जागतिक दूध दिन : १ जून
- 04 Jun 2021
- Posted By : study circle
- 1124 Views
- 6 Shares
जागतिक दूध दिन : १ जून
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”धवलक्रांती व दुग्धव्यवसाय” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ग्रामोत्थान करणारी धवलक्रांती व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा
१६. कृषि प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था :
ब. धवलक्रांती
सामान्य अध्ययन पेपर (४) : भारतीय अर्थव्यवस्था
२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास :
पशुधन आणि त्याची उत्पादकता - भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
जागतिक दूध दिन विशेष : ग्रामोत्थान करणारी धवलक्रांती
* अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार २००१ पासून दर वर्षी जून महिन्याचा पहिला दिवस जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो.
* सर्वासामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यान्यात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
* बालके, महिला आणि वृद्ध नागरिकांना. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.
* दुधाच्या उत्पादनाचे ग्रामीण भागाच्या अर्थकारणात मोलाचे स्थान आहे. पूरक व अतिरिक्त उत्पन्न, नियमित व विकेंद्रीत रोजगार आणि महिलांसाठी रोजगार ही या व्यवसायाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
* दूध हे परिपूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते. जवळपास सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, कर्बोदके, कॅल्शियम, प्रथिने आणि अन्य पोषण तत्त्वे दुधातून मिळतात. जन्माला आल्यानंतर साधारण १५ वर्षांपर्यंत व्यक्तीचे जे पोषण दुधामुळे होते ते इतर कोणत्याही पदार्थाने होत नाही. भारतात दुधाच्या दृष्टीने म्हैस, गाय आणि शेळी हे प्रमुख स्रोत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये संकरित गायींमुळे दुधाच्या पुरवठ्यात लक्षणीय वाढ झाली.
* आज जगातील सर्वात जास्त पशुधन भारतात आहे. त्याचबरोबरीने सर्वाधिक दुग्धोत्पादनही भारतातच होते. असे असले तरी तुलनात्मकदृष्ट्या भारतातील गायी, म्हशींची दूध उत्पादकता कमी आहे.
* शेतकरी कुटुंबाला शेतीच्या उत्पन्नाला पूरक उत्पन्न म्हणून दुधाचा धंदा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुख्य म्हणजे हा रोजगार वर्षभर सुरू राहतो. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती या दुहेरी अंगाने दुग्ध व्यवसाय फलदायी आहे. दुग्धोत्पादन व्यवसायाचे एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यातून सर्वाधिक विकेंद्रीत रोजगारव्यवस्था निर्माण होते. दुभती जनावरे असणार्या घरांमध्ये दूध, दही, तूप यांची विक्री करून मिळणारा पैसा हा घरातील स्त्रीच्या हाती जातो. अलीकडील काळात तर दुधाच्या उत्पन्नातून मिळणार्या पैशावर पहिला हक्क घरातील स्त्रीचा असेल हे धोरण म्हणून मान्य केले आहे. याखेरीज दुधाचे उत्पन्न हे रोजच्या रोज आणि रोखीने मिळणारे आहे.
* दुग्धोत्पादनासाठीच्या जनावरांचे मलमूत्र, केरकचरा यातून शेणखत तयार होते. त्यापूर्वी त्यावर गोबर गॅस प्लँट बसवता येतो. काही ठिकाणी या गोबर गॅसच्या साहाय्याने प्रकाशदिवेही लावले आहेत. असे प्रकल्प मोठ्या संख्येने निर्माण झाल्यामुळे गावागावांतील केरकचरा कमी होऊ लागला. सध्या सेंद्रिय शेतीचा आग्रह धरला जात आहे. त्यादृष्टीनेही दुभत्या जनावरांच्या मलमुत्राचा फायदा होत आहे.
* एखाद्या शेतमजुराला एखादी गाय-म्हैस पाळणे शक्य असते. बचत गट किंवा मायक्रो फायनान्स ग्रुपच्या माध्यमातून कर्ज घेऊन ही जनावरे घेता येतात. यासाठी केलेली गुंतवणूक वर्षा-दोन वर्षांत फेडता येते. या अतिरिक्त उत्पन्नातून या कुटुंबांतील विवाहकार्ये, शिक्षण, औषधपाणी, दवाखाना यांसारखे खर्च सहजगत्या पूर्ण केले जाऊ शकतात.
* दुधाच्या क्षेत्रात सहकाराने मोठी क्रांती घडवून आणली. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये सहकारी दूध संस्था किंवा दूध संघ मोठ्या प्रमाणावर आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असलेल्या सहकारी दूध संघांमुळे दुधाला कायमची बाजारपेठ निर्माण झाली. दूध उत्पादन घेणारे लोक दूध संघ, डेअरीमध्ये ताजे दूध जमा करतात आणि साधारणतः आठवड्याला-महिन्याला त्याचे पेमेंट घेतात. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रातील अनेक मोठे दूध संघ पुण्या-मुंबईसारख्या महानगरांना दूध पुरवत आहेत. याखेरीज चितळेंसारख्या खासगी दूध संस्थांनीही शेतकर्यांना दुभती जनावरे घेण्यासाठी भांडवल पुरवून, त्यांची काळजी घेण्यासाठी औषधपाणी कसे करायचे याचे प्रशिक्षण दिले, स्वतःच्या पशुशाळा निर्माण केल्या, वितरणाचे जाळे उभे केले आणि त्याचा संबंध प्रत्यक्ष व्यापाराशी जोडून दुधापासून बनवलेल्या पदार्थांनी पुण्या-मुंबईसह अनेक ठिकाणच्या बाजारपेठांपर्यंत धडक दिली.
* पुढील काळात मोठ्या सहकारी दूध संस्थांनी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरणे आवश्यक आहे. कारण, आपल्या दुधाचा उत्पादन खर्च तुलनेने कमी आहे. त्यामुळे जगाच्या तुलनेत आपण ते किफायतशीर दरात विकू शकतो. तसेच बटर, खवा, चीज यांच्या विक्रीला चालना देऊ शकतो. यासाठी नेस्लेसारख्या कंपनीप्रमाणे दूध संस्थांनी प्रचंड मोठे प्लँट उभे केले तर जगाच्या बाजारपेठेत आपले डेअरी प्रॉडक्टस् सहजगत्या विकता येतील. त्यातून रोजगारही वाढेल.
* गुजरातमधील ग्रामीण जीवनाचा कायापालट अमूलने म्हणजेच आनंद मिल्क युनियन लिमिटेडने घडवून आणला. हे परिवर्तन सहकारी तत्त्वावर झाले. अमूलमुळे ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढले, रोजगार वाढला. या संस्थेने आता शैक्षणिक संस्थाही सुरू केली आहे. महाराष्ट्रातही काही संस्थांनी असा प्रयत्न केला. सांगण्याचा मुद्दा इतकाच की कौटुंबिक पातळीवर ग्रामीण भागाचे अभ्युत्थान करण्याचे प्रभावी साधन म्हणून दूध व्यवसायाचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागामध्ये त्या-त्या प्रदेशाचे सहकारी दूध संघ तयार झाले आणि या सर्व दूध संघांनी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय बाजारात उतरण्यासाठी संयुक्त प्रक्रिया उद्योग सुरू केला तर या राज्यातल्या दूध व्यवसायाला एक नवी दिशा आणि नवी ताकद मिळेल. एक नवी श्वेतक्रांती यातून आकाराला येऊ शकते.
सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
३१ मे २०२१ / प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ कृषी अर्थतज्ज्ञ
वेगान (शाकाहारी) दूध आणि पेटा
* १ जून या जागतिक दुग्ध दिवसाच्या पूर्वसंध्येला पेटाने अमूलला पत्र लिहून सध्याचे दूध उत्पादन संकलन बंद करून वेगान दूध उत्पादनाकडे वळावे, असा अनाहूत सल्ला दिला. देशातील करोडो लोकांचा उदरनिर्वाह हा दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे, त्यालाच अपशकून करण्याचा हा प्रयत्न आहे.
* वेेगान हा शब्द मुळात व्हेजिटेरियन (Vegetarian) या शब्दातील प्रथम तीन आणि शेवटचे दोन शब्द एकत्र करून वेगान Vegan असा बनवला आहे. तो आता जगात वेगळ्या संदर्भाने पसरत चालला आहे. जे लोक मटण, चिकन, अंडी, चीज, दुधापासून बनवलेले ताक दही म्हणजे थोडक्यात प्राणी आणि प्राण्यापासून उत्पादित अगदी मध, कपडे, मोती न वापरणारी, खाणारी ही जगातील मंडळी एकत्र येऊन ही चळवळ उभी केलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने चित्रविचित्र आंदोलने करून लक्ष वेधून घेणार्या पेटा (People for the ethical treatment of animals) सारख्या संस्थांच्या मदतीने जगातील विकसनशील देशात नवनवीन मुद्दे रेटण्याचा प्रयत्न करत असतात.
* जागतिक दुग्ध दिवस, प्रत्येकाला दूध आणि दुधाविषयी माहिती व्हावी, त्यांनी ती जाणून घ्यावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या पुढाकाराने हा दिवस साजरा केला जातो. देशात शाश्वत दुग्ध व्यवसाय या थीमवर (२०२१) हा दिवस साजरा झाला. तसेही जगात आपण दुग्धोत्पादनात पहिले आहोत. आणि प्रतिमानशी प्रतिदिन दुधाचा वापर देखील ३०० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. हे सर्व वाढावं, पशुरोग निर्मूलनाच्या माध्यमातून जगात दुग्धजन्य उत्पादनाची निर्यात वाढावी, लोकांच्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाण्याविषयी जागृती व्हावी आणि एकूणच देशातील करोडो कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर आहे हे अधोरेखित व्हावं, तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वापरावरून या मंडळींना आपण थेट मदत करू शकतो ही भावना वाढीस लागावी, असा व्यापक हेतू हा दिवस साजरा करण्यामागे निश्रि्चतच आहे. अशा या दिवसाच्या पूर्वसंध्येला पेटा या जागतिक संघटनेच्या भारतातील शाखेने देशातील अग्रगण्य अशी मोठी सहकारी दूध संस्था अमूलला पत्र लिहून सध्याचे दूध उत्पादन संकलन बंद करून वेगान दूध उत्पादनाकडे वळावे. या वेगान व्यवसायात पदार्पण करून त्याचा लाभ घ्यावा, असा अनाहूत सल्ला या पत्राद्वारे दिला आहे.
* अमूल ही संस्था देशातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि वितरणातील एक अग्रगण्य सहकारी संस्था आहे. देशातील अनेक संस्था या संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असतात.
* वेगान दूध - शाकाहारी दूध जे बदाम, सोयाबीन, नारळ आणि ओट या पासून बनवले जाते. जे कोणत्याही बाजूने गाई म्हशीच्या दुधाची बरोबरी करू शकत नाही. त्यापासून मिळणारी ऊर्जा, शक्ती, शर्करा, फॅट, प्रोटीन, (प्रथिने) जीवनसत्त्वे यांची असणारी कमतरता वेगवेगळ्या मार्गाने त्यामध्ये समाविष्ट करून त्याला उच्च दर्जा देण्याचा प्रयत्न केला जातो. जो डब्ल्यूएचओला मान्य आहे, त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ते तयार केले जाते. याबाबत श्री. सोधी, व्यवस्थापकीय संचालक, अमूल यांनी याला उत्तर देताना वेगान दूध - दुधासारखे बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या वस्तू या रासायनिक किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेल्या असतात. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त आपण पेय म्हणू शकतो ते कोणत्याही परिस्थितीत दुधाचा दर्जा घेऊ शकत नाहीत. या प्रकारे उत्तर ट्विटरवर दिले आहे. पण पेटा वेगवेगळ्या प्राणिजन्य आजारांची यादी, पर्यावरणाबद्दल चिंता आणि प्राण्यांच्या बाबतीत क्रौर्य रोखणे असे मुद्दे समोर आणून आपला मुद्दा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे.
* एदेशातील करोडो लोकांचा उदरनिर्वाह हा या दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे, त्यालाच अपशकून करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या खाद्य संस्कृतीमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दही, ताक, लोणी यांचा पूर्वापार समावेश आहे. आयुर्वेदात दुधाचा वापर हा विविध अंगांनी अधोरेखित केला आहे. शेवटी लोकांनी काय खावं आणि काय खावू नये, याबाबत निश्रि्चतच जबरदस्ती करता येणार नाही, हे व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्या युरोपियन मंडळींना माहीत नाही असे नाही. असे असले तरीही जगातील मोठमोठ्या कंपन्या आपले उत्पादन खपवण्यासाठी सुद्धा असे उद्योग करत असतात. मागील ७५ वर्षांपासून या देशातील दुग्ध व्यवसाय करोडो लोकांचा आधारस्तंभ बनला आहे. अशा सर्व बाबी श्री. सोधी यांनी या पत्रानंतर ट्विटरच्या माध्यमातून सर्वांच्या नजरेसमोर आणल्या आहेत.
* जागतिक पातळीवर आपण दुग्धव्यवसायात प्रथम क्रमांकावर असलो तरी आपल्या पशुधन संख्येवरून आपल्याला टार्गेट केले जाते. या अशा प्रचंड पशुधनामुळे आणि त्यांच्या मिथेन वायू उत्सर्जनामुळे आपण पर्यावरणाला हानी पोहोचवत आहोत, असा आरोप करून नवनवीन बाबी आपल्यावर लादण्याचा जागतिक समुदायाचा प्रयत्न नेहमी सुरू असतो. आपल्याला येणार्या काळात प्रति जनावर दूध उत्पादन वाढीसाठी प्रचंड प्रयत्न आणि मेहनत करावी लागेल हे निश्रि्चत! त्याचबरोबर बदाम, सोयाबीन आणि नारळ यापासून सुद्धा नवनवीन मूल्यवर्धित उत्पादने घ्यायला पाहिजेत. या सर्वांचे भारतातील उत्पादनदेखील चांगले आहे. नैसर्गिक दुधापेक्षा त्यांच्या किमतीही जास्त आहेत. त्याचाही फायदा त्या त्या उत्पादकांना भविष्यात होऊ शकतो.
* एका आकडेवारीवरून आपल्या देशात देखील लॅक्टोज इनटॉलेरेंस (Lactose intolerance) असणार्या लोकांची संख्याही वाढत आहे. वेगान खाद्य संस्कृती परदेशात वेगाने वाढत आहे. आपण मंडळी सर्वांगीण विचार न करता पाश्चात्त्यांचे अनुकरण करत असल्याने या सर्वांचा विचार आपल्याला या जागतिक दुग्ध दिनी करावाच लागेल. एकूणच पेटाचे अमूल साठी लिहिलेले पत्र आणि त्यावरील श्री. सोधी यांच्या प्रतिक्रिया या थेट दुधाशी संबंधित असल्यामुळे या घटनेचा धांडोळा माध्यमांमधून घेऊन वस्तुस्थिती आपल्या उत्पादकांना कळावी, यासाठीचा हा छोटासा प्रयत्न!
सौजन्य व आभार : अॅग्रोवन
१ जून २०२१ / डॉ. व्यंकटराव घोरपडे
पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अॅनिमल्स)
* पेटा ही संस्था २२ मार्च १९८० मध्ये इन्ग्रीड न्यू कीर्क व अॅलेक्स पॅचेको यांनी अमेरिकेतील नोर्फ्लॉक व्हर्जिनिया येथे स्थापन केली असून तिचे कार्य जगभर चालते.
* पेटा या संस्थेने अमूलचे मॅनेजिंग डायरेक्टर आर. एस. सोधी यांना पत्र लिहून वीगन मिल्क प्रोडक्टच्ये उत्पादन करण्याबाबत अमूलने विचार केला पाहिजे. जगभरात वेगाने वाढत असलेल्या शाकाहारी दुधाचे आणि उपपदार्थांचे मार्केट काबीज केले पाहिजे. वनस्पतींपासून दूध तयार करण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. याची मागणी वाढत आहे. अन्य कंपन्या याचा फायदा घेऊ शकतात तर अमूल का नाही? असे म्हटले होते.
* प्राणी संरक्षणासाठी काम करणारी पेटा (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट टू अॅनिमल्स) ही संस्था बैलांनंतर गायींच्या संवर्धनासाठी प्रयत्नरत आहे. गायीच्या दुधाऐवजी शाकाहारी म्हणजेच वनस्पती दुधाची निर्मिती करणे शक्य असून त्यासाठी दूध संघांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पेटाने केले आहे. याला प्रत्युत्तर देत अमूल दूध संघाने हे शास्त्रीय नसून पेटा प्राणी संरक्षणाच्या आडून वेगळाच अजेंडा चालवत आहे, १० कोटी शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावण्याच हा डाव आहे, असा आरोप केला.
* पेटाने याआधी शर्यतींमध्ये बैलांच्या वापराबाबत कोर्टात धाव घेतल्याने महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती. तसेच तामिळनाडू येथील जल्लिकट्टू या बैलांच्या खेळावरही आक्षेप घेत न्यायालयीन लढाई लढली होती. मात्र, प्रचंड सामाजिक व राजकीय दबावानंतर हा खेळ सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. भारतात बंदिस्त कुकुट्ट पालन, हत्ती आणि अन्य प्राण्यांच्या संगोपनपद्धतीवर पेटाने न्यायालयीन लढाया लढल्या आहेत.
भारतातील दुग्धव्यवसाय
१) जागतिक पातळीवर दूध उत्पादन करणार्या सर्व देशांमध्ये भारत अग्रणी.
२) सन २०२० मध्ये भारतातील दुग्धव्यवसायाची उलाढाल ११.३६ लाख कोटी रुपये
३) २०१९-२० मध्ये देशात १९८.४ दशलक्ष टनांहून अधिक दुधाचे उत्पादन झाले.
४) २०१८-१९ मध्ये दूध व्यवसायामध्ये तत्कालीन मूल्यानुसार ७.७२ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली, ती त्या वर्षीच्या गहू आणि तांदूळ यांच्या एकत्रित उलाढालीहून अधिक होती.
५) २०१५ पासून गेल्या सहा वर्षांच्या काळात, देशातील दूध उत्पादनात दर वर्षी सरासरी ६.३% ची वाढ झाली आहे तर या काळात जागतिक पातळीवरील दूध उत्पादन दर वर्षी फक्त १.५% ने वाढली.
६) देशातील दूध उत्पादन क्षेत्र ८ कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकर्यांना उपजीविकेचे साधन पुरविते आणि यापैकी बहुतांश मुख्यतः छोटे आणि दुर्लक्षित, भूमिहीन मजूर आहेत.
७) २ कोटींहून अधिक दूध उत्पादक शेतकरी सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या माध्यमातून एकत्र आले.
८) १.९४ लाख सहकारी दूध उत्पादक संस्था दूध उत्पादन करणार्या गावांमधून दूध संकलन करतात .
९) १७७ मिल्क युनियन, १५ मिल्क मार्केटिंग फेडरेशन्स कार्यरत
१०) भारतात लाईव्हस्टॉक संबंधित उद्योगातून जवळपास २१.२५ कोटी लोकांना रोजगार मिळतो.
११) भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर आहे, परंतु प्रति जनावर उत्पादन अत्यंत कमी आहे.
१२) २०१५-१६ मध्ये भारताचे दरडोई प्रतिदिन दूध उत्पादन ३३७ ग्रॅम होते
१३) जागतिक दूध उत्पादनाच्या फक्त ७ टक्के दुधाचा आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यात येतो.
१४) भारतात जवळपास ७० टक्के दूध उत्पादकांकडे १ ते ३ इतकी अल्प जनावरे आहेत.
१५) भारत, पाकिस्तान, इजिप्त व चीन आदी मोजक्या देशांत म्हशीच्या दुधाचा वापर होतो.
१६) सहकारी तत्त्वातून ३० टक्के दुधाची विक्री,उर्वरीत ७० टक्के दूध खासगी व्यापार्यांच्या हातात.
दुधाची गुणवत्ता -
१) जागतिक मानांकानुसार दुधामध्ये प्रतिमिलि १ लाखापेक्षा जास्त जिवाणू असतील तर ते स्वीकारले जात नाही. भारतामध्ये हे प्रमाण ८ ते १० लाख प्रतिमिलि इतके प्रचंड आहे. सोबत भेसळीचे प्रमाणही वाढत आहे.
२) भारतात देशी गायीचे दूध (ए १) व संकरित गायीचे दूध (ए २) म्हणजेच ए-१, ए-२ दूधाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
३) दूध संकलन त्यातील स्निग्ध पदार्थावर (फॅट व डिग्री) अवलंबून आहे. त्याचबरोबर प्रतिमिलि जिवाणूंची संख्या लक्षात घेणे गरजेचे आहे.
४) दूध गुण प्रत नियंत्रण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करणे.
५) चारा व खाद्याचे योग्य नियोजन करणे.
दुग्ध व्यवसायात आधुनिकता आणण्याची गरज -
१) जागतिक दर्जाचे दुग्ध पदार्थ तयार करण्यासाठी आवश्यक असणारे चांगल्या प्रतीचे दूध आपल्याकडे मिळत नाही. दुग्ध व्यवसाय नवीन तंत्रज्ञानाने करायचा असेल तर भांडवली खर्च वाढतो.
२) दुग्ध व्यवसायात आधुनिक यंत्रांचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होतो. या भांडवली खर्चाला ५० टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य मिळाले तर मोठ्या प्रमाणात परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
३) दुधामधील जिवाणूंचे प्रमाण कमीत कमी ठेवण्यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी दूध काढल्यानंतर शक्यतो त्वरित ४ अंश सेल्सिअस तापमानाला साठवावे.
४) भारतातील पशुधनाला खुरे व तोंडातील रोगांपासून मुक्ती देण्याचे ध्येय लसीकरण केल्यास २०२५ सालपर्यंत, तर लसीकरणाशिवाय २०३० सालपर्यंत पूर्ण करू शकतो.
५) गुरांचे पोषण होण्यासाठी उत्तम प्रतीचा चारा व पशुखाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पशुआधार योजनेद्वारे पशूंची गणना व नोंदणी केली जाते.
६) आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धोत्पादन मंत्रालयाच्या पशुपालन पायाभूत सुविधा विकास मंडळ (AHIDF) तर्फे योजना आखल्या जातात. त्यानुसार पशुखाद्य निर्मिती संयंत्रे, दुग्धप्रक्रिया व मूल्यवर्धन सुविधा उभ्या करण्यासाठी उद्योजक, खाजगी कंपन्या, मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाते. मात्र सध्या दुग्धजन्य पदार्थांची आयात करणार्या प्रमुख देशांनी भारतातून निर्यात होणार्या दुग्धजन्य पदार्थांवर वाढीव आयात शुल्क लावले जात आहे.
गोपाल रत्न -
* २०२१ पासून केंद्र सरकारने गुरेपालन आणि दुग्धालय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी गोपाल रत्न या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांची सुरुवात केली. हे पुरस्कार तीन विविध श्रेणींसाठी दिले जातील -
१) सर्वोत्कृष्ट गुरे पालक शेतकरी,
२) सर्वोत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ
३) सर्वोत्कृष्ट सहकारी दुग्धव्यवसाय संस्था किंवा दूध उत्पादक कंपनी किंवा अन्न उत्पादक संघटना.
* ई-गोपाल अॅप-
१) १० सप्टेंबर २०२० रोजी पंतप्रधानांनी ई-गोपाल अॅप चे (उत्पादनशील गुरांच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठीचे अॅप) उद्घाटन केले होते. हे अॅप शेतकर्यांना थेट वापरता येते.
२) २०१२१ पासून ई-गोपाल अॅपचे उमंग मंचाशी एकत्रीकरण केल्यामुळे उमंग मंचाच्या ३ कोटी १० लाख वापरकर्त्यांना ई-गोपाल अॅप वापरता येते.
* एपिडा (APEDA) चे अध्यक्ष - डॉ. एम. अंगामुथु
* राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक - मिनेश शाह
* गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघटनेचे अर्थात अमूल चे व्यवस्थापकीय संचालक - डॉ आर. एस. सोधी
* केंद्रीय मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्री - गिरीराज सिंह
राष्ट्रीय दूध दिन :२६ नोव्हेंबर
* २०१४ पासून श्वेत क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांचा वाढदिवस भारतात देशात राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणार्या उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे आहे.
* २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळमधील कोझिकोड येथे जन्मलेल्या वर्गीज कुरियन यांचे जन्मशताब्दीवर्ष २०२१.
* १९४९ मध्ये, कुरियन यांनी भारतात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक असोसिएशन लिमिटेड (केडीसीएमपीयूएल) चा कार्यभार स्वीकारला व त्यानंतर दूध उत्पादनात एक क्रांती घडून आली. यानंतर केडीसीएमपीयूएलच्या सहकारी संस्था तयार झाल्या.
* १९५५ मध्ये डॉ. वर्गीस कुरियननी म्हशीच्या दुधाची पावडर करण्याचे नवीन तंत्र शोधले.
* १९७० मध्ये भारतातील ऑपरेशन फ्लड म्हणून जगातील सर्वात मोठा दुग्धव्यवसाय विकास कार्यक्रम डॉ. वर्गीस कुरीयन यांच्या प्रयत्नातून सुरु झाला.
* त्यांनी सर्व कर्मचार्यांच्या सूचनेनुसार केडीसीएमपीयूएलचे नाव अमूल म्हणजे अनमोल असे ठेवले.
* देशातील १.६ करोड पेक्षा अधिक दूध उत्पादक अमूलशी संबंधित आहेत.
* अमूलशी १,८५,९०३ दुग्ध सहकारी संस्था जोडल्या गेलेल्या आहेत.
* डॉ. वर्गीस कुरियन यांना भारत सरकारने पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्याशिवाय, त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, कार्नेगी वटलर वर्ल्ड पीस पुरस्कार आणि अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. श्वेत क्रांतीचे जनक.
* ९ सप्टेंबर २०१२ रोजी वर्गीस कुरियन यांचे निधन झाले.
दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे -
१) दूधामध्ये असणार्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. रक्तदाब नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही त्यामुळे हृदयासंबंधीत कोणत्याही समस्या उद्भवत नाही. हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी झोपताना दूध पिणे कधीही चांगले.
२) दूध पिण्यामुळे त्वचे संबंधीतील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. दूध हे त्वचेला कोमल, मुलायम आणि चमकदार बनवतो. दूधामध्ये त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे असतात. त्यामुळे दिवसातून दोन ग्लास दूधाचे सेवन करणे गरजेचे आहे. दुधात व्हिटॅमिन बी १२ असते जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत करते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए नवीन पेशी रचना तयार करण्यास मदत करते आणि त्वचेच्या विविध आजारांशी लढायला मदत करते.
३) स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंत करतात त्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे मिळतात. दूध पिण्याने स्नायुमधील वेदनाही दूर होते.
४) दूध हा प्रथिनांचा स्रोत आहे, त्याच्या योग्य सेवनाने रक्तातील साखरेचे योग्य स्तर राखण्यात आणि उर्जेची पातळी कमी करण्यास मदत करते. क्रीमपेक्षा कमी फॅट (फॅट) असलेले दूध अधिक प्रभावी आहे.
दूधातून मिळणारे घटक
* दूध हे पाणी, मेदाम्ले, प्रामुख़्याने केसीन (प्रथिन) आणि लॅक्टोजचे (शर्करा) कलिली मिश्रण आहे. याशिवाय सोडियम,पोटॅशियम, कॅलशियम यांचे क्षार, आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस पेंटाऑक्साइड, अ आणि ड जीवनसत्त्व असते. दुधामध्ये काहीं प्रमाणात जिवाणूप्रतिबंधक आणि कवकप्रतिबंधक विकरे असतात. सस्तन प्राण्यांच्या सर्वच जातीमध्ये दूध निर्मिती होते.
* प्रतिलिटर मानवी दुधात १५ ग्रॅम प्रथिने असतात तर रेनडियरच्या दुधातील प्रथिनांचे प्रमाण १०९ ग्रॅम असते.
* दूधामध्ये मानवी शरीरास पोषक असलेले घटक-
१) कॅल्शियम
२) मॅगनिशियम
३) झिंक
४) फॉस्फरस
५) ऑयोडीन
६) आयर्न
७) पोटॅशियम
८) फोलेट्स
९) व्हिटॅमिन ए
१०) व्हिटॅमिन डी
११) राइबोफ्लेविन
१२) व्हिटॅमिन बी१२
१३) प्रोटीन
१४) आरोग्यदायी फॅट
दुधाचे प्रकार व दुग्धपदार्थ
१) गायीचे दूध - गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते आणि जीवनसत्त्व अचे प्रमाण जास्त असते. गीर गाईचे दूध बी २ प्रकारचे आहे. गायीचे दूध रोज पिल्याने कॅन्सर, HIV, ह्दयरोग, रक्तदाब, मायग्रेन सारखे आजार होत नाहीत.
२) म्हशीचे दूध - हे दूध पचायला अतिशय हलके असल्याने कोणत्याही वयाचे लोक या दुधाचे सेवन करू शकतात. म्हशीच्या दुधात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉसफरस, कॅल्शिअम असल्याने हाडांसाठी हे दूध अतिशय उपयुक्त असते.
३) निरसे दूध - दुधाळू प्राण्यांच्या न तापविलेल्या दुधास निरसे अथवा कच्चे दूध म्हणतात. दूध तापविल्याने त्यातील अनेक महत्त्वाचे घटक नष्ट होतात.
४) ऑरगॅनिक दूध - ऑरगॅनिक दूध म्हणजे कोणत्याही प्रकारचे भेसळ नसलेले शुद्ध गायीचे दूध.
५) सोया मिल्क - सोया मिल्कमध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे दुध कॅल्शिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम, झिंक आशा खनिजांनी परिपूर्ण असे असते.
६) राईस मिल्क - राईस मिल्कमध्ये व्हिटॅमिन इ आणि मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
७) बदाम दूध - बदाम दुधात भरपूर कॅलरीज, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशिअम, कॉपर असल्याने त्याचे रोज सेवन केल्यास वजन कमी करण्यास, हाड मजबूत बनवण्यात, त्वचेला तजेला आणण्यास ते फायदेशीर ठरते.
८) नारळाचे दूध - नारळाच्या दुधात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन इ, व्हिटॅमिन बी १, व्हिटॅमिन बी ३, आणि व्हिटॅमिन बी ५ असल्याने हे दूध अतिशय स्वास्थकारक असते.
९) लोणी - लोण्यामध्ये कमीत कमी ८० टक्के दुधातील स्निग्ध असते.
१०) दही - दुधातील लॅक्टोजचे लॅक्टिक अॅसिडमध्ये रुपांतर होते.
११) पनीर - दुधामध्ये केसीन नावाचे प्रथिन असते. दुधामध्ये एखादा आम्लधर्मी पदार्थ घातल्यास केसीनचे रेणू एकत्र येऊन त्याचे जाळे तयार करण्यात होतो. त्यास पनीर असे म्हणतात. पनीर तयार करताना दुधात सायट्रिक आम्लाचे द्रावण किंवा लिंबाचा रस २ टक्के एवढा टाकला जातो. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध व प्रथिने आढळतात. तसेच कॅल्शियम फॉस्फरस या क्षारांचे प्रमाणही जास्त असते. जीवनसत्व अ व ड यांचे प्रमाणही भरपुर प्रमाणात आढळते.
१२) खवा - १ लीटर चांगल्या दुधापासून १२० ते १३० ग्रॅम एवढा खवा बनतो. काही ठिकाणी यास मावा असेही म्हणतात. खवामध्ये स्निग्धांचे प्रमाण २० टक्के असते, आर्द्रता ४५ ते ४० टक्के आणि एकुण घनपदार्थ ६० ते ४५ टक्के असतात. नैसर्गिक तापमानामध्ये व्यवस्थित पॅकिंग केलेला असेल तर ७ दिवसांपर्यंत आणि रेफ्रिजरेटरमध्ये ३ आठवड्यांपर्यंत टिकून राहतो. मुख्यतः खव्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले असल्यामूळे खवा जास्त काळ टिकून राहतो.
१३) चीझ - दुधातील केसीन या प्रथिनास साकळून चीझ तयार केले जाते. केला जातो. चीझ हे गाई, म्हैस, बकरी किंवा मेंढीच्या दुधापासून बनवितात. दुधाला आम्ल करुन रेनेट नावाचे एनजाइम घालून साकळवतात. त्यातला द्रव पदार्थ काढून टाकल्यानंतर राहिलेला घनपदार्थ म्हणजे चीझ.
ए-१ व ए-२ दूध
* गायीच्या दुधात ८७ टक्के पाणी आणि १३ टक्के घन पदार्थ असतात. घन पदार्थात मेद, शर्करा (लॅक्टोज), खनीजपदार्थ व प्रथिने असतात. केसीन हा प्रथिनांचा मुख्य घटक असतो आणि या केसीनपैकी ३०-३५ टक्के प्रमाण हे बीटा केसीनचे असते.
* गायींच्या जनुकीय रचनेनुसार, बीटा केसीनचे निरनिराळे प्रकार असतात. यांतील प्रमुख प्रकार म्हणजे ए १ व ए २ बीटा केसीन. या दोघांच्या संरचनेत एका अमायनो आम्लाचा फरक असतो. पैकी ए १ हा प्रथम शोधला गेला व ए २ त्यानंतर.
* २०९ अमायनो आम्लांच्या शृंखलेने बनलेल्या या दोन्ही केसीनमधला एकमेव फरक म्हणजे ६७वी जागा. ए १ बीटा केसीनमधे या जागी असतो हिस्टिडीन आणि ए २ बीटा केसीनमधे असते प्रोलिन. पचनसंस्थेतील पाचक विकरांची अभिक्रिया नेमकी या ६७ व्या ठिकाणीच होत असते. ए१ बीटा केसीनपासून बीटा केसोमॉर्फिन ७ (बीसीएम७) हे पेप्टाईड तयार होते. परंतू, ए२ प्रकारात बीसीएम७ तयार होत नाही.
* २००० मधे स्थापन झालेल्या ए २ कॉर्पोरेशन या कंपनीने एक जनुकीय चाचणी विकसित केली. गाय कोणत्या प्रकारचे दूध देते (ए१ की ए२) हे या चाचणीद्वारे ठरविता येते. या चाचणीने प्रमाणित ए२ दूध हे त्यात हानिकारक पेप्टाईड्स चा अभाव असल्याने, अधिक किंमतीने विकले जाऊ शकते. बीटाकेसीन ए१ हा हानीकारक घटक प्रौढांमधे हृदयरोग तर बालकांत इन्शुलिन-मधुमेहाचा कारक ठरतो.
* आफ्रिका व आशियात फक्त ए २ प्रकारच्या गायी आहेत. ए १ प्रकार पश्रि्चमी देशांत आढळतो. जातिनिहाय पाहिले तर ग्वेर्न्से जातीच्या ७० टक्के गायी ए१, तर होल्स्टन व आयर्शायर्स जातीच्या गायी ४६ ते ७० टक्के ए२ प्रकारचे दूध देतात.
* युरोप (फ्रान्सशिवाय), ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मधील गायींत ए १ बीटा केसीन आढळते. ए २ मिल्क हे ए २ मिल्क कंपनीचे ब्रँड उत्पादन मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व इंग्लंडमध्ये विक्रीस उपलब्ध आहे.
* ए २ दूध -गायीच्या ज्या दुधात बीटा-केसीन प्रथिनाचा ए २ हा घटक मिळतो, त्या दुधास ए २ प्रकारचे दूध स्हणतात.
* ए १ दुधातील ए १ प्रथिने हानिकारक असू शकतात व त्यामुळे दुधाचे पचन कठीण होऊ शकते.
* ए २ मिल्क कंपनी ने विकसित केलेल्या जनुकीय चांचणीद्वारे, कोणती गाय ए १ प्रकारचे दूध देते व कोणती गाय ए २ प्रकारचे दूध देते, हे शोधता येते. या चाचणीच्या आधारे सर्व गायींची चांचणी करुन ही ए २ मिल्क कंपनी ऊत्पादकास प्रमाणपत्र देते. हे दूध अधिक किंमतीला विकले जाते.
* पिलास जन्म दिल्यानंतर पहिल्या काहीं दिवसात स्तनातून येणार्या दुधास कोलोस्ट्रम (मराठीत चीक) म्हणतात. कोलोस्ट्रममधील प्रतिकारद्रव्ये संसर्गापासून पिलांचे संरक्षण करतात.
* पियुषिका पोषग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्रवते व ऑक्सिटॉसिनच्या प्रभावाने स्तनामध्ये साठलेले दूध आचळातून बाहेर वाहते.
दुधावरील प्रक्रिया -
१) पाश्चरायझेशन या प्रक्रियेत दूध विशिष्ट काळासाठी ठरावीक तापमानावर तापवण्यात येते. या प्रक्रियेमुळे दुधातील हानिकारक जीवाणू नष्ट होऊन ते माणसांच्या पिण्यालायक होते, तसेच त्याचे आयुष्यमानही वाढते.
२) होमोजिनायझेशन प्रक्रियेत दुधातील स्निग्धकण फोडून ते एकजीव करण्यात येते व ते नासणार नाही याची काळजी घेऊन थंड करण्यात येते.