पायाभूत संरचना / प्रश्नमंजुषा (73)

  • पायाभूत संरचना / प्रश्नमंजुषा (73)

    पायाभूत संरचना / प्रश्नमंजुषा (73)

    • 30 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 565 Views
    • 2 Shares

    नवे संसद भवन : सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट

     
     
            देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2022 रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्याचा सरकारचा मानस आहे. सध्याच्या संसद भवनाला लागून नव्या संसद भवानाची इमारत उभी राहणार असून 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचा कोनशिला समारंभ करण्यात आला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच भारत स्वतःची संसद बांधणार आहे. 
    • ब्रिटिश काळापासून भारताचा राज्यकारभार ज्या संसद भवनातून चालत आहे त्याला 2021 साली 100 वर्षं पूर्ण होत आहेत. एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर या स्थापत्यशास्त्रज्ञांनी या इमारतीचं डिझाईन तयार केलं होतं. ही संसद उभारण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागला होता.
    • सप्टेंबर 2016 मध्ये नवे संसद भवन बांधण्याच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाची घोषणा. त्यावेळी 21 महिन्यात म्हणजे 2022 पर्यंत ही संसद बनून तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.
    • नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकूण 1,224 सदस्य एकाचवेळी बसू शकतील. (लोकसभा सदस्यांसाठी 888, तर राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा अधिक जागा उपलब्ध)
    • सध्याचे संसद भवन आहे तसंच ठेवून त्याचे पुरातत्व वारसा म्हणून जतन होईल. तसेच वेगवेगळ्या संसदीय कार्यक्रमांसाठी तिचा वापर होणार.
    • सध्याच्या  संसद भवनाचं डिझाइन मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिराप्रमाणे आहे. पण, नवीन संसद भवनाची डिझाइन मात्र वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉनप्रमाणे आहे - जयराम रमेश
    • 2022 साली 75 व्या स्वातंत्र्यदिनी नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु करण्याचे अपेक्षित - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. 

     नियोजित संसद भवनाची वैशिष्ट्ये
    • जुनी संसद आहे तशीच ठेवून त्याच्या शेजारी 65 हजार चौरस मीटरवर संसदेची 4 मजली नवी आणि भव्य इमारत. जुन्या संसद भवनाच्या इमारतीपेक्षा नवी इमारत 17,000 स्केअर फूट मोठी.
    • नवी संसद आधुनिक, तंत्रज्ञानसज्ज आणि ऊर्जा बचत करणारी. पर्यावरणाला पूरक अशी इमारत.
    • लोकांना संसदेत जाता-येताना सुरक्षेचा जाच होऊ नये, मात्र सुरक्षाही भक्कम असावी, अशा प्रकारे नव्या तंत्रज्ञानवर आधारित सुरक्षा यंत्रणा.
    • सध्याची संसद गोलाकार आहे. नवी संसद त्रिकोणी आकाराची असेल. मात्र, उंची जुन्या संसदेएवढीच असेल.
    • नवीन इमारत भारतीय संस्कृती आणि प्रादेशिक कला, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि वास्तुकलेच्या विविधतेचं समृद्ध मिश्रण दर्शवणारी असेल.
    • एक संविधान हॉल (सेंट्रल कॉन्स्टिट्युशनल गॅलरी) असेल जी सर्वसामान्यांसाठी खुली असेल. 
    • दिल्लीत गेल्या काही वर्षात भूकंपाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मोठ्या भूकंपातही इमारतीला नुकसान होणार नाही, अशा पद्धतीने इमारतीचं बांधकाम करण्यात येईल.
    • सध्या लोकसभेची आसन क्षमता सुमारे 550 तर राज्यसभेची आसन क्षमता 250 आहे.
    • नव्या संसदेतील लोकसभा तिप्पट मोठी असणार आहे. राज्यसभाही मोठी असेल. 
    • संसदेतील सध्याचा सेंट्रल हॉल दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी कमी पडतो. त्यामुळे 1350 सदस्य बसू शकतील, इतकी आसनक्षमता असणारा नवीन सेंट्रल हॉल उभारण्यात येणार.
    • खासदारांसाठी लाउंज, मोठं ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी खोल्या, डायनिंग एरिया असे वेगवेगळे भाग.
    • या प्रकल्पाअंतर्गत 2024 पर्यंत केंद्रीय सचिवालय उभारण्याचे उद्दिष्ट. 
    • सेंट्रल व्हिस्टा पुनर्निमाण प्रकल्प एकूण 20 हजार कोटी रुपयांचा असला तरी नव्या संसद भवनासाठी 861 कोटी रुपये खर्च.
    • ‘टाटा प्रोजेक्ट लिमिटेड’कडे या इमारतीच्या उभारणीचे कंत्राट. सप्टेंबर 2020 महिन्यात झालेल्या लिलावात टाटा प्रोजेक्ट कंपनीला संसद भवन उभारण्याचे कंत्राट मिळाले.
    • गुजरातमधील ‘एचसीपी डिझाइन्स’ ही वास्तुविशारद संस्था सल्लागार कंपनी
     
    सेेंट्रल व्हिस्टा प्रकल्प 
            भारताचा प्रशासकीय कारभार दिल्लीतील ल्युटियन्स भागातून चालतो. यात भारताची संसद, राष्ट्रपती भवन आणि इतर सर्व मंत्रालयांच्या इमारती, सचिवालय ही सर्व प्रशासकीय कार्यालयं आहेत. 
    1) एडविन ल्युटियन्स या ब्रिटिश आर्किटेक्टच्या नेतृत्त्वाखाली भारतीय प्रशासनाचे वैशिष्ट्ये असलेल्या नवी दिल्ली परिसरातील इमारतींचे डिझाईन तयार केल्याने हा भाग ल्युटियन्स परिसर म्हणून ओळखला जातो.
    2) राजपथच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात. यात वरील इमारतींव्यतिरिक्त राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल आर्काईव्हज, इंदिरा गांधी कला केंद्र, बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस, निर्माण भवन, जवाहरलाल भवन हा सर्व परिसरही सेंट्रल व्हिस्टाअंतर्गत येतो. या संपूर्ण भागाचं पुनर्निमाण करण्यात येणार आहे.
    3) गेल्या 75 वर्षात लोकसंख्या वाढीबरोबर खासदारांची संख्या वाढली आणि प्रशासकीय कारभारही वाढला. त्यामुळे केवळ संसदच नाही तर सर्व कार्यालयांमध्येही जागा कमी पडू लागली. एका मंत्रालयातून दुसर्‍या मंत्रालयात जाणं-येणंही वेळखाऊ झालं. या कारणास्तव हा संपूर्ण परिसर नव्याने बांधण्याचा विचार पुढे आला. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात (2019) त्यावर खर्‍या अर्थाने कामाला सुरुवात झाली.
    4) सप्टेंबर 2016 मध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा झाली. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन असा 3 किलोमीटरपेक्षा अधिक परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे.
    5) सध्या सर्व मंत्रालयं वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांना एका मंत्रालयातून दुसर्‍या मंत्रालयात खेटे मारावे लागतात. त्यात बराच वेळ लागतो. त्यामुळे सर्व मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणून त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाने जोडण्यात येणार आहे.
    6) एक केंद्रीय सचिवालय उभारण्यात येणार आहे. परिसरात असणारी सर्व कार्यालयं अंडरग्राउंड सब-वेने जोडण्यात येणार आहेत. हे सब-बे मेट्रोलाही जोडलेले असतील.

    सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरील आक्षेप 
            सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टविरोधात, दिल्लीतील विविध कोर्टांत दाखल याचिकाद्वारे 1200 पेक्षा जास्त हरकती घेण्यात आल्या. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी केली.
    1) सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी ज्या वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या, त्याविरोधात 7 याचिका दाखल. यात मुख्य याचिका हा भूखंड वापरात बदल करण्याची परवानगी दिल्याविरोधात आहे. अशा प्रकारचा बदल ’कायदेशीर नाही’, असं काही आर्किटेक्सचं म्हणणं आहे. विविध परवानग्या देताना सरकारने स्वत:चे मापदंड बाजूला ठेवले. या प्रकल्पासाठी 86 एकर जमिनीचा लँड यूज बदलण्याशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्टात 5 नोव्हेंबरला सुनावणी झाली. लँड यूज बदलण्याचे आदेश 20 मार्च 2020 ला केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने दिले होते. 
    2) सध्या जो सेंट्रल व्हिस्टा परिसर आहे तो सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे खुला आहे. मात्र, नव्या पुनर्निमाण प्रकल्पात जवळपास 80 एकर परिसर ’प्रतिबंधित’ होईल. म्हणजे या भागात केवळ सरकारी अधिकारी जाऊ शकतील. सामान्य माणसासाठी या परिसरात प्रवेश निषिद्ध असेल. त्यामुळे जी जागा सामान्य जनतेसाठी खुली राहणार नाही, त्याची भरपाई कशी होईल, असा सवाल एका याचिकेत आहे.
    3) या प्रकल्पासाठी पर्यावरण ऑडिट करण्यात आलेलं नाही. या प्रकल्पसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात येणार आहे. जवळपास 1 हजार झाडांची कत्तल होईल. त्यामुळे पर्यावरणीय समतोलावर त्याचा परिणाम होईल, असा आक्षेप पर्यावरणवाद्यांनी घेतला आहे. प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी चुकीच्या पद्धतीने दिली गेली.
    4) भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये दिल्लीचा क्रमांक वरचा आहे. या प्रकल्पामुळे दिल्लीतल्या प्रदूषणात वाढ होईल, असा इशारा पर्यावरतज्ज्ञांनी दिला आहे. तसेच सल्लागार नेमण्यात भेदभाव करण्यात आला. 
    5) या प्रकल्पाचं ऐतिहासिक किंवा हेरिटेज ऑडिट झालेलं नाही. या प्रकल्पात राष्ट्रीय संग्रहालय ही ऐतिहासिक वास्तूही पाडली जाणार आहे. अशा इतरही इमारती आहेत. त्यांचं एक राष्ट्रीय महत्त्व आहे. त्यामुळे त्या पाडता कामा नये, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
    6) कोरोना काळात जिथे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च करण्याची गरज आहे, अशावेळी नव्या संसदेसाठी हजारो कोटी रुपये खर्च करणं योग्य आहे का, असा सवाल विरोधी पक्षातल्या खासदारांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही उपस्थित केला आहे.

    सरकारची भूमिका -
    1) लोकसंख्या वाढीबरोबर मतदरासंघ पुनर्रचनेमुळे मतदारसंघांची संख्या वाढते. 2026 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना येऊ घातली आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचीही सदस्यसंख्या वाढणार आहे. अशावेळी भविष्यात मोठ्या संसदेची गरज आहे.
    2) प्रशासकीय कामकाजाचा आवाकाही वाढला आहे. त्यामुळे जागा भाड्याने घेऊन कामकाज करावं लागतं. त्यासाठी अतिरिक्त 1 हजार कोटी रुपये खर्च येतो. सेंट्रल व्हिस्टामुळे हा खर्च वाचणार आहे.
    3) भविष्यात अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवशयक असल्यामुळे त्या सोयीसाठी नवी भुतिक यंत्राणा गरजेची आहे.
    4) सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकांवर निकाल येत नाही तोवर बांधकाम करणार नाही, तोडफोड करणार नाही आणि झाडंही स्थलांतरित करणार नाही, असं आश्र्वासन केंद्र सरकारने दिलं आहे. अशी हमी दिल्यानंतर  सर्वोच्च न्यायालयाने  केंद्र सरकारला कोनशिला समारंभाची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकांवर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बांधकाम, तोडफोड आणि झाडांचे स्थलांतर करण्यात येणार नाही, अशी हमी महान्यायवादी तुषार मेहता यांनी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला दिली. या खंडपीठात न्यायमूर्ती दिनेश महेश्र्वरी आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा समावेश आहे.

    भारतीय संसद भवनाचा इतिहास
     
     
            विद्यमान पार्लमेण्ट हाऊसचे मूळ वसाहतवादी आहे आणि तिथपासून गेल्या सात दशकांत भारताने लोकप्रतिनिधित्वाधारित लोकशाही यशस्वी करण्यात प्रगती केलेली आहे. त्यामुळे राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे होईल तेव्हा नवी ‘लोक संसद’ (पीपल्स पार्लमेण्ट) उभारण्याचा संकल्प हा लोकांच्या आशाआकांक्षांतून आलेला आहे. 
    •• भारताचे संसद भवन हे देशाच्या लोकशाही भावनेचा उत्तुंग आविष्कार आहे. राज्यघटनेने जी लोकप्रतिनिधित्वाधारित व्यवस्था दिली, तिचे हे मंदिर लोकांच्या विश्र्वाचे एक प्रतीक आहे. सन 2022 मध्ये आपला देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करील, तेव्हा लोकशाही कायम ठेवणे हेही भारताचे एक वैशिष्ट़य असेल. त्या प्रसंगासाठीच ‘लोक संसद’ ही इमारत देशाच्या इतिहासात प्रथमच उभारली जात आहे. राजधानी दिल्लीतील अगदी मोक्याच्या जागी होणार्‍या या इमारतीमुळे भारतीय लोकशाहीची प्रगती दिसून येईल. ही लोकशाही लोकांच्या आशाआकांक्षांना प्रतिसाद देणारी आहे, हेही ही नवी इमारत बांधली गेल्यामुळे प्रतीत होईल.
    •• नवी ‘पीपल्स पार्लमेण्ट’ इमारत आणि नवी दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील सर्वच इमारतींचा एक तर विकास किंवा पुनर्विकास करणारा प्रकल्प, यामुळे ‘नव भारता’च्या उभारणीला गती येईल, अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, राष्ट्रीयत्वाची व राष्ट्रगौरवाची भावना वाढीस लागेल आणि प्रत्येकाचे योगदान राष्ट्रउभारणीसाठी मिळेल..
    •• भारतवर्षांतील लोकशाहीची पाळेमुळे प्राचीन काळात आहेत. परंतु सुलतानी आणि मोगलाईची सहा शतके ही अवनतीचा काळ होती. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही मूल्यांचे पुन्हा एकात्मीकरण करणे हे सरकारचे महत्त्वाचे कर्तव्य आणि राष्ट्रीय नेतृत्वापुढील महत्त्वाचे ध्येय राहिले. वसाहतकाळात बांधले गेलेले ‘पार्लमेंट हाऊस’ (आजचे ‘संसद भवन’) हे याकामी महत्त्वाची भूमिका बजावू लागले.
    •• 1912 मध्ये  ब्रिटिशकाळात, भारताच्या पार्लमेण्टसाठी स्वतंत्र इमारत असावी, याविषयीचा प्रश्र्न पहिल्यांदा उपस्थित करण्यात आला. त्या वेळचे पार्लमेण्ट हाऊस हे गव्हर्नर जनरल यांच्या प्रासाद-समूहातील एक सभागृह म्हणून बांधण्यात येणार होते. 
    •• 1919 च्या ‘गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट’मुळे भारतीय प्रजेला लोकप्रतिनिधित्व मिळाले आणि द्विदल सभागृहाची वैधानिक तरतूद झाली. त्यामुळे कायदेमंडळाच्या इमारतीची आवशयकता स्पष्ट झाली. 
    •• 1921 साली त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
    •• 1927 मध्ये ‘पार्लमेण्ट हाऊस’चे उद्घाटन झाले, त्यातील तीन सभागृहांना त्या वेळी - चेम्बर ऑफ प्रिन्सेस, स्टेट कौन्सिल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली असे म्हटले जात असे. स्वातंत्र्योत्तर काळात ही तीन सभागृहे अनुक्रमे लायब्ररी हॉल (सेंट्रल हॉल), राज्यसभा आणि लोकसभा म्हणून ओळखली जाऊ लागली. 
    •• 1956 मध्ये वाढत्या गरजेनुरूप दोन मजले याच संकुलात बांधण्यात आले.
    •• 2019 मध्ये, केंद्र सरकारची सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाला मंजुरी.
    •• 2020 मध्ये, कोनशिला समारंभ पार पडला.
    •• 2022 चे ‘हिवाळी अधिवेशन’ भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी नव्या इमारतीमध्ये भरविले जाणार आहे. या नव्या पार्लमेण्ट संकुलात सध्याचे संसद भवनही असेल, पण नवी त्रिकोणी आकाराची इमारत बांधण्यात आल्यामुळे कायदेमंडळाचे कामकाज कार्यक्षम आणि प्रभावीपणे होणार आहे. या नव्या इमारतीत भारतीय मूल्ये जपणार्‍या प्रादेशिक कला/ कारागिरी/ वस्त्रे/ वास्तुकला आणि संस्कृती या सर्वाना स्थान आहे.
    •• 2024 सालापर्यंत प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल, सध्याची संसद आणि या संसद भवनाच्या शेजारी सध्या असलेली ‘पार्लमेण्ट अ‍ॅनेक्स अ‍ॅण्ड लायब्ररी’ची इमारत तसेच प्रस्तावित पार्लमेण्ट इमारत यांदरम्यानची ये-जा तोवर सुकर झालेली असेल. या संकुलाला सुघटित ‘लेजिस्लेटिव्ह आन्क्लाव्ह (एन्क्लेव्ह)’चे स्वरूप येईल.
    •• 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे भारताचे ध्येय आहे, आणि त्यापुढे 2030 मध्ये 10 ट्रिलियन डॉलरचा पल्ला भारतीय अर्थव्यवस्थेला गाठायचा आहे, त्या दृष्टीने नवी पार्लमेण्ट इमारत आणि भोवतालच्या अख्ख्या ‘सेंट्रल व्हिस्टा’चा विकास किंवा पुनर्विकास हा देशाला राष्ट्रीय एकात्मतेकडे नेणारा, सर्व नागरिकांमध्ये राष्ट्रगौरवाची भावना वाढीस लावणारा आणि प्रत्येकाने ‘नव भारता’च्या आशाआकांक्षा पूर्ण राष्ट्रीय ध्येयासाठी काही तरी योगदान दिलेच पाहिजे, याची शिकवण देणारा ठरणार आहे.
    •• जागतिक इतिहास असे सांगतो की जेव्हा जेव्हा देश आर्थिक संकटामध्ये होते तेव्हा तेव्हा अशा मोठ़या प्रकल्पांची उभारणी झाल्यामुळे अर्थव्यवस्थांना उभारी आली. दुसर्‍या महायुद्धानंतर जपानमध्ये टोक्यो टॉवरच्या बांधकामातून हजारो कामगारांना रोजगार मिळाला आणि राष्ट्रवादाची भावना अधिक वाढीस लागली, तसेच जपानी अर्थव्यवस्थेचेही पुनरुज्जीवन झाले. अमेरिकेतील ‘न्यू डील’मुळे तीन ट्रिलियन डॉलर खर्चाचे 34,000 नवे बांधकाम प्रकल्प पूर्ण झाले.

    • इतिहासात अनेक लोकशाही देशांनी, वसाहतींपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर नव्या इमारतींद्वारे परिवर्तन घडवून आणल्याची उदाहरणे आहेत-
    1) 1800 मध्ये, अमेरिकेला (यूएसए) स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 25 वर्षांनी, वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारत उभारली गेली आणि तेथेच युनायटेड स्टेट्स काँग्रेसचे पहिले अधिवेशन  झाले. 
    2) 1988 मध्ये, ऑस्ट्रेलियाची सध्याची पार्लमेण्ट इमारत कॅनबेरा या शहरात तयार झाली आणि तिने ऑस्ट्रेलियनांना एक अभिमानबिंदू दिलाच, शिवाय पर्यटकांनाही आकर्षित केले. 
    3) 1960 मध्ये, ब्राझीलमध्ये ‘नॅशनल काँग्रेस बिल्डिंग’ म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 70 वर्षांनी बांधली गेली. 
    4) ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि यूएसए हे आजही जगातील मोठे लोकशाही देश म्हणून ओळखले जातात, यामागे या इमारतींचेही योगदान आहे.
     
    जगातील सर्वोत्तम पार्लमेंट वास्तू
     
    1) नेदरलँड्सचे संसदभवन द बिन्नेनहोफ 
     
     
    1) नेदरलँडस (हॉलंड) या देशाचे संसदभवन द बिन्नेनहोफ जगात सर्वात जुने आहे. 
    2) राजधानी हेग या शहरात हे संसद भवन 13 व्या शतकात उभारले गेले होते. 2020 साली या इमारतीला 800 वर्षे पूर्ण झाली. 
    3) 1584 साली ही इमारत नेदरलँडच्या राजकारणाचे केंद्र बनले. नेदरलँडच्या या ऐतिहासिक इमरतीमध्ये अजूनही काम होतं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या बैठका या इमारतीत होतात. या इमारतीमध्येच देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय आहे. 
    4) द बिन्नेनहोफ या इमारतीचा नेदरलँड्समधील 100 हेरिटेज साइटमध्ये समावेश आहे. 
    5) द बिन्नेनहोफ ही इमारत उभारण्याचा मुख्य उद्देश हा नेदरलँडमधील काउंट (यूरोपियन देशांमधील कुलीन आणि प्रभावशाली व्यक्तींना दिली जाणारी उपाधी) यासाठी उभारली होती. 
     
    2) इटलीचे संसद भवन पलाज्जो मडामा 
     
     
    1) 1 6 व्या शतकात बांधले गेलेल्या इटलीच्या संसद भवनाचे नाव पलाज्जो मडामा आहे. 
    2) 1505 मध्ये राजधानी रोममध्ये उभारलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. 
    3) सुरुवातीला पलाज्जो मडामा या इमारतीची उभारणी मेडिसी कुटुंबियांसाठी केली होती. नंतर या इमारतीचे संसद भवनामध्ये रुपांतर करण्यात आले. द सीनेट ऑफ द रिपब्लिक सभागृहात एकूण 315 निर्वाचित सदस्य आहेत.
    4) 1871 पासून या इमारतीमध्ये इटलीच्या संसदेचे एक सभागृह द सीनेट ऑफ द रिपब्लिकची बैठक होत आहे. 
     
    3) फ्रेंच संसद भवन लग्जमबर्ग पॅलेस 
     
     
    1) युरोपमधील प्रमुख देश फ्रान्सच्या संसदेची इमारत 17 व्या शतकातील आहे. 
    2) राजधानी पॅरिस मध्ये असणार्‍या या इमारतीचे नाव लग्जमबर्ग पॅलेस असे आहे.
    3) 1958 पासून या इमारतीत संसदेचे अधिवेशन घेण्यास सुरुवात झाली. 
    4) 1615 ते 1645 दरम्यान ही इमारत फ्रान्सच्या राजाचा राजवाडा होता. 
    5) 19 व्या शतकात जगभरात दोन डझनपेक्षा जास्त संसद भवनांची उभारणी झाली. 
     
    4) अमेरिकेचे संसद भवन ’कॅपिटल’ 
     
     
    •   1800 मध्ये  अमेरिकेचे संसद भवन ‘कॅपिटल’चे बांधकाम  पूर्ण झाले. 
     
    5) ब्रिटनचे संसद भवन
     
     
    1) ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन अँड हाऊस ऑफ लॉर्ड्सची स्थापना अनुक्रमे 1840 आणि 1870 मध्ये झाली. 
    2) ब्रिटनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर जगातील सर्वच संसदेचं मूळ मानलं जातं. 
    3) चार्ल्स बेरी आणि अगस्तस वेल्बि पुगिन यांनी या संसदेचं डिझाइन केलं होतं. 
    4) थेम्स नदीच्या काठावर उभारण्यात आलेली ही संसद जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. 
    5) या संसदेच्या आवारात तीन टॉवर आहेत- एलिझाबेथ टॉवर, न्यू पॅलेस आणि हाउस ऑफ कॉमन्स अशी या तीन टॉवरची नावे आहेत. 
    6) गॉथिक स्थापत्य शैलीचा अद्भुत असा नमुना म्हणून याकडे पाहिलं जातं. 
    7) इतिहास आणि स्थापत्य शैलीमुळे 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये या संसदेचा समावेश केला. 
     
    6) जर्मनीचे संसद भवन 
     
     
    1) जगातील अनोख्या आणि आकर्षक अशा संसदेच्या इमारतींमध्ये जर्मनीच्या संसदेचं नाव बुंडेस्टॅग असे आहे. 
    2) जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये जर्मनीचे संसद भवन आहे.
    3) 1884 ते 1894 दरम्यान या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं. हिटलरच्या काळानंतर यामध्ये अनेक बदल झाले. 
    4) 1990 च्या दशकात इंग्लिश वास्तुविशारद नॉर्मन फॉस्टरने यामध्ये अनेक बदल केले. 
     
    7) फिनलँडचे संसद भवन 
     
     
    1) रशियाच्या ताब्यातून स्वतंत्र झालेल्या फिनलँडची संसद त्यांच्या देशाची ताकद इमारतीमधून दाखवून देते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फिनलँडने अर्थव्यवस्थेमध्ये स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. 
    2) हेलसिंकीमध्ये असलेली ही संसद गुलाबी आणि फिकट पांढर्‍या रंगाची आहे. 
    3) ग्रेनाइट दगडांपासून बांधण्यात आलेल्या इमारतीच्या आतही रंगांचा छान असा वापर करण्यात आला आहे. 
    4) 1907 मध्ये जगात पहिल्यांदा पहिल्या महिला खासदाराने मत दिलं होतं, ती जागा या वास्तूत सुरक्षित अशी ठेवण्यात आली आहे.
     
    8) भारतीय संसद भवन 
     
     
    1) 1921 मध्ये एडविन लुटियन्स यांनी डिझाईन केलेले भारताचे संसद भवन उभारले गेले. 
    2) या इमारतीच्या उभारणीसाठी त्यावेळी 83 कोटी रुपये खर्च आला असून ही इमारत 2.4 हेक्टर जागेत आहे.  
     
    9) दि ग्रेट हॉल ऑफ द पीपल ऑफ चायना 
     
     
    1) 1959 मध्ये दि ग्रेट हॉल ऑफ द पीपल ऑफ चायना इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. 
    2) नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या 2900 हून अधिक सदस्यांची वार्षिक बैठक येथे आयोजित केली जाते.
     
    10) बांगलादेशचे संसद भवन 
     
     
    1) आशियाई देशांमधील संसद भवनांमध्ये बांगलादेशची संसद खूप  सुंदर अशी आहे. ढाक्यात असलेलं पार्लमेंट हाउस हे एका कृत्रिम तलावाच्या काठावर आहे. 
    2) 1961 मध्ये त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. दहा वर्षे बांधकामासाठी लागलेल्या या संसदेच्या आत 8 इमारती एकमेकींना जोडून आहेत. 
    3) अमेरिकन वंशाचा वास्तुविशारद लुईस कन्हने याचा आराखडा तयार केला होता. अशा प्रकारच्या इमारतीची प्रेरणा त्याला स्कॉटलंडच्या किल्ल्यावरून सुचली होती.
     
    11) श्रीलंकेचे संसद भवन 
     
     
    1) इतर संसद भवनांच्या तुलनेत श्रीलंकेच्या संसदेची उभारणी खूप कमी वेळेत झाली. 1979 ते 1982 या चार वर्षांच्या कालावधीत या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. 
    2) जोफ्री बावा नावाच्या लंकेच्या वास्तुविशारदाने याचा आराखडा तयार केला होता. यामध्ये श्रीलंकेतील बौद्ध इमारतींशिवाय इतर आधुनिक स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. 
    3) संसद भवनाचे सर्व दरवाजे चांदीसारखे चमकदार असून आतील सजावट ही ब्रिटीश संसदेसारखी आहे. 
    4) तळ्याच्या काठावर असल्याने संसदेच्या सौदर्यात आणखी भर पडते.
     
    12) रुमानियाचे संसद भवन 
     
     
    1) जगातील सर्वात मोठ्या आणि भक्कम अशा संसद भवनांमध्ये रोमानियाच्या संसदेचा समावेश आहे. 1984 ते 1997 दरम्यान या संसद भवनाचे बांधकाम करण्यात आले. 
    2) बुखारेस्टमध्ये तयार करण्यात आलेली ही इमारत वास्तुविशारद एन्का पेट्रिशियाने तयार केलेल्या आराखड्यानुसार बांधण्यात आली. वयाच्या 32 व्या वर्षी तिने हे डिझाइन तयार केल होते.
    3) हे संसद भवन तयार करण्यासाठी 20 हजार सैनिक आणि कैद्यांनी दिवस रात्र काम केलं होतं. 
    4) याच्या आतील भाग हा संगमरवरी दगडात बांधण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने 8 गुप्त मार्गही आहेत. 
     
    13) स्कॉटलंडचे संसद भवन 
     
     
    1) वास्तुविशारद एनरिक मिरालस यांनी स्कॉटलंडच्या संसद भवनाचा आराखडा तयार केला होता. आराखडा तयार होताच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आराखड्यात कोणताही बदल न करता त्याप्रमाणेच संसदेचं बांधकाम करण्यात आलं होतं.
    2) 1999 ते 2004 या कालावधीत बांधण्यात आलेली ही संसद वादाच्या भोवर्‍यात अडकली होती. या इमारतीच्या उभारणीसाठी प्रचंड पैसे खर्च करण्यात आले होते.  
    3) अनेक इमारतींचा समावेश असलेल्या या संसदेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व इमारती या वेगवेगळ्या आहेत. बाहेर आणि आत इतक्या वेगवेगळ्या आहेत की एकाच देशाची संसद आहे असंही वाटणार नाही. 

    प्रश्‍नमंजुषा (73)
    1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) जर्मनीच्या संसदेचं नाव बुंडेस्टॅग असे आहे.
    ब) नेदरलँडस (हॉलंड) या देशाचे संसदभवन द बिन्नेनहोफ जगात सर्वात जुने आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) सध्याच्या  भारतीय संसद भवनाचे डिझाइन कोणत्या वास्तूसारखे आहे ?
    1) वॉशिंग्टन डीसी येथील पँटागॉन इमारत 
    2) दि ग्रेट हॉल ऑफ द पीपल ऑफ चायना 
    3) मध्य प्रदेशच्या मुरैना येथील चौसठ योगिनी मंदिर
    4) ब्रिटनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर 
     
    3) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (वास्तुविशारद )      स्तंभ ब (कार्य )
    अ. जोफ्री बावा I.    भारताचे संसदभवन
    ब. लुईस कन्हने II.   श्रीलंकेचे संसदभवन
    क. एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर III.   जर्मनीचे संसदभवन
    ड. नॉर्मन फॉस्टर IV.   बांगला देशाचे संसदभवन
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II IV I III
    (3) III II I I
    (4) II IV I III
     
    4) जगात पहिल्यांदा कोणत्या वर्षी पहिल्या महिला खासदाराने तिच्या देशाच्या संसदेत (फिनलंड) मतदान केले होते?
    1) 1920
    2) 1905
    3) 1907
    4) 1921
     
    5) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : दुसर्‍या महायुद्धानंतर जपानमध्ये टोक्यो टॉवरच्या बांधकामातून हजारो कामगारांना रोजगार मिळाला.
    कारण (र) : जेव्हा देश आर्थिक संकटामध्ये असतो तेव्हा मोठया प्रकल्पांची उभारणी केल्यास अर्थव्यवस्थांना उभारी येते.
    पर्यायी उत्तरे :
    (1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    6) बांगला देशाच्या संसदेची इमारतीची कल्पना या किल्ल्यावरून सुचली होती ?
    1) स्कॉटलंडच्या 
    2) बकिंगहॅमच्या
    3) जंजीराच्या
    4) अटकेच्या
     
    7) 1919 च्या ‘गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट’मुळे  .....
    अ) सर्वसामान्य भारतीय प्रजेला व्यापक लोकप्रतिनिधित्व मिळाले.
    ब) प्रांतामध्ये द्विदल सभागृहाची वैधानिक तरतूद झाली. 
    क) केंद्रामध्ये द्विदल सभागृहाची वैधानिक तरतूद झाली.
    ड) कायदेमंडळाच्या इमारतीसाठी तरतूद करण्यात आली.
    पर्यायी उत्तरे :
    1) ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  फक्त क बरोबर
     
    8) भारताच्या पार्लमेंटसाठी स्वतंत्र इमारत असावी, याविषयी पहिल्यांदा कधी मागणी करण्यात आली होती ?
    1) 1912
    2) 1919
    3) 1921
    4) 1927
    9) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि यूएसए हे जगातील मोठे लोकशाही देश म्हणून ओळखले जातात, 
    कारण (र) : तेथील लोकशाहीमागे संसदेच्या इमारतींचेही योगदान आहे.
    पर्यायी उत्तरे :
    (1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    10) भारतीय वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत तयार होणारे नवे संसदभवन  काय म्हणून ओळखले जाणार आहे ?
    1)  हमारी संसद (अवर पार्लमेण्ट) 
    2)  संसद भवन  (पार्लमेण्ट हाऊस) 
    3)  लोक संसद (पीपल्स पार्लमेण्ट) 
    4) जन संसद (पब्लिक पार्लमेण्ट) 
     
    11) बिटिश संसद पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) चार्ल्स बेरी आणि अगस्तस वेल्बि पुगिन यांनी या संसदेचं डिझाइन केलं होतं. 
    ब) गॉथिक स्थापत्य शैलीचा अद्भुत असा नमुना म्हणून याकडे पाहिलं जातं. 
    क) ते जगातील सर्वच संसदेचं मूळ मानलं जातं.
    ड) 1987 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्याचा समावेश केला. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
     
    12) ऑस्ट्रेलियाची सध्याची पार्लमेण्ट इमारत कॅनबेरा या शहरात आहे ?
    1) मेलबोर्न 
    2) कॅनबेरा 
    3) ब्रिस्बेन
    4) सिडने
     
    13) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (देश) स्तंभ ब (संसद भवनाचे नाव)
    अ. हॉलंड I. द बिन्नेनहोफ 
    ब. युएसए II. कॅपिटल
    क. फ्रान्स III. लग्जमबर्ग पॅलेस 
    ड. इटली IV. पलाज्जो मडामा 
    पर्यायी उत्तरे ः
    (1) I III IV II
    (2) II IV II III
    (3) I II III IV
    (4) IV III I II
     
    14) ब्राझीलची संसद इमारत स्वातंत्र्यानंतर सुमारे 70 वर्षांनी 1960 मध्ये बांधली गेली, तिचे नाव काय ?
    1)  पार्लमेंट  इमारत 
    2)  ग्रेट हॉल ऑफ ब्राझील
    3)  नॅशनल  काँग्रेस बिल्डिंग
    4) रिओ नॅशनल हाऊस
     
    15) नवी दिल्लीतील ल्युटियन्स परिसरातील कोणत्या इमारतींचे डिझाईन एडविन ल्युटियन्स या ब्रिटिश आर्किटेक्टने तयार केले होते ?
    अ) भारताची संसद
    ब) सेंट्रल सेक्रेटेरिएट
    क) राष्ट्रपती भवन
    ड) इंडिया गेट
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    16) कोणत्या कंपनीला सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प संसद भवन उभारण्याचे कंत्राट मिळाले ?
    1) एचसीपी डिझाइन्स
    2) लार्सन अँड टूब्रो
    3) शापुरजी पालनजी
    4) टाटा प्रोजेक्ट लिमिटेड
     
    17) दिल्लीतील राजपथच्या दोन्ही बाजूंच्या भागाला सेंट्रल व्हिस्टा म्हणतात. या परिसरामध्ये  कोणत्या इमारतींचा   समावेश होतो ?
    अ) निर्माण भवन, जवाहरलाल भवन
    ब) इंदिरा गांधी कला केंद्र
    क) राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल आर्काईव्हज
    ड)  बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस
    इ)  संसद भावन 
    फ) राष्ट्रपती भवन 
    ग) नॉर्थ व साऊथ ब्लॉक
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    18) ब्रिटनमधील पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टरच्या आवारात खालीलपैकी कोणता टॉवर नाही ?
    1) हाउस ऑफ कॉमन्स टॉवर
    2) हाउस ऑफ लॉर्डस टॉवर
    3) एलिझाबेथ टॉवर
    4) न्यू पॅलेस  टॉवर
     
    19) सेंट्रल व्हिस्टासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) सप्टेंबर 2019 मध्ये नवे संसद भवन बांधण्याच्या ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाची घोषणा झाली.
    ब) 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचा कोनशिला समारंभ झाला.
    क) 2022 साली 75 व्या स्वातंत्र्यदिनी नव्या संसद भवनातून संसदेचे कामकाज होणे अपेक्षित आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त ब आणि क
    4) अ, ब आणि क
     
    20) भारतीय संसद भवनासा शताब्दी महोत्सव कधी साजरा होईल ?
    1) 1912
    2) 1921
    3) 1929
    4) 1935
     
    21) .खालील विधाने विचारात घ्या:
    a)  1927 मध्ये भारताच्या ‘पार्लमेण्ट हाऊस’ मध्ये असलेल्या तीन सभागृहांना चेम्बर ऑफ प्रिन्सेस, स्टेट कौन्सिल आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली असे म्हटले जात असे. 
    b)  1947 पासून काळात भारताच्या ‘पार्लमेण्ट हाऊस’ मध्ये असलेल्या तीन सभागृहांना लायब्ररी हॉल (सेंट्रल हॉल), राज्यसभा आणि लोकसभा म्हणून ओळखतात.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (73)
    1-3
     
    2-3
     
    3-4
     
    4-3
     
    5-2
     
    6-1
     
    7-4
     
    8-1
     
    9-2
     
    10-3
     
    11-4
     
    12-2
     
    13-3
     
    14-3
     
    15-1
     
    16-4
     
    17-1
     
    18-2
     
    19-3
     
    20-2
     
    21-3

Share this story

Total Shares : 2 Total Views : 565