बनाना नेट
- 12 Jun 2021
- Posted By : study circle
- 20 Views
- 0 Shares
बनाना नेट
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”कृषी अर्थव्यवस्था” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात ”केळी निर्यातीसाठी ‘बनाना नेट” व त्यावर येऊ शकणारे प्रश्न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (4) : कृषी अर्थव्यवस्था
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
2.2 भारतीय शेती व ग्रामीण विकास :
* कृषी विपणनावरील गॅट कराराचे परिणाम.
2.10 कृषी :
* आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषी विषयक विविध करार
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
केळी निर्यातीसाठी बनाना नेट
* द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला, लिंबूवर्गीय फळे आदींच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘ट्रेसेबिलिटी’ यंत्रणेत केळी पिकाचा समावेश झाला आहे. अपेडा’तर्फे ‘बनाना नेट’ नावाने त्याचे ‘सॉप्टवेअर’ तयार झाले असून, जुलै 2021 पासून कार्यपद्धतीची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
* केळी हे राज्याचे प्रमुख व निर्यातीसाठी महत्त्वाचे फळपीक आहे. 2016-17 साली देशाची वार्षिक केळी निर्यात 35 हजार टनांपर्यंत मर्यादित होती. ती वर्षागणिक वाढते आहे. सन 2020-21 फेब्रुवारी अखेर ती 1.91 लाख टन झाली. त्यात राज्याचा वाटा 70 टक्के म्हणज 1.35 लाख टन होता.
* देशाच्या केळी निर्यातीत महाराष्ट्राचा बहुतांश वाटा आहे. ‘बनाना नेट’मुळे त्यास अजून चालना मिळेल. शिवाय जागतिक बाजारपेठेत हुकमी स्थान तयार करण्याची संधी देशातील केळी उद्योगापुढे निर्माण झाली आहे. देशातील शेतीमालांची निर्यात सुकर होण्यासाठी केंद्र सरकारने ‘अपेडा’अंतर्गत ‘ट्रेसेबिलिटी’ (शेतकरी ते ग्राहक- शेतीमाल वाहतूक पारदर्शक साखळी) यंत्रणा देशभरात अमलात आणली. ऑनलाइन पद्धतीच्या या यंत्रणेत सर्वप्रथम ‘ग्रेपनेट’ (द्राक्ष), त्यानंतर अनारनेट (डाळिंब), मँगोनेट (आंबा), व्हेजनेट (भाजीपाला), सिट्रस नेट (लिंबूवर्गीय फळे) आदी यंत्रणा ‘हॉर्टीनेट’अंतर्गत टप्प्याटप्प्याने विकसित झाल्या. त्या माध्यमातून युरोप, अमेरिका, आखाती देश व एकूणच जागतिक बाजारपेठेत निर्यातीला चालना मिळून आपले स्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर पक्के करण्याची संधी मिळाली.
‘बनाना नेट’चे फायदे -
1) जागतिक बाजारपेठेत भारतीय केळी पोहोचविण्याची संधी
2) ‘गुड ग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस’ची अंमलबजावणी
3) केळी उद्योग वा ‘क्लस्टर’ संबंधित सर्व ‘डाटा बेस’ निर्मिती
4) कीडनाशकांचे ‘लेबल क्लेम’, ‘पीएचआय’, ‘एमआरएल’ होणार उपलब्ध
5) रासायनिक अवशेषमुक्त व कीडमुक्त मालाचे उत्पादन
6) गुणवत्तेमुळे देशांतर्गत बाजारपेठेतही वाढणार स्थान
सौजन्य व आभार : दैनिक अग्रोवन
5 जून 2021 / मंदार मुंडले