विज्ञान-तंत्रज्ञान / प्रश्नमंजुषा (65)
- 23 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 415 Views
- 0 Shares
गुरू-शनी ग्रहांची महायुती
21 डिसेंबर 2020 च्या रात्री गुरू आणि शनी या ग्रहांची अतिशय दुर्मिळ अशी युती पाहायला मिळाली. तसेच या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र होती. 397 वर्षांनी गुरू व शनी हे ग्रह एकमेकांच्या सर्वात जवळ येताना पृथ्वीवरून दिसले. सप्टेंबर 2020 पासून गुरू ग्रह शनीच्या जवळ सरकत असल्याचे दिसून येत होते. नोव्हेंबर महिन्यात ते साधारणपणे 5 अंश इतक्या जवळ आले होते. डिसेंबरच्या सुरुवातीला त्यांच्यात 2 अंश एवढे कमी अंतर असल्याचे दिसून आले. 18 डिसेंबर ते 23 डिसेंबर हा गुरू-शनी महायुती पाहण्यासाठी उत्तम कालावधी होता. जानेवारी 2021 पर्यंत ते एकत्रित असणार आहेत; परंतु सूर्यास्तानंतरच्या संधिप्रकाशामुळे त्यांना पाहण्यास अडचण येते.
• सर्व ग्रह आपापल्या कक्षेत सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हे ग्रह पृथ्वीसापेक्ष एका रेषेमध्ये येतात, म्हणजेच ते एकमेकांच्या जवळ आल्याचे पृथ्वीवरून दिसतात. जेंव्हा असे दोन ग्रह आकाशात एकमेकांच्या अगदी जवळ आल्यासारखे दिसतात तेंव्हा त्या घटनेला खगोलशास्त्रीय भाषेत युती (संयोजन) असे म्हणतात. मात्र 21 डिसेंबर रोजी दोन महाकाय ग्रहांची युती होत असल्याने याला महायुती असे म्हटले गेले.
• साधारणपणे 20 वर्षातून एकदा हे ग्रह आकाशामध्ये एकमेकांच्या जवळ येताना पाहू शकतो.
• गुरू ग्रह आणि पृथ्वीमध्ये जेवढे अंतर आहे, त्याच्या दुप्पट शनी ग्रह पृथ्वीपासून लांब आहे.
• 21 डिसेंबरला जरी दिसताना हे दोन्ही ग्रह एकत्र दिसले तरी प्रत्यक्षात गुरू पृथ्वीपासून 86 कोटी किलोमीटर, तर शनी 159 कोटी किलोमीटर अंतरावर आहे.
• 21 डिसेंबर रोजी गुरु आणि शनी हे दोन ग्रह एकमेकांच्या इतके जवळ होते की उघडया डोळ्यांनी हे वेगवेगळे न दिसता एकच असल्यासारखे वाटले. दुर्बिणीचा शोध लागल्यापासून फक्त दुसर्यांदा अशी घटना घडली.
• गुरू ग्रहाचा सुर्याभोवतीचा भ्रमणकाळ हा 11.86 वर्षे, तर शनीचा 29.5 वर्षे आहे. हे दोन्ही ग्रह सूर्याभोवती त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरत आहेत. यांच्या फिरण्याचा एकत्रित परिणाम म्हणून प्रत्येक 19 वर्षे 7 महिन्यांनी हे दोन ग्रह एकमेकांच्या जवळ असल्यासारखे दिसतात आणि युती घडते. मात्र प्रत्येक वेळी ते इतके जवळ येतीलच असे नाही, त्यामुळे ही घटना फारच दुर्मीळ असते.
• 21 डिसेंबर रोजी हे दोन ग्रह परस्परांपासून फक्त 0.1 अंश (6 मिनिट 6 आर्कसेकंद) इतक्या कमी अंतरावर होते. सप्तर्षी मधील सहावा तारा वशिष्ठ आणि त्याचा जोडीदार अरुंधती म्हणून हे दोन्ही 0.2 अंश एवढ्या अंतरावर होते. त्यापेक्षाही निम्म्या अंतरावर हे दोन ग्रह दिसले.
• वशिष्ठ व अरुंधती हे दोन तारे ज्यांना दिसतील त्यांची दृष्टी उत्तम आहे असे समजले जाते.
• यापूर्वी 16 जुलै 1623 मध्ये अशा प्रकारची महायुती पहायला मिळाली होती. त्यानंतर यावर्षी म्हणजे तब्बल 397 वर्षांनी अशी संधी चालून आलीय आणि यानंतर थेट 15 मार्च 2080 रोजी अशी महायुती पहायला मिळेल.
• ग्रहांची युती ही फक्त एक खगोलीय घटना आहे, त्याने कुणाचेही वाईट होत नाही. गुरु आणि शनी ग्रह एकमेकांच्या खूप जवळ येण्याच्या घटनेला पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस स्टार आणि द ग्रेट कंजक्शन असं म्हटलं जाते.
• थियॉलॉजिस्ट पॉल बेगली यांच्या मते अशी खगोलीय घटना ही पृथ्वीसाठी धोकादायक ठरण्याची भीती असते. बेगली यांच्या मते, पुढील 500 वर्षे गुरु आणि शनी ग्रह एकमेकांच्या जवळ येणार नाहीत. माया संस्कृतीवर विश्वास ठेवणार्यांनुसार हा दिवस हा जगाचा अंत होण्याचा दिवस आहे. माया संस्कृतीच्या कालगणनेनुसार 21 डिसेंबर 2012 हा 5,126 वर्षांच्या एका कालचक्रचा शेवट असेल असं सांगण्यात आलं होतं. कॉन्सपिरेसी थेअरी म्हणजेच कट सिद्धांत मांडणारे काही जाणकारांच्या मते या दिवशी जगाचा विनाश होणार होता.
हायाबुसा-2
डिसेंबर 2020 मध्ये हायाबुसा-2 या जपानच्या आणि चांग- 5 या चीनच्या अवकाशयानाने पृथ्वीवर अवकाशातून नमुने आणण्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या. जपानने लघुग्रहावरुन, तर चीनने चंद्रावरून नमुने गोळा केले होते. अलीकडे अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात जपान व चीन जोमाने उतरले आहेत. चीन आणि जपान, हे दोन्ही देश दुसर्या महायुद्धाच्या काळात अणुकार्यक्रमात व नंतरच्या अवकाश कार्यक्रमात नव्हते. दोघांनी साधारणतः 1980 च्या दशकानंतर आर्थिक प्रगती साधली. एकूण अंतराळ कार्यक्रमात जपानने इतर देशांच्या सहाय्याने झपाट्याने प्रगती केलेली आहे; तर चीन आपल्या स्वभावानुसार बहुतांशी स्वतःच्या बळावर अवकाश कार्यक्रम पुढे नेत आहे.
• अवकाशातील पाषाण गोळा करून आणण्याची हायाबुसा ही मोहीम जपानने आखली. या नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटनसारख्या देशांना जपानने बरोबर घेतले. सूर्यमालेच्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात हा पाषाण अलग झाला होता. त्याच्या अभ्यासामुळे सूर्यमालेची निर्मिती झालेल्या प्रक्रिया समजून घेता येतील. जपानच्या या मोहिमेमुळे सूर्यमालेच्या निर्मितीप्रक्रियेशी संबंधित काही गोष्टींवर प्रकाश पडू शकेल.
• 5 डिसेंबर 2020 रोजी जपानच्या हायाबुसा यानाने क्युगू या अवकाशपाषाणावरून नमुने आणले. द. ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटी भागात, जपानी अंतराळवाहन हायाबुसा-2 (बहिरी ससाणा) या वाहनाने क्यूगू या अवकाश पाषाणावरून पार्सल पाठवले.
• क्युगू हा पृथ्वीपासून सुमारे 29 कोटी कि.मी. अंतरावर असणारा, सुमारे 800 मीटर रुंदीचा पाषाण आहे. हा पाषाण 4.50 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेतील ग्रह, लघुग्रहांपासून सुटा झाला असावा. या पाषाणाचा हायाबुसा अवकाशवाहनाने सुमारे वर्षभर अभ्यास केला. तेथील मातीचे नमुने गोळा केले.
• असे पाषाण म्हणजे सूर्यमालिका तयार होताना विखुरलेले काही तुकडे असतात. ते काही कारणाने बाजूच्या ग्रहात किवा लघुग्रहात सामावून न गेल्यामुळे तसेच अंतराळात फिरत राहातात. नंतरही उल्केसारखे ते एखाद्या ग्रहाच्या कक्षेत खेचले जात नाहीत.
• काहींच्या मते सुरुवातीच्या काळात पृथ्वीवर आलेले पाणी अशा पाषाणांवरून आलेले होते. तरीही या पाण्यांचे पृथःकरण केले, तर ते पृथ्वीवरील पाण्यापेक्षा वेगळे असू शकेल. आजपर्यंत आपण धुमकेतूंच्या अभ्यासातून पाण्याचा शोध घेत आलो. त्यापेक्षा अशा पाषाणांकडे लक्ष द्यायला हवे, असे संशोधकांना वाटते आहे.
• हायाबुसा वाहन जसे पृथ्वीजवळ आले, तसे या वाहनातून मातीचे पार्सल पृथ्वीच्या कक्षात सोडले आणि हायाबुसा-2 त्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.
• हायाबुसाने सोडलेले पार्सल पृथ्वीच्या वातावरणात आले, त्यावेळी त्याचा वेग सुमारे 11 किमी प्रतिसेकंद इतका होता. पृथ्वीच्या वातावरणात 200 किमी उंचीवर अस्ताना झालेल्या घर्षणामुळे, एखादा अग्नीगोल पृथ्वीकडे झेपावा, तसे त्याचे दृश्य अंतराळातील काही वाहनांनी टिपले. नंतर पार्सलचे पॅराशूट उघडल्यानंतर त्याचा वेग काहीसा कमी झाला.
• वातावरणात सुमारे 10 किमी अंतरावर आल्यावर पॅराशूटचे दिवे झगमगून आपला ठावठिकाणा सांगू लागले. त्याच्या आगमनाची वर्दी लागताच ऑस्ट्रेलियन हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने ते ताब्यात घेतले. तोपर्यंत जपानचे हेलिकॉप्टरही येऊन घिरट्या घालू लागले होते. अंधारात त्यांना नेमके ठिकाण सापडेना. अखेर उजाडल्यावर त्यांना ते ठिकाण सापडले. सुमारे 16 किलो वजनाचे हे पार्सल योग्य अवस्थेत जपानच्या ताब्यात आले.
• या पार्सलबरोबरच काही वायूचे नमुने विश्लेषणासाठी आणलेले आहेत. या व्यतिरिक्त सुमारे 100 मिलिग्रॅम वजनाचे कण आहेत. आता या नमुन्यातील काही भाग ब्रिटनमधील मँचेस्टर, ग्लासगो अशा विद्यापीठांना आणि नॅचरल हिस्टरी मुझियमला संशोधनासाठी 2021 मध्ये मिळेल.
• 2011 मध्ये हायाबुसा-2ची सुरुवात झाली.
• 2014 मध्ये ते वाहन प्रत्यक्षात अंतराळात सोडले गेले.
• 2017 मध्ये वर्षानी ते क्युग्यू जवळ पोहोचले.
• 2018 फेब्रुवारी मध्ये बंदुकीच्या गोळीसारखा आघात करून त्यांने धुळीचे नमुने घेतले.
• 2018 जून मध्ये त्यांने छोटा स्फोट केला व ते परत पृथ्वीच्या दिशेने झेपावले.
• 2020 डिसेंबर मध्ये पार्सल पृथ्वीवर पोहोचवले व हायाबुशा-2 हे अंतराळवाहन पुढच्या लांबच्या प्रवासाला निघून गेले. त्याच्या प्रवासाचा पुढचा टप्पा आहे, तो एका खूप छोट्या, 30 मीटरहून कमी रुंदीच्या अंतराळ पाषाणाकडे जाण्याचा.
• 2031 मध्ये तो टप्पा गाठला जाईल
चांग-5
चंद्रावरून अभ्यासासाठी काही नमुने आणण्यासाठी चीनने चांग -5 हे अवकाशयान पाठविले होते आणि 17 डिसेंबर 2020 ला ते नमुने घेऊन यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले. चांग-5 (चीनची चंद्रदेवता) 5 या अवकाशयानाने सुमारे 2 किलो नमुने गोळा केले. अमेरिकेच्या अपोलो मोहिमेनंतर सुमारे 45 वर्षांनी चंद्रावरून हे नमुने आणले गेलेले आहेत. अपोलो मोहिमेच्या वेळी अंतराळवीरांनी स्वतःच हे नमुने आणले होते. मानवरहित यानाने दूरनियंत्रणाद्वारे आणलेले हे पहिलेच नमुने. चीनच्या या चांद्रमोहिमेमुळे चंद्र-पृथ्वीच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे.
• 23 नोव्हेंबर 2020 ला चीनने या मोहिमेची सुरुवात केली.
• 1 डिसेंबर 2020 ला चांग -5 यान चंद्रावर उतरले. उतरणार्या वाहनाने लगेच नमुने गोळा करायला सुरुवात केली.
• 3 डिसेंबर 2020 ला नमुने गोळा करून झाल्यावर वर जाणार्या वाहनाने ते चंद्रावरून उचलले व लगेच सहा मिनिटात ते कक्षेत भ्रमण करू लागले. ते भ्रमण करीत असतानाच, हे नमुने पृथ्वीवर नेण्यासाठीच्या वाहनाकडे सोपवायचे होते. त्याकरीता ते त्या वाहनाच्या समोर दोन इंचाच्या अचुकतेने आणायचे होते. मग पहिले वाहन दुसर्याची पकड मिळवणार होते. त्यानंतर अर्ध्या तासात पार्सल पोहोचवण्याचे काम पार पाडायचे होते. या घडामोडींची सर्व नियंत्रणे पृथ्वीवर होती. 3.80 लाख कि.मी.वरून हे काम होत होते. संदेशवहनात वेळेचा फरक असणार होता. प्रतिमा मिळवतानाचा वेळ आणि संदेश पाठवण्याचा, तसेच प्रत्यक्ष कृतीचा वेग व वेळ यात अंतर पडणार होते. हे काम कठीण होते. आठवडाभर चंद्राच्या कक्षेत भ्रमण झाल्यावर परतीच्या प्रवासाचे इंजिन चालू झाले.
• 17 डिसेंबर 2020 ला चांग-5 यान 113 तासांचा प्रवास करून ते चीनमध्ये त्याच्या तळावर परत आले. मात्र चांद्रयानाचा वेग, पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतरच्या वाहनाच्या आवश्यक वेगाहून जास्त असल्याने वातावरणात शिरण्यापूर्वी या यानाचा वेग कमी करावा लागला.
• चीनने मिळवलेले नमुने प्रयोगशाळांत रासायनिक पृथःकरणासाठी नेले जातील. किरणोत्सार असेल, तर तो किती आणि कोणत्या मूलद्रव्यांमुळे होतो, याचा तपास होईल. मूलद्रव्यांची वेगवेगळी कोणती समस्थानिके आहेत, हे अभ्यासले जाईल.
• चीनच्या पुढील चांद्रमोहीम : चांग 6 (2023-24), चांग- 7 (2023), चांग 8- 2027)
• 2030 नंतर मानवासहित चांद्रप्रवासाची आखणी. या यशामुळे चीनला चंद्रावर माणूस पाठवणे शक्य होणार आहे.
मार्स सॅम्पल रिटर्न (एमएसआर)
अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा मंगळावरील नुमने गोळा करून पृथ्वीवर आणण्याची तयारी करत आहे. यासाठी नासाने मार्स सॅम्पल रिटर्न (एमएसआर) मल्टी मिशन एफर्टच्या पुढील टप्प्यास मंजुरी दिली.
• जुलै 2020 मध्ये लाँच करण्यात आलेले पर्सिविरेन्स रोव्हर 18 फेबु्रवारी 2021 रोजी लाल ग्रह म्हणून ओळखण्यात येणार्या मंगळावर उतरणार आहे. कारच्या आकाराचा हा रोव्हर मंगळावरील प्राचीन सूक्ष्म जीवनाच्या संकेतांचा शोध घेणार आहे.
• लँडिंग केल्यानंतर पर्सिविरेन्स रोवर आपल्या रोबोटिक हातांच्या मदतीने मंगळावरील तुटलेले दगड आणि धूळ गोळा करणार आहे. हे नमुने एका ट्यूबमध्ये गोळा करेल. हे रोवर मंगळावरील नमुने दुसर्या निर्धारित ठिकाणीही गोळा करू शकते. एमएसआरच्या पुढील चरणात रोव्हरने गोळा केलेले नमुने लँडरपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यानंतर रोबोटिक आर्म हे रोव्हरने गोळा केलेल्या नमुन्यांना मार्स एसेंट व्हेईकलमध्ये बसवण्यात आलेल्या कंटेनरमध्ये ट्रान्स्फर करेल. त्यानंतर हे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
प्रश्नमंजुषा (65)
1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 21 डिसेंबर दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते.
ब) 22 डिसेंबर दिवशी दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
2) शनी ग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर आहे ?
1) 16 कोटी किलोमीटर
2) 86 कोटी किलोमीटर
3) 159 कोटी किलोमीटर
4) 169 कोटी किलोमीटर
3) ग्रहांची युती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) या घटनेला पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमस स्टार आणि द ग्रेट कंजक्शन असं म्हटलं जाते.
ब) सूर्य प्रदक्षिणा करताना युती झाल्यास हे ग्रह पृथ्वीसापेक्ष एका रेषेमध्ये येतात.
क) साधारणपणे 200 वर्षातून एकदा अशी युती आकाशामध्ये दिसते.
ड) गुरू आणि शनी या ग्रहांची युती अतिशय दुर्मिळ असते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
4) गुरू ग्रह आणि पृथ्वीमध्ये जेवढे अंतर आहे, त्याच्या ..
1) तिप्पट नेप्च्यून ग्रह पृथ्वीपासून लांब आहे.
2) दुप्पट युरेनस ग्रह पृथ्वीपासून लांब आहे.
3) दुप्पट शनी ग्रह पृथ्वीपासून लांब आहे.
4) निमपट मंगळ ग्रह पृथ्वीपासून लांब आहे.
5) हायाबुसा संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) ही मोहीम जपानने अवकाशातील पाषाण गोळा करून आणण्यासाठी आखली.
ब) हायाबुसा यानाने क्युगू या अवकाशपाषाणावरून नमुने आणले.
क) हायाबुसा मोहीम 2030 पर्यंत सुरु राहणार आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
6) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (मोहीम ) स्तंभ ब (योगदान)
अ. हायाबुसा I. चंद्रावरील माती अवकाशयात्रीद्वारे आणणे
ब. चांग -5 II. चंद्रावरील माती रोबोद्वारे गोळा करून आणणे
क. एमएसआर III. अवकाशातील पाषाण गोळा करून आणणे
ड. अपोलो IV. मंगळावरील नुमने गोळा करून आणणे.
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) III II IV I
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III I II
7) अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने जुलै 2020 मध्ये कोनते अवकाशयान मंगळाकडे प्रक्षेपित केले ?
1) पर्सिविरेन्स रोव्हर
2) मार्स सॅम्पल रिटर्न
3) स्पेस -क्ष
4) मॉम
8) गुरू आणि शनी या ग्रहांची अतिशय दुर्मिळ अशी युती कोणत्या दिवशी पाहायला मिळाली/ मिळणार नाही?
1) 21 डिसेंबर 2012
2) 16 जुलै 1623
3) 15 मार्च 2080
4) 21 डिसेंबर 2020
9) हायाबुसा मोहीमेत जपानचा सहकारी देश कोण आहे ?
1) ब्रिटन
2) अमेरिका
3) ऑस्ट्रेलिया
4) न्यूझीलंड
उत्तरे : प्रश्नमंजुषा (65)
1-3
2-3
3-3
4-3
5-4
6-3
7-1
8-1
9-1