तिसरी आघाडी
- 17 Jun 2021
- Posted By : study circle
- 5 Views
- 0 Shares
तिसरी आघाडी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”पक्ष आणि हितसंबंधी गट” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ”महाराष्ट्रात तिसरा पर्याय अयशस्वी ” व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (२) : भारतीय संविधान, राजकारण व कायदा
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
७. पक्ष आणि हितसंबंधी गट :
* भारतीय पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप
* राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष - विचारप्रणाली, संघटन, पक्षीय निधी, निवडणुकीतील कामगिरी, सामाजिक आधार, महाराष्ट्रातील प्रमुख हितसंबधी गट
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
महाराष्ट्रात तिसरा पर्याय अयशस्वी
* महाराष्ट्रात तिसरा पर्याय यशस्वी का ठरतो आहे, याचे कठोरपणे आत्मपरीक्षण करायला हवे. त्यासाठी झापडे काढायला हवीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शब्दप्रामाण्याऐवजी बुद्धिप्रामाण्याकडे जायला हवे...
* भाजपची वाढती राजकीय ताकद, काँग्रेसची हतबलता आणि राष्ट्रीय स्तरावर तिसरा पर्याय शोधण्याची धडपड ही आजची राजकीय परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातील तिसर्या पर्यायाच विचार केला तर काय दिसते? काँग्रेस-राष्ट्रवादी-सेना आणि भाजप या एकाच नाण्याच्या वेगवेगळ्या बाजू असल्याचे दिसून आल्याने, २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत वंचित बहुजन आघाडीला तिसरा पर्याय समजून, महाराष्ट्रातल्या मतदारांनी ४१ लाख एवढी भरघोस मतसंख्या नोंदवली; परंतु त्यानंतरच्या वाटचालीत असे काय घडले असावे, की वंचित बहुजन आघाडी अगदीच पिछाडीवर गेली? ज्या पंढरपूरपासून वंचित बहुजन आघाडीला दिशा मिळाली होती, त्याच पंढरपुरातील २०२१ च्या पोटनिवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराला फक्त ११७३ मते मिळावी. असे का व्हावे?
* वंचित बहुजन आघाडी हे २०१८ मध्ये पंढरपूरला झालेल्या धनगर बांधवांच्या मेळाव्याचे अपत्य होय. वंचित बहुजन आघाडी हा बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला पक्ष हे अर्धसत्य जाणावे; कारण धनगर बांधवांनी त्या मेळाव्याचे अध्यक्षस्थान त्यांना दिले होते व एक नेतृत्व म्हणून पुढे केले होते. आज चित्र निर्माण केले जाते, की आरपीआय नंतर भारतीय रिपब्लिकन पक्ष व त्यानंतर भारिप-बहुजन महासंघ व यानंतरची बाळासाहेबांच्या प्रयत्नांची फलश्रुती म्हणजे आजची वंचित बहुजन आघाडी आहे; पण हे चित्र दिशाभूल करणारे वाटते. बाळासाहेब आंबेडकरांनी असे एकामागून एक प्रयोग त्यांच्या राजकीय जीवनात केले; परंतु वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे त्यांच्या आयुष्यातले एकमेवाद्वितीय असे यश म्हटले पाहिजे. या निवडणुकीत जरी वंचितचा एकही खासदार निवडून आला नाही, (इम्तियाज जलील हे एमआयएमचे खासदार आहेत.), तरी मतांची संख्या ४१ लाख होती. आंबेडकरांना अकोला व सोलापूर या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला, तरीही पक्षाला एवढी मोठी मतसंख्या कधीच मिळालेली नव्हती. ही मतसंख्या फक्त आणि फक्त दलित व ओबीसी या दोन्हींच्या एकत्रीकरणामुळे मिळू शकली, हे वादातीत सत्य म्हणावे लागेल. त्यासाठी कुठल्याही राजकीय ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही; परंतु त्यानंतर लगेच झालेल्या २०२० मधील विधानसभा निवडणुकीत ही मतसंख्या एकदम २४ लाखांवर घसरली. या घसरणीची तीन प्रमुख कारणे संभवतात -
१) ८ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करीत असल्याची घोषणा केली. असे करताना आपण २५-३० वर्षे सोबत असलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या केडरवर अन्याय करतो आहोत, याची जाणीव त्यांना झालेली दिसत नाही. त्याचा फटका बसला वंचित बहुजन आघाडीला व त्यायोगे अर्थातच समाजाला. प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या आमसभेत कुणाला विश्वासात घेतले व असा निर्णय कधी मंजूर केला, याची कुणाला माहिती नाही; त्यामुळे साहजिकच लोकसभेत भारिप बहुजन महासंघाजवळ आलेला ओबीसी समाज भारिपमधील प्रस्थापितांना सलू लागला. परिणामी दोन्ही समाज घटकांमध्ये कळत नकळत दरी निर्माण झाली.
२) प्रकाश आंबेडकरांनी काढलेली टूम म्हणजे मायक्रो ओबीसी (ज्या अनुषंगाने बहुसंख्य किंवा मॅक्रो ओबीसी आपोआप वेगळा वाटू लागला). खरे तर, महाकाय ओबीसी समाज आधीच इतक्या पंथ, संप्रदाय व जात खंडांमध्ये विभागला आहे, की त्याला आपण मायक्रो व मॅक्रोमध्ये विभागून जोडतो, अथवा तोडतो याचे भान आंबेडकरांना राहिले नाही.
३) २०२० च्या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकणारे उमेदवार राहिले बाजूला व हौशे-गवसे उमेदवार झाले. विशेष म्हणजे, लोकसभेचे व विधानसभेचे ९५ टक्के उमेदवार नंतर पक्ष सोडून गेले. जे नेते, पदाधिकारी व ओबीसी/ओबीसीतर कार्यकर्ते वंचितला सोडून गेले, ते सारे मतलबी, स्वार्थी व संधिसाधू होते, असे म्हणून आत्मपरीक्षण टाळणे म्हणजे स्वतःची प्रतारणा करणे होय.
* ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरासरीने अनुमान काढल्यास वंचित बहुजन आघाडीची मतसंख्या ९ लाखांच्या पुढे गेलेली नाही. त्याआधी पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये वंचितचा एकही उमेदवार १२-१४ हजारांच्या वर मते घेऊ शकला नाही.
* आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रवासाचा निस्पृह विचार करून, अहंगंड सोडून, स्वत: पुढाकार घेऊन आंबेडकरांनीच वंचितच्या नेतृत्वात यथायोग्य बदल घडवून आणावा. यश मिळाल्यावर श्रेय घेण्यासाठी समोर येतात, तसे अपयशाची जबाबदारी स्वीकारणे, ही खर्या नेत्याची कसोटी समजावी. गेली अनेक वर्षे जसे सामाजिक अभियांत्रिकीचे यश ते स्वत:कडे घेतात. ते त्यांनी घेण्यात गैर नाही; परंतु मुद्दा शिल्लक राहतो तो अपयशाचा! एवढ्या वर्षांत आपण काय केले व काय झाले, याचा लेखाजोखा तुम्ही कितीही टाळला, तरी तो नाकारू शकत नाही. वंचित बहुजन आघाडी नवीन आहे, अजून दोन-चार निवडणुका होऊ द्यावात, नंतर हा मुद्दा चर्चिला जावा, असे म्हणणे हा शुद्ध आत्मिक-बुद्धिभेद होईल. यासाठी काँग्रसकडे पाहा. गांधी-नेहरू घराण्यांचा वारसा, महामानवांचे वंशज व या मानसिकतेत जगणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी (सीताराम केसरी यांनी सोनिया गांधी पंतप्रधान व्हाव्यात म्हणून केलेला विलाप आठवा.) स्वतःचे व पर्यायाने देशाचेही वाटोळे करून घेतले. अजूनही काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधी यांच्या विरोधात बोलणे म्हणजे आत्मघात करून घेणे, अशीच भावना आहे. किंबहुना काँग्रेसी नेत्यांच्या अशा वृत्तीमुळेच देश प्रतिगामी लोकांच्या जाळ्यात अडकला.
* हल्लीच निवर्तलेले काँग्रेस नेते राजीव सातव काही प्रश्नांना उत्तरे देताना म्हणाले होते, की आपले व्यक्तिगत मेरिट व जनपाठिंबा असेल, तर पक्षश्रेष्ठी कितीही कुटील किंवा धूर्त असले, तरी काही करू शकत नाहीत. आपले सामाजिक, राजकीय व राष्ट्रीय अस्तित्व हा आपला कायम ठेवा असतो व तो निरपेक्षपणे जपावा. आज सातव यांचे शब्द प्रकर्षाने आठवतात. थोडक्यात, डोळ्यांवरची अनाठायी झापडे बाजूला सारून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या न्यायाने निरीक्षण केल्यास, आपण शब्दप्रामाण्याकडून (जे फसवे असू शकते) बुद्धिप्रामाण्याकडे (स्वतःची बुद्धी आपली प्रतारणा कधीच करत नाही) सहज वाटचाल करू शकतो. विशेषतः, तरुणांनी ही काळाची गरज समजावी आणि कामाला लागावे.
सौजन्य व आभार : महाराष्ट्र टाइम्स
१६ जून २०२१ / अॅड. धनराज वंजारी