भारत आणि चीनदरम्यान सहमती
11 नोव्हेंबर -‘एलएसी’वर गेल्या अनेक महिन्यांपासून कायम असलेला तणाव संपुष्टात आणण्यावर भारत आणि चीनदरम्यान सहमतीचे वातावरण तयार झाले. सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 नोव्हेंबरला चुशूल सेक्टरमध्ये भारत चीनदरम्यान कोअर कमांडर पातळीवरील चर्चेचा आठवा टप्पा पार पडला होता. यामध्ये दोन्ही बाजूंनी तयारी दर्शविल्यानंतर माघारीच्या योजनेवर चर्चा झाली. या चर्चेमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स ब्रिगेडियर घई यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव हे सहभागी झाले होते.
या योजनेनुसार प्याँगयाँग त्सो भागातून दिवाळीदरम्यान माघारीस तीन टप्प्यात भारत व चीन सैन्याची माघारी होईल. एप्रिल-मे 2021 पर्यंत तैनातीच्या पूर्ववत जागांवर दोन्ही देशांचे सैनिक पोहोचलेले असतील. गलवान खोर्यात 15 जून रोजी दोन्ही देशांतील सैनिकांत झालेल्या हिंसक धुमश्चक्रीनंतर दोन्ही देशांकडून प्रत्येकी 50 हजारांवर सैनिक सीमेवर समोरासमोर उभे करण्यात आले होते. कैलास रेंजवर भारतीय लष्कर 29-30 ऑगस्टच्या रात्री तैनात केले गेले होते. चीनचा भरवसा नसल्याने भारताने कडक हिवाळ्यातही प्रदीर्घ मुक्कामाची तयारी चालवलेली होती.
संयुक्त कृती दल -
1) पहिल्या टप्प्यात टँक, वाहने आणि सैनिकांना सीमेपासून एका निश्चित अंतरापर्यंत मागे सरकायचे आहे.
2) दुसर्या टप्प्यात पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्यावरून दोन्ही बाजूंनी 3 दिवसांत दररोज 30 टक्के सैनिकांची माघार नियोजित आहे. तद्नंतर भारतीय जवान आपल्या धनसिंह थापा या प्रशासकीय पोस्टच्या जवळ येतील. दुसरीकडे, चीनचे सैनिक पूर्ववत आपल्या फिंगर-8 वरील ठिकाणावर परततील.
3) तिसर्या आणि अंतिम टप्प्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्यासह चुशूल आणि ‘रेजांग ला’ परिसरातील टेकड्या रिकाम्या करायच्या आहेत.
4) माघारीचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी दोन्ही बाजू मिळून एक संयुक्त कृती दल स्थापन.
प्रश्नमंजुषा (11)
1) लडाख सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 नोव्हेंबरला भारत चीनदरम्यान कोअर कमांडर पातळीवरील चर्चेचा आठवा टप्पा कोठे पार पडला होता ?
1) प्याँगयाँग त्सो
2) रेजांग ला
3) चुशूल
4) यापैकी नाही
2) लडाख सीमेवरील भारत-चीन संघर्षा संदर्भातील खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा :
a) पूर्ववत जागांवर दोन्ही देशांच्या सैनिकांची वापसी
b) कैलास रेंजवर भारतीय लष्कर तैनात
c) कोअर कमांडर पातळीवरील चर्चेचा आठवा टप्पा
d) गलवान खोर्यातील संघर्ष
पर्यायी उत्तरे :
1) (d),(b),(c),(a)
2) (c),(b),(d),(a)
3) (c),(d),(b),(a)
4) (a),(b),(c),(d)
3) फिंगर-8 हे काय आहे ?
1) पँगाँग सरोवराच्या उत्तर किनार्यावरील टेकडी
2) पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्यावरील टेकडी
3) चीनचे लष्करी ठिकाण
4) ‘रेजांग ला’ परिसरातील टेकडी
4) ‘एलएसी’वर तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि चीनदरम्यानच्या सहमतीनुसार कितव्या टप्यात भारतीय जवान धनसिंह थापा या प्रशासकीय पोस्ट ठिकाणावर परततील ?
1) पहिल्या टप्प्यात
2) दुसर्या टप्प्यात
3) तिसर्या टप्प्यात
4) अंतिम टप्प्यात
5) 6 नोव्हेंबर 2020 रोजी चुशूल सेक्टरमध्ये भारत चीनदरम्यान कोअर कमांडर पातळीवर झालेल्या चर्चेमध्ये कोण सहभागी झाले नव्हते?
1) डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स ब्रिगेडियर घई
2) परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव
3) संरक्षण सचिव अजयकुमार
4) वरीलपैकी नाही
उत्तरे : प्रश्नमंजुषा (11)
1-3
2-1
3-2
4-2
5-3