प्रकाशझोतातील व्यक्ती / प्रश्नमंजुषा (59)
- 16 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 228 Views
- 0 Shares
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन
पंतप्रधानपदी मिळणार्या अपुर्या पगारात ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कुटुंबाचा खर्च आणि गरजा भागविणे परवडत नसल्यामुळे ब्रेग्झीट प्रक्रिया पूर्ण झाली की राजीनामा देण्याचा विचार करत आहेत. पंतप्रधान होण्यापूर्वी बोरीस एका वर्तमानपत्रात कॉलम लिहीत असत आणि त्यासाठी त्यांना महिना 22 लाख रुपये मिळत. पंतप्रधान झाल्यापासून त्याचे वेतन वर्षाला 1.43 कोटी रुपये महिन्याला साधारण 12 लाख रुपये आहे.शिवाय या पगारातून पेन्शनपोटी काही रक्कम कापली जाते. बोरीस यांचे राहणीमान खर्चिक आहे त्यामुळे या पगारात त्यांना घरखर्च चालविणे अवघड बनले आहे.अधिक जबाबदारीची जागा घेऊन पगार कमी अशी त्यांची अवस्था आहे.
• पूर्वी बोरीस यांनी केवळ दोन भाषणे देऊन 1.50 कोटीची कमाई केली होती.
• जगात सर्वाधिक वेतन सिंगापूरच्या पंतप्रधानांना मिळते. त्यांना वर्षाला 11 कोटी रुपये मिळतात. भारताच्या पंतप्रधानांना महिना 2 लाख म्हणजे वर्षाला 24 लाख रुपये वेतन मिळते.
• जगभरच्या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक वेतन -
1) सिंगापूरचे पंतप्रधान - 11 कोटी रुपये
2) हाँगकाँगचे प्रमुख - 4 कोटी रुपये
3) स्वित्झर्लंडचे पंतप्रधान - 3.50 कोटी रुपये
4) ब्रिटनचे पंतप्रधान - 1.43 कोटी रुपये
5) भारताचे पंतप्रधान - 24 लाख रुपये
डॉ. निरदर सिंग कपानी
9 डिसेंबर 2020 - प्रकाशीय धागे (फायबर ऑप्टिक्स) तंत्रज्ञानाचे पितामह डॉ. निरदर सिंग कपानी यांचे अमेरिकेत कॅलिफोर्नियातील वुडसाइड येथे निधन झाले. जैव वैद्यकीय साधने, संरक्षण उपकरणे, दूरसंचार उपकरणे, प्रदूषण मापन उपकरणे यात त्यांनी 100 एकस्वे (पेटंट) घेतली होती. फायबर ऑप्टिक्स, लेसर्स, सौरऊर्जा यावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. प्रकाशीय धागे व उद्योजकता या विषयावर चार पुस्तके त्यांनी लिहिली.
• 31 ऑक्टोबर 1926 रोजी कपानी यांचा जन्म पंजाबमधील मोगा येथे झाला. डेहराडून येथे त्यांचे बालपण गेले.
• 1948 मध्ये आग्रा विद्यापीठातून पदवी घेऊन पीएचडीसाठी ते लंडनला गेले. तेथूनच अमेरिकेला स्थायिक होऊन, रॉचेस्टर विद्यापीठात व नंतर शिकागोतील इलिनॉइस इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थांत संशोधन केले.
• 1953 मध्ये लंडनमधील नामांकित इम्पीरियल कॉलेजमध्ये त्यांनी हॅरॉल्ड हॉपकिन्स यांच्या समवेत काम केले होते. प्रकाशीय धाग्यांमुळे संदेशवहनात मोठी प्रगती झाली, त्यात या दोघांचा मोठा वाटा होता.
• 1960 मध्ये प्रकाशीय धागे (फायबर ऑप्टिक्स) हा शब्द व संकल्पना कपानी यांनीच प्रथम सायंटिफिक अमेरिकनमधील शोधनिबंधात वापरली होती. काचेच्या धाग्यात प्रकाश एका दिशेने सोडला तर तो दुसर्या बाजूने बाहेर पडतो, त्यामुळे प्रकाशीय धाग्यांचा वापर संदेशवहनासाठी होऊ शकतो ही ती मूळ संकल्पना. इंटरनेट युगाची पायाभरणी करण्यात कपानी यांचा या तंत्रज्ञानाच्या रूपाने मोठा वाटा होता.
• कॅलिफोर्निया विद्यापीठात सांता क्रूझ येथे उद्योजकता नवनिर्माण केंद्राची स्थापना त्यांनी केली. याच विद्यापीठाच्या बर्कले कॅम्पसमध्ये ते काही काळ ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे प्रकाशीय विजाणुशास्त्राचे मानद प्राध्यापक होते.
• 1967 मध्ये त्यांनी शीख फाउंडेशनची स्थापना केली होती. त्याद्वारे त्यांनी शीख संस्कृती व भाषा विकासासाठी आर्थिक मदत केली.
• 1973 मध्ये त्यांनी कॅपट्रॉन कंपनीची स्थापना केली. पुढे वुडसाइड येथे त्यांनी ऑप्टिक्स टेक्नॉलॉजी ही कंपनी स्थापन केली होती.
• 1999 मध्ये त्यांना फॉर्च्युन नियतकालिकाने सात उद्योजकांत गौरवले होते.
• 2009 मध्ये शांघायमध्ये जन्मलेले वैज्ञानिक चार्लस क्यएन काओ यांना फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञानासाठी नोबेल मिळाले, त्यावेळी कपानी यांना मात्र डावलण्यात आले होते.
• कपानी यांच्या आठवणी द मॅन हू बेंट लाइट या नावाने 2021 मध्ये प्रकाशित.
शास्त्रज्ञ आर. नरसिंहा
15 डिसेंबर 2020 - प्रसिद्ध अवकाशशास्त्रज्ञ आणि पद्मविभूषणने गौरवण्यात आलेले रोद्दम नरसिंहा यांचे वयाच्या 87 वर्षी निधन झाले. त्यांना 2018 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता.
• नरसिंहा यांची राष्ट्रीय एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) चे संचालक म्हणून निवड झाली होती.
• नरसिंहा यांनी तेजस या लढाऊ विमानाची डिझाईन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
• त्यांनी जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्सड सायंटिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर) मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले.
• केंद्र सरकारने नरसिम्हा यांना अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रातील योगदानासाठी 2013 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.
श्रीपतराव खंचनाळे
14 डिसेंबर 2020 रोजी भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे यांचे कोल्हापुरात निधन झाले. 45 व्या वर्षी कुस्तीतून निवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत नवे मल्ल घडवण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले होते.
• हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, चांदीच्या 7 गदा, तीन सुवर्णपदके, एकलव्य, द्रोणाचार्य पुरस्कार, वस्ताद म्हणून घडवलेले 5 महाराष्ट्रकेसरी, एक हिंदकेसरी - अशी कामगिरी त्यंनी केली होती.
• महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक सरकारने कर्नाटक भूषण पुरस्कार दिला.
• 3 मे 1959 रोजी दिल्लीच्या मैदानात, राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या स्पर्धेत, रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग या पंजाबच्या नामांकित पहिलवानास श्रीपतराव खंचनाळे यांनी नवव्या मिनिटात अस्मान दाखवून भारताचा पहिला हिंदकेसरी होण्याचा मान मिळविला होता. त्यांना राष्ट्रपतींसहित तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही गौरवले.
• खंचनाळे आधी हिंदकेसरी झाले व त्यानंतर त्याच वर्षी कर्हाडला झालेल्या लढतीत अनंत शिरगावकर यांना हरवून ते महाराष्ट्र केसरी झाले.
• खंचनाळे मूळचे कर्नाटकातील एकसंबा (ता. चिक्कोडी, बेळगाव) गावचे. त्यांचे वडीलही पैलवान होते. त्यांनी श्रीपतरावांना कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत पाठविले व कोल्हापूर हीच खंचनाळे यांची कर्मभूमी बनली. पंचक्रोशीतील कुस्त्या जिंकून त्यांनी चांगले नाव कमावले. शाहूपुरी तालमीत आल्यावर वस्ताद हसनबापू तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरविले. कुस्तीतील भीष्माचार्य विष्णू नागराळे, मल्लाप्पा थडके यांचाही त्यांच्यावर प्रभाव राहिला.
• 1955 साली त्यांनी पहिली मोठी कुस्ती मारली, मिरजेच्या मैदानात पंजाबच्या ग्यानसिंगला, पाठोपाठ लखनापूरला कर्तारला चीतपट मारून खंचनाळेंनी चुणूक दाखवली होती.
• घुटना, एकलंगी, लपेट, एकेरी पट या डावांवर त्यांचे प्रभुत्व होते.
• कुस्ती ही विद्या आहे, कला आणि कौशल्यही आहे. त्यापलीकडे मातीतल्या मल्लांसाठी श्रद्धाही आहे. खंचनाळे हे अशा कुस्तीशी श्रद्धेने जोडलेल्या परंपरेतील मल्ल. कुस्ती हा ताकदीचा, संयमाची परीक्षा पाहणारा खेळ, तसाच कौशल्याचा आणि डोक्याने लढायचाही खेळ. यातले डावपेच खंचनाळे यांनी लवकर आत्मसात केले आणि त्यांचे आखाड्यातला उभरता मल्ल म्हणून नाव होऊ लागले. चपळाई व आक्रमकता यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या खेळात होता. धिप्पाड शरीर, रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि समोरच्या पैलवानाच्या उरात धडकी भरविण्याची ताकद ही त्यांची खास वैशिष्ट्ये. प्रतिस्पर्ध्याला समजायच्या आत अनेकदा त्यांनी मैदान मारलेले असायचे. विजेची चपळाई, कमालीची आक्रमकता आणि ताकदीने भारी पैलवनांना चकवणारी डावपेचाची समज यामुळे सुखदेव, इसाराम, बचनसिंग, टायगर, बंतासिंग, चाँद पंजाबी यांसारख्या पैलवानांना त्यांनी काही सेकंदांत वा मिनिटांत अस्मान दाखविले. त्यांची सादिक पंजाबीसोबतची प्रचंड गाजलेली लढत 3 तासांनंतर बरोबरीत सोडवली गेली होती.
4 दिग्गजांचा जन्मदिवस
12 डिसेंबर 2020 रोजी वेगवेगळ्या क्षेत्रातील 3 दिग्गज व्यक्तींचा वाढदिवस साजरा झाला, तर भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी झाली.
1) भारतीय राजकारणाचे भिष्म पितामह शरद पवार (80 वा वाढदिवस)
2) सुपरस्टार रजनिकांत (70 वा वाढदिवस) - तमिळ सिनेसृष्टीचा थैलवा म्हणून रजनीकांत यांना सन्मान दिला जातो. हिंदी आणि तमिळ चित्रपटातून अनेक दशके कार्यरत रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 साली झाला.
3) अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंग (40 वा वाढदिवस)
4) भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (जयंती) - जून 2016 मध्ये गोपीनाथ मुंडे यांचं दुर्दैवी अपघाती निधन झाले होते.
झकीऊर रेहमान लखवी
10 डिसेबर 2020 - 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्या झकीऊर रेहमान लखवीला प्रती महिना खर्चासाठी 1.50 लाख रुपये देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने मंजुरी दिली. पाकिस्तानच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मंजूर समितीने हा निर्णय घेतला.
• लखवी हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन प्रमुख आहे.
• 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर लखवीचा समावेश दहशतवाद्यांच्या यादीत झाला होता. 2015 पासून तो जामीनावर बाहेर आहे. फक्त दाखवण्यापुरतं त्याला पाकिस्तानी जेमलध्ये ठेवण्यात आलं होतं, कारण रावळपिंडीमधील अदियाला जेलमध्ये असताना तो एका मुलाचा बाप झाला होता.
• लखवीला देण्यात येणार्या प्रती महिना दीड लाखांमध्ये जेवण (50 हजार), औषधं (45 हजार), सार्वजनिक गोष्टींचा वापर (20 हजार), वकिलांची फी (20 हजार) आणि वाहतूक (15 हजार) यांचा समावेश आहे.
मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन
पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन यांना प्रतीमहिना दीड लाख रुपये देण्याची विनंती संयुक्त राष्ट्राने मान्य केली.
• पाकिस्तानच्या अॅटोमिक एनर्जी कमिशनसाठी काम केलेल्या बशीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानात लादेनची भेट घेतली होती.
• नवाज शरीफ सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलं होतं.
रवी पटवर्धन
8 डिसेंबर 2020 - अभिनेते रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 वर्षी निधन झाले. त्यांनी अनेक चित्रपटात गावचा पाटील, पोलीस आयुक्त, न्यायाधीश, सरपंच, नायिकेचा श्रीमंत बाप, कुटुंबप्रमुख यासह काही खलनायक स्वरुपाच्या भूमिकेत काम केले. त्यांनी 200 हून अधिक चित्रपट तर 150 हून अधिक नाटकांमध्ये काम केले.
• 6 सप्टेंबर 1937 रोजी रवी पटवर्धन यांचा जन्म झाला. 1944 मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन त्यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवचे अध्यक्ष बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते.
• त्यांनी मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी केली.
• 1974 मध्ये पटवर्धन यांनी आरण्यक या रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात धृतराष्ट्र साकारला होता. त्यानंतर 2019 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी तीच धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती.
• त्यांनी लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या प्रिझन डायरीच्या पु. ल. देशपांडे यांनी केलेल्या स्वगत या भाषांतरावर आधारित एकपात्री प्रयोग केला होता. या प्रयोगात हिंदी चित्रपट संगीतकार जयदेव यांचे संगीत असल्याने झरिन दारुवाला, पं. शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरसिया यांचे त्यात वादक म्हणून योगदान होते.
• आयएनटीच्या कोंडी या नाटकात त्यांना बंगाली रंगभूमीचे भीष्मपितामह शंभू मित्रा यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली.
• संस्कृत भाषेवर प्रभृत्व असलेल्या पटवर्धन यांनी वयाच्या 80 व्या वर्षी भगवदगीतेचे 700 श्लोक पाठ केले होते. शृंगेरी मठातर्फे घेतलेल्या पाठांतर परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते.
• त्यांची काही गाजलेली नाटके - कथा कोणाची व्यथा कुणाला, प्रपंच करावा नेटका, हृदयस्वामिनी, बेकेट, मुद्राराक्षस, कौतेय, आनंद, वीज म्हणाली धरतीला, मला काही सांगायचंय, अपराध मीच केला
सुह से-ओक
कोरियन अमूर्तकलेचे उद्गाते सुह से-ओक यांचे 29 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. भारतातील चित्रशैलीस आधुनिक कलारूप देणारे केसीएस पणिक्कर आणि शंकर पळशीकर हे सुह से-ओक यांचे समकालीन.
• सुह् से-ओक यांचा जन्म 1929 सालचा, ग्रामीण भागातला. सोलच्या (पूर्वीचे सेऊल) राष्ट्रीय विद्यापीठात ते कलाशिक्षणासाठी गेले. कोरियन युद्धापूर्वीच्या 1949 या वर्षांत त्यांनी सरकारी कलाप्रदर्शनात पहिले पारितोषिक मिळवले. पुढे 1950 पासून याच कला विभागात ते शिकवू लागले आणि 1959 मध्ये त्यांनी समविचारी चित्रकार व विद्यार्थ्यांसह मुंग्निम्हो हा कलासमूह (1959 ते 1964) स्थापन केला.
• कोरियन इंक (जपानी/चिनी शाईसारखी) आणि कोरियातील पारंपरिक चित्रांसाठी वापरले जाणारे ब्रश तसेच तुतीच्या लगद्यापासून बनलेला कागद हे अस्सल देशी साहित्य वापरून त्यांनी आधुनिक, आंतरराष्ट्रीय कलाजाणिवेला आवाहन करणारी चित्रे केली.
• दक्षिण कोरियाचा ऑर्डर ऑफ मेरिट हा पद्मश्रीसदृश पुरस्कार त्यांना 2012 मध्ये मिळाला होता. त्यांच्या चित्रांची प्रदर्शने अर्थातच देश-विदेशांत भरली होती.
फ्रान्सचे माजी राष्ट्रपती वेलेरी गिसकाड
5 डिसेंबर 2020 - फ्रान्सचे माजी राष्ट्रपती वेलेरी गिसकार्ड डिएस्टेंग (94 वर्षीय) यांचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले.
• 1974 ते 1981 पर्यंत ते राष्ट्रपती पदावर होते.
• वेलेरी यांना यूरोपीय देशांना एकत्रित करणारे नेते म्हणून ओळखले जाते.
लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा
4 डिसेंबर 2020 - लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा यांचे फुफ्फुसांच्या आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
• गुप्तचर संस्था आयबीचे माजी संचालक दिनेश्वर शर्मा यांची ऑक्टोबर 2019 मध्ये लक्षद्वीपच्या प्रशासकपदी नियुक्ती झाली होती.
• ते जम्मू आणि काश्मीरसाठी केंद्राचे वार्ताकार होते.
• शर्मा हे 1976 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते केरळ केडरशी संबंधित होते.
प्रश्नमंजुषा (59)
1) 2009 साली फायबरऑप्टिक्स तंत्रज्ञानासाठी नोबेल पुरस्कार कोणास देण्यात आला ?
a) हॅरॉल्ड हॉपकिन्स
b) चार्लस क्यएन काओ
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
2) 12 डिसेंबर 2020 रोजी कोणाचा वाढदिवस साजरा केला जातो?
अ) रजनिकांत
ब) युवराज सिंग
क) शरद पवार
ड) रामनाठ कोविद
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क
2) ब, क आणि ड
3) अ, ब आणि ड
4) वरील सर्वांचा
3) घुटना, एकलंगी, लपेट, एकेरी पट या संज्ञा जास्त करुन कशाशी संबंधित आहेत?
1) मॅट्रवरील कुस्ती
2) मातीतील कुस्ती
3) नुरा कुस्ती
4) ग्रीकोरोमन कुस्ती
4) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) झकीऊर रेहमान लखवी हा अलकायदा या दहशतवादी संघटनेचा कमांडर आहे.
ब) पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञज्ञ बशीरुद्दीन यांनी अफगाणिस्तानात लादेनची भेट घेतली होती.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
5) डिसेंबर 2020 मध्ये अभिनेते रवी पटवर्धन यांचे वयाच्या 84 वर्षी निधन झाले. त्यांची गाजलेली नाटके शोधा:
अ) अपराध मीच केला
ब) मुद्राराक्षस
क) वीज म्हणाली धरतीला
ड) मला काही सांगायचंय
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) वरील सर्व
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
6) भारताचे पहिले हिंदकेसरी कोण ?
1) वस्ताद हसनबापू तांबोळी
2) कुस्तीतील भीष्माचार्य विष्णू नागराळे
3) रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग
4) श्रीपतराव खंचनाळे
7) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : प्रकाशीय धाग्यांचा वापर संदेशवहनासाठी होऊ शकतो
कारण (र) : काचेच्या धाग्यात प्रकाश एका दिशेने सोडला तर तो दुसर्या बाजूने बाहेर पडतो.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
8) प्रकाशीय धागे (फायबर ऑप्टिक्स) तंत्रज्ञानाचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
1) हॅरॉल्ड हॉपकिन्स
2) चार्लस क्यएन काओ
3) प्रा. रोद्दम नरसिंहा
4) डॉ. निरदर सिंग कपानी
9) जगभरच्या राष्ट्रप्रमुखांचे वार्षिक वेतना नुसारचा योग्य चढता क्रम लावा.
अ) स्वित्झर्लंड
ब) ब्रिटन
क) भारत
ड) सिंगापूर
इ) हाँगकाँग
पर्यायी उत्तरे :
1) क - अ - ब - इ - ड
2) क - अ - इ - ड - ब
3) ब - ड - अ - क - इ
4) क - ब - अ - इ - ड
10) डिसेंबर 2020 मध्ये खालीलपैकी कोणाचे कोरोना संक्रमणामुळे निधन झाले?
1) लक्षद्वीपचे प्रशासक दिनेश्वर शर्मा
2) कोरियन अमूर्तकलेचे उद्गाते सुह से-ओक
3) फ्रान्सचे माजी राष्ट्रपती वेलेरी गिसकार्ड डिएस्टेंग
4) राष्ट्रीय एरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल) चे संचालक आर. नरसिंहा
11) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (शास्त्रज्ञ) स्तंभ ब (योगदान)
अ. रोद्दम नरसिंहा I. तेजस लढाऊ विमानाचे डिझाईन
ब. डॉ. निरदर सिंग कपानी II. फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञान
क. मोहम्मद सुलतान बशीरुद्दीन III. पाकिस्तान अॅटोमिक एनर्जी कमिशन
ड. डॉ. रुईची मोरिशिटा IV. व्हायरस बस्टर्स
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) I II III IV
3) III II IV I
4) IV III I II
12) पु. ल. देशपांडे यांनी स्वगत या नावाने कोणत्या कलाकृतीचे भाषांतर केले होते ?
1) जी. बी शॉ यांचे पिग्मेलियन
2) मेश्राम यांचे प्रेमा तुझा रंग कसा
3) रत्नाकर मतकरी यांचे आरण्यक
4) जयप्रकाश नारायण यांचे प्रिझन डायरी
13) झरिन दारुवाला, पं. शिवकुमार शर्मा व हरिप्रसाद चौरसिया या व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील आहेत ?
1) नाट्य क्षेत्र
2) साहित्यिक
3) संगीत
4) चित्रकला
14) बंगाली रंगभूमीचे भीष्मपितामह म्हणून कोणास ओळखले जाते ?
1) रविंद्रनाठ टागोर
2) हृषिकेश मुखर्जी
3) शंभू मित्रा
4) यापैकी नाही
15) भारतातील चित्रशैलीस आधुनिक कलारूप देणारे केसीएस पणिक्कर आणि शंकर पळशीकर यांचे समकालीन सुह से-ओक यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले, ते कोणत्या देशाचे कलाकार होते ?
1) जपान
2) व्हिएतनाम
3) दक्षिण कोरिया
4) फिलीपाईन्स
उत्तरे : प्रश्नमंजुषा (59)
1-2
2-1
3-2
4-3
5-2
6-4
7-1
8-4
9-4
10-3
11-2
12-4
13-3
14-3
15-3