प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्नमंजुषा (64)
- 22 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 330 Views
- 0 Shares
ब्रिटिश लेखक जॉन ली कॅरे
जगभरातील वाचकांना मोहिनी घालणारे हेरकथा आणि कादंबर्यांचे पितामह ब्रिटिश लेखक जॉन ली कॅरे (वय 98) यांचे 14 डिसेंबर 2020 रोजी इंग्लंडच्या कॉर्नवॉल शहरामध्ये निधन झाले. त्यांचे खरे नाव डेव्हिड कॉर्नवेल हे होते.
• कॅरे यांनी लिहिलेल्या शीतयुद्धाच्या काळावर भाष्य करणार्या हेरकथा आणि कादंबर्या जगभर गाजल्या होत्या. दि स्पाय हू केम इन फ्रॉम दि कोल्ड, टिंकर टेलर सोल्जर स्पाय आणि दि ऑनरेबल स्कूलबॉय या साहित्यकृतींना जगभरातील वाचकांना वेड लावले होते. त्यांनी साकारलेली जॉर्ज स्मायले ही व्यक्तीरेखा अजरामर ठरली.
• यांच्या कादंबर्या, तसेच संपूर्ण साहित्यिक कारकीर्द ही पश्चिम आणि सोविएत युनियन यांच्यातील संघर्षाबद्दलच्या लेखनावर आधारलेली होती. ग्रॅहॅम ग्रीन त्यांचा आवडता लेखक होता. त्यांनीही गुप्तहेर खात्यात काम केले होते.
• त्यांचे शिक्षण शेरबोर्न कॉलेज या सरकारी शाळेत झले. नंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ बर्न, स्वित्झर्लंड येथे शिक्षणासाठी गेले. त्यानंतर ते ऑक्सफर्डमध्ये शिकण्यासाठी गेले.
• सुरुवातीला ते ब्रिटिश गुप्तहेर खाते एमआय 5 मध्ये भरती झाले आणि नंतर त्यांची बदली एमआय 6 मध्ये झाली. तिथे त्यांनी हेरगिरीचे धडे घेतले - फोन टॅप करणे, चौकशी तंत्रे, एजंटकडून माहिती मिळवणे. या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्यांच्या हेरगिरीवर आधारित कादंबर्या लिहिताना उपयोग झाला. कॅरी यांनी हेरगिरीमधले अनेक शब्द लोकप्रिय केले - मोल्स (moles), लँपलायटर्स (lamplighters) आणि कझिन्स (सीआयए सहकार्यांसाठी ब्रिटिश गुप्तहेर वापरत असलेला शब्द)
जॉन ली कॅरे यांची वाचकप्रिय पुस्तके -
⇒ द रशिया हाऊस (1989)
⇒ द सीक्रेट पिलग्रिम
⇒ द स्पाय हू केम इन फ्रॉम कोल्ड
⇒ अ परफेक्ट स्पाय
⇒ अ स्मॉल टाऊन इन जर्मनी
⇒ द नेव्ह अँड सेंटिमेंटल लव्हर
⇒ द नाईट मॅनेजर (1993-मृत्यूच्या व्यापारामध्ये अफाट पैसा मिळवणार्या शस्त्रास्त्रांच्या डीलरची कथा)
⇒ द कॉन्स्टंट गार्डनर (मोठ्या औषध कंपन्या)
⇒ अ मोस्ट वाँटेड मॅन (दहशतवाद )
⇒ द मिशन साँग (पश्चिमी राष्ट्रांचा आफ्रिकेतील हस्तक्षेप)
चार्ल्स एलवुड तथा चक येगर
19 डिसेंबर, 2020 रोजी स्वनातीत म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने विमान उडवणारे पहिले वैमानिक चार्ल्स एलवुड तथा चक येगर यांचे वयाच्या 97 व्या वर्षी निधन झाले. ते युरी गागारिन, नील आर्मस्ट्राँग, चार्ल्स लिंडबर्ग यांच्या तोडीचे वैमानिक होते. पदवी नसल्यामुळे त्यांना अंतराळवीर होण्याची संधी मिळाली नाही.
• त्यांचे वडील शेतकरी होते. शाळेत अभ्यासापेक्षा बास्केटबॉल आणि अमेरिकी फुटबॉल यांसारख्या खेळांत अधिक रमत. मात्र भूमिती या विषयात त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले होते.
• 600 यार्डावरील सावज अचूक टिपण्याचे शिकारी कौशल्यही त्यांच्यापाशी होते. दिशा आणि मितीविषयी ज्ञान त्यांना वैमानिक म्हणून घडवण्यात मोलाचे ठरले. त्यामुळे पदवी नसूनही तातडीच्या वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झाली.
• दुसर्या महायुद्धात सप्टेंबर 1941 मध्ये ते अमेरिकी लष्करात दाखल झाले, नोव्हेंबर 1943 मध्ये वैमानिक प्रशिक्षण पूर्ण करून ते इंग्लंडमधील युद्धभूमीकडे रवानाझाले. त्यांच्या पी-51 मस्टँग स्क्वाड्रनने एका दिवसात पाच जर्मन मेसरश्मिट लढाऊ विमाने पाडून दाखवली. एक जुळारी (मेकॅनिक) म्हणून त्यांची लष्करी विमानांची देखभाल-दुरुस्ती करणार्या तळांवर भरती झाली.
• युद्धानंतर त्यांना कॅप्टन या हुद्द़यावर बढती मिळाली आणि ते उच्च वेगाच्या विमान उड्डाणांसाठी चाचणी वैमानिक म्हणून काम पाहू लागले. पुढे ब्रिगेडियर जनरल या हुद्द़यापर्यंत ते पोहोचले आणि चाचणी वैमानिकांच्या संस्थेचे प्रमुख बनले. तेथे त्यांनी अनेक वैमानिक आणि अंतराळवीर घडवले.
• 14 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांनी एक्स-1 या विमानातून ध्वनीची वेगमर्यादा भेदून दाखवली.
• 1950-53 या काळात ते कोरियन युद्धात सहभागी झाले होते, त्यावेळी अमेरिकी वैमानिक स्कॉट क्रॉसफील्ड यांनी ध्वनीपेक्षा दुप्पट वेगाने (माक 2) उड्डाण केले होते. चक येगर यांनी त्यापेक्षाही अधिक वेगाने (माक 2.44) विमान उडवले.
पावलो रॉस्सी
डिसेंबर 2020 मध्ये इटलीच्या पावलो रॉस्सी या माजी फुटबॉलपटूचे 64 व्या वर्षी निधन झाले. 1982 मध्ये रॉस्सीने इटलीला फुटबॉलचे जगज्जेतेपद मिळवून देण्याबरोबरच गोल्डन बॉल (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू), गोल्डन बूट (स्पर्धेत सर्वाधिक गोल), त्यावर्षीचा ‘बालें डिओर’ असे एकूण पाच पुरस्कार जिंकले. ही किमया साधणारा तो एकमेव. पेले, मॅराडोना, बेकेनबाउर, क्रायुफ, प्लॅटिनी, झिदान, मेसी, दोन्ही रोनाल्डो यांची उंची त्याने गाठली नाही, पण तो उत्कृष्ट स्ट्रायकर होता. त्याच्यामुळेच 1982 नंतर जशी इटालियन फुटबॉलची दिशा बदलली, तसेच ब्राझिलियन फुटबॉलचेही युरोपीकरण सुरू झाले. हे दोन युगप्रवर्तक बदल घडवून आणण्यास रॉस्सीच जबाबदार होता.
• 1980 मध्ये सामनेनिश्चिती प्रकरणी रॉस्सीवर इटालियन फुटबॉल संघटनेने तीन वर्षांची बंदी घातली होती. तो ‘स्ट्रायकर’ म्हणून खेळायचा आणि इटलीत चांगल्या, भरवशाच्या गोलमारकांची वानवा असल्याने प्रशिक्षक बेअरझोत यांच्या विनंतीवरून रॉस्सीचा बंदीकाल घटवण्यात आला. त्यांने स्पेनमधील विश्वचषक 1982 स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
• पहिल्या तीन सामन्यांमध्ये - वि. पोलंड, वि. पेरू आणि वि. कॅमेरून - इटलीला बरोबरीपलीकडे जाता आले नाही. इटली विरुद्ध ब्राझील सामन्यात रॉस्सीने हॅटट्रिक साधली. उपान्त्य फेरीत पोलंडविरुद्ध दोन गोल आणि अंतिम सामन्यात (पश्चिम) जर्मनीविरुद्ध इटलीच्या तीनपैकी पहिला गोल. एकूण सहा गोल.
टाकाहिरो शिराइशी
16 डिसेंबर 2020 - जपानमध्ये ’हाउस ऑफ हॉरर’ या नावाने ओळखल्या जाणार्या व माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरद्वारे संपर्क साधून 9 लोकांची हत्या करणार्या टाकाहिरो शिराइशी याला जपानमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
• ‘ट्विटर किलर’ नावाने ओळखल्या जाणार्या टाकाहिरो शिराइशी याला 2017 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्या फ्लॅटमधून मानवी शरीराचे तुकडे सापडले होते. त्यांने हत्या केलेल्यांपैकी बहुतांश महिला होत्या, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क साधून तो त्यांना भेटला होता. टाकाहिरो ट्विटरद्वारे आत्महत्येचा विचार करणार्या महिलांशी संपर्क साधायचा. त्यानंतर त्या महिलांना घरी बोलावून त्यांची हत्या करायचा.
रोद्दम नरसिंहा
पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या जडणघडणीत महत्त्वाची कामगिरी करणारे ज्येष्ष्ठ अवकाशशास्त्रज्ञ रोद्दम नरसिंहा यांचे 14 डिसेंबर 2020 रोजी निधन झाले. विज्ञानाबरोबरच त्यांना योगविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास व गणित यांत त्यांना रुची होती. 2013 मध्ये त्यांना पद्मविभूषणने गौरविण्यात आले होते.
• डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासमवेत त्यांनी ‘डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नॉलॉजी’ हे पुस्तक लिहिले होते.
• भारताच्या अवकाश कार्यक्रमात 1980 च्या दशकात पहिल्या काही प्रक्षेपकांचे उड्डाण अपयशी झाले असतानाही खचून न जाता तो कार्यक्रम पुढे नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कामगिरीमुळे एएसएलव्ही (ऑग्मेंटेड सॅटेलाइट लाँच व्हेइकल) ची उड्डाणे यशस्वी झाली. ‘एएसएलव्ही’नंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक व भूसंकालिक उपग्रह प्रक्षेपकांची (पीएसएलव्ही) उड्डाणे यशस्वी झाली. या दोन प्रक्षेपकांवर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सर्व अवकाश मोहिमांची भिस्त आहे.
• ‘एएसएलव्ही’ या प्राथमिक प्रक्षेपकाची काही उड्डाणे अपयशी झाल्यावर त्यातील दोष दुरुस्त करण्यासाठी इस्रोचे तेव्हाचे अध्यक्ष व प्रसिद्ध वैज्ञानिक सतीश धवन यांनी ज्या दोन समित्या नेमल्या होत्या, त्यांत नरसिंहांचा समावेश होता. वायुगतिकीतील तज्ज्ञ या नात्याने त्यांनी ज्या सूचना केल्या त्यातूनच एएसएलव्हीची उड्डाणे नंतर यशस्वी झाली. स्पष्टवक्तेपणा व धाडस हे दोन्ही गुण त्यांच्यात होते.
• नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (बंगळुरु) व नॅशनल इन्स्टिट़यूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज या दोन महत्त्वाच्या संस्थांचे नेतृत्व करीत असताना वायुगतिकी तज्ज्ञ या नात्याने त्यांनी इस्रोला मोलाची साथ दिली. या दोन्ही संस्थांचे नेतृत्व करताना त्यांनी शैक्षणिक व आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला प्राधान्य दिले.
• ‘भारताचे राफेल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानांची रचना व विकास यांत त्यांचा मोठा वाटा होता.
• नरसिंहा यांचा जन्म आंध्रातील अनंतपूर जिल्ह़्यातील रोद्दम गावचा. त्यांचे शिक्षण म्हैसूर विद्यापीठात झाले. आईवडिलांना त्यांनी रेल्वेत नोकरी करावी असे वाटत होते, पण वेगळा मार्ग निवडून बेंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट़यूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थेत दाखल झाले. नंतर ते बेंगळूरुच्या सेंट्रल कॉलेज येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांच्यासह त्यांना काम करायला मिळाले. पुढे अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन ते भारतात परतले होते.
बी. गोविंदाचार्य
13 डिसेंबर 2020 रोजी बी. गोविंदाचार्य (85 वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या नावातील ‘बी.’ हे अक्षर उडिपी जिल्ह़्यातील बाणंजी या जन्मगावापासून आलेले. उडिपी शहराजवळ अम्बळपाडि भागात ते राहत. त्यांनी वेदांसह अनेक संस्कृत ग्रंथांचे अध्ययन करून त्यांचे सटीक अर्थ सांगणारी 150 पुस्तके लिहिली. वेद, उपनिषदे यांवर मर्मग्राही ग्रंथ लिहिले. संस्कृत वाङ्मय मातृभाषेत यावे म्हणून अनुवादकार्य केले. त्यांनी माध्वाचार्याच्या ‘सर्वमूल ग्रंथां’च्या जीर्ण पोथीचे संगणकीकृत प्रतिमांकन केले.
• माध्वाचार्य हे ‘द्वैत’ तत्त्वज्ञान मांडणारे, तेराव्या शतकातील विद्वान. त्यांच्या शिष्यत्वाची पिढीजात परंपरा गोविंदाचार्याना मिळाली. गोविंदाचार्यांनी शंकराचार्याचे अद्वैत, रामानुजांचे विशिष्टाद्वैत ही तत्त्वदर्शने त्यांनी अभ्यासली, त्यावर ग्रंथ लिहिले, ते कन्नडमध्ये आणले आणि या तिघांवर तयार झालेल्या तीन चित्रपटांचे संवादलेखन त्यांनी केले.
• त्यांनी भाषंतरित (कन्नडमध्ये) केलेले काही ग्रंथ -
⇒ बाणभट्टाची कादंबरी
⇒ भवभूतीचे उत्तररामचरित
⇒ कालिदासाचे शाकुंतल
⇒ शूद्रक या संस्कृत नाटककाराचे ‘मृच्छकटिक’चे कन्नड भाषांतर (आवैया मण्णिन आटद बंडि) केल्यांने त्यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (2001) मिळाला.
• बहुमान -
⇒ वाङ्मयीन भाषांतरासाठी साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार (2001)
⇒ पद्मश्री (2015)
डॉ. विमल कीर्ती
डिसेंबर 2020 मध्ये पाली भाषेचे व्यासंगी व आंबेडकरी विचारवंत डॉ. विमलकीर्ती यांचे निधन झाले.
• भंडारा जिल्ह्यातील मूळचे रहिवासी असलेल्या डॉ. विमलकीर्ती यांचे मूळ नाव एल. जी. मेश्राम.
• भदंत डॉ. आनंद कौसल्यायन यांच्या सहवासात आल्यानंतर ते डॉ. विमल कीर्ती झाले.
• डॉ. आंबेडकर हे त्यांचे प्रेरणास्रोत होते. एकूण 81 पुस्तकांचे लेखन; तसेच अनुवाद त्यांनी केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली-पाकृत विभागाचे ते प्रमुख होते.
• ’स्वतंत्र मजूर पक्ष’ हे त्यांचे पहिले पुस्तक 1979 मध्ये आले. पालीविषयक पुस्तकांशिवाय महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित खंडरूपात त्यांनी लिखाण केले. आंबेडकरी चळवळीला दिशादर्शन करणारे हे लिखाण होते.
नरेंद्र भिडे
डिसेंबर 2020 मध्ये संगीतकार नरेंद्र भिडे यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे (सीओईपी) पदवीधर असलेले भिडे, इंजिनीअरिंगपेक्षा कलेच्या क्षेत्रात रमले. तंत्रज्ञानाच्या शिक्षणाचा उपयोग करून, त्यांनी ’डॉन’ नावाचा अद्ययावत पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ उभा केला.
• ‘मुळशी पॅटर्न’, ’हंपी’, ’देऊळ बंद’, ’एलिझाबेथ एकादशी’, ’हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ’श्वास’, ’सरीवर सरी’ यांसारखे चित्रपट; तसेच ’अवंतिका’, ’उन पाऊस’, घरकुल’ यांसारख्या मालिकांद्वारे संगीताच्या बाबतीत आपला ’पॅटर्न’ तयार केला.
विष्णू सावरा
डिसेंबर 2020 मध्ये माजी आदिवासी कल्याण मंत्री विष्णू सावरा यांचे निधन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटनांपैकी ’वनवासी कल्याण आश्रमा’च्या कामातून सावरा घडत गेले. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात वनवासी कल्याण आश्रमाने आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी काम सुरू केले होते. सावरा तेथे शिकले. पदवीधर झाले आणि त्यांनी पुढे संघ परिवाराच्या कामात झोकून दिले.
• आदिवासींमध्ये विविध विषयांवर जागृती करणे, शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजावून देणे, त्यासाठी पाड्या-पाड्यांवर फिरून मुलांना शाळेत नेणे, आदिवासी विभागातील रानमेवा मुंबईत आणून त्याला चांगली किंमत मिळवून देणे, आदिवासींना त्यांच्या विविध प्रश्नांवर संघटित करणे आदी कामात सावरा कायम पुढे असत.
• महाराष्ट्रात भाजपला बहुजन चेहरा देणार्या वसंतराव भागवतांनी सावरांना भाजपमध्ये आणले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना उमेदवारी दिली. सावरा 1990 ते 2014 या काळात सहावेळा आमदार म्हणून निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना आदिवासी कल्याण खात्याचे मंत्रिपद मिळाले.
मा. गो. वैद्य
19 डिसेंबर 2020 रोजी नागपूर येथे तरुण भारतचे माजी मुख्य संपादक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक आणि प्रचार प्रमुख असलेल्या माधव गोविंद ऊर्फ बाबुराव वैद्य (98 वर्षे) यांचे निधन झाले. मा. गो. वैद्य हे ‘नीरद’ या टोपण नावाने ते लेखन करीत.
• 1978 साली ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
• 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणार्या मा. गो. वैद्यांना पत्रकारिता व समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले.
संत राम सिंह
16 डिसेंबर 2020 - शेती सुधारणा कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याच्या भावनेतून दिल्ली-हरियाणाच्या सीमेवरील सिंधू बॉर्डरवर संत बाबा राम सिंह यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
• करनाल येथील सिंगरा गावातील रहिवासी बाबा राम सिंह गुरुद्वारा नानकसरमध्ये सेवा देत होते. पंजाब, हरियाणासह जगभरात बाबांचे अनुयायी होते.
शक्ती सिन्हा
शक्ती सिन्हा एमएस विद्यापीठ, बडोदे येथे अटलबिहारी वाजपेयी पॉलिसी रिसर्च अँड इंटरनॅशनल स्टडीजचे मानद संचालक आहेत. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत अनेक वर्षे पीएमओसह खासगी सचिव म्हणून काम केलं आहे.
• वाजपेयी : द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया - लेखक शक्ती सिन्हा
• भारत पाकिस्तानदरम्यान 1999 मध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी कारगिल युद्धादरम्यान वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांच्याशी पाचवेळा चर्चा केली होती. अटल बिहारी वाजपेयी यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा यांचं नवं पुस्तक ‘वाजपेयी: द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ यामध्ये हा गौप्यस्फोट करण्यात आला. कारगिल युद्धाच्या बाबतीत पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांना अंधारात ठेवलं होतं, असं भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांचं म्हणणं होतं.
हजरत अली शाह कादरी
19 डिसेंबर, 2020 - कर्नाटकातील धारवाड येथील हजरत अली शाह कादरी हे ‘देशातील सर्वात वृद्ध मतदार’ असून त्यांचे वय आहे 112 वर्षे. भारतीय निवडणूक आयोगाने कादरी यांना ‘देशातील सर्वात वृद्ध मतदार’ ठरवले आहे. त्यांच्या आधारकार्डवर त्यांचे जन्मसाल 1908 हे आहे. कादरी यांचे आई-वडील इराकमधील बगदाद येथून 1905 मध्ये भारतात आले होते. कादरी यांनी बि-टिश आणि भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे.
• कादरी हे देशातील व कदाचित जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांच्यावर एन्डोस्कोपीच्या सहाय्याने प्रोस्टेट शस्त्रक्रिया झाली. सर्वसामान्यपणे प्रोस्टेट ग्रंथीचे वजन 15 ते 20 ग्रॅम असते.
प्रश्नमंजुषा (64)
1) खालीलपैकी कोणत्या बिटिश लेखकास हेरकथा आणि कादंबर्यांचे पितामह म्हणून ओळ्खले जाते ?
1) जॉन ली कॅरे
2) चार्ल्स एलवुड
3) चार्ल्स डिकन्स
4) इयान फ्लेमिंग
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) ‘भारताचे राफेल’ म्हणून ‘तेजस’ या हलक्या लढाऊ विमानास ओळखले जाते.
ब) नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज व नॅशनल इन्स्टिट़यूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज या दोन संस्थांनी त्याची निर्मिती केली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने विमान उडवणारे पहिले वैमानिक कोण ?
1) युरी गागारिन
2) चार्ल्स लिंडबर्ग
3) चार्ल्स एलवुड
4) नील आर्मस्ट्राँग
4) वायुगतिकीतील तज्ज्ञ रोद्दम नरसिंहा यांचे कोणत्या प्रक्षेपकाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान होते ?
अ) जीएसएलव्ही
ब) पीएसएलव्ही
क) एसएलव्ही
ड) एएसएलव्ही
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) ब आणि ड बरोबर
4) वरील सर्व बरोबर
5) एम 5 अँड एम 6 ही संज्ञा कोणत्या देशा च्या गुप्तहेर संस्थेसाठी वापरली जाते ??
1) युएसए
2) युएसएसआर
3) सीआयएस
4) युके
6) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) पाली भाषेचे व्यासंगी व आंबेडकरी विचारवंत : डॉ. विमलकीर्ती
ब) संगीतकार : नरेंद्र भिडे
क) माजी आदिवासी कल्याण मंत्री : विष्णू सावरा
ड) नागपूरच्या तरुण भारतचे माजी मुख्य संपादक : माधव गोविंद ऊर्फ बाबुराव वैद्य
इ) 2020 मधील शेतकर्यांच्या आंदोलनास समर्थन : संत बाबा राम सिंह
फ) देशातील सर्वात वृद्ध मतदार : हजरत अली शाह कादरी
ग) माध्वाचार्याच्या ‘सर्वमूल ग्रंथां’च्या जीर्ण पोथीचे संगणकीकृत प्रतिमांकन : बी. गोविंदाचार्य
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) ब वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
7) डिसेंबर 2020 मध्ये पाली भाषेचे व्यासंगी व आंबेडकरी विचारवंत डॉ. विमल कीर्ती यांचे निधन झाले, त्यांचे मूळ नाव काय होते ?
1) डॉ. आनंद कौसल्यायन
2) कल्पित व्यास
3) एल. जी. मेश्राम
4) यापैकी नाही
8) ’वनवासी कल्याण आश्रम’ ही संस्था कोणत्या विचारधारेवर चालते ?
1) ठक्कर बाप्पा
2) गांधीवादी
3) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
4) नवगांधीवादी
9) ’वाजपेयी : द इयर्स दॅट चेंज्ड इंडिया’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) डॉ. विनय सहस्रबुद्धे
2) शक्ती सिन्हा
3) मा. गो. वैद्य
4) नरेंद्र भिडे
10) खालीलपैकी कोण ‘नीरद’ या टोपण नावाने लेखन करीत ?
1) डॉ. विमल कीर्ती
2) मा. गो. वैद्य
3) बी. गोविंदाचार्य
4) विष्णू सावरा
11) मॅक हे कशाचे एकक आहे ?
1) ध्वनीचा वेग मोजण्याचे
2) विमानाचा वेग मोजण्याचे
3) क्षेपणास्त्राचा वेग मोज़ण्याचे
4) वरील सर्व
12) जॉन ली कॅरे यांनी लिहिलेल्या पुस्तकांंचा संच ओळखा :
अ) अ स्मॉल टाऊन इन जर्मनी
ब) अ परफेक्ट स्पाय
क) द नेव्ह अँड सेंटिमेंटल लव्हर
ड) द नाईट मॅनेजर
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) वरील सर्व
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
13) डिसेंबर 2020 मध्ये पावलो रॉस्सी या कोणत्या देशाच्या माजी फुटबॉलपटूचे निधन झाले ?
1) स्पेन
2) ब्राझील
3) इटली
4) नेदरलँडस
14) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (तत्त्ववेत्ता) स्तंभ ब (सिद्धांत)
अ. शंकराचार्य I. ‘द्वैत’ तत्त्वज्ञान
ब. रामानुजाचार्य II. ‘अद्वैत‘ तत्त्वज्ञान
क. माध्वाचार्य III. ‘द्वैत-अद्वैत‘ तत्त्वज्ञान
ड. निंबकारााचार्य IV. ’विशिष्टाद्वैत’ तत्त्वज्ञान
पर्यायी उत्तरे ः:
अ ब क ड
1) II III I IV
2) II IV II III
3) III II IV I
4) IV III I II
15) जॉन ली कॅरी यांनी हेरगिरीमधले जे अनेक शब्द लोकप्रिय केले त्यातील कोणता शब्द सीआयए सहकार्यांसाठी ब्रिटिश गुप्तहेर वापरत ?
1) मोल्स
2) लँपलायटर्स
3) ट्रेकर्स
4) कझिन्स
16) खालीलपैकी कोणती संशोधन संस्था बंंगळुरु येथे नाही ?
अ) इंडियन इन्स्टिट़यूट ऑफ सायन्स
ब) नॅशनल इन्स्टिट़यूट ऑफ अॅडव्हान्सड स्टडीज
क) नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज
पर्यायी उत्तरे :
1) यापैकी नाही
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
17) ‘डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नॉलॉजी’ या पुस्तकाचे लेखक कोण ?
1) सतिश धवन व वसंत गोवारीकर
2) के. कस्तुरीरंगन
3) डॉ. एपीजे अब्दुल कलाम व रोद्दम नरसिंहा
4) विक्रम साराभाई व रोद्दम नरसिंहा
18) खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (ग्रंथ) स्तंभ ब (लेखक)
अ. कादंबरी I. शूद्रक
ब. उत्तररामचरित II. कालिदास
क. शाकुंतल III. भवभूती
ड. मृच्छकटिक IV. बाणभट्ट
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III II IV I
4) IV III II I
उत्तरे : प्रश्नमंजुषा (64)
1-1
2-1
3-3
4-3
5-4
6-3
7-3
8-3
9-2
10-2
11-4
12-2
13-3
14-2
15-4
16-1
17-3
18-4