आंतरराष्ट्रीय चहा दिन : २१ मे

  • आंतरराष्ट्रीय चहा दिन : २१ मे

    आंतरराष्ट्रीय चहा दिन : २१ मे

    • 22 May 2021
    • Posted By : study circle
    • 481 Views
    • 0 Shares
    आंतरराष्ट्रीय चहा दिन : २१ मे
     
         सामाजिक-आर्थिक विकास, संस्कृती, आरोग्य अशा कितीतरी बाबींच्या अनुषंगाने चहा हे मानवाच्या आयुष्यातलं एक अविभाज्य अंग झालंय. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा. त्याचं हे महत्त्वच लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यूएनच्या अन्न व कृषी संघटने कडून (एफएओ) आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
     
    •  याआधी, भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया या देशांमध्ये या चहा उत्पादक देशांमध्ये १५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जात असे. पण नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले, त्याचे कारण म्हणजे चहा उत्पादनाचा हंगाम मे मध्ये बहुतेक चहा उत्पादक देशांमध्ये सुरू होतो.
     
    आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचा उद्देश
     
    १)  चहा हा जगातील भूक आणि दारिद्र्य निर्मूलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी युएनची आशा आहे.
    २)  चहाच्या व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि त्याच्या नैतिक आणि टिकाऊ उत्पादनावर लक्ष केंद्रीत करणे.
    ३)  चहा उत्पादनाचा हंगाम मे मध्ये बहुतेक चहा उत्पादक देशांमध्ये सुरू होतो.
     
      यूएनने चहाच्या औषधी गुणांना नुसते ओळखले नसून त्याला शाश्‍वत विकास लक्ष्य कार्यक्रमाचा Sustainable Development Goal programme  एक महत्त्वाचा घटक मानले आहे. तसेच चहाचा वाढता वापर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.  चहाचे औषधी मूल्य असून यामध्ये लोकांमध्ये आरोग्यासाठी फायदे देण्याची क्षमता असल्याचे यूएनने  म्हटले आहे. चहा अनेक संस्कृतींमध्ये महत्त्वाचा असतो आणि यामुळे रोजगार, निर्यात कमाई आणि अन्नसुरक्षेला हातभार लागतो.
     
    आंतरराष्ट्रीय चहा दिवसाचा इतिहास
     
      मुंबई शहरातील काही व्यापार्‍यांच्या आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठकीत १५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा करायचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर वर्ल्ड सोशल फोरमच्या २००४ मधील चर्चासत्रात नवी दिल्लीत हा दिवस २००५ मध्ये पहिल्यांदा साजरा करण्याचे ठरले. त्यावेळी हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू असा  होता की, जागतिक चहा व्यापार्‍यांचे कामगारांवर आणि उत्पादकांकडे लक्ष केंद्रित व्हावे.
     
      २००५ साली १५ डिसेंबरला पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्यात आला होता. त्यावेळी  जगभरातील टी आणि कॉफी हाऊसेसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
     
      २०१५ साली भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनला आंतरराष्ट्रीय चहा दिवसाची व्याप्ती वाढवायचा प्रस्ताव दिला. त्यानुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने यावर अनेक देशांचा विचार घेऊन २१ मे हा जागतिक चहा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला.
     
      २१ मे २०२० हा पहिला आंतरराष्ट्रीय चहा दिन ठरला.
     
      २१ मे २०२१ हा दुसरा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा झाला.
     
    चहाचे फायदे
     
    १)  चहामध्ये प्रोटिन, पॉलीसॅकेराइड, पॉलिफेनॉल, मिनरल्स आणि अमिनो, कार्बनिक अ‍ॅसिड, लिग्निन आणि मिथाइलक्सैन्थिन (कॅफिन, थिओफिलाइन आणि थियोब्रोमाइन) हे घटक असतात. हे शरीराला फायदेशीर असतात.
    २)  चहामध्ये फायटोकेमिकल्स मानवी शरीरात शक्तिशाली अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट्स म्हणून कार्य करतात.
     
    *•  चहाचा मानवी शरीरास पुढीलप्रकारे फायदे होत असल्याचा विविध संशोधकांचा दावा आहे -
    १)  चहामध्ये असलेले फ्लॅवोनाईड व अँटिऑक्सिडंटस हृदयविकार, रक्तदाब, कर्करोग यासारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करण्याची भूमिका पार पाडतात.
    २)  चहामधील कॅटेचिन या घटकात शरीरातील उष्मांक (कॅलरी) जाळण्याची मोठी क्षमता आहे.
    ३)  हाडे मजबूत बनविण्याकरिता आणि हाडांची ताकद वाढविण्याकरिता चहाचे सेवन उपयुक्त ठरते. वयोमानानुसार हाडे ठिसूळ होऊ लागल्याने सांधेदुखीसारख्या अनेक व्याधी होतात; मात्र नियमित चहा प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
    ४)  शरीराला ऊर्जा पुरविण्याचे काम या पेयाद्वारे होत असते. शरीरात आलेला आळस दूर करण्याचे सामर्थ्य चहामध्ये असते; माफक प्रमाणात चहाचे सेवन केल्यास शारीरिक थकवा कमी होतो.
    ५)  प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम चहाद्वारे होते.
    ६)  रक्तशर्करा नियंत्रणात ठेवण्याचे काम चहामुळे होते. मधुमेह असलेल्या रुग्णांकरिता चहा हे चांगले औषध आहे.
    ७)  चहा हे शरीराला हितकारक आणि उत्साहवर्धक पेय आहे. मेंदूपेक्षाही स्नायूंना हे पेय जास्त उत्साहवर्धक आहे.  वेगवेगळ्या स्नायूंची क्षमता वाढवण्याचे कामही चहामुळे होते.
    ८)  कर्करोगाची निर्मिती करणार्या अनेक पेशींना प्रतिबंध करण्याचे काम चहातील काही घटकांमुळे होते, अनेक प्रकारच्या कर्करोगांशी लढण्यात चहाचा फायदा होतो.
    १०) नियमित चहा घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा व्यक्तींचा रक्तदाब नियंत्रित राखण्यात चहाची मदत होते.
    ११) चहामध्ये असलेले विशिष्ट गुणधर्म शरीरातील कोलेस्टरॉलच्या वाढीस प्रतिबंध करतात. ग्रीन टीबरोबर ब्लॅक टीमध्येही शरीरातील चरबी जाळण्याची क्षमता असते.
    १४) चहामध्येही वजन नियंत्रणात आणण्याची क्षमता आहे. 
     
    *  चहाचे कोणकोणते प्रकार आरोग्याला कसे उपयुक्त ठरतात?
    1)  ग्रीन टी - ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाच्या अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठे असते. एका कपात २५ मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात कॅफीन हा घटक ग्रीन टीमध्ये सापडतो. अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठे असल्याने ग्रीन टी हा हृदयविकारावर उपयुक्त समजला जातो. 
    2)  ओलोंग टी - या चहाची पाने थोड्याच वेळेकरिता फरमेंट केली असतात. यामुळे या चहाची चव चांगली असते. या चहाच्या एका कपामध्ये ३० मिलीग्रॅम एवढे कॅफीन असते. आपल्या शरीरात चरबी साठवणारी जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला प्रतिबंध करण्याचे काम या चहातील काही घटकांमुळे होते.
    3)  व्हाईट टी - चहाच्या झाडाची पाने खूपच कोवळी असताना खोडली जातात आणि त्यापासून हा चहा बनवला जातो. कोवळ्या पाणांपासून बनवला जात असल्याने या चहाचा स्वाद कडक नसतो. अन्य चहापेक्षा व्हाईट टीमधील कॅफीनचे प्रमाण कमी असते. एक कप व्हाईट टीमध्ये १५ मिलीग्रॅम एवढे कॅफीन आढळून येते. असा चहा सुट्टा खरेदी केल्यास तो आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असतो. याचे कारण सुट्ट्या चहावर कमी प्रक्रिया केलेली असते. या चहामध्ये कॅन्सरला प्रतिबंध करणारे काही घटक आढळून आले आहेत.
    ५)  सुगंधी चहा (फ्लेवर्ड टी) - चहाला विशिष्ट प्रकारचा वास येण्याकरिता त्यामध्ये दालचिनी, संत्र्यांची साल घातली जाते. ब्लॅक, ग्रीन आणि व्हाईट या चहांमध्ये हे पदार्थ घातल्यास सुगंधी चहा तयार होतो. या चहामध्ये अन्य चहाप्रमाणेच अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण असते. त्यामुळे या चहाचाही आरोग्याला मोठा फायदा  होतो.
    4)  ब्लॅक टी - चहाचा हा सर्वमान्य प्रकार आहे. जगातील चहा घेणार्या एकूण व्यक्तींपैकी ७५ टक्के व्यक्ती असा चहा घेत असतात. चहाच्या एका कपामध्ये ४० मिलीग्रॅम एवढे कॅफीन असते.
     
    *   ब्लॅक टी पिण्याचे फायदे -
    १)  वजनवाढीवर नियंत्रण - ‘ब्लॅक टी’मध्ये असणार्‍या अँटीऑक्सिडंटसमुळे फॅट बर्न होण्यास तसेच लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. चहामध्ये दूध घातल्याने अँटीऑक्सिडंटसचा परिणाम कमी होतो. ‘ब्लॅक टी’मुळे भूक कमी लागूनदेखील शरीराला जास्त ऊर्जा मिळते. त्यामुळे आपण जास्तीत जास्त अ‍ॅक्टीव राहतो.
    २)  पचनक्रिया सुधारते -खाल्लेल्या अन्नाचे चांगल्यारितीने पचन करण्यासाठी ‘ब्लॅक टी’ अतिशय उपयुक्त ठरतो. पचनशक्ती चांगली करण्यासाठी तसेच, पोटदुखी, गॅस यांच्यावर उत्तम उपाय म्हणून काम करतो. या समस्या दूर झाल्यामुळे आपल्याला हलके आणि शांत वाटते.
    ३)  हृदयाशी निगडीत अडचणी दूर करण्यास उपयुक्त -रोज ‘ब्लॅक टी’ प्यायल्यास वजन कमी होण्याबरोबरच पचनक्रियाही सुधारते. यामुळे हृदयाशी निगडीत अडचणी दूर होण्यास मदत होते. कोलेस्टरॉलची पातळी योग्य ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.
     
    चहाचे मानवी शरीरावरील दुष्परिणाम
     
    १)  ‘कर्करोग आणि हृदयरोग रोखणारे ‘अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट’ नामक पदार्थ केवळ कोर्‍या चहात आहे. दूधसाखर घालून उकळलेला चहा आयुर्वेद शास्त्रानुसार अग्नीमांद्य (भूक अल्प होणे) घडवणारा असतो.
    २)  दिवसाला ७ ते ३० कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध या विकारांना बळी पडतात.
    ३)  भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.
    ४)  दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मलावष्टंभ, तहान, पक्षाघातासारखे वातविकार आणि शुक्राणूंची संख्या अल्प होणे, असे विकार बळावतात.
    ५)  दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वाढवणारा आणि उष्णगुणाचा आहे.
    ६)  टपरीवर चहा अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.
    ७)  पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, तसेच एप्रिल, मे आणि ऑक्टोबर या मासात सर्वांनी चहा जपून अल्प प्रमाणात प्यायला हवा.
    ८)  भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’
    ९)  चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही. हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे, हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.
    १०) नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.
    ११) चहा समवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला मारक बनतो.
     
    चहा उद्योग
     
      अनेक देशांसाठी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. तसेच या उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात. विकसनशील देशांत चहा हे मुख्य नगदी पिकांपैकी एक आहे. २०१४ मध्ये, जगातला चहाचा व्यापार हा ३६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या घरात होतातर २०२० मध्ये तो सुमारे ४२ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका झाला. 
     
    *   जगात सर्वाधिक चहाची निर्यात करणारे देश २०१९ -
    १)  चीन (२ अब्ज डॉलर्स, जागतिक निर्यातीच्या ३२ %)
    २)  भारत (०.८०३ अब्ज डॉलर्स, जागतिक निर्यातीच्या १३ %)
    ३)  श्रीलंका (०.७२१ अब्ज डॉलर्स, जागतिक निर्यातीच्या ११ %)
    ४)  केनिया (०.३६१ अब्ज डॉलर्स, जागतिक निर्यातीच्या ६ %)
    ५)  पोलंड (०.२५५ अब्ज डॉलर्स, जागतिक निर्यातीच्या ४%)
     
      जगात दरडोई प्रतिवर्ष सर्वाधिक चहाचे सेवन करणारे देश २०१६-
    १) टर्की (३.१६ किग्रॅ)
    २) आयर्लंड (२.१९ किग्रॅ)
    ३) इंग्लंड (१.९४ किग्रॅ)
    ४) इराण (१.५० किग्रॅ)
    ५) रशिया (१.३८ किग्रॅ)
    २०) चीन (२४ लाख टन)
    २८) भारत (९ लाख टन)
    ३५) अमेरिका (३.०५ लाख टन) 
     
    *•   भारतातील चहा उत्पादन, सेवन व निर्यात -
    १)  भारताच्या अर्थव्यवस्थेत चहा व्यवसायाचे मोठे योगदान राहिले आहे.
    २)  भारत सर्वाधिक चहाचे उत्पादन, खप आणि निर्यात अशा तिन्ही पातळ्यांवर आघाडी देशांपैकी एक आहे.
    ३)  भारतातून सर्वांत प्रथम अमेरिकेत चहाची विक्रीसाठी निर्यात करण्यात आली होती.
    ४)  २०२० च्या आकडेवारीनुसार, भारत ९० कोटी किलोग्रॅम चहाच्या उत्पादनासह दुसर्‍या क्रमांकावर होता.
    ५)  २०२० साली मध्ये भारतातून सुमारे ६००० कोटी रुपये मूल्याच्या चहाची निर्यात करण्यात आली.
    ६)  जगातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी ३१ टक्के चहाचे दर्जेदार उत्पादन भारतात घेतले जाते.
    ७)  जगात सर्वाधिक चहाचे सेवन करणारा भारत एक प्रमुख देश आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या मते, भारतातील चहाच्या एकूण उत्पादनापैकी ८० टक्के उत्पादन हे भारतातच सेवन केलं जातं. मात्र दरडोई सेवनाच्या बाबतीत भारताचा जगात २८ वा क्रमांक आहे.
    ८)  इराण, रशिया, संयुक्त अरब अमिरात, यूएसए आणि यूके हे भारतातून मोठ्या प्रमाणावर चहाची आयात करतात. जगातील एकही देश असा नाही, की जिथे भारताचा चहा घेतला जात नाही.  
     
    *  शेअर बाजारातील चहा कंपन्या -
    १)  भारतीय शेअर बाजारात चहा संबंधित प्रक्रियाउद्योग आणि चहाची निर्यात करणार्‍या १६ नोंदणीकृत कंपन्या आहेत.
    २)  या सर्व कंपन्यांची  सुमारे १२,००० कोटी रुपयांची एकूण मालमत्ता असून या सर्व कंपन्यांचा वार्षिक निव्वळ नफा ८५० कोटी आहे.
    ३)  सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार कंपन्यांचे सुमारे ३५ हजार कोटींचे बाजारभांडवल आहे. 
     
    *•   टी बोर्ड ऑफ इंडिया -
    १)  भारतात सर्वप्रथम १९०३ मध्ये ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ची स्थापना करण्यात आली.
    २)  अधिनियम १९५३ अंतर्गत नवीन ’टी. बोर्ड’ची स्थापना स्वातंत्र्यानंतर १ एप्रिल १९५४ मध्ये करण्यात आली.
    ३)  ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ मुख्यालय कोलकता येथे असून भारतात १७ कार्यालये आहेत.
    ४)  विकासात्मक आणि नियामक कार्यांव्यतिरिक्त, ’टी. बोर्ड ऑफ इंडिया’ थेट प्रचार कार्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शन आणि सहभागाचे आयोजन करते. शिवाय खरेदीदार-विक्रेता भेट घडवून आणणे आणि परदेशात व्यापारी शिष्टमंडळ दौरा आयोजित करण्याचे काम करते. चहा बाजार सर्वेक्षण, मार्केट नॅलिसिस, निर्यातदार / आयातदारांना संबंधित माहिती प्रसारित करणे यासारख्या विविध बाजार विकासाची कार्ये करते.  
     
    *   भारतातील चहा व्यापाराच्या पद्धती -
    १)  भारतात दोन पद्धतीने चहाची विक्री केली जाते. एक म्हणजे बोली लावून (ऑक्शन) आणि थेट व्यापार्‍याला विक्री केली जाते.
    २)  कलकत्ता, गुवाहाटी, सिलिगुडी, कोची, कोन्नूर आणि कोइम्बतुर येथील चहाच्या मुख्य बाजारपेठांमध्ये बोली लावून चहाची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
    ३)  भारतीय बाजारपेठेत सुटा चहा १४० रुपये प्रतिकिलोपासून उपलब्ध आहे. वेगवेगळ्या चहाच्या प्रतीनुसार किमती बदलत जातात.
    ४)  गुवाहाटी चहा लिलाव केंद्रावर हाताने तयार केलेल्या आसाममधील चहाला प्रति किलो ३९ हजार ००१ रुपयांची किंमत मिळाली. लिलाव पद्धतीत चहाला मिळालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक किंमत आहे.  
     
    *  चहाची उलाढाल -
    १)  भारतातील चहाखालील क्षेत्र वाढत असून जगातील सर्वाधिक म्हणजे १३ हजार चहाचे मळे भारतात आहे. शिवाय त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या २० लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे.
    २)  भारताच्या निर्यातीत चहाचा मोठा वाटा असून चहा व्यवसायाची उलाढाल ११ हजार कोटींची आहे. यातून देशाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन प्राप्त होते.
    ३)  भारतात सध्या १६९२ चहाचे नोंदणीकृत उत्पादक (प्रकिया उद्योग), २२०० नोंदणीकृत चहा निर्यातदार, ५५४८ नोंदणीकृत चहाचे खरेदीदार आहेत. आसाममध्ये सर्वाधिक चहाचे उत्पादन घेतले जाते.  
     
    चहा : एक स्टार्ट-अप
     
      शहरी भागात चहाचा व्यवसाय  एक ’स्टार्ट-अप’ म्हणून उदयास येऊ लागला आहे. चहाच्या अशा नवीन स्टार्ट-अपची महिन्याकाठी उलाढाल देखील लाखोंवर पोचली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसारख्या ठिकाणी अशी ’स्टार्ट-अप’ मुख्यतः दिसून येत असून यशस्वीरीत्या काही शाखांमध्ये अशा ’स्टार्ट-अप’चा विस्तार पोचला आहे.
     
    *   चहा एक स्टार्ट-अप म्हणून यशस्वी होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत -
    १)  उच्चशिक्षित किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण झालेले तरुण आता या व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या शक्कल लढवून ग्राहकांना आकर्षित करणे.
    २)  चहा करण्याच्या वेगळ्या-वेगळ्या पद्धतीमुळे चहाची ’स्टार्ट-अप’ आकर्षणाची केंद्रे बनली आहेत. चहाच्या चवीतले वेगळेपण आणि केव्हाही गेलो तरी त्याच चवीचा चहा मिळणार याची खात्र
    ३)  पारंपरिक दृष्टिकोन सोडून नीट-नेटकेपणा आणि स्वच्छता नजरेत भरते.
    ४)  दर्जा टिकवून ठेवता यावा यासाठी चहाशिवाय अन्य कोणतेही खाद्यपदार्थ ठेवले जात नाहीत.
     
    चहावरील पुस्तके
     
    १)  ‘द क्लासिक ऑफ टी’ हे चिनी चहाचा पितामह लू यू याने आठव्या शतकात लिहिलेले चहावरचे सगळ्यात जुने पुस्तक आहे.
    २)  ‘द स्टोरी ऑफ टी ः ए कल्चरल हिस्टरी अँड  ड्रिंकींग गाइड’ हे मेरी आणि रॉबर्ट हेस यांचे  चहावरील पुस्तक  जस्त लोकप्रिय आहे.
    ३)  ‘एम्पायर ऑफ टी - द एशियन लीफ दॅट कॉन्कर्ड द वर्ल्ड’ या पुस्तकात मार्कमन इलिस, रिचर्ड काऊल्टन आणि मॅथ्यू मॉगर या लेखक त्रयीने चहाच्या मूळांचा शोध घेत ब्रिटिश साम्राज्याच्या राजकारणातल्या चहाच्या भूमिकेपासून चहाच्या जागतिकीकरणापर्यंतचा प्रवास मांडला आहे.
    ४)  ‘नाइंटीन एटीफोर (१९८४)’ आणि ‘अ‍ॅनिमल फार्म ’ या विख्यात साहित्यकृतींबरोबरच संस्कृती, भाषा आणि राजकारणावर अनेक गाजलेले निबंध लिहिणार्‍या जॉर्ज ऑर्वेलनी उत्तम चहा करण्याचे ११  नियम सांगितले आहेत. ‘अ नाईस कप ऑफ टी’ या १९४६ सालच्या निबंधात त्यांनी यावर भास्य करताना म्हंटले आहे की, ‘ या अकरापैकी कदाचित दोन नियम सगळ्यांना मान्य होतील - १) चहा करायला भारतातली किंवा  सिलोन ( श्रीलंका) मधलीच चहाची पाने वापरावीत, २) चहा चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यातच करावा.
     
    भारतातील चहा लागवड
     
      भारत हा जगातील मोठा चहा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. ईशान्येकडील आणि दक्षिणेकडील राज्यांत चहा, कॉफीचे उत्पादन घेतले जाते.
     
    १)  चहाची लागवड मुख्यत्वेकरून उत्तर व दक्षिण भारतातील डोंगराळ भागांत होते.
    २)  आसाम हा चहाच्या लागवडीमध्ये प्रथमपासून अग्रेसर प्रदेश आहे. त्या राज्यातील ब्रह्मपुत्रा आणि सुरमा या नद्यांच्या खोर्यांतील प्रदेश. आसाममधील चहाचे क्षेत्र सर्वात जास्त असले, तरी त्याची विभागणी फक्त ७५० मळ्यांत आहे.  आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या खोर्यात (याला ‘आसाम व्हॅली’ असेही नाव आहे) चहाच्या लागवडीसाठी सर्वात अनुकूल परिस्थिती असल्यामुळे जगातील सर्वात मोठे सलग चहाचे क्षेत्र या भागात आहे. चहाच्या लागवडीसाठी सुरमा खोर्यांतील हवामान ब्रह्मपुत्रेच्या खोर्याइतके चांगले नाही.
    ३)  पश्रि्चम बंगालमधील दार्जिलिंग, जलपैगुरी, कुचबिहार. भारताच्या ईशान्य भागात तयार होणार्या चहामध्ये दार्जिलिंग चहा विशेष स्वादयुक्त असतो.
    ४)  तराई, कांग्रा, कुमाऊँ आणि डेहराडून जिल्ह्यांतही चहाची लागवड लहान प्रमाणात होते.
    ५)  तामिळनाडूमध्ये ३४,६४६ हेक्टर क्षेत्रात ६,४५० मळे आहेत.
    ६)  केरळमधील मळ्यांची संख्या ३,०३२ आहे.
    ७)  दुसर्या महायुद्धानंतर सी.टी.सी. पद्धतीने उत्तर भारतातील मळ्यांत फार मोठ्या प्रमाणावर चहा तयार होऊ लागला आहे. या भागात जवळजवळ पन्नास टक्के चहा या पद्धतीने होतो. दक्षिण भारतात ही पद्धत फारशी उपयोगात आणली जात नाही.
     
    *  जगात सर्वाधिक चहाचे उत्पादन करणारे देश २०२०-
    १)  चीन (२४ लाख टन)
    २)  भारत (९ लाख टन)
    ३)  केनिया (३.०५ लाख टन)
    ४)  श्रीलंका (३ लाख टन)
    ५)  टर्की (१.७५ लाख टन)
    ६)  इंडोनेशिया (१.५७ लाख टन)
    ७)  व्हिएतनाम (१.१७ लाख टन)
    ८)  जपान (८९ हजार टन)
    ९)  इराण (८४ हजार टन)
    १०) अर्जेंटिना (७० हजार टन)
     
      जगातील एकूण २६ देशांत चहाची लागवड करण्यात येते. यामध्ये चीन, जपान, भारत, बांगलादेश, श्रीलंका, तैवान, इंडोनेशिया, मलेशिया, पूर्व आफ्रिका (केनिया, मालावी, युगांडा आणि मोझांबिक), तुर्कस्तान, ब्राझील, अर्जेंटिना आणि रशिया यांचा समावेश आहे. चीन आणि जपानमध्ये मुख्यत: छोटे शेतकरी चहाची लागवड करतात.
     
      भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, श्रीलंका, रशिया आणि पू. आफ्रिकेतील देश या देशांत ती मोठ्या मळ्यांत करण्यात येते. यांतील काही देशांत चहाची लागवड करणार्या लहान जमीनधारकांचे क्षेत्रही मोठे आहे. भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, युगांडा, टांझानिया, दक्षिण आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.
     
    भारतातील चहा उद्योगाची वाटचाल
     
    १)  भारत चीननंतरचा म्हणजे दुसर्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. भारतात आसाममध्ये कॅमेलिया सिनेसिस जातीच्या चिनी प्रकारच्या चहासारखे उत्पादन होऊ शकतं, याचा शोध सर्वप्रथम रॉबर्ट ब्रूस याला १८२३ मध्ये लागला. १८३० मध्ये त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्या भावाने, चार्ल्सने पाठपुरावा करत हे नमुने कोलकात्याला पाठवले. त्यात असं आढळलं की चहाची ही पाने चिनी चहापेक्षा वेगळी होती.
     
      एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस मणीराम दिवाण या स्थानिक व्यापार्याने रॉबर्ट ब्रूसची गाठ सिंगफो या जमातीशी घालून दिली होती. या जमातीतले लोक चहाशी साधर्म्य असणारे एक पेय पीत होते. ते एका विशिष्ट जंगली झुडपाची कोवळी पानं उन्हात वाळवत. तीन दिवस या पानांवर दव पडेल, अशी ती ठेवली जात. त्यानंतर ती पोकळ बांबूत ठेवून दिली जात. त्यांचा चांगला वास येईपर्यंत त्यांना धुरी दिली जात असे. ब्रूसने त्या पेयाची चव घेतली तर ती चहाशी मिळतीजुळती आहे, असं त्याच्या लक्षात आलं. त्याने या पानांचे नमुने गोळा केले.
     
      याच दरम्यान चहाच्या क्षेत्रातली चीनची जागतिक मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी ब्रिटिशांच्या वसाहतींमध्ये चहाची लागवड करता येईल का, याची चाचपणी सुरू होती. त्यासाठी चीनमधून चहाच्या बिया चोरून भारत, श्रीलंका या वसाहतींमध्ये आणल्या जात. त्यांच्यावर प्रयोग केले जात. या चिनी बिया इथल्या मातीत नीट रुजत नव्हत्या. याच दरम्यान ब्रूसला सापडलेली ही नवी जात सगळ्यांपुढे आली.
     
    २)  ब्रिटिशांनी अप्पर आसाममधल्या चबुआ इथं चहाची व्यावसायिक लागवड सुरू केली १८४० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात चहाच्या व्यवसायाने पाय रोवायला सुरुवात केली. चिनारी ही जात आधी आसाममध्ये आणि नंतर दार्जिलिंग तसेच कांगरामध्ये लावली गेली. ती तिथे चांगली रुजली. दार्जिलिंगचा पहिला सुपरीटेंडंट आर्चिबाल्ड कॅम्पबेल याने दार्जिलिंगमध्ये १८४१ मध्ये त्याच्या घराजवळ चिनारीची रोपं लावली. १८४७ मध्ये अधिकृतरीत्या चहाच्या रोपांची नर्सरी सुरू झाली.
    ३)  भारतात चहा लोकप्रिय होण्यामागे ब्रिटिशांचे खूप प्रयत्न होते. भारतात रेल्वेचं आगमन झाल्यावर विविध रेल्वे स्टेशन्सवर चहाचे ठेले उभारले गेले. भारतात चहाची लागवड करण्यासाठी ब्रिटिशांनी जो खटाटोप केला त्याला एक बाजू होती. ती होती चीनबरोबरच्या संबंधांची. त्या काळी चीनकडून चहा विकत घेऊन तो इंग्लंडमध्ये तसेच इतर ठिकाणी नेऊन विकला जात होता. आपल्या चहाच्या मक्तेदारीची जाणीव असलेला चीन हा देश चहाचे दर सतत वाढवत असे. दुसरीकडे चहाची मागणीही वाढती होती. इंग्लंडमधला साधा कामगारदेखील त्याच्या एकूण उत्पन्नाच्या काही टक्के रक्कम चहावर खर्च करत असे. ब्रिटिश भारतातून कापूस नेत, त्याचे कापड विणणे वगैरे व्यापारातून जो पैसा मिळत असे तो चीनमध्ये उत्पादित होणार्या चहाच्या खरेदीसाठी वापरला जाई. दरम्यानच्या काळात चीन आणि बिटिशांच्या व्यापारात अनेक चढउतार आले. चिनी व्यापारी ब्रिटिशांची कोंडी करत असत. त्यामुळे इंग्लंडमध्ये मोठी मागणी असताना चीनकडून चहाचा पुरवठा होत नसे. ही कोंडी फोडण्यासाठी ब्रिटिशांनी १८ व्या शतकात अफूच्या व्यापाराची शक्कल लढवली. चिनी राज्यकर्त्यांचा विरोध झुगारून ब्रिटिशांनी अफूचा व्यापार चोरी-छुप्या पद्धतीने सुरू ठेवला. याच काळात चीनला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. शेवटी व्यापारक्षेत्रासाठी ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मागण्या चीनला मान्य कराव्या लागल्या. चहा आणि अफू या दोन्ही घटकांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर बराच काळ राज्य केले आहे.
     
    ४)  दुसर्या महायुद्धानंतर भारतात चहा लक्षणीयरीत्या लोकप्रिय झाला. १९०० शतकाच्या शेवटी भारतात उत्पादित होणार्या एकूण चहापैकी ७१ टक्के चहा भारतातच विकला जात होता.
     
    ५)  भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्रि्चम बंगाल, तामीळनाडू आणि केरळमध्ये चहाच्या महत्त्वाच्या बागा आहेत. इथे सगळीकडेच उत्तम दर्जाचा चहा तयार होतो आणि या चहा उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
     
    ६)  भारतात चहाच्या उद्योगातून लाखो लोकांना रोजगार मिळतो. टी बोर्ड ऑफ इंडियाच्या माहितीनुसार आजमितीस संपूर्ण आसाममध्ये मिळून सुमारे ४४०० चहाच्या बागा आहेत. सुमारे ६३०० चहाच्या बागा निलगिरीमध्ये आहेत. तर दार्जिलिंगमध्ये ८५ चहाच्या बागा आहेत
     
    ७)  १९५३ मध्ये टी अ‍ॅक्ट दार्जिलिंग, आसाम आणि निलगिरी चहाच्या अधिकृत पुरवठ्यासाठी  तयार करण्यात आला असून त्यामार्फत या चहाची अधिकृततेची तपासणी होते.          
     
      अर्ल ग्रे चहा -
    १) ब्रिटिश लोकांसाठी चहाचं महत्त्व फक्त एक पेय म्हणून नाही, तर त्यांच्यासाठी ती एक जीवपद्धती आहे. गेली १५० वर्षे अर्ल ग्रे टी ने फक्त ब्रिटिश नाही तर युरोपियन लोकांचं आयुष्य व्यापलं आहे.
    २) अर्ल ग्रे चहाला त्याचं नाव ब्रिटनचा पंतप्रधान चार्ल्स अर्ल ग्रे दुसरा (१८३०-३४) याच्या नावावरून मिळालं.  एका चीनी सरकारी अधिकार्‍याच्या मुलाला चार्ल्सच्या सैनिकांनी बुडताना वाचवलं होतं. त्या चीनी अधिकार्‍याने खुश होऊन चार्ल्सला चहाचं एक नवीन मिश्रण भेट म्हणून दिलं. हेच मिश्रण पुढे अर्ल ग्रे नावाने प्रसिद्ध झालं.
    ३) अर्ल ग्रेला त्याची खास चव देणार्‍या लिंबासारख्या आंबट बर्गमॉट फळाचा रस चहामध्ये बर्गमॉट मिसळण्याची कल्पना ब्रिटनमधली होती. अर्ल ग्रे तयार करण्यासाठी जी मूळ चीनी कृती होती त्यातील अत्यंत आंबट फळांच्या चव कमी करण्यासाठी आणि त्यांना पर्याय म्हणून बर्गमॉट वापरणात आलं होतं.  इंग्लंडच्या ट्विनिंग चहा कंपनीने, चहाची चव वाढवण्यासाठी त् चार्ल्स यांच्या विनंतीवरून बर्गमॉट फळाची निवड केली होती.  
     
      चहाचा प्राचीन संदर्भ -
     
    १) चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी तसे नाही. त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व ३० वे शतक ते ख्रिस्तपूर्व २१ वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. 
    १) चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते. चहा हा शब्द चिनी भाषेतील ‘चा’ या शब्दापासून रूढ झाला आहे. चिनी भाषेतून जपान, भारत, इराण आणि रशिया या देशांत हा अथवा तशा प्रकारचे शब्द रूढ झाले.
    २) इंग्रजी भाषेतील टी या शब्दाचा उगम चीनमधील मॉय प्रांतातील बोली भाषेतील ‘टे’ या शब्दात आहे. डच लोकांनी जावामार्गे हा शब्द युरोपात नेला. इंग्रजी भाषेत अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चहाला ‘टे’ हा शब्द रूढ होता. त्यानंतर त्याचा उच्चार ‘टी’ असा करण्यात येऊ लागला.
    ३) ख्रिस्तपूर्व २७३७ मध्ये शेन नुंग हा चीनचा तेव्हाचा सम्राट होता. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर तो जंगलात राहत होता. दक्षिण चीनच्या दुर्गम भागात असताना एकदा तो एका औषधी वनस्पती असलेल्या झाडाखाली बसून गरम पाणी पीत असताना त्याच्या कपातील गरम पाण्यात त्या झाडाची काही पाने पडली. त्यामुळे पाण्याचा रंग आणि चवही बदलली. शेन नुंगला ते पाणी पिल्यामुळे एकदम तरतरी आली. त्याला ती चव खूप आवडली. पुढे त्याने गरम पाण्यात ती पाने घालून ते पाणी पिण्याची सवय लावून घेतली. त्याने त्या परिसरात म्हणजे सिचुआन आणि युनानच्या डोंगररांगांच्या परिसरात त्या रोपांचा शोध घेतला. हीच रोपे चहाची रोपे म्हणून नावारूपास आली आणि आजच्या चहाचा जन्म झाला.
    ४) चीनमध्ये पहिल्यांदा चहाची शेती - चहाच्या शेतीची सुरुवात चीनमध्ये केली गेली. 
    ५) जगात सर्वप्रथम चहाचा पेय म्हणून आस्वाद घेण्यात आला तो चीनमध्ये. क्वीन राजवटीत म्हणजे ख्रिस्तपूर्व २०० व्या शतकात चीनमध्ये चहा विलक्षण लोकप्रिय होता.  
     
      चहाचे अर्थशास्त्र -
    •   चिनी लोकांनी कित्येकवर्ष चहा बनविण्याची पद्धत, कला जगापासून लपवून ठेवली होती. कोणीही व्यक्ती चिनी इतर लोकांसमोर चहा बनवत नसे. ब्रिटिशांना याचा शोध घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. अखेर युरोपियनांकडून ब्रिटिशांना चहाची ओळख झाल्यावर मात्र ब्रिटिशांना चहाचा व्यापार दिसू लागला.
    १)  ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ब्रिटिशांनी चहाचा खात्रीशीर पुरवठा आणि मोठा नफा मिळावा यासाठी चीनशी कठोर व्यापारनीतीचा अवलंब केला.
    २)  चिनी लोकांनी कित्येक वर्ष चहा जगापासून लपवून ठेवला होता. त्यामुळे केवळ चीनमध्येच चहाचे उत्पादन होत होते. ब्रिटनचा चहापुरवठादार चीन या चहाची किंमत केवळ चांदीच्या स्वरूपात घेण्यावर आग्रही होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर चांदी देणे ब्रिटनला शक्य नसल्याने. अखेर आयात चहाचे मूल्य चुकविण्यासाठी ब्रिटिशांनी चिनी लोकांना अफूची सवय लावून व्यापारतोल सांभाळण्याचा प्रयत्न केला.
    ३)  ब्रिटिशांनी चिनी लोकांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटून चांदीच्याऐवजी अफू देऊन चहाची आयात सुरू केली. मात्र चिनी सम्राटाने अफूपासून वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. परिणामी चीनमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे मग ब्रिटिशांनी चहासाठी आपला मोर्चा भारताकडे वळविला.  
     
      भारतात चहाचा प्रवेश -
    १)  भारतातील चहाचे उत्पादन हे ब्रिटनमधील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी केले गेले.  इंग्रजांच्या ‘चहाबाज’पणामुळे भारतात चहाचे मळे रुजले.
    २)  १८२० पासून चहा हे पेय आहे हे खर्‍या अर्थाने भारतीयांच्या मनावर ठसविले गेले.  चीनमधून येणारा चहाचा पुरवठा खात्रीशीर न राहिल्याने ब्रिटिशांनी भारतात चहा लागवडीला प्रोत्साहन दिले. सुरुवातीला यासाठी चीनमधून चहाचे बी मागवले जायचे. त्यानंतर आसामच्या भागातील चहाच्या बियांचा वापर सुरु झाला.
    ३)  भारतात पूर्वीपासूनच चहाचे झाड होते, त्याचा वापरही स्थानिक करत. १८२४ साली म्यानमार आणि आसामच्या पर्वतीय भागात दरम्यान अशा चहाची पाने सापडली. त्यानंतर इंग्रजांनी १८३६ सालापासून चहाचे उत्पादन सुरु केले. त्यावेळेपासून आसामचा हा चहा जगात प्रसिध्द आहे.
    ४)  ब्रिटिशांनी भारताला व्यापारी पद्धतीने चहाची लागवड करण्यास शिकविले. भारतात आरमारी अधिकारी म्हणून भारतात आलेला ए.सी. ब्रूस आणि लष्करी अधिकारी चार्ल्टन या दोघा ब्रिटिशांनी चहाबाबत भारतात मोठे संशोधन सुरू केले. परिणामी ब्रिटिशांनी भारतीयांना चहामळ्यांची लागवड करण्यासाठी १५ वर्षांपर्यंत बिनाभाड्याने जमिनी देण्यासह प्रचंड सवलती देऊ केल्या.
    ५)  सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीकडे चीनमधून चहा खरेदी करण्याची मक्तेदारी होती.  ही मक्तेदारी १८१३ च्या सनदी कायद्याने करण्याची मक्तेदारी पुढील २० वर्षे अबाधीत राहिली. पण कंपनीची ही मक्तेदारी (चहा व चीनशी व्यापार) १८३३ च्या सनदी कायद्याने संपुष्टात आली. ही मक्तेदारी संपत आली तशी चीनशिवाय चहा आणखी कुठे कुठे पिकू शकेल हे शोधण्याची नड इंग्रजांना भासायला लागली. त्यातून आसाममधल्या चहाच्या स्थानिक जातीचा शोध लागला.
    ६)  एखाद्या उत्पादनाचे कमॉडिटी करण करून, ते उत्पादन म्हणजे लोकांची दैनंदिन गरज होईल याकडे विशेष लक्ष द्यायचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यापारनीतीने आता  जे जग व्यापून टाकले  अही त्याची सुरुवात ब्रिटिशांनी अठराव्या शतकाच्या मध्यावर केली होती आणि ब्रिटिश नागरिकांना व्यापणार्‍या उत्पादनाचे नाव होते - चहा.  
     
      ब्रिटिशांसाठी स्टार्ट अप -
    १)  १८ व्या शतकात, ब्रिटनमध्ये चहा ही उच्चभ्रू वर्गाची मक्तेदारी होती. त्यामुळे  एसी ब्रूसने त्यावेळी चहातील नफ्याचे गणित मांडायला सुरुवात केली. प्रत्येकी १६५ एकर जमिनीचा एक अशा हजार पट्ट्यांमधून वर्षाला २.३२ लाख पौंड नफा चहाच्या उद्योगातून होऊ शकतो असे एसी ब्रूसने सांगितले. 
    २)  परिणामी लंडनमधील उच्चभ्रू  भांडवलदारांच्या या नवीन ’स्टार्ट-अप’साठी भारताकडे ओढा वाढला. तेथील भांडवलदारांना चहाच्या रूपाने एक वेगळा उद्योग मिळाला. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली. आसाममध्ये झाबुआ येथे १८३७ मध्ये प्रथमच इंग्लिश टी गार्डन तयार करण्यात आले. १८४० मध्ये आसाम टी. कंपनीने व्यावसायिक तत्त्वावर चहाचे उत्पादन, ब्रँडिंग विक्री करण्यास सुरुवात केली.
    ३)  त्यावेळी चहाचे ब्रँडिंग ब्रिटनच्या राणीकडून करण्यात आले. ब्रिटनची राणी चहा घेत असतानाचे चित्र सर्व ठिकाणी पसरविण्यात आले. त्याचाच परिणाम म्हणून १८५० च्या दशकामध्ये भारतामध्ये चहाविक्रीचे प्रमाण झपाट्याने वाढले.  
     
    भारतातील चहाचे काही लोकप्रिय प्रकार
     
    १)  आसाम टी  - आसाम राज्यात चहाचे सर्वाधिक मळे आहेत. येथे पिकणारी चहा आसाम टी नावाने ओळखली जाते. ब्रिटिशांनी आसाम राज्यापासूनच चहाला ओळख मिळवून दिली होती. आसाममध्ये चहाचे भारतातील सर्वात मोठे संशोधन केंद्र आहे. हे केंद्र जोरहाटमध्ये टोकलाईत वसले आहे. संपूर्ण भारत देशात आसाम ही एकच अशी जागा आहे; जेथे चहाचे पीक समतल जमिनीवर घेतले जाते. याच कारणामुळे आसाममध्ये उगवणार्या चहाच्या पत्त्यांचा स्वाद इतर ठिकाणच्या चहापेक्षा वेगळा आणि खास असतो. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोर्याचा परिसर, कार्बी आणि काछर टेकड्यांच्या परिसरात चहाचे मळे आहेत.
     
    २)  दार्जिलिंग टी - संपूर्ण भारतात दार्जिलिंग प्रदेशातील चहा अतिशय प्रसिद्ध आहे. दार्जिलिंगमध्ये १८४१ पासून चिनी चहाची रोपे उगवली जातात. वेगळ्या चवीमुळे दार्जिलिंग चहाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त असते.  दार्जिलिंग चहाला जीआय (जीओग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रदेशातील ८७ चहांच्या मळ्यांना हे मानांकन असून, त्यातून वर्षाकाठी सुमारे १० हजार टन चहाचे उत्पादन घेतले जाते.
     
    ३)  कांगडा टी - हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग देखील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात १८२९ पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाची चहा येथे पिकवली जाते. कांगडा टी हा प्रकारदेखील दार्जिलिंग आणि आसाम टीप्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे. या प्रदेशातील कांगडा आणि मंडी जिल्ह्यात सुमारे २ हजार ६३ हेक्टर क्षेत्रावर कांगडा टीचे उत्पादन घेतले जाते.
     
    ४)   निलगिरी टी - निलगिरी टी हादेखील चहाचा लोकप्रिय प्रकार आहे. निलगिरी प्रदेशात एक खास प्रकारचे फूल उमलते. ज्याचे नाव कुरिंजी फूल असे आहे. हे फूल १२ वर्षांतून एकदा उमलत असल्याचे सांगितले जाते. या फुलाच्या सुगंधामुळे याठिकाणी उगवणार्या चहामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा सुगंध आणि चव असते. ही चहा निलगिरी टी म्हणून प्रसिद्ध आहे. निलगिरी चहाला देखील जीआय मानांकन आहे. या भागात दरवर्षी सुमारे ९२ दशलक्ष किलो चहा उत्पादित केली जाते. भारताच्या एकूण चहा उत्पादनापैकी सुमारे १० टक्के वाटा निलगिरी चहाला आहे.

     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 481