नेताजी सुभाषचंद्र बोस

  • नेताजी सुभाषचंद्र बोस

    नेताजी सुभाषचंद्र बोस

    • 24 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 1311 Views
    • 0 Shares

    नेताजी सुभाषचंद्र बोस
     

            केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असून 2021 पासून तो साजरा करण्यात येत आहे. सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचा समारोह 2022 मध्ये होणार आहे.

    •• भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रेसर नेते सुभाषचंद्र बोस (23 जानेवारी 1897 ते 18 ऑगस्ट 1945) यांनी दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. त्यांनी दिलेला ’जय हिंद ’ चा नारा हा भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी ’तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा ’ असे आवाहन केले होते.

     

    •• सुभाषबाबूंनी दास्यमुक्तीसाठी आणि नंतरच्या प्रगतीसाठी अनेक योजना आखल्या. त्या कार्यवाहीत आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. प्रकृतीची पुरेशी साथ नसतानाही त्यांनी उपोषण-निदर्शनांपासून सशस्त्र युद्धापर्यंतचे सर्व मार्ग आचरणात आणले. त्यासाठी त्यांनी म. गांधीपासून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांपर्यंतच्या सर्व नेत्यांचे प्रसंगोपात्त सहकार्य स्वीकारले. त्यांचा स्वभाव दृढनिश्र्चयी व प्रसंगी कठोरही होत होता; तथापि त्यांचे वागणे मात्र सौजन्यशील व सौहार्दाचे असे. मूळात त्यांचा कल आध्यात्मिक साधनेकडे होता. दूरदृष्टी, जबरदस्त, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यांमुळे कोणत्याही प्रसंगी ते डगमगले नाहीत. आझाद हिंद सरकारच्या स्थापनेनंतर त्यांनी स्वीकारलेले राष्ट्रगीत हेच स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले. 

    शिक्षण व विद्यार्थी जीवन 
    •• 23 जानेवारी 1897 - सुभाषचंद्र बोस यांचा जन्म ओडिशा मधील कटक शहरात झाला.सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले.  आई प्रभावतीदेवींनी बालवयात त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत महत्त्वाचे आहेत. रॉवेंशा विद्यालयाचे मुख्याध्यापक बेनी माधवदास यांचाही त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. 
     
    • जानकीनाथ बोस हे कटक शहरातील नामवंत वकील होते. आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. कटक महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच बंगाल विधानसभेचे सदस्य ही होते. इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. 
    प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे कोलकात्त्यातील एक श्रीमंत घराणे होते. प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण 14 मुले होती. त्यात 6 मुली व 8 मुलगे होते. सुभाषचंद्र त्यांचे सहावे अपत्य व पाचवे पुत्र होते. 
    • आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते. 
     
    •• 1903- त्यांच्या वडिलांनी त्यांचे नांव कटकमधील एका प्रसिद्ध अशा प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये दाखल केले. पुढे सुभाषबाबू  कटक मध्ये रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल नामक शाळेत शिकले. ह्या शाळेत त्यांच्या एका शिक्षकाचे नाव वेणीमाधव दास होते. वेणीमाधव दास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत. त्यांनी सुभाषमधली सुप्त देशभक्ती जागृत केली. 
     
    •• सुभाषबाबूंवर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता. दोघांच्या अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी तेव्हा केले होते. मिशन शाळेत गोर्‍या व हिंदी विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारा भेदाभेद आणि विवेकानंदांचे लिखाण यांमुळे राष्ट्रप्रेम निर्माण झाले व पुढे गोर्‍यांच्या उद्दाम वर्तनाचे (उदा., प्रा. ओटन) प्रसंग अधिकाधिक घडले तसतसे ते वाढत गेले. 
     
    ••• महाविद्यालयात शिकत असताना, अन्यायाविरूद्ध लढण्याची त्यांची प्रवृत्ती झाली.  कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन हे भारतीय विद्यार्थ्यांशी उर्मटपणे वागत असत. प्रा. ओटन यांच्या व तशाच एका गोर्‍या प्राध्यापकाच्या उर्मट वर्तवणुकीने अपमानित झालेल्या प्रेसिडेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हरताळ पुकारला. त्याचे नेतृत्व स्वीकारणे सुभाषबाबूंना भाग पडले. पुढील आयुष्याचे वळण लागण्याची ही नांदी होती; पण या प्रकरणी त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. 
     
    •• 1912 - विवेकानंद-रामकृष्णांच्या ग्रंथांमुळे त्यांना अत्यंत उत्कट अशी धार्मिक ओढ वाटू लागली. वयाच्या पंधराव्या वर्षापासूनच ते कटक आणि नंतर कलकत्त्याला भेटणार्‍या साधू, बैरागी, योगी इत्यादींना प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्याला खरा मार्ग सापडेल का, याचा शोध घेऊ लागले. ध्यान, हटयोग यांतही त्यांना गोडी वाटू लागली. विषयासक्तीवर पूर्ण नियंत्रण मिळवून साक्षात्कार प्राप्तीचा मार्ग दाखविणारा कोणी गुरू त्यांना या दोन्ही शहरांत भेटला नाही.
     
    •• 1914 - कॉलेजमधील पहिले वर्ष संपल्यानंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सतराव्या वर्षी ते आणि त्यांच्यासारखे त्यांचे चारपाच मित्र गुरूच्या शोधार्थ निघाले. गया, काशी, हरद्वार, हृषिकेश, मथुरा, वृंदावन, दिल्ली, आग्रा इ. ठिकाणी ते सर्वजण हिंडले; परंतु हवा असलेला गुरू तर मिळाला नाहीच उलट तीर्थक्षेत्री जातिपातीचे प्रस्थ, शिवाशीव इ. पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला. विवेकानंदांच्या शिकवणुकीने त्यांची मानवाच्या समानतेवरील श्रद्धा दृढ झाली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून, सुभाष त्यांचे शिष्य बनले.  
     
    •• 1917 - अशुतोष मुखर्जींच्या मदतीने त्यांना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.
     
    •• 1919 - तत्त्वज्ञान विषय घेऊन बीए उत्तीर्ण. त्याच वर्षी वडिलांच्या इच्छेनुसार ते आयसीएससाठी इंग्लंडला गेले. त्या वेळी असहकार आंदोलन सुरू झाले नव्हते. जालियनवाला बाग येथे काय घडले, त्याची पूर्ण कल्पना पंजाब बाहेरच्या लोकांना आली नव्हती. परीक्षेत यश मिळाल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टी उजेडात आल्या. 
     
    •• 1921 - इंग्लंडला जाऊन सुभाष भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
     
    •• 22 एप्रिल 1921 - पहिली सक्तीची एक वर्षाची उमेदवारी न करता सरळ नोकरीचा राजीनामा देऊन ते मायदेशी परतले.  
     
    •• 16 जुलै 1921 - सुभाषबाबूंची बोट मुंबई बंदराला लागली. तेव्हा महात्मा गांधी मुंबईत होते. 
     
    •• 20 जुलै 1921 - महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले. रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते मुंबईला जाऊन महात्मा गांधींना भेटले. मुंबईत गांधींजी मणिभवन वास्त मध्ये वास्तव्य करत.
     
    स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 
    • 1921 - गांधीजींनी सूचना केल्यानुसार त्यांनी कोलकात्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, देशबंधू चित्तरंजन दास यांची भेट घेतली. देशबंधू चित्तरंजन दास ह्यांच्या कार्याने प्रभावित झाल्याने त्यांनी इंग्लंडहून दासबाबूंना पत्र लिहून, त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजन दास हेच होते. दासबाबूंना त्यांना पाहून फार आनंद झाला. गांधींजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात असहकार आंदोलन चालवले होते व दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले. 
     
    • 1922 -  कारावासानंतर ते  काही काळ  बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते.  
     
    • सी. आर. दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. सी. आर. दास कोलकात्त्याचे महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली. सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. 
     
    • 1927 - भारतातील राजकीय परिस्थितीचा 6 महिने अभ्यास करून नंतर ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. 
     
    • 1928- काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली. दोघांनी मिळून इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली. 
     
    • मे 1928  - महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे सहावे अधिवेशन पुण्यात भरले. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून सुभाषचंद्रांनी भाषण केले
     
    • 1928 - जेव्हा सायमन कमिशन भारतात आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. कोलकात्त्यात सुभाषबाबूंनी सायमनविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले. 
     
    • सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने भारताच्या भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी 8 सदस्यांची समिती नेमली. पंडित मोतीलाल नेहरू ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने नेहरू रिपोर्ट सादर केला.
     
    • 1928 - काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. 
     
    • गांधींजी त्याकाळी पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी सहमत नव्हते. ह्या अधिवेशनात त्यांनी इंग्रज सरकारकडून वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता. मात्र, सुभाषबाबू व पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांना, पूर्ण स्वराजच्या भूमिकेशी तडजोड मान्य नव्हती. जवाहरलालांसह सुभाषबाबूंनी त्यास विरोध केला आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मांडावा असे सुचविले. अखेर वसाहतीचे स्वराज्याची मागणी मान्य करण्यासाठी इंग्रज सरकारला 1 वर्षाची मुदत देण्याचे ठरले. जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले. इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही.
     
    • 1929 - काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी 26 हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
     
    • 26 जानेवारी 1931 - कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले. भगतसिंग यांची फाशी वाचवू शकत नसल्यामुळे व प्रत्यक्ष काहीच सवलती न मिळाल्यामुळे गांधी-आयर्विन कराराला सुभाषबाबूंनी अत्यंत कडक शब्दांत जाहीर विरोध केला होता. तेव्हापासून महात्मा गांधी व सुभाषबाबूंचे मार्ग भिन्न झाल्यासारखे दिसतात. 
     
    • 22 जुलै 1940 -  मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली.
     
    • 1944 - अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. 

    कारावास 
    • 1921 ते 1941 या 20 वर्षाच्या कालावधीत सुभाषबाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला. 
     
    • 1921 - त्यांना सर्वप्रथम 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कलकत्त्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली. सुभाषबाबूंनी तीत पुढाकार घेतला. त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला. तुरुंगात दासांच्या पुरोगामी विचारांचा सुभाषबाबूंवर फार मोठा परिणाम झाला. 
     
    • 1924 ऑक्टोबर - ब्रिटिश सरकारने सूडबुद्धीने खोटा आरोप लादून मध्ये त्यांना स्थानबद्ध केले. बंगाल प्रांतिक परिषदेमध्ये क्रांतिवीर गोपीनाथ साहा याचा जाहीर गौरव करण्यात आला होता. परिषदेस स्वतंत्र पक्षाचे म्हणजे कौन्सिलमध्ये काम करणार्‍या काँग्रेस गटाचे बहुसंख्य लोक होते. त्यांनीच बंगाल कौन्सिलचे कार्य अशक्य करून टाकले होते. त्यांना खच्ची करण्यासाठी फार व्यापक धरपकडी झाल्या व सर्वांवर, दहशतवादी आंदोलनाशी संबंधित असल्याचे आरोप करण्यात आले. 
     
    • गोपीनाथ साहा हे कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्नांत होते, पण त्यांनी चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्रि्चत कालखंडासाठी अलीपूर, बेर्‍हामपूर, कलकत्ता इ. शहरांतील तुरुंगात ठेवून पुढे म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले. कारावासात त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध विषयांचे वाचन केले. 
     
    • 5 नोव्हेंबर 1925 - देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली. मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. 
     
    • सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.
     
    • 1930 - सविनय कायदेभंगाच्या वेळी सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. गांधी-आयर्विन करारानंतर (1931) त्यांची मुक्तता झाली व ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झाले. 
     
    • 1932 - जानेवारीमध्ये सशस्त्र क्रांतिकारक चळवळीशी संबंध जोडून सरकारने त्यांना पुन्हा स्थानबद्ध केले. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. प्रकृतीच्या कारणास्तव तुरुंगातून मुक्त करताना त्यांना देशातून हद्दपार केल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी परदेशी जाणे त्यांना भाग होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.
     
    • 1936 - हद्दपारीच्या आज्ञेचा भंग करून सुभाषबाबू भारतात आले. त्यांना पुन्हा पकडण्यात आले. 1935 च्या कायद्यान्वये नव्या कौन्सिलच्या निवडणुका झाल्यानंतरच त्यांची मुक्तता करण्यात आली (1937). 
     
    • 2 जुलै 1940 -फॉरवर्ड ब्लॉकने जाहीर केलेल्या संकल्पित सत्याग्रहाच्या पूर्वीच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. दुसरे महायुद्ध सुरू असताना तुरूंगात निष्क्रिय राहणे सुभाषबाबूंना शक्य नव्हते. सरकारला आपली सुटका करण्यास भाग पाडण्यासाठी, सुभाषबाबूंनी अलीपूरच्या तुरूंगात आमरण उपोषण सुरू केले. तेव्हा सरकारने त्यांची सुटका केली. पण इंग्रज सरकार युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवू इच्छीत नव्हते. त्यामुळे सरकारने त्यांना त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवले.
     
    युरोपातील वास्तव्य 
    • 1933-36 अशी तीन वर्षे ते व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे राहिले. युरोप मधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरू ठेवले. या काळात त्यांनी यूरोपातील राजकीय परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेतला. 
     
    • फॅसिझम व साम्यवाद या दोन विचारसरणींतील उपयुक्त गोष्टी एकत्र करून एक नवीन विचारप्रणाली अनुसरावी, असे त्यांचे मत होते. त्यांनी डी व्हॅलेरा, केमाल आतातुर्क अशा नेत्यांना भेटून त्या दृष्टीने चाचपणीही केली.  आयर्लंडचे नेते डी व्हॅलेरा सुभाषबाबूंचे चांगले मित्र बनले.
     
    • त्यांनी इटलीचे नेते बेनिटो मुसोलिनी ह्यांची अनेकदा भेट घेतली. मुसोलिनीने त्यांना, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन दिले.
     
    • सुभाषबाबू युरोप मध्ये असताना, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू ह्यांचे ऑस्ट्रियामध्ये निधन झाले. सुभाषबाबूंनी तिथे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरूंचे सांत्वन केले.

    • पटेल-बोस जाहीरनामा - 
    यूरोपच्या दौर्‍यात व्हिएन्ना येथे विठ्ठलभाई पटेलांचे सानिध्य त्यांना लाभले (एप्रिल-ऑक्टोबर 1933). विठ्ठलभाई पटेल ह्यांच्यासह सुभाषबाबूंनी पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्यामध्ये त्या दोघांनी गांधीजींच्या नेतृत्वावर कडाडून टीका केली. त्यानंतर विठ्ठलभाई पटेल आजारी पडले, तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांची खूप सेवा केली. पण विठ्ठलभाई पटेलांचे निधन झाले. विठ्ठलभाईंनी आपल्या मृत्युपत्रामध्ये आपल्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून त्यांना नेमले. त्यांनी आपले मृत्युपत्र बनवून आपली करोडोंची संपत्ती सुभाषबाबूंच्या नावे केली. पण त्यांच्या निधनानंतर, त्यांचे बंधू सरदार वल्लभभाई पटेलांनी हे मृत्युपत्र स्वीकारले नाही व त्यावर न्यायालयात खटला चालवला. हा खटला जिंकून, सरदार वल्लभभाई पटेलांनी ती सर्व संपत्ती, गांधीजींच्या हरिजन सेवा कार्याला भेट म्हणून देऊन टाकली.
     
    • 1934 - सुभाषबाबूंना त्यांचे वडील जानकीनाथ मृत्युशय्येवर असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे ते विमानाने कराची मार्गे कोलकात्त्याला परतले. कराचीला पोचल्यावर त्यांना कळले की त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कोलकात्त्याला पोचताच, इंग्रज सरकारने त्यांना अटक केली व काही दिवस तुरूंगात ठेवून, पुन्हा युरोपला धाडले.
    काँग्रेसचे अध्यक्षपद 
    • 1937 - ऑक्टोबरमध्ये, हरिपुरा येथे होऊ घातलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी राष्ट्रीय योजना आयोग स्थापन केला. पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. 
     
    • 1937 - जपानने चीनवर आक्रमण केले. तेव्हा सुभाषबाबूंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने चिनी जनतेला साहाय्य करण्यासाठी, डॉ. द्वारकानाथ कोटणीस ह्यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला. पुढे जेव्हा सुभाषबाबूंनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जपानची मदत मागितली, तेव्हा त्यांना जपानचे हस्तक व फॅसिस्ट म्हटले गेले. पण वरील घटनेवरून हे सिद्ध होते की सुभाषबाबू न जपानचे हस्तक होते, न ही फॅसिस्ट विचारसरणीशी सहमत होते.
     
    • 1938 - काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा (गुजरात) येथे झाले. ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली. हे काँग्रेसचे 51 वे अधिवेशन होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष असलेल्या सुभाषबाबूंचे स्वागत 51 बैलांनी खेचलेल्या रथातून केले गेले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंचे अध्यक्षीय भाषण फारच प्रभावी झाले. कोणत्याही भारतीय राजकीय व्यक्तीने क्वचितच इतके प्रभावी भाषण कधी केले असेल.  आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी संघराज्यात्मक घटनेचा प्रखर विरोध करून राष्ट्रीय सामर्थ्यवादावर भर दिला. 
     
    • सुभाषबाबूंनी बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्र्वेश्र्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान परिषद भरवली.
     
    • 1938 - गांधीजींनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषबाबूंची निवड केली असली, तरी गांधीजींना सुभाषबाबूंची कार्यपद्धती पसंत नव्हती. ह्याच सुमारास युरोपात द्वितीय महायुद्धाची छाया पसरली होती. सुभाषबाबूंची इच्छा होती की इंग्लंडच्या कठीण परिस्थितीचा लाभ उठवून, भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र केला जावा. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ह्या दिशेने पावले टाकण्यास सुरूवात केली होती. गांधीजी ह्या विचारसरणीशी सहमत नव्हते.
     
    1939 - जेव्हा नवीन काँग्रेस अध्यक्ष निवडण्याची वेळ आली, तेव्हा सुभाषबाबूंना अध्यक्षपदावर कुणी अशी व्यक्ती हवी होती, जी ह्या बाबतीत कोणत्याही दबावासमोर झुकणार नाही. अशी कोणती दुसरी व्यक्ती समोर न आल्यामुळे, सुभाषबाबू स्वतः पुन्हा काँग्रेस अध्यक्ष बनू इच्छीत होते. पण गांधीजीना ते नको होते. गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या ह्यांची निवड केली. देशाच्या परिस्थितीत काँग्रेसचे धोरण जहाल असावे व काँग्रेसने आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा बदलत्या राजकारणात अनुकूल फायदा करून घ्यावा, या उद्देशाने ते अध्यक्षपदासाठी पुन्हा उभे राहिले.
     
    • कविवर्य रवींद्रनाथ टागोर ह्यांनी गांधीजींना पत्र लिहून सुभाषबाबूंनाच पुन्हा अध्यक्ष बनवण्याची विनंती केली. प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिकही पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते. पण गांधीजींनी ह्या प्रश्नावर कुणाचेच म्हणणे ऐकले नाही. 
     
    • शेवटपर्यंत तडजोड न होऊ शकल्यामुळे, अनेक वर्षांनंतर, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली गेली. सर्वजण समजत होते की जेव्हा स्वतः महात्मा गांधीनी पट्टाभि सितारामैय्या ह्यांना साथ दिली आहे, तेव्हा तेच ही निवडणूक आरामात जिंकणार. पण घडले वेगळेच. सुभाषबाबूंना निवडणुकीत 1580 मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना 1377 मते मिळाली. गांधीजींनी विरोध करूनही सुभाषबाबूंनी 203 मतांनी ही निवडणूक जिंकली. पण निवडणुकीच्या निकालाने पेच मिटला नाही. 
     
    • पट्टाभि सितारामैय्यांची हार ही आपली स्वतःची हार मानून, गांधीजींनी आपल्या साथीदारांना असे सांगितले की त्यांना जर सुभाषबाबूंची कार्यपद्धती मान्य नसेल, तर ते काँग्रेसमधून बाहेर पडू शकतात. ह्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या 14 पैकी 12 सदस्यांनी राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले व एकटे शरदबाबू सुभाषबाबूंच्या बाजूने उभे राहिले.

    काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा -
    • 1939 - काँग्रेस अधिवेशन त्रिपुरी (जबलपूर) येथे झाले. ह्या अधिवेशनाच्या वेळी सुभाषबाबू तापाने इतके आजारी होते, की त्यांना स्ट्रेचरवर पडून अधिवेशनाला उपस्थित रहावे लागले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘सहा महिन्यांत युद्धाचा भडका उडेल’, असे भाकित त्यांनी केले. गांधीजी ह्या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. गांधीजींच्या साथीदारांनी सुभाषबाबूंशी बिलकुल सहकार्य केले नाही. अधिवेशनानंतरही सुभाषबाबूंनी तडजोडीसाठी खूप प्रयत्न केले. पण गांधीजी व त्यांच्या साथीदारांनी त्यांचे काही चालू दिले नाही. शेवटी परिस्थिती अशी बनली की सुभाषबाबू काही कामच करू शकत नव्हते. 
     
    • 29 एप्रिल 1939 - सुभाषबाबूंनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसने सुभाषबाबूंविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून बंगाल प्रांतिक परिषदेतून त्यांची उचलबांगडी केली व पुढे तीन वर्षे कोणत्याही पक्षीय अधिकारपदासाठी निवडणूक लढविण्यावर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. 

    फॉरवर्ड ब्लॉक
    • 3 मे 1939 - सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक नामक आपल्या पक्षाची स्थापना केली. काही दिवसांनंतर, सुभाषबाबूंना काँग्रेस मधून काढून टाकण्यात आले. पुढे फॉरवर्ड ब्लॉक हा एक स्वतंत्र पक्ष बनला. दुसरे महायुद्ध सुरू होण्यापूर्वीच, फॉरवर्ड ब्लॉकने भारताचा स्वातंत्र्यलढा अधिक तीव्र करण्यासाठी, जनजागृती सुरू केली. 
    • 19 आणि 20 मार्च 1940 - फॉर्वर्ड ब्लॉक व किसान सभा यांचे संयुक्त अधिवेशन रामगढ येथे भरविण्यात आले.
    •• 6 एप्रिल 1940 - पासून राष्ट्रीय आंदोलनाचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे इंग्रज सरकारने सुभाषबाबू सहित फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले. 
    •• 18 जून 1940 - नागपूरच्या अधिवेशनात अस्थायी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.
     
    नजरकैदेतून पलायन 
    •• कोलकाता येथील आपल्या घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी विमा एजंट झियाउद्दीन यांच्या वेशात 14 गुप्तचर अधिकार्‍यांच्या डोळ्यात धूळ फेकली. त्यांनी फक्त भारतातून पलायन केलं नाही तर जवळपास अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोहोचले.
    • 16 जानेवारी 1941 - घरातील नजरकैदेतून निसटण्यासाठी सुभाषबाबूंनी एक योजना बनवली. आपण अध्यात्मसाधना करणार आहोत, असे भासवून त्यांनी एकांतवास पतकरला. पठाणी वेशभूषेत, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करून, ते पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. शरदबाबूंचा प्रथम पुत्र शिशिर ह्याने आपल्या गाडीतून त्यांना कोलकात्त्यापासून दूर, गोमोह येथे पोचवले. 
    • गोमोह रेल्वे स्थानकावर फ्रंटियर मेल पकडून ते पेशावरला पोचले. पेशावर येथे त्यांना फॉरवर्ड ब्लॉक मधील एक सहकारी, मिया अकबर शहा भेटले. मिया अकबर शहांनी त्यांची ओळख, भारत नवजवान सभेचा कार्यकर्ते व कीर्ती किसान पार्टीच्या भगतराम तलवारशी करून दिली. सुभाषबाबूंना घेऊन पुढे निघाला. पेशावर, शाबकादर, गडंब खोरे, लालपुरा, जलालाबाद, अड्डा शरीफ आणि पुढे काबूल अशा मार्गाने ते पुढे निघाले. सुभाषबाबूंना पुश्तू भाषा येत नव्हती. म्हणून त्यांनी मुक्याचे सोंग घेतले.
    •• 26 जानेवारी 1941- भगतराम तलवारच्या सोबतीने, सुभाषबाबू पेशावरहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलच्या दिशेने निघाले. ह्या प्रवासात भगतराम तलवार, रहमतखान नामक पठाण बनले होते व सुभाषबाबू त्यांचे मुके-बहिरे काका बनले होते. हा संपूर्ण प्रवास त्या दोघांनी डोंगरातून पायी चालत पूर्ण केला.
    • काबूलमध्ये उत्तमचंद मल्होत्रा नावाचा एक भारतीय व्यापारी राहत होता. सुभाषबाबूंनी दोन महिने त्यांच्या घरी वास्तव्य केले. तिथे त्यांनी प्रथम रशियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्यामुळे, त्यांनी जर्मन व इटालियन वकिलातीत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. 
    •• इटालियन वकिलातीत त्यांच्या प्रयत्नांना यश आले. जर्मन व इटालियन वकिलातींनी त्यांना मदत केली. अखेर ओरलँडो मझयुटा नामक इटालियन व्यक्ती बनून, सुभाषबाबू काबूलहून रेल्वेने प्रवास करत, रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोचले.

    नाझी जर्मनीतील वास्तव्य
     
    •
    • बर्लिन येथे सुभाषबाबू सर्वप्रथम रिबेनट्रोप आदि जर्मनीच्या अन्य नेत्यांना भेटले. जर्मन सरकारचे एक मंत्री डम फॉन ट्रॉट सुभाषबाबूंचे फार चांगले मित्र बनले.
     
    • 6 नोव्हेंबर 1941 - आझाद हिंद केंद्राची बैठक झाली. याच बैठकीत ‘जय हिंद’ हा पहिला नारा देण्यात आला. त्यातूनच पुढे सुभाषबाबूंना ‘नेताजी’ म्हटले जाऊ लागले. तत्त्पूर्वी सुभाषबाबूंनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान केंद्र’ स्थापन केले. जर्मनीने 10 लाख मार्क्सचा धनादेश सुभाषबाबूंना दिला. याच केंद्राचे नाव ‘आझाद हिंद केंद्र’ असे झाले.
     
    • त्यांनी जर्मनीत भारतीय स्वातंत्र्य संघटना व आझाद हिंद रेडियो ह्या दोन्हींची स्थापना केली. तेथील वास्तव्यात त्यांनी हिंदी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढ्यास प्रवृत्त केले आणि बर्लिन आकाशवाणीवरून ते देशबांधवांना सातत्याने आवाहन करीत राहिले. 
     
    • जर्मनीत एमिली शेंक्ल या ऑस्ट्रियन युवतीने त्यांची चिटणीस म्हणून काम स्वीकारले. सुभाषबाबूंनी तिच्याशी गुप्तपणे विवाह केला. त्यांना अनिता ही मुलगी झाली.
     
    • 29 मार्च 1942 - सुभाषबाबू जर्मनीचे सर्वोच्च नेते डॉल्फ हिटलर ह्यांना भेटले. पण अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना भारताच्या विषयात फारसा रस नव्हता. त्यांनी सुभाषबाबूंना सहकार्याचे कोणतेही स्पष्ट वचन दिले नाही.
     
    • काही वर्षांपूर्वी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांना माइन काम्फ नामक आपले आत्मचरित्र लिहीले होते. ह्या पुस्तकात त्यांनी भारत व भारतीयांविषयी अनुदार उद्गार काढले होते. ह्या विषयावर सुभाषबाबूंनी अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. अ‍ॅडॉल्फ हिटलर ह्यांनी आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली व आपल्या आत्मचरित्राच्या पुढील आवृत्तीतून ते सर्व परिच्छेद गाळण्याचे वचन दिले. शेवटी, सुभाषबाबूंना समजले की अ‍ॅडॉल्फ हिटलर व जर्मनी ह्यांच्याकडून त्यांना फार काही मिळण्यासारखे नाही. 
     
    • हिटलरच्या भेटीनंतर निराश न होता त्यांनी पुढे मुसोलिनीची भेट घेतली; तथापि मुसोलिनीची हंगामी सरकार स्थापण्याची सूचना त्यांना एकूण राजकीय परिस्थितीचा विचार करता स्वीकारार्ह वाटली नाही. म्हणून त्यांनी हिंदी लोकांना संघटित करण्यावर भर दिला. 
     
    •• जर्मनी-इटलीमधील भारतीय सैनिकांना भेटून त्यांनी आपले मनोगत सांगितले व ब्रिटिशांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले. त्या वेळी जपानने ब्रिटिशांविरुद्ध रशियामध्ये आघाडी उघडली होती. 
     
    •• 1942 - ‘आझाद हिंद नभोवाणी केंद्र’ सुरू झाले. सुभाषबाबूंनी आपल्या धीरगंभीर आवाजात भाषण दिले, ‘होय, मी सुभाषचंद्र बोस बोलत आहे. मी ज्याची वाट पहात होतो, तो क्षण आता आलेला आहे. हिंदुस्थानच्या द़ृष्टीनं नवयुगाची पहाट.’ भारतात चैतन्याची लाट उसळली. आझाद हिंद सेनेत सैनिक जमा होऊ लागले. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. 
     
    •• जून 1942 - बँकाक येथे भारतीयांची एक परिषद भरली होती. त्यात सुभाषबाबूंना पूर्व आशियात येऊन नेतृत्व करण्याची विनंती केलेली होती. 
     
    •• 8 मार्च 1943 - जर्मनीतील कील बंदरातून, ते अबीद हसन सफरानी नामक साथीदारासह, एका जर्मन यूबोट नावाच्या पाणबुडीत बसून, पूर्व आशियाच्या दिशेने निघाले. ह्या जर्मन पाणबुडीतून त्यांनी हिंदी महासागरातील मादागास्करचा किनारा गाठला. तिथे त्या दोघांनी भयंकर समुद्रातून रबराच्या होडीने वाट काढत, जपानी पाणबुडी गाठली. द्वितीय महायुद्धाच्या काळात, कोणत्याही दोन देशांच्या नौसेनेच्या पाणबुड्यांच्या दरम्यान झालेली, नागरिकांची ही एकमात्र अदलाबदल. ही जपानी पाणबुडी मग त्यांना इंडोनेशियातील पेडाँग बंदरात (सुमात्रा) घेऊन आली.
     
    •• 16 मे 1943 -  पेडाँग ते टोकिओ हा प्रवास त्यांनी विमानाने केला. जपान येथे आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर दुसरी आघाडी तेथे उघडली. 

    आझाद हिंद सेना व पूर्व आशियातील वास्तव्य 
     
     
    • 8 फेब्रुवारी ते 16 मे 1943- युरोप खंडाच्या एका टोकापासून आशिया खंडाच्या दुसर्या टोकापर्यंत अत्यंत धोक्याचा समुद्राखालचा प्रवास करुन अत्यंत गुप्तपणे सुभाषबाबू टोकियोला येऊन पोहोचले.
     
    • पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.
     
    •• नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानची संसद डायट समोर भाषण केले.
     
    • 21 ऑक्टोबर 1943 - सिंगापूर येथे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्टप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी 11 राष्ट्रांनी मान्यता दिली. नेताजी आझाद हिंद फौजेचे सरसेनापतीही बनले. या सरकारने इंग्लंड-अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारून स्वतःची तिकिटे व नोटाही काढल्या. 
     
    •• आझाद हिंद फौजेत जपानी लष्कराने इंग्रजांच्या फौजेतून पकडलेल्या भारतीय युद्धबंद्यांना भरती केले गेले. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झाँसी की रानी रेजिमेंटही बनवली गेली.
     
    •• पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना आझाद हिंद फौजेत भरती होण्याचे तसेच त्यांना आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा असा नारा दिला.
     
    •• आझाद हिंद सेनेची घोषणा - चलो दिल्ली
     
    •• आझाद हिंद सेनेचे स्फूर्तीगीत - कदम कदम बढाए जा.
     
    •• 18 मार्च 1944 - आझाद हिंद सेनेने  भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक (आसाम) येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. द्वितीय महायुद्धाच्या काळात, आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी चलो दिल्ली अशी हाक दिली. 
     
    •• दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान आणि निकोबार बेटे जिंकली. जपानने अंदमान, निकोबार व जित बेटांचा ताबा आझाद हिंद सरकारकडे सोपविला. ही बेटे अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदच्या अनुशासनाखाली राहिली. नेताजींनी ह्या बेटांचे शहीद आणि स्वराज बेटे असे नामकरण केले. 
     
    •• दोन्ही फौजांनी मिळून इंफाळवर व कोहिमावर आक्रमण केले. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. आझाद हिंद सेनेला नैसर्गिक आपत्तींमुळे माघार घ्यावी लागली. 
     
    • आझाद हिंद फौज माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झाँसी की रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. युद्धात पराजय होत असतानासुद्धा नीतिधैर्य खचू न देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. 
     
    •• 6 जुलै 1944 - आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
     
    •• 12 सप्टेंबर 1944 - रंगून आकाशवाणीवरून सुभाषबाबूंनी भाषण करून ब्रिटिशांशी कोणत्याही प्रकारचा समझोता न करण्याचे, फाळणी न स्वीकारण्याचे व लढा चालू ठेवण्याचे देशबांधवांना आवाहन केले.

    बेपत्ता होणे व मृत्यूची बातमी  -
    •• 15 ऑगस्ट 1945 - दुसर्‍या जागतिक महायुद्धात जर्मनी-इटली व नंतर जपानचा पराभव झाला; जपानने शरणागती पत्करली. नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मांचुरियाहून त्यांना तिकडे धाडण्याची व्यवस्था फिल्ड मार्शल ताराऊ याने केली. 
     
    •• 17 ऑगस्ट 1945 - सायगावहून त्यांनी मांचुरियाच्या दिशेने प्रयाण केले.
     
    •• 18 ऑगस्ट 1945 - विमानातून मांचुरियाच्या प्रवासादरम्यान नेताजी बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. या दिवशी नेताजी सुभाषचंद्र कसे व कुठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे. 
     
    •• जपानने शरणागती पतकरल्यामुळे मानसिक धक्का - 2,600 वर्षांत जपानचा हा पहिलाच पराभव होता. सरकार असून नसल्यासारखे - यामुळे सुभासबाबूंच्या निधनाची वार्ता जाहीर केली गेली नाही. निधनाचे वृत्त दीर्घ काळ अज्ञात राहिल्यामुळे लोकांत पुढे शंका निर्माण झाली.
     
    • तैपेई (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते. या अपघाताची कारणे अशी होती : विमानात एकूण 9 माणसांऐवजी 13 उतारू घेतले होते. विमानतळ तुलनात्मकदृष्ट्या फार छोटा होता आणि या वेळी वैमानिकाची मनःस्थिती अस्थिर व भांबावलेली होती. शिवाय वैमानिकाने फॉर्मोसा विमानतळाचा कधीच अनुभव घेतला नव्हता.
     
    •• 20 ऑगस्ट 1945 -  नेताजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर 25 दिवसांनी हबीबुर रहमान नेताजींच्या अस्थी घेऊन जपानला पोहोचले.
     
    •• 23 ऑगस्ट 1945 - जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की, ऑगस्ट 18 रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. अपघातग्रस्त विमानात नेताजी सुभाषचंद्रांसह त्यांचे सहकारी कर्नल हबिबूर रहमान होते. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, परंतु त्यांना यश आले नाही. मग नेताजींच्या अस्थी जपानची राजधानी टोकियो येथील रेनकोजी नामक बौद्ध मंदिरात ठेवल्या गेल्या.
     
    •• 1956 आणि 1977 - स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ह्या घटनेची चौकशी करण्यासाठी, दोन वेळा एकेका आयोगाची नियुक्ती केली. दोन्ही वेळा हाच निष्कर्ष निघाला की नेताजींचा त्या विमान अपघातातच मृत्यू ओढवला होता. या आयोगाने तैवानच्या सरकारशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नव्हता.
     
    •• 1999 - मनोज कुमार मुखर्जी ह्यांच्या नेतृत्वाखाली तिसरा आयोग नेमला गेला. 2005 साली तैवान सरकारने मुखर्जी आयोगाला असे कळवले की 1945 साली तैवानच्या भूमीवर कोणतेही विमान अपघातग्रस्त झालेच नव्हते. 2005 मध्ये मुखर्जी आयोगाने भारत सरकारला आपला अहवाल सादर केला. आयोगाने आपल्या अहवालात असे लिहिले की नेताजींचा मृत्यू त्या विमान अपघातात घडल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. परंतु भारत सरकारने मुखर्जी आयोगाचा हा अहवाल नामंजूर केला.
     
    •• 2015 - सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ज्या शेकडो फायली भारत सरकारकडे होत्या, त्यांतल्या बर्‍याच फायली सरकारने लोकांना बघण्यासाठी खुल्या केल्या.

    भारतरत्न पुरस्कार -

     

    •• 1992 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरान्त भारतरत्न प्रदान केले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार मागे घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरान्त ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातली ही एकमेव घटना आहे.

    सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना  

     

    •• 23 जानेवारी 1897 सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला.
    •• 1920 मध्ये आय.सी.आय. परीक्षा उत्तीर्ण झाले.
    •• 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
    •• 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.
    •• डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.
    •• जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली. नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.
    • • 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले. सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले. आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या. सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते. झाशी रेजिमेंटचे नेतृत्व- कॅ. लक्ष्मी स्वामीनाथन
    •• आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.
    •• 18 ऑगस्ट 1945 -विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते. 
     
    सुभाषचंद्र बोस यांच्यावरील साहित्य
    1) अ‍ॅन इंडियन पिल्ग्रिम : अ‍ॅन् अनफिनिशड ऑटोबायॉग्रफी अँड कलेक्टेड लेटर्स - 1897-1921 हे त्यांचे आत्मवृत्त आहे (1965).
    2) गरुडझेप (वि. स. वाळिंबे)
    3) जयहिंद आझाद हिंद (वि. स. वाळिंबे)
    4) नेताजी (वि. स. वाळिंबे)
    5) नेताजींचे सीमोल्लंघन (एस. एम. जोशी)
    6) नेताजी सुभाषचंद्र बोस (रमेश मुधोळकर)
    7) नो सिक्रेट (अनुज धर)
    8) महानायक (विश्वास पाटील)
    9) नेताजींची सुवचने आणि संदेश (य.ना. वालावलकर)
    10) नेहरू व बोस (रुद्रांग्शू मुखर्जी, मराठी अनुवाद - अवधूत डोंगरे)
     

    नेताजींच्या संदर्भातील काही प्रेरणादायी सुभाषिते -

     

    1) मजा आयेगा जब हमारा राज देखेंगे, कि अपनी ही जमी होगी, अपना आसमाँ होगा, शहीदों की चिताओंपर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरनेवालों का यहीं नामोनिशाँ होगा.
    2) हमें सब सुखों को भूल जाना पड़ेगा, वतन के लिये दुख उठाना पड़ेगा । 
    3) जय आझाद-हिंदी ! उठो कमर बाँधो ! वतन लुट रहा है, बचाना पडेगा, हुक्म नेताजी का बजाना पड़ेगा ।
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1311