.  महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते.
    • 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरील एका छावणीमध्ये शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली.  भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. 
    • भेटीच्या वेळी उंचपुर्‍या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याचवेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण प्रचलित झाली. परमानंदाने कृपाण म्हणजे लांब खंजीर महाराजांपाशी असल्याचा उल्लेख केला आहे. संभाजींच्या दानपत्रात शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत अफझलखान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. 
    • आधीच ठरलेल्या इशार्‍याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजी पालकरच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद  झाले. काहीजण पळून गेले.
    • शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधानपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफझलखानाचा वध ही महाराजांच्या शौर्यसाहसाची गाथा आहे; पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडविणे, हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होय. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला. 
    • अफझलखानाच्या मृत्यूनंतर शिवाजी राजांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने संदर्भ हवा  करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
    • अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले.  स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजी पालकरने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली. 

    पन्हाळ्याचा वेढा व सिद्दी जौहरचे आक्रमण 1660 
            अफझलखानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर, वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली, तर दुसर्‍या तुकडीने घाटावर कोल्हापुरापर्यंत आक्रमण केले. 
    • नोव्हेंबर 1659 च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. 
    • हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. या सुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडाला वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. 

    पावनखिंडीतील लढाई -
    • 13 जुलै 1660 - मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वरपांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनिशी रात्री पन्हाळगड सोडला (13 जुलै 1660) आणि विशाळगडाकडे कूच केले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हा जखमी होऊन मरण पावला. महाराज विशाळगडास पोहचले आणि तेथून राजगडास गेले. 
    • पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने शिवाजी राजांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई झाली.  तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशाळगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील. 
    • शिवाजीराजांना ते पटेना पण ’बाजी’च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केले. संदर्भ हवा  बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले. 
    • बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. 
    • सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून जाऊ दिले, असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाहक ठपका ठेवण्यात आला, याचे वैषम्य वाटून सिद्दी जौहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जौहरने पन्हाळागडाला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला.

    शाहिस्तेखान प्रकरण
            तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वांत बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता. मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. 

    • 1660 - शायिस्तेखान हा जानेवारी 1660 मध्ये औरंगाबादेस पोहचला. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणार्‍या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालात तळ ठोकला.  
    • शायिस्तेखानाच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमताने वागत होते, याची कल्पना येते. विजापूरने मोगलांची मदत मागितल्याचा उल्लेख परमानंदानेही केला आहे. महाराज पन्हाळगड लढवीत होते. त्याच सुमारास शायिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादेहून कूच करून निघाला. 
    • 9 मे 1660 - अहमदनगर, सुपे या मार्गाने पुण्यात दाखल झाला. शिवाजीचे पारिपत्य करून त्याच्या मुलखातील किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे, अशी औरंगजेबाची आज्ञा होती. म्हणून शायिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील तीन वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्याहून सुभ्याचा कारभार पाहत होता. 
    • इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवीत असता शायिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गढीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याने चाकणचा किल्ला शर्थीने लढविला. 3 महिन्यांच्या या वेढ्यात मोगलांचे सहाशेच्यावर सैनिक जखमी वा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. 
    • चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली, हे पाहून शायिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करण्याचा नाद सोडला व मोगल सैन्य मैदानी प्रदेशांत पसरले आणि पुणे, कल्याण आणि भिवंडी हे मुलूख त्यांनी काबीज केले. महाराजांनी शायिस्तेखानाशी वाटाघाटी चालू ठेवून घाटावरील कोल्हापूरपर्यंतचा भाग, आदिलशहाच्या अखत्यारीतील कोकण हे प्रदेश मिळत असल्यास आपण विजापूरचे राज्य जिंकून घेण्याच्या कामात पूर्ण सहकार्य करू असे कळविले. शायिस्तेखानाने ही देऊ केलेली मदत झिडकारली. ही मोठी चूक होती, असे पुढे मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मोगल मैदानी प्रदेशात दहशत निर्माण करीत होते; पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेता आले नाहीत. 
    • 1661- मोगलांनी प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण मोगल सेनापती कारतलबखान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले. उंबरखिंडीचे युद्ध (1661) हे शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय. 
    • 5 एप्रिल 1663 - शायिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय. शायिस्तेखानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जसवंतसिंह हा होता.  रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकार्‍यांसह शायिस्तेखानाच्या लष्करात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले.
    • शायिस्तेखानाच्या महालातील 40-50 स्त्री-पुरुष ठार अगर जखमी झाले होते. मोगलांच्या छावणीत एकच हाहाःकार उडाला. भीमसेन सक्सेना याने लिहून ठेवलेले आहे, की यापूर्वी कधीही असे धाडस करणे कुणालाही शक्य झाले नव्हते. मोगल सेनापतीच्या छावणीत घुसून कुणी हिंदू जमीनदार अशा प्रकारे हल्ला करील, असे कुणालाही वाटले नाही. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव हिंदूस्थानात सर्वत्र पसरले. हल्ल्यापूर्वी त्यांनी मोगल छावणीची आणि शायिस्तेखानाच्या हालचालींची बारकाईने नोंद व तपासणी केली असली पाहिजे. या प्रकरणात जसवंतसिंहाकडून प्रत्यक्ष उत्तेजन जरी नसले, तरी कानाडोळा किंवा दुर्लक्ष झाले. ‘खरे-खोटे काय, ते परमेश्वर जाणे’, असे भीमसेन सक्सेना म्हणतो. औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रात या हल्ल्याची हकीकत शबखून (रात्रीचा छापा) अशा शब्दांत त्रोटक देण्यात आली आहे. औरंगजेब त्यावेळी काश्मीरच्या दौर्‍यावर होता. त्याने शायिस्तेखानाला ताबडतोब बंगालच्या सुभ्यावर पाठविले आणि त्या जागी मोठा मुलगा मुअज्जम यास नेमले. शायिस्तेखानानंतर मोगल सैन्याचे नेतृत्व जसंतसिंहाच्या हाती देण्यात आले. त्याने सिंहगडावर हल्ला केला; पण मराठ्यांनी तो परतविला. त्यानंतर मोगली सैन्याच्या हालचाली थंडावल्या.
    • 1663 सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते. एके रात्री लाल महालाजवळून जाणार्‍या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले.  
    • महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे  प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली. या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते.

    सुरतेची लूट 1664
            सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. 

    • शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. यूरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. 
    • महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकार्‍याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही.
    • 4 दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (6 ते 9 जानेवारी 1664). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापार्‍यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला. मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले.
    • 23 जानेवारी 1664 -  शहाजीराजे कर्नाटकात घोड्यावरून पडून होदिगेरे येथे मरण पावले.
    • गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले. 

    कोकणात मराठ्यांची निर्वेध सत्ता -
    • महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. 
    • पश्रि्चम किनार्‍याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे. जंजिर्‍याच्या सिद्दीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात, हे ते जाणून होते. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जौहरला दारुगोळ्याची मदत केली होती (1660). याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारी कैद केले होते.
    • 1664 - इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली; तेव्हा आदिलशहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी अझीझखानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले. 
    • अझीझखान आणि वाडीचे सावंत एक झाले, परंतु अझीझखान मरण पावल्यामुळे (10 जुलै 1664) आदिलशहाने खवासखान याला पाठविले. 
    • तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाळ येथे ते खवासखानावर चालून गेले (ऑक्टोबर 1664). 
    • खवासखानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली. ती मदत घेऊन मुधोळचा बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले. या लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला. त्याजकडील खजिना मराठ्यांनी लुटला. बाजी घोरपड्याची 200 माणसे ठार झाली. घोरपड्याच्या मृत्युनंतर खवासखानही पराभूत होऊन निघून गेला (डिसेंबर 1664). विजापूरकरांची ही मोहीम म्हणजे कोकण ताब्यात ठेवण्यासाठी आदिलशहाने केलेला शेवटचा प्रयत्न होय. त्यानंतर कोकणात मराठ्यांची सत्ता निर्वेध चालू राहिली.

    पुरंदरचा तह 1665 
           औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले. 

    • औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी 1665).
    • परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचल्याची बातमी त्यांना लागली (3 मार्च 1665).
    • जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. 
    • जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्करी तुकड्या ठेवल्या आणि त्यांना जागरुक राहण्याचे आदेश दिले.
    • जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. दहा ते पंधरा हजार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या करून त्यांनी शिवाजीचा प्रदेश उद्ध्वस्त करावा, अशा आज्ञा दिल्या. त्यामुळे प्रजा हैराण होऊन गावे सोडून कोकणात आणि अन्यत्र जाऊ लागली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली.
    • मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (14 एप्रिल 1665). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. 
    • दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (30 मे 1665). 
    • त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. 
    • पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. 
    • 11 जून 1665 रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. 

    पुरंदरच्या तहातील अटी  -
    1) महाराजांनी मोगलांना 23 किल्ले आणि वार्षिक 4 लाख होन उत्पन्नाचा किंवा महसुलाचा मुलूख द्यावा.
    2) उरलेले 12 किल्ले आणि वार्षिक 1 लाख होनाचा मुलूख बादशहाशी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा. 
    3) मुलगा संभाजी याला 5 हजाराची बादशाही मनसब देण्यात येईल.
    4) महाराजांना मनसबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल; पण दक्षिणेत मोगल सांगतील ती कामगिरी आपण करू, असे आश्वासन त्यांनी द्यावे.
    5) विजापूरच्या मोहिमेत सहकार्य करण्याची एक अट होती. त्या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे पाच लाख होनाचे प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूख सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला तीन लाख होन या हिशोबाने चाळीस लाख होनाच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूख आपल्या ताब्यात आहे. त्याचे उत्पन्न चार लाख होनाचे आहे, असे महाराजांनी कळविले.

    • शिवाजी महाराजांनी मोठया नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला, तर ते विजापूरशी हातमिळवणी करतील, हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूख आम्ही तुम्हाला देऊ, अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना 12 किल्ले आणि आदिलशाही मुलूखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले.
    • पुरंदरच्या अटींनी औरंगजेब संतुष्ट झाला नाही; कारण जयसिंहाने शिवाजीचा नाश करण्याची संधी घालविली, असे त्याचे मत होते. तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.
    • औरंगजेबाने विजापूरही जिंकून घ्यावे, अशी जयसिंहाला आज्ञा केली. शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन तो विजापूरवर चालून गेला. मातब्बर प्रधान मुल्ला अहमद हा मोगलांकडे गेला असतानाही विजापूरकरांनी लढण्याची शर्थ केली. निकराच्या लढायांत जयसिंहाला माघार घ्यावी लागली आणि भीमा ओलांडून सोलापूर गाठावे लागले (जानेवारी 1666).
    • या मोहिमेत शिवाजी महाराजांना कपटकारस्थानाने ठार मारण्याचा बेत दिलेरखानाने जयसिंहाला सांगितला, असे जयसिंहाच्या छावणीतील इटालियन प्रवासी निकोलाव मनुची (1639-1717) म्हणतो. तेव्हा जयसिंहाने ही सूचना फेटाळली आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला करावा असे सुचवले. नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे महाराजांचा हा हल्ला अयशस्वी झाला (16 जानेवारी 1666). 
    • शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी  पालकर प्रथम विजापूरला मिळाला आणि जयसिंहाने त्याची मनसब वाढविल्यावर मोगलांकडे गेला व पुढे त्यास औरंजेबाने मुस्लिम करून अफगाणिस्तानात पाठविले (17 मार्च 1667). त्याचे नाव मुहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले.
    • जंजिर्‍याचे सिद्दी हे मूळचे विजापूरचे चाकर; पण जयसिंहाने त्यांना 1665 नंतर मोगलांच्या आश्रयाखाली आणले. कोकणातील आपल्या अधिकारावर हश आक्रमण आहे, असे शिवाजी महाराजांना वाटू लागले. शिवाय विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (5 मार्च 1666).

    शासनव्यवस्था आणि अष्टप्रधानमंडळ 
            1666 च्या दिल्लीभेटीपूर्वी शिवाजी राजांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे. 

    • शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला आणि त्याबरोबरच राज्यकारभाराविषयक एक सुसूत्र नियमावली - कानुजाबता तयार केली. राज्याभिषेकाच्या समयी मुख्य-प्रधान (पेशवा), अमात्य, सेनापती, पंडितराव, न्यायाधीश, सचिव, मंत्री व सुमंत अशी अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांपैकी सहा प्रधानांनी सैन्य घेऊन युद्धादी प्रसंग करावे, अशी आज्ञा होती. तत्कालीन राजकीय परिभाषा फार्सी होती व अधिकार्‍यांची नावे फार्सीवरूनच घेतलेली असत. त्यासाठी रघुनाथपंत हणमंते यांच्या करवी राजव्यवहारकोश तयार करवून घेतला.
    • अष्टप्रधानांची कर्तव्ये आणि कार्यभार यांचे तपशील कानुजाबतात देण्यात आले आहेत. राज्याभिषेकानिमित्त होन आणि शिवराई ही दोन नवी नाणी पाडण्यात आली. त्या नाण्यांवर ‘राजा शिवछत्रपती’ अशी अक्षरे घातली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृत श्लोकबद्ध असून ते बहुधा शहाजींनी घडवली असावी; कारण ही मुद्रा शिवाजी महाराजांच्या पंधराव्या वर्षापासून वापरात दिसते. राज्याभिषेकानंतरही हीच मुद्रा कायम राहिली. ती अशी :प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता शाहसूनो:शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला. संस्कृत भाषेचा आणि भाषापंडितांचा मानसन्मान व आदर केला.
    • शिवाजी महराजांनी वतनदारांचे हक्क नियंत्रित केले, त्यांना महसुलातून (रयतेकडून) हिस्सा मिळत असे. त्याऐवजी रोख रक्कम वेतन म्हणून ठरवून दिली, त्यांना गढ्याकोट बांधण्यास मनाई केली. तसेच लष्कराला नियमित वेतन देण्याची पद्धत सुरू केली. तलवारीच्या जोरावर राज्य निर्मिले व तलवारीच्या जोरावरच ते रक्षिले; तथापि ‘साहेबी कारकुनाची’ अशी घोषणा केली. याचा अर्थ नागरी प्रशासन लष्करापेक्षा सर्वोच्च असेल. गड-कोटांना काय हवे ते कारकून देतील. कारकून प्रजेकडून कर वसूल करतील. तो लष्कराला हक्क नाही, अशा शिवाजी महाराजांच्या आज्ञा असत. कारभार ठीक चालवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे. मध्ययुगात मुलकी सत्तेचे श्रेष्ठत्व सांगणारा हा थोर नेता भारताच्या इतिहासातही कदाचित एकमेव असेल.
    • स्वराज्यस्थापनेत डोंगरी किल्ले, सवेतन सुसज्ज सेना आणि विश्वासू सहकारी यांचा वाटा मोठा होता. स्वार्‍यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिळविणे आणि संपत्ती व दारुगोळा जमा करून खजिना सुसज्ज ठेवणे, हा होता. या राज्यांगाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले. त्यामुळे सैन्याचा पगार कधी तटला नाही वा मागे पडू दिला नाही. किल्ले, दारुगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च त्यांच्या या कोषबलावर अवलंबून होता. अपुरी शस्त्रास्त्रे, मर्यादित सैन्य व साधनसंपत्ती यांमुळे आमनेसामने अशी मैदानी युद्धपद्धती मोगल वा विजापूर यांसारख्या बलाढ्य शत्रूंसमोर निरुपयोगी ठरेल. एवढेच नव्हे तर ते हानिकारक ठरेल, हे जाणून त्यांनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली.
    • आपल्या प्रशासन-लष्कर व्यवस्थेत शिवाजी महाराजांनी धार्मिक बाबींना कधी आड येऊ दिले नाही. या काळात सर्वधर्मसहिष्णू राज्यपद्धती स्थापणे, हे एक प्रकारचे क्रांतिकार्य होते. मुसलमान सुलतान इस्लामशिवाय इतर धर्मांना आणि ख्रिश्चन राज्यकर्ते ख्रिस्ती धर्माशिवाय इतर धर्मांना गौण व हीन लेखत, भिन्न धर्मीय प्रजेला समान दर्जाची रयत म्हणून मान्यता मिळत नसे. लष्कराला त्यांच्या खास आज्ञा असत की, ‘युद्धात धार्मिक वास्तू, साधू-संत, बायका-मुले, कुराण् आदींना धक्का लागता कामा नये’. स्त्रियांची विटंबना त्यांना मान्य नव्हती. त्यांच्या लष्करात स्त्रियांना व कबिल्याला स्थान नव्हते.
    • शिवाजी महाराजांची हेरव्यवस्था उत्तम असली पाहिजे हे त्यांच्या अनेक मोहिमा, अनपेक्षित यशस्वी हालचालींवरून लक्षात येते. आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा एक मोठा वाटा ते हेरव्यवस्थेवर खर्च करत असत. अशा प्रकारचे उल्लेख युरोपीय पत्रव्यवहारांत सापडतात.

    आग्र्याची भेट व सुटका 
            औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत 9 वर्षांचा संभाजी देखील होता.  परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली. 

    • 12 मे 1666 रोजी शिवाजी महाराज दुपारी आग्र्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोजखान याची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर-आग्रा रस्त्यावर आग्र्याच्या किल्ल्यापासून 2.50 किमी. अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारी त्यांना राहण्यास जागा दिली. पुढील 3 महिने त्यांचे वास्तव्य येथेच होते. महाराज पोहोचताच त्यांना  भेटीस आणावे, अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भरविलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकार्‍यांसह दिवाण-इ-खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला.
    • महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकार्‍याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला, ह्या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. औरंगजेबाने रामसिंहाला विचारले शिवाजीला काय होत आहे? रामसिंह जवळ येताच शिवाजी महाराज कडाडून म्हणाले,  मी कोणच्या प्रकारचा मनुष्य आहे, हे तुला, तुझ्या बापाला आणि बादशहाला ठाऊक आहे. असे असूनही मला अयोग्य ठिकाणी उभे करण्यात आले. मला बादशाही मनसब नको, चाकरी नको, असे मोठ्याने म्हणतच महाराज जाऊ लागले. रामसिंहाने त्यांना थांबवण्याकरिता त्यांचा हात धरला, तो झिडकारून महाराज एका बाजूला जाऊन बसले (एका बाजूला म्हणजे ‘दरबाराच्या बाहेर’ असे नव्हे)...... त्यांना खिल्अत (सन्मानाचा पोशाख) देण्यास औरंगजेबाने आकिलखान, मुख्लिसखान, मुल्तफतखान यांना पाठविले. औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. आपल्यावर विश्वास ठेवून महाराज आग्र्याला आले, याची रामसिंहाला जाणीव होती. त्याने आपण महाराजांच्याबद्दल जबाबदार राहू, अशा प्रकारचा जामीन बादशहाला लिहून दिला. त्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावरून हलविण्यात आले नाही.
    • शिवाजीबद्दल आधीपासून धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटार्‍यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकर्‍यांना बगल देऊन निसटला. पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही, तोपर्यंत शिवाजी निसटून 24 तास झाले होते.
    • आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता ते मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसर्‍या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदार्‍या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही. 
    • पुढील 3 महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता, असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले; पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांना दगाफटका झाला, तर बादशहाच्या वचनावर इतःपर कोणाचाही विश्वास रहाणार नाही, असाही विचार औरंगजेबाची मोठे बहीण जहांआरा हिने बोलून दाखविला. महाराजांनीही मोगल वजीर जाफरखान, बख्शी मुहम्मद अमीन इत्यादींशी संपर्क साधून आपल्यावर एकाएकी प्राणसंकट येणार नाही, याबद्दल कसोशीने प्रयत्न केले.
    • आपल्या ताब्यात असलेले किल्ले आणि मुलूख महाराजांनी मोगलांना देऊन टाकावेत म्हणजे त्यांना इतरत्र मनसबी देण्यात येतील, हे औरंगजेबाचे धोरण होते. जयसिंहाने केलेल्या तहाने त्याचे समाधान झाले नव्हते. कुणीकडून का होईना, पण महाराजांना महाराष्ट्रातून बाहेर काढावे हा त्याचा हट्ट. उलट, मी भक्कम रक्कम देतो, माझे किल्ले परत करा असे महाराजांचे म्हणणे. महाराजांना आग्र्यासच काही दिवस ठेवावे ही जयसिंहाची इच्छा; पण त्यांच्या जीवास अपाय होऊ नये याची त्याला काळजी. आग्र्याच्या वास्तव्यात मोगल दरबारातील अधिकार्‍यांना आपल्याकडे वळविण्यात महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. महाराजांच्या बाणेदार वर्तनामुळे मोगल प्रजा स्तिमित झाली होती.
    • विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची नामुष्की झाली होती. इराणचा बादशहा भारतावर हल्ला करणार, अशी अफवा होती आणि महाराजांचा प्रश्न अद्यापि निकालात निघाला नव्हता. या परिस्थितीत औरंगजेब मोठ्या काळजीत होता. शिवाजी महाराजांकडून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, हे पाहून औरंगजेबाने महाराजांवरील पहारे कडक केले. रामसिंहावर पुढे वाईट प्रसंग येऊ नये, म्हणून शिवाजी महाराजांनी रामसिंहाची जामीनकी रद्द करविली आणि सोबतची बरीच माणसे दक्षिणेस परत पाठविण्याची परवानगी मागितली. याच सुमारास महाराजांना शहरातील दुसर्‍या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वीच निघून जाण्याचे महाराजांनी ठरविले.
    • 17 ऑगस्ट 1666 रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटार्‍यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकर्‍यांना दुसर्‍यां दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौलादखान, तरबियतखान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता; पण आरोप सिध्द झाला नाही. अंबरची जहागीरही त्याला देण्यात आली. औरंगजेबाने अधिकार्‍यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले (20 नोव्हेंबर 1666). नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले.
    • पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा फार गवगवा केला नाही. उलट वरकरणी आपण मोगलांशी एकनिष्ठ आहोत, असे दाखविले व बादशहाचा निरोपही घेता आला नाही, अशी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये, यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण ठेवले. 
    • राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुअज्जम यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहागीर मिळावी, म्हणजे आपण त्याच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी त्याला औरंगाबादेस पाठवू असे कळविले आणि सरदारांसहित संभाजी औरंगाबादेस गेले. तिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादेस ठेवून राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागीर आणि शिवाजी महाराजांना ‘राजा’ ही पदवी या घटना 1667 मधील होत.

    महाराष्ट्रात परतल्यानंतर विजयी घोडदौड 
            शिवाजीराजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदरच्या तहात दिलेले 23 किल्ले जिंकून घेतले. त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले. कोंढाण्याच्या लढाईत सुभेदार तानाजी मालुसरे यांस लढताना वीरमरण आले. 

    • महाराजांच्या आग्रा भेटीचा फायदा घेऊन आदिलशहाने कोकणात पुन्हा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला आणि इतर काही महाल वगळता मध्य व दक्षिण कोकण हे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि सावंतवाडीच्या बंडखोर देसायांना आपल्या हवाली करावे, असे पोर्तुगीजांना सांगितले. 
    • 1667 - पोर्तुगीजांच्या गोव्याच्या मुलखातील बारदेशावर तीन दिवस स्वारी केली (10 ते 12 नोव्हेंबर 1667). पेडणे, कुडाळ, डिचोली इ. भागांतील बंडखोर देसायांना पकडावे, असा त्यांचा उद्देश होता; पण ते लोक गोव्याला पळून गेले. या स्वारीत पोर्तुगीजांचे नुकसान व मनुष्यहानी झाली. अखेर थोड्या दिवसांनी 1667 मध्ये दोन्ही पक्षांत तह झाला. तहाप्रमाणे मराठ्यांनी कैदी आणि मालमत्ता परत केली. पोर्तुगीजांनीही बंडखोर देसायांना आवर घालू अशी हमी दिली. दाभोळला पोर्तुगीजांना वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी परवानगी दिली.
    • 1668 - नारवे येथील सप्तकोटीश्वर देवालयाचा त्यांनी जीर्णोद्धार केला (1668). याच वर्षी फ्रेंचांना राजापूर येथे वखार घालण्यास त्यांनी परवानगी दिली. 
    • 1669 - सिद्दीचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी एप्रिल 1669 मध्ये जंजिर्‍याला वेढा दिला. जंजिरा शिवाजी महाराजांच्या हाती जाणे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांपैकी कुणालाच नको होते. ते सिद्दीला गुप्तपणे मदत करीत. या निमित्ताने सिद्दींना मदत करून मध्य कोकणात प्रवेश करावा, ही मोगलांची इच्छा होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न असफल झाला; तथापि मोगलांवरच चढाई करण्याची धाडसी मोहीम महाराजांनी आखली (1669). 
    • 1669 - औरंगजेबाने मूर्तिभंजनाचे धोरण जाहीर करून काशी येथील प्रसिध्द मंदिराची मोडतोड केली (सप्टेंबर 1669). धर्मांतरालाही उत्तेजन देण्यात येऊ लागले. यामुळे सर्वसामान्य प्रजेत असंतोष वाढू लागला होता. महाराज योग्य संधीची वाट पहात होते. त्यांनी तत्काळ औरंगाबादेत तैनात असलेले मराठा लष्कर आणि अधिकारी प्रतापराव गुजर व आनंद राव यांना परत बोलाविले आणि मोगलांविरुध्द युद्ध पुकारले.

    राज्याभिषेक 
            शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती. 

    • मुघल सम्राटाच्या लेखी शिवाजीराजे एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता. 
    • सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी शिवाजी राजांच्याबद्दल मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला.
    • महाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती. 
    • प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराज हे कुणबी होते. त्यांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना ’क्षत्रिय’ जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली. 
    • शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणार्‍यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव ’गागाभट्ट’ असे होते आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता.
    • सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणा घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी सातार्‍यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.
    • 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून ’करणकौस्तुभ’ नामक ग्रंथ लिहवून घेतला.

    मोगल-मराठा संघर्ष 
            शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली.
    • 4 फेब्रुवारी 1670 - 
    तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला. या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. 
    • 8 मार्च 1670 - 
     
    पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. 
    • जून 1670 - 
     
    माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसर्‍या हल्ल्यात मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला.
    माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला. तसेच महाराजांचे सैन्य दक्षिणच्या सुभ्यात चहूकडे पसरले. त्यांनी वर्‍हाड आणि पूर्व महाराष्ट्र येथील प्रदेशांवर आक्रमणे केली. खेड्यापाड्यातून मराठे चौथाई वसूल करू लागले. 
    • 3 ते 5 ऑक्टोबर 1670-
     
    सुरतेवर दुसर्‍यांदा हल्ला -शिवाजी महाराजांनी बागलाण आणि डांग वाटेने पुढे सुरतेवर हल्ला चढविला. सुरतेतील समृध्द व्यापारी, पेढीवाले आणि सावकार यांची संपत्ती हरण करण्यात आली. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते. हिरे, मोती, सोने-नाणे अशी 50 लाखाची लूट या स्वारीत मिळाली. लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांनी सुरतेचा खजिना नाशिक-त्रिंबक-मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला. 
    • 17 ऑक्टोबर 1670 -
     
    मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊदखान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे-मोगल यांत लढाई झाली. या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार ठार अगर जखमी झाले. 
    • 1670 -
     
    शिवाजी महाराजांनी राजगडहून राजधानी रायगडला हलविली. पुढील अल्पकाळातच मराठ्यांनी त्र्यंबकेश्वर, खळा, जवळा, औंढा, पट्टा इ. किल्ले जिंकून घेतले. 
    • नोव्हेंवर 1670-
     
    शिवाजी महाराजांनी वर्‍हाडमधील कारंजा हे शहर लुटले. त्यापूर्वी महाराजांनी आणखी एक मोठा धाडसी उपक्रम केला. तो म्हणजे बागलाण प्रांतावर (सध्याचा नाशिक जिल्ह्यातील तालुका) चढाई  होय. मुअज्जम या आक्रमणाने हतबुध्द झाला. दक्षिणेत मोगलांचा दाऊदखान कुरेशीव्यतिरिक्त दुसरा मातब्बर सरदार नव्हता. दिलेरखान हा नागपूर प्रांतात होता. त्याने दक्षिणेकडे जावे म्हणून बादशहाने आज्ञा केली. खानदेश सुभ्यात सटाणा, गाळणा किल्ला व मालेगाव इत्यादींचा समावेश होता. नाशिक (गुलशनाबाद) हे तालुक्याचे ठिकाण असून संगमनेर जिल्ह्यात मोडत होते. महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हारच्या मार्गाने पुढे सरकून नाशिक आणि बागलाणच्या मध्ये पसरलेल्या पूर्व-पश्रि्चम डोंगरावरील किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा चालविला. इंद्राई, कांचन, मांचन, अचलगड, मार्कंडगड, अहिवंतगड हे किल्ले मराठ्यांच्या हातात पडले. 
    • 5 जानेवारी 1671 -
    मराठ्यांनी बागलाणातील साल्हेरचा किल्लाही जिंकून घेतला. मराठ्यांच्या दुसर्‍या सैन्याने औसा, निलंगा, नांदेड, उमरखेड इ. भागांत धुमाकूळ घालून बर्‍हाणपूर लुटले. तेव्हा औरंगजेबाने काबूलचा सुभेदार महाबतखान याची दक्षिणेच्या मोहिमेवर नेमणूक केली, तो औरंगाबाद येथे 10 जानेवारी 1671 रोजी दाखल झाला. महाबतखानाच्या हाताखाली दाऊदखानाला देण्यात आले.
    • सप्टेंबर 1671 -
     
    दाऊदखान आणि महाबतखान यांच्या भांडणामुळे औरंगजेबाने दाऊदखानाला खानदेशातून हलविले आणि महाबतखानाला बदलले. त्याच्या जागेवर गुजरातचा सुभेदार बहादुरखान याची नेमणूक केली. पुन्हा मोगल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. मोगल आणि मराठे यांत घनघोर युद्ध होऊन साल्हेरच्या युद्धात मोगल फौजेची वाताहात झाली. मराठ्यांचा शूर सरदार सूर्यराव काकडे या युद्धात मारला गेला. बहादुरखानाने भीमा नदीच्या काठी श्रीगोंद्याजवळ पेडगाव येथे छावणी घातली आणि औरंगजेबाच्या आज्ञेने तिथे एक किल्ला बांधला. हाच बहादुरगड होय. पुढे अनेक वर्षे याचा उपयोग मोगलांची छावणी म्हणून होत होता.
    • 1672 -
     
    या सुमारास औरंगजेबाला सतनामी जमात आणि वायव्य प्रांतातील पठाण यांच्या प्रखर बंडाशी मुकाबला करावा लागला. त्याने मुअज्जम आणि इतर अनुभवी सरदार यांना दक्षिणेतून बोलावून घेतले. आणि बहादुरखानाला सुभेदार आणि  लष्करी मोहिमेचा सूत्रधार नेमले. दक्षिणेतून सैन्य गेल्यामुळे त्याची कुचंबणा झाली. वायव्य प्रांतातील पठाणांचे बंड वाढले, बख्शी मुहम्मद अमीन याची पठाणांनी बेअब्रू केली. शिवाय मोगलांना सर्व प्रकारची हानीही सहन करावी लागली. 
    • एप्रिल 1674-
     
    औरंगजेब बंड शमविण्यासाठी स्वतः दिल्लीतून बाहेर पडला.

    आदिलशाहीशी संघर्ष
    • 24 नोव्हेंवर 1672 -
    अली आदिलशहा मरण पावला. त्याचा  वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. 
    • 1673 -
     
    विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. 
    • 6 मार्च 1673 -
     
    महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला . सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. 
    • 24 फेब्रुवारी 1674 -
     
    बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च 1673) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर याने खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा 24 फेब्रुवारी 1674 रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव ठार झाला.
    • मोगल सरदार दिलेरखान आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांनी युती करून मराठ्यांवर चाल केली; पण या युतीला न जुमानता बहलोलखानाचा मराठ्यांनी दणदणीत पराजय केला. मराठ्यांनी संपगाव, लक्ष्मेश्वर, बंकापूर, हुबळी इ. स्थळे लुटली. महाराजांनी कोकणात मोगल आणि सिद्दी यांचा आरमारी युद्धात पराजय केला; पण सिद्दींचा सरदार सुंबुल याच्याबरोबर मराठ्यांचा आरमारी अधिकारी दौलतखान हाही जखमी झाला.
    • इंग्रजांनी सिद्दी आणि महाराज यांत मध्यस्थी करण्याच प्रयत्न केला; परंतु सिद्दी आरमाराला इंग्रज मुंबईत आश्रय देतात, या सबबीवर ही मध्यस्थी शिवाजी महाराजांनी झिडकारली. इंग्रजांची मुख्य गार्‍हाणी म्हणजे राजापूर आणि इतर स्थळांतील वखारींच्या लुटीबद्दल भरपाई मागण्यासंबंधी होती. मराठ्यांच्या हाती जंजिरा पडू नये, ही इंग्रजांची इच्छा असूनही, व्यापार-उदीम, जकात आणि मुक्त संचार यांसाठी मराठ्यांशी मिळते घेण्याचे धोरण त्यांना स्वीकारावे लागले. अखेर वाटाघाटी होऊन इंग्रज आणि महाराज यांच्यात तह करण्याचे ठरले (1674).

    दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबर 1674 
            गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्रि्वन शुद्ध पंचमी (24 सप्टेंबर 1674) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागले. त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. 

    • विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणार्‍या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. 
    • 24 सप्टेंबर 1674 - शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्‍चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसर्‍या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.
    • मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.
    • राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रांवरून उपलब्ध आहेत. 
    • 29 मे 1674 रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. 
    • 30 मे 1674 रोजी पत्नींशी वैदिक पध्दतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील सहा दिवस विविध समारंभ होत होते. 
    • 6 जून 1674 ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके 1576, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले.
    • तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. 
    • 12 जून 1674 रोजी राज्याभिषेकाच्या नंतर इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या.
    • 17 जून 1674 - राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यु झाला. याशिवाय काही आकस्मिक मोडतोडीच्या घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.

    राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा 
            राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वर्‍हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (1674-75). महाराजांनी जंजिर्‍याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. 

    • विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली. बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. 
    • मे 1675 - 
    स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला. या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. 
    • ऑक्टोबर 1675 - 
    पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. पठाणांचे बंड मोडावे आणि मराठ्यांना प्रतिकार करावा असे ठरले; पण पठाण खवळले.
    • 11 नोव्हेंबर 1675 -  
    खवासखान हा विजापूरला येताच त्यांनी त्याला कैदेत टाकले. तेव्हा दक्षिणी मुसलमान सरदार शेख मिन्हाज याने बहलोलखानाचा पठाण सरदार खिज्रखानाला ठार मारले. त्याचा सूड म्हणून पठाणांनी खवासखान यास ठार मारले.  
    • जानेवारी-फेब्रुवारी 1676 -
    दरम्यान शिवाजी महाराज सातारला आजारी होते, तत्संबंधी अनेक अफवा प्रसृत झाल्या. संभाजी आणि सावत्र आई सोयराबाई यांचे परस्परसंबंध चिघळत असल्याची वदंता होती. संभाजींच्या वर्तनाविषयीच्या बातम्यांत काही अंशी वदंताही असावी; पण शिवाजी महाराजांनी शांतपणे या सर्व बाबी हाताळल्या. विजापूरविरुध्द मोगलांनी चालविलेली तयारी ते बारकाईने पहात होते. विजापूर राज्यातील अथणी, संपगाव इ. भागांतही ते स्वतः आक्रमणे करीत होते. 
    • 18 जानेवारी 1676 - 
    शेख मिन्हाज आणि दक्षिणी सरदार यांनी गोवळकोंड्याच्या कुत्बशाहाची मदत मागितली. विजापूरची सूत्रे बहलोलखानाकडे आली. 
    • 21 मार्च 1676 -
    दक्षिणी मुसलमान आणि पठाण यांच्यात शाह डोंगर मुक्कामी प्रखर युद्ध होऊन दक्षिणी पक्षाचा बिमोड झाला.
    • 27 मार्च 1676 -
    औरंगजेब पंजाबातून दिल्लीला परत आला. त्याने विजापूरच्या अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी बहादुरखानास विजापूरवर स्वारी करण्याची आज्ञा दिली आणि दिलेरखानास दक्षिणेत रवाना केले (जून 1676). दिलेरखानाबरोबर नेताजी पालकरलाही दक्षिणेत पाठविले. 
    • 31 मे 1676 -
    मोगल सुभेदार बहादुरखान याने भीमा ओलांडून विजापूरवर चाल केली .
    • 19 जून 1676 -
    नेताजीला आपल्या कृतीचा पश्चात्ताप झाला होता. दक्षिणेत येताच त्याने संधी साधून दिलेरखानाची छावणी सोडली आणि तो महाराजांकडे आला. त्याचे शुध्दीकरण करून महाराजांनी त्याला हिंदू केले.
    • 13 जून 1676 -
    विजापूरजवळील इंडी येथील युद्धात मोगलांची दैना उडाली. त्यात मोगल सरदार इस्लामखान रुमी मुलांसह ठार झाला. मोठ्या कष्टाने मोगलांनी माघार घेतली आणि नळदुर्ग किल्ल्याला वेढा घातला. बहलोलखानाने तो उठविला त्यात बहादुरखानाचाच मुलगा मोहसीन मारला गेला (ऑगस्ट 1676). तेव्हा त्याने विजापूरचे दक्षिणी सरदार शेख मिन्हाज, सिद्दी मसूद, शेख जुनैदी यांना पुन्हा एकत्र आणले आणि विजापूरच्या पाडावासाठी महाराजांच्या मदतीची अपेक्षा धरली. महाराजांनी या संधीचा पूर्ण लाभ उठविला. त्यामुळे मराठ्यांना दक्षिण भारतात मोठे आश्रयस्थान निर्माण झाले.

    दक्षिण दिग्विजय 1674 
            17 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीत  जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या.  त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला.  त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता.  तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते.  

    • या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता.  त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता. 
    • शिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.  
    • चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणे प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला. त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना; तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण 20 लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले. 
    • यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. 
    • कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना जंजिर्‍याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली. 
    • तमिळनाडूमध्ये विजापूरच्या अधिकार्‍यांत दोन तट होते. खवासखान याच्या पक्षाचा नासिर मुहम्मद हा जिंजीचा किल्लेदार होता आणि बहलोलखानाचा नातेवाईक शेरखान हा दक्षिण तमिळनाडूचा प्रशासक होता. तमिळनाडूमधील मांडलिक राजे विशेषतः तंजावर व त्रिचनापल्ली येथील राजे हे कधी शेरखानाला, तर कधी नासिर मुहम्मदला मदत करून आपला बचाव करून घेत होते. तंजावर दरबारातील मुत्सद्दी रघुनाथ नारायण हणमंते याने व्यंकोजी राजांना (शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू) समजावून सांगितले की, विजापूर दुर्बल झाले आहे व तमिळनाडूमधील विजापूरचे प्रशासक हे आपसांत भांडत आहेत. तेव्हा ही संधी साधून तमिळनाडूमधील विजापूरची सत्ता नाहीशी करावी; पण व्यंकोजी राजांना हा सल्ला मानण्याचे धैर्य झाले नाही. तेव्हा त्यांना सोडून रघुनाथ नारायण हा हैदराबादवरून सातार्‍यास आला. 
    • हैदराबादेस आक्कण्णा आणि मादण्णा या दोन बंधूंची सत्ता होती. महाराजांना त्यांचे भरपूर साहाय्य मिळेल, असे रघुनाथ नारायण याने सुचविले. 
    • 21 एप्रिल 1672 रोजी गोवळकोंड्याचा सुलतान अब्दुल्लाह मरण पावला. त्यानंतर त्याचा जावई अबुल-हसन तानशाहा गादीवर आला. महाराजांनी त्याच्याशी स्नेहसंबंध जोडले होते. पुढे आक्कण्णा व मादण्णा या दोन बंधूंनी गोवळकोंड्याचे राजकारण केले. शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी निकटचे संबंध जोडले. यातूनच महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मसलत तडीस नेली.
    • दक्षिणेकडे रवाना होण्यास योग्य मार्ग हैदराबाद, कुर्नूल, तिरुपती, मद्रास व जिंजी हाच होता. दुसरा मार्ग बेळगाव, धारवाड हे जिल्हे व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील चित्रदुर्ग, कोलार, आंबोण, वेल्लोर, जिंजी हा होता. शिवाजी महाराजांनी हैदराबादमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. गोवळकोंड्याचे प्रधान आक्कण्णा व मादण्णा हे अनुकूल होते. बहादुरखान मराठ्यांच्या मोहिमेला अनुकूल बनला. महाराजांनी आपल्या गैरहजेरीत राज्यकारभार व्यवस्थित चालावा, म्हणून रायगडावर प्रमुख मंत्री तसेच धाकटा मुलगा राजाराम आणि पत्नी सोयराबाई यांना ठेवले आणि संभाजींस शृंगारपूर येथे राहण्यास आज्ञा केली. दक्षिण दिग्विजयासाठी त्यांनी रायगड सोडला (1676). त्यांच्या अनुपस्थितीत मोरोपंतांची जंजिर्‍यावरील मोहीम, रामनगर प्रकरणात पोर्तुगीजांकडून चौथाईची मागणी, अशी काही प्रकरणे उद्भवली.
    • शिवाजी महाराज मजल दरमजल करीत हैदराबादच्या सरहद्दीवर पोहोचले. मराठ्यांच्या सैन्याची एक तुकडी बेळगाव, धारवाड या भागांत विजापूरविरुध्द लढण्यात गुंतली होती. ती नंतर महाराजांच्या सैन्यात सामील झाली. महाराज मार्च 1677 च्या प्रारंभी हैदराबादला पोहोचले. तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. मोगलांना प्रतिकार करण्यासाठी मराठ्यांची आपल्याला मदत आसावी, अशी कुत्बशाहाची इच्छा होती. तमिळनाडूतून विजापूरची सत्ता सर्वस्वी नाहीशी करावी, ही मराठ्यांची इच्छा होती. कुत्बशाहाशी मैत्री केल्यास मोगलांविरोधी दक्षिणेत आघाडी उघडता येईल, असाही एक महाराजांचा हेतू होता. व्यंकोजीराजे यांनी तंजावरला राज्य स्थापिले होते. बंगलोर-जिंजीचा प्रदेश आणि तंजावर हे भाग शहाजींच्या नंतर त्यानी आपल्याकडे ठेवले. त्यांत आपल्याला वाटा मिळाला पाहिजे, असा दावा महाराजांनी केला; तथापि विजापूरची सत्ता नामशेष करणे, हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता.
    • हैदराबादला महाराज एक महिना राहिले. कुत्बशाहाशी वाटाघाटी होऊन मैत्रीचा तह झाला. त्यात मोहीम चालू असेपर्यंत स्वारी खर्चासाठी म्हणून कुत्बशाहाने रोजाना 3 हजार होन द्यावेत, तसेच महाराजांनी विजापूरकडून जिंकलेला प्रदेश त्यांची वडिलार्जित जहागीर वगळता त्यांनी कुत्बशाहाकडे द्यावा, असे ठरले. नंतर पंधरा ते वीस हजार घोडेस्वार आणि तीस हजार पायदळ घेऊन महाराज श्रीशैलम पर्वतावर गेले (एप्रिल 1677). 
    • तेथून कालहस्ती, तिरुपती इ. क्षेत्रे करीत ते मद्रासच्या जवळ पेद्दपोलम गावी पोहोचले (मे 1677). 
    • तेथून ते जिंजीच्या भव्य दुर्गाकडे आले. जिंजीचा किल्ला त्यांच्या ताब्यात आला (मे 1677). 
    • वेल्लोरचा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला (22 जुलै 1678). 
    • त्रिवाडी येथे तमिळनाडूच्या आदिलशाहातील मुलखाचा सुभेदार शेरखान याचा मराठ्यांनी पराजय केला. विजापूरच्या अधिकार्‍यांनी आपापली ठाणी सोडून पळ काढला. मराठ्यांनी वालदोर, तेगनापट्टण, पानेमोल, त्रिनेलोर इ. स्थळे ताब्यात घेतली. शेरखानाला कुठूनही मदत मिळण्याची आशा राहिली नाही. त्याने भुवनगिरीमध्ये आश्रय घेतला. मराठ्यांनी भुवनगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला (जुलै 1677). तेव्हा शेरखान शरण घेऊन त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला, तसेच तह करून बाकीच्या अटीही त्याला मान्य कराव्या लागल्या.
    • महाराजांनी जिंजी प्रदेशाची मुलकी आणि बिनमुलकी व्यवस्था बारकाईने केली आणि किल्ल्याची डागडुजी केली.
    • महाराष्ट्रातून त्यांच्याबरोबर आलेले शेकडो कारकून, मुलकी अधिकारी कामावर तैनात करण्यात आले. हा हा म्हणता विजापूरचा कारभार नाहीसा झाला. 
    • पुढे महाराज कावेरीच्या तीरावर पोहोचले. तिरुमलवाडी येथे त्यांनी छावणी घातली. याच ठिकाणी मदुरादी राज्यांचे राजे आणि नायक यांनी मराठ्यांना खंडणी पाठविली. व्यंकोजीराजे यांनीही महाराजांची भेट घेतली. शिवाजी महाराजांनी वडिलार्जित मालमत्ता, प्रदेश यांमध्ये आपल्याला अर्धा वाटा मिळावयास हवा, असे व्यंकोजीस सांगितले. तेव्हा व्यंकोजीराजे अचानक तंजावरला गुपचूपणे निघून गेले. शिवाजी महाराजांनी कावेरीच्या उत्तरेकडील व्यंकोजीचा प्रदेश घेतला. त्यावेळी व्यंकोजींनी सबुरीचे धोरण अंगीकारून समझोता केला. म्हैसूर भागातील मराठा प्रदेशाची व्यवस्था करून बंगलोर वगैरे काही परगणे त्यांनी व्यंकोजीची बायको दिपाबाई हिच्यासाठी परत केले.
    • म्हैसूरच्या सीमाभागात त्यांच्यात आणि म्हैसूरकरांत किरकोळ चकमकी झालेल्या दिसतात; पण ते प्रकरण वाढले नाही. 
    • दक्षिणेत व्यंकोजीराजांनी महाराजांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा पराजय झाला व त्यांना जबर रकमेची भरपाई करावी लागली (16 नोव्हेंबर 1677). 
    • रघुनाथराव हणमंतेसारख्या वाकबगार अधिकार्‍याच्या हाती महाराजांनी तमिळनाडू प्रदेशातील प्रशासनव्यवस्था सुपूर्त केली. बहादुरखानाने त्यांचा मार्ग मोकळा करून दिला, ती त्याची घोडचूक होती. औरंगजेबाने बहादुरखानाच्या हातून सूत्रे काढून घेतली.
    • म्हैसूरहून परतताना मराठ्यांनी कोप्पळ, गदग, लक्ष्मेश्वर इ. स्थळांवरून प्रवास केला. कर्नाटकात शिवाजी महाराजांचा तीन महिने मुक्काम होता. शिवाजी महाराजांच्या परतीच्या वाटेवर बेळगावच्या आग्नेयीस 48 किमी. वरील बेलवडी येथील देसाईण सावित्रीबाई हिने शिवाजी महाराजांच्या लष्करास 27 दिवस कडवा प्रतिकार केला. अखेर अन्नधान्याचा तुटवडा पडल्यानंतर सावित्रीबाई महाराजांच्या सैन्यावर तुटून पडली आणि तिने पराक्रम गाजवून लष्कराची हानी केली; पण अखेर मराठ्यांनी तिची गढी घेतली. देसाईणीला तिच्या उपजीविकेसाठी काही प्रदेश देण्यात आला. 
    • दक्षिण दिग्विजय आटोपून महाराज मध्ये पन्हाळागडास परत आले (एप्रिल 1678).

    शिवाजी - संभाजी संबंध -
    • शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या काळात सोयराबाई व संभाजी यांचे पटत नाही, हे माहीत असल्यामुळे त्यांनी संभाजींना सहकुटुंब शृंगारपुरास राहण्यास बजाविले. 
    • संभाजींनी दिलेरखानाशी पत्रव्यवहार केला. शृंगारपूरला संभाजी असताना त्यांचे मंत्र्यांशी खटके उडत होते. म्हणून महाराजांनी संभाजींना कोकणातून हलवून परळी येथील सज्जनगड किल्ल्यावर जाण्यास सांगितले; पण स्वराज्यातून निघून मोगलांना मिळावयाचे हे संभाजींनी ठरविले होते. त्याप्रमाणे दिलेरखानाशी बोलणी करून ते परळी सोडून एकाएकी माहूलीला स्नानासाठी जातो म्हणून गेले आणि दिलेरखानाच्या छावणीत दाखल झाले (13 डिसेंबर 1678). 
    • या सुमारास मराठ्यांनी चढाईचे धोरण स्वीकारून कोप्पळचा किल्ला जिंकून घेतला (3 मार्च 1679). 
    • मसूदखान आणि दिलेरखान एक झाले, पण महाराजांची आक्रमणे त्यांना थांबविता येईनात. तेव्हा दिलेरखानाने संभाजींना पुढील महत्त्वाच्या मोहिमांत आपल्याबरोबर घेऊन प्रथम स्वराज्यातील भूपाळगडचा किल्ला जिंकून घेतला (17 एप्रिल 1679). 
    • विजापूर अतिशय दुर्बल झाले असून एका हल्ल्यात ते आपल्या हाती येईल, अशी समजूत दिलेरखानाने करून घेतली. औरंगजेब जोधपूर प्रकरणात राजपुतांची बंडे मोडण्यात गुंतल्यामुळे उत्तरेकडून लष्करी मदत मिळण्याची शक्यता नव्हती. सिद्दी मसूद आणि शिवाजी महाराज हे एक झाले. महाराजांनी विजापूरला फौज आणि रसद यांचा मुबलक पुरवठा केला. दिलेरखानाने धुळखेडजवळ भीमा ओलांडली आणि तो विजापूरवर चालून गेला (ऑगस्ट 1679). 
    • महाराज दहा हजार घोडेस्वारांसहित विजापूराजवळ पोहोचले. मोगल मुलखात चौफेर हल्ले करून त्यांना त्रस्त केले. त्यामुळे मोगलांनी विजापूरचा वेढा उठवावा हा हेतू सिध्दीस गेला.
    • याच सुमारास औरंगजेबाने हिंदूंवर लादलेल्या जझिया कराच्या निषेधार्थ शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक परखड पत्र लिहून त्याची कानउघडणी केली.
    • दिलेरखानाचा विजापूरचा वेढा अयशस्वी झाला; तेव्हा शहाजादा मुअज्जमने दिलेरखानावर ठपका ठेवला आणि औरंगजेबाकडे तक्रार केली. दिलेरखानाने विजापूरहून माघार घेऊन भोवतालच्या प्रदेशातील प्रजेवर अनन्वित अत्याचार करण्यास प्रारंभ केला. दिलेरखानाच्या मनातील कपटकारस्थान करण्याचे बेत जाणून संभाजीराजे दिलेरखानाच्या अथणी येथील छावणीतून निसटले आणि विजापूरमार्गे पन्हाळ्यास आले (डिसेंबर 1679).
    • वर्‍हाड, खानदेश इ. भागांतील मोगल प्रदेशात हाहा:कार उडवून दिला होता. महाराजांनी औरंगाबादजवळील जालना शहरावर हल्ला करून ते लुटले (नोव्हेंबर 1679 ). 
    • औरंगाबादहून मोगल सैन्य येत आहे, असे पाहून ते नगर आणि नाशिक यांच्या सीमेवरील पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर आले. तेथे त्यांना संभाजीराजे मोगलांकडून परत आल्याची बातमी कळली. ती ऐकून ते घाईघाईने पन्हाळगडास आले. पन्हाळगडावर पिता-पुत्रांची गाठ पडली (13 जानेवारी 1680). 
    • शिवाजी महराजांनी संभाजींना एकूण सर्व राज्यातील गड, कोट, किल्ले, उत्पन्न - खर्च इत्यादींचा तपशील समजावून दिला आणि त्यांस राज्यकारभारात अधिक भाग घेता यावा, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
    • सज्जनगडावरून महाराज रायगडास परतले (4 फेब्रुवारी 1680). 
    • रायगडावर राजारामांचे मौंजीबंधन झाले (7 मार्च 1680). 
    • राजारामांचा विवाह झाला (15 मार्च 1680). 
    • समारंभानंतर काही दिवसांनी महाराज आजारी पडले. नवज्वराचा ताप असावा. रक्ताच्या उलट्या होऊन महाराजांचा रायगडला मृत्यू झाला, असे फार्सी कागदपत्रांत म्हटले आहे. इंग्रज वखारींच्या कागदपत्रांत रक्ताचा अतिसार झाला असे लिहिले आहे. त्यांच्या मृत्यूविषयी विश्वासार्ह पुरावा अद्याप ज्ञात झाला नाही.

    मूल्यमापन 
    • शिवाजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. ते अजिंक्य असा लढवय्या पुरुष होते. राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती. त्यांनी आपले बेत उत्तमरीत्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले. कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत. सर्व कार्यात त्यांनी सर्व जातींतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती ती कामे करवून घेतली.
    • मुंबई-लंडन येथील इंग्रजांच्या पत्रव्यवहारात अलेक्झांडर द ग्रेट, सीझर आणि हॅनिबल या पराक्रमी शूर वीरांबरोबर शिवाजी महराजांची तुलना करण्यात आली आहे (16 जानेवारी व 14 फेब्रुवारी 1678). 
    • मार्तिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे.
    • खाफीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार. तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता; पण तोही शिवछत्रपतींविषयी म्हणतो, ‘शिवाजीने सार्वकाल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला. लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला. मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे. मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले. या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत. जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील, त्याला तो कडक शासन करीत असे.’ 
    • महाराष्ट्रेतर कवींनी-विशेषतः तमीळ (सुब्रह्मण्य भारती), तेलुगू (कोमाराजू वेंकटलक्ष्मणराव), बंगाली (रवींद्रनाथ टागोर), गुजराती (झवेरचंद मेघाणी) हिंदी (केदारनाथ मिश्र) इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे. 
    • पतितपरावर्तन हा मार्गही त्यांनी अवलंबिला-बजाजी निंबाळकर व नेताजी पालकर हे सुंता झालेले आणि मुसलमानांत दहापाच वर्षे राहिलेले मराठे सरदार त्यांनी परत हिंदू करविले व त्यांच्या कुटुंबियांशी सोयरीक केली. 
    • सर्व धर्मांतील साधु-संतांना सन्मानाने वागविले आणि त्यांना उदार अंतःकरणाने देणग्या दिल्या. 
    • स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता आणि स्वधर्माबद्दल जाज्ज्वल्य अभिमान यांमुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली. त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय. त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील, अशी व्यवस्था केली. धैर्य आणि साहस यांबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते. म्हणून समर्थ रामदास म्हणतात -
    निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
    अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी.
    • दक्ष प्रजापालन, न्याय्य करव्यवस्था, सैन्याने रयतेला त्रास न देणे, या व अशा अनेक यशस्वी धोरणांमुळे महाराजांच्या मृत्यूनंतरही मोगल साम्राज्याचे कंबरडे मोडेपर्यंत मराठे लढले आणि पुढे भारतव्यापी झाले. मराठी मनाला ही प्रेरणा-ज्योत आजपर्यंत पुरली आहे व पुढेही पुरेल यांत शंका नाही.

    शिवाजी महाराजांवरील ललित साहित्य 
    1) राजा शिवछत्रपती (लेखक बाबासाहेब पुरंदरे)
    2) आग्र्‍याहून सुटका (पु.बा. गोवईकर)
    3) आज्ञापत्र : रामचंद्रपंत अमात्य
    4) सभासदाची बखर : कृष्णाजी अनंत सभासद
    5) एक्याण्णव कलमी बखर : (संपादक)वि.स.वाकसकर
    6) शिवछत्रपतींचे चरित्र : मल्हार रामराव चिटणीस
    7) राजा शिवाजी (खंडकाव्य) : म.म.कुंटे
    8) शिवराय (खंडकाव्य) : कवी यशवंत
    9) उष:काल (कादंबरी) : ह.ना. आपटे
    10) गड आला पण सिंह गेला (कादंबरी) : ह.ना. आपटे
    11) श्रीमानयोगी (कादंबरी) : रणजित देसाई
    12) कुलरक्षिता जिऊ (पुस्तक - लेखिका : वैशाली फडणीस)
    13) कुळवाडीभूषण शिवराय (पुस्तक - लेखक : श्रीकांत देशमुख)
    14) छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे (पुस्तक - लेखक : दत्ता नलावडे)
    15) छत्रपती शिवाजी (चरित्र, निनाद बेडेकर)
    16) थोरलं राजं सांगून गेलं (निनाद बेडेकर)
    17) रणसंग्राम (मूळ इंग्रजी ’फ्राँटियर्स’ लेखिका मेधा देशमुख भास्करन; मराठी अनुवादक - नंदिनी उपाध्ये) (शिवाजी आणि औरंगजेब यांच्या जीवनातील समकालीन प्रसंगांवर आधारलेली कादंबरी)
    18) शिवछत्रपती (पटकथा, लेखक - शिरीष गोपाळ देशपांडे)
    19) शिवनामा (काव्य, कवी - मुबारक शेख)
    20) शिवभूषण (निनाद बेडेकर)
    21) छत्रपती शिवाजी आणि सुराज्य (लेखक - भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल दवे)
    22) पॅटर्न शिवरायांचा (प्रा. सतीश कुमदाळे)

    शिवाजीच्या जीवनाचे अंग दाखविणारी नाटके/चित्रपट 
    1) ’आग्र्‍याहून सुटका’ (नाटक, लेखक विष्णू हरी औंधकर, 1920च्या सुमारास)
    2) छत्रपती शिवाजी आणि 21वे शतक - व्याख्याते डॉ. गिरीश जखोटिया (2013)
    3) जाहले छत्रपती शिवराय (महानाट्य : लेखक व दिग्दर्शक सुदाम तरस) (2013)
    4) तीर्थ शिवराय (रंगमंचीय संगीतमय कार्यक्रम, गीते - डॉ. निखिल पाठक. संगीत - जीवन धर्माधिकारी)
    5) फत्ते शिकस्त (मराठी चित्रपट - शिवाजीच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर; दिग्दर्शक - दिक्पाल लांजेकर)
    6) फर्जंद (मराठी चित्रपट - शिवाजीच्या भूमिकेत - चिन्मय मांडलेकर, दिक्पाल लांजेकर)
    7) बेबंदशाही (नाटक, विष्णू हरी औंधकर, 1920च्या सुमारास)
    8) मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009) (चित्रपट - कथा/पटकथा महेश मांजरेकर)
    9) भालजी पेंढारकरांचे अनेक चित्रपट (’गनिमी कावा’, छत्रपती शिवाजी’, थोरातांची मंजुळा’, ’नेताजी पालकर’, ’बहिर्जी नाईक’, बालशिवाजी’, मराठा तितुका मेळवावा’, महाराणी येसूबाई’, मोहित्यांची मंजुळा’, स्वराज्याचा शिलेदार’, वगैरे)
    10) राजे आणि छत्रपती - लेखक शिवा बागुल (सप्टेंबर 2014)
    11) रायगडाला जेव्हा जाग येते - नाटक, लेखक वसंत कानेटकर 
    12) लाल महालातील थरारक शिव तांडव (महानाट्य -प्रमुख भूमिका अमोल कोल्हे)
    13) शहा शिवाजी - लेखक य.ना. टिपणीस (1920च्या सुमारास)
    14) शिवगर्जना (महानाट्य : लेखक व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत) (2012)
    15) शिवरायांचे आठवावे रूप’ (महानाट्य- लेखक ऋषिकेश परांजपे).
    16) शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (नाटक : लेखक राजकुमार तांगडे) (2013)
    17) शिवाजीच्या जीवनावरील निमेशनपट (हिंदी आणि मराठी) - अझहर खान यांच्या ’अमन अनम फिल्म प्रॉडक्शन’ची निर्मिती (ऑगस्ट 2013)

    • शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भालजी पेंढारकर यांनी राजा शिवाजी हा चित्रपट दिग्दर्शित केला यात शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका चंद्रकांत मांढरे यांनी केली होती
    • शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषेत प्रकाशित झाल्या आहेत. 
    • 24 नोव्हेंबर 2008 पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नितीन देसाई यांनी दिग्दर्शित केलेली राजा शिवछत्रपती ही मालिका दूरचित्रवाणीच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर चॅनेलवर दाखवली गेली.
    शिवाजी महाराजांविषयी पुस्तके
    1) असे होते शिवराय (सौरभ म. कर्डे)
    2) ईस्ट इंडिया कंपनी- Factory Records
    3) उद्योजक शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
    4) डच ईस्ट इंडिया कंपनी- Factory Records
    5) छत्रपती शिवाजी महाराज (लेखक - दि. वि. काळे)
    6) छत्रपती शिवाजी महाराज (नामदेवराव जाधव)
    7) छत्रपती शिवाजी महाराज : चरित्र आणि शिकवण (शिवप्रसाद मंत्री)
    8) झुंज नियतीशी (अनुवादक - इंद्रायणी चव्हाण, मूळ इंग्रजी -Challenging Destiny : Chhatrapati Shivaji - - Biography, लेखक - मेधा देशमुख-भास्करन)
    9) डाग रजिस्टर- डच पत्रव्यवहार
    10) पराक्रमापलीकडले शिवराय (प्रशांत लवटे)
    11) श्री भोसले कुलाचा वंशवृक्ष (इंद्रजित सावंत), (2017)
    12) मराठा-स्वराज्य संस्थापक श्री शिवाजी महाराज (1932); लेखक - चिंतामण विनायक वैद्य
    13) महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी (प्रा. डॉ. आनंद पाटील)
    14) छत्रपती शिवाजी महाराज’ प्रकाशन 1970 मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते   (पूर्वार्ध व उत्तरार्ध, पृष्ठसंख्या 1200) लेखक: वासुदेव सीताराम बेंद्रे.
    15) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी (बालवाङ्मय, श्रीकांत गोवंडे)
    16) श्री राजा शिवछत्रपती-खंड 1  2, (गजानन भास्कर मेहेंदळे)
    17) राजा शिवछत्रपती (लेखक - ब. मो.  पुरंदरे, 1965)
    18) शककर्ते शिवराय, खंद 1 आणि 2 (1982) लेखक - विजय देशमुख 
    19) शिवकालीन घोडदळ आणि युद्धनीती (डॉ. राम फाटक)
    20) शिवकालीन दंतकथा (सुरेंद्र साळोखे)
    21) शिवकालीन पत्रसार संग्रह खंड 1 व 2 : भारत इतिहास संशोधक मंडळ
    22) शिवकालीन स्त्रियांचे अधिकार (नीलिमा भावे)
    23) शिवछत्रपती समज-अपसमज (आनंद घोरपडे)
    24) शिव छत्रपतींचे चरित्र (रघुनाथ विनायक हेरवाडकर)
    25) शिवछत्रपतींच्या समाधीचा शोध व बोध (3री आवृत्ती) (इंद्रजित सावंत?)
    26) शिवाजी - दी ग्रेट गोरिला - आर. डी. पाल्सोकर 
    27) शिवाजी - (सर यदुनाथ सरकार)
    28) शिवाजी आणि रामदास (सुनील चिंचोळकर)
    29) शिवजयंती (नामदेवराव जाधव)
    30) शिवराय (भाग 1, 2, 3, नामदेवराव जाधव)
    31) शिवरायांची युद्धनीती (डॉ. सच्चिदानंद शेवडे)
    32) छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अष्टयोग (अंकशास्त्रावरील पुस्तक; लेखक - तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सतीश सुखदेव कदम)
    33) शिवाजीचे उर्दू भाषेतील संक्षिप्त चरित्र (लाला लजपत राय)
    34) शिवाजी व शिवकाल (सर यदुनाथ सरकार; मूळ इंग्रजी; मराठी अनुवाद वि. स. वाकसकर, 1930)
    35) शिवाजी द ग्रँड रिबेल (इंग्रजी, डेनिस किंकेड, 1930), नवी आवृत्ती - ‘द ग्रँड रिबेल : अ‍ॅन इम्प्रेशन ऑफ शिवाजी’ (2015)
    36) शिवाजी निबंधावली खंड 1 व 2
    37) शिवाजी-निबंधावली भाग 1 व 2 : या दोन खंडांत श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अप्रत्यक्षपणे प्रकाश पाडणारे व शिवकालीन परिस्थितीचे वर्णन करणारे अनेक लेख संग्रहित केले आहेत. पांडुरंग वामन काणे, शंकर दामोदर पेंडसे, गोविंद रामचंद्र राजोपाध्ये, रामकृष्ण परशुराम सबनीस, यशवंत खुशाल देशपांडे, वासुदेव आत्माराम देशप्रभू, जनार्दन सखाराम करंदीकर, महामहोपाध्याय रायबहादूर गौरीशंकर ओझा, शंकर वामन दांडेकर, श्रीक्रुष्ण व्यंकटेश पुणतांबेकर, भास्कर वामन भट, शिवराम काशीनाथ ओक, सुरेन्द्रनाथ सेन, पंडित वैद्यनाथन शास्त्री तसेच डळी उहरीश्रशी चरश्रशीं अशा अनेक थोर इतिहास अभ्यासकांचे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या संबंधित विविध विषयांवरील लेखही या ग्रंथात आहेत.
    38) शिवाजीची कर्नाटक मोहीम (एम.एस. नरवणे)
    39) शिवाजी जीवन आणि काळ (गजानन भास्कर मेहेंदळे)
    40) डहर्ळींरक्षळ चरहरीरक्ष (नामदेवराव जाधव)
    41) शिवाजी महाराज  एम.बी.ए. (नामदेवराव जाधव)
    42) डहर्ळींरक्षळ चरहरीरक्ष ींहश सीशरींशीीं (हेमंतराजे गायकवाड)
    43) शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरू (नामदेवराव जाधव, मराठी, हिंदी, इंग्रजी) + (व्याख्यानाची सीडी)
    44) शिवाजी महाराजांचा पुरुषार्थ (श्रीपाद दामोदर सातवळेकर)
    45) शिवाजी महाराजांची डायरी (नामदेवराव जाधव)
    46) शिवाजी महाराजांची पत्रे (नामदेवराव जाधव)
    47) शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (नामदेवराव जाधव)
    48) क्षत्रियकुलावतंस छत्रपति श्रीशिवाजी महाराज ह्यांचे चरित्र (लेखक - कृष्णराव अर्जुन केळूसकर). हे शिवाजीचे मराठीतले 1906 साली लिहिलेले पहिले चरित्र.

    शिवजयंती 
    1) 2001 सालापासून 19 फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. सरकारी शिवजयंती तारखेनुसार असते.  
    •• शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551ला झाला असं मानलं जातं. महाराष्ट्र सरकारने 2000 साली विधिमंडळात तसा ठराव मांडून शासकीय कार्यक्रमांसाठी ही तारीख मंजूर करून घेतली. पण, राज्यात अजूनही एक गट असा आहे जो शिवाजी महाराजांची जन्मतारीख 6 एप्रिल 1627 म्हणजे वैशाख वद्य द्वितीया शके 1549 असल्याचं मानतो.
    2) भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले. ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते. 
    3) तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या सार्‍यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.  
    4) ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख 19 फेब्रुवारी अशी निश्रि्चत केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर 1752 साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात 1700 सालपर्यंत 10 दिवसांचा तर 1700 सालापासून पुढे 11 दिवसांचा फरक येतो. त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित 19 फेब्रुवारी ही तारीख 10 - 11 दिवसांनी चुकते. (4 ऑक्टोबर 1582 ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन 15 ऑक्टोबर 1582 येतो). 
    5) शिवाजीचा जन्म 1627 साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल 1630 नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर 1630 सालची फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारीला आली असती. म्हणून, 2001 सालापासून 19 फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते. 
    • 1869 मध्ये महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करून त्यांचा पोवाडा लिहिला. 
    •• लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात शिवाजीच्या जयंतीनिमित्त ’शिवजयंती’ या सार्वजनिक उत्सवाची सुरुवात केली.
    6) 1970 साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे  दंगल झाली.  त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला 14 वर्षांची बंदी घातली गेली. 1984 साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. 

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे?
    •• 19 फेब्रुवारी 1630 या तारखेच्या म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीच्या ऐवजी पूर्वी छ. शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627.
    •• त्यामुळे जेथे शके 1549 येते तेथे इसवी सन 1627 आणि शके 1551 येते तेथे इसवी सन 1630 साल स्मरणात ठेवावे. शालीवाहन शक आणि इसवी सन यांच्यामध्ये 78 वर्षांचा फरक आहे.

    लोकमान्य टिळकांचे योगदान -
    •• छ. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत सुरुवातीच्या काळात प्रयत्न करणार्‍यांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे आणि वि. का. राजवाडे यांचे नाव आधी घेतले जाते.
    •• टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. 14 एप्रिल 1900 च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता. शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबाबत निश्रि्चत माहिती उपलब्ध होत नसल्याबद्दल त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली होती. बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते. डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी ’इळीींह ऊरींश ेष डहर्ळींरक्षळ’ नावाने लिहिलेल्या पुस्तकात हे नमूद केले आहे. आपटे आणि परांजपे यांचे पुस्तक ’द महाराष्ट्रा पब्लिशिंग हाऊस लिमिटेडटने 1927 साली प्रकाशित केले होते.

    लोकमान्य टिळकांनी काही मुद्द्यांचा विचार तेथे केला होता, ते लिहितात -
    1) कवी भूषण यांनी ’शिवभूषण’ या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.
    2) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे 15 वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही. केवळ एके ठिकाणी वयाचा उल्लेख येतो ते म्हणजे जिजाबाई शहाजी महाराजांना भेटायला बंगळुरूला गेल्या तेव्हा शिवाजी महाराज 12 वर्षांचे होते.
    3) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते. मात्र गणिती आकडेमोड करुन पाहिल्यास गुरुवारच्या ऐवजी शनिवार येतो. चिटणीस बखर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 130 वर्षांनी लिहिण्यात आली आहे.
    4) रायरी बखर प्रा. फॉरेस्ट यांनी लिहिली होती. त्यामध्ये एके ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्माचे शक 1548 आणि एके ठिकाणी 1549 लिहिले आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू शके 1602 म्हणजे 1680 साली झाला असे लिहिले आहे. मात्र या बखरीत केवळ वर्षांचा उल्लेख आहे. जन्मतारखेचा नाही.
    5) धार येथील ’काव्येतिहास संग्रहा’मध्ये तिथी वैशाख शुद्ध पंचमी, शके 1549 आणि सोमवार हा जन्मवार दिला आहे. मात्र यामध्ये नक्षत्र चुकीचे देण्यात आले आहे.
    6) बडोदा येथे छापून प्रकाशित झालेल्या ’शिवदिग्विजय’ ग्रंथामध्ये शके 1549, प्रभव संवत्सर, वैशाखद्वीतिया, गुरुवार, रोहिणी नक्षत्र अशी माहिती दिली आहे. व जन्मवार गुरुवार दिला आहे. चिटणीस बखरीप्रमाणे यातही गोंधळ दिसतो.
    7) बडोदा येथे प्रकाशित झालेल्या ’श्रीशिवप्रताप’ ग्रंथात शके 1549चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे. मात्र रक्ताक्षी हे नाव हे शके 1546 चे होते. शके 1549चे नव्हे.
    8) संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारिख दिलेली नाही.
    9) ’काव्येतिहास संग्रह’ या नियतकालिकाने छापलेल्या ’मराठी साम्राज्याची छोटी बखर’ या लेखात शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके 1549, क्षय, वैशाख शुद्ध पंचमी, सोमवार असा उल्लेख आहे. इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकले आहे. 
    10) भारतवर्ष या नियतकालिकाने ’एक्याण्णव कलमी बखर’ प्रकाशित केली. त्यात शिवाजी महाराजांची जन्मतिथी 15 व्या परिच्छेदात दिली आहे. ती शके 1559, क्षय, वैशाख, शुद्ध पंचमी अशी दिली आहे. येथे 1549 ऐवजी 1559 शक पडले आहे.
    11) भारतवर्षाने ’पंत प्रतिनिधींची बखर’ही प्रसिद्ध केली. त्यात 1549, वैशाख पौर्णिमा, सोमवार असा उल्लेख आहे. 

    जेधे शकावलीमुळे बदलली अभ्यासाची दिशा -
    •• सुरुवातीच्या काळात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार शिवाजी महाराजांचा जन्म शके 1549 (1627) मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे गृहित धरण्यात आले. मात्र 1916 साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली.
    •• या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी फाल्गुन वद्य तृतिया 1551 ( शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630) असल्याचे घोषित केले.

    जेधे शकावली काय आहे?
    1) जेधे शकावली हा एक 23 पानांचा दस्तऐवज आहे. यातील पानांच्या दोन्ही बाजूंना मजकूर लिहिलेला आहे. जेधे शकावलीमध्ये शके 1549 ते शके 1619 म्हणजेच इसवी सन 1618 ते 1697 या कालावधीतील सर्व महत्त्वाच्या घटनांच्या तारखा लिहून ठेवल्या आहेत.
    2) भोर संस्थानातील एका गावाचे देशमुख दयाजीराव सर्जेराव उर्फ दाजीसाहेब जेधे यांनी ही शकावली टिळकांकडे सोपवली होती. जेधे शकावलीचा अभ्यास अनेक इतिहास अभ्यासकांनी केला आणि त्यातील बहुतांश नोंदी सुयोग्य असल्याचा निर्वाळा दिला.
    3) या शकावली शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 19 वर्षांपर्यंतच्या नोंदी आहेत आणि त्याच्या लेखकास अस्सल कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध होत असावीत असे दिसते.
    4) सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापार्‍यांनी केलेली नोंद जुळते.
    5) जयसिंहाशी केलेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळली आहे.
    6) जेधे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके 1540 दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे.
    7) नौशेरखानाबरोबर झालेली लढाई शके 1579 मध्ये ज्येष्ठ महिन्यात झाली. ही नोंदही बरोबर आहे.
    8) शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथीही योग्य आहे.

    1627 की 1630 -
    •• शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की 1627 ची की 1630ची मान्य करावी हा प्रश्न उरतो. आपटे आणि परांजपे यांनी 1627 म्हणजे 1549 शक नसावे हे सांगण्यासाठी काही काही नोंदी दिल्या आहेत.
    1) कवी परमानंद- ’शिवभारत’ लिहिणार्‍या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1662 पर्यंतच्या घडामोडी दिल्या आहेत. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 अशी तिथी दिली आहे. जेधे शकावलीशी ही नोंद जुळते.
    2) राज्याभिषेक शकावली- शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती. त्यातही फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 ही तारीख आहे. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे.
    3) फोर्ब्स दस्तऐवज- गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए. के. फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके 1551 अशी नोंद आहे.
    4) जेधे शकावली - या शकावलीत स्पष्टपणे 1551 या वर्षाचा उल्लेख आहे.
    5) दास-पंचायतन शकावली - या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551मध्ये झाला अशी नोंद आहे.
    6) ओर्नेसच्या नोंदी - या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला अशी नोंद आहे.
    7) स्प्रेंजेल - या 1791 साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला असे लिहिण्यात आले आहे.
    8) तंजावरचा शिलालेख - तंजावरमध्ये 1803 साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 साली झाल्याची नोंद आहे. मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे.

    जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका -
    1) शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि नंतर सर्व उलगडा झाला. या दस्तऐवजात शिवाजी महाराजांची कुंडली आहे.
    2) त्यात मारवाडी भाषेत नोंद केली आहे - ॥संवत 1686 फागूण वदि 3 शुक्रे उ. घटी 30।9 राजा शिवाजी जन्मः ॥ संवत 1686 फाल्गुन वद्य 3 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (सन 1630).
    3) संवत कालगणना सध्या वापरत असलेल्या इसवी सनाच्या आधी 56 वर्षे सुरु होते त्यामुळे प्रत्येक वर्षातून 56 वर्षे वजा केली इसवी सन समजून घेता येते.

    1966 साली राज्य सरकारने स्थापन केलेली समिती -
    1) शिवजयंती कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.
    3) समितीच्या पहिल्या बैठकीला आ. ग. पवार काही कारणांनी उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत महामोपाध्याय द. वा. पोतदार, ग. ह. खरे, वा. सी बेंद्रे. ब. मो. पुरंदरे. मोरेश्वर दीक्षित यांचे फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 (19 फेब्रुवारी 1630) या तारखेवर एकमत झाले. मात्र न. र. फाटक यांनी मात्र वैशाख शुद्ध द्वीतिया शके 1549 (6 एप्रिल 1927) ही तारीख योग्य वाटते असे मत दिले.
    4) सर्व सदस्यांनी त्यानंतर आपापली निवेदनेही समितीसमोर सादर केली. न. र. फाटक यांच्या तारखेचे खंडन करणारी निवेदनेही सादर करण्यात आली.
    1) दुसर्‍या बैठकीसाठी आ. ग. पवार उपस्थित राहिले. शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीचा निर्णायक पुरावा नसल्यामुळे जुनी तारीख कायम ठेवावी असं मत त्यांनी मांडलं. या बैठकीत एकमत न झाल्यामुळे जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडे सोपवण्यात आला. शेवटी ठाम पुरावा उपलब्ध होईपर्यंत किंवा इतिहासतज्ज्ञांत एकवाक्यता येईपर्यंत समारंभाच्या सोईसाठी जुनीच तिथी म्हणजे वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 (इसवी सन 1627) ही चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय शासनाने समिती सदस्यांना कळवला.

    गजानन भास्कर मेहेंदळे यांचे लेखन -
    1) गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेल्या ’श्री राजाशिवछत्रपती’ या ग्रंथाच्या सोळाव्या परिशिष्टामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मासंदर्भात उहापोह करण्यात आला आहे. त्यात त्यांनी पुढील सर्व स्रोतांचा विचार केला आहे- एक्याण्णव कलमी बखर, चिटणीस बखर, पंतप्रतिनिधींची बखर, सातारच्या छत्रपतींची वंशावलीबद्ध यादी, शिवदिग्विजय बखर, नागपूरकर भोसल्यांची बखर, शेडगावकर बखर, प्रभानवल्ली शकावली, धडफळे यादी, न्या. पंडितराव यांची बखर, शिवाजीप्रताप बखर, जेधे शकावली, राज्याभिषेक शकावली, फोर्ब्स शकावली, शिवभारत, तंजावर शिलालेख, घोडेगावकर शकावली, चित्रे शकावली, कोस्मी द ग्वार्दचा उल्लेख, रॉबर्ट आर्मचा उल्लेख, स्प्रेंजेलमधील उल्लेख 
    1) 1996 साली तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांची भारत इतिहास संशोधन मंडळाचे वि. द. सरलष्कर, भारतीय इतिहास संकलन समितीचे महाराष्ट्र कार्यवाह चिं. ना. परचुरे आणि इतिहास अभ्यासक निनाद बेडेकर यांनी भेट घेतली. फाल्गुन वद्य 3 1551 ही तिथी स्विकारण्यासाठी सरकारने नवी समिती स्थापन करण्याची विनंती त्यांनी नवलकर यांच्याकडे केली.
    2) त्यावर एकदा समिती स्थापन झाली आहे. आता फाल्गुन वद्य 3 या या दिवशी सरकारने जन्मतिथीचा उत्सव साजरा करायचे ठरवले आहे. याबाबत ज्यांना आपले म्हणणे सरकारकडे सादर करायचे आहे त्यांनी एका महिन्यात सादर करावे. त्याबाबत सरकारी निवेदन वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होईल आणि सरकार निर्णय घेईल असे प्रमोद नवलकर यांनी सांगितले. त्यावर दहा अभ्यासकांनी आपली मते कळवली आणि त्या सर्वांनी फाल्गुन वद्य तृतिया 1551 ला अनुकूल मत दिले होते. 

    शिवजयंती साजरी करण्यात टिळक, फुले यांचं योगदान -
    •• शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी व्हावी जेणेकरून समाजात शिवाजी महाराजांच्या बद्दल जागृती होईल आणि लोकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळेल, लोक एकत्र येतील असे प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळात दोन नेत्यांनी केले, ज्योतिबा फुले आणि लोकमान्य टिळक.
    •• 1869 मध्ये ज्योतिबा फुले यांना रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लागला आणि त्यांनी महाराजांच्या आयुष्यावर एक मोठा पोवाडा लिहिला, असा उल्लेख इतिहासात आहे. 
    •• 1870 मध्ये पुण्यात त्यांनी पहिला शिवजयंती उत्सव साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही पुढच्या काळात दोनदा या शिवजयंती कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे.
    •• 14 एप्रिल 1900 रोजी लोकमान्य टिळक यांनी केसरी या आपल्या दैनिकात लिहिलेल्या लेखात शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेबद्दल मोठा उहापोह केला आहे. त्यांच्या बरोबरीने इतिहासकार वि. का. राजवाडे यांनीही शिवाजी महाराजांची जन्मतारीख शोधण्यासाठी प्रयत्न केले. लोकमान्य टिळकांचा या तारखेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास डी व्ही आपटे आणि एम आर परांजपे यांनी लिहिलेलं ’बर्थडेट ऑफ शिवाजी’ या पुस्तकात पाहायला मिळतो. हे पुस्तक 1927 मध्ये प्रसिद्ध झालं आहे.
    •• तेव्हाच्या उपलब्ध काही बखरींचा आसरा घेऊन यात प्रमुख्याने मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीचा उल्लेख करता येईल. ही बखर शिवाजी महाराज मरण पावल्यावर 130 वर्षांनी लिहिली. आणि यात शिवाजी महाराजांचा जन्म 6 एप्रिल 1627 ला झाला असा उल्लेख आहे. अशा काही बखरी गृहित धरून तेव्हाच्या काळात 6 एप्रिल हीच शिवजयंतीची तारीख मानली जात होती. आणि जन्मसाल होतं 1627. लोकमान्य टिळकांनी अनेकदा शिवजयंतीची निश्रि्चत तारीख उपलब्ध नाही यावरून निराशा व्यक्त केली आहे.
    •• 1916मध्ये भोर संस्थानचे देशमुख दाजीसाहेब जेधे यांनी त्यांच्या कुटुंबाकडे असलेली जेधे शकावली लोकमान्य टिळकांच्या हवाली केली. यात 23 महत्त्वाची कागदपत्रं आहेत. यात शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630ला झाल्याचा उल्लेख आहे.
    •• या जेधे शकावलीच्या इतरही काही नोंदी जसं की, शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तो दिवस, मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी केलेला तह या तारखा इंग्रजांकडे असलेल्या नोंदींशी जुळतात. त्यामुळे ही शकावली पुढे इतिहासकारांनी उचलून धरली. 
    •• जोधपूर संस्थानात शिवाजी महाराजांची कुंडली सापडली तीही जन्मसाल 1630 असल्याचं सुचवत होती. त्यामुळे पुढे लोकमान्य टिळकांनीही 19 फेब्रुवारी 1630 हीच खरी तारीख असल्याचा निर्वाळा दिला.

    अखेर तारीख निश्रि्चत कशी केली?
    •• शिवजयंतीच्या दोन तारखा आणि तिथी यांचा घोळ सोडवण्यासाठी पहिल्यांदा 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहासकारांची एक समिती नेमली. कारण त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी होती. या समितीमध्ये महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, न. र. फाटक, आ. ग. पवार, ग. ह. खरे, वा. सी. बेंद्रे, ब. मो. पुरंदरे, मोरेश्वर दीक्षित यांचा समावेश होता.
    •• समितीच्या सदस्यांची तारखेवर एकवाक्यता झाली नाही. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आपापली निवेदनं समितीसमोर ठेवली आणि अखेर सरकारला निर्णय घ्यायला सुचवलं. त्यामुळे सरकारने जोपर्यंत इतिहासकारांमध्ये एकमत होत नाही, तोपर्यंत जुनीच तारीख कायम ठेवण्याचा निर्वाळा दिला.
    •• 2000 साली आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधिमंडळात उपलब्ध पुरावे आणि 1966च्या समितीचा अहवाल मांडून 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्म दिवस असल्याचा प्रस्ताव मांडला, तो सभागृहाने मान्य केला. आणि अशापद्धतीने शिवजयंतीचा शासकीय दिवस ठरला 19 फेब्रुवारी.
    •• शिवाजी महाराजांवर स्मृतिग्रंथ लिहिणारे इतिहासकार जयसिंगवार पवार यांच्या मते, समकालीन ऐतिहासिक पुरावे पाहता शिवाजीमहाराजांचे जन्मसाल 1630 असावे असेच दिसते. 

    छत्रपती शिवाजी महाराज - रयतेचे राजा 
    रयतेवर जीवापाड प्रेम -
    •• शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणार्‍या धारकर्‍यांना ‘मानकरी’, भाला फेकणार्‍या निष्णात सैनिकाचा ‘भालेराव’ अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होवून चढाई करणार्‍या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे.

    निर्भिडपणा आणि जिद्द -
    •• आपल्यापेक्षा प्रबळ शत्रुला शिवाजी महाराज कधीही घाबरले नाही. भय हा शब्द महाराजांच्या ध्यानी-मनीही नव्हता. महाराजांची कार्यपद्धती नेमकी असायची. एखादी मोहीम आखल्यानंतर गड उतार झाल्यापासून ते पुन्हा गडावर येईपर्यंत कशी कामे करायची, याचे व्यवस्थापन चोख असायचे. नियोजन करणे, माहिती गोळा करणे, जबाबदार्‍या निश्रि्चत करणे, यामुळे शिवाजी महाराजांना मोठे यश मिळाले. जिद्दीने, चातुर्याने आणि बुद्धी वापरून शिवाजी महाराजांनी समस्यांवर मात करत प्रचंड यश संपादन केले आणि स्वराज्याची स्थापना केली.

    दूरदृष्टी -
    •• महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय काय केले जाऊ शकते, याचा विचार त्यांच्याकडे होता. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करायचे. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना हजारदा विचार करावा लागे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यामुळे इतक्या उंचावर इतके अभेद्य किल्ले बांधता आले. शत्रूचा धोका जसा जमिनीवर आहे तसाच तो पाण्याच्या बाजूनेही असू शकतो, या दूरदृष्टीतून त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने मिरवत आहे.

    गनिमी कावा -
    •• गनिमी कावा हे शिवाजी महाराजांचे प्रमुख हत्यार होते. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडाव केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले आणि जिंकले. हिंदवी स्वराज्यात शिवाजी महाराजांकडे 400 गड-किल्ले होते, असे सांगितले जाते.

    व्यवस्थापन -
    •• स्वराज्य मिळाल्यानंतरही महाराजांचे विविध खात्यांचे नियोजन करणारे अष्टप्रधान मंडळ हे व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते. काही गड त्यांनी स्वतः बांधले, तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक एक गड-किल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते.

    न्याय आणि सर्वधर्मसमभाव  -
    •• हिंदू असूनही शिवाजी महाराजांनी मुस्लिमांशी कधीही दुजाभाव केला नाही. आपली लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून, त्यांच्या साम्राज्याशी आहे, असे शिवाजी महाराज नेहमी आपल्या सहकार्‍यांना सांगत. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणार्‍यांना व त्रास देणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद केली होती. 
    •• महिलांना त्रास देणार्‍यांना शिवाजी महाराजांनी कडक शासन केल्याची अनेक उदाहरणे देता येतील. शिवाजी महाराजांच्या दरबारात सुनावणीसाठी आलेले प्रकरण तातडीने, समोरासमोर तडीस नेले जायचे.

    शिवछत्रपतींची प्रेरणा - बुंदेलखंड, आसामात स्वातंत्र्याचा लढा
            युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळे हाताशी धरले आणि त्यांच्यात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतविले. तीन शाह्यांशी टक्कर देऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अठरापगड जातीतून त्यांनी महायोद्धे निर्माण केले. शालिवाहन राजाने मातीच्या शिपायातून सैन्य उभे केले, अशी दंतकथा आहे. शिवरायांनी ही कथा वास्तवात आणली. शिवरायांनी दिलेले हे बाळकडू मराठ्यांच्या अनेक पिढ्यांनी जोपासले आणि औरंगजेबासारख्या अतिबलाढ्य बादशहाला खडे चारले. 
    •• बुंदेलखंडात छत्रसाल याने शिवरायांपासून घेतलेल्या प्रेरणेतून स्वतंत्र राज्य निर्माण केले; तर आसामात लचित बडफुकन याने याच प्रेरणेतून मोगलांचे जोखड झुगारून दिले. हे लढे 1671 सालचे. 2021 मध्ये बुंदेलखंड आणि आसामात झालेल्या या स्वातंत्र्यलढ्यांना 350 वर्षे पूर्ण झाली. शिवरायांची हीच प्रेरणा पुढे जाटांनी घेतली, शिखांनी घेतली. मोगलांची राजवट झुगारून दिली. शिवरायांच्या याच प्रेरणेतून मराठे सरदारांनी हिंदुस्थान गाजवला. मराठ्यांना रोखण्यासाठी बंगालमध्ये कोलकात्याला इंग्रजांना ‘मराठा डिच’ नावाचा 5 किलोमीटरचा खंदक खोदावा लागला. अटकेपार मराठी तलवारी तळपल्या. 
    •• छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा श्रीगणेशा केला, तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंबहुना त्यांचा घात करण्यासाठी आदिलशाहीने अफझलखानास पाठवले. शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांचा कनकगिरीच्या वेढ्यात याच अफझलखानाने कपटाने मृत्यू घडविला होता. या अफझलखानाला शिवरायांनी भेटीवेळी यमसदनास धाडले. अफझलखानासारख्या बलाढ्य सरदाराचा वध आणि त्याच्या प्रचंड सैन्याचा संपूर्ण पाडाव झाला. आदिलशाहीला हा जबर धक्का बसलाच; पण इंग्रज, पोर्तुगीज, डच आदी परकीयांनीही या घटनेची दखल घेतली. महाराष्ट्रासह देशभर अफझलखानाच्या वधाचे पडसाद उमटले.
    •• अफझलखानापाठोपाठ शिवरायांनी शाहिस्तेखानावर केलेल्या हल्ल्याचे, त्याची बोटे तोडण्याचे वृत्त हिंदुस्थानात वार्यासारखे पसरले. खानाची छावणी 1 लाखांची. एवढ्या मोठ्या लष्करातून आत घुसून शिवरायांनी औरंगजेबाचा मामा असलेल्या शाहिस्तेखानाची बोटे तोडून मोगल बादशाहीचे नाक कापले. मोगलांसह आदिलशाही, कुतुबशाही, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांनी या घटनेची दखल घेतली.
    •• महाराजांनी आपल्या मुलखापासून दूर असलेल्या सुरतेवर अचानक छापा घातला. सुरत लुटली. त्याचा गाजावाजा झाला. सुरत हे मोगल राजवटीचे नाक. शिवरायांनी मोगलांना आव्हान दिल्याने त्यांच्याविषयी सामान्य जनतेत कौतुक आणि आदराची भावना निर्माण झाली.
    •• या सर्वांवर कळस चढवला, तो आग्य्राहून सुटकेच्या चित्तथरारक प्रसंगाने आणि भर दरबारात शिवरायांनी  औरंगजेबाचा केलेल्या अवमानाने! दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आले. तेव्हा त्यांना त्यांच्या मानाप्रमाणे जागा मिळाली नाही. महाराजांचा संताप झाला. दरबारात खड्या आवाजात बोलणे म्हणजे बेअदबी; पण महाराजांनी क्रोधाने जणू गर्जनाच केली. खिलत नको, सन्मान नको, असे खडसावून महाराजांनी बादशहाकडे सरळ पाठच फिरवली. बादशहाला पाठ न दाखवता मागे जायचे, हा दरबारी रिवाज. तो महाराजांनी पायदळी तुडवला. मिर्झा राजा जयसिंग पुत्र रामसिंहाने त्यांना कसेबसे आपल्या हवेलीत आणले. शिवरायांच्या या स्वाभिमानी वर्तनाने सारा दरबार थक्क झाला. आग्य्रात खळबळ उडाली. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल या परदेशांतही शिवरायांचे नाव पोहोचले.
    •• या घटनेनंतर औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराज आणि संभाजीराजे यांचे प्राण धोक्यात आले. अशावेळी शिवरायांनी अतिशय धीरोदात्तपणे, धीरगंभीरपणे परिस्थितीला तोंड दिले. फुलादखानासारख्या कडव्या अंमलदाराच्या कडेकोट मगरमिठीतून सुटणे अशक्यप्राय होते; पण महाराजांनी मोठ्या हिकमतीने आणि युक्तीने या नजरकैदेतून संभाजीराजांसह सहीसलामत सुटका करून घेतली. ते मिठाईच्या पेटार्यातून निसटले, पेटारे नेणार्या हेलकर्यांच्या वेशातून बाहेर पडले की, धार्मिक कार्यासाठी आलेल्या साधू-महंतांच्या मेळ्यातून निघून गेले, याविषयी इतिहास मूक आहे. काहीही असले, तरी औरंगजेबाच्या नाकावर टिच्चून त्याच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.
    •• शिवरायांच्या या अभूतपूर्व धाडसी कृत्याने मोगली सल्तनतीला जबरदस्त धक्का बसला. औरंगजेबाचा तिळपापड उडाला. या प्रकरणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याभोवती दैवी पुरुषाचे तेजोवलय निर्माण झाले. परकालदास राजस्थानी पत्रातून, इंग्रज, पोर्तुगीज, डचांच्या पत्रातून देश-परदेशात शिवरायांचे नाव दुमदुमले.
    •• शिवरायांच्या या अशा एकापेक्षा एक साहसी आणि ज्वलज्जहाल स्वातंत्र्यनिष्ठ पराक्रमांनी तत्कालीन हिंदुस्थानी समाजात शिवराय आपले तारणहार ही भावना द़ृढ झाली. मोगली, मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जुलमी जोखडापासून सुटका करून घ्यावयाची, तर त्यासाठी शिवरायांच्या स्वातंत्र्याचा मंत्र जपला पाहिजे. याचा साक्षात्कार जनतेला झाला. 

    छत्रसाल बुंदेला -
    •• शिवरायांच्या प्रेरणेने बुंदेलखंडचे स्वतंत्र राज्य निर्माण करणारा छत्रसाल बुंदेला हा चंपतराय बुंदेला याचा चौथा पुत्र. त्याचा जन्म 1649 चा. या चंपतरायाची विश्वासघाताने हत्या झाली. तेव्हा तो 12-13 वर्षांचा होता. औरंगजेबाने शिवरायांवर मिर्झा राजा जयसिंग याला पाठवले. त्याच्या सैन्यात छत्रसाल होता. विजापूरवरील स्वारीत, देवगडच्या (छिंदवाडा) लढाईत त्याची चमक दिसून आली. तथापि, मोगली कारभाराला छत्रसाल विटला होता. छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कार्य त्याच्या समोर होते. पुरंदर स्वारीवेळी त्याने शिवरायांची भेट घेतली. आपल्याला सेवेत घ्यावे, म्हणून त्याने विनंती केली. तथापि, शिवरायांनी त्याला बुंदेलखंडात जाऊन तिथे मोगली सत्तेविरोधात बंड पुकारण्याची प्रेरणा दिली. छत्रसालाने शिवरायांचा उपदेश शिरोधार्थ मानला.
    •• बुंदेलखंडातील त्याचे भाऊ, आप्तस्वकीय सारे मोगलांच्या चाकरीत होते. दतिया नरेश शुभकर्ण यासह अनेक जहागीरदार मोगलांचे ताबेदार होते. अशा बिकट परिस्थितीत छत्रसालने प्रारंभी छोटे सैन्य उभे केले. लहान-लहान जहागिरी कब्जात घेतल्या. 
    •• 1669 साली औरंगजेबाने जिझिया कर लादला आणि हिंदूंची मंदिरे पाडण्याचा सपाटाच लावला. त्या विरोधात छत्रसालने आवाज उठवला. सर्वसामान्य लोक त्याच्या पाठीशी उभे राहिले. तेव्हा औरंगजेबाची नजर त्याच्याकडे वळली.
    •• औरंगजेबाने 30 हजार सैन्यांनिशी रणदुल्लाह खान याला छत्रसालवर पाठवले. छत्रसालने गनिमी काव्याने त्याची ससेहोलपट केली. तहव्वूरखान, अन्वर खान, बहलोदखान, हमीद, मुराद खान, सय्यद अफगाणी अशा अनेक मोगली सरदारांना त्याने पाणी पाजले. इटावा, गढाकोटा, रामगढ, धामौनी, शाहगढ यासह कलिंजरचा किल्ला जिंकला. 
    •• 1671 सालात त्याने बुंदेलखंडचे स्वातंत्र्य जाहीर केले. बुंदेलखंडावर त्याने आपले संपूर्ण वर्चस्व निर्माण केले. बुंदेलखंड केसरी म्हणून त्याचा लौकिक झाला. अखेर मोगली सत्तेला त्याच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यावी लागली.
    •• 1729 मध्ये प्रयागचा मोगली सुभेदार महम्मद बंगश याने बुंदेलखंडवर स्वारी केली, तेव्हा छत्रसालने बाजीराव पेशवा यास मदतीची हाक दिली. बाजीरावाने तातडीने येऊन बंगशचा पराभव केला. छत्रसालाची संकटातून सुटका केली. छत्रसालने बाजीरावाला आपला तिसरा मुलगा मानले. त्याला आपल्या राज्याचा तिसरा हिस्सा बहाल केला. पन्ना येथील हिर्याच्या खाणीतील वाटा दिला. शिवरायांच्या प्रेरणेतून छत्रसालाने बुंदेलखंड स्वतंत्र केला. संकट आले, तेव्हा छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशाने बाजीराव  पेशवे याने त्याचे रक्षण केले. त्यातून मराठ्यांना उत्तर हिंदुस्थानात विस्ताराची संधी मिळाली.

    लचित बडफुकन -
    •• आसामात तेराव्या शतकापासून अहोम राजवंशाची राजवट होती. सतराव्या शतकात आसामला मोगलांचे ग्रहण लागले. बलाढ्य मोगलांचा ज्याने आपल्या रणकौशल्याने पाडाव केला, स्वातंत्र्य परत मिळवले, तो वीर म्हणजे लचित बडफुकन. बडफुकन म्हणजे सेनापती. लचित हा अहोम राजाचा सेनापती होता. त्याचा जन्म 1622 सालचा. औरंगजेबाने 1669 मध्ये हिंदूंविरोधात मोठी मोहीमच उघडली. जिझिया कर लादला. हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. जी काही थोडी हिंदू राज्ये होती, त्या राज्यांवर आक्रमण केले. गुवाहाटीचा इटाकुली हा महत्त्वाचा किल्ला मोगलांच्या ताब्यात होताच. आता सार्या आसामचा घास घ्यायचा औरंगजेबचा मनसुबा ठरला.
    •• मोगलांचे आज ना उद्या आक्रमण होणार, हे लक्षात घेऊन लचित बडफुकनने आधीच हालचाल केली. इटाकुली किल्ला कब्जात घ्यायची योजना ठरवली. एका काळोख्या रात्री लचितने आपले 10-15 शूर सैनिक निवडले. त्यांनी गुपचूप किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यातील तोफा निकामी केल्या आणि सकाळ होते न होते तोच, लचितने किल्ल्यावर धडक मारली. लचितच्या ताब्यात भक्कम किल्ला आला. त्याची पिछाडीची बाजू सुरक्षित झाली. लचितने आपले लष्कर सुसज्ज बनवले. आक्रमण आले, तर ते ब्रह्मपुत्रा नदीमार्गे येणार. त्याने छोट्या आणि चपळ युद्धनौका बनवल्या. आपल्या नौसैनिकांना खडतर प्रशिक्षण दिले. हेरांचे पक्के जाळे विणले. शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याने जय्यत तयारी केली.

    कुचराईबद्दल सख्ख्या मामाला प्राणदंड -
    •• साल 1671! मिर्झा राजा जयसिंग याचा पुत्र रामसिंह प्रचंड सैन्य घेऊन चालून आला. ब्रह्मपुत्रा नदीमार्गे मोठ्या प्रमाणावर आरमारी गलबते, तोफा अशा युद्ध साहित्यासह हे लष्कर ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात आले. एका बाजूला कामाख्या देवीचे मंदिर, दुसर्‍या बाजूला विष्णू मंदिर आणि तिसर्या बाजूला होता इटाकुली किल्ला. 
    •• मोगलांचे सैन्य येत आहे, याची खबर मिळताच लचितने तिसर्या बाजूला भक्कम तटबंदी उभारण्याचे ठरवले. आपला मामा मोमाई तामुली याच्यावर त्याने ही जिम्मेदारी सोपवली; पण मामाने चालढकल केली. लचित संतापला. त्याने कुचराईबद्दल मामाचे मुंडके उडवले. देशापेक्षा माझा मामा मोठा नाही, हे या बहाद्दराचे उद्गार. लचितने मग आपल्या देखरेखीखाली संरक्षक तटबंदी पूर्ण केली.

    सरायघाटची लढाई -
    •• रामसिंहाला अडवण्यासाठी लचितने नदीपात्रात नावांचे पूल उभे केले होते. या लढाईवेळी लचित खूप आजारी होता. तापाने फणफणलेला असतानाही लचित जातीने युद्ध नेतृत्व करीत होता. मोगलांची अवाढव्य लढाऊ गलबते आली; पण त्यांच्या मार्यात न सापडता लचितच्या बच्छारिना छोट्या नौकांनी या जहाजांना पद्धतशीर वेढा घालीत, एकेक जहाज बुडवण्याला प्रारंभ केला. अनेक गलबते फुटली. चार हजार मोगल सैनिक गारद झाले. भारतीय इतिहासात असे नदीतील जलयुद्ध क्वचितच झाले असेल. लचित बडफुकनने शिवरायांच्या प्रेरणेने मोगलांचा पराभव केला. आसामचे स्वातंत्र्य अबाधित राखले. पूर्वेकडे हातपाय पसरण्याचे औरंगजेबाचे स्वप्न भंगले.

    छत्रपती शिवरायांचे द्रष्टेपण -
    •• औरंगजेबाच्या काळात मोगल साम्राज्य अफगाणिस्तानापासून बंगालपर्यंत, काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत पसरले होते. शिवरायांच्या प्रेरणेतून बुंदेलखंड आणि आसामात उठाव झाले. शिवरायांच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेनेच मराठ्यांनी 27 वर्षे औरंगजेबाला झुंज दिली. त्याच्या अनेक बलाढ्य सरदारांचा पाडाव केला. शिवरायांनी दूरद़ृष्टीने दक्षिण भारतात जिंजीच्या बळकट किल्ल्यासह आपली ठाणी निर्माण केली. 
    •• स्वराज्यावरील संकटकाळी छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजीतून लढा देता आला. छत्रसालने बुंदेलखंडचे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्यामुळे मराठ्यांना उत्तर भारतात संचार करणे सुलभ झाले. शिवरायांच्या दूरद़ृष्टीमुळेच रणरागिणी ताराराणी आणि स्वराज्याचे सूाम्राज्य बनविणारे शंभूपुत्र शाहू महाराज व बाजीराव पेशवे तसेच शिंदे, होळकर, पवार, दाभाडे, गायकवाड, पिलाजी जाधवराव आदी सरदारांनी उत्तरेत धामधूम केली. बंगालपर्यंत मराठी बारगीरांचा धाक निर्माण झाला. अटकेपावेतो भीमथडी घोडी गेली. त्याचे सारे बीजारोपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्वलंत प्रेरणेतून आणि द्रष्टेपणातून झाले, ही वस्तुस्थिती आहे.

    लचितचे शिवरायांना पत्र -
    •• लचित बडफुकन हा शिवरायांच्या असामान्य पराक्रमाने भारावून गेला होता. त्याने शिवरायांना पत्र पाठवले होते, असे काही मान्यवर इतिहासकारांनी म्हटले आहे. त्याने पत्रात म्हटले आहे की, ‘आपण दक्षिणेकडून मोगलांवर चढाई करावी, मी पूर्वेकडून हल्ले करीन. मोगलांना नेस्तनाबूत करू.’ लचित बडफुकन याच्या मनातील शिवरायांविषयीच्या आदर भावना आणि त्याने घेतलेली प्रेरणा त्यातून स्पष्ट होते.

    किल्ले संवर्धन 
    •• परकीय यवनी व इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांच्या विरोधात स्वातंत्र्याचा हुंकार देऊन अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गड-किल्ल्यांची दुरवस्था
    •• श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले 236 पेक्षा अधिक किल्ले राज्यात आहेत. यापैकी 100 किल्ल्यांवर लोकांचा ‘राबता’ आहे. परिणामी, या 100 किल्ल्यांच्या माध्यमातून किमान 25 हजार कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्यातून या 100 किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित राखून इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. 
    •• राज्यातील उर्वरित 136 किल्ल्यांवर गडप्रेमी, पर्यटक, इतिहास अभ्यासक यांचा ‘राबता’ सुरू झाला, तर राज्यातील आणखी 34 हजार कुटुंबांचा चरितार्थ विनासायास सुरू होऊन या 136 ऐतिहासिक किल्ल्यांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपुढे जाऊ शकेल आणि अनाहूतपणे किल्ला जागता झाल्याने अपप्रकार थांबतील. पुरातत्त्व विभागाला उत्पन्नाचे साधन प्राप्त होईल आणि त्यातून किल्ला दुरुस्ती व देखभालीची योजना अंमलात आणता येऊ शकेल. 
    •• राज्यातील या 136 गड-किल्ले आजही उपेक्षित असून त्यांच्या डागडुजी-संवर्धनाद्वारे गड पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. यातून 25 हजारांहून अधिक कुटुंबांना थेट रोजगार मिळणार आहे.
    •• 1 किल्ला 250 कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन बनू शकतो. त्यातून 250 कुटुंबांना या किल्ल्याबाबत आदर निर्माण होईल. त्यांच्या माध्यमातून किल्ल्याची सुरक्षादेखील पाहिली जाईल.
    •• केंद्रीय पुरातत्त्व विभागास दरवर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची जी तरतूद होते, ती देशातील किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू यांच्या तुलनेत अत्यल्प असून ही आर्थिक तरतूद वाढविण्याकरिता आजवरच्या कोणत्याही केंद्र सरकारने विचार केलेला नसल्याने प्राचीन किल्ले विकासाची ठोस अशी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून तयार होऊ शकलेली नाही. 
    •• महाराष्ट्रात सेना-भाजपचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या विकासाची विशेष योजना तयार करून त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद होऊन खासदार संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली रायगड किल्ला संवर्धन प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. रायगडावरील उत्खननातून अनेक प्राचीन वस्तू सापडल्या. त्यातून तत्कालीन इतिहास उलगडला आहे. यापूर्वी राजगड, तोरणा किल्ल्यांवरही पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन योजना अमलात आणली गेली. परंतु, ती अमलात आणताना मूळ ढाचात बदल झाल्याची तक्रार दुर्ग अभ्यासकांची आहे.
    •• छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमधील 350 पेक्षा जास्त गड-किल्ल्यांची नोंद आहे. यापैकी अनेक किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या दुरुस्तीची कामे करून ते मजबूत करण्यात आले होते; मात्र शिवशाहीनंतर प्रथम मोगली आक्रमणांनी व त्यानंतर इंग्रजांनी हे मराठी पराक्रमाचे व कर्तृत्वाचे  मानबिंदू उद्ध्वस्त केले. 
    •• शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडावरून राज्यकारभार सुरू केला. दरम्यान, रायगड परिसरातील अनेक छोट्या गढी, किल्ल्यांना मजबूत करून राजधानीच्या परिसरात अनेक गड-किल्ल्यांचे जाळे विणले. यामध्ये दासगाव बंदरानजीक असणारा दौलतगड हा टेहळणी करण्याकरिता फार उपयुक्त मानला जात असे. सोनगडावर सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान इंग्रजांनी केलेल्या मदतीच्या विरोधात राजापूर येथील वखार जाळल्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोन इंग्रजांना काही वर्षांकरिता ठेवल्याची नोंद आहे.
    •• समर्थ रामदास स्वामींनी ‘दासबोध’ लेखनाकरिता निवडलेली शिवथरघळ महाड तालुक्यात आहे.
    •• गांधारपाले व कूल येथील बौद्धकालीन लेणी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे आहेत. गांधारपाले लेण्यांना जाण्याचा मार्ग या विभागाने केला. परंतु, कोल येथील लेण्यांजवळ कोणत्याही सुविधा नाहीत.
    •• डोंगरी किल्ल्यांप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सागरी दुर्गांची अत्यंत दुरवस्था झाली असून यामध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबागचा कुलाबा, खांदेरी, उंदेरी, कोर्लई, मुरुड तालुक्यांतील पद्मदुर्ग, जंजिरा आदी किल्ल्यांचा समावेश आहे. 
    •• 2016 साली  रायगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून किल्ले रायगडावर काम सुरू करण्यात आले; मात्र मराठी माणसांच्या स्वाभिमानाची ही स्थळे केवळ पर्यटनस्थळे न राहता ती  जाज्वल्य देशभक्ती निर्माण करणारी स्फूर्तिस्थाने ठरावीत याकरिता केंद्रीय पुरातत्त्व विभागाने काहीही केलेले नाही.  किल्ले संवर्धनाच्या कामात प्रामुख्याने तटबंदी, बुरूज उभारणी, दुरुस्ती ही कामे करून किल्ल्यांचे मूळ स्वरूप जपण्यासाठी प्रयत्न केला जातो. पुरातत्त्व विभागाने सुमारे 100 कोटींची कामे केली आहेत.
    •• राज्यातील किल्ले केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहेत; मात्र या विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात देखभाल होत नाही. त्यामुळे काही किल्ल्यांचा अपवाद वगळता अन्य किल्ल्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 
    •• कोकणातील 147 किल्ले.
    •• कोकणातील पूर्णगड या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने पूर्ण केले. बाणकोट, यशवंतगड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम पूर्ण झाले . खांदळी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम. यशवंतगडासाठी 5 कोटींचा निधी खर्च. 
    •• मागील काही वर्षांत गडप्रेमी, गिर्यारोहण संस्था व युवकांमध्ये झालेली मोठी वाढ पाहता प्रतिवर्षी लाखो लोक या गडांना आवर्जून भेट देतात. 
     
     

     

Share this story

Total Shares : 9 Total Views : 13304