सामान्यज्ञान / प्रश्नमंजुषा (70)
- 27 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 770 Views
- 0 Shares
सामान्यज्ञान
22 डिसेंबर : राष्ट्रीय गणित दिन
महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी झाला होता. त्यांचा जन्मदिवस गणित दिन म्हणून साजरा केला जातो. 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी या महान गणितज्ञाचे आकस्मिक निधन झाले.
• त्यांनी गणितीय विश्लेषण आणि संख्या पद्धतीच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले. त्यांनी प्रतिभा व जिद्दीच्या जोरावर गणितीय सिद्धांताचा शोध लावत भारताची मान जगभरात उंचावली.
• विलक्षण प्रतिभेच्या आधारे रामानुजन यांनी आपल्या अल्प जीवनात 3884 गणितातील प्रमेये आणि सिद्धांतांचा संग्रह केला. त्यांनी सहज ज्ञान व बीजगणितावरील अद्वितीय प्रभुत्वाच्या आधारे या क्षेत्रात मोठे योगदान दिले.
• त्यांनी मॉक थीटा फंक्शनचा शोध लावला होता. याचा उपयोग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आरोग्य क्षेत्रात कॅन्सरवरील उपचारासाठी केला जातो.
• आध्यात्मिक विचार न मिळणार्या गणिताच्या सूत्रांना काही अर्थ नसतो, असे रामानुजन मानत होते.
• गणित क्षेत्रात होणार्या संशोधन कार्यासाठी रामानुजन जर्नलची स्थापना करण्यात आली आहे.
• केम्ब्रिज विद्यापीठात जगविख्यात प्राध्यापक जी. एच. हार्डी यांच्या संपर्कात आल्यानंतर रामानुजन यांना मोठी संधी मिळाली. त्यांनी प्रा. शेषू अय्यर यांच्या माध्यमातून आपले सिद्धांत आणि सूत्रांची काही शोधपत्रे प्रा. जी. एच. हार्डींना पाठवली. त्याने प्रभावित होऊन हार्डी यांनी त्यांचे काही अनुत्तरित प्रश्न रामानुजन यांच्याकडे पाठवले. रामानुजन यांनी अत्यंत सहजरीत्या या प्रश्नांची उत्तरे दिली. हार्डींनी रामानुजन यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात येण्याचे निमंत्रण दिले. रामानुजन यांनी तेथे हार्डींसोबत अनेक शोध लावले.
• फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते. तसेच ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते प्रथम भारतीय ठरले.
• प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यानंतर ते मद्रास विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
• रामानुजन यांनी मॅथेमॅटिकल अॅनालिसिस, इन्फिनाइट सिरीज, नंबर थिअरी व कॉन्टिन्यूड फ्रेक्सन्समध्ये अतुलनीय योगदान दिले. त्यामुळे या चारही विषयांना नवीन दिशा मिळाली.
23 डिसेंबर : राष्ट्रीय किसान दिन
• भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस 23 डिसेंबर हा ’राष्ट्रीय किसान दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील शेतकर्यांच्या हितासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.
15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन
• महिला शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने 2017 पासून 15 ऑक्टोबर हा दिवस ’राष्ट्रीय महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरविले.
29 ऑगस्ट : शेतकरी दिन
• पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट ’शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यासाठी त्यांचे नातू आणि तत्कालीन राज्य सरकारमधील कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
1 जून : कृषी दिन
हरितक्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जून हा ’कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
25 डिसेंबर : मनुस्मृती दहन दिन, भारतीय स्त्रीमुक्ती दिन
25 डिसेंबर 1927 मध्ये महाड सत्याग्रहाच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. 1990 च्या दशकापर्यंत 25 डिसेंबर हा दिवस फुले आंबेडकरी चळवळीने ‘मनुस्मृती दहन दिन’ म्हणून साजरा करीत जातीव्यवस्था निर्मूलनाची ही एक प्रतीकात्मक सांस्कृतिक मोहीम मानली होती.
• 1990 च्या दशकात कॉम्रेड शरद पाटलांनी अब्राह्मणी स्त्रीवादी मांडणीचा उद्घोष केला होता. जागतिकीकरणाच्या बदलत्या माहौलात मनुस्मृती दहनाच्या ऐतिहासिक कृतीचे स्त्रीवादी पैलू अधिक प्रकर्षाने प्रकाशझोतात आले. नव्वदीनंतर दलित स्त्रीवादाची चर्चा अकादमिक पातळीवर चर्चा सुरू झाली.
• 1994 मध्ये महाराष्ट्रात भारिप-बहुजन महासंघाने महिला आघाडी बळकट करण्यासाठी बहुजन महिला परिषद संघटीत केली.
• 1995 मध्ये राष्ट्रीय स्तरावर दलित स्त्रियांच्या संघटना आकारास आल्या.
• डिसेंबर 1996 मध्ये डॉ. प्रमिला लीला संपत यांनी चंद्रपूर येथे ‘विकास वंचित दलित महिला परिषदे’त 25 डिसेंबर हा ‘मनुस्मृती दहन दिवस’ व ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. यापूर्वीच्या मनुस्मृती दहन दिवसाच्या स्मरणाला केवळ ‘वर्ण-जातीविरोधी’ आशय प्राधान्याचे प्रतिक म्हणूनच अधिक प्रक्षेपित केले गेले होते. 1996 च्या या प्रस्तावाने त्याची ‘वर्ण-जातीबद्द स्त्रीवादी’ जाणीव अधिक टोकदार झाली.
• 1970 च्या दशकातील मुख्यप्रवाही स्त्रीवाद हा प्रामुख्याने दावा व समाजवादी स्त्रीवाद राहिल्याने त्याने जातीप्रश्नाची दाखल न घेतल्यामुळे तो पांढरपेशा व उच्चजातीय राहिला. त्यावर पाश्चात्य स्त्रीवादाचा उसना प्रभाव होता. त्यांनी 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी दिवस स्वीकारला होता. ह्या मुख्यप्रवाही स्त्रीवादाचा प्रतिवाद फुले आंबेडकरी स्त्री चळवळीने करून जाती पितृसत्तेच्या ब्राह्मणी विचारसरणीच्या आधाराला लक्ष्य केले. तसेच दलित स्त्रियांना या स्त्रीवादी चळवळीने नेतृत्त्वाची संधी कशी दिली नाही याची मीमांसा केली.
• मनुस्मृती ही जातींची व स्त्रियांची गुलामगिरी कायम ठेवणारी कायदेसंहिता आहे. ब्राह्मणी धर्मशास्त्रामध्ये मनुस्मृतीचे मध्यवर्तीत्त्व अद्याप टिकून आहे. जातीव्यवस्था समर्थक कोणत्याही ब्राह्मणी ग्रंथांमध्ये मनुस्मृतीच्या किंवा त्यातील आशयाप्रमाणे स्रियांना आणि शूद्रातिशूद्र जातीजमातींना नियंत्रित करण्याचा भाग आहे. या ग्रंथात स्त्रिया आणि शूद्रांना सारखेच मानले आहे. दोघांनाही हीन व अपवित्र मानले आहे. जातीरचनेत सर्व स्त्रिया उतरंडीनुसार वेगवेगळ्या जातींच्या कप्प्यात बंदिस्त राहिल्याने विभागलेल्या आणि जातिगत उच्च-नीच दर्जा व कल्पनेमुळे त्या सर्व एकसमान पातळीवर शोषित आहेत, असे म्हणता येत नाही आणि तसे वास्तवही नाही.
• फुले-आंबेडकरवादी विचारप्रणालीने जाती स्त्रीदास्याचे निदान करून ते नष्ट करण्यासाठी लढे दिले. हे 1970 च्या दशकात भारतात आलेल्या पांढरपेशा स्त्रीवादीच्या एकांगी मार्गावर नेमके बोट ठेवले. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीवादी मांडणीलाही पुढे आणले आहे. जातीय श्रेणीबद्दता आणि तिचा पाया बनलेली स्त्रियांची गुलामगिरी याचे अनन्यसाधारण वैचारिक दिग्दर्शन बाबासाहेबांनी केले आहे.
• राज्यघटना निर्माण केल्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिलाची लढाई उभी करून मनूच्या जातीय व स्त्री-पुरुष विषमतेच्या आधाराला समूळ उखडून टाकण्याचा एकाकीपणे जोरकस प्रयास केला. 25 डिसेंबरच्या ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिना’च्या प्रतीकात्मक मोहिमेने जातीवर्ग व्यवस्थाक पुरुषसत्तेची चर्चा पुढे आणली जाते. मुख्यप्रवाही स्त्रीवादाच्या वर्गीय आणि जातीय म्हणजे ब्राह्मणी आधारावर उभ्या राहिलेल्या स्त्रीवादाच्या मर्यादा चिकित्सकपणे मांडण्याचा अवकाश तयार होतो.
2020 मध्ये सर्वाधिक ट्वीट झालेले पाच सिनेमे
2020 मध्ये करोनाच्या महासाथीमुळे टाळेबंदी होऊन बरेच सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित झाले. ट्वीटरने त्यापैकी कोणत्या पाच सिनेमांबद्दल सर्वाधिक ट्वीट केलं गेलं त्याची यादी प्रसिद्ध केली -
• दिल बेचारा -
1) मुकेश छाब्रिया दिग्दर्शित, सुशांत सिंग राजपूत तसंच संजना सांघी अभिनित ‘दिल बेचारा’ या सिनेमाबद्दल 2020 मध्ये सर्वाधिक वेळा ट्वीट केलं गेलं.
2) जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित या सिनेमाबद्दल सर्वाधिक ट्वीट झाले कारण 14 जूनला सुशांत सिंग राजपूतने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती.
3) त्याचा हा शेवटचा चित्रपट तेव्हा पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यावर होता. सिनेमागृहे बंद असल्यामुळे तो हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. सुशांतवरच्या प्रेमापोटी, त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा सिनेमा सर्वाधिक लोकांनी बघितला.
• छपाक -
1) 2020 या वर्षात सर्वाधिक ट्वीट झालेला दुसरा सिनेमा म्हणजे ‘छपाक’. एकतर्फी प्रेमातून मुलींवर होणारे अॅसिड हल्ले असा गंभीर विषय असलेला हा सिनेमा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता.
2) सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सुमारात दिल्लीत जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. त्याला आपला पाठिंबा देण्यासाठी दीपिका पदुकोण दिल्लीत जेएनयूमध्ये पोहोचली आणि लगेच ट्वीटरवर एकीकडे तिला पाठिंबा देणार्यांचं तर दुसरीकडे बॉयकॉट छपाक म्हणणार्यांचं उधाण आलं.
3) समीक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं असलं, ट्वीटरवर ट्रेण्डिंग असला तरी तो रसिकांना सिनेमागृहात खेचून आणू शकला नाही.
• तानाजी : द अनसंग वॉरियर -
1) ‘छपाक’ला सिनेमागृहांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही, त्याच काळात अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या ऐतिहासिक सिनेमाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
2) ‘सिनेमाचं राजकारण करणं धोकादायक आहे तसंच सिनेमा खर्या इतिहासाचं चित्रण करत नसतो’ या सैफ अली खानच्या विधानामुळे ‘तानाजी’वरून बरीच चर्चाही झाली. तो ट्वीटरचर्चित तिसर्या क्रमांकाचा सिनेमा ठरला.
• थप्पड -
1) ट्वीटरचर्चित तिसर्या क्रमांकाचा सिनेमा - अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड. तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या या नायिकाप्रधान सिनेमाने पतीपत्नीच्या नातेसंबंधातील राजकारणाची चर्चा घडवून आणली.
• गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल -
2) ट्वीटरवर चर्चा झालेला गेल्या वर्षभरातील पाचव्या क्रमांकाचा सिनेमा होता, ‘गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल’.
3) भारतीय वायुदलातील महिला अधिकारी गुंजन सक्सेना यांच्यावरील या बायोपीकमध्ये जान्हवी कपूरने मुख्य भूमिका केली होती. या सिनेमात वायुदलामधले अधिकारी स्त्रीद्वेष्टे दाखवण्यात आल्यामुळे बरीच नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
4) सिनेमावर बंदी आणण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.
सांताक्लॉज
आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप व अमेरिका या पाचही खंडांमध्ये युरोप हा सर्वात जास्त थंड खंड. तेथे हिवाळ्यात दिवस संध्याकाळी पाचच्या आतच मावळतो. थंडीच्या दिवसात सर्वत्र बर्फच बर्फ साचते, पडते, मुरते. त्यामुळे लोकांना संध्याकाळी घराबाहेर पडणे फार मुश्कील ठरते. अशा बिकट जागी दिवसभराचे कामकाज आटोपणे, मित्रमंडळींसह गप्पागोष्टी मारणे, विचारांची देवाणघेवाण करणे, वस्तूंची ने-आण करणे इ. कामे पुरी करणे, कमी वेळात कठीण होऊन जायचे. लोक शेकोटी पेटवून दांड़याला जुने कपडे गुंडाळून, त्याचे काकडे बनवून दिवा-बत्तीची आरास लावून कामे करत. कसे तरी करून स्वत:ला सक्रिय ठेवत. त्याच्यातूनच सर्वसाधारणपणे इ.स. चौथ्या शतकात बाळ येशूच्या जयंतीच्या रूपाने सांताक्लॉजची कल्पना रुजली, चालू झाली. तीच रूढी, परंपरा जगाच्या कानाकोपर्यात पसरली आहे.
• 1870 साली अमेरिकेत प्रथमच ख्रिसमसला राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली. खाऊ-खेळणीची दुकाने थाटली. रंगीबेरंगी दिवे, स्टार झळकले. पताकांच्या माळा लागल्या. आकाशी फटाके गरजले. त्यांने मुलाबाळांत सांताक्लॉजचे आकर्षण वाढले. केकसारखे गोडधोड सुरू झाले.
• ‘ख्रिसमस ट्री’ला ख्रिसमस काळात नटवून थटवून त्याभोवती रोषणाई करून नाचायचे, कारण ते एकमेव झाड बर्फाच्छादित कडाक्यात हिरवे गार राहते. युरोपातील इतर झाडे थंडीत हतबलता स्वीकारून पानगळ सोडून देतात.
• 6 डिसेंबरला येणार्या संत निकोलस याच्या सणाची आठवण सांताक्लॉज हे नाव करून देते. त्या दिवसापासून सांताक्लॉज गावभर फिरून बाळयेशूची पूर्वतयारी करू लागतो. सिंटर क्लास या डच नावावरून ते तयार झाले. संत निकोलसशी सांता खूप जुळतामिळता आहे. संत निकोलसचा कनवाळू स्वभाव सांताक्लॉजसारखाच दयाळू, प्रेमाळू, मनमिळाऊ होता. गोरगरीब बालकांचे ते कैवारी. अबलांना विशेष करून निराश्रित स्त्रियांना ते प्रेमाने समजून घ्यायचे. त्यांना काही तरी नेऊन द्यायचे.
• थॉमस नॅस्ट या प्रसिद्ध चित्रकाराने, जनसामान्यांतली सांताक्लॉजची कळवळ्याची प्रतिमा टिकविण्यासाठी पहिला सांताक्लॉज बनविताना फार मोठी मेहनत घेतली.
• 1870 साली प्रथमच प्रख्यात कवी क्लेमेंट मूर यांच्या कवितेतील सांताचे हुबेहूब चित्र थॉमस नॅस्ट यांने साकारले. त्याची लोकप्रियता त्यामधून सर्वत्र वाढत गेली.
• लाल रंगाचा ड्रेस घातलेल्या सांताक्लॉजचे सध्याचे रुप कोला कंपनीची देण आहे.
1934 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी कोका-कोलाने प्रसिद्धीसाठी सांताक्लॉजला कंपनीच्या लोगोशी जुळता लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि पांढरी दाढी लावली होती. तेव्हापासून सांताक्लॉज अशाचप्रकारे आपल्याला दिसतो आहे. मूळ सांताक्लॉज अतिशय सोप्या पद्धतीने होता.
• सुरुवातीची अनेक शतके येशूचा वाढदिवस 6 जानेवारी रोजी साजरा केला जाई -
1) ख्रिसमस 25 डिसेंबरला असो की 6 जानेवारीला, बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कोणत्याही तारखेचा उल्लेख नाही. सुरुवातीला ख्रिस्त समुदायामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाबद्दल मतभेद होते.
2) 360 च्या आसपास रोमच्या एका चर्चमध्ये ईसा मसीहच्या वाढदिवसाच्या पहिला उत्सव साजरा केला होता. चौथ्या शतकात 25 डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून घोषित करण्यात आला.
3) 1836 मध्ये अमेरिकेत ख्रिसमसला कायदेशीर मान्यता मिळाली आणि 25 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.
4) कझाकिस्तान, रशिया, यु्क्रेन, इजिप्त या देशांमध्ये आजही 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जात नाही. अर्मेनियन अॅपोस्टोलिक चर्च 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा करतात. तर रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला मानणारे 7 जानेवारी रोजी ख्रिसमस साजरा करतात.
• वृत्तपत्रात छापलेल्या फोटोमुळे ख्रिसमस ट्री ची परंपरा सुरु -
1) जर्मनीत मार्टिन ल्यूथर यांनी बर्फाने माखलेल्या झाडापासून प्रेरित होऊन पहिल्यांदा ख्रिसमस ट्री सजवला होता. चीड आणि फर चे झाड असते ख्रिसमस ट्री.
2) 1846 मध्ये जर्मनीचे राजकुमार अल्बर्ट यांना ख्रिसमस एक ट्री चांगली वाटल्याने त्यांनी ते झाड आपल्या पत्नीस (इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया) भेट म्हणून दिले. राजकुमार अल्बर्ट यांच्या पत्नीचा ख्रिसमस ट्री सोबतचा फोटो लंडन न्यूजमध्ये छापला आणि व्हायरल झाला. तेव्हापासून ख्रिसमस ट्रीच्या परंपरेला सुरुवात झाली.
3) पोलंडमध्ये कोळीला (किटक) संपन्नता आणि चांगल्याचे प्रतिक मानले जाते. येथे ख्रिसमस ट्री वर प्रतिकात्मक कोळी आणि त्याचे जाळे सजवले जाते.
4) 6 ते 8 वर्षांत तयार होते एक ख्रिसमस ट्री
5) 1850 पासून अमेरिकेत ख्रिसमस ट्री च्या विक्रीला सुरुवात झाली.
6) सर्वात मोठा तरंगता ख्रिसमस ट्री ब्राझीलच्या रियो डि जेनेरियो शहरात आहे. त्याची उंची 278 फूट आहे.
7) युरोपात दरवर्षी सुमारे 5 कोटी, तर अमेरिकेत 3.5 कोटी ख्रिसमस ट्री सजवले जातात.
• जिंगल बेल हे एक आभार गीत होते -
1) जेम्स लॉर्ड पिअरपोंट यांनी चर्चच्या कॉन्सर्टसाठी एक आभार गीत जिंगल बेल लिहिले होते.
2) 1857 मध्ये हे गीत रिपब्लिश केले आणि ख्रिसमसच्या दिवशी गायले जाणारे सर्वात लोकप्रिय गीत बनले.
• भारतात ख्रिश्चन लोकांनी केरळमध्ये ठेवले होते पहिले पाऊल
1) भारतात ख्रिश्चन धर्माची सुरुवात केरळच्या क्रांगानोर येथून झाली होती.
2) येशूचे 12 प्रमुख शिष्यांपैकी एक संत थॉमस 52 सालामध्ये केरळच्या कोडुन्गल्लुर येथे आले होते.
3) भारतात आल्यानंतर संत थॉमस यांनी 7 चर्चची स्थापना केली होती.
पुस्तके व ग्रंथ
टू द एजेस ऑफ द अर्थ : एडवर्ड जे. लार्सन
लेखक एडवर्ड जे. लार्सन यांचे ’टू द एजेस ऑफ द अर्थ’ हे पुस्तक पृथ्वीचे ध्रुव पादाक्रांत करण्याच्या विविध मोहिमांचे वर्णन करते. 1909 सालच्या तीन साहसी शोधमोहिमा हा या पुस्तकाचा मध्यवर्ती विषय आहे.
1) उत्तर ध्रुव मोहीम - अमेरिकेचा रॉबर्ट पिअरी (नेतृत्त्व)
2) दक्षिण ध्रुव अमोहीम - ग्रेट ब्रिटनचा अर्नेस्ट शॅकल्टन
3) काराकोरम पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर ’के2’ मोहीम - इटलीचा राजकुमार लुईजी आमेडेओ
• या तिन्हींपैकी फक्त पिअरीचा चमू पूर्ण यशस्वी झाला. शॅकल्टनच्या मोहिमेवरच्या एका चमूला चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधता आला, पण स्वतः शॅकल्टन ज्या चमूसोबत पायपीट करत होता त्याला मात्र भौगोलिक दक्षिण ध्रुवापासून काही अंतरापर्यंतच पोहोचता आलं. ड्यूकच्या चमूला देखील खराब हवामानामुळे मोहीम आटोपती घ्यावी लागली.
• 1909 च्या आधी रॉबर्ट पिअरीने तीनवेळा उत्तर ध्रुव गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 1909 साली वयाच्या 52 व्या वर्षी त्याने नव्या उमेदीने उत्तर ध्रुवावर स्वारी केली. रॉबर्ट पिअरीची फ्रेडरिक कूकसोबत उत्तर ध्रुव गाठण्यासाठीची चढाओढ, न्यूयॉर्क टाईम्स आणि न्यूयॉर्क हेराल्ड या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांनी अनुक्रमे पिअरी आणि कूकची बाजू उचलून धरणे, पिअरीच्या ध्रुवीय स्वारीचे वृत्त ’एक्सलुझिव्हली’ देण्यासाठी न्यूयॉर्क टाईम्सने केलेला महागडा करार यावर या पुस्तकात भाष्य आहे.
• दक्षिण ध्रुवाच्या मोहिमेचा सेनापती शॅकल्टननेही 1909 पूर्वी रॉबर्ट स्कॉटसोबत दक्षिण ध्रुवीय मोहिमेचा अनुभव घेतला होता. तेव्हा दक्षिण ध्रुव गाठता आला नसला तरी त्यांच्या चमूने सर्वाधिक दक्षिणेकडे जाण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. शॅकल्टनच्या मोहिमेअंतर्गत त्याच्या सहकार्यांनी हिमनद्यांचे प्रवाह, हिमस्फटिकांची रचना, चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास केला.
• ड्यूक आमेडेओ याने दर्यावर्दी आणि गिर्यारोहक अशी दुहेरी ओळख निर्माण केली होती. 1900 सालच्या उत्तर ध्रुवाच्या मोहिमेचा तो नेता होता. अतीव थंडीमुळे दोन बोटं गमवावी लागल्याने तो स्वतः त्या मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाऊ शकला नाही तरी त्याचा सोबती कॅप्टन कॅगनीने उत्तरेकडे जाण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. ड्यूकने 1892 पासून गिर्यारोहणाचे धडे गिरवत युरोपमधली गिरिशिखरं सर केली होती.
द प्रेसिडेंशिअल ईअर्स : प्रणव मुखर्जी
’द प्रेसिडेंशिअल ईअर्स’ हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळावर लिहिलेले पुस्तक आहे. त्याच्या प्रकाशनावर त्यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी आक्षेप घेतला. सदर पुस्तकातला जो भाग प्रसिद्ध करण्यात आला त्यामागे राजकीय हेतू असल्याचा अभिजीत मुखर्जी यांचा आरोप आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भावाचा आक्षेप खोडून काढला.
• 31 ऑगस्ट रोजी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. कोव्हिड संसर्ग झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल असताना त्यांच्यावर ब्रेन सर्जरी करण्यात आली.
• हे पुस्तक पुढच्या 2021 मध्ये प्रकाशित होणार आहे. 11 डिसेंबर 2020 रोजी या पुस्तकाचे प्रकाशक रूपा बुक्सने या पुस्तकातला काही भाग प्रसिद्ध केला. आपली राष्ट्रपती पदावर नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंह सरकार वाचवण्यात व्यग्र झाले आणि त्यामुळे काँग्रेसनं राजकीय दिशा गमावल्याचं मुखर्जी यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.
• 2017 साली प्रणव मुखर्जी यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ देण्यात आला होता.
• 2012 साली राष्ट्रपतीपदी नियुक्ती होण्याआधी प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसच्या जवळपास सर्वच सरकारांमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं. मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात काँग्रेसच्या 2014 च्या निवडणुकीतील पराभवाचं विश्र्लेषण केलं आहे. या पुस्तकात मुखर्जी यांनी नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यकाळ निरंकुश असल्याचं म्हटलं आहे.
• 2004 साली सोनिया गांधी यांनी पतंप्रधान होण्यास नकार दिला होता. त्यावेळी त्या प्रणव मुखर्जी यांनाच पंतप्रधानपद देऊ करतील, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, सोनिया गांधी यांनी मनमोहन सिंह यांची निवड केली. पुस्तकात प्रणव मुखर्जी लिहितात, 2004 साली मी पंतप्रधान असतो तर काँग्रेस 2014 ची निवडणूक हरली नसती, असं पक्षातील काही नेत्यांना वाटायचं. मात्र, मी या मताशी सहम नाही. मला वाटतं माझी राष्ट्रपती पदी नियुक्ती केल्यानंतर काँग्रेसने राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी काँग्रेसला नीट हँडल करू शकत नव्हत्या. दुसरीकडे मनमोहन सिंह सभागृहात नसायचे आणि त्यांचा खासदारांशी असलेला संपर्क तुटला होता.
• 1982 साली मनमोहन सिंह यांची इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्या नियुक्ती पत्रावर अर्थमंत्री या नात्याने प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली होती. मनमोहन सिंह यांनी कधीकाळी प्रणव मुखर्जी यांच्या हाताखाली काम केलं होतं.
वाजपेयी - द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया : लेखक शक्ती सिन्हा
अटल बिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा यांनी लिहिलेले ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
• शक्ती सिन्हा सध्या एमएस विद्यापीठ, बडोदे येथे अटलबिहारी वाजपेयी पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनपुस्तक ल स्टडीजचे मानद संचालक आहेत.
• भारत पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी कारगिल युद्धादरम्यान वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांच्याशी पाचवेळा चर्चा केली होती. अटल बिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा यांचं पुस्तक ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ यामध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आला. कारगिल युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अंधारात ठेवलं होतं, असं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांचं म्हणणं होतं.
प्रश्नमंजुषा (70)
1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) अमेरिकेचा ’लीजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार मिळवणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान आहेत.
ब) ’लीजन ऑफ मेरिट’ हा पुरस्कार कुठल्याही सरकारच्या प्रमुखाला वैशिष्ट़यपूर्ण कामगिरीसाठी दिला जातो.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
2) एकतर्फी प्रेमातून मुलींवर होणारे अॅसिड हल्ले असा गंभीर विषय असलेला कोणता सिनेमा मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता ?
1) दिल बेचारा
2) थप्पड
3) छपाक
4) गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल
3) खालील जोड्या अचूक जुळवा '
स्तंभ अ (पदनाम) स्तंभ ब (व्यक्ती)
अ. भारताचे राजदूत I. रॉबर्ट ओब्रायन
ब. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार II. स्कॉट मॉरिसन
क. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान III. शिन्झो अॅबे
ड. जपानचे माजी पंतप्रधान IV. तरणजित सिंग संधू
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) IV I III II
3) III II IV I
4) IV I II III
4) भारतातील ख्रिश्चन समुदाय संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) येशूचे 12 प्रमुख शिष्यांपैकी एक संत थॉमस इस 52 सालामध्ये केरळच्या कोडुन्गल्लुर येथे आले होते.
ब) पोर्तुगीजांनी भारतात प्रॉटेस्टंट पंथांची सुरुवात केली.
क) भारतात ख्रिश्चन धर्माची सुरुवात केरळच्या क्रांगानोर येथून झाली होती.
ड) भारतात आल्यानंतर संत थॉमस यांनी 10 चर्चची स्थापना केली होती.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
5) जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपट ओळखा :
1) दिल बेचारा
2) थप्पड
3) छपाक
4) गुंजन सक्सेना : द कारगील गर्ल
6) माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कारकीर्दीतील घटनानुसारचा योग्य क्रम लावा.
अ) काँग्रेस पक्षातून बाहेर पडून नवीन पक्ष स्थापन केला.
ब) भारताच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती
क) भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ’भारतरत्न’ देण्यात आला
ड) अर्थमंत्री या नात्याने मनमोहन सिंह यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती केली.
पर्यायी उत्तरे :
1) ड - अ - ब - क
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) ड - ब - अ - क
7) खालील विधाने विचारात घ्या:
a) चीड आणि फर चे झाड ख्रिसमस ट्री म्हणून ओळखले जाते.
b) जगातील सर्वात मोठा तरंगता ख्रिसमस ट्री ब्राझीलच्या रियो डि जेनेरियो शहरात आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
8) ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून 25 डिसेंबर हा ‘मनुस्मृती दहनाचा दिवस’च साजरा करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला होता ?
1) कॉम्रेड शरद पाटील
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) डॉ. प्रमिला लीला संपत
4) केंद्रीय महिला व बालविकास खाते
9) लेखक एडवर्ड जे. लार्सन यांचे ’टू द एजेस ऑफ द अर्थ’ हे पुस्तक कोणत्या मोहिमांचे वर्णन करते ?
अ) काराकोरम पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर ’के2’ मोहीम - इटलीचा राजकुमार लुईजी आमेडेओ
ब) हिमालय पर्वतरांगेतले सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट मोहीम - एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे
क) उत्तर ध्रुव मोहीम - अमेरिकेचा रॉबर्ट पिअरी (नेतृत्त्व)
ड) दक्षिण ध्रुव अमोहीम - ग्रेट ब्रिटनचा अर्नेस्ट शॅकल्टन
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
10) खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतीय स्त्रीमुक्ती दिन साजरा केला जातो ?
1) 8 मार्च
2) 25 डिसेंबर
3) 3 जानेवारी
4) 8 सप्टेंबर
11) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे. त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : 25 डिसेंबर 1927 मध्ये महाड सत्याग्रहाच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.
कारण (र) : मनुस्मृती ही जातींची व स्त्रियांची गुलामगिरी कायम ठेवणारी कायदेसंहिता आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
12) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या सन्मानाबाबत खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (वर्ष) स्तंभ ब (बहुमान)
अ. 2016 I. स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान (बहारीन)
ब. 2018 II. ग्रँड कलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाइन अवॉर्ड (पॅलेस्टाइन )
क. 2019 II. ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू (रशिया)
ड. 2020 IV. लीजन ऑफ मेरिट (अमेरिका)
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) I II III IV
3) III II IV I
4) IV I II III
13) श्रीनिवास रामानुजन अय्यंगार यांच्या संदर्भात अचूक विधाने शोधा :
अ) त्यांनी गणितातील 4000 प्रमेये आणि सिद्धांतांचा संग्रह केला.
ब) फेलो ऑफ रॉयल सोसायटीचे सदस्यत्व मिळणारे ते पहिले कृष्णवर्णीय होते.
क) ट्रनिटी कॉलेजची फेलोशिप मिळवणारे ते प्रथम भारतीय ठरले.
ड) त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात प्रा. जी. एच. हार्डी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
14) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
1) 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन
2) 23 डिसेंबर : राष्ट्रीय किसान दिन
3) 29 ऑगस्ट : शेतकरी दिन
4) 10 जुलै : कृषी दिन
15) रामानुजन यांनी गणिताच्या या क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिले.
अ) कॉन्टिन्यूड फ्रेक्सन्स
ब) कॅलक्युलस
क) नंबर थिअरी
ड) इंटिग्रेशन व मॅट्रिक्स
इ) इन्फिनाइट सिरीज
फ) मॅथेमॅटिकल अॅनालिसिस
ग) मॉक थीटा फंक्शन
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) ब आणि ड वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
16) सांताक्लॉज ही व्यक्तीरेखा मूळ कोणत्या संतांच्या कार्यावर आधारित आहे ?
1) थॉमस नॅस्ट
2) क्लेमेंट मूर
3) सिंटर क्लास
4) संत निकोलस
17) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (चित्रपट) स्तंभ ब (दिग्दर्शक)
अ. थप्पड I. मुकेश छाब्रिया
ब. छपाक II. शरण शर्मा
क. दिल बेचारा III. अनुभव सिन्हा
ड. गुंजन सक्सेना: द कारगील गर्ल IV. मेघना गुलजार
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III IV I II
4) IV III I II
उत्तरे : प्रश्नमंजुषा (70)
1-2
2-3
3-4
4-4
5-1
6-1
7-3
8-3
9-2
10-2
11-1
12-2
13-2
14-4
15-3
16-4
17-3