क्रीडा क्षेत्र / प्रश्‍नमंजुषा (67)

  • क्रीडा क्षेत्र / प्रश्‍नमंजुषा (67)

    क्रीडा क्षेत्र / प्रश्‍नमंजुषा (67)

    • 25 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 1197 Views
    • 0 Shares

    क्रीडा विश्‍व 2020

            2020 या वर्षात कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठिस धरले. त्याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. क्रीडा विश्‍वही त्याला अपवाद ठरले नाही. ऑलिम्पिक 2020, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया कप यासह अनेक क्रिकेट, फुटबॉल, टेनिस लीग स्थगित कराव्या लागल्या. फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांनी चाहत्यांचा निरोप घेतला.  
     
    बलबिरग सिंग सीनियर (1923 -2020) - 
     
     
    • भारताचे दिग्गज हॉकीपटू बलबिर सिंग डोसांज यांनी 1948 लंडन, 1952 हेल्सींकी आणि 1956 मेलबर्न अशा तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आणि तीनही वेळेस सुवर्णपदक जिंकले. त्यांनी तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण 22 गोल्स केले. 1952 च्या सुवर्णपदकाच्या सामन्यात नेदरलँडविरुद्धच्या 6-1 अशा विजयात बलबिर यांनी 5 गोल्स केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक 5 वैयक्तिक गोलचा विक्रम हा त्यांच्याच नावावर आहे. 1957 मध्ये पद्मश्री पुरस्कार जिंकणारे ते पहिले खेळाडू ठरले. 25 मे 2020 रोजी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
     
    चुनी गोस्वामी (1938-2020) -
     
     
    ••  भारताचे दिग्गज फुटबॉलपटू चुनी गोस्वामी यांनी 1960च्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले. 30 सामन्यांत त्यांनी 9 गोल केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं. 1962 मध्ये आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या भारतीय संघाचे त्यांनी नेतृत्व सांभाळले होते आणि 1964 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील संघानं आशिया कप स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 30 एप्रिलला वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
     
    राजिंदर गोएल (1942-2020) - 
     
    •• भारताचे महान फिरकीपटू राजिंदर गोएल यांचे या वर्षी निधन झाले. रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 637 विकेट्सचा विक्रम आजही त्यांच्या नावावर आहे. 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
     
    चेतन चौहान ( 1947-2020) -
     
     
    ••  चेतन चौहान यांचे वयाच्या 73व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57 च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्षे डीडीसीएचे उपाध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. 1981 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले.  
     
    दिएगो मॅराडोना (1960-2020) -
     
     
    •• अर्जेंटिनाचे माजी दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. 1986 साली आपल्या बहारदार खेळाने अर्जेंटिनाला विश्‍वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचे नाव फुटबॉलविश्‍वात प्रसिद्ध झाले. मॅरेडोनाने बोका ज्युनियर्स, नेपोली आणि बासिर्लोना या प्रख्यात संघांशिवाय अन्य संघाकडूनही खेळ केला. इंग्लंडविरुद्ध 1986 साली झालेल्या स्पर्धेतील गोल फुटबॉलविश्‍व कधीही विसरू शकणार नाही. याच गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ असे संबोधले जाते. त्याच सामन्यात त्यांनी 4 मिनिटानंतर सुरेख गोल नोंदविला होता. फिफाने या गोलला फुटबॉल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोल संबोधले होते.
     
    डीन जोन्स (1961-2020) -
     
     
    •• ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू डीन जोन्स यांचे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यांनी वन डे क्रिकेटमध्ये 6068 धावा केल्या, तर 52 कसोटीत 11 शतकांसह 3631 धावा केल्या. ते 59 वर्षांचे होते.
     
    कोब ब्रायंट (1978 - 2020) - 
     
     
    •• जगभरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन - एनबीए-चे कोर्ट मायकेल जॉर्डन, मॅजीक जॉन्सन, लॅरी बर्ड आदींनी 1990 चे दशक गाजवले. यांच्याबरोबरच कोब ब्रायंटने 1996 ते 2016 अशी 20 वर्षे कोर्ट गाजवलं. 26 जानेवारी 2020 ला हेलिकॉप्टर अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यासह त्याच्या 13 वर्षीय मुलगी गिएना हिचाही या अपघातात मृत्यू झाला. 
     
    2020 वर्षात निवृत्त झालेले क्रिकेटपटू 
     1) मोहम्मद आमिर -
     
      
    पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमिरने अचानक निवृत्ती जाहीर केली. 28 वर्षीय गोलंदाजानं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. आमीरने 30 कसोटी त 119 विकेट्, 61 वन डेत 81 आणि 50 ट्वेंटी-20 त 59 विकेट्स घेतल्या आहेत.
    2) इरफान पठाण -
     
     
    भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यानेही जानेवारी 2020 मध्ये निवृत्ती जाहीर केली. त्यानं 120 वन डे, 29 कसोटी व 24 ट्वेंटी-20 सामने खेळला आहे. त्यानं कारकिर्दीत एकूण 301 विकेट्स घेतल्या आहेत. तर 1 शतक व 11 अर्धशतकांसह 2821 धावा केल्या आहेत.
     
    3) महेंद्रसिंग धोनी  -
     
     
    भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा 2019 पासून सुरू होती. 15 ऑगस्ट 2020  रोजी त्यानं निवृत्ती जाहीर केली. 2007 चा ट्वेंटी-20, 2011 चा वन डे आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार म्हणून धोनी ओळखला जातो. 16 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये धोनीनं 350 वन डेत 10733 धावा केल्या आहेत. 90 कसोटींमध्ये 38.09च्या सरासरीने 4876 धावा आणि 98 ट्वेंटी-20त 1617 धावा त्याच्या नावावर आहेत.
     
    4) सुरेश रैना -
     
     
    महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेतलेल्या दिवशीच 33 वर्षीय सुरेश रैना यानंही निवृत्तीची घोषणा केली. 17 जुलै 2018 साली इंग्लंडविरुद्ध रैना शेवटची वन डे खेळला होता. रैनाने 18 कसोटीत 768 धावा केल्या आहेत आणि यात एक शतक व 7 अर्धशतकांचा समावेश आहे. 226 वन डे त 5615 धावा नावावर असून त्यात 5 शतकं आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. 78 ट्वेंटी-20 सामन्यांत रैनाने 1605 धावा केल्यात.
     
    5) पार्थिव पटेल -
     
     
    याने 9 डिसेंबरला क्रिकेटच्या सगळ्या प्रकारातून निवृत्ती घेतली. पटेलनं 17 वर्ष आणि 153 दिवसाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 35 वर्षीय पार्थिवनं 25 कसोटी, 38 वन डे आणि दोन ट्वेंटी-20त भारताचं प्रतिनिधीत्व केलं. कसोटीत त्यानं 934 धावा, वन डेत 736 धावा केल्या आहेत. 736 रन बनवले. कसोटीत त्याच्या नावावर 62 झेल व 10 स्टम्पिंग आहेत.
     
    आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ 
     
            10 डिसेंबर 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र विधेयकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2021-21 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली होती.
    • पुणे येथे या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. 
    • खोले समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर विधीमंडळाने मान्यता दिली.
     
    आशिया खंडातील पहिला स्टेनलेस जलतरण तलाव 
     
            24 डिसेंबर 2020 - औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्रातील सेंटर ऑफ एक्सलन्समधील 16 कोटी खर्चून तयार झालेल्या स्टेनलेस जलतरण तलावाचे उद्घाटन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉकीच्या अ‍ॅस्ट्रो टर्फ मैदानाचेही उद्घाटन झाले.
    • औरंगाबाद साई केंद्रात भारतातील व आशिया खंडातील पहिला स्टेनलेस स्टीलचा जलतरण तलाव तयार करण्यात आला. हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा 20 बाय 50 मीटरचा तलाव आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या कंपनीने तलाव तयार केला होता, त्याच विदेशी कंपनीने हा तलाव बनवला.
    • साईत मराठवाड्यातील पहिले अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानात तयार करण्यात आले. हे टर्फ बनवण्यासाठी 5.30 कोटी रुपये खर्च आला. हे ब्लू टर्फ असून देशात केवळ चार ठिकाणी अशाप्रकारचे टर्फ आहेत. 
     
    मल्लखांब खेळाला क्रीडा मंत्रालयाची मान्यता
     
     
         20  डिसेंबर 2020 - केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने 4 स्वदेशी खेळांना अधिकृत मान्यता दिली-
    1) मल्लखांब
    2) गटका
    3) कलरीपायूट्टू 
    4) थांत-ता 
    •• हरयाणा येथे 2021 मध्ये होणार्‍या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत या चार खेळांचाही समावेश असेल.
    1) कलरीपायूट्टू हा खेळ प्रामुख्याने केरळमध्ये खेळला जातो.
    2) मल्लखांब हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसहित संपूर्ण भारतात खेळला जातो. 
    3) गटका पंजाबमध्ये खेळला जातो.
    4) थांग-ता हा मणिपूर मार्शल-आर्टवर आधारित आहे.
     
    फॉर्म्युला टू रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर
     
     
            बहारीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये भारताच्या 22 वर्षीय जेहान दारुवाला यानं इतिहास रचला. त्यांने फार्मुला टू रेस जिंकली. अशी कामगिरी करणारा - फॉर्म्युला टू रेस जिंकणारा तो पहिला भारतीय ड्राइव्हर  पहिला भारतीय ठरला.
    •• ही शर्यत त्यांने फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांना मागे टाकले. 
    •• दुसर्‍या क्रमांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त 3.5 सेकंदाचं अंतर होतं. 
    •• 2019 चा विजेता टिकटुम तिसर्‍या क्रमांकावर राहिला.
     
    विश्‍वचषक बॉक्सिंग स्पर्धा 
     
            19 डिसेंबर 2020 - भारताने जर्मनीच्या कोलोन येथे झालेल्या बॉक्सिंग विश्‍वचषक स्पर्धेत 3 सुवर्ण,  2 रौप्य आणि 4 कांस्य पदके मिळवली. भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले.  या स्पर्धेत यजमान जर्मनीशिवाय भारत, बेल्जियम, क्रोएशिया, डेन्मार्क, फ्रान्स, मालडोवा, नेदरलँड, पोलंड आणि युक्रेनच्या बॉक्सर्सनी भाग घेतला होता.
    • सुवर्ण पदक : सिमरनजित कौर (57 किलो), मनीषा मौन (57 किलो) व अमित पंघाल (52 किलो) 
    • रौप्य पदक : सतीश कुमार (91 किलोहून अधिक)
    • कांस्य पदक : सोनिया लाठेर (57 किलो), पूजा रानी (75 किलो), गौरव सोलंकी (57 किलो) आणि मोहम्मद हसमुद्दीन (57 किलो) 
     
    फिडे ऑनलाइन जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा
     
            24 डिसेंबर 2020 - भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरिन, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी आणि डी. गुकेश यांनी फिडे ऑनलाइन जागतिक युवा आणि कॅडेट जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली.
    • निहाल (एलो 2620) याने अर्मेनियाचा ग्रँडमास्टर शांत सर्गस्यान याचा 18 वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत 1.5-0.5 असा पराभव केला.
    • रक्षिताने मुलींच्या 16 वर्षांखालील गटात चीनच्या साँग युक्सिन हिच्यावर 1.5-0.5 अशी सरशी साधली. गुकेशने मुलांच्या 14 वर्षांखालील गटात वोलोडार मुरझिन याचा 2-1 असा पाडाव करत जेतेपद पटकावले.
     
    ला-लीगा फुटबॉल : मेसीचा विक्रमी गोल
     
     
            24  डिसेंबर 2020 - बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सी याने एका क्लबतर्फे सर्वाधिक गोल रचण्याचा महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडीत काढला. 
    •• बार्सिलोनातर्फे सर्वाधिक 644 गोल झळकावण्याचा मान मेस्सीने मिळवला. मेस्सीने व्हॅलाडॉलिडविरुद्ध तिसरा गोल लगावत हा विक्रम केला. त्याच्या कामगिरीमुळे बार्सिलोनाने व्हॅलाडॉलिडचा 3-0 असा पराभव करत ला-लीगा फुटबॉलमध्ये पाचव्या स्थानी मजल मारली. 
    •• 21 डिसेंबर रोजी, ला-लीगा फुटबॉलमध्ये व्हॅलेंसिया संघाविरुद्ध सामन्यात मेस्सीने पेले यांच्या सर्वाधिक 643 गोलच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. 
    •• 2004 साली बार्सिलोनाकडून पदार्पण करणार्‍या मेस्सीने 643 वा गोल साजरा केला. 
    •• पेले यांनी 1957 ते 1974 दरम्यान सांतोस संघासाठी 643 गोल लगावले होते. 
    •• मेस्सी हा बार्सिलोना आणि ला-लीगा फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणारा एकमेव फुटबॉलपटू ठरला.
     
    फिफाचे बहुमान 2019-20
     
     
            18 डिसेंबर, 2020 - विविध देशांच्या फुटबॉल संघांचे कर्णधार, प्रशिक्षक, निवडक पत्रकार व चाहत्यांच्या मतदानांच्या आधारावर फिफाने विविध बहुमानासाठी खेळाडूंची निवड केली. फिफाने स्वित्झर्लंंडच्या ज्युरिक येथे व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले, पण फिफाचे अध्यक्ष जियान्नी इनफांटिनो पुरस्कार प्रदान करण्यासाठी म्युनिच येथे उपस्थित होते.
    •• रॉबर्ट लेवानडोस्की फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू -
    1) लियोनेल मेस्सी व ख्रिस्टियानो रोनाल्डो यांचे वर्चस्व मोडीत काढताना बायर्न म्युनिचचा सुपरस्टार स्ट्रायकर असलेला पोलंडचा रॉबर्ट लेवांडोवस्की 2020 चा फिफा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू पुरस्काराचा मानकरी ठरला. ऑनलाइन फिफा पुरस्कार सोहळ्यात लेवानडोस्कीला 52 मते मिळाली. रोनाल्डोला 38 व मेस्सीला 35 मते मिळवता आली. 
    2) 2008 नंतर मेस्सी व रोनाल्डो यांच्या व्यतिरिक्त फक्त दोघांना हा पुरस्कार मिळाला आहे. 2018 मध्ये क्रोएशियाच्या लुका मोडरिचने हा पुरस्कार पटकावला होता.
    3) 2008 नंतर हा पुरस्कार पटकावणारा लेवांडोवस्की स्पेनच्या कुठल्या क्लबचा पहिला खेळाडू ठरला. 2008 मध्ये रोनाल्डोने मॅन्चेस्टर युनायटेडचा खेळाडू म्हणून हा पुरस्कार पटकावला होता.
    4) लेवानडोस्कीला गतसत्रात 47 सामन्यांत 55 गोल करतान 10 गोल करण्यासाठी हातभार लावला. तो बुंदेसलिगा, जर्मन कप व चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक गोल करणारा ठरला.
    5) 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली तेव्हापासून बायर्न म्युनिखच्या एकाही खेळाडूला हा पुरस्कार पटकावता आला नाही. फ्रेंक रिबेरी 2013 मध्ये आणि मॅन्युअल नूयेर 2014 मध्ये तिसर्‍या स्थानी राहिले होते.
     
    • जुर्गेन क्लोप बेस्ट कोच

    1) लिव्हरपूलचे जर्गेन क्लोप यांनी सलग दुसर्‍यांदा सर्वोत्तम प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकावला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने 30 वर्षांत प्रथमच प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली. 

    2) 53 वर्षीय क्लोप यांनी म्युनिचचे हेन्सी फ्लिक व लीड्सच्या मार्सेलो बिल्सा यांना मागे टाकले.

     

    • मॅन्युअल नेऊर उत्कृष्ट गोलरक्षक -

    1) जर्मन क्लब बायर्न म्युनिचचा मॅन्युअल नेऊर उत्कृष्ट गोलरक्षक ठरला. जर्मनीच्या नेऊरने 33 सामन्यांत 31 गोल केेले. 
    2) त्यांनी अ‍ॅथलेटिको माद्रिदच्या जेन ओबलेक व लिव्हरपूलच्या एलिसन बेकरला पराभूत केले.
     
    • सोन हियुंग मिनचा उत्कृष्ट गोल 

    1) टॉटेनहमच्या सोन हियुंग मिनच्या गोलला उत्कृष्ट गोलचा पुरस्कार देण्यात आला.

    2) त्याने गतवर्षी बर्नलेविरुद्ध शांतपणे गोल केला होता. तो बॉक्समधून चेंडू घेऊन गेला व एकट्यानेच गोल केला.
     
    • लुसी ब्रांझ सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू

    1) मँचेस्टर सिटीची डिफेंडर लुसी ब्राँझ सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू ठरली. 

    2) 29 वर्षीय ब्राँझ, हा पुरस्कार जिंकणारी इंग्लंडची पहिली महिला ठरली. 
    3) तिने डेन्मार्कची हेर्डर व फ्रान्सच्या वेंडी रेनार्डला मागे सोडले. 
    4) लियोनसह चॅम्पियन्स लीगसोबत जुळलेली लुसी सध्या मॅन्चेस्टर सिटतर्फे खेळते. 

    • सर्वोत्कृष्ट महिला कोच  हॉलंडच्या सेरिना विएगमॅन -

    1) नेदरलँडला 2019 मध्ये विश्‍वविजेतेपद पटकावून देणार्‍या सरीना विएगमॅनला सर्वश्रेष्ठ महिला प्रशिक्षकाचा पुरस्कार मिळाला. 

    • सर्वोत्कृष्ट महिला गोलरक्षक -  फ्रान्सची सारा बोहादी 

     


    एटीपी टेनिस पुरस्कार 2020 
     
            23 डिसेंबर 2020- 2020 सालचे एटीपी पुरस्कार जाहीर झाले.
    1) सर्बियाचा जोकोव्हिच 2020 मध्ये अव्वल मानांकित खेळाडू ठरला. हा पुरस्कार त्यांने 6 व्यांदा पटकाविला 2020 मध्ये त्यांने विक्रमी आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन किताबासह एकूण 4 किताब जिंकले. 
    2) स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर एकेरी गटात प्रशंसकांचा सर्वात आवडता खेळाडू ठरला. त्याची सलग 18 वेळा या पुरस्कारासाठी निवड झाली. 2020 मध्ये तो फ्क्त 6 एकेरी सामने खेळला.
    3) मॅट पाविच आणि ब्रूनो सोरेस यांची जोडी (अमेरिकन ओपन चॅम्पियन) दुहेरीत अव्वल स्थानी
    4) स्पेनच्या राफेल नदालने सलग तिसर्‍यांदा आणि एकूण चौथ्यांदा ‘स्टिफन एडबर्ग खेल भावना पुरस्कार’ मिळवला.  त्याचा हा एकूणातील 13 वा किताब होता.
    5) रशियाच्या आंद्रे रूबलेवने पाच किताब जिंकत टूरवर रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा केली. तो 23 व्या स्थानावरून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानी पोहोचला. 
    6) फ्रान्सिस तियाफोईला सामाजिक कार्यासाठी ‘आर्थर अ‍ॅश मानवता पुरस्कार’ देण्यात आला.
    7) स्पेनच्या कार्लोस अलकारेजला वर्षातील ‘उदयोन्मुख खेळाडू’ (17 वर्षीय) म्हणून पुरस्कार देण्यात आला. 2020 मध्ये त्याने तीन चॅलेंजर किताब जिंकले. 
    8) वासेक पोसपिसील 2019 मध्ये पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर सर्वश्रेष्ठ पुनरागमन करणारा खेळाडू ठरला. कॅनडाचा हा खेळाडू 2019 मध्ये 150 व्या क्रमवारीवर होता, सध्या तो 61 व्या स्थानी आहे. 

    बॉक्सिंग डे कसोटी 
     
     
            ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर प्रत्येक वर्षी 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन केले जाते. ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवशी सुरू होणार्‍या या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हणातात. बॉक्सिंग डे कसोटीचा बॉक्सिंग खेळाशी काही संबंध नाही. जगभरातील अनेक देशात ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवस जेव्हा लोकं मित्र आणि नातेवाइकांना भेटतात तेव्हा बॉक्समध्ये काही गिफ्ट देतात. त्यामुळे या दिवसाचे नाव ख्रिसमस बॉक्सवरून दिले गेले.  अशाप्रकारे  भारत आणि ऑस्ट्रेलियात 26 डिसेंबर 2020 ला सुरु झालेला दुसरा क्रिकेट कसोटी सामना हा बॉक्सिंग डे कसोटी म्हणून ओळखला गेला.
    • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व कॅनडा या राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवसाला बॉक्सिंग डे असे म्हटले जाते. 
    • बॉक्सिंग डे कसोटी फक्त ऑस्ट्रेलियाच नव्हे, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेतही खेळवली जाते.
    • 1913 मध्ये जोहान्सबर्ग येथे  इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ’बॉक्सिंग डे टेस्ट मॅच’ची सुरुवात झाली होती. पण दुसरा ’बॉक्सिंग डे’ कसोटी सामना त्यानंतर 48 वर्षांनी खेळवण्यात आला होता.  
    • बॉक्सिंग डे - इंग्लंडमध्ये ख्रिसमस दरम्यान एकमेकास दिलेल्या भेटीला ख्रिसमस बॉक्स म्हणतात. 25 डिसेंबर रोजी तिथल्या रिवाजाप्रमाणे बड्या असामी आपल्या कर्मचार्‍यांना ख्रिसमसची भेट बॉक्समध्ये देतात. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 26 डिसेंबर रोजी परंपरेप्रमाणे सगळे कर्मचारी सुटीच्या दिवशी तो ख्रिसमस बॉक्स घेऊन घरी जातात व कुटुंबियांना मालकानं दिलेला ख्रिसमस बॉक्स किंवा भेटवस्तू देतात. त्यामुळे 26 डिसेंबर या दिवसाला तो भेटीचा बॉक्स घरच्यांना देण्याचा दिवस म्हणजे बॉक्सिंग डे असं नाव पडले. ऑस्ट्रेलिया हा ब्रिटनच्या वसाहतीचा देश असल्यामुळे तिथंही ही प्रथा रूजली. 

    • 128 वर्ष जुनी परंपरा -

    1) बॉक्सिंग डे आणि क्रिकेट यांचा 128 वर्ष जुना इतिहास आहे. 1892 साली शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेचा एक सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर झाला. यात व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्स यांच्यात ख्रिसमसच्या दरम्यान क्रिकेट सामना खेळवण्याची सुरूवात झाली. मेलबर्नमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना 1950 मध्ये झाला. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला. ती मॅच 22 डिसेंबर रोजी झाली होती. पण हळूहळू बॉक्सिंग डे क्रिकेटचा भाग झाला. 

    2) 1950-51 च्या अ‍ॅशेस क्रिकेट  मालिकेतील मेलबर्न कसोटी 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत झाली, त्यावेळी बॉक्सिंग डे मधल्या दिवशी होता. त्यामुळे 26 डिसेंबरच्या आजुबाजुला कधीही सामना सुरू झाला तरी त्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हंटले जाऊ लागले. 26 डिसेंबर हा त्या कसोटी सामन्यात आला की ते पुरेसं असायचं. त्यानंतर 1974-75 मध्ये अ‍ॅशेस मालिकेत 26 डिसेंबर पासून तिसरी कसोटी खेळवण्यात आली. आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डेच्या (26 डिसेंबर) दिवशी कसोटी सुरू करण्याची प्रथा पडली. 1980 मध्ये  मेलबर्नवर दरवर्षी 26 डिसेंबर, बॉक्सिंग डेच्या दिवशी कसोटीची सुरूवात करण्याचा करार करण्यात आला.
    3) मेलबर्नमध्ये 1980 च्या आधी फक्त चार (1952, 1968, 1974 आणि 1975) बॉक्सिंग डे सामने झाले होते.
    4) अ‍ॅडिलेड येथे 1967, 1972 आणि 1976 साली बॉक्सिंग डे सामने झाले. 
    5) 1975 साली वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत लक्षात आले की बॉक्सिंग डे कसोटी मॅच मोठी होऊ शकते. ती मॅच पाहण्यासाठी 85 हजार प्रेक्षक आले होते. त्यानंतर बॉक्सिंग डे दिवशी कसोटी मॅच सुरू करण्याची परंपरा सुरू झाली. 

    अजिंक्य रहाणे
     
     
            बॉर्डर-गावसकर चषकातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर नियमीत कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्याने उर्वरीत 3 कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता.
    • 2014 पासून विराट कोहली भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. तेव्हापासून त्यानं 56 कसोटी सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. आतापर्यंत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत तिसर्‍यांदा रहाणेला नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पूर्वीच्या दोन्ही सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवला होता.
    • मार्च 2017 मध्ये विराट कोहलीला दुखपात झाल्यामुळे अंजिक्य रहाणेनं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. हा सामना भारतीय संघानं 8 गड्यांनी जिंकला होता.
    • जून 2018 मध्ये अफगाणिस्तान विरोधातील एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेनं संघाचं नेतृत्व केलं होतं. कसोटी सामन्यात पदार्पण करणार्‍या अफगाणिस्तान संघाचा भारतानं डाव आणि 262 धावांनी पराभव केला होता. 2 दिवसांत सामन्याचा निकाल लागला होता.
     
    डे-नाईट (पिंक बॉल) क्रिकेट टेस्ट
     
     
            2020 च्या शेवटी ऑस्ट्रेलियाचा संघ आठवेळा पिंक बॉल टेस्ट (डे-नाईट टेस्ट) खेळला असून त्या आठही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत  वर्चस्व राखलं आहे.
    1) पहिली डे-नाईट टेस्ट अ‍ॅडलेड इथल्या अ‍ॅडलेड ओव्हल इथे झाली होती. ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, पर्थ इथे डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. 
    2) 2019 मध्ये टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध पिंक बॉल टेस्ट जिंकली होती. ही टीम इंडियाने खेळलेली पहिली पिंक बॉल टेस्ट होती. दुसर्‍या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतास पराभूत केले.
    3) डे-नाईट टेस्ट दुपारी 1 ते 1.30 च्या बेतात सुरू होते. दोन तासानंतर 20 मिनिटांचं चहापानाचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांच्या खेळानंतर सपर म्हणजेच रात्रीच्या भोजनाचं 40 मिनिटांचं सत्र असतं. त्यानंतर दोन तासांचा खेळ होतो आणि साधारण 9 ते 9.30च्या बेतात खेळ थांबतो. 90 ओव्हर्सचा खेळ होणं अपेक्षित असतेे.
    4) भारतात पहिली डे-नाईट वनडे 1984 मध्ये झाली होती.
    5) पहिली डे-नाईट रणजी मॅच ग्वाल्हेर इथं 1996-97 मध्ये झाली होती.
    6) पहिली पिंक बॉल मॅच 2016 मध्ये कॅब सुपर लीग स्पर्धेची फायनल झाली होती. 
     
    • पिंक बॉलचे गुणधर्म-

    1) वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये वापरल्या जाणार्‍या पांढर्‍या बॉलप्रमाणे पिंक बॉलही सपाट होतो. लाल बॉलपेक्षा पिंक बॉल हलका असतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अधिक प्रमाणात स्विंग होतो.

    2) पिंक बॉल सॉफ्ट होऊ लागतो तसा स्विंग होणं कमी होत जातं. पिंक बॉल रिव्हर्स स्विंग करणं बॉलर्सला कठीण जातं. पिंक बॉल खूप वळत नाही.
     
    • टेस्ट खेळणार्‍या विविध देशांमध्ये तीन कंपन्या बॉल पुरवतात-
    1) भारतात होणार्‍या टेस्ट मॅचेसवेळी एसजी कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. भारतातल्या पहिल्या डे-नाईट टेस्टसाठी बीसीसीआयने एसजी कंपनीलाच पिंक बॉल तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती. उत्तर प्रदेशातील मेरठस्थित एसजी कंपनीच्या फॅक्टरीत पिंक बॉलची निर्मिती होते.
    2) इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ड्यूक्स कंपनीच्या बॉलचा वापर केला जातो.
    3) अन्य टेस्ट खेळणार्‍या देशांमध्ये कुकाबुरा कंपनीने तयार केलेले बॉल वापरले जातात. 

    • लाल, पांढरा आणि गुलाबी- प्रत्येक क्रिकेट बॉल रबरने बनलेला असतो. डायचा रंग बदलतो आणि फॉरमॅटनुसार फिनिशिंग बदलतं. टेस्ट मॅचमध्ये वापरला जाणारा लाल बॉल ग्रीसमध्ये ठेऊन मग वापरण्यासाठी सज्ज होतो. जेणेकरून पाणी बॉलमधल्या लेदरमध्ये शिरू नये. 
    • डे-नाईट टेस्टसाठी वापरण्यात येणारा पिंक बॉल ग्रिसमध्ये ठेवला जाऊ शकत नाही कारण तसं केलं तर पिंक बॉलची झळाळी निघून जाते. पिंक बॉलवर गुलाबी रंगाचा अतिरिक्त मुलामा दिला जातो. जेणेकरून कृत्रिम प्रकाशात हा बॉल चमकेल. फिल्डर, बॅट्समन ,स्टेडियममधील प्रेक्षक तसंच टीव्हीवर मॅच पाहणारे चाहते यांना हा चेंडू नीट दिसत राहतो. 
     
    भारत -ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट
     
     
            18 डिसेंबर 2020 - अ‍ॅडलेडमध्ये खेळलेल्या डे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला. भारताने दुसर्‍या डावात 9 गडी बाद 36 धावा केल्या होत्या. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त होऊन रिटायर झाला. भारताचा एकही फलंदाज दोन आकडी धावा काढून शकला नाही. भारताला पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाचा वेगवाग गोलंदाज जोश हेजलवुडने सर्वाधिक 5 आणि पॅट कमिन्सने 4 गडी बाद केले.
    • याआधी भारतीय टीमचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावसंख्या 42 होती. 1974 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध केली होती.
    • 96 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा रेकॉर्ड (36 धावा) केला होता.
     
    धावसंख्येचा उच्चांक आणि नीचांक
    •• 19 डिसेंबर 2016 - चेपॉकच्या खेळपट्टीवर भारताने इंग्लंडविरुद्ध 7 बाद 759 असे धावसंख्येचे शीखर उभे करीत 1 डाव आणि 75 धावांनी विजय मिळवला. करुण नायरच्या नाबाद 303 धावांच्या संस्मरणीय खेळीने सुवर्णाध्याय लिहिला. विराट कोहली त्यावेळी कर्णधार होता.
    •• 19 डिसेंबर 2020 - अ‍ॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या डावात 53 धावांची आघाडी घेऊनही दुसर्‍या डावात फक्त 36 धावांत कोसळला. अडीच दिवसांत पहिली कसोटी भारताने 8 गडयांनी गमावली.  विराट कोहली यावेळीही कर्णधार होता.
     
    भारतीय क्रिकेट संघाची विदेशातील कामगिरी
            टीम इंडिया 2011-20 या गेल्या 10 वर्षांत सेना (डएछअ) म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अपयशी ठरली आहे. या काळात सेना दौर्‍यात भारताने 37 सामन्यांत  फक्त 13 टक्के यश मिळाले. 
    ••• भारताला या दौर्‍यातील 73 पैकी 22 डावांत धावसंख्येचा 200 चा आकडाही गाठता आला नाही. अ‍ॅडलेड कसोटीच्या दुसर्‍याच डावात भारताने 36 धावांत गाशा गुंडाळला. 2014 मध्ये भारताचा इंग्लंडविरुद्ध सामन्यात 94 धावांवर खुर्दा उडाला होता. 
    ••• यादरम्यान भारताने एकूण 12 मालिका खेळल्या. यातील 9 मालिकेत भारताचा पराभव झाला.  
    ••• भारतीय संघाला 2020 च्या सत्रात एकाही कसोटीत विजय संपादन करता आला नाही. त्यामुळे भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेश अडचणीचा ठरला. भारताचा संघ गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर आहे. त्यामुळे हे स्थान कायम ठेवण्याचे मोठे आव्हान टीमसमोर आहे.
    ••• भारताच्या तुलनेत पाक व श्रीलंकेला विदेश दौर्‍यावर उल्लेखनीय कामगिरी करता आली. पाकने सर्वाधिक 17 आणि श्रीलंकेने 15 टक्के विजय नोंदवले.

    ••• देशांतर्गत स्पर्धेत भारतात 38 संघ -
    •• आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील क्रिकेटच्या सुविधा अधिक व नियोजन पद्धत चांगल्या आहेत. देशातील 38 संघांची एलिट व प्लेट गटात विभागणी केली गेली आहे.. प्रथम श्रेणी, एकदिवसीय व टी-20 तिन्ही क्रिकेटमध्ये सर्व संघांना संधी मिळते. 
     
    विराट कोहली
     
     
            17 डिसेंबर 2020 - ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा भारतीय कर्णधार म्हणून विराट कोहलीने विक्रम केला. त्यांने अ‍ॅडिलेड येथील दिवसरात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी 180 चेंडूंचा सामना करताना 74 धावा केल्या. 51 वर्षांनंतर विराट कोहलीनं हा विक्रम मोडला.
    • याआधी हा विक्रम माजी कर्णधार टायगर पटोदी यांच्या नावावर होता. टायगर पटोदी यांनी भारतीय संघाचं नेतृत्व करताना ऑस्ट्रेलियाविरोधात 10 डावांत 829 धावा काढल्या होत्या.
    • विराट कोहलीनं एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावां 50 वेळा काढण्याचा विक्रम केला. असा पराक्रम कराणारा विराट कोहली पाचवा भारतीय खेळाडू आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग यांनी केला.
    • ऑस्ट्रेलियातील एखाद्या मैदानावर 500 पेक्षा जास्त धावा काढणारा विराट कोहली तिसरा भारतीय खेळाडू ठरला. याआधी सचिन तेंडुलकर ( सिडनी 785 धावा) आणि लक्ष्मण (सिडनी 549) यांनी ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या मैदानावर 500 पेक्षा जास्त धावा काढल्या.
     
    पार्थिव पटेल
     
            डिसेंबर 2020  मध्ये भारतीय संघाचा विकेटकीपर पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून (कसोटी, वनडे, टी-20) संन्यास घेतला.  35 वर्षीय पार्थिवने भारताकडून 25 कसोटी, 38 वनडे आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गुजरातचे प्रतिनिधीत्व करताना 194 सामने खेळले आहेत. 
    •• त्यांने 2002 मध्ये 17 वर्षे 153 दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू होता.
    •• तो कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू होता. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, पीयूष चावला आणि एल शिवरामकृष्णन यांच्या नावावर आहे.
    •• पार्थिवने अखेरचा कसोटी सामना जानेवारी 2018 मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध जोन्हासबर्ग येथे खेळला होता.
    •• त्याने अखेरचा वनडे सामना 12 फेब्रुवारी 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेन येथे खेळला होता.
    •• पार्थिवने जानेवारी 2003 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केले होते. 
    •• त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 25 सामने खेळले आहेत. यात त्याने 934 धावा केल्या. तर वनडे करिअरमध्ये त्याने 38 सामने खेळले असून 736 धावा केल्या आहेत. पार्थिव पटेलने 2 टी-20 सामने खेळले आहेत. पार्थिव पटले तिन्ही प्रकारात एकही शतक झळकावता आले आहे.
    •• पार्थिवने 194 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. ज्यात 43.39 च्या सरासरीने 11,204 धावा केल्या आहेत. त्याने फर्स्ट क्लास मॅचमध्ये 27 शतके आणि 62 अर्धशतके केली आहेत.
    •• पार्थिव पटेल आयपीएलमध्येही विविध संघांकडून खेळला आहे. 2020 च्या दुबई येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये तो विरोट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली बंगळुरु टीमचा हिस्सा होता. काही वर्षांपासून तो समालोचन करतानाही दिसत आहे. 
     
    आयपीएल व बीसीसीआय
     
            23 डिसेंबर 2020 - अहमदाबाद येथे झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) 89व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध निर्णय घेण्यात आले.
    या बैठकीतील महत्त्वाचे ठराव -
    1) 2022 च्या हंगामात आयपीएलचे एकूण 10 संघ असतील. 2021 मध्ये आयपीएल टूर्नामेंटमध्ये 8 संघ खेळतील.
    2) सर्व पुरुष आणि महिला फर्स्ट क्लास खेळाडूंना त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली जाईल.
    3) इंटरनेशनल ओलिंपिक कमेटीसोबत क्लेरिफिकेशन नंतर 2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला सामील करण्याच्या आयसीसीच्या निर्णयाचे समर्थन 
    4) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे आयसीसीच्या बोर्डात डायरेक्टर, त्यांच्या अनुपस्थितीत सेक्रेटरी जय शाह डायरेक्टरची जबाबदारी सांभाळतील.
    5) जय शहा आयसीसीच्या चीफ एग्जीक्यूटिव मीटिंगमध्ये बीसीसीआय बोर्डाचे प्रतिनिधी.
    6) राजीव शुक्ला बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती
     
    आयपीएलमधील श्रीमंत खेळाडू
     
     
            इनसाईड स्पोर्ट्स मनी बॉलच्या वृत्तानुसार आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सनंतर सर्वात यशस्वी संघ आणि कर्णधार अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमधून 2020 पर्यंत 137 कोटींपेक्षा जास्त कोट्यवधी रुपयांची कमाई केली. या रकमेत सामनावीर, मालिकावीर व इतर बक्षिसांच्या रकमेचा समावेश नाही. 
    1) महेंद्रसिंग धोनी - धोनी 2008 सालापासून आयपीएलमध्ये चेन्नईचे नेतृत्व करत आहे. धोनी 2 वर्षांच्या काळात पुणे संघाकडून खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 15 ऑगस्टर 2020 मध्ये निवृत्ती घेतलेल्या धोनीने 2020 मध्ये युएईत पार पडलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईचे नेतृत्व केले. धोनीने 2008 ते 2010 या काळात एकाच बोलीवर चेन्नईचे नेतृत्व केल्यानंतर 2011 साली चेन्नईने धोनीच्या मानधनात वाढ करत त्याच्यासाठी 8.2 कोटी रुपये मोजले. धोनी याच बोलीवर 2013 पर्यंत चेन्नईचे नेतृत्व करत होता. बीसीसीआयने 2014 मध्ये संघमालकांना पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत वाढवून 12.5 कोटी एवढी केल्यामुळे धोनीने 2015 पर्यंत प्रत्येक हंगामात 12.5 कोटी कमावले. त्याला पुणे सुपरजाएंट संघाकडूनही तेवढेच मानधन मिळत होते.बीसीसीआयने 2018 चा हंगाम सुरु होण्याआधी पहिल्या पसंतीच्या खेळाडूला कायम राखण्यासाठीची किंमत 15 कोटी केल्यामुळे धोनीला 2018 ते 2020 हे तीन हंगाम 15 कोटींचे मानधन मिळत होते. 
    2) रोहित शर्मा- मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा या यादीमध्ये दुसर्‍या स्थानी येतो. रोहितला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना 3 कोटींचे मानधन मिळत होते. रोहितने याच बोलीवर 2008 ते 2010 या काळात डेक्कन चार्जर्सचे प्रतिनिधीत्व केले. मुंबईने 2011 साली रोहितसाठी 9.2 कोटी रुपये खर्च करत त्याला आपल्या संघात घेतले. तो याच बोलीवर 2013 पर्यंत मुंबईकडून खेळत होता. रोहित 2014 पासून धोनी एवढीच कमाई करत आहे. आतापर्यंत आयपीएलमीधल त्याची कमाई (बक्षिसांची रक्कम वगळून) 131 कोटींच्या घरात आहे. 
    3) विराट कोहली  - या यादीत 126 कोटींच्या कमाईसह तिसर्‍या स्थानावर आहे.
     
    बायोपीक
     
    ••• बुद्धिबळ जगज्जेता विश्‍वनाथन आनंद - कलर यलो प्रॉडक्शन आणि सनडायल एंटरटेनमेंट या बायोपीकची निर्मिती, दिग्दर्शक आनंद राय- दिग्दर्शक
    ••• हॉकीपटू ध्यानचंद - त्यांनी भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये हॉकीत 3 सुवर्णपदकं मिळवून देण्याबरोबरच 400 आंतरराष्ट्रीय गोल केले होते. अभिषेक चौबे - दिग्दर्शक, आरएसव्हीपी तसंच ब्ल्यू मंकी फिल्म्स या दोन कंपन्यांची निर्मिती.
    ••• सत्य साईबाबा - धार्मिक अध्यात्मिक क्षेत्रातल्या सत्य साईबाबा यांच्यावर बायोपीक येणार आहे. अनुप जलोटा - सत्य साईबाबांची भूमिका. विकी राणावत -  दिग्दर्शक 

    प्रश्‍नमंजुषा (67)
    1) खालील जोड्या अचूक जुळवा :
     स्तंभ अ (मार्शल आर्ट) स्तंभ ब (राज्य)
    अ)  कलरीपायूट्टू I.    मध्य प्रदेश
    ब)  थांत-ता II.   पंजाब
    क)  मल्लखांब III   मणिपूर
    ड)  गटका IV.   केरळ
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    2) पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती?
    1)  डॉ. भालचंद्र मुणगेकर
    2)  डॉ. विजय खोले
    3)  पंडित विद्यासागर
    4)  केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू 
     
    3) भारतात सुरु झालेल्या क्रिकेट स्पर्धेनुसारचा योग्य चढता क्रम लावा. 
    अ)  पहिली डे-नाईट रणजी मॅच
    ब)  पहिली पिंक बॉल मॅच 
    क)  पहिली टी 20 मॅच 
    ड)  पहिली डे-नाईट वनडे मॅच
    पर्यायी उत्तरे :
    1)  अ - ब - क - ड
    2)  क - अ - ड - ब
    3)  ड - अ - क - ब
    4)  ड - अ - ब - क
     
    4) बार्सिलोनाच्या लिओनेल मेस्सी याने एका क्लबतर्फे सर्वाधिक गोल रचण्याचा कोणत्या फुटबॉलपटूचा विक्रम मोडीत काढला ?
    1)  मॅराडोना
    2)  पेले
    3)  ख्रिस्तियानो रोनाल्डो
    4)  जुर्गेन क्लोप
     
    5) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ)  रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक 637 विकेट्सचा विक्रम राजिंदर गोएल त्यांच्या नावावर आहे.
    ब)  ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक 5 वैयक्तिक गोलचा विक्रम बलबिर सिंग डोसांज यांच्या नावावर आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ
    2)  फक्त ब
    3)  अ आणि ब दोन्ही
    4)  कोणतेही नाही
     
    6) खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने हॉकी सुवर्णपदक जिंकले नाही ?
    1) 1956
    2) 1960
    3) 1948
    4) 1952
     
    7) नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन -एनबीए-चे कोर्ट  गाजविणार्‍या खेळाडूंचा योग्य समूह शोधा :
    अ)  लॅरी बर्ड 
    ब)   कोब ब्रायंट 
    क)  मॅजीक जॉन्सन
    ड)   मायकेल जॉर्डन
    पर्यायी उत्तरे :
    1)  अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3)  अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    8) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलेले भारताचे पहिले खेळाडू कोण ?
    1) ध्यानचंद 
    2) सचिन तेंडुलकर 
    3) बलबिरग सिंग जुनियर 
    4) बलबिरग सिंग सीनियर 
     
    9) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) आशिया खंडातील पहिला स्टेनलेस जलतरण तलाव औरंगाबाद येथे सुरु झाला.
    ब) औरंगाबाद साई केंद्रात मराठवाड्यातील पहिले अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानात तयार करण्यात आले.
    क) महाराष्ट्रातील पहिले अ‍ॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान बालेवाडी पुणे येथे आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    10) ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज खेळाडू डीन जोन्स यांचे कोठे निधन झाले ?
    1) सिडनी
    2) मेलबोर्न
    3) मुंबई
    4) लंडन
     
    11) भारतीय क्रिकेट संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : 
    a)  पार्थिव पटेल हा  कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा भारताचा चौथा सर्वात तरुण खेळाडू होता. 
    b)   महेंद्रसिंग धोनी हा  भारताचा यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू होता.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1)  फक्त (a)
    2)  फक्त (b)
    3)  (a) व (b) दोन्ही
    4)  दोन्हीही नाहीत 
     
    12) भारतीय टीमची टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वात कमी व कमाल धावसंख्यया किती आहे (2020 पर्यंत)?
    1)  42 आणि 759
    2)  42 आणि 972
    3)  36 आणि 759
    4)  36 आणि 972
     
    13) खालील जोड्या अचूक जुळवा :
        स्तंभ अ (खेळाडू)     स्तंभ ब (माहिती)
    अ. राजिंदर गोएल I.   हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू 
    ब. चुनी गोस्वामी II.  भारताचे  फुटबॉलपटू 
    क. चेतन चौहान II.  फिरकीपटू
    ड. कोब ब्रायंट         II.  अर्जुन पुरस्कार
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    14) भारत -ऑस्ट्रेलिया दरम्यानचा बॉर्डर - गावसकर चषक कोणत्या स्वरुपाची क्रिकेट मालिका आहे ?
    1)  भारत - ऑस्ट्रेलिया टी 20 क्रिकेट मालिका
    2)  भारत - ऑस्ट्रेलिया वनडे क्रिकेट मालिका
    3)  भारत - ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिका
    4)  वरीलपैकी सर्व
     
    15) कोणत्या कंपनीने तयार केलेले बॉल जगभर क्रिकेट मॅचेसवेळी वापरले जातात ?
    अ)  ड्यूक्स कंपनी
    ब)  बेन्सन अँड हेजेस कंपनी
    क)  कुकाबुरा कंपनी
    ड)  एसजी कंपनी
    पर्यायी उत्तरे :
    1)  अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3)  अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    16) खालीलपैकी कोणते विधान बॉक्सिंग डे बाबत असत्य आहे?
    1)  मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दरवर्षी बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन केले जाते.
    2)  26 डिसेंबर या दिवसाला बॉक्सिंग डे असं नाव आहे.
    3)  ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवशी सुरू होणार्‍या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हणातात.
    4)  सर्व  राष्ट्रकुल देशांमध्ये ख्रिसमसच्या दुसर्‍या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते. 
     
    17) 2020 मध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या खेळांना अधिकृत मान्यता दिली ?
    अ)  कलरीपायूट्टू 
    ब)  थांत-ता 
    क)  मल्लखां
    ड)  गटका
    पर्यायी उत्तरे :
    1)  अ, ब आणि क बरोबर
    2)  अ, ब, क आणि ड बरोबर
    3)  अ, ब आणि ड बरोबर
    4)   अ, क आणि ड बरोबर
     
    18) खालीलपैकी कोणत्या देशात शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते ?
    1)  इंग्लंड
    2)  न्यूझीलंड 
    3)  दक्षिण आफ्रिका
    4)  ऑस्ट्रेलिया
     
    19) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : बॉक्सिंग डे कसोटी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाते.
    कारण (र) : बॉक्सिंग डे कसोटीचा बॉक्सिंग खेळाशी काहीही संबंध नाही.
    पर्यायी उत्तरे :
    (1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    20) कोठे पार पडलेली फॉर्मुला फार्मुला टू रेस जिंकल्याने अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ड्राइव्हर  पहिला भारतीय ठरला ?
    1) मोनॅको
    2) नोएडा बेद्धा सर्कीट
    3) बर्लीन
    4) बहारीन
     
    21) फिफाचे बहुमान 2019-20 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली.
    ब)  फिफा सदर पुरस्कारांचे वितरण स्वित्झर्लंंडच्या ज्युरिक येथे केले जाते.
    क) 2020 च्या फिफा सदर पुरस्कारांचे वितरण जर्मनीच्या म्युनिक येथे झाले.
    ड) रॉबर्ट लेवानडोस्की हा 2020 चा फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब, क आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    22) 2020 सालचा एटीपी अव्वल मानांकित टेनिस खेळाडू कोण आहे ?
    1)  स्वित्झर्लंडचा रॉजर फेडर
    2)  स्पेनचा राफेल नदालन
    3)  रशियाचा आंद्रे रूबलेवन
    4)  सर्बियाचा जोकोव्हिच
     
    23) फिफाचे बहुमान 2019-20 संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ)  फिफाचे अध्यक्ष जियान्नी इनफांटिनो 
    ब)  लिव्हरपूलचे जर्गेन क्लोप यांनी सलग दुसर्‍यांदा सर्वोत्तम प्रशिक्षक
    क)  रॉबर्ट लेवानडोस्की फिफाचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू
    ड)  जर्मन क्लब बायर्न म्युनिचचा मॅन्युअल नेऊर उत्कृष्ट गोलरक्षक 
    इ)  मँचेस्टर सिटीची डिफेंडर लुसी ब्राँझ सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू 
    पर्यायी उत्तरे :
    1)  वरील सर्व
    2)  ड आणि फ वगळता सर्व  
    3)  ब वगळता सर्व
    4)  ड, फ, ग वगळता सर्व
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (67)
    1-4
     
    2-2
     
    3-4
     
    4-2
     
    5-3
     
    6-2
     
    7-2
     
    8-4
     
    9-2
     
    10-3
     
    11-1
     
    12-3
     
    13-3
     
    14-3
     
    15-4
     
    16-4
     
    17-2
     
    18-4
     
    19-2
     
    20-4
     
    21-3
     
    22-4
     
    23-1

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1197