मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी

  • मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी

    मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी

    • 01 Mar 2021
    • Posted By : study circle
    • 1442 Views
    • 2 Shares

     मराठी भाषा गौरव दिन : 27 फेब्रुवारी 

     


    मराठी मातृभाषेला गौरव व महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी  ’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेतला. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.

     
    • महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964’ नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 
    •• मराठी राजभाषा दिन - करण्यात येतो. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून 1997 पासून 1 मे हा दिवस ’राजभाषा मराठी दिन’म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने 10 एप्रिल 1997 रोजी प्रसिद्ध केला.

    मराठी भाषेसंदर्भात ठळक नोंदी -
    •• मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. 
    •• भाषाकुळ - इंडो-युरोपीय, इंडो-आर्य, इंडो-आर्य दक्षिण विभाग,  महाराष्ट्री प्राकृत, मराठी-कोंकणी
    • लिपी - देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची)
    •• मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. 
    •• लोकसंख्या - 8.5 कोटी (प्रथमभाषा), 2 कोटी (द्वितीयभाषा). 2011 च्या जनगणनेनुसार, भारत देशात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. 
    •• मराठी मातृभाषा असणार्‍या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. 
    •• जागतिक मानांकनात मराठीचा क्रमांक 15 वा आहे. 
    •• भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टातील 22 अधिकृत भाषांत मराठी आहे.
    •• राज्यभाषा- महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली
    •• महाराष्ट्राची राजभाषा असलेली मराठी गोव्याची सह राजभाषा आहे. 
    •• दमण-दीव व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातही तिला सह राजभाषेचा दर्जा आहे. 
    •• बोलीभाषा -अहिराणी, कोकणी, कोळी, आगरी, माणदेशी, मालवणी,वाडवळी वर्‍हाडी,हलबी
    •• महाराष्ट्राव्यतिरिक्त गोव्यात मराठी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. त्याशिवाय मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यातही मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. तमिळनाडू, केरळमध्येही काही प्रमाणात मराठी भाषक आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थानातही मराठी भाषक आहेत. 
    •• मॉरिशस, इस्रायल, अमेरिका, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासह इतर अनेक देशांत मराठी भाषक मोठ्या प्रमाणात आहेत. 

    कुसुमाग्रज -
    •• मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला. 
    •• नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर विविध नियतकालिकांचे व वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 
    •• कुसुमाग्रज या टोपणनावाने त्यांनी कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. 
    •• वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 
    •• ’नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला’ ही त्यांची नाटके. 
    •• ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. 
    •• मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कोल्हापुरातील मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. 
    •• या कविश्रेष्ठांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले.

    मराठी भाषिक प्रदेश -
    •• मराठी भाषा मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, उत्तर कर्नाटक (बेळगांव, हुबळी-धारवाड, गुलबर्गा, बिदर, कारवार), गुजरात (दक्षिण गुजरात, सुरत, बडोदा व अहमदाबाद), आंध्रप्रदेश (हैदराबाद), मध्यप्रदेश (इंदूर, ग्वाल्हेर), तामिळनाडू (तंजावर) व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण, दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील 36 राज्यंमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. इतरही अनेक देशांमध्ये मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे.
    •• 72 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. मराठी भाषा भारतासह,फिजी,मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते. जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथेही बोलली जाते.

    राजभाषा -
    •• भारतीय राज्यघटनेतील 22 अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. 
    •••     मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. 
    •• गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी मराठीचा वापर शासनाच्या सर्व कारणासाठी होऊ शकतो. शासनाशी मराठीत होणार्‍या पत्रव्यवहाराचे उत्तर मराठीतच दिले जाते. 
    •• दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे.
    •• महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत मराठीच्या उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा विद्यापीठ (पणजी), महाराजा सयाजीराव विद्यापीठ (बडोदे), उस्मानिया विद्यापीठ (तेलंगण), गुलबर्गा विद्यापीठ, देवी अहिल्या विद्यापीठ (इंदूर) व जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय (नवी दिल्ली) येथे मराठी उच्चशिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण 15 विद्यापीठांमध्ये मराठी शिकविली जाते.

    मराठी साहित्य संमेलन -
    •• 11 मे 1878 रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्षपद न्या. रानडे यांनी भूषविले.

    मराठी पुस्तके -
    •• ’लीळाचरित्र’ हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. 
    •• मराठीत दरवर्षी दोन हजार नवीन पुस्तके प्रकाशित होतात व सुमारे 500 दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. 
    •• नामवंत खासगी प्रकाशन संस्था आणि सरकारी प्रकाशने यांची वार्षिक उलाढाल, तसेच पाठ्यपुस्तके धार्मिक, ललित आणि वैचारिक ग्रंथ यांची एकत्रित बाजारपेठ सुमारे 250 कोटी रुपयांपर्यंत आहे. 
    •• सरकारी संस्था ’बालभारती’ दरवर्षी सुमारे 9 कोटी पुस्तके छापते. 
    •• भारतातील सर्वाधिक खपाच़े मासिक ’लोकराज्य’ आणि देशातले सर्वाधिक खपाचे पाचव्या क्रमांकाच़े वर्तमानपत्र ’लोकमत’ हे आहे. 
    •• देशभरातील एकूण ग्रंथालयांतली 25 टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.
    •• अनुवाद, भाषांतर या बाबतीतही मराठी पुस्तके हिंदीच्या पुढे आहेत. इंग्रजी वा अन्य भाषांतील पुस्तकांचे जेवढे अनुवाद मराठीत प्रसिद्ध होतात, तेवढे इतर भाषांतही होत नसावेत. 

    मराठी विश्वकोश -
    •• अनेक प्रकारचे कोश मराठीत आहेत. या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
    •• संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र शासनाने 19 नोव्हेंबर 1960 ला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली केली. या मंडळाने मराठी विश्वकोशाची निर्मिती केली. 
    •• श्री. व्यं. केतकरांनी मराठीतील पहिला ज्ञानकोश एकहाती लिहिला. मराठी विश्वकोश ही ज्ञानकोशाची सुधारून वाढवलेली आवृत्ती आहे.
    •• शब्दार्थ कोशांव्यतिरिक्त मराठी भाषेत अर्वाचीन चरित्र कोश, प्राचीन चरित्र कोश (सिद्धेश्वरशास्त्री चित्राव), तत्त्वज्ञानकोश, तुलनात्मक भाषा विज्ञान (भोलानाथ तिवारी+उदय नारायण तिवारी+पांडुरंग दामोदर गुणे) वाङ्मय कोश, विश्वकोश, समाजविज्ञान कोश, सरिता कोश, संस्कृती कोश, स्थलकोश, ज्ञानकोश (श्री.व्यं केतकर), असे 

    पुरस्कार -
    •• विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, वि.स. खांडेकर आणि भालचंद्र नेमाडे अशा 4 मराठी साहित्यिकांना आजवर ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले आहेत.
    •• भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
    •• ’मूर्तिदेवी पुरस्कार’ शिवाजी सावंत यांना मृत्युंजय या कादंबरीसाठी मिळाला आहे.
    •• महेश एलकुंच़वार आणि विजय तेंडुलकर या लेखकांना ’सरस्वती सन्मान’ मिळाले आहेत.
    •• विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांना ’कालिदास सन्मान’ मिळाले आहेत.
    •• महाराष्ट्रातले दादासाहेब फाळके यांचा नावाने ’अखिल भारतीय कला सन्मान’ दिला जातो.
    •• भारतीय संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार बालगंधर्वना मिळाले आहेत.
    •• सर्वोत्तम चित्रपटाचे पहिले राष्ट्रपती सुवर्णकमळ आचार्य अत्रे यांच्या ”श्यामची आई” चित्रपटास मिळाले होते.
    •• डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, पां.वा. काणे, भीमसेन जोशी, जे.आर.डी. टाटा, सचिन तेंडुलकर, विनोबा भावे आणि लता मंगेशकर हे आजवरचे भारतरत्न पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रीय.

    मराठी मुळाक्षरे -
    •• मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीची मुळाक्षरे हीच बहुसंख्य (पण सर्व नाही) मराठी मुळाक्षरे होत. 
    •• यात 19 स्वर आणि 36 व्यंजने आहेत. 
    •• देवनागरी लिपीत नसलेली ऑ, दीर्घ ॠ, दीर्घ , दंततालव्य च, छ, झ,आणि र्‍य, र्‍ह ही खास मराठी अक्षरे आहेत.

    • स्वर -
    •अ आ  ऑ इ ई उ ऊ ऋ ॠ  
    ए ऐ ओ औ अं अः

    • व्यंजने -
    क ख ग घ ङ
    च छ ज झ ञ
    ट ठ ड ढ ण
    त थ द ध न
    प फ ब भ म
    य र ल व
    श ष स ह ळ
    क्ष ज्ञ

    •• विशेष - ’ङ’ आणि ’ञ’ चा उच्चार हा, ’ण’ किंवा ’न’ प्रमाणेच नासिक्य होतो.
    •• ’ङ’ हा ’ड’ नाही. तसेच ’ञ’ हे ’त्र’ नाही. उदाहरणार्थ- अङ्क=अंक, मञ्जूषा=मंजूषा.

    • आधुनिक तंत्रज्ञान आणि मराठी लेखन -
    • संगणकीकरणाच्या सुरूवातीच्या काळात मराठी लेखनासाठी विविध अडचणी होत्या. काळानुसार आणि वापरलेल्या तंत्रज्ञानानुसार संगणकावरील टंकलेखनपद्धतीचे पूर्व-टंकनपद्धती आणि आधुनिक टंकनपद्धती असे दोन प्रकार आहेत -
    •• पूर्व टंकनपद्धती -युनिकोडच्या अगोदर ही टंकन पद्धती अस्तित्वात होती. यात इंग्रजी फॉन्टच्या ज़ागेवर मराठी फॉन्ट टाईप करता येत असत. (उदा. शिवाजी, कृतिदेव, किरण इत्यादी फॉन्ट). तसेच पूर्वप्राथमिक अवस्थेत मराठी भाषेत टंकलेखनासाठी अनेक सॉफ्टवेअर बनविण्यात आली होती.
    •• आधुनिक टंकनपद्धती-आधुनिक टंकन पद्धतीत युनिकोड टंक व त्या विविध की बोर्डसचा समावेश होतो.
    •• युनिकोड टंकनपद्धती - कगप हा भाषाशास्त्रानुसार विकसित केलेला की बोर्ड असून तो शब्द उच्चारणपद्धतीनुसार विकसित केलेला आहे. हा की बोर्ड लिनक्स ऑपेरेटिंग सिस्टिमवर उपलब्ध आहे. विंडोजसाठी शुभानन गांगल याच़े सोपी मराठी सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. या दोन्ही टंकनपद्धतीत फार थोडा फरक आहे.
    •• देवनागरी इनस्क्रिप्ट - ज्यांना पारंपरिक टंकन यंत्रावर टंकलेखनाचा सराव आहे, अशांसाठी देवनागरी इनस्क्रिप्ट हा पर्याय विंडोज़ आणि लिनक्स या परिचालन प्रणालींवर मिळतो.
    •• प्रथमत: मराठी छपाई क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या विविध मराठी मुद्रांमध्ये एकमानकता (स्टँडर्डायझेशन) नसल्यामुळे सुसंगती (कंपॅटिबिलिटीही) नसते. टंकणयंत्रावरील मराठी लिपीसाठीचा कळफलक अजून प्रमणित होऊ शकलेला नाही. त्यामुळे एक माणूस अनेक टंक वापरू शकत नाही. यासाठी राज्य मराठी विकास संस्था प्रयत्नशील आहे.
    •• मराठीचे टंक (फॉन्ट) हे व्यापारी तत्त्वावर निर्माण केले असल्याने ते महाग किंमतीला विकत घ्यावे लागतात. त्यामुळे त्यांचा वापर मर्यादित होतो व सर्वसामान्य जनतेला ते सहजासहजी मिळत नाहीत. सी डॅक या संस्थेने निर्माण केलेले टंक मोफत उपलब्ध आहेत. मात्र असे टंक मर्यादित संख्येत आहेत.
    •• हे व्यापारी मराठी फॉन्ट विकताना ग्राहकाच्या गरजेनुसार त्याला टंकांमध्ये - एनएअसआय ते युनिकोड असा पर्याय पुरवत नाहीत.
    •• आंतरजालावर शोध घेण्यासाठी युनिकोडचा वापर गुगलसारख्या शोध यंत्रामध्ये करता येतो. आपोआप डाउनलोड होणारे डायनामिक टंक युनिकोड कंपॅटिबल नसल्यामुळे शोध यंत्रात चालत नाहीत.
    •• युनिकोड धर्तीचे टंक विंडोज 2000 व त्या पुढील प्रणालींबरोबर मुळातच असतात. जुन्या विंडोज प्रणाली वापरणार्‍यांना युनिकोड वापरणे जड जाते. परंतु लिनक्सवर आधारित संचालन प्रणालींत युनिकोडचा मूळ म्हणून वापर केल्यामुळे अशा संगणकांवर मराठी वापरताना कमी समस्या येतात.
    •• हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेले असल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात. परंतु काही अक्षरे मराठीसाठी विशेष आहेत, ती सगळी टाईप करता येतील असे टंक कमी आहेत.
    •• सध्या युनिकोडमुळे मराठी ही संगणकावर बरीच स्थिरस्थावर झालेली आहे आणि मराठी टंकलेखनाचे अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत.

    मराठी आणि परिचालन प्रणाली -
    •• मराठी ही भाषा काही मोजक्या परिचालन प्रणालींमध्ये उपलब्ध आहे. त्यात सर्वात मोठा हिस्सा हा लिनक्स या परिचालन प्रणालीचा आहे. याव्यतीरिक्त मायक्रोसॉफ्ट विंडोज् आणि अ‍ॅपल मॅकओएस या परिचालन प्रणालींमधेही मराठी भाषा कमी-अधीक प्रमाणात उपलब्ध आहे.
    •• युनिकोड तक्ता - हा तक्ता देवनागरी लिपीसाठी आहे, यातील काही अक्षरे मराठीत वापरली जात नाहीत आणि मराठीतील काही अक्षरे या तक्त्यात नाहीत.
    •• बोलनागरी -यामध्ये लिप्यंतर तंत्रज्ञानाचा वापर करून सॉफ्टवेअर च्या माध्यमातून मराठी टंकन करतात. ही पद्धती खासकरून कुठलेही प्रशिक्षण न घेता टंकन करणार्‍या लोकांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहे. लिप्यंतरसाठी पुढील सॉफ्टवेअर लोकप्रिय आहेत.
    1) मायक्रोसॉफ्ट इंडिक टूल : इंडिक टूल हे मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केले आहे. हे विंडोजच्या विविध  प्रणाल्यांवर चालते.
    2) गूगल इनपुट टूल :  हे गूगल या कंपनीने विकसित केलेले सॉफ्टवेअर विंडोज बरोबरच गूगल क्रोम ब्राउजरच्या साहाय्याने कुठल्याही प्रणालींवर चालू शकते.
    3) ओसीआर तंत्रज्ञान - या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठीतील स्कॅन केलेले दस्तऐवज, छायाचित्रांचे स्वयंचलित पद्धतीने टंकन करता येते. टेसरॅक्ट ओसीआर हे सॉफ्टवेअर लिनक्स परिचालन प्रणालीवर उपलब्ध आहे.
    मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासाकरिता कार्यरत संस्था -
    4) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
    5) मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
    6) विदर्भ साहित्य संघ 
    7) महाराष्ट्र साहित्य परिषद 
    8) मराठवाडा साहित्य परिषद 
    9) कोकण मराठी साहित्य परिषद 
    10) बालकुमार साहित्य मंच, सोलापूर 
    11) अभिजात मराठी भाषा परिषद 
    12) भाषा सल्लागार मंडळ 
    13) भाषा संचालनालय
    14) विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ 
    15) भाषा सल्लागार समिती
    16) विधी अनुवाद व परिभाषा सल्लागार समिती 
    17) राज्य विकास मराठी संस्था (1992) : (केवळ पुस्तक प्रकाशने आणि ग्रंथप्रदर्शने आयोजित करण्याचे काम करीत राहिल्याने या संस्था-स्थापनेचा मूळ हेतू बारगळला आहे) 
    18) मराठी भाषा अभ्यास परिषद
     
    एकविसाव्या शतकातील मराठी
    ••• मराठीत 10 उपग्रह चॅनेल्स आहेत. त्यात सात रंजनात्मक आणि तीन पूर्णवेळ बातम्यांची चॅनेल्स आहेत. ही सर्व चॅनेल्स आता  सर्व डीटीएच कंपन्यांना घ्यावी लागली आहेत. 
    ••• मराठी प्रेक्षकांच्या दबावामुळे झी, स्टार यांना मराठीत उतरावे लागले, तेही रंजन आणि बातम्या या दोन्ही विभागात. 
    ••• राज्याच्या जवळपास सर्व शहरांत एफएम सेवा सुरू आहे. एकेका शहरांत एकापेक्षा जास्त एफएम स्टेशन्स आहेत. मुंबई व पुणे वगळता बहुतांश ठिकाणी एफएम स्टेशन्स मराठीतून चालवली जातात.
    ••• मराठीत दर्जेदार चित्रपट बनू लागल्याने हिंदीतील चित्रपट निर्मिती कंपन्या मार्केट लक्षात घेऊन मराठीत उतरल्या आहेत. झी टॉकीजने स्वतःच्या बळावर चित्रपट काढून ते यशस्वी करून दाखवले. त्यानंतर इरॉस, एबी कॉर्प्स, मुक्ता आर्टस यासह अनेक कंपन्या मराठीत आल्या आहेत. 
    ••• देशभरातील 14 प्रमुख वर्तमानपत्रांच्या वाचक सर्वेक्षणाचा आढावा घेतल्यास पाचव्या क्रमांकाला लोकमत आणि चौदाव्या क्रमांकावर सकाळ हे दैनिक आहे. (आधार-रिडरशीप सर्व्हे) 
    ••• मराठीतील प्रकाशन संस्थांची संख्याही लक्षणीय आहे. हिंदी भाषक प्रदेश मोठा असला तरी पुस्तके खपण्याच्या बाबतीत तो प्रांत तितका सुपीक नाही. त्या तुलनेत मराठीत वाचन मोठ्या प्रमाणात होते, शिवाय पुस्तकेही बक्कळ निघतात.
    ••• मराठी लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांच्या भाषेमार्फत पोहोचले पाहिजे, हे व्यावासायिकांना बरोबर कळते. बहुतांश उत्पादनांच्या जाहिराती आता मराठीतून कराव्या लागल्या आहेत. उत्पादनांची पोस्टर्स होर्डिंग्जही मराठीतून येऊ लागली आहेत. अनेक उत्पादनांची माहितीपत्रके मराठीतून येऊ लागली आहेत. बर्याच बँकांनी आता आपल्या एटिएमची सेवा मराठीत देऊ केली आहे. 
    ••• अनेक कंपन्यांच्या कॉल सेंटरवर मराठीतून उत्तरे दिली जाऊ लागली आहे. 
    ••• मराठी लोकांची भाषाविषयक जागरूकता गेल्या काही वर्षांतील आंदोलनांमुळे वाढली आहे. 
    ••• मराठी भाषक ग्राहका द्धता ंना हाताळण्यासाठी मराठी बोलता येणार्या किंवा जाणार्या विक्रेत्याची, अधिकार्याची नियुक्तीही आता केली जाऊ लागली आहे, हे मराठी माणसाच्या मार्केटमधील ताकदीचेच यश आहे.
    ••• इंटरनेटच्या विश्वात युनिकोड आल्यापासून तर मराठीची छाती आणखी रूंद झाली आहे. वर्तमानत्रांच्या साईट्स तर मराठीत आहेत, पण त्याशिवायही अनेक नवनवीन मराठी साईट्स सुरू झाल्या आहेत. 
    ••• मराठी वेबविश्वाची समृअक्षरशः दीपवणारी आहे. मराठी विकीपेडीयातील लेखांची संख्या पंधरा हजाराच्या पलीकडे गेली आहे. गुगलच्या जवळपास सर्व सेवा मराठीतही आहेत. गुगलच नव्हे तर मायक्रोसॉफ्टपासून ते इतर अनेक कंपन्यांनी आपली सॉफ्टवेअर्स मराठीत आणली आहेत. त्यासाठी कोणतीही आंदोलने करावी लागली नाहीत, हे विशेष. मराठी ब्लॉगविश्व तर वेगाने विस्तारते आहे. एकट्या मराठी ब्लॉगविश्व. कॉमवर नोंदणी झालेल्या ब्लॉगची संख्या सोळाशेच्या पलीकडे गेली आहे.
    ••• सिटी बँकेचे अध्यक्ष विक्रम पंडितांपासून अनेक महत्त्वाच्या व्यावसायिक जागांवर मराठी माणसे आसनस्थ आहेत. त्यांचे कर्तृत्व तेजाने झळाळून उठते आहे. ही माणसे मराठी माणसांचे आयकॉन ठरली आहेत. त्यांची मार्केटमधील उंची आपसूक मराठी माणसालाही उंची गाठून देते. त्याचवेळी सामाजिक क्षेत्रातील मराठी माणसांचे कर्तृत्वही त्याच्या वृत्तीचे निदर्शक आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी इतर भाषकांनाही आदर आहे. प्रकाश आमटेंपासून अभय बंगांपर्यंत मोठ्या उंचीची ही मंडळी माणुसकी कवेत घेणारी असली तरी त्यांचे मराठीपणही कळत नकळत अधोरेखित होत असते हे नाकारूनही चालणार नाही.
     
     
    मराठी भाषेचा इतिहास 
    मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. येथील सह्याद्री, सातपुडासारख्या डोंगररांगा, गड व किल्ले, दर्‍याखोर्‍यांचा परिसर म्हणजेच महाराष्ट्र भूमी. या भूमीपेक्षाही अधिक राकट, कणखर असा मराठी माणूस. 

    आद्य काळ -
    • हा काळ इ.स. 1200 पूर्व, म्हणजे लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा लिखाणाचाही पूर्वीचा काल होय. या काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात तसेच़ शिलालेखात आढळतात.
    •• मराठी भाषेचे वय हे साधारणपणे 1500 वर्ष मानले जाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलली. 
    •• संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेचा विकास महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानतात. 
    •• पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. 
    •• मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहितात. 
    •• इ. स. 500-700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. 
    •• शके 905 मधील श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर ’श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. 

    इ.स. 1012 - राजा केसिदेवरायाचा अक्षी शिलालेख -
    •• अक्षीचा देवनागरीतील मराठी शिलालेख हा श्रवणबेळगोळच्या आधीचा आहे. नाणेघाटातील 2200 वर्षांपूर्वीचा ब्राह्मीतील शिलालेख हा आजपर्यंत सापडलेला सर्वांत प्राचीन मराठी (महाराष्ट्री) शिलालेख आहे. राजा केसिदेवरायच्या कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा मराठी भाषेतील पुराणतम शिलालेख आहे.  अक्षी हे गाव महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून दक्षिण दिशेस 5 कि.मी. अंतरावर अलिबाग- मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे. या शिलालेखाचा उल्लेख  1883 च्या कुलाबा गॅझेटियरमध्ये आहे. 
    •• हा लेख एका ओबडधोबड शिळेवर कोरला असून त्या शिळेचा माथ्यावर चंद्रसूर्य आणि मजकुराखाली गद्धेगाळ व शेवटी पुन्हा चंद्रसूर्य असे कोरीवकामाचे स्वरूप आहे. लेख देवनागरी लिपीत असून भाषा संस्कृत व मराठी मिश्र आहे. इंग्रजी काल गणनेनुसार या लेखाची तारीख 16 मे 1012 अशी आहे.
    • त्या शिलालेखावरील वरील मजकूर खालीलप्रमाणे -
    गी सुष संतु । स्वस्ति ओं । पसीमस-
    मुद्रधीपती ।श्री कोंकणा चक्री-
    वर्ती । स्री केसीदेवराय । महाप्रधा-
    न भइर्जु सेणुई तसीमीनी काले
    प्रव्रतमने । सकु संवतु : 934 प्रधा-
    वी संवसरे: अधिकु दिवे सुक्रे बौ-
    लु । भइर्जुवे तथा बोडणा तथा नौ
    कुंवली अधोर्यु प्रधानु । महलषु-
    मीची वआण । लुनया कचली ज
    •• अर्थ : जगी सुख नांदो. ओम पश्चिम समुद्राधीपती श्री कोकण चक्रीवर्ती श्री केसिदेवराय यांचा महाप्रधान भइर्जु सेणुई याने शक संवत 934 परिधावी संवत्सर अधिक मासात शुक्रवारी वद्यपक्षात देवीचा बोढणासाठी नऊ कुंवली धान्य दान केले. लुनया हे लेख कोरणार्‍याचे नाव आहे.

    इस. 1018 - कुडलचा शिलालेख-  
    •• कुडल संगम, ता. दक्षिण सोलापूर येथील मराठी शिलालेख - वाछि तो विजेया होईवा ॥’ कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. 
    •• भीमा व सीना या दोन नद्यांचा संगमावर वसलेल्या या गावात चालुक्यकालीन संगमेश्वर मंदिर आहे. त्याची स्थिती बर्‍यापैकी असून तेथील सभामंडपातील तुळईवर अडीच़ ओळींच़ा लेख कोरलेला आहे. 
    •• त्याच़ा काही भाग संस्कृत काही भाग मराठी आहे. शेवटच़े वाक्य वाछि तो विजेया होईवा ॥’ असे मराठीत आहे. त्यात काळाच़ा स्पष्ट उल्लेख आहे. 
    •• तेथे शके 940 असे कोरले आहे. साधारणतः इ.स. 1018 या काळात तो कोरला गेला असावा. 

    इ.स. 1060 - दिवे आगार ताम्रपट-
    •• श्रवणबेळगोळच्यानंतर दिवे आगार ताम्रपटाच़ा शोध लागला. 
    •• त्याच़ा काळ शके 982 (इ.स. 1060) होता. त्यानंतर कुडलचा शिलालेखाच़ा शोध लागला.

    इ.स. 1109 - परळ, मुंबई येथे आढळलेला शिलालेख -
    •• कालानुक्रमे मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. पुढील प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात -
    1) 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 
    2) 1600 ते 1700 या काळातील शिवरायांची सत्ता
    3) 1700 ते 1818 या काळातील पेशवाई सत्ता 
    4) 1818  ते 1947 या काळातील इंग्रजी सत्ता
    •• काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.

    यादव काळ-
    •• हा काळ 1250 ते 1350 असा आहे. 
    •• देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. देवगिरीचा यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता. अनेक लेखक व कवी यांना राजाश्रय होता. 
    •• या काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. चक्रधर स्वामी, भावे व्यास, महिंद्र व्यास, नागदेव आणि महदंबा यांनी मराठी वाङमयात महत्त्वाची भर घातली. 
    •• मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडतात. शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. 
    •• 1278 मध्ये म्हाइंभट /श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली. महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. 
    •• या काळात वारकरी संप्रदायास सुरुवात झाली. महाराष्ट्राचा बहुतेक सर्व जातीत यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. नामदेवशिंपी, गोरा कुंभार,नरहरी सोनार, सावता माळी, चोखा मेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांनी भक्तिपर काव्यरचना केल्या व मराठी साहित्याच़े दालन वैविध्यानी समृद्ध केले.
    •• 1290 मध्ये भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. ज्ञानेश्र्वरांनी ’परि अृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. 
    •• संत एकनाथ यांनी मराठी भाषेत भारुडे लिहिली. त्यांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण 10 आदि ग्रंथांची ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.  

    बहामनी काळ -
    •• हा काल इ.स. 1350 ते इ.स. 1600 असा आहे. 
    •• यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ’तारीख’सारख्या अनेक फारसी शब्दांच़े आगमन झाले. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. 
    •• नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णुदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.

    छत्रपती शिवाजी महाराजांच़ा काळ -
    •• हा काळ इ.स. 1600 ते इ.स. 1700 असा आहे. 
    •• या काळात मराठी स्वराज्याची स्थापना झ़ाल्याने मराठी भाषेवरील फारसी शब्दांच़े आक्रमण थंडावले. त्या काळात राजकीय पत्रव्यहार, बखरी लिहिण्यासाठी मराठीचा वापर केलेला दिसून येतो. या पत्रांचा समावेश ’मराठी रुमाल’ किंवा ’पेशव दफ्तर’ या सारख्या संग्रहातून करण्यात आला आहे. 
    •• शिवाजी महराजाम्नी रघुनाथ पंडित यांना संस्कृत ऐवजी मराठी शब्द योजना करण्यास सांगितले. 
    •• याच़ काळात मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांचामुळे लोकमान्यताही मिळू लागली. मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. 
    •• या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
    •• छत्रपती शिवाजी महाराजांच्या ’आज्ञापत्रात’ मराठी भाषेची बदललेली शैली दिसून येते. तसेच यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा प्रभाव भाषेवर पडत असतो, हे सिद्ध होते.

    पेशवे काळ -
    •• हा काल इ.स. 1700 ते इ.स. 1818 असा आहे. 
    •• पेशवेकाळात मराठी भाषेवर संस्कृतचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. या कालखंडात संस्कृत काव्याचे अनुकरण करणारी पंडिती कविता लिहिल्या गेल्या. यातील कथाभाग, अलंकारिकता, अभिजात भाषावैभव या विशेषामुंळे पंडिती कवितेने मराठीला समृद्ध केले आहे. 
    •• याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. रघुनाथ पंडित यांनी रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती, स्वयंवर अशी अजरामर काव्ये लिहिली. 
    •• श्रीधर या कवीने आपले हरिविजय व पांडव ,प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या. 
    •• याच काळात शृंगार व वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. लोकजीवनाशी व लोककलांशी जवळीक साधणारी शाहिरी कविता आकाराला आली. भक्तीपासून ते शृंगारापर्यंतचे अनेक अनुभव खास मराठमोळ्या शैलीत साकार करणार्‍या शाहिरांच्या कविता हे मराठी कवितेचे एक भूषण आहे. निरंजन माधव, कृष्ण दयार्णव, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ हे या काळातील महत्त्वाचे कवी आहेत.
    •• याच़ काळात वाङ्मय हा रंजनाच़ा प्रकार आहे हे समाजाने मान्य करण्यास सुरुवात केली. 
    •• याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झाली.
     
    इंग्रजी कालखंड -
    •• हा काळ इ.स. 1818 ते  1947 असा आहे. 
    •• पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेत मराठी भाषेची संरचना काही प्रमाणात बदलली. इंग्रजांनी महाराष्ट्रात आपली सत्ता स्थापन केली. इंग्रजी साहित्याच्या प्रभावामुळे मराठीत निबंध, कादंबरी, लघुकथा, शोकात्मिका  असे  नवे साहित्यप्रकार मराठीतून लिहिले जाऊ लागले. 
    •• याकाळात गद्य लेखनाची सुरुवात झाली. कथा लेखनाची बीजे याच़ काळात रोवली गेली. 
    •• नियतकालिके व गद्यसाहित्य छापण्याची सुरुवात होण्याच़ा हा काल होता. मराठी भाषेत अनेक नियतकालिके या काळात कथा छापू लागली.
    •• छपाईची सुरुवात झ़ाल्यानंतर मराठी भाषेचा प्रसार उत्कर्ष वेगाने होत गेला. 
    •• मराठी पंडित व मराठी भाषेचे अभ्यासक मेजर कँडी या आंग्ल अधिकार्‍याने मराठी भाषेला विराम, अर्धविराम, प्रश्न आदी विरामचिन्हांनी बांधले. यामुळे मराठी लिखाण सुकर झाले.
    •••    ’केशवसुत’ हे या आधुनिक कवितेचे प्रवर्तक होते. आधुनिक कवितेमध्ये कवींच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचा भावनांचा आविष्कार दिसून येतो. कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंधही महत्त्वाचे ठरत असल्याने सामाजिक जाणिवेने मराठी कवितेला नवे वळण देण्याचे कार्य मर्ढेकरांच्या कवितेने 1940-45च्या काळात केले. मानवी जीवनातील असंगतता, मल्यांची पडझड, एकाकीपणा या कवितेतून व्यक्त होताना दिसतो.
    •• मराठी भाषेतील पद्य साहित्य आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा ’शेतकर्यांचा आसूड’ हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकरंचे झालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. 

    स्वातंत्र्योत्तर कालखंड -
    •• 1947 नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला. 
    •• 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला.
    •• वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. 
    •• 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक-सामाजिक वातावरण बहरून आलेले होते. 
    •• छबिलदास चळवळ जोमात होती. शेकडो उत्साही, नवर्जनशील तरुण आपापले मित्र घेऊन आणि खांद्याला झोळ्या अडकवून छबिलदासवर थडकत असत. 
    •• ‘युक्रांद’च्या तालमीत तयार झालेले तरुण, दलित पँथर्सचा साहित्यप्रक्षोभ, नक्षलवादाने प्रेरित झालेले नव-कम्युनिस्ट असे एक वातावरण तर दुसर्‍या बाजूला ‘अ‍ॅकॅडेमिक’ साहित्याचा व समीक्षेचा सरोजिनी वैद्य, विजया राजाध्यक्ष आदींचा वाङ्मयीन दबदबा. 
    •• ‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. मध्यवर्गीयांना रिझविण्याची संपूर्ण जबाबदारी पु.ल. देशपांड्यांवर पडली. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाले. 
    •• ‘घाशीराम कोतवाल’, ‘सखाराम बाईंडर’, ‘गिधाडे’ सत्तरीच्या पूर्वार्धातले. चिं. त्र्यं. खानोलकरांची ‘मिस्टरी’ आणि ‘कोकणी गूढ’ त्याचप्रमाणे दिलीप चित्रेंची, विलास सारंगांची बंडाळी याच काळातली. 
    •• ‘नेमाडी’ पंथातील नवविद्वान आणि भाऊ पाध्येंची ‘वासुनाका’ हीसुद्धा साठीच्या दशकातलेच. 
    •• ‘दलित पँथर्स’नी साठीच्या अखेरीस आणि सत्तरीच्या सुरुवातीस दिलेले आव्हान जितके उग्र तितकेच आश्वासकही होते.
    •• ‘माणूस साप्ताहिक’ आणि श्री. ग. माजगावकर यांनीही सर्व प्रस्थापितविरोधी प्रवृत्तींना एकत्र आणायला सुरुवात केली होती. ग. वा. बेहेरेंचे ‘सोबत’ही त्याच काळात दणाणत होते. 
    •• पु.ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेले इचलकरंजीचे साहित्य संमेलन हा एक साहित्याचा महाआनंदोत्सव होता. असाच आणखी एक नवीन प्रवाह त्या परिस्थितीत येऊन थडकला- ‘स्त्री-मुक्ती’ चळवळीचा. छाया दातार, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर अशा अनेकांनी सर्व वैचारिकतेला नवे परिणाम दिले होते. 
    •• बाळ गांगल या वातावरणाशी निकट होते, त्यांनी प्रकाशात आणलेले कित्येक पुढे थेट प्रथितयश झाले वा विद्रोही- प्रथितयश झाले.
    •• सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.

    अभिजात भाषा
    2021 मध्ये केंद्र सरकारने तमीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन 16 वर्षे पूर्ण झाली. मराठीला हा दर्जा देण्याचा प्रस्ताव अजूनही सरकार दरबारी प्रलंबित आहे. 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला. पण समृद्ध आणि सुंदर अशी ’मराठी’ भाषा  अभिजात असूनही तो दर्जा तिला मिळाला नाही. ’मराठी’ला इतिहास 2500 वर्षांपूर्वीचा असून जगातील 12 देशांतील तज्ज्ञांकडून मराठीच्या या प्राचीनतेचे पुरावे मान्य केले आहेत.  पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हालचाली सुरू झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. 

    • भारत सरकारने 2021 पर्यंत 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे -
    1) तामीळ
    2) संस्कृत
    3) कन्नड
    4) तेलुगू
    5) मल्याळम 
    6) उडिया

    अभिजात भाषा म्हणजे काय?
    एखाद्या भाषेस ’अभिजात’ दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील  निकष घालून दिलेले आहेत -
    1) भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा हवा (1500-2000 वर्षं या काळातील हवा).
    2) प्राचीन साहित्य हवे, जो त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतो.
    3) दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
    4) ’अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

    प्रा. रंगनाथ पठारे समिती-
    •• अभिजात मराठीसाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या ज्येष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या समितीमध्ये ख्यातनाम भाषा वैज्ञानिक प्रा. कल्याण काळे, प्रा. श्रीकांत बहुलकर, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. आनंद उबाळे, प्रा. मधुकर वाकोडे, श्री. परशुराम पाटील, हरी नरके असे तज्ज्ञ होते.  
    •• या सर्वांनी वर्षे भांडारकर संस्थेत आणि अन्यत्र चौफेर अभ्यास करून 436 पृष्ठांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. 
    •••    या अहवालात राजारामशास्त्री भागवत, ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकर, दुर्गा भागवत, के. एस. अर्जुनवाडकर, डॉ. ए. एम.  घाटगे, डॉ. अशोक केळकर, ल. रा. पांगारकर अशा असंख्य मान्यवरांचे संदर्भ दिलेले आहेत.

    • मराठी भाषा इसवी सनापूर्वी अस्तित्वात होती याचे पुरावे -
    1) इसवी सनापूर्वी 207 या वर्षी ब्राह्मी लिपीत परंतु मराठी भाषेत लिहिलेले शिलालेख सापडले आहेत.
    2) गाथा सप्तशती हा 700 श्लोकांचा मराठी ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेला. त्याचा अर्थ असा की ही भाषा त्या लिखाणाअगोदर किमान 300 वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. ग्रंथातील वर्णन आजही मराठी लोकांच्या आचार-विचारांशी आणि त्यांच्या सध्याच्या संस्कृतीशी जुळणारे आहे. ग्रंथात वापरलेले गेलेले काही शब्द मराठीखेरीज अन्य भारतीय भाषेत नाहीत.
    3) भांडारकर पुरातत्त्व संशोधन संस्थेमध्ये किमान 80 हस्तलिखिते मराठी भाषेचे पुराणत्व सिद्ध करणारी आहेत.

    •• रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र सरकारने छाननी व तपासणीसाठी साहित्य अकादमीकडे पाठवला. साहित्य अकादमीने नियुक्त केलेल्या जागतिक पातळीवरील सर्व भाषा वैज्ञानिकांनी हा अहवाल तपासला आणि त्याला लेखी मान्यता दिली. 
    •• 2017 साली ओडिया भाषेला अभिजात भाषेचा  दर्जा मिळण्याआधी पाच भाषांना हा दर्जा मिळाला होता. उडियाविरूद्ध मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती न्यायालयाने गुणवत्तेवर फेटाळली. भाषातज्ज्ञांचा शब्द शेवटचा असेल, असे या निकालात न्यायालयाने नमूद केले. मराठीबाबत अहवाल साहित्य अकादमीच्या भाषा वैज्ञानिकांनी एकमताने मान्य केलेला आहे.
    •• जागतिक कीर्तीचे भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी यांनी मराठी ही जगातील 6 व्या क्रमांकाची समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे, असे  ’बेळगाव तरुण भारत’मध्ये आवर्जून नमूद केलेले होते. 
    •• मराठीच्या प्राचिनत्वाचे पुरावे राजाराम शास्त्री भागवत, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, दुर्गा भागवत आदींनी दिलेले आहेत. ’कुवलयमाला’ या 1200 वर्षांपूर्वीच्या अभिजात ग्रंथात मराठी माणसे भांडकुदळ आहेत, असा उल्लेख आहे. 
    •• प्राचीन महारठ्ठी, मरहठ्ठी, महाराष्ट्री प्राकृत, अपभ्रंश मराठी आणि आजची मराठी असा मराठी भाषेचा प्रवास आहे. 1932 साली प्रसिद्ध विद्वान श्री. ल. र. पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील 3 नावे आहेत हे सिद्ध केलं आहे. त्यानुसार ’गाथासप्तशती’ हा महाराष्ट्री प्राकृतातील अर्थात मराठीतील ग्रंथ आहे.
    •• गाथासप्तशती तिसर्‍या शतकातील ग्रंथ आहे, त्यानंतर श्रवणबेळेगोळचा शिलालेख, नंतर संतसाहित्य असा मराठीचा प्रवास आहे. हाल, पादलिप्त, प्रवरसेन, हरीभद्र, उद्योतन सुरी असे अनेक मराठी लेखक मधल्या काळात झालेले आहेत. अभिजात अहवालामध्ये या संदर्भग्रंथ, हस्तलिखितांची प्रमाणे दिलेली आहेत.
    •• 1932 साली ल. रा. पांगारकर यांनी लिहिलेल्या मराठी साहित्याचा इतिहास या ग्रंथात महाराष्ट्री प्राकृत हे मराठीचंच आधीचं रूप आहे हे सप्रमाण मांडलेलं आहे. याशिवाय राजाराम शास्त्री भागवत यांच्या 1885 व 1887 च्या मर्हाठ्यासंबंधी चार उद्गार व मराठीची विचिकित्सा या दोन ग्रंथात तसेच प्राचीन महाराष्ट्र या डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या 1927 च्या ग्रंथात याचे विपुल संदर्भ आलेले आहेत. विदुषी दुर्गा भागवत यांनी असे म्हटले आहे की, प्राचीन महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी भाषा असल्याचे राजाराम शास्त्रींनी सिद्ध केलेले आहे.
    •• अभिजात दर्जामुळे मराठीची भाषिक प्रतिष्ठा वाढेल. मराठी माणसाचा अभिजात न्यूनगंड दूर व्हायला मदत होईल. मराठी माध्यमाच्या शाळांची दर्जावाढ, मराठी माध्यमातून शिकलेल्यांसाठी रोजगार निर्मिती, वाचन संस्कृतीचा विकास, बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्था, तज्ज्ञ, विद्यार्थी यांना पाठबळ, मराठीच्या 52 बोलींचे संशोधन, श्रेष्ठ मराठी ग्रंथ रास्त किमतीत उपलब्ध करून देणे आणि यांसारखे इतर अनेक उपक्रम यांना अभिजातमुळे बळकटी येईल.
    •• दाक्षिणात्य भाषांना अभिजात दर्जा मिळाला, म्हणून महाराष्ट्रातूनही अभिजातपणाची मागणी जोर धरू लागली. पुरातनत्व कमी पडलं की अनेकदा अत्यंत दूरान्वयाने संबंधित पुरावा किंवा लागूच न होणारा पुरावा म्हणून कोणत्यातरी प्राचीन भारतीय कालखंडातील ग्रंथाचे नाव आद्यग्रंथ म्हणून पुढे केले जाते. तसाच काहीसा ’महाराष्ट्री प्राकृता’शी मराठीचा संबंध प्रस्थापित करून तिसर्‍या शतकातील ’गाथासप्तशती’ (गाथासत्तसई असे महाराष्ट्री प्राकृतातील नाव) हा ग्रंथ आदिग्रंथ म्हणून पुढे करण्यात आला.  ’महाराष्ट्री प्राकृत’ आणि मराठीचा संबंध लावणे हे केवळ अटीत बसवण्याचा अट्टाहास होय. 
    •• संस्कृत ही एक अभिजात भाषा आहे, कारण त्या भाषेत अनेक प्राचीन ज्ञानपरंपरा, साहित्य, शास्त्रे यांचे जतन केलेले आहे. त्याच बरोबर या ज्ञानपरंपरांची साखळी खंडित होत किंवा अखंडपणे आजवर टिकलेली आहे. तीच परिस्थिती तामीळची आहे.
    •• मराठी अभिजात आहे हे सांगण्यासाठी चांगला पुरावा हवा. अस्सल प्राचीन साहित्यपरंपरा हवी, शास्त्रपरंपरा हवी. मराठी अभिजात नाही, कारण या परंपरा अकराव्या बाराव्या शतकानंतर जोरकसपणे दिसून येतात. त्या आधीच्या प्राकृतांच्या अवस्था अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी, अर्धमागधी इत्यादी आहेत. यापैकी एकीला मराठीची आदिम अवस्था ठरवणं हे कठीण आहे. तो कालविपर्यास आणि तर्कदुष्टता आहे.
    मराठी साहित्य -
    1) मराठी संस्कृती/साहित्याबाबतचे इतर काही लेख - कथा, कविता, कादंबरी, नाटक, नाट्य, बाल साहित्य, ललित लेख, विनोद, मराठी साहित्य संमेलने, अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा, चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्प्रचार

    मराठीचे आद्य कवी -
    1) मुकुंदराज
    2) माहीमभट
    3) महदंबा
    4) ज्ञानेश्वर
    5) नामदेव
    6) जगमित्रनागा
    7) एकनाथ
    8) तुकाराम
    9) रामदास
    10) वामन पंडित
    11) श्रीधर
    12) मुक्तेश्वर
    13) मोरोपंत
    14) माधवस्वामी - तंजावरचे लेखक
    15) होनाजी
    16) महिपती
    17) केशीराजव्यास - मराठीतील पहिले संपादक
    18) दामोदर पंडित
    19) मुसलमान मराठी संतकवी : एकनाथ, तुकारामांच्या काळात आणि त्या नंतरही मुसलमान संतानी जी सेवा केली, ती उपेक्षणीय नाही. इसवी सनाच्या पंधराव्या ते अठराव्या शतकापर्यंत मुसलमान संत कवी आढळतात. त्यांमधील सुरुवातीच़ा आणि गुणांनीही अग्रगण्य असा कवी म्हणजे मुंतोजी ब्रह्मणी हा होय. मृतुंजय या नावानेही तो प्रसिद्ध आहे. नारायणपूर येथे त्याची समाधी आहे. ’सिद्धसंकेत प्रबंध’ हा त्याच़ा सर्वात मोठा ग्रंथ. दोन हज़ार ओव्या असलेल्या या ग्रंथातील दुसर्‍या प्रकरणाला ’राम-जानकी’ असे नाव आहे. या कवीबद्दल रा. चिं .ढेरे म्हणतात, असा हा संतकवी केवळ मुसलमान संत कवीच नव्हे, तर अखिल मराठी संत मंडळात मानाचे स्थान पावणारा आहे. 

    मराठीतील बोली भाषा
    •• जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, मूळ मराठी भाषेचे व्याकरण एकच असले तरी, तिची बोलीभाषा दर 12 कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. मराठी विश्वकोशातील माहितीनुसार ढोबळमानाने विचार केल्यास मराठीत 60 ते 70 च्या दरम्यान बोलीभाषा आहेत, असं म्हणता येईल. भाषातज्ज्ञ ग्रीअर्सनने वेगवेगळ्या भागांतले नमुने गोळा करून दिल्यामुळे पोटभाषांचे पुसट चित्र आपल्याला मिळते. 
    पोटभाषांचे वर्गीकरण -
    ••• पोटभाषांच्या वर्गीकरणात ध्वनी, व्याकरणप्रक्रिया आणि शब्दसंग्रह यांच्यातील भेदांचा विचार करावा लागतो. 
    ••• काही मराठी बोलींतील ’ळ’ च्या ’ल’ किंवा ’य’ किंवा ’र’ असणार्‍या बोली निश्चितपणे वैशिष्यपूर्ण आहेत. तीच गोष्ट ’ला’ (मला) याऐवजी ’ले’ (मले) किंवा ’-आक’ (माका, घराक) यांचा उपयोग करणार्‍या बोलींची. 
    ••• अशा प्रकारची वैशिष्टये आणि त्यांची प्रदेशवार व्याप्ती, म्हणजे भौगोलिक मर्यादा शोधून काढल्याशिवाय मराठीचे म्हणजेच ती ज्या पोटभाषा, बोली यांनी बनली आहे, त्यांचे स्वरूप निश्चत होणार नाही.
    1) स्थानमाहात्म्यानुसार मराठी बोलीचे प्रकार -कोंकणी मराठी , कोल्हापुरी मराठी, कारवारी मराठी, अहिराणी, मराठवाडी, नागपुरी 
    2) भौगोलिक परिसरानुसार मराठी बोलीचे प्रकार - कोल्हापुरी, चंदगडी , नागपुरी, मराठवाडी, कोकणी, वर्‍हाडी, बेळगावी, मालवणी, मोरस मराठी, झाडीबोली, तंजावर, बगलांनी, नंदुरबारी, खाल्यांन्गी, वर्ल्यांगी, तप्तांगी, डोंगरांगी, जामनेरी, खानदेशी 
    3) समूहानुसार मराठी बोलीचे उपप्रकार - नंदीवाले, नाथपंथी देवरी, नॉ लिंग-मुरूड-कोलाई-रायगड, पांचाळविश्वकर्मा, गामीत, ह(ल/ळ)बी, माडिया, मल्हार कोळी, मांगेली, मांगगारुडी, मठवाडी, मावची, टकाडी, ठा(क/कु)री, ’आरे मराठी’, जिप्सी बोली(बंजारा), कोलाम/मी, यवतमाळी (दखनी), मिरज (दख्खनी), जव्हार, पोवारी, पावरा, भिल्ली, धामी, छत्तीसगडी, भिल्ली (नासिक), बागलाणी, भिल्ली (खानदेश), भिल्ली (सातपुडा), देहवाळी, कोटली, भिल्ली (निमार),कोहळी, कातकरी, कोकणा, कोरकू, परधानी, भिलालांची निमाडी, मथवाडी, मल्हार कोळी, माडिया, वारली, हलबी, कुचकोरवी, कोल्हाटी, गोल्ला, गोसावी, ढोर-कोळी/टोकरे कोळी (खानदेश)घिसाडी, चितोडिया, छप्परबंद, डोंबारी, नाथपंथी डवरी, पारोशी मांग, बेलदार, वडारी, वैदू, दखनी उर्दू, महाराष्ट्रीय सिंधी, मेहाली, सिद्दी, बाणकोटी,चित्पावनी, वाघ्ररी / वाघरी, पारधी, गोंडी,गोरमाठी,लेवा,डांगी,वाडवळ / वडवली/ळी, कैकाडी,अहिराणी, कदोडी / सामवेदी, तावडी, आगरी, देहवाली, जुदाव, महाराऊ, भिलाऊ, लाड सिक्की, लेवापातीदार, गुजरी, वगैरे.
    4) आदिवासी बोलीभाषा -महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया आदी बोलीभाषा प्रमुख आहेत. या बोलीभाषा महत्त्वाच्या असल्या, तरी यापैकी गोंडी व भिल्ली या बोलीभाषा अतिप्राचीन आहेत.  आदिवासींच्या कोरकू, माडिया आणि वारली या भाषा महत्त्वाच्या मानल्या जातात.

    • मराठी आणि मराठीची रूपे -
      1) मराठी, 2) अहिराणी, 3) आगर, 4) खान्देशी लेवा, 5) चंदगडी, 6) झाडी, 7) पोवारी, 8) कोहळी, 9) तावडी, 10) मालवणी, 11) व-हाडी, 12) वाडवळी, 13) सामवेदी, 14) संगमेश्वरी

    • आदिवासींच्या भाषा -
    15) कातकरी, 16) कोकणा, 17) कोरकू, 18) कोलामी, 19) गोंडी, 20) देहवाली, 21) परधानी, 22) पावरी, 23) भिलालांची निमाडी, 24) मथवाडी, 25) मल्हार कोळी, 26) माडिया, 27) मावची, 28) मांगेली, 29) वारली, 30) हलबी, 31) ठाकरी, 32) ‘क’ ठाकूरी, 33) ढोरकोळी, 34) ‘म’ ठाकूरी

    • भटक्या विमुक्तांच्या सांकेतिक भाषा-
    35) कुचकोरवी, 36) कैकाडी, 37) कोल्हाटी, 38) गोरमाटी, 39) गोल्ला, 40) गोसावी, 41) घिसाडी, 42) चितोडिया, 43) छप्परबंद, 44) डोंबारी, 45) नाथपंथी डवरी, 46) नंदीवाले, 47) पारोशी मांग, 48) पारधी, 49) बेलदार, 50) मांग गारुडी, 51) वडारी, 52) वैदू. अन्य भाषा : 53) पारोशी मांग, 54) दख्खनी, 55) ‘नॉ’ लिंग, 56) ‘म’ ठाकूरी, 57) उर्दू , 58) सिंधी : भाषा आणि साहित्य

    • मराठी भाषेतून जवळपास 17 बोलीभाषांची निर्मिती झाली आहे -
    1) अहिराणी (जळगाव, बुलढाणा, मलकापूर, बर्‍हाणपूर, शहापूर),
    2) इस्रयली मराठी,
    3) कोंकणी, चित्पावनी (मालवण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा)
    4) कोल्हापुरी (कोल्हापूर),
    5) खानदेशी,
    6) चंदगडी (कर्नाटक, महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेश), 
    7) झाडीबोली (भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा भूप्रदेश झाडीपट्टी)
    8) डांगी, तंजावर,
    9) तावडी (जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल),
    10) देहवाली (भिल्ल समाजात ही बोली आढळते.),
    11) नंदभाषा (व्यापारी भाषा ही सांकेतिक भाषा)
    12) नागपुरी (नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा काही भाग, भंडारा, गोंदिया)
    13) बेळगावी (बेळगावची बोलीभाषा, कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोंकणी यांच्या मिश्रणातून तयार)
    14) भटक्या विमुक्त
    15) मराठवाडी (महाराष्ट्र-कर्नाटक या सीमावर्ती भागातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बोली)
    16) मालवणी (रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग)
    17) व्हराडी (बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा)

    ••• डॉ. गणेश देवी आणि डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी सन 2009 पासून महाराष्ट्रातील या भाषाचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या संशोधनातून समोर आलेल्या बाबी -  
    1) राज्यातील कातकरी, कोरकु, कोलामी, गोंडी, पावरी, कैकाडी, कोल्हाटी, गोसावी, चितोडिया, वैदू, मल्हार कोळी, हल्बी अशा 40 बोलीभाषांमध्ये समाज, निसर्ग, देवी-देवता, शरीर अशाबद्दलचे शब्द आहेत. त्यामुळे या भाषांचे अस्तित्व सिद्ध होते. 
    2) या भाषांना धोरणात्मक पातळीवर आधार न मिळाल्याने त्यांचे अस्तित्व पुसले जात आहे.
    3) या 40 भाषांपैकी एकाही भाषेला घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान मिळालेले नाही. 
    4) या भाषा विद्यापीठीय स्तरावरही शिकवल्या जात नाहीत किंवा या भाषा शिकवणारी एकही संस्था अस्तित्वात नाही.
    5) कातकरी, कोकणा, कोरकु, गोंडी, हिली, वारली, हल्बी या भाषा शालेय स्तरावर शिकवल्या जातात. इतर भाषांमध्ये शिक्षण नसल्याने या भाषांची स्थिती चिंताजनक आहे. यामध्ये निहाली आणि कोलामी भाषा सर्वात कठीण अवस्थेत आहेत.
    6) आदिवासी, भटक्या आणि विमुक्त जमातीच्या या बोलींवर दक्षिणेचा तसेच राजस्थान, गुजराती भाषेचा प्रभाव आहे. ज्या प्रांतातून हे नागरिक महाराष्ट्रात येऊन स्थिरावले तेथील भाषेचा प्रभाव आहे. 
    7) राज्यात काही अ‍ॅस्ट्रो एशियाटिक भाषा आहेत. यातील निहाली भाषेला कोणतेही कूळ नाही. ही भाषा राज्याच्या पाच जिल्ह्यांमध्ये बोलली जाते. ही भाषा बोलणारे केवळ 2 हजार लोक शिल्लक आहेत. त्यातही चार ते पाच ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांच्याकडे लोककथा आणि लोकगीतांचा खजिना आहे. त्यांच्यानंतर ही मूळ भाषा माहीत असणारे कोणी नाही. त्यामुळे त्याचे अस्सल रूप अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. यातील काही भाषांना डिजिटल रूप मिळाले आहे. 

    बोलीभाषा भाषा बोलणार्‍यांची टक्केवारी -
    1) वारली 3.50 लाख 
    2) मल्हार कोळी 3.03 लाख 
    3) कोरकु 2.56 लाख 
    4) कातकरी 1.35 लाख 
    5) ठाकरी 90 हजार 
    6) डोंबारी 27 हजार 
    7) कोल्हाटी 27 हजार 
    8) पावरी 10 हजार 
    9) निहाली 2 हजार 

    उत्तर महाराष्ट्र
    1) डांगी बोली - डांगी बोली या खानदेशी व गुजरातीमधील संक्रमक बोली आहेत. त्यामुळे गुजराती व मराठी या दोन्ही भाषांशी त्यांचे पुष्कळ साम्य आहे. मात्र खानदेशीशी असलेले त्याचे साम्य अत्यंत निकटचे आहे. ग्रीअर्सनने डांगी बोली व खानदेशी यांना भिल्ल भाषांच्या सदरात घातलेले आहे. द्विभाषिक मुंबई राज्याच्या विभाजनानंतर डांग हा प्रदेश गुजरात राज्यात घालण्यात आला. या प्रदेशाच्या उत्तरेला बडोदे जिल्हा, पश्चिमेला सुरत जिल्हा, दक्षिणेला नाशिक जिल्हा व पूर्वेला खानदेश आहे. डांगच्या प्रदेशात बोलल्या जाणार्‍या बोलींना डांगी हे नाव आहे.

    2) अहिराणी - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील बर्‍हाणपूर, शहापूर, अंतुर्ली पर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. शब्दांमध्ये नाद आणि लय हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, के. नारखेडे या लेखकांनी आपल्या साहित्यात बोलीच़ा वापर केला आहे.

    3) तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात आहेत. ’क’चा जागी ’ख’च़ा उच्चार केला ज़ातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीच़ा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समज़त असत परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.

    4) खानदेशी - ही बोली जळगाव जिल्हा व लगतच्या धुळे जिल्ह्यात बोलली जाते.

    5) देहवाली - भिल्ल समाजात ही बोली आढळते. गुजराती आणि हिंदी भाषांच़ा हिच्यावर मोठा प्रभाव आहे. बोलीची वाक्यरचनाही गुजरातीशी मिळतीजुळती आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. या भाषेच़े खळवाड आणि मेवासी असे दोन पोटप्रकारही आहेत. देहवालीच्या मूळ स्वरात ’ळ’, ’क्ष’ आणि ’ज्ञ’ ही व्यंजने नाहीत, तर ’छ’, ’श’ आणि ’ष’ यांच्याऐवजी ’स’ हे एकच़ व्यंजन वापरले ज़ाते. या भाषेच़े अभ्यासक चामुलाल राठवा यांनी देहवाली मौखिक साहित्य शब्दबद्ध केले आहे. विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी या भाषेत लेखन केले आहे. भाषासाहित्य प्रकल्पाअंतर्गत अकादमीद्वारे हे प्रसिद्धही झ़ाले आहेत.

    6) भिल्ली बोलीभाषा -गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये बोलली जाते. या बोलीवर त्या त्या राज्यांच्या प्रमाण भाषेचा प्रभाव असल्याने महाराष्ट्रात ती मराठीची बोलीभाषा म्हणून गणली जाते.

    कोकण
    1) कोंकणी / चित्पावनी - कोकण प्रदेशात अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. त्या सर्वांना ‘कोकणी’ ही सामान्य संज्ञा वापरण्यात येते पण त्यांतील काही बोली भाषिक दृष्टीने एकमेकींपासून इतक्या भिन्न आहेत, की त्यांचा एकाच समूहात अंतर्भाव करणे चुकीचे ठरते. इतर कोणताही निकष न लावता असे म्हणता येईल, की ज्या बोलींत मराठीतील पुल्लिंगी एकवचनी ‘आ’ या प्रत्ययाऐवजी ‘ओ’ येतो (मराठी - घोडा, काळा; कोकणी - घोडो, काळो) ; पण त्याचबरोबर ‘ला’ या शब्दयोगी अव्ययाला समानार्थक असा ‘का’ किंवा ‘क्’ हा प्रत्यय लागतो (तूं-तुका, मी-माका, घोडो-घोड्याक् इ.) त्या बोली कोकणी. पहिले लक्षण गुजरातीलाही लागू पडते, पण दुसरे फक्त कोकणीला. 
    • कोकणीचे आणखीही एक लक्षण आहे. ते म्हणजे ‘इ’ किंवा ‘उ’ कोणत्याही स्वरानंतर आल्यास त्यांचे स्वरत्व नाहीसे होते (मराठी - घेईन, घेऊन, भाऊ; कोकणी - घेयन,घेवन, भाव्). या तत्त्वानुसार पाहिले, तर गोव्याच्या उत्तरेला असलेल्या दक्षिण रत्नागिरीच्या (मालवण,वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी) बोलींपासून केरळपर्यंत कोकणीचे विस्तारक्षेत्र आहे. 
    • कोकणी बोलींचे भाषिक वैशिष्ट्यांनुसार तीन भाग पाडता येतात -
    1) गोव्याच्या उत्तरेकडील मराठीशी संपर्क असलेली व तिने प्रभावित झालेली ‘उत्तर कोकणी’
    2) पोर्तुगीज प्रभुत्वाखाली चारशे वर्षे असलेली गोव्याची ‘मध्य कोकणी’ आणि
    3) कन्नड व मलयाळम् या भाषांनी वेढलेली अगदी खालची ‘दक्षिण कोकणी’
    • कोकणी या नावाने ओळखल्या ज़ाणार्‍या अनेक बोली आहेत-
    1) मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातली आगरी,कोळी, वाडवळ, कादोडी, ईस्ट ईंडियन, बाणकोटी, वारली, कोकणा, कातकरी, 
    2) रत्नागिरी जिल्ह्यातली संगमेश्वरी, चित्पावनी, 
    3) सिंधुदुर्गातली मालवणी, 
    4) गोव्यातले श्रीमंत हिंदू शेतकरी बोलतात ती काणकोणची कोकणी, 
    5) तिथल्याच़ शेतमजुरांची कोकणी, 
    6) गोव्यातल्या ख्रिश्चनांची पोर्तुगीज पद्धतीची कोकणी, गावड्यांची कोकणी, 
    7) कारवार जिल्ह्यातली कारवारी, 
    • वरील सर्व बोली ठोकरीत्या कोकणी बोली समजल्या जातात, पण निश्चितपणे एकमेकांपासून वेगळ्या आहेत. या बोलींपैकी गोव्यातल्या स्थानिक पर्तुगीज/ख्रिश्चन बोलत असलेल्या एका बोलीला राज्यभाषा केले आहे.

    1) मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. 
    • दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते. 
    • मच्छिंद्र कांबळी यांच्या मालवणी नाटकांमुळे ही भाषा जास्त प्रसिद्धीस आली. मालवणी बोलीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहेत. जसे की, झील (मुलगा), चेडू (मुलगी), घोव (नवरा).

    2) कोळी - मुख्यतः महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, अलिबाग तसेच गुजरातमधील उमरगाव, दादरा नगर हवेली आणि गोव्यात त्याच़बरोबर संपूर्ण कोकणातील किनारपट्यांवर सर्रास कोळी भाषा बोलली ज़ाते. 
    ••• कोळी गीते आणि इतर मुबलक लेखन असूनसुद्धा बोलणारे व्यक्ती विखुरल्यामुळे कोळी भाषा संकटात आहे. संस्कृत भाषेतसुद्धा अशाच प्रकारे विपुल लेखन झालं होतं. पण बोलणारे लोक नसल्यामुळेच संस्कृत भाषेवर परिणाम झाला आहे.
    ••• कोळी ज़ातीतील अनेक उपज़ातींमध्ये थोड्याफार भाषेचे फरक पडतात ज़से, कोळी, मांगेली, वैती, आगरी इ. भाषेत  ळ  उच्चार  ल  ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील  मांगेली  भाषेत ळ ची स्पष्ट सिद्ध होते. ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत. शब्दशः  त्याने जेवण केलं होतं  ( त्यान जेवण करीलता ),  तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे  ( तुमाना कायतरी हांग्याय ).
    ••• महाराष्ट्रातील किनारी भागात प्रामुख्याने राहणारा कोळी समाज पूर्वी एकत्र राहत होता. त्यातून त्यांची कोळी भाषा आणि संस्कृती विकसित होत गेली. पण मासेमारी व्यवसायात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे कोळी बांधवांना आपलं राहतं ठिकाण सोडण्याची वेळ आली. मासेमारी सोडून हा समाज बांधकाम मजुरी, शेतमजुरी तसंच शहरी भागाकडे मोठ्या प्रमाणावर वळला. त्यामुळे एकत्र राहणारा समाज विखुरला गेला. याचा परिणाम त्यांच्या भाषेवर होत आहे. 

    3) आगरी -आगरी बोली ही महाराष्ट्राच्या राज्याच्या उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. आगरामधले आगरी, गवळी व कुणबी तसेच किनारपट्टीवरील कोळी, खारवी, भंडारी व भोई ही बोली बोलतात. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारे लोक प्रामुख्याने आढळतात.

    4) वाडवळी - उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात सागरी किनार्‍यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. तिचा उगम आणि विकास बहुतांशी ठाणे जिल्ह्यात झालेला दिसतो. ही बोली वसई परिसरात बोलली जाते.

    5) कादोडी - कादोडी ही मराठीची अत्यंत दुर्लक्षित बोली म्हणता येईल. वसई आणि वसईच्या आसपासच्या गावांमध्ये या बोलीचा वापर केला जातो. त्याला सामवेदी किंवा कुपारी असंही म्हटलं जातं. सामवेदी बोली ही सामवेदी ब्राह्मण, पाचकळशी आणि सामवेदी ख्रिस्ती समुदायांमध्ये बोलली जाते. या भाषेवर कोकणी, मराठी, गुजराती भाषांचा प्रभाव दिसून येतो. या बोलीला लिपिबद्ध करणं थोडेसं अवघड आहे, मात्र तरिही गेल्या काही वर्षांमध्ये या बोलीचं देवनागरी लिपीमधलं लेखन प्रकाशित करण्याचे प्रयत्न झाले आहेत. कुपारी समाजाने आपल्या चालीरिती, लग्नप्रथा, गाणी जपण्याचा प्रयत्न केला आहे. कादोडी नावाने एक अंकही प्रकाशित केला जातो.

    पश्चिम महाराष्ट्र 

    1) माणदेशी -मराठीच्या अनेक बोलीभाषांत काहीशी रांगडी, पण प्रेमळ शब्दावली असणारी अशी ही माणदेशी बोली. पूर्वेकडे आंध्र आणि कर्नाटक सीमाभागातील तेलुगु आणि कन्नड शब्द आणि विशिष्ट शब्दावर जोर देण्यासाठी स्वरांत ‘हेल उच्चाराचा प्रभाव आहे. जसे ‘यावं रावं री?’ (कोण गावचे पाहुणे?) आ ईकारान्त हेल माणदेशात जसजसे पश्चिमेकडे जाऊ तसे आकारान्त व एकारान्त होत जातो. जसे ‘कोण गावं गा? कुनच्च्या गावचे रे? आरा-रा- (सातारी बोली). या सातारी बोलीचा कडकपणा व रुक्षता पश्चिमेकडील माणबोलीवर पडत जातो. 
    ••• पूर्वेकडील ओवी, अभंगातील हळुवारपणा व मार्दव पश्चिमेकडे कमी होत जाते. 
    ••• दक्षिणेकडून सांगली परिसरातील जैनी भाषेचा प्रभाव तर उत्तरेकडून सोलापुरी बोचणारी शब्दयोजना ‘अबे, काबे’चा प्रभाव जाणवतो. 
    ••• मराठेशाहीतील पराक्रमी वीरांचे पोवाडे, डफ तुणतुण्याचा साज, भेदक गीते, गोंधळ गीते, लोकनाट्य तमाशे अशा कितीतरी कलाविष्कारांनी, माणबोलीने अभिजात मराठी भाषेला समृद्ध केले आहे. ओवी आणि शिवी यामधून लोकभावनांचा सहज उद्रेक होत असतो म्हणून माणदेशी शिव्या याही बोलीचा उत्स्फूर्त अलंकारच ठरावा. 
    ••• माणदेशातील काही खास शब्द सांगायचे झाल्यास खरपाड-दुष्काळ, तेगार-नखरा, पाट्याळ-भयंकर मोठे, धावडं-एक जमात, अंगरखा-सदरा, डरंगळ-मेंढ्यांचा एक रोग, मिसरी-खडीसाखर या शब्दांचा उल्लेख करावा लागेल. काही वाक्प्रचारांचा अर्थ द्यायचा झाल्यास गाबाडणे- वाया जाणे, मोंडशी करणे- पराजित करणे, अबादानी होणे- संपन्न होणे, घेगलणे- जीव रंजीस येणे, इर्जिक घालणे- शेतीत एकमेकास मदत करणे असा देता येईल. माणदेशी ही कवित्वाची सुवर्णखाण आहे. भाषांचे सौंदर्य बोली वाढवितात. 
    ••• माण हा मूळच्या औंध संस्थानातील परगणा. माणदेश हा पश्चिम महाराष्ट्रात माण नदीकाठावरल भूभाग. सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांतील दुष्काळी पट्ट्यातला. माण नदीमुळे या प्रदेशाचे नाव माणदेश. झख्रस्तोत्तर चौथ्या शतकात येथे राष्ट्रकूट घराण्यातील मानाङ्क राजाचे राज्य होते. त्याची राजधानी माण नदीकाठी दहीवडी-म्हसवड परिसरात वसली होती, मानापूर. 

    2) पुणेरी - मराठी भाषेच्या विविध धाटणींच्या बोलींपैकी पुणेरी मराठी बोली ही ज्यास्तीत ज्यास्त व्याकरणशुद्ध म्हणून ओंळखली जाते, तथापि ती बहुतांशी लेखी लिपीनुसार बोलली जात असल्यामुळे ऐकण्यास नाटकी आणि सपक वाटते.  

    3) पारधी भाषा - महाराष्ट्राच्या मध्यभागातील अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील माळरानावर पारधी समाज प्रामुख्याने पाहायला मिळतो. त्यांची विशिष्ट अशी पारधी बोलीभाषा आहे. 
    ••• ही भाषा मराठी, गुजराती, राजस्थानी आणि कानडी भाषेचं मिश्र स्वरूप आहे. 
    ••• या समाजातील उच्च शिक्षित तरूणांचं या भाषेवर प्रभुत्व नाही. त्यामुळे पूर्वीच्या पिढीतील लोकांशी ते मराठी किंवा हिंदीत व्यवहार करतात. त्यामुळे हळुहळू ही भाषा बोलणार्‍या लोकांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे.

    4) वडारी - सोलापुरातील सीमावर्ती भागात सापडणार्‍या वडारी समाजात ही भाषा बोलली जाते. तेलुगू आणि कन्नड या भाषांचा वडारी भाषेवर प्रभाव आहे. वडार समाज हा मूळतः बांधकाम व्यवसायात आहे. समाजातील शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. 
    ••• गेल्या काही काळात बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस आल्यामुळे समाजातील काही लोकांकडे पैसा तर आला. या समाजातील लोक मोठ्या प्रमाणात महानगरांमध्ये स्थलांतरित झाले. भाषेविषयी पुरेशी जागरुकता नसल्यामुळे त्यांची भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे.

    5) कैकाडी, महारी, चांभारी, लमाण भाषा - महाराष्ट्रातील ठराविक मागास जातींच्या विशिष्ट भाषा आहेत. त्यांना त्यांच्या जातीच्या नावाने ओळखले जाते. पूर्वी या समाजातील लोक या बोलीभाषेचा वापर सर्रास करायचे. पण आता या भाषा बोलणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 
    ••• बोलीभाषांच्या र्‍हासाला सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे. तुलनेत मागास असलेल्या जातीतील लोक शिक्षणामुळे मुख्य प्रवाहात आले. पण सामाजिक परिस्थिती आणि मागासलेपणाच्या न्यूनगंडातून आपली ओळख जाहीर होण्याची भीती नेहमीच त्यांच्यामध्ये होती. या भीतीतूनच त्यांनी त्यांच्या बोलीभाषांचा त्याग केला. 
    ••• अजूनही या भाषा काही ठिकाणी बोलल्या जातात. पण सार्वजनिकरीत्या या भाषा बोलणं टाळलं जातं. त्यामुळे याचा परिणाम या बोलीभाषांवर होऊ शकतो. या भाषा बोलणार्‍यांची संख्या केवळ बोटांवर मोजण्याइतपत उरेल. 
    ••• पूर्वी आपली ओळख जपण्यासाठी या भाषा निर्माण झाल्या होत्या. पण कालांतराने समाजातील हेवेदाव्यांमुळे आयडेंटीटी क्रायसिस निर्माण झाला. अशा स्थितीत या भाषा बोलल्या तर समाजात आपल्यासला मागास समजलं जाईल. त्यामुळे आपण मुख्य प्रवाहातून दूर जाऊ ही भीती सतत ही बोलीभाषा बोलणार्‍या व्यक्तींमध्ये असते.

    6) भटक्या विमुक्त - भटक्या विमुक्त जमातींच्या मराठी संलग्न बोली आहेत. यांना पारूशी असेही संबोधन आहे. यामध्ये गोंधळी, कुडमुडे जोशी, गोसावी, भराडी, गोपाळ, शिकलगार, वैदू, नंदीवाले, बेलदार, कोल्हाटी आदी भटक्या जमाती येतात. 
    ••• सदैव भ्रमणात राहिल्याने यांच्या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच जमातीत रहावीत यासाठी या बोली भाषांचा उपयोग केला जातो. भाषेतील शब्द उदाहरण मावशी म्हणजे माची. 
    ••• शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातील डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी या भाषांवर संशोधन केले आहे.

    7) नंदभाषा - व्यापार करताना इतरांना कळू नये म्हणून व्यापारी ’ही एक सांकेतिक भाषा इतिहासात वापरत होती. आज़ही काही ठिकाणी वापरात आहे. त्या भाषेमध्ये चलनाच्या उल्लेखांसाठी निराळे शब्द आहेत. उदाहरणार्थ भुरका - एक, आवरू - दोन, उधानू - तीन, पोकू - चार, मुळू - पाच, शेली - सहा वगैरे. 
    ••• विसोबा खेचर (नामदेवांचे गुरू) यांनी या नंदभाषेच़ा वापर करून शंकराची स्तुती करणार्‍या काव्यरचनाही केल्या आहेत.

    8) साळी/नारायणपेठी बोली - महाराष्ट्रातील स्वकुळ साळी समाजाची बोली. आंध्र प्रदेशातून येऊन देशभर विखुरलेले मराठी विणकर ही बोलीबाषा बोलतात.


    कर्नाटक सीमा
    1) कोल्हापुरी - कोल्हापूर भागात बोलली ज़ाणारी ही बोली आहे. बोलीभाषापैकी कोल्हापुरी मराठी बोली ही निष्कपट, गरीब, खेडवळ, अशिक्षित शेतकर्‍याची बोली आहे. लय काढून बोलण्याची लकब या भागात आढळते. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव यावर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो.  श्रीविष्णूच्या गर्भश्रीमंत तिरुपति रूपापेक्षा, त्याच्या अस्सल शेतकरी वेषातल्या पंढरपूरच्या विठोबाच्या रूपाला, अथवा श्रीशंकराच्या मल्हारी /खंडोबाला मनोभावे भजणार्‍या-पुजणार्‍या रांगड्या शेतकर्‍यांच्या मुखांतून उमटणारी ही बोलीभाषा आहे. 

    2) चंदगडी बोली - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड भागात ही भाषा प्रचलित आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींच़ा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेचा प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. 
    ••• उच्चाराच़ा विशिष्ट हेल, सुरावट आणि निराळे व्याकरण हे या भाषेत दिसून येते. 
    ••• चंदगड तालुक्याच़ा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याचा सीमेलगतची गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे ती कोकणीच्या प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरतात. 
    ••• चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेचा प्रभावाने तयार झ़ालेली बोली वापरात आहे. या मध्ये ’मिय्या जेवलो’ (मी जेवले), ’मिय्या बाज़ारास गेल्लो’(मी बाज़ारात गेले) अशी शब्द रचना दिसते. तसेच ’कोठे’ऐवजी ’खट्टे’ असा शब्द ऐकू येतो.

    3) बेळगावी - बेळगाव या महाराष्ट्राचा सीमाभागातील ही बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींचा मिश्रणातून तयार झालेली आहे. या भाषेतील गोडव्याची ओळख पु.ल. देशपांडे यांचा रावसाहेब या कथेने करून दिली. त्याच़ बरोबर भीमराव गस्ती, नारायण अतिवाडकर या साहित्यिकांनीही या भाषेतून लेखन केले आहे. 
    ••• प्रकाश संत लिखित लंपन या व्यक्तीचित्रात या भाषेला विपूल वापर आढळतो. ज़से काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज, सक्काळी सक्काळी.. एकदम मज्जा ऐद नोडरी ऽऽ अभ्यास इल्ला एन इल्ला... या भाषेत गा हा प्रत्यय लावला ज़ातो ज़से ’काय गा कव्वा येत्यास?’ (काय, केव्हा येणार?)


    मराठवाडा
    1) मराठवाडी -मराठवाडा प्रदेशात ही ठसकेबाज मराठी भाषा वापरली ज़ाते. गावठी किंवा शिवराळपणा हे वैशिष्ट्य मराठवाड्यातल्या मराठी चे समज़ले ज़ाते. या भाषेत उर्दू शब्दही आढळतात. लाव, आव या स्वरूपाच़े कारकवाचक प्रत्यय या बोलीच़े वेगळेपण दाखवतात. उदा. जेवलाव, च़ाल्लाव, ठिवताव इत्यादी
    ••• नांदेड जिल्ह्यात तेलंगणा  राज्याला लागून असल्याने एक वेगळाच़ हेलका धरला ज़ातो. 
    ••• महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात थोडी वेगळी भाषा बोलली ज़ाते. लातूरी भाषेत काही वेळा क्रियापदांवर कानडी भाषेच़ा परिणाम होतो, परंतु प्रभाव मात्र नाही. 

    विदर्भ
    1) नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूरचा काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. तसेच मध्य प्रदेशातील शिवनी, छिंदवाडा, बालाघाट व रायपूर या भागातही ही बोली प्रचलित आहे. 
    • वर्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. नागपुरीला वर्हाडी भाषेचेच एक रूप मानल्याने नागपुरी बोलीचा स्वतंत्र भाषिक अभ्यास झाला नाही. परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली जाते. यावर हिंदी शब्दांचाही प्रभाव आढळतो.

    2) वर्‍हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या  6 जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. मूळ मराठी ही बोली कुठल्याही प्रकारचा हेल न काढता,अनुनासीक इ.चा अतिरेक न करता अत्यंत संथपणे बोलली जाते. प्रमाण मराठीतील काही शब्दात बदल होत असल्यामुळे ती थोडी अशुद्ध वाटते.
    ••• म्हाइंभट यांचा ’लीळाचरित्र’ हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वर्‍हाडी बोलीत लिहिला गेला. महानुभाव पंथातील अनेक रचना याच बोलीतून झाल्या आहेत. 
    ••• प्रमाण मराठीतील ’ड’चा ’ळ’, ’ळ’चा ’य’ या बोलीत केला जातो. जसे, ’नदीच्या गायात, गाय फसली’ (नदीच्या गाळात गाय फसली). तसेच जो हा प्रत्यय असलेली देईजो, येईजो, घेईजो अशी रूपे येतात. फारशी व हिंदीचा प्रभाव या बोलीवर आहे.

    3) झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा 4 जिल्ह्यांचा भूप्रदेश’झाडीपट्टी’ म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. 
    ••• मराठीतील ’ण, छ, श, ष आणि ळ’ ही 5 व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. 
    ••• मराठीतील मुकुंदराजकृत ’विवेकसिंधू’मधील अनेक अपरिचित शब्द आजही झाडीबोलीत प्रचारात आहेत.

    4) गोंडी बोलीभाषा - महाराष्ट्रात प्राधान्याने आणि मध्य भारतातील मोठ्या विस्तृत पट्ट्यात बोलली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, अमरावती, नागपूर या जिल्ह्यात व आंध्र प्रदेशाच्या सीमेलगतही गोंडी बोली बोलली जाते. महाराष्ट्रातील आदिवासी बोलींमध्ये गोंडी बोली सर्वाधिक बोलली जाते. गोंडी बोलीला लिपी आहे. 
    ••• गोंडी बोलीभाषेचा बारकाईने अभ्यास करणारा जर्मन भाषातज्ञ जूल ब्लॉच याने गोंडी बोलीची आंतरराष्ट्रीयता शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता. 
    ••• द्राविडी भाषासमूहातील कोणत्याही भाषेची अभिन्न वैशिष्ट्ये धारण करणारी गोंडी ही एकमेव प्राचीन बोलीभाषा आहे असे मत कॉल्डवेलने गोंडी भाषेच्या 7 वैय्याकरणीय कसोट्या लावून मांडले होते.

    • तंजावरी मराठी - ही मराठी भाषेची एक बोली असून ती भारतातील तमिळनाडू ह्या राज्यात बोलली ज़ाते. ज़वळपास 1 लाखाहून अधिक लोक ही भाषा रोजच्या व्यवहारात उपयोगात आणतात. तमिळनाडू राज्यातील तंजावर किंवा तंजावूर ह्या नगरातील ही एक बोलीभाषा आहे. 
    ••• छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजी राजे ह्यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावरला पिढ्यापिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे.
    ••• ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा असून त्यात आज़ही बरेचसे प्राचीन मराठी शब्द वापरात आहेत. तसेच काळाचा ओघात पडलेला स्थानिक तमिळ भाषेच़ा प्रभाव ह्या भाषेवर ज़ाणवतो.

    ••• बेने इस्रायली /इस्रायली मराठी -  मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
     
     

Share this story

Total Shares : 2 Total Views : 1442