आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
- 09 Apr 2021
- Posted By : study circle
- 400 Views
- 0 Shares
आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
25 मार्च 2021 रोजी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणार्या आशा भोसले या मंगेशकर घराण्यातील दुसर्या व्यक्ती आहेत. 1998 मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
• आशा भोसले यांचा अल्पपरिचय -
जन्म - 8 सप्टेंबर 1933, सांगली
वडील - दीनानाथ मंगेशकर, शास्त्रीय गायक आणि संगितकार
आई - शेवंती उपाख्य शुद्धमती मंगेशकर (माई मंगेशकर)
भावंडे - लता मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर (सर्वजण अभिनय आणि गायन क्षेत्राशी संबंधीत)
जोडीदार - गणपत राव भोसले, दुसरा विवाह-राहुल देव बर्मन
अपत्ये - हेमंत (प्रोफेशनल पायलट आणि संगितकार), वर्षा, आनंद. हेमंत भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र चिंटू जगप्रसिध्द बँड बायबँड चे सदस्य आहेत.
• ठळक नोंदी -
1) 18 वेळा आशाताई भोसले यांना फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.
2) 20 भारतीय आणि 12 विदेशी भाषांमध्ये त्यांनी गायन केलं आहे. त्यांनी मुख्यत्त्वे यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत.
3) 1000 पेक्षा जास्त बॉलीवूडध्ये चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला.
4) 12,000 पेक्षा जास्त गाणी त्यांनी गायली आहेत.
• पुरस्कार व बहुमान -
1) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (1981, 1986)
2) फिल्मफेअर पुरस्कार (18 वेळा नामांकन व 7 वेळा पुरस्कार)
3) भारत-पाकिस्तान असोसिएशनचा नाईटिंगेल ऑफ एशिया हा पुरस्कार (1987)
4) मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार (1989)
5) स्क्रीन व्हिडीयोकॉन अॅवॉर्ड, जानम समझा करो - अल्बम (1997)
6) ग्रॅमी पुरस्कार - ग्रॅमी अॅवॉर्डकरता नामांकित होणार्या पहिल्या भारतीय गायिका (1997)
7) गुजरात सरकारचा दयावती मोदी पुरस्कार (1998)
8) महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार
9) दादासाहेब फाळके पुरस्कार (2000)
10) सिंगर ऑफ दी मिल्लेनीयम अॅवॉर्ड, दुबई (2000)
11) एमटीव्ही अॅवॉर्ड, कम्ब्ख्त इश्क या गितासाठी (2001)
12) फिल्मफेयर लाईफटाईम अचीव्हमेंट अॅवॉर्ड (2001)
13) बीबीसी आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार - ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते (2002)
14) बर्मिंगहॅम फिल्म फेस्टिव्हल मध्ये विशेष सन्मान (2002)
15) बेस्ट फिमेल प्लेबॅकसाठी आयआयएफ (आयफा) लाईफटाईम अचीव्हमेंट अॅवॉर्ड (2002)
16) लिव्हिंग लिजंड अॅवॉर्ड (2004)
17) मोस्ट स्टाईलीश पीपल इन म्युझीक अॅवॉर्ड (2005)
18) पद्मविभूषण (2008)
19) गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद (2011)
20) बीबीसीच्या 100 इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचा समावेश (2015)
21) महाराष्ट्र भूषण पुरस्कार (2021)
22) महाराष्ट्र सरकारचे 17 पेक्षा जास्त पुरस्कार
23) अमरावती व जळगाव विद्यापीठाने त्यांना साहित्यातील डॉक्टरेट उपाधी देऊन सन्मानित केले.
• राष्ट्रीय फिल्म अॅवॉर्ड -
त्यांना 2 वेळा बेस्ट प्लेबॅक सिंगर साठी राष्ट्रीय फिल्म अॅवॉर्ड मिळाले.
1) 1981 दिल चीज क्या है या गितासाठी चित्रपट उमराव जान.
2) 1986 मेरा कुछ सामान या गितासाठी चित्रपट इजाजत.
* फिल्म फेयर बेस्ट प्लेबॅक अॅवॉर्ड -
त्यांना एकूण 18 नॉमिनेशन्स. पैकी 7 फिल्म फेयर अॅवॉर्ड मिळाले. पहिले अॅवॉर्ड 1967 मध्येे मिळाले होते.
1) 1967 गरिबो की सुनो या गितासाठी चित्रपट दस लाख (1966)
2) 1969 मध्ये परदे मे रहने दो या गितासाठी चित्रपट शिखर (1968)
3) 1972 पिया तु अब तो आजा या गितासाठी चित्रपट कारवा (1971)
4) 1973 दम मारो दम या गितासाठी चित्रपट हरे रामा हरे क्रिष्ना (1972)
5) 1974 होने लगी है रात या गितासाठी चित्रपट नैना (1973)
6) 1975 चैनसे हमको कभी या गितासाठी चित्रपट प्राण जाये पर वचन न जाये (1974)
7) 1979 ये मेरा दिल या गितासाठी चित्रपट डॉन (1978)
• आशा भोसले पुरस्कार -
1) 2002 सालापासून आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त, चित्रपट संगीतात लक्षणीय कामगिरी करणार्या पार्श्वगायकास, अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा) आणि काही अन्य संस्थांच्या वतीने आशा भोसले पुरस्कार दिला जातो.
2) 1.11 लाख रुपये रोख व एक स्मृती चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
3) हा पुरस्कार लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीतले प्यारेलाल, कल्याणजी आनंदजीमधले आनंदजी, अन्नू मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन आणि सोनू निगम यांना मिळाला आहे.
• आशाताईंची कारकीर्द -
• आशा भोसले यांनी असंख्य चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते, गायली आहेत. यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. ते कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला. दीनानाथ मंगेशकरांचे वडील कर्हाडे ब्राह्मण होते. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासून गाण्याची आवड होती.
1) 1941 साली त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर यांचा ह्नदयविकाराने मृत्यु झाला त्यामुळे घरातील सर्व जवाबदारी मोठया बहिणीवर म्हणजे लता मंगेशकर यांच्यावर आली. मंगेशकर कुटुंब पुण्याहून सुरुवातीला कोल्हापूर आणि त्यानंतर मुंबईत आले आणि तेथेच स्थायिक झाले.
2) 1943 साली आशा भोसले यांची गायिकेची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली.
3) 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचे पहिले हिंदी गाणे चुनरिया या चित्रपटाकरता सावन आया हे होते. त्यांनी आपले पहिले सोलो गाणे रात की रानी या चित्रपटातील आयेगा आयेगा हे गाणे गायले होते.
4) 1949 साली वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी त्यांचे 31 वर्षीय प्रियकर गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. ते लताजींचे मॅनेजर होते. पुढे त्या आपल्या पतिपासून विभक्त झाल्या आणि आईकडे परत आल्या.
5) 1950-60 च्या दशकात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना सुरुवातीला फारशी संधी मिळाली नाही.
6) 1957-58 हे वर्ष आशा भोसले यांचे होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. त्यांनी अनेक संगीतकारांबरोबर काम केले. आपल्या आवाजाने त्यांनी अनेक कवींच्या काव्यरचना, चित्रपट आणि त्यातील अभिनेत्रींना अजरामर केले.
7) 1980 साली त्यांनी प्रसिध्द संगितकार राहुलदेव बर्मन यांच्यासोबत विवाह केला. राहुल देव बर्मन यांच्यासोबत त्या त्यांच्या मृत्युपर्यंत सोबत होत्या.
8) 1981 चा राष्ट्रीय पुरस्कार दिल चीज क्या है या त्यांच्या गीताला मिळाला.
9) 1986 चा राष्ट्रीय पुरस्कार इजाजत चित्रपटातल्या मेरा कुछ सामान या त्यांच्या गाण्याला मिळाला.
10) 1997 मध्ये ब्रिटिश लोकप्रिय बँड ने रिलीज केलेले एक गाणे आशाजींना समर्पीत केले होते.
11) 2011 साली आशा भोसले यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे) नोंदवण्यात आले.
12) 2012 ऑक्टोबरमध्ये त्यांची मुलगी वर्षा हिने आत्महत्या केली.
13) 2013 साली मराठी चित्रपट माई मध्ये प्रथमच त्यांनी चित्रपटांत अभिनय केला.
• महत्त्वाची माहिती -
1) आशाताईंची रेस्टॉरंट दुबई, सिंगापुर, कुवैत, आणि मुंबई या ठिकाणी 4 रेस्टॉरंटस आहेत. हे अशा नावाजलेल्या ठिकाणी आहेत. वाफा ग्रुपच्या रेस्टॉरंट मध्येे त्यांची 20% भागीदारी आहे. येथील कुक्स ना आशाजींनी 6 महिन्याचे प्रशिक्षण स्वतः दिले आहे. त्या उत्तम सुगरण आहेत. त्यांनी बनविलेली कढई गोस्त, बिर्याणी, पाया करी, गोझन फिशकरी आणि दालफ्राय फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय आहे.
2) आशा भोसले यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलं. बॉलीवूडमध्ये त्यांना मेलडी क्वीन म्हणून ओळखलं जातं. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीते, नाट्यगीते, गझला, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्व प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहेत. कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्वीडन आदि देशांत आयोजित त्यांचे संगीत कार्यक्रम लोकप्रिय झाले आहेत. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
• आशाताईंंची काही प्रसिद्ध हिंदी गाणी -
1) 1960 च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ऑखोसे जो उतरी है दिलमे (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणे. ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती.
2) 1965 चे जाइये आप कहाँ (मेरे सनम.)
3) 1968 मधील वो हसीन दर्द देदो (हम साया); चैन से हमको कभी, ही गाणी.
4) 1971 चे कारवाँ चित्रपटातील गीत, राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना पिया तू अब तो आजा हे गाणे.
5) 1971 चे फिल्मफेअर पुरस्कार विजेते दम मारो दम, हे गाणे.
6) 1972 चे जवानी दिवानीतले जाने जा हे गाणे.
7) 1981 चा उमराव जान या चित्रपटाने त्यांना गझल गायिका म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यांचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना अजरामर झाली.
8) 2007 साली त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला.
• आशाताईंंची मराठी गाण्यांची कारकीर्द -
1) हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरली. त्यांनी सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गायलेली मराठी गाणी गाजली.
2) बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविता आशाताईंच्या आवाजात रसिकांपुढे आल्या.
आशाताईंंची काही लोकप्रिय मराठी गीते -
• तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती, रेशमाच्या रेघांनीतला लावणीचा ठसका, सैनिक हो तुमच्यासाठीतला कृतज्ञता भाव, केव्हा तरी पहाटेतली हुरहुर, जे वेड मजला लागले, नाच रे मोरा, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश..,
1) संगीतकार - हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए. आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले.
2) मराठीत दत्ता डावजेकर - श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला.
3) अभिनेत्री - मधुबाला-मीनाकुमारीपासून ते तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला. आशाताई सुमारे 900 चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत.
4) सहकारी - त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ गाजवला. त्या सध्या हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत.
5) संगीत आल्बम -राहुल अँड आय, आशा अँड फ्रेन्ड्स, लेस्ली लुईबरोबरचे काम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, असे अनेक नवप्रयोग कमालीचे यशस्वी ठरले.
• आशा भोसले यांच्या सांगीतिक आयुष्यावर अनेक पुस्तके आहेत त्यांपैकी काही -
1) आशा भोसले : ए म्युझिकल बायोग्राफी - राजू भारतन
2) आशा भोसले : नक्षत्रांचे देणे (संपादक - वामन देशपांडे, मोरया प्रकाशन)
3) खय्याम (विश्वास नेरुरकर)
4) नामांकित (डॉ. अनघा केसकर)
5) मंगेशकर स्वरांचा कल्पवृक्ष (प्रभाकर तांबट)
6) सुरा मी वंदिले (कृष्णकुमार गावंड)
महाराष्ट्र भूषण पुरस्कार
महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणार्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हा शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार खालील क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी दिला जातो -
1) आरोग्यसेवा
2) उद्योग
3) कला
4) क्रीडा
5) पत्रकारिता
6) लोकप्रशासन
7) विज्ञान
8) समाजसेवा
• 2012 सप्टेंबरपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता व निकष -
1) संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
2) हा पुरस्कार परप्रांतीय व्यक्तींनाही देण्यात येईल असे ठरवले गेले परंतु त्यासाठी त्या परप्रांतीय व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असणे गरजेचे करण्यात आले.
3) पदम पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येते.
• पुरस्काराचे स्वरुप -
1) या पुरस्काराची रक्कम रु.10 लाख इतकी असेल. 2012 सालापूर्वी 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र दिले जात होते.
2) पुरस्कारार्थीला शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते.
• महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समिती -
1) अध्यक्ष - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
2) उपाध्यक्ष - उपमुख्यमंत्री अजित पवार
3) शासकीय सदस्य - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय
4) सदस्य सचिव - सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे
5) अशासकीय सदस्य - विविध क्षेत्रातील तज्ञ अशा 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.
आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत -
• 2012 ते 2014 आणि 2016-2020 दरम्यान हा पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नाही. बाबासाहेब पुरंदरेना हा पुरस्कार दिल्यावरुन वादंग झाले होते, त्यामुळे तत्कालीन सरकारने सदर पुरस्कार स्थगित केला होता.
• महाराष्ट्र सरकारखेरीज महाराष्ट्रभूषण या नावाचा पुरस्कार देणार्या काही संस्था आहेत - महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र समूह, महात्मा कबीर समता परिषद, पनवेल वेल्फेअर सोशल क्लब, काही राजकीय पक्ष.