दीपंकर भट्टाचार्य
बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या राष्ट्रीय राजकारणातील प्रमुख पक्षांनी प्रत्येकी 2, तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (मार्क्सवादी लेनिनवादी) म्हणजे ’भाकप माले’ने 12 जागा जिंकल्या. बिहारमध्ये डाव्यांची लक्षणीय ताकद असली, तरी मतांच्या विभाजनामुळे निवडणुकांच्या राजकारणात त्यांना पुरेसे यश मिळत नव्हते. राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केल्यामुळे डाव्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या यशाचे श्रेय ’भाकप माले’चे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांचे आहे. आपले आग्रह कायम ठेवताना हेकेखोरपणा सोडून वाटाघाटी केल्यामुळे बिहारमध्ये डाव्यांना हे यश मिळू शकले.
1) दीपंकर भट्टाचार्य यांचा जन्म आसामात गुवाहाटी येथे झाला. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते.
2) पश्चिम बंगाल बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आलेल्या दीपंकर यांनी कोलकात्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधून पदवी मिळवली. या काळात ते डाव्या पक्षांच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी पदव्युत्तर पदवीही मिळवली.
3) भारतीय पीपल्स फ्रंटचे सरचिटणीस आणि पुढे ’भाकप माले’च्या कामगार संघटनेचे सरचिटणीस म्हणूनही काम केले.
4) 1987 मध्ये ते ’भाकप मालेफ च्या केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्यूरोचे सदस्य बनले.
5) 1989 मध्ये विनोद मिश्रा यांच्या निधनानंतर त्यांची एकमताने पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवड झाली.
डॉ. विवेक मूर्ती
करोना विषाणूचा अमेरिकेतील संसर्ग रोखण्यासाठी स्थापण्यात येणार्या कार्यगटाच्या सहअध्यक्षपदी, नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी, डॉ. विवेक मूर्ती (वय 43) यांची नियुक्ती केली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त डेव्हिड केस्लर यांच्याबरोबर ते करोना कार्यगटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील. मास्कचा वापर, सुरक्षित वावर यांबाबत ते आग्रही आहेत.
1) मूळ भारतीय वंशाचे असलेले डॉ. विवेक मूर्ती यांचे कुटुंबीय कर्नाटकातील; परंतु त्यांचा जन्म ब्रिटनमध्ये 1977 मध्ये झाला. 1978 साली त्यांच्या वडलांनी अमेरिकेत स्थलांतर केले.
2) मियामीत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठात पदवी आणि येल स्कूल ऑफ मेडिसीनमधून एमडी ही पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यांनी व्यवस्थापनशास्त्राची पदवी मिळवली असली, तरी वैद्यकीय सेवेवर भर दिला.
3) ’डॉक्टर्स ऑफ अमेरिका’ या डॉक्टरांच्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
4) डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या करोनाविषयक धोरणाचे टीकाकार असलेले डॉ. मूर्ती यापूर्वी बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कार्यकालात अमेरिकेचे सर्जन जनरल होते. संपूर्ण अमेरिकेचा डॉक्टर अशी ख्याती असलेल्या या पदावर सर्वांत तरुण वयात येण्याचा मान त्यांना मिळाला होता.
आँग सान स्यू की
म्यानमारमधील सत्तारूढ ’नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ (एनएलडी) पक्षाच्या सर्वेसर्वो आणि लोकप्रिय नेत्या आँग सान स्यू की यांनी सार्वजनिक निवडणुका जिंकल्या. सत्तेत येण्यासाठी आवश्यक असलेल्या 322 जागा त्यांनी संपादन केल्याने अंतिम निकाल जाहीर होण्याआधीच त्यांचा विजय नक्की झाला. 2015 सालच्या पहिल्या मुक्त निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक जागा मिळाल्या. देशाच्या राज्यघटनेमुळे स्यू की यांना संपूर्ण सत्ता मिळू शकत नाही आणि सत्तेत लष्कराला भागीदारी द्यावी लागते.
1) म्यानमारमध्ये करोनाचे सावट असल्याने अनेकांना मतदान करता आलेले नाही. अनेक केंद्रावरील मतदान रद्द झाले. बौद्ध मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता कायम आहे.
2) जगाच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधातील वांशिक हिंसाचार रोखण्यात कुचराई केली, रोहिंग्यांना म्यानमारवासी मानण्यास इन्कार केला. त्यातून त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा गेला. नोबेल परत घ्यावे, अशीही मागणी झाली. जागतिक नेत्यांनी त्यांना या अत्याचारांची दखल घेण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय न्यायालयात या विषयावरील खटल्यात स्यू की यांनी लष्कराची बाजू घेतली व अत्याचारांचा इन्कार केला.
3) म्यानमारमधील लष्करशाहीच्या विरोधात एकाकी लढा देणार्या स्यू की यांनी दोन दशके नजरकैदेत राहून, अहिंसक पद्धतीने लोकशाहीसाठी आंदोलन केले.
पर्यावरणवादी बाल कार्यकर्ते
स्वीडनच्या ग्रेटा थुनबर्गची प्रेरणा घेऊन जागतिक तापमानवाढ, हवामान बदल, प्रदूषण, कचरा, प्लास्टिक यांसारख्या समस्याबाबत जागरुकत निर्माण करण्यात अनेक बाल कार्यकर्ते देशभर आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची मुले-
लिसीप्रिया कंगुजम
मणिपूरच्या या 9 वर्षांच्या मुलीने भारताच्या संसदबाहेर बसून पंतप्रधान आणि देशातल्या खासदारांना हवामान कायदा आणण्यासाठी के आवाहन केले होते. मंगोलिया येथे 2018 साली झालेल्या ‘एशिया मिनिस्टेरियल कॉन्फरन्स फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन’मध्ये उपस्थित राहण्याची संधी तिला मिळाली. 2019 च्या स्पेनमध्ये झालेल्या ‘सीओपी25’ या हवामान परिषदेमध्येही ती उपस्थित होती. साठहून अधिक देशांमधील युवा नेते तिच्या समर्थनार्थ न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयासमोर जमले होते, तर तिच्या लढ़याला ऐंशीपेक्षा अधिक देशांतून ऑनलाइन पाठिंबा मिळाला.
जन्नत तारिक अहमद पतलू
ही 7 वर्षांची काश्मिरी मुलगी, 2018 पासून दर रविवारी आपल्या वडिलांबरोबर काश्मीरच्या दाल सरोवराची साफसफाई करुन कचर्याची योग्य विल्हेवाट लावते.
रिद्धिमा पांडे
हवामान बदल रोखण्यासाठी पुरेशी पावले न उचलल्याबद्दल वेगवेगळ्या देशांतील 16 मुलांनी संयुक्त राष्ट्रांकडे पाच देशांविरोधात याचिका दाखल केली होती. हरिद्वारची रिद्धिमा पांडे ही 12 वर्षांची विद्यार्थिनी त्यांपैकी एक होती. 2013 साली केदारनाथमध्ये आलेला प्रलय हवामान बदलाचा इशारा असल्याचे ओळखून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी तिने संयुक्त राष्ट्रांत आवाज उठवला.
कालरेस वालेस
4 नोव्हेंबर 2020- मूळचे स्पॅनिश असूनही गुजरातला कर्मभूमी मानणार्या फादर कालरेस वालेस यांचे वयाच्या 95 व्या वर्षी स्पेनमध्ये निधन झाले. 2005 साली ते ‘आईच्या आजारपणामुळे’ स्पेनला परत गेले होते.
1) फादर कालरेस वालेस यांनी गणिताची गुजराती परिभाषा तयार केली. नवगणिताचे पाठ्यपुस्तक लिहिले.
2) त्यांनी पंचाहत्तर पुस्तके लिहिली. त्यांची 30 पुस्तके गुजराती, तर 45 इंग्रजीत आहेत. त्यांनी मूळ गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘सदाचार’ या पुस्तकाच्या वीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या. ‘कुमार’ या गुजराती मासिकातील त्यांच्या स्तंभलेखनाची पुस्तके झाली, गांधींविषयीही त्यांनी लिहिले.
3) स्पेनच्या यादवीत (1936-39) वडील गेल्याने ख्रिस्ती संस्थेत कालरेस धर्मशिक्षण शिकले.
4) 1958 मध्ये ‘फादर’ ही उपाधी मिळवून, दोन वर्षे धर्मसेवा करून 1960 मध्ये ते अहमदाबादेत आले आणि महाविद्यालयात रुजू झाले होते.
प्रश्नमंजुषा (16)
1) आँग सान स्यू की यांच्याबाबत योग्य विधान शोधा.
अ) त्यांना मिळालेला शांततेचा नोबेल पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी युरोपीय मानवी हक्क कार्यकर्त्यांनी केली होती.
ब) त्यांनी स्थानिक रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारवासी मानण्यास इन्कार केला.
क) त्या म्यानमारमधील ’नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी’ (एनएलडी) पक्षाच्या नेत्या आहेत.
ड) त्या म्यानमारच्या पंतप्रधान आहेत.
पर्यायी उत्तरे ः
1) अ, ब, क आणि ड
2) अ, ब आणि क
3) अ, क आणि ड
4) अ आणि ड
2) खालील जोड्या योग्यप्रकारे लावा -
स्तंभ अ स्तंभ ब
a) ग्रेटा थुनबर्ग i) स्वीडनची पर्यावरणवादी बाल कार्यकर्ती
b) लिसीप्रिया कंगुजम ii) काश्मीच्या दाल सरोवराची साफसफाई
c) जन्नत तारिक अहमद पतलू iii) संयुक्त राष्ट्रांकडे पाच देशांविरोधात याचिका दाखल
d) रिद्धिमा पांडे iv) स्पेनमधील ‘सीओपी25’ या हवामान परिषदेत सहभागी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iii) (ii) (iv) (i)
2) (i) (iv) (ii) (iii)
3) (iii) (ii) (i) (iv)
4) (i) (iv) (iii) (ii)
3) गुजरातला कर्मभूमी मानणार्या फादर कालरेस वालेस यांचेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) त्यांनी गुजराती भाषेत लिहिलेल्या ‘सदाचार’ या पुस्तकाच्या वीसहून अधिक आवृत्त्या निघाल्या.
2) नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचे अहमदाबादमध्ये निधन झाले.
3) ते मूळचे स्पेन देशाचे नागरिक होते.
4) त्यांनी गणिताची गुजराती परिभाषा तयार केली.
4) डॉ. विवेक मूर्ती यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या ः
a) बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कार्यकालात ते अमेरिकेचे सर्जन जनरल होते.
b) मूळ भारतीय वंशाचे असलेले डॉ. विवेक मूर्ती यांचे कुटुंबीय तेलंगणा राज्यातील आहेत.
c) ’डॉक्टर्स ऑफ अमेरिका’ या डॉक्टरांच्या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते.
c) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे ते माजी आयुक्त आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) (a) आणि (b)
2) (a) आणि (c)
3) (c) आणि (d)
4) (a), (b), (c) आणि (d)
5) दीपंकर भट्टाचार्य यांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते / कोणती विधाने सत्य आहेत?
a) ते ’भाकप (मार्क्सवादी लेनिनवादी)’ या पक्षाचे सरचिटणीस आहेत.
b) त्यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी केल्यामुळे त्यांच्या पक्षाने बिहार निवडणुकीत 12 जागा जिंकल्या.
c) पश्चिम बंगाल बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ते राज्यात पहिले आले होते.
पर्यायी उत्तरे:
1) फक्त (a) आणि (b)
2) फक्त (c)
3) फक्त (a) आणि (c)
4) वरील सर्व
उत्तरे : प्रश्नमंजुषा (16)
1-2
2-2
3-2
4-2
5-4