राष्ट्रीय घटना / प्रश्नमंजुषा (52)
- 12 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 269 Views
- 1 Shares
गिलगिट-बाल्टिस्तान
चिनी सामरिक व आर्थिक दडपणामुळे पाकिस्तानला, गिलगिट-बाल्टिस्तान(जीबी)ला पाकिस्तानचा पाचवा प्रांत बनवण्याचाा निर्णय घ्यावा लागला. त्याचे काश्मीर, भारत आणि चीनवर मोठे परिणाम होतील. चीनकडून घेतलेल्या प्रचंड कर्जाच्या परतफेडीसाठी पाकिस्तान हा भूभाग चीनला विकू शकतो. ज्याप्रमाणे 1960 मध्ये पाकिस्तानने लडाखचे शॅक्सगाम खोरे चीनला आंदण दिले होते, अगदी तसेच जीबी बाबत घडू शकते. त्यास पार्श्वभूमी म्हणून जीबीमधल्या पाक-चीन सांगडीअंतर्गत चीन पूर्व लडाखच्या एलएसी कंट्रोलमध्ये फेरफार करण्याच्या मार्गावर आहे. मे 2020 पासून तेथे सुरू असलेला भारत-चीन संघर्ष हा त्याचाच भाग आहे. जीबीत तैनात चिनी अधिकार्यांनी अल बद्र या मुस्लिम दहशतवादी संघटनेला भारतीय काश्मीरमध्ये दहशतवादी हैदोस घालण्याचे आदेश दिले असून नोव्हेंबर 2020 मध्ये सुरुंग खोदून भारतात प्रवेश केलेल्या ज्या अतिरेक्यांना, भारतीय सुरक्षदलांनी नागरगोटात कंठस्नान घातले; ते याच चीन-पाकिस्तानच्या नव्या आतंकी धोरण प्रणालीचा भाग होते.
• 15 नोव्हेंबर 2020 ला गिलगिट-बाल्टिस्तान (जीबी) सिनेटच्या निवडणुका घेतल्यानंतर पाक सरकार जीबीला प्रांताचा दर्जा देईल अशी घोषणा, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 1 नोव्हेंबर 2020 रोजी सिनेटमध्ये केली होती. पाकच्या या कृतीला विरोध करताना पीओकेचे माजी पंतप्रधान सरदार आतिक खान आणि जीबीचे सांप्रत मुख्यमंत्री हाफिज हफीझूर रेहमान यांनी, गिलगिट- बाल्टिस्तान जम्मू-काश्मीरचा हिस्सा आहे व तो तसाच राहील, तो पाकिस्तानात जाणार नाही, असे म्हटले.
• चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी (सीपीईसी) चीन आणि पाकिस्तानमधील सर्व रेल्वे लाईन्स, रोडस् आणि ऑईल, गॅस पाईपलाईन्ससाठी आवश्यक असणारा जमिनी संपर्क फक्त गिलगिट-बाल्टिस्तानच्या माध्यमातून होऊ शकतो. यासाठी चीनचा जीव या क्षेत्रात गुंतला आहे. सीपीईसीमध्ये चीनने 62 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केल्यामुळे, आंतरराष्ट्रीय न्यायालयीन संदर्भात या क्षेत्राला आवश्यक वैधता आणि त्याला पाकिस्तानी राज्यघटनेची मान्यता चीनसाठी अतिशय मोलाची आहे.
• पाकिस्तानी सेनेने इम्रान खानच्या माध्यमातून भारताला संदेश दिला आहे की, भारताने जसे 2019 मध्ये जम्मू-काश्मीर आणि भारताच्या एकीकरणासाठी घटनात्मक बदल केले, तसेच, बदल भारतापासून तोडलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या बाबतीत पाक सरकार 2020 मध्ये करत आहे.
• घटनाक्रम -
1) 1947 पासून सामरिकद़ृष्ट्या महत्त्वाचा हा इलाका पाकिस्तानने अवैधपणे आपल्या व्याप्तीखाली ठेवला असला तरी भारताने जीबीवरील आपला हक्क कायम ठेवला आहे. सध्या या भागात 12 लाख रहिवासी आहेत.
2) गिलगिट-बाल्टिस्तानचे पाकिस्तानमधले स्थान संदिग्ध आहे. अधिकृत पाकिस्तानी नकाशांमध्ये हा इलाका पाकिस्तानात दर्शवला असला तरी प्रत्यक्षात पाकिस्तानी राज्यघटनेत या क्षेत्राचा साधा उल्लेखही नाही.
3) 19 व्या शतकात झिंगजियांगचे उइघर, लेह व दक्षिण काश्मीरचे सुन्नी, कारगिल, स्कार्डू व गिलगिटचे शिया आणि बाल्टिस्तानचे नुरबक्षी मुसलमान हे सर्व जण डोग्रा नरेशसाठी लढत असले तरी रशियाचा डोळा या क्षेत्रावर आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली.
4) 1877 मध्ये ब्रिटिशांच्या प्रभावामुळे काश्मीर नरेशांनी, ब्रिटिश एजंटाच्या अधिपत्याखालील गिलगिट एजन्सीची स्थापना करून रशियन साम्राज्य आणि अरब सागर यांमधला हा एकमेव दुवा इंग्रजांच्या ताब्यात दिला.
5) 1947 मध्ये हा भूभाग पाकिस्तानने अवैधरीत्या बळकावला. सप्टेंबर-ऑक्टोबर, 1947 मध्ये काश्मीर खोरे हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानी सेना आणि बलूच कबाईलींनी हल्ला करून तेथील 6 जिल्हे (पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर) बळजबरीने काबीज केले आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात गिलगिट स्काऊटच्या ब्रिटिश कमांडरनी पाकिस्तानात सामील होण्यासाठी बंड पुकारले. काश्मीर खोर्यातील सामरिक गुंत्यात फसलेल्या भारतापाशी जीबीमधील सैनिकी बंडाला शमवण्यासाठी आवश्यक लष्करी ताकद नसल्यामुळे हा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात आला.
6) महाराजा हरिसिंग यांनी काश्मीरच्या भारतातील विलय संधीवर हस्ताक्षर करताच माजी राजवटीचा भूभाग असलेला जीबी कायदेशीररीत्या भारताचा हिस्सा बनला, ही भारताची भूमिका पाकिस्तानला मान्य नाही. जीबी ब्रिटिशांपाशी लॉन्ग लीझवर होते आणि ब्रिटिश सर्वश्रेष्ठत्व लयास गेल्यावर तेथील ब्रिटिश सेनेची अधिसत्ता आपोआप संपुष्टात आली आणि कायद्यानुसार ब्रिटिश कमांडरच्या मताची किंमत शून्य झाली. परिणामी, 15 ऑगस्ट 1947 ला हा भूभाग स्वाभाविकत: काश्मीर महाराजांच्या अधिपत्याखाली आला आणि नंतर काश्मीर विलय संधीवर हस्ताक्षर होताच तो आपोआप भारताचा अभिन्न हिस्सा बनला.
7) काश्मीर नरेशांनी विलय संधीवर हस्ताक्षर केले, त्यावेळी गिलगिटचा भूभाग त्यांनी ब्रिटिश सरकारला दीर्घ मुदतीच्या भाडेतत्त्वावर दिला होता आणि त्यामुळे या क्षेत्रावरील त्यांचा ताबा केवळ प्रतीकात्मक होता, अशी पाकिस्तानी भूमिका आहे. फाळणीनंतर कबाईलींनी जीबीवर आक्रमण केले नसून, तेथील लोकांच्या मागणीनुसार तो भाग पाकिस्तानात विलीन झाला असा पाकिस्तानचा युक्तिवाद आहे. भारताला हा युक्तिवाद मान्य नाही.
8) चीनने जसे जीबीच्या उत्तरेतील चिनी झिंगजियांग प्रांतातील उइघर मुसलमानांवरील वचकासाठी हान वंशीय लोकांना आणले, त्याचे अनुकरण करत जनरल झिया-उल-हक यांनी, जीबीतील शिया मुसलमानांवर वचक बसवण्यासाठी तेथे पंजाबी सुन्नींना वसवले.
9) 2009 - पाकिस्तानने गिलगिट- बाल्टिस्तान एम्पॉवरमेंट अँड सेल्फ गव्हर्नन्स अॅक्ट 2009 पारित करून जीबीला फेडरल गव्हर्न्मेंटच्या अधिपत्याखाली आणले.
10) 2009 च्या पाकिस्तानी वटहुकुमानुसार, जीबीत सेल्फ रूल लागू असला तरी तेथील सिनेटकडे नगण्य अधिकार असून, हे क्षेत्र पाकिस्तानच्या वज्रमुष्ठीखाली रगडले जात आहे. जीबी सिनेटमधील 33 जागांपैकी 6 जागा महिलांसाठी आणि 3 जागा तंत्रज्ञांसाठी राखीव असतात. इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ पार्टीला 2020 च्या निवडणुकीत 11 जागा मिळाल्या असून, अपक्ष आणि राखीवांच्या मदतीने सरकार स्थापन केले.
11) ऑगस्ट 2016 मध्ये, पाकिस्तान सरकारने बलुचिस्तान व पीओकेमध्ये चालवलेली दडपशाही आंतरराष्ट्रीय मंचावर आणण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बलुचिस्तान आणि पीओकेच्या प्रतिनिधी मंडळाला दिले होते. त्यामुळे जीबी आणि बलुच आंदोलनांना हवा मिळून बंड पुकारले जाईल आणि त्याचा सीपीईसी प्रकल्पावर परिणाम होईल या शक्यतेने चीन आणि पाकिस्तानने जीबी ला पाकचा प्रांत करण्याची रणनीती आखली.
12) ऑगस्ट 2019 मध्ये भारतीय संसदेत काश्मीर ठराव पारित झाल्याच्या दुसर्याच दिवशी गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानने जबरदस्ती हथियाये गिलगिट-बाल्टिस्तान, पीओके और 1953 में खोये अक्साई चीन समेत पुरा जम्मू-काश्मीर नि:संशय भारत का अभिन्न हिस्सा है, असे म्हटले होते. यानंतर तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी सरकारने आदेश दिला तर जीबी व पीओकेत कारवाई करायला सेना सज्ज आहे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भांबावलेल्या पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांतीय दर्जा देण्यासंबंधी पाऊल उचलले. यासाठी त्याला चीनने खुला, सर्वंकष पाठिंबा दिला.
13) 2020 मध्ये सौदी अरेबियाने गिलगिट-बाल्टिस्तान व पीओकेला त्यांच्या नोटांवरील नकाशातून काढले.
राजस्थान
8 डिसेबर 2020 - काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी काँग्रेसची पीछेहाट होऊन भाजपने चांगले यश संपादन केले. राजस्थानमध्ये सत्ताधारी पक्षाला जिल्हा परिषदा वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही यश मिळते, असा गेल्या दोन दशकांचा इतिहास. पण यंदा ही परंपरा मोडली गेली. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या या निवडणुकीत दिल्लीच्या सीमेपासून जवळ असलेल्या राजस्थानच्या ग्रामीण भागातील मतदारांनी भाजपला कौल दिला. त्यामुळे शेतकरी वर्ग हा भाजपच्या धोरणांना अनुकूल असल्याचे या निकालाने स्पष्ट झाल्याचा दावा भाजपच्या धुरीणांनी केला.
• 21 जिल्हा परिषदांपैकी 15 ठिकाणी भाजपला सत्ता मिळाली. 222 पैकी 93 पंचायतींमध्ये भाजप तर 81 मध्ये काँग्रेस सत्तेत आली. मात्र नोव्हेंबरमध्ये झालेल्या 6 पैकी 4 महानगरपालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते.
• पंचायत समित्यांमध्ये बिनविरोध निवडले गेलेले सदस्य वगळता ज्या 4371 जागांसाठी निवडणूक झाली, त्यांपैकी भाजपचे 1989 (45.50 टक्के) तर काँग्रेसचे 1852 (42.35 टक्के) सदस्य निवडून आले.
• हैदराबाद महानगरपालिकेतही भाजपने 150 पैकी 48 जागा जिंकून तेथील सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे बळ 55 वर आणले.
• मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात समझोता घडवून आणण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले असले तरी पक्षांतर्गत गटबाजी आणि दुफळी कमी झालेली नाही. जुलै 2020 महिन्यात सचिन पायलट यांनी 18 समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकविल्याने राजस्थानची सत्ता काँग्रेसला गमवावी लागणार अशी चिन्हे होती. आमदारांचे पुरेसे संख्याबळ होऊ न शकल्याने व भाजप नेत्या वसुंधराराजे यांच्या हेकेखोर भूमिकेमुळे काँग्रेसची सत्ता उलथविण्याचे भाजपचे प्रयत्न निष्फळ ठरले. या सार्या गोंधळात सचिन पायलट यांना काँग्रेस नेतृत्वासमोर पांढरे निशाण फडकविण्याशिवाय पर्याय नव्हता. बंड शमले तरी पायलट किंवा त्यांच्या समर्थकांना गेहलोत यांनी दूरच ठेवले.
• उत्तर भारतात काँग्रेसची अवस्था ठीक नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेस कमकुवत असून बिहार विधानसभा निव्वडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली. मध्य प्रदेशची सत्ता ऑपरेशन कमळमुळे गमवावी लागली.
प्रश्नमंजुषा (52)
1) खालील विधाने विचारातघ्या :
a) अशोक गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत.
b) सचिन पायलट हे राजस्थानचे उपमुख्यमंत्री आहेत.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
2) डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने चांगले यश संपादन केले ?
1) बिहार
2) तेलंगणा
3) राजस्थान
4) मध्यप्रदेश
3) पाकिस्तानी राज्यघटनेत कोणत्या प्रांताचा उल्लेख नाही ?
1) बलुचिस्तान
2) पंजाब
3) सिंध
4) गिलगिट-बाल्टिस्तान
4) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 2020 पासून गिलगिट-बाल्टिस्तान ला पाकिस्तानचा सहावा प्रांत बनला आहे.
ब) 1960 मध्ये पाकिस्तानने लडाखचे गलवान खोरे चीनला आंदण दिले होते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
5) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (मुस्लीम समुदाय) स्तंभ ब (वास्तव्याचा प्रदेश)
अ. शिया I. बाल्टिस्तान
ब. सुन्नी II. कारगिल, स्कार्डू व गिलगिट
क. उइघर III. लेह व दक्षिण काश्मीर
ड. नुरबक्षी मुसलमान IV. झिंगजियांग
पर्यायी उत्तरे:
अ ब क ड
1) II III I IV
2) II IV III I
3) I II IV I II
4) II III IV I
6) 2020 मध्ये सौदी अरेबियाने गिलगिट-बाल्टिस्तान व पीओकेला त्यांच्या नोटांवरील नकाशातून काढले ?
1) पाकिस्तान
2) सौदी अरेबिया
3) चीन
4) टर्की
7) पाकिस्तानात सामील होण्यासाठी कोणी पुकारलेले बंड शमवण्यासाठी आवश्यक लष्करी ताकद नसल्यामुळे 1947 साली गिलगिटचा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला ?
1) बलूच कबालीनी
2) डोग्रा नरेशविरोधी ब्रिटिश कमांडरनी
3) गिलगिट स्काऊटच्या मुस्लीम कमांडरनी
4) गिलगिट स्काऊटच्या ब्रिटिश कमांडरनी
8) जनरल झिया-उल-हक यांनी गिलगिट-बाल्टिस्तानातील शिया मुसलमानांवर वचक बसवण्यासाठी तेथे कोणाचे स्थलांतर केले ?
अ) पंजाबी सुन्नी
ब) दक्षिण काश्मीरचे सुन्नी
क) पंजाबी शिया
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
9) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
अ) गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री : हाफिज हफीझूर रेहमान
ब) भारताचे केंद्रीय गृहमंत्री : अमित शहा
क) पीओकेचे माजी पंतप्रधान : सरदार आतिक खान
ड) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान : जनरल झिया-उल-हक
पर्यायी उत्तरे :
1) जोडी अ, ब आणि क बरोबर
2) जोडी ब, क आणि ड बरोबर
3) जोडी अ, ब आणि ड बरोबर
4) जोडी अ, क आणि ड बरोबर
उत्तरे : प्रश्नमंजुषा (52)
1-2
2-3
3-3
4-4
5-4
6-2
7-4
8-1
9-1