महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा
- 23 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 310 Views
- 0 Shares
महाराष्ट्रातील स्वयंसेवेची उज्ज्वल परंपरा
महाराष्ट्राच्या स्वयंसेवी क्षेत्राचा गेल्या साठ वर्षांचा इतिहास पाहिला तर तो अदभुत आहे. समाजाचं मन तयार करणं, समाजशिक्षण, नवनवे प्रयोग करणं, न बोलल्या गेलेल्या विषयांकडे समाजाचं लक्ष वेधणं, धोरणांवर; तसंच कायद्यांवर परिणाम करणं ह्यासारखी किती तरी कामं विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांनी केलेली दिसतात.
• 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना ’भारतरत्न’ पुरस्कार मिळाला. समाजकार्यासाठीचे हे पहिले ’भारतरत्न’. महाराष्ट्राला मिळालेलाही हा पहिलाच सन्मान. तेव्हा नेहरूंनी महर्षींच्या सामाजिक कामाचं भरभरून कौतुक केलं. भाषण संपता संपता नेहरू म्हणाले, ’अण्णा, तुम्ही प्राचीन भारतातील ऋषीसारखे आहात. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या.’ कर्वे म्हणाले, ’माझ्या आयुष्यातल्या सर्व आकांक्षा पूर्ण झाल्या. आता फक्त एक इच्छा आहे. मला संयुक्त महाराष्ट्र झालेला पहायचा आहे.’ त्यांच्या या वाक्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला नैतिक बळ मिळालं. दोनच वर्षांनी त्यांची इच्छा पूर्ण झाली.
• हा प्रसंग महाराष्ट्रातल्या सामाजिक कामाचं वैशिष्ट्य अधोरेखित करणारा आहे. महर्षी कर्वे असं म्हणाले तेव्हा राजकारण तापलं होतं. नेहरूंना संयुक्त महाराष्ट्र मान्य नव्हता. आयुष्यात कधी राजकारणावर न बोललेले महर्षी अगदी महत्त्वाच्या क्षणी बोलले. माझं काम सामाजिक असलं, तरी मला राजकीय विचार आहे. सामाजिक कामालाही राजकीय भान लागतं, हे त्यांनी यातून सांगितलं.
• महाराष्ट्रातलं सामाजिक स्वयंसेवी काम व्यापक राजकारणाशी बांधलेलं आहे. त्यामागे व्यापक परिवर्तनशील विचार आहे. आपल्या कामातून समाजातल्या उणिवांवर उपाय तर शोधलाच पाहिजे; पण त्यानंतर त्याचा परिणामही सर्व समाजावर झाला पाहिजे, तशी धोरणं आखली पाहिजेत. त्यासाठी आपण मदत केली पाहिजे, ही धारणा महाराष्ट्रात दिसते. या भूमीतलं सामाजिक भान मोठं आहे.
सामाजिक कामाचे प्रयोग (1960 चे दशक) -
• संयुक्त महाराष्ट्राची स्थापना एका लोकचळवळीतून झाल्यामुळे सर्वत्र नव्या आकांक्षा, नवा उत्साह होता. उद्योग असो, शेती असो किंवा शिक्षण क्षेत्रं असो. नवा महाराष्ट्र उभा करण्याचं स्वप्न सर्वांच्या मनात होतं. याचा परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक स्वयंसेवी चळवळीवरही झाला. त्यातूनच 1960 च्या दशकातील स्ययंसेवी कामाचा आशय ठरला. ज्या आशयाचं सूत्र ’सेवा, शिक्षण आणि तांत्रिक मदत’ असं होतं.
• 1960 च्या आधीही समाजकार्याची, समाजसुधारणेची मोठी परंपरा महाराष्ट्राला होती. संतांनी केलेल्या प्रबोधनाच्या शिकवणीवर मराठी मनाची मशागत झाली होती.
• महाराष्ट्र राज्य स्थापन व्हायच्या आधी सामाजिक कामाचे तीन प्रमुख वैचारिक प्रवाह होते -
1) पहिला प्रवाह मिशनरी कामाचा
2) दुसरा गांधीवादी विचारसरणीचा
3) तिसरा महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रबोधन व परिवर्तनवादी विचारसरणीचा.
• 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं, तेव्हा वरील विचारांची कामं कुठे कुठे सुरू होती. काही प्रभावशाली होती. मग ती मिशनरी संस्थांची रुग्णालयं असोत किंवा मुख्यत: विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागात गांधीवादी कामांची उभी राहिलेली साखळी असो किंवा त्याच वळणाचं बाबा आमटे यांचं ’आनंदवन’ किंवा अमरावतीच्या ’तपोवना’तील शिवाजीराव पटवर्धन यांचं महारुग्णांसाठी उभं केलेलं काम असो; किंवा महात्मा फुले यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन 1919 साली स्थापन झालेली रयत शिक्षण संस्था असो.
• राज्याची स्थापना झाली तेव्हा सर्वत्र उद्योग, सहकार, सामाजिक न्याय आणि शिक्षण यांना प्राधान्य देण्याचं सूत्र होतं. सरकारी धोरणांची पावलंही तशीच पडत होती. तोच सूर पकडून पाणी, शेती, ग्रामोद्योग, आरोग्य आणि शिक्षण यांत काम करण्यासाठी कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी विविध संस्थांना आकार दिला. सामाजिक कामाचे अनेक नवे प्रयोग विविध संस्थांनी सुरु केले -
1) 1964 साली पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना झाली.
2) 1966 मध्ये, मूळची मिशनरी कामाची प्रेरणा असूनही त्यावेळच्या धान्यटंचाईकडे पाहून शेतीतलं उत्पन्न वाढावं म्हणून तांत्रिक मदत करणारी अॅफ्रो (अॅक्शन फॉर फूड) त्यावेळच्या दुष्काळी अहमदनगर जिल्ह्यात स्थापन झाली. त्या संस्थेचा नंतर विस्तार झाला.
3) 1967 मध्ये मणिभाई देसाईंनी स्थापन केलेली ’भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन’ (बाएफ) सुरू झाली.
4) 1969 मध्ये शेतीला प्राधान्य देऊन काही मिशनरी इंजिनीअर्सनी स्थापलेली ’मराठवाडा शेती साह्य मंडळ’ किंवा पाण्यावर काम करणारी; पण स्वयंसेवी संस्थांना तंत्रज्ञानाची मदत करणारी ’अफार्म’ उभी राहिली.
5) 1960 च्या दशकात जामखेडला आरोग्यसेवेचं काम डॉ. रजनीकांत आरोळे यांनी सुरू केलं.
परिवर्तनवादी कामांना गती (1970 चे दशक) -
• 1970 च्या दशकाच्या मध्यापर्यंत शिक्षण, शेती, आरोग्यसेवा, ग्रामोद्योग या विषयांवर महाराष्ट्राच्या सामाजिक स्वयंसेवी क्षेत्राचं प्राधान्यानं लक्ष होतं. नंतर मात्र यात आमूलाग्र बदल होऊ लागला तो सत्तरच्या दशकाच्या मध्याला. जगाच्या इतिहासात जसं सत्तरचं दशक हे ’बदलांचं दशक’ म्हणून आपण ओळखतो, तसंच महाराष्ट्राचंही आहे. महाराष्ट्रातही त्या वेळी बरीच उलथापालथ झाली -
1) शिवसेनेचा उदय झाला.
2) युक्रांद, छात्र युवक संघर्ष समिती, विविध विद्यार्थी संघटना, पतित पावन यांसारख्या संघटना विद्यार्थी आणि युवकांचं भावविश्व ढवळत होत्या.
3) दलित, भटक्या समाजातले कार्यकर्ते लिहू लागले होते.
4) ग्रंथाली वाचक चळवळ जोरात होती. साहित्यिक, कवी कोंडलेल्या मनांना वाट करून देत होते.
5) महिला हक्काचा आवाज वाढत होता.
6) ग्राहक चळवळ आकारात होती.
7) आदिवासी भागात चळवळी वाढत होत्या.
8) शेतकरी संघटना शेतीच्या अर्थशास्त्राची मांडणी करत होती.
9) नामांतर आंदोलन जोर धरू लागलं होतं. समाजजीवन ढवळून निघत होतं.
• तापलेल्या सामाजिक अस्वस्थतेतून परिवर्तनवादी परिभाषा महाराष्ट्राच्या समाजमनात तयार होऊ लागली. मूलभूत हक्क, अधिकार, सामाजिक न्याय, पाणलोट क्षेत्र विकास अशा विषयांवर दूरदूर गावात, छोट्या खेड्यापाड्यांत, शहरी वस्त्यांमध्ये सामाजिक, स्वयंसेवी काम करणारे गट उभे राहिले.
• सामाजिक कामाच्या विस्ताराचा हा काळ. तो व्हायला त्याच काळात सामाजिक कामाला बराच परदेशी पैसाही आला, हे ही एक कारण आहे; परंतु, 1975 पर्यंत महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्याची अद्भुतरम्यता विरली आणि समाजातले अनेक घटक अस्वस्थ झाले.
• मराठी भाषिकांचं स्वत:चं राज्य आलं, तरी अजून संधी मिळत नाही, आपले मूलभूत अधिकारही मारले जात आहेत, याची जाणीव समाजसमूहांना झाली. त्यांच्या इर्ष्येनंदेखील या परिवर्तनवादी सामाजिक स्वयंस्फूर्त कामांना ताकद मिळाली.
’एनजीओं’चा काळ (1980 व 1990 चे दशक) -
• सध्या नावारूपाला आलेल्या अनेक सामाजिक स्वयंसेवी संस्था या काळात सुरू झाल्या. त्यांची यादी मोठी आहे. स्वयंसेवी संस्थांना ’एनजीओ’ म्हणायला याच काळात सुरुवात झाली. अर्थात काहीही असलं, तरी ही 20 वर्षे सामाजिक चळवळींची, आंदोलनांची वर्षे आहेत. या आंदोलनांनी कित्येक महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आणले, काही तर इतके टोकाला नेले, की त्यातून धोरणांवर बदल केला गेला. नवे कायदे तयार केले गेले.
• स्त्री मुक्ती संघटना, क्रांतिकारी महिला संघटना अशांच्या विविध लढ्यातून महिला धोरण ठरायला मदत झाली.
• अंधश्रद्धा निर्मूलन, दारूमुक्ती आंदोलन, मानवी हक्क अभियान अशा चळवळींनी सामाजिक उणिवांवर नेमकं बोट ठेवलं.
• पुढील आंदोलनांनी आदिवासी, जल-जंगल-जमीन अशांसारख्या विषयांवर नवे कायदे आले, आदिवासींना त्यांचे हक्क मिळायला सुरूवात झाली -
1) शोषित जनआंदोलन
2) जबरनजोत आंदोलन कृती समिती
3) श्रमजीवी संघटना
4) श्रमिक संघटना
5) भूमिसेना
6) लेखा-मेंढा गावातील आदिवासी स्वशासनाचा आग्रह
7) रायगडमधील दळी जमिनींचा प्रश्न
पाणीप्रश्नावरील काम -
• या काळात महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थांनी पाण्याच्या प्रश्नांवर फार धडाकेबाज काम केलं. सध्याच्या जलयुक्त शिवार योजना किंवा ’पाणी फाउंडेशन’च्या कामाचा पाया याच वीस वर्षांत घातला गेला. इतकं काम दुसरीकडे झालं नसेल. पुढील संस्थांच्या प्रयत्नाने अनेक कामे पार पडली -
1) ’अफार्म’चा ’इंडो-जर्मन वॉटरशेड प्रकल्प’
2) ’आफ्रो’
3) ’ग्रामायन’
4) ’मानवलोक’
5) ’मराठवाडा ईको ग्रुप’
• गडचिरोली जिल्ह्यात ’सर्च’सारख्या संस्थेनी केलेलं काम व संशोधन देशात व बाहेरही नव्या आरोग्य योजना आखताना कामाला येते.
• या काळात एका विषयाला वाहून घेतलेली संस्था-संघटनांची नेटवर्क्स आपल्याला दिसतात. त्यात जमीन अधिकार आंदोलन असो किंवा सेहत, मेडिको फ्रेंन्ड्स सर्कल असो. आरोग्याच्या क्षेत्रात किती तरी मूलगामी काम ह्या मंडळींनी केलं.
सीएसआर व महिला बचतगट (2000 चे दशक) -
• 1995 च्या सुमारास यातल्या काही संस्था संघटना स्थिरावल्या आणि त्यांनी संशोधन, धोरण समर्थन (अॅडव्होकसी), माध्यम समर्थन (मीडिया अॅकव्होकसी) अशी कामं सुरू केली. एखाद्या विषयाला किंवा प्रश्नाला वाहून घेतलेली असंख्य उदाहरणं या काळात उभी राहिली.
• प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य दिलेल्या ’प्रथम’ सारख्या संस्थेचा या काळातला विस्तार अद्भुत आहे. एखाद्या उद्योग संस्थेला बरोबर घेऊन, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचं (सीएसआर) प्रकरण सुरू होण्याआधी, निधी संकलन करत करत त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या दूरवस्थेवर नेमकं बोट ठेवलं आणि उत्तरं शोधली.
• 1995 नंतर महिलांचा, मुख्यत: स्थानिक, राजकारणात सहभाग वाढावा, म्हणून जे कायदे आले त्या आधारानं उभं राहिलेलं ’महिला राजसत्ता आंदोलन’ हे आणखी एक उदाहरण. खेडोपाड्यातील महिलांनी राजकारणात यावं म्हणून काम करत असलेल्या या आंदोलनांनी खूप खोलवर घडवून आणला.
• 1995 नंतर महिला बचत गटांनी ग्रामीण गरीब आणि शहरी कष्टकरी महिलांचं भावविश्व आर्थिक स्वावलंबनाच्या ध्यासानं भरून टाकलेलं दिसतं.
सेवा आणि विकास -
• आध्यात्मिक किंवा धार्मिक प्रेरणेतून शुद्ध ’सेवा’ असा हेतू ठेवून गेल्या 30-35 वर्षांत मोठी कामं महाराष्ट्रात उभी राहिली. नानासाहेब धर्माधिकारी किंवा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून किंवा काही देवस्थानांच्या प्रतिष्ठानातून उभी राहिलेली विकासकामं. या कामातला सेवा, करुणा आणि सुविधा उभारणी करण्याचा भाव मोठा आहे. कित्येकांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा आणि संधी या कामांनी दिली. अशी असंख्य कामं आहेत.
वर्तमान आणि भवितव्य (2010 चे दशक) -
• गेल्या दहा-पंधरा वर्षांत मात्र महाराष्ट्राची सामाजिक स्वयंसेवी चळवळ थिजल्यासारखी दिसते. एकेका विषयाला वाहून घेऊन काम करता करता त्यांच्या कामाची बेटं झाली. व्यापक परिवर्तनाशी, राजकारणाशी त्यांची नाळ तुटली. स्वयंस्फूर्त ऊर्मीपेक्षा ’प्रकल्प राबवण्याच्या यंत्रणा’ असं काहींचं स्वरूप झालं. यात मग सीएसआर शिरलं. त्यानं उद्योगसंस्थांच्या प्राधान्यांना महत्त्व आलं.
• लोकाधार कमी कमी होत कंपनी-आधार, सरकार-आधार किंवा फंडिंग-एजन्सी आधार महत्त्वाचा झाला. मग सिनेअभिनेते येऊन पाणी कसं वाचवायचं, याचे धडे देऊ लागले. त्यांच्या प्रसिद्धीचा लखलखाट आला. मागोमाग माध्यमं आली. महाराष्ट्रातील सामाजिक कामाचा सूरताल बदलला.
• फुले असोत किंवा गांधी किंवा आणखी कुणी. समाजाकडे पाहण्याचे त्यांनी दिलेले चष्मे आता उपयोगाचे ठरतीलच, याची खात्री नाही इतकं वास्तव बदललं आहे. एकेकाळी या क्षेत्रानं महाराष्ट्राचं वैचारिक पुढारपण केलं; पण आता माहीत नाही, कारण स्वयंसेवी क्षेत्राच्या मागे अस्वस्थ समाजही उभा असावा लागतो. ते झालं नाही, तर इतिहास गौरवशाली आहे; पण पुढे काय होईल माहीत नाही.