जागतिक आरोग्य दिन / जागतिक आरोग्य संघटना
- 10 Apr 2021
- Posted By : study circle
- 2030 Views
- 2 Shares
जागतिक आरोग्य दिन / जागतिक आरोग्य संघटना
7 एप्रिल 2021 रोजी 71 वा जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला गेला. जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.
1) जागतिक आरोग्य दिनाची थीम : दरवर्षी या दिवसासाठी एक खास थीम निवडली जाते. 2021 मध्ये ‘सुंदर, निरोगी जगाची निर्मिती’ ही थीम डब्ल्यूएचओने निवडली.
2) 2020 मध्ये आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही, ही बाब अधोरेखित झाली आहे. ‘कोरोनाव्हायरस’च्या (कोविड-19) साथीने जगात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाल्याने माणसांच्या जीवनावर व रोजंदारीवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. अशावेळी आरोग्य ही खरोखरच आपली संपत्ती आहे आणि काहीही झाले, तरी या संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे, याबद्दल जागरुकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘एका सुसंस्कृत, आरोग्यदायी जगाची उभारणी’ ही यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे.
3) जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश : या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जागरूक करणे. सध्या लाखो लोक कोविड सारख्या नव्या सम्सर्गजन्य रोगाबरोबरच मलेरिया, कॉलरा, क्षयरोग, पोलिओ, कुष्ठरोग, कर्करोग आणि एड्स सारख्या प्राणघातक आजारासह अनेक बड्या आजारांशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत जगातील सर्व लोकांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या निरोगी बनविण्यासाठी जागरूक करणे फार महत्वाचे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचा इतिहास व उत्क्रांती
जागतिक आरोग्य संघटना ही आंतरराष्ट्रीय सहकार्याने कार्य करणारी संस्था असून ती राष्ट्रसंघाच्या आरोग्य यंत्रणेचे व पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालयाचे कार्य पुढे चालवीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली असली तरी त्याच्या जवळपास शंभर वर्ष आधीपासूनच वेगवेगळ्या देशांनी आरोग्याच्या मुद्द्यांवर एकत्र येण्यास सुरुवात केली होती. मध्ययुगीन काळात भयंकर साथीचे रोग संसर्गामुळे जगभर पसरल्याने कोट्यावधी लोक मृत्यूमुखी पडत. अशा संसर्ग झालेल्या व्यक्तींचे विलगीकरण व अलगीकरण करण्याचे (क्वारंटाइन) महत्त्व अगदी प्राचीन काळापासून लोकांना पटले होते.
1) 14 व्या शतकात युरोपातील संसर्गजन्य रोगाने बाधितांच्या विलग्नवासाची व्यवस्था भूमध्य समुद्रावरील बंदरात केली गेली होती. त्या काळात विलगीकरणामुळे रोगांचा प्रसार नेहमी थांबेच असे नाही, कारण त्या काळी रोगप्रसाराच्या कारणांचे ज्ञान अपुरे होते. निरनिराळ्या देशांतील बंदरांत विलग्नवास व्यवस्था निरनिराळी असे, तसेच त्याकरिता केलेले कायदेही एकाच प्रकारचे नसत त्यामुळे व्यापारउदीमाला बराच अडथळा येई.
2) 23 जून 1851 रोजी पॅरिसमध्ये आरोग्यविषयक पहिले जागतिक आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलन ( इंटरनॅशनल सॅनिटरी कॉन्फरन्स) आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर उपलब्ध व संकलित माहितीच्या आधारावर सम्सर्गजब्य रोगांच्या प्रतिबंधासाठी विलग्नवासविषयक नियम केले गेले. विविध देशातील आरोग्यविषयक कायद्यांच्या एकसूत्रीकरणाचे प्रयत्न झाले. 1938 पर्यंत या कॉन्फरन्सची 14 अधिवेशनं झाली. त्यावेळी जगासमोरची मोठी आव्हानं होती कॉलरा, प्लेग आणि यलो फिव्हर. या साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी 1892 आणि 1903 मध्ये करार झाले. आजच्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांची पाळंमुळं या करारांमध्ये सापडतात.
3) 20 व्या शतकाच्या सुरुवातीस सूक्ष्मजंतुशास्त्राची भक्कम पायावर स्थापना होऊन रोगप्रतिबंधाच्या मूलतत्त्वांबद्दल बरेचसे एकमत झाल्याने तसेच विलग्नवासविषयक नियमांमध्ये एकसूत्रीपणा आल्यानंतर या कार्यासाठी एखादी आंतरराष्ट्रीय यंत्रणा असावी, असा विचार प्रबळ झाला. अशा यंत्रणेची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे असावीत हा विचार पटू लागला -
1) स्वास्थ्यसंरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय संकेतांचा अर्थ लावून त्यांत वेळोवेळी होणार्या बदलांचा अभ्यास करणे त्या संकेतांचा भंग होत असल्याच्या तक्रारीबद्दल अधिकृत मत प्रदर्शित करणे.
2) रोगविज्ञानात होत असलेल्या प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी परिषदा भरवून त्यानुसार आंतरराष्ट्रीय संकेत व कायदे यांत बदल सुचविणे.
3) साथीच्या रोगांबद्दल जागतिक माहिती गोळा करून ती सर्व देशांना पुरविणे.
4) 1902 मध्ये आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनांच्या प्रभावामुळे ’अखिल अमेरिकन आरोग्य संस्था’ स्थापण्यात आली.
5) 1909 मध्ये पॅरिस येथे ‘आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कार्यालय’ (Office Internationale d'hygiene Publique) स्थापण्यात आले. ही संस्था आरोग्यविषयक पहिली जागतिक स्वरूपाची संस्था असून ती 1947 ते 1950 च्या दरम्यान टप्याटप्याने जागतिक आरोग्य संघटनेत विलीन झाली.
6) 1920 मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर लीग ऑफ नेशन्सची (राष्ट्रसंघ) स्थापना झाली. तिच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय सहकार्याने आरोग्याच्या पुढील प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधले गेले -
1. औषधिद्रव्ये व रक्तरसापासून (रक्तातील घन पदार्थविरहित रक्तद्रवापासून) बनविलेल्या लसींचे प्रमाणीकरण,
2. रोगांचे सर्वमान्य असे नामाभिधान ठरविणे,
3. जन्ममृत्यूंची माहिती एकत्र करून पुरविणे व मादक पदार्थांविषयी (अफू, कोकेन वगैरेंविषयी) वैद्यकीय माहिती पुरविणे वगैरे.
4. रोगासारख्या संकटाविरुद्ध आंतरराष्ट्रीय आघाडी उभारावयाची असेल, तर त्यासाठी प्रत्येक राष्ट्रातील जनतेची आरोग्यपातळी वाढविणे हाच एक कायमचा आणि खरा टिकाऊ उपाय आहे, याची जाणीव होऊ लागली.
5. रोगसंसर्ग कमी होण्यासाठी राष्ट्राराष्ट्रांनी आपापसांत बांध उभे करणे हे प्रभावी साधन होऊ शकत नाही, हेही पटू लागलेे.
7) राष्ट्रसंघाची आरोग्य यंत्रणा -
1921 मध्ये राष्ट्रसंघाने पॅरिस येथील संस्थेच्या घटनेत आरोग्यविषयक व्यापक समस्यांना तोड देण्यास मर्यादा येत असल्याने नवी जागतिक आरोग्य यंत्रणा उभी करण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यातूनच राष्ट्रसंघाची आरोग्य यंत्रणा अस्तित्त्वात आली. राष्ट्रसंघाच्या या आरोग्य यंत्रणेसाठी आर्थिक तरतूद अगदीच अपुरी होती. कालांतराने जागतिक शासनसंस्था स्थापन करण्याचे राष्ट्रसंघाचे मूळ उद्दिष्ट असफल झाल्यामुळे या जागतिक आरोग्य यंत्रणेचे वजन पुष्कळ कमी झाले. असे असले तरी तिने 20 वर्षे केलेल्या भरीव कामगिरीमुळे पुढच्या जागतिक आरोग्य यंत्रणेचा पाया रचला गेला.तसेच तिला समर्पित भावनेने काम करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्यकर्ते लाभल्यामुळे या यंत्रणेने पुढील आरोग्य प्रश्न प्रभावीपणे हाताळले -
1. पोषण, हिवताप (मलेरिया), औषधिद्रव्यांचे प्रमाणीकरण आणि खेड्यांतील जनतेचे आरोग्यरक्षण या क्षेत्रांत तिने भरीव कामगिरी केली.
2. रोगप्रतिबंधाचे कार्य आंतरराष्ट्रीय सहकार्याने यशस्वी होऊ शकते, ते या यंत्रणेने दाखवून दिले.
8) 1945 साली आरोग्य क्षेत्रात कार्यरत आंतरराष्ट्रीय संघटना-
दुसर्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीवेळी आरोग्य क्षेत्रात 4 निरनिराळ्या संघटना कार्यरत होत्या -
1. संयुक्त राष्ट्रांची साहाय्य व पुनर्वसन संघटना (युनायटेड नेशन्स रीलीफ अँड रिहॅबिलिटेशन अॅडमिनिस्ट्रेशन, UNRRA) : ही संघटना तात्पुरत्या स्वरूपाची असून आरोग्य संरक्षण एवढे एकच उद्दिष्ट तिच्यापुढे नसून ती इतर अनेक प्रकारची कार्ये करीत असे.
2. राष्ट्रसंघाची आरोग्य संघटना : ही जिनीव्हा येथे अलग पडल्यासारखी होती व तिची कर्मचारीसंख्या कमी असल्याने तिची प्रतिष्ठा कमी झालेली होती.
3. पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था.
4. अखिल अमेरिकेतील आरोग्यविषयक माहिती पुरविणारी संस्था : या संस्थेचे क्षेत्र अमेरिकेपुरतेच मर्यादित होते. सर्व राष्ट्रांमध्ये कार्य करणारी अशी जागतिक एकसूत्री यंत्रणा उभी राहण्यास हा काळ अत्यंत योग्य होता.
9) 1945 च्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान, चीनच्या प्रतिनिधी स्झमिंग स्झे यांनी नॉर्वे ब्राझीलच्या प्रतिनिधींना संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था तयार करण्याचे काम दिले. या विषयावर ठराव मंजूर करण्यात अपयशी ठरल्यानंतर परिषदेचे सरचिटणीस अल्जर हिस यांनी अशी संघटना स्थापन करण्याच्या घोषणेचा वापर करण्याची शिफारस केली. स्झे आणि इतर प्रतिनिधींनी आरोग्याविषयी आंतरराष्ट्रीय परिषद बोलाविण्याची घोषणा केली.
10) 1946 मध्ये ‘जागतिक आरोग्य यंत्रणे’ची तात्पुरती संघटना स्थापन करण्यात येऊन संयुक्त राष्ट्रांतील 26 राष्ट्रांची संमती मिळताच तिला कायम स्वरूप देण्यात आले.
11) 22 जुलै 1946 रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या मसुद्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 51 देशांनी आणि इतर 10 देशांनी स्वाक्षरी केली. अशाप्रकारे जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्रांची पहिली विशेष संस्था बनली.
12) 7 एप्रिल 1948 रोजी पहिल्या जागतिक आरोग्य दिनी जागतिक आरोग्य संघटना औपचारिकपणे अस्तित्त्वात आली. आंतरराष्ट्रीय मंजुरीने संयुक्त राष्ट्रांनी विविध कार्यांकरिता उभारलेल्या संघटनांपैकी ही एक संघटना बनली. तिला तिच्या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरांवरून डब्ल्यू.एच.ओ. (थकज) असे संबोधतात.
13) 24 जुलै 1948 रोजी जागतिक आरोग्य सभेची पहिली बैठक झाली अंद्रीजा स्टॅम्पार हे सभेचे पहिले अध्यक्ष होते. तसेच जी. ब्रॉक चिशोलम यांना डब्ल्यूएचओचे महासंचालक म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी या काळात कार्यकारी सचिव म्हणून काम करताना मलेरिया, क्षयरोग आणि लैंगिक संक्रमणाचा प्रसार नियंत्रित करणे, माता व मुलांचे आरोग्य, पोषण आणि पर्यावरणीय स्वच्छताविषयक कामांना प्राथमिकता दिली.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही जगाच्या इतिहासातील फार महत्त्वाची घटना होय. या संघटनेच्या घटनेमध्ये विस्तृत व उदार ध्येय ठरविण्यात आले असून त्यात आधुनिक आरोग्यविषयक व सामाजिक असे सर्व महत्त्वाचे प्रश्न अंतर्भूत करण्यात आलेले आहेत. सध्या ही संघटना कोरोना विषाणूविरुद्धच्या जागतिक लढाईत महत्त्वाची भूमिका वठवते आहे. 2020 साली डब्ल्यूएचओनं कोरोना विषाणूमुळे होणार्या कोव्हिड-19 या आजारास जागतिक आरोग्य संकट म्हणून जाहीर केल्यावरच जगभरातील राज्यकर्त्यांनी त्याकडे अधिक गांभीर्यानं पाहण्यास सुरुवात केल्याचं दिसलं. मात्र कोरोना विषाणूच्या साथीच्या सुरुवातीच्या काळात डब्ल्यूएचओ ने पुरेशी पावले उचलली नाहीत, डब्ल्यूएचओची भूमिका चीनधार्जिणी आहे, अशी टीकाही जगभरातील तज्ज्ञांनी केली. या आजाराची तीव्रता समजून घेण्यात चीननं उशीर केला आणि त्यावर डब्ल्यूएचओने पांघरूण घातलं, असे आरोपही झाले. विशेषतः तैवाननं डब्ल्यूएचओ आपल्याशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केल्यामुळे डब्ल्यूएचओच्या कार्यपद्धतीवर अनेकजण प्रश्नचिन्ह उभं झालं होतं.
1) स्थापना : 7 एप्रिल 1948
2) मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
3) विभागीय कार्यालये : कैरो, कोपनहेगन, नवी दिल्ली, मनिला, ब्राझव्हिल्ली (कांगोची राजधानी), वॉशिंग्टन
4) सदस्य राष्ट्रे : 194 (147 देशात कार्यालये)
5) कार्यालयीन कामकाजाची भाषा : अरबी, चिनी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश
6) कामकाज : जागतिक आरोग्य संघटनेचे 3 विभाग आहेत -
1) जागतिक आरोग्य सभा
2) कार्यकारी मंडळ
3) सचिवालय
7) महासंचालक : टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस. टेड्रोस हे डब्ल्यूएचओचं संचालकपद भूषवणारे पहिले आफ्रिकन आहेत आणि ते याआधी इथियोपियाचे आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते. त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2017 पासून 2022 पर्यंत पाच वर्षांसाठी आहे. 2019-20 मध्ये कोव्हिड रोगाच्या जागतिक प्रसाराबाबत चीननं घेतलेल्या भूमिकेचं डब्ल्यूएचओनं कौतुक केलं होतं, ते अनेकांना पटलं नाही. त्यामुळे टेड्रोस यांच्या नेतृत्त्वावर टीका झाली.
8) जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय : आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे.
जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टे
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रास्ताविकात नमूद आरोग्यविषयक मसुदा -
1) आरोग्य म्हणजे केवळ ‘रोगाचा अभाव’ असे नसून त्यात जनतेच्या मानसिक व सामाजिक आरोग्याचा अंतर्भाव होतो.
2) आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये सर्व राष्ट्रे परस्परावलंबी आहेत.
3) बालकांचे पालन, पोषण व विकास या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असून त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.
4) आरोग्यविषयक कार्यात जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी लोकशिक्षणाची फार गरज आहे.
5) आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क असून सर्व शासनसंस्थांनी या हक्काचे शक्य त्या प्रयत्नांनी जतन केले पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टे व्यापक आहेत -
• संघटनेच्या घटनेतील पहिले कलम ‘जगातील सर्व लोकांना शक्य तेवढे अधिकाधिक आरोग्य मिळवून देणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे’ असे असून या उद्दिष्टानुसार संघटनेचे कार्य चालते.
1) आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क असल्याने त्याचे जतन झाले पाहिजे, यासाठी जागरुकता निर्माण करणे.
2) आरोग्याचा हक्क प्रत्येकास मिळण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबविणे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
3) सर्वोच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा जगातील सर्व नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणे.
4) आरोग्य याचा अर्थ केवळ ‘रोगाचा अभाव’ असे नसून त्यात जनतेच्या सामाजिक व मानसिक आरोग्याचा अंतर्भाव होतो. आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये सर्व राष्ट्रे एकमेकांवर अवलंबून आहेत त्यामुळे परस्पर सहकार्य आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन सदस्य राष्ट्रांना मारगदर्शन करणे.
5) बालकांचे पालन पोषण आणि विकास या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी असून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपक्रम आखणे.
6) आरोग्यविषयक कार्यात जनतेचे सहकार्य मिळविण्यासाठी लोक शिक्षणाची साधने व प्रणाली विकसित करने.
• संघटनेचे सभासद -
1) जगातील कोणत्याही राष्ट्राला या संघटनेचे सभासद होता येते. अजून जी राष्ट्रे स्वतंत्र नाहीत त्यांना ‘संबद्ध’ सभासद म्हणून घेण्यात येते.
2) 16 मे 1950 रोजी दक्षिण र्होडेशियास ‘संबद्ध’ सभासद करण्यात आले होते.
3) 1972 च्या मे महिन्यात चिनी प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करण्याचे मान्य करण्यात आले व तैवानचे सभासदत्व रद्द झाले.
4) 1973 मे मध्ये उ. कोरियाला सभासदत्व देण्यात आले.
5) 2021 मध्ये सदस्य राष्ट्र संख्या 194 आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे विभाग
1) जागतिक आरोग्य सभा (संसदेच्या स्वरूपाची) -
1) ही सभा वर्षातून एकदा भरते. ही सभा दरवर्षी मे महिन्यात पार पडते.
2) या सभेद्वारे 5 वर्षासाठी एका महासंचालकाची नेमणूक केली जाते.
3) सभेला प्रत्येक सभासद राष्ट्राने 3 प्रतिनिधी पाठवावयाचे असतात.
4) या सभेत जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वसाधारण धोरण व अर्थसंकल्प ठरविणे, ही कामे होतात.
2) कार्यकारी मंडळ (मंत्रिमंडळाच्या स्वरूपाचे) -
1) यूएन महासभा जागतिक आरोग्य संघटनेच्या 34 सदस्यांचे कार्यकारी मंडळ निवडते.
2) त्यांतील 8 आळीपाळीने दरसाल निवृत्त होतात, परंतु ते फेरनिवडणुकीस पात्र असतात.
3) या कार्यकारी मंडळाचा कालावधी 3 वर्षाचा असतो.
कार्ये - कार्यकारी मंडळ जगातील महत्त्वाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निर्णय घेऊन धोरण ठरवते -
1) हे मंडळ ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करते व अर्थसंकल्प तयार करते.
2) आरोग्यावर चांगला वाईट परिणाम करणार्या विविध तंत्रज्ञानाचा शोध घेणे.
3) जगातील विविध रोगांचे वर्गीकरण करणे.
4) मादक द्रव्याबाबत आयुक्त समिती म्हणून काम करणे.
5) कोविड, सार्स, मलेरिया, एड्स यासारख्या रोगांच्या उद्रेकाबाबत आंतरराष्ट्रीय समन्वय साधणे.
3) सचिवालय (प्रत्यक्ष कार्य करणारे कर्मचारी) -
1) सचिवालय एका प्रमुख संचालकाच्या हाताखाली कार्यरत असून त्याच्या मदतीकरिता इतर कर्मचारी नेमलेले असतात. हे कर्मचारी व प्रमुख अधिकारी कोणत्याही देशातून घेतले जातात. निवड झाल्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त होतो.
2) 1973 जानेवारी मध्ये एकूण कर्मचार्यांची संख्या (प्रादेशिक कार्यालयांतील व प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांची मिळून) 3,500 होती.
कार्यालयीन भाषा -
• जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य खालील भाषांतून चालते -
1) इंग्रजी
2) फ्रेंच
3) रशियन
4) चिनी
5) स्पॅनिश
• प्रादेशिक केंद्रे -
संपूर्ण जगभर काम करायला सोपे जावे या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य 6 विभाग आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाला जवळपासच्या देशांत कार्यक्रम राबविणे व नियंत्रण ठेवणे सोपे जाते. -
प्रदेश मुख्य कार्यालय
1) आफ्रिका ब्रॅझाव्हिल, काँगो
2) अमेरिका वॉशिंग्टन, अमेरिका
3) आग्नेय आशिया नवी दिल्ली, भारत
4) यूरोप कोपनहेगन, डेन्मार्क
5) भूमध्य समुद्र-पूर्वभाग अॅलेक्झांड्रिया, इजिप्त
6) पश्चिम पॅसिफिक सागरीय मनिला, फिलिपीन्स
• आग्नेय-आशिया विभागाचे मुख्य कार्यालय दिल्लीत आहे. त्यात भारत, सिलोन, ब्रह्मदेश, मंगोलिया, थायलंड, अफगाणिस्तान, नेपाळ इत्यादी सभासद राष्ट्रे आहे.
वित्तीय पुरवठा
विविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. व्यक्ती, संस्था व सरकारे यांच्याकडून आर्थिक साहाय्य वेळोवेळी मिळते -
1) संघटनेच्या अर्थसंकल्पाकरिता प्रत्येक राष्ट्राचा वाटा त्या राष्ट्राची लोकसंख्या व दरडोई उत्पन्नावरून ठरविण्यात येतो.
2) संयुक्त राष्ट्रांकडून तांत्रिक साहाय्य निधीतून काही रक्कम देण्यात येते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फौंडेशन्स, स्वयंसेवी संस्था आणि इतर युएन संघटनांद्वारे जागतिक आरोग्य संघटनेला अर्थ पुरवठा होतो.
3) संयुक्त राष्ट्र बालक निधीतूनही (युनिसेफमधूनही) औषधे, उपकरणे व संयुक्त कार्य या स्वरूपात मदत करण्यात येते. ही संघटना आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संस्था, आंतरराष्ट्रीय कर्करोग विरोधी संघ, जागतिक वैद्यकीय संघटना, जागतिक पशुवैद्यक संघटना इ. शी संबंध आहेत. त्यांच्याकडूनही काही निधी उपलब्ध होतो.
4) 1960 पासून एक स्वेच्छ निधी उभारण्यात आला असून या निधीमार्फत देवी, कुष्ठरोग व यॉज यांचे निर्मूलन पाणीपुरवठा वैद्यकीय संशोधन वगैरे कामे चालतात.
5) यूएन महासभा जागतिक आरोग्य संघटनेच्या अर्थसंकल्पाला मान्यता देते.
6) जागतिक आरोग्य संघटनेचे वार्षिक बजेट हे साधारण 4 अब्ज डॉलरचे असते.
• भारताला मिळालेले अर्थसहाय्य -
1) भारताला हिवताप, क्षय, देवीनिर्मूलन, कुपोषण, माता व बालके यांचे आरोग्य या प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता तसेच कुष्ठरोग, गुप्तरोग, खुपरी, पटकी इत्यादींवरील मोहिमांकरिता पुष्कळ साहाय्य मिळाले आहे.
2) नागपूर येथील केंद्रीय सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी संशोधन संस्थेला उपकरणे व इतर साहित्य घेण्याकरिता वित्तीय मदत मिळाली असून संघटनेने योग्य तो सल्ला या कामी दिला होता.
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्य
• जगातील सर्व लोकांना शक्य तेवढे अधिकाधिक आरोग्य मिळवून देणे हे कार्य ही संघटना करत असल्याने ती अनेक राष्ट्रांना सहाय्य करते -
1) राष्ट्रीय आरोग्य सेवेला मजबुती आणण्यासाठी मदत करणे,
2) आरोग्य कर्मचार्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी शिक्षण सहाय्य देणे,
3) राष्ट्रातील प्रमुख रोगांच्या निवारणा साठी मदत करणे,
4) माता व बालके यांच्या आरोग्य रक्षण करिता सहाय्य,
5) पाणी पुरवठा व इतर स्वच्छता विषयक कार्यासाठी सहाय्य,
6) मानसिक आरोग्याचे प्रवर्तकांना सहाय्य करणे,
• एखाद्या राष्ट्राकडून साहाय्याकरिता मागणी येताच संघटनेमार्फत त्या विशिष्ट प्रश्नाचा अभ्यास केला जातो. तेथील शासनाच्या एकट्या प्रयत्नाने तो सुटणार नाही, अशी खात्री करून घेतल्यानंतर त्या राष्ट्रातील आरोग्याधिकार्याबरोबर विचारविनिमय करून एक आराखडा तयार करण्यात येतो. हा आराखडा संबंधित प्रादेशिक केंद्रामार्फत मध्यवर्ती सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येतो. सभेने मान्यता दिल्यानंतर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीकरिता तपशीलवार योजना तयार करण्यात येते नंतर जरुरीनुसार मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रादेशिक कार्यालयाला तज्ञ पुरविण्यात येतात व मध्यवर्ती कार्यालयाच्या सूचनांनुसार प्रत्यक्ष कार्यास सुरुवात होते. या कार्यात संघटना कर्मचारी आणि स्थानिक आरोग्याधिकारी सहभागी असतात. हाती घेतलेले कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी त्या राष्ट्राच्या शासनावर असते.
• जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यांत पुढील गोष्टींचा समावेश होतो -
1) सांसर्गिक रोगांसंबंधी माहिती गोळा करून ती सर्व राष्ट्रांना पुरविणे.
2) विलग्नवासविषयक माहिती गोळा करणे.
3) औषधिद्रव्यांचे प्रमाणीकरण - औषधातील प्रभावी द्रव्यांचे परिमाण व पद्धती यांबद्दल निश्चित नियम घालून देणे आंतरराष्ट्रीय निघंटू (इंटरनॅशनल फार्माकोपिया) प्रसिद्ध करणे.
4) जन्म-मृत्यूसंबंधी आकडेवारी प्रसिद्ध करणे.
5) विद्यावेतने देऊन विशेष शिक्षणासाठी संघटनेमार्फत मदत दिली जाते.
6) आरोग्यासंबंधी वाङ्मय प्रसिद्ध करण्याचे कार्य संघटना करते. त्याकरिता सर्व जगात शेकडो माहिती केंद्रे उभारलेली आहेत - इंग्लंडमधील इन्फ्ल्युएंझा केंद्र, अमेरिकेतील लस संशोधन केंद्र, अर्जेंटिनामधील अस्थि-अर्बुदांच्या (अस्थीतील पेशींच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणार्या गाठींसंबंधीच्या) संशोधनाचे केंद्र. या केंद्रातील तज्ञ जरूर ती माहिती गोळा करून तिच्या आधाराने निष्कर्ष काढतात.
7) जगातील सर्व उत्तमोत्तम शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ मिळावा या हेतूने संघटनेने हजारो शास्त्रज्ञांच्या व शिक्षकांच्या विषयवार याद्या तयार केल्या आहेत. भारतीय तज्ञांना योग्य प्रतिनिधित्व या याद्यांत मिळाले आहे. या याद्यांमधून जरुरीप्रमाणे तज्ञांची निवड प्रमुख कार्यवाह करतात. हे तज्ञ सर्व काम विनामूल्य करतात. जरुरीप्रमाणे त्यांच्या सभा भरून आधुनिक मतप्रवाहांची चर्चा केली जाते व या चर्चांवर आधारित प्रकाशने प्रसिद्ध केली जातात.
• जागतिक आरोग्य संघटना खालील कार्यासाठी मदत करते -
1) संशोधन कार्य - निरनिराळ्या संस्था, संघटना व प्रयोग शाळांना संशोधन कार्यात सर्व प्रकारची मदत करणे.
2) शिष्यवृत्त्या - ज्या भागात प्रशिक्षणाची सोय नसेल त्या भागातील लोकांना शिक्षण घ्यायला इतर देशात जाण्यासाठी शिष्यवृत्त्या देणे.
3) संसर्गजन्यरोग नियंत्रण - क्षय, हिवताप, देवी, महारोग, गुप्तरोग, खुपर्या अशा संसर्गजन्य रोगांचे नियंत्रण करण्याच्या कामाला मदत करतो.
4) नैसर्गिक आपत्तीत मदत - कुठल्याही देशात नैसर्गिक आपत्ती आली तर त्या देशाच्या लोकांना व सरकारला आर्थिक व इतर साहाय्य करणे.
5) आरोग्यविषयक कार्यक्रम - वैद्यकीय शिक्षण, परिसर स्वच्छता, ग्रामीण आरोग्य, आरोग्यविषयक आकडेवारी गोळा करणे. पोषक आहार इत्यादी कार्यक्रमात मदत करणे.
6) मदत कार्य - कुठल्याही देशातील आरोग्य खात्याला जर काही मदत हवी असेल, तर देणे.
7) संशोधनाची माहिती - कुठल्याही देशात झालेल्या संशोधनास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मासिके, नियतकालिके, वार्षिक रिपोर्ट प्रकाशित करणे.
8) इतर संघटनेच्या बरोबर काम करणे.
• जागतिक आरोग्य संघटनेचे काही कार्यक्रम -
1) प्रोग्रॅम फॉर अॅप्रोप्राईट टेक्नॉलॉजी इन हेल्थ
2) इंटरनॅशनल एड्स व्हॅक्सीन इनिसिएटीव्ह
3) मेडिसिन फॉर मलेरिया व्हेंच्यूर
4) ग्लोबल अलायन्स फॉर टीबी ड्रग डेव्हलपमेंट
5) एरिया ग्लोबल टीबी व्हॅक्सीन फौंडेशन
6) इंटरनॅशनल पाटर्नरशीप फॉर मायक्रोबीसाईडस
7) पेडियाट्रीक्स डेंगू व्हॅक्सीन इनिसिएटीव्ह
8) फौंडेशन फॉर इन्नोव्हेटिव्ह न्यू डायग्नोस्टिक्स्
9) इन्स्टिट्यूट फॉर वन हेल्थ वर्ल्ड
10) ड्रग्स फॉर निग्लेक्टेड डिसीजेस इनिसिएटीव्ह
जागतिक आरोग्य धोरण -
• डब्ल्यूएचओ जगभरच्या देशांच्या आरोग्य धोरणाला संबोधित करताना पुढील घटकावर भर देते -
1) आरोग्यविषयक समानता वाढवणारी आणि गरीब-समर्थक, लिंग-प्रतिसाद देणारी आणि मानवी हक्कांवर आधारित दृष्टीकोन एकत्रित करणारी धोरणे, कार्यक्रमांद्वारे आरोग्याच्या मूलभूत सामाजिक आणि आर्थिक निर्धारकांना संबोधित करणे.
2) आरोग्यदायी वातावरणाला चालना देण्यासाठी, प्राथमिक प्रतिबंध तीव्र करणे आणि आरोग्यास होणार्या पर्यावरणाच्या धोक्यांमागील मूळ कारणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सर्व क्षेत्रातील सार्वजनिक धोरणांवर परिणाम करणे.
जागतिक आरोग्य संघटनेची प्रकाशने
जागतिक आरोग्य संघटनेमार्फत खालील प्रकाशने प्रसिद्ध होतात -
1) बुलेटिन ऑफ द ‘हू’(द्वि मासिक): संशोधनापासून उपलब्ध झालेल्या नवीन ज्ञानक्षेत्रांचे वर्णन, विविध प्रयोगशाळांतून चालू असलेल्या व प्रत्यक्ष झालेल्या संशोधनकार्याची माहिती यात देण्यात येते. दर सहा महिन्यांनी एक ग्रंथ आणि प्रत्येक ग्रंथात 6 अंक प्रसिद्ध होतात. हे समाचारपत्र इंग्रजी व फ्रेंच भाषेत असते व एका भाषेत समग्र लेख असला, तर दुसरीत त्याचा सारांश देतात.
2) ‘हू’ क्रॉनिकल : दरमहा प्रसिद्ध होणार्या या प्रकाशनात संघटनेमार्फत चालू असलेल्या कार्याची माहिती, वैद्य व आरोग्य कर्मचारी यांना उपयुक्त अशी आधुनिक प्रगतीसंबंधीची माहिती देण्यात येते. हे प्रकाशन पाचही अधिकृत भाषांत प्रसिद्ध होते.
3) इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ लेजिस्लेशन : दर तिमाहीस प्रसिद्ध होणार्या या प्रकाशनात विविध देशांतील आरोग्यविषयक महत्त्वाच्या कायद्यांचे इंग्रजी व फ्रेंच भाषांतून समीक्षण असते.
5) सांसर्गिक रोग व जन्म-मृत्यूंची वार्षिक आकडेवारी : ही दरसाल इंग्रजी व फ्रेंच भाषांत प्रसिद्ध होते.
6) सांसर्गिक रोगांचा साप्ताहिक वृत्तांत : इंग्रजी व फ्रेंच भाषांतून.
7) वर्ल्ड हेल्थ : साधारण जनतेकरिता हे सचित्र मासिक इंग्रजी, फ्रेंच, रशियन व स्पॅनिश भाषांत प्रसिद्ध होते.
8) पदव्युत्तर कार्यकर्त्यांना मार्गदर्शक पाठ्यपुस्तके वरील 4 भाषांत प्रसिद्ध होतात.
9) सार्वजनिक आरोग्यासंबंधी निबंध : विशेष अभ्यास करून लिहिलेले निरनिराळ्या विषयांवरील निबंध संघटना प्रसिद्ध करते. ते इंग्रजी व फ्रेंच भाषांत असतात.
10) शास्त्रीय वृत्तांत व टिपणे : तज्ञांच्या समित्यांकडून आलेले वृत्तांत चार भाषांतून.
11) अधिकृत वृत्तांत : संघटनेच्या मुख्य सभेचे व इतर सभांचे वृत्तांत, कार्यवाहांचा वार्षिक वृत्तांत व दर चार वर्षांनी जागतिक आरोग्यासंबंधी अधिकृत निवेदन.
12) जगातील वैद्यकीय शिक्षणसंस्था, दंतरोग शिक्षणसंस्था यांच्या याद्या व माहिती, आंतरराष्ट्रीय निघंटू (2 विभाग आणि 1 पुरवणी), विलग्नवासाचे आंतरराष्ट्रीय संकेत यांबद्दलची प्रकाशनेही वेळोवेळी प्रसिद्ध होतात. संघटनेचे एक स्वतंत्र ग्रंथालय असून निरनिराळ्या प्रादेशिक कार्यालयांना पुस्तके उसनवार देण्याची व्यवस्था आहे.
इतर आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध
1) संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी : या निधीमार्फत होणार्या कार्याला संघटनेची तांत्रिक संमती मिळविण्यात येते. हे कार्य गर्भिणींचे व बालकांचे आरोग्य, क्षयप्रतिबंधक लस, हिवताप प्रतिबंधक, यॉज व खुपरी विरोधी मोहीम आणि पोषण यांवर केंद्रित केलेले असते.
2) आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेशी सहकार्य : कारखान्यांतील कामगारांचे आरोग्य, खलाशांचे आरोग्य व जहाजांतील आरोग्य व्यवस्था, आरोग्य विमा योजना व इतर सामाजिक विमा योजना यांविषयी कार्य केले जाते.
3) जागतिक अन्न व शेती संघटनेच्या सहकार्याने इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपासून मानवाला होणार्या सांसर्गिक रोगांबद्दल, तसेच पोषण व खेड्यांतील जनतेचे आरोग्यरक्षण ही कार्येही संघटना करते.
4) अनेक बिनसरकारी आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संघटना सहकार्य करते व त्यांना अधिकृत मान्यता देते. यांपैकी काहींची नावे अशी : आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग संस्था, आंतरराष्ट्रीय कर्करोगविरोधी संघ, जागतिक वैद्यकीय संघटना, जागतिक पशुवैद्यक संघटना वगैरे.
जागतिक आरोग्य आणीबाणी -
• नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीतील जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मानवी जीवनाचे टाळण्यासारखे नुकसान, रोग आणि अपंगत्वाचे ओझे कमी करण्यासाठी देश आणि इतर भागधारकांशी समन्वय साधणे.
1) 5 मे 2014 रोजी, डब्ल्यूएचओने जाहीर केले की पोलिओचा प्रसार हा जागतिक आरोग्य आणीबाणी आहे - आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व या रोगांचा प्रादुर्भाव विलक्षण मानला गेला.
2) 8 ऑगस्ट 2014 रोजी, डब्ल्यूएचओने जाहीर केले की इबोलाचा प्रसार हा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे; गिनिया मध्ये सुरू झाले असा विश्वास होता की हा उद्रेक जवळपासच्या इतर देशांमध्ये जसे की लाइबेरिया आणि सिएरा लिओनमध्ये पसरला होता.
3) 30 जानेवारी 2020 रोजी डब्ल्यूएचओने कोविड-19 साथीचा रोग सर्व जगभर पसरल्याने ’सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आंतरराष्ट्रीय चिंता (पीएचईआयसी)’ जाहीर केली.
• रोगांच्या उच्चाटनात डब्ल्यूएचओची भूमिका -
1) गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा महत्त्वाचा वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्याविषयी देशांना सावध करणं, लस आणि उपचारांविषयी संशोधन, आरोग्यासाठी निधी जमा करणं आणि तो गरज असेल तिथे पोहोचवणं अशी कामं ही संघटना करते.
2) डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांमुळे देवी रोगाचं उच्चाटन, पोलियो सारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झालं. इबोलावरची लस तयार करण्यातही डब्ल्यूएचओनं महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या कोव्हिड, सार्स, मर्स, एचआयव्ही एडस, इबोला, मलेरिया, टीबी, पोलिओ अशा संसर्गजन्य आजारांबरोबरच, कॅन्सर आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही डब्ल्यूएचओ काम करते आहे.
3) जागतिक आरोग्यास धोका उत्पन्न करणारा कोणताही प्रश्न ही संघटना ताबडतोब हाताळावयास सुरुवात करते. उदा., रुधिराभिसरण तंत्राच्या, विशेषेकरून हृदय व वाहिन्यांच्या रोगांमुळे होणारी मृत्युसंख्या वाढल्याचे निदर्शनास येताच संघटनेने त्यावर ताबडतोब संशोधनास सुरुवात केली. शरीरात अगदी अल्प प्रमाणात असलेली मूलद्रव्ये आणि हृद्रोग यांमधील संबंध शोधण्याच्या उद्देशाने फिनलंडमधील पाण्याची त्या दृष्टीने तपासणी चालू आहे. वरीलप्रमाणेच वातावरणीय आरोग्य हाही महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. वातावरणीय प्रदूषण हा मर्यादित स्वरूपाचा प्रश्न राहिला नसून मानवाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीमधील मोठा अडथळा एवढेच नव्हे, तर मानवाच्या अस्तित्वास आव्हान देणारा प्रश्न बनला आहे. संघटना या प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवीत आहे. 5 जून 1972 रोजी स्टॉकहोम येथे जागतिक प्रदूषण परिषद संयुक्त राष्ट्रांतर्फे भरविण्यात आली होती.
• जागतिक आरोग्य संघटनेद्वारे नमूद आजार -
1) करोनरी हार्ट डीसीज (हृदयरोग) - दरवर्षी 72 लाख लोकांचा मृत्यू.
2) कर्करोग - दरवर्षी 62 लाख लोकांचा मृत्यू
3) सेरेब्रोव्हॅस्कुलर आजार - दरवर्षी 46 लाख लोकांचा मृत्यू
4) अॅक्युट लोअर रेस्पीरेशन इंन्फेक्शन - दरवर्षी 37 लाख लोकांचा मृत्यू
5) नवजात बालकांचे आजार - दरवर्षी 36 लाख बालकांचा मृत्यू
6) क्षय रोग - दरवर्षी 29 लाख बालकांचा मृत्यू
7) हगवण आणि कॉलरा - दरवर्षी 25 लाख लोकांचा मृत्यू
8) एचआयव्ही/एडस् - दरवर्षी 23 लाख लोकांचा मृत्यू
9) मलेरिया - दरवर्षी 21 लाख लोकांचा मृत्यू
10) तंबाखूचे आजार - दरवर्षी 49 लाख लोकांचे मृत्यू
डब्ल्यूएचओ समोरचा ’तैवान’ प्रश्न
1) तैवान हे चीनच्या अग्नेयेस समुद्रात असलेलं बेट आहे. 1949 साली चीनमध्ये साम्यवादी राज्यक्रांती झाली, पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. पण त्या क्रांतीला विरोध करणारे लोक तैवानमध्ये आश्रयास गेले. त्यांनी रिपब्लिक ऑफ चायना म्हणून तैवानमधून राज्यकारभार सुरू ठेवला. पण चीननं आजही या बेटावरचा आपला दावा सोडलेला नाही.
2) आंतरराष्ट्रीय संघटना एकतर चीन किंवा तैवान या दोनपैकी एकाच देशाला मान्यता देऊ शकतात, अशी चीनची भूमिका आहे. त्याचा परिणाम म्हणूनच संयुक्त राष्ट्रांमध्ये तैवानला सदस्यत्व नाही. काही देश आणि संघटनांनी मधला मार्ग स्वीकारला आहे, उदा. ऑलिम्पिकमध्ये तैवानचा संघ चायनीज तैपेई नावानं खेळतो.
3) जागतिक आरोग्य संघटनेनं तैवानला सदस्यत्व दिलेलं नाही. डब्ल्यूएचओच्या बैठकांमध्ये तैवानला याआधी निरीक्षक म्हणून सहभागी मिळायचा. पण त्यांची आकडेवारी चीनच्या नावाखाली जमा होते. कोरोना विषाणूच्या बाबतीतही तेच झाले असून, तैवाननं त्यावर आपली नाराजी व्यक्त केली होती.
4) तैवानमधील कोव्हिड स्थिती अनेक देशांच्या तुलनेत बरीच चांगली असून त्यांनी या विषाणूच्या प्रसाराला आळा घातला. बाकीच्या जगालाही त्यातून फायदा होऊ शकतो, असं तैवानला वाटतं. चीनसोबतचं नातं जपण्यासाठी डब्ल्यूएचओ आपल्याला सदस्यत्व नाकारत असल्याचा सूर तैवानमध्ये आहे.
डब्ल्यूएचओ : आरोग्य, सत्ता आणि अर्थकारण
1) डब्ल्यूएचओचे अधिकारी अराजकीय भूमिका किंवा सावधगिरीची भूमिका घेण्यामागे या संघटनेचं अर्थकारण जबाबदार आहे. पैसा उभा करण्यासाठी अनेकदा राजकीय सहकार्य गरजेचं असतं. डब्ल्यूएचओसाठी प्रत्येक देशातून त्या त्या देशाच्या ऐपतीनुसार निधी येतो. पण मोठया प्रमाणात, म्हणजे जवळपास 70 टक्के निधी खासगी संस्था, कंपन्या आणि देणगीदारांकडून येतो.
2) कोरोना पँडेेमिक (2020) दरम्यान डब्ल्यूएचओवर झालेली टीका ही काही पहिलीच नव्हती. ऑक्टोबर 2017 मध्ये डब्ल्यूएचओची सूत्रं हाती घेतल्यावर टेड्रोस यांनी गुडविल अम्बॅसेडर म्हणून झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचं नाव सुचवलं होतं. मुगाबे यांच्यावर आधीच मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप होते, त्यामुळे डब्ल्यूएचओवर कडाडून टीका झाली होती.
3) टेड्रोस यांच्याआधी डब्ल्यूएचओचं महासंचालकपद सांभाळणार्या मार्गारेट चॅन यांच्यावरही टीका झाली होती. 2010 त्यांनी स्वाईन फ्लूची जागतिक साथ घोषित करण्याची घाई केली, असं अनेकांना वाटतं. चॅन यांनी त्यावेळी जगभरातील देशांना औषधांवर कोट्यवधी खर्च करण्याचा सल्ला दिला होता, त्यापैकी बहुतांश देशांना त्या औषधांची गरज पडली नाही. 2014-15 साली आफ्रिकेत इबोलाच्या साथीदरम्यान चॅन यांनी दिरंगाई केल्याचा आरोप झाला.
4) 1980-90 च्या दशकात अनेकदा डब्ल्यूएचओवर आरोप झाले आणि या संघटनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.
5) 1998 मध्ये नॉर्वेच्या माजी पंतप्रधान डॉ. जिरो हार्लेम ब्रंटलँड यांनी डब्ल्यूएचओचं चित्र बदललं आणि संघटनेच्या कामात ताळमेळ वाढवला. स्वतः सार्वजिनक आरोग्याविषयीच्या तज्ज्ञ असलेल्या जिरो यांच्याच नेतृत्त्वाखाली 2003 साली डब्ल्यूएचओ नं सार्स कोरोनाव्हायरसच्या साथीला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
जागतिक आरोग्य संघटनेची गरज व महत्त्व
• बदलत्या काळानुसार आरोग्य समस्या आणि त्यांचा फैलाव हा कोणत्याही भौेगोलिक, आर्थिक, वांशिक, राजकीय किंवा सामाजिक बंधने किंवा सीमारेषांना जुमानत नाही हे दिसून आलेले आहे. प्रचंड प्रतिकारशक्ती असणारे विषाणू (वायरस) आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी धोरण असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. बदलत्या काळात आरोग्य समस्यांना केंद्रस्थानी ठेवून जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे.
• खाली नमूद केलेल्या मह्त्त्वाच्या एपिडेमिक व पँडेमिक आजारांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे अस्तित्व आणि कार्य यांना महत्त्व प्राप्त झाले आहे -
1) बर्ड फ्लू व स्वाईन फ्लू : बर्ड फ्लू तसेच स्वाईन फ्लू आदी संसर्गजन्य आजार गेल्या दशकात समोर आले आहे. त्यांचा अटकाव रोखण्यासाठी देशांतर्गत प्रवासी वाहतुकीवर बंधने घालण्याची वेळ अनेक देशांवर आली. प्राण्यांची वाहतूक बर्ड फ्लूमुळे बंद करावी लागली.
2) मॅड काऊ आजार : प्राणीमात्रात या सोबतच मॅड काऊ आजार समोर आला.
3) ईबोला : दक्षिण अमेरिकाव व आफ्रिकेत ईबोलाचा प्रसार गंभीर स्वरुपाचा होता.
4) चिकन गुणिया आणि डेंग्यू : भारतात चिकन गुणिया आणि डेंग्यूचा प्रसार अनेकांचे प्राण घेणारा ठरला.
5) सार्स, मर्स व कोव्हिड : जगातील सर्वच देशांना या तिन्ही विषाणूंनी हैराण केले. फक्त आरोग्यच नव्हे तर सामाजिक व आर्थिक जीवन त्यामुळे विस्कळीत झाले.
6) एडस व एचआयव्ही : असुरक्षित लैंगिक संबंध आणि रक्तसंक्रमणातून पसरणारा एचआयव्हीचा विषाणू बाधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मोडून काढत असतो. परिणाम स्वरुप एडस् चे आव्हान गेल्या दोन दशकांपासून जगातील अनेक देशांपुढे आहे.
7) पोलिओ : एक दिवस निवडून संपूर्ण देशात, नवजात शिशू पासून 5 वयाच्या बालकापर्यंत पोलिओ डोस देण्याच्या संकल्पनेला 1995 साली सुरूवात झाली आणि 20 वर्षांनी भारत पोलिओमुक्त झाल्याचे स्वप्न वास्तवात येऊ शकले.