कोरोना सार्वजनिक लसीकरण / प्रश्नमंजुषा (61)
- 18 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 970 Views
- 0 Shares
कोरोना सार्वजनिक लसीकरण
8 डिसेंबर 2020 रोजी ब्रिटनमध्ये कॉव्हेंटरी मधल्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये 90 वर्षांच्या मार्गारेट कीनन या महिलेला फायझरच्या लशीचा डोस सर्वांत पहिल्यांदा देण्यात आला आणि नियामकांकडून मान्यता मिळाल्यानंतर कोरोना लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश बनला.
• डिसेंबर 2020 मध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण सापडून 1 वर्ष झाले. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जगभरात 7 कोटी लोकांना या आजाराची बाधा झाली, तर 15 लाखापेक्षा अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच चीन पासून ते आफ्रिकेतील छोट्या देशातसुद्धा लॉकडाऊन करण्याची वेळ आली.
• मार्च 2020 महिन्यापासून या रोगाला गंभीरपणे घेतले गेले. त्यानंतर जगभरच्या प्रयोगशाळेत 50 प्रकारच्या लसी विकसित करण्याचे प्रयत्न झाले. डिसेंबर 2020 पर्यंत 15 लशींच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील चाचणी झाली, तर 9 लशींच्या तिसर्या टप्प्यातील चाचणी पार पडली. यातील 8 लसींचे उत्पादन भारतात होत आहे. त्यात भारतातील 3 स्वदेशी लसींचाही समावेश आहे
• डिसेंबर 2020 मध्ये लशींच्या तिसर्या टप्प्यातील चाचणी होऊन त्यांचे परिणामही जाहीर झाले होते -
1) फायझरया अमेरिकन कंपनीची जर्मनीमध्ये विकसित झालेली लस
2) मॉडर्ना कंपनीची अमेरिकेत विकसित झालेली लस
3) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित झालेली लस
4) रशियन कंपनीची स्फुटनिक-5 लस
• युकेमध्ये सुरू झालेली सार्वजनिक लसीकरण मोहीम प्रत्येकासाठी बंधनकारक नाही. युकेमधल्या लसीकरण मोहीमेअंतर्गत 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्या नागरिकांना आणि काही आरोग्यसेवकांना तसेच ज्येष्ठांची काळजी घेणार्या कर्मचार्यांना पहिल्यांदा लस दिली गेली आहे.
महत्वाच्या कोरोना लसी
1) टोझिनामेरान लस (बायोएनटेक , जर्मनी)
2) स्पुटनिक-5/गॅमकोव्हिडव्हॅक लस (गेमालये रिसर्च, रशिया)
3) फायझर-बायोएनटेकची लस (ब्रिटन)
4) मॉडर्ना कंपनीची लस (अमेरिका)
5) कोव्हॅक्सिन लस (भारत बायोटेक, भारत)
6) कोविशील्ड लस (ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, अॅस्ट्रझेनेका व सीरम इंडिया, भारत)
7) कोविड-1 लस (नोव्हावॅक्स अमेरिका व सीरम इंडिया, भारत)
8) झायकोव्हॅक लस (कॅडिला हेल्थकेअर, भारत)
9) सनोफी कंपनीची लस (फ्रान्स)
10) बीबीआयबीपी कोरोव्हॅक लस (सिनोफार्मा, चीन)
11) कोरोनाव्हॅक लस (सिनोव्हॅक, चीन)
ब्रिटन, रशिया, चीन येथे लस विकसित होत असताना, भारतातही स्थानिक; तसेच अन्य देशांच्या मदतीने लस तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर 2020 महिन्यात पुढील कंपन्यांच्या लशी वेगवेगळ्या देशांच्या सरकारी राष्ट्रीय नियामक प्राधिकरण संस्थांकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत होत्या, काहीनी आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी अर्ज केले होते, तर कहींच्या विविध तप्प्यातील चाचण्या सुरु होत्या-
1) फायझर कंपनीच्या लशीला ब्रिटन सरकारची मान्यता मिळाली व ती वयोवृद्ध (80 वर्षावरील) लोकांना देण्यास सुरुवात झाली.
2) मॉडर्ना कंपनीची लस वितरित करण्यास ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेमध्ये आपत्कालीन मान्यता कायदयानुसार मान्यता मिळाली.
3) रशियन कंपनीच्या स्फुटनिक-5 लसीला रशियामध्ये वितरित करण्याची मान्यता मिळाली. स्पुटनिक-5 ही रशियामध्ये विकसित झालेली लस भारतात रेड्डीज लॅबोरेटोरीज मध्ये उत्पादित होत आहे. या लसीच्या तिसर्या टप्प्याततील चाचणीमध्ये 4 लाख स्वयंसेवक सहभागी झाले होते.
4) भारतामध्ये कोविशील्ड ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस, सीरम इंडिया ही कंपनी तयार करत असून या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. लशीची तिसर्या टप्प्यातील चाचणी महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटकसहित संपूर्ण भारतामध्ये 17 ठिकाणी झाली. कोविशील्ड लसीचा 0.5 मिलीचा पहिला डोस आणि पुन्हा 28-29 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो.
5) अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सने विकसित केलेल्या कोविड -1 या लसीची चाचणी सीरम कंपनी (सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) करत आहे. ऑगस्ट 2020 महिन्यामध्ये नोव्हावॅक्स कंपनीने कोविड -1 लसीचे वार्षिक 2 अब्ज डोस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) बरोबर करार केला होता.
6) भारत बायोटेक या कंपनीने कोव्हॅक्सिन ही लस, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या साहाय्याने पूर्णपणे भारतात विकसित केली गेली आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, दिल्ली, ओडिशा, पश्रि्चम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यातील 22 ठिकाणी 26 हजार जणांवर या लशीच्या तिसय्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम पहिले गेले.
7) झायडस कॅडिलाची लस ही स्वदेशी म्हणजे भारतात (अहमदाबाद) विकसित झालेली असून तिची दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी झाली.
► सिनोफार्माची लस (चीन) -
1) चीनमध्ये परदेशात जाणार्या कामगारांपासून ते सरकारी अधिकारी असलेल्या लाखो लोकांना सिनोफार्मची लस दिली जाते.
2) डिसेंबर 2020 पहिल्या आठवड्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये सिनोफार्मच्या लसीची जी चाचणी झाली, त्यामध्ये 31 हजार जण सहभागी झाले होते. ही लस स्वयंसेवकांना करोनाच्या संसर्गापासून वाचवण्यात 86 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती.
3) सिनोफार्म लस चाचणीत सहभागी देश - अर्जेंटिना, बहारीन, इजिप्त, इंडोनेशिया, जॉर्डन, मोरक्को आणि रशिया.
4) 14 डिसेंबर 2020 : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये चीनच्या सिनोफार्म कोव्हिड 19 लसीची चाचणी थांबवली. या लसीची चाचणी सुरु असणार्या एका स्वयंसेवकावर लसीचा विपरित परिणाम दिसून आला. सिनोफार्म ही चिनी कंपनी पेरूमध्ये 12 हजार स्वयंसेवकांच्या मदतीने आपल्या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणीच्या लसीकरणाला सुरुवात करणार होती. या लसीच्या प्राथमिक साईड इफेक्ट्समध्ये अन्य लक्षणांबरोबच पायांच्या स्नायूंमध्ये कळा येऊन दुखण्याचं लक्षण जाणवलं.
► सनोफीची लस (फ्रान्स) -
1) 12 डिसेंबर 2020 : ऑस्ट्रेलियात तयार होणारी फ्रेंच कंपनी सनोफीची लस फॉल्स एचआयव्ही पॉझिटिव्ह रिझल्ट देत असल्याने रद्द करावी लागली. अभ्यासाचा पुढील टप्पा फेब्रुवारी 2021 मध्ये सुरू होणार.
2) क्वीन्सलँड व सीएसएल यांचा हा संयुक्त प्रकल्प होता.
3) ऑस्ट्रेलिया सरकारने या लसीचे 5 कोटी डोस बुक केले होते.
► ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका- सीरम लस -
1) ही लस पारंपरिक पद्धतीने विकसित केली गेली आहे. पारंपारिक लशींमध्ये कमकुवत व्हायरस किंवा व्हायरसचे शुद्धीकृत साक्षांकृत प्रथिने यापैकी एकाचा वापर केला जातो.
2) या लसीमध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन, चिंपांझीमधील कोल्ड विषाणूशी जोडले गेले असून हा संकरित विषाणू रुग्णाना इंजेक्शनने दिला जातो.
3) हा व्हायरस (विषाणू) निरुपद्रवी असून रुग्णांच्या शरीरावर कोणताही अपाय करू शकत नाही. मात्र शरीरातील पेशीमध्ये गेल्यानंतर, हा विषाणू कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटिन्स (प्रथिने) ओळखणारी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) करण्यासाठी मदत करतो.
4) त्यानंतर शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये असणार्या टी सेल्स (टी पेशी) व्हायरसमुळे संसर्गित झालेल्या सामान्य पेशींना तटस्थ करतात. तसेच शरीरातील रोग प्रतिकारशक्तीमध्ये भविष्यात येणार्या मूळ व्हायरस विरुद्ध लढण्यासाठी स्मृती तयार करून ठेवतात.
5) त्यामुळे संबंधित व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर, रोग प्रतिकारशक्ती लगेच त्याला ओळखून नष्ट करते आणि व्यक्ती कोरोना व्हायरसमुळे होणार्या संसर्गापासून सुरक्षित राहतो.
► फायजर लस आणि मॉडर्ना लस -
1) या दोन्ही लसींच्या निर्मितीसाठी एमआरएनए तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
2) एमआरएनए तंत्रज्ञानामध्ये व्हायरल प्रोटीन इंजेक्शन देण्याऐवजी ते एमआरएनए मार्फत दिले जाते. एमआरएनए शरीरामध्ये छोट्या लिपिड कणांमध्ये बसवून शरीरामध्ये इंजेक्ट केले जाते.
3) हे एमआरएनए व्हायरल प्रोटीन एन्कोड करते. जेव्हा ही लस शरीराच्या बाह्यभागात इंजेक्ट केली जाते, तेव्हा स्नायूपेशी शरीरात थेट व्हायरल प्रोटीन तयार करण्यासाठी मदत करतात. हे तंत्रज्ञान कोरोना व्हायरस निसर्गात काय करतो याची नक्कल करते.
4) एमआरएनए शरीरामध्ये केवळ कोरोना व्हायरस प्रोटीनचे ठराविक घटक कोड करते, त्यामुळे रोगाचा उद्भव न होताही वास्तविक कोरोना व्हायरस कसा दिसतो याचे रोगप्रतिकारक यंत्रणेस पूर्वावलोकन होते.
5) हे पूर्वावलोकन प्रतिरक्षा प्रणालीस शक्तिशाली अँटीबॉडीज डिझाइन करण्यास वेळ देते, परिणामी ते एखाद्या व्यक्तीस संसर्ग झाल्यास पूर्ण व्हायरस निष्प्रभ करू शकते.
► रशियन स्पुटनिक-5 लस -
1) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीप्रमाणे ही लस पारंपरिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केली गेली आहे.
► कोव्हॅक्सिन -
1) भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही एक निष्क्रिय लस आहे.
2) ती नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजीने (एनआयव्ही) विभक्त केलेल्या कोरोना व्हायरसच्या भागापासून विकसित केली गेली आहे.
► कॅसिनो बायोलॉजिक्स लस -
1) चीनची कॅसिनो बायोलॉजिक्स ही कंपनीने लस विकसित केली आहे.
2) या कंपनीने तिसर्या टप्प्यातील चाचण्यांमधून मिळालेली माहिती जाहीर केलेली नाही.
घटनाक्रम -
• 3 डिसेंबर 2020 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद, हैदराबाद व पुणे येथील प्रयोगशाळांना भेट देऊन कोरोना लसीशी संबंधित प्रगतीचा आढावा घेतला.
• 4 डिसेंबर 2020 : सर्वपक्षीय बैठकीत कोविड-19 लस लवकर उत्पादित करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन
• 5 डिसेंबर 2020 : पहिल्या आठवड्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये सिनोफार्मच्या लसीची चाचणी यशस्वी.
• 6 डिसेंबर 2020 : जगातील सर्वात मोठी लस उत्पादक असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका लस कोविशिल्डच्या मंजुरीसाठी अर्ज केला.
• 8 डिसेंबर 2020 : कोरोना लशीचा सार्वजनिक वापर सुरू करणारा ब्रिटन हा जगातला पहिला देश बनला.
• 9 डिसेंबर 2020 : 60 देशांच्या दूतावासांतील अधिकार्यांची हैद्राबादच्या लस निर्मिती कारखान्यास भेट. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली नाही. परिणामी फायझर, सीरम इन्स्टिटयूट आणि भारत बायोटेक या तीन लशींचे बाजारागमन लांबणीवर पडले.
• 12 डिसेंबर 2020 : ऑस्ट्रेलियात तयार होणारी फ्रेंच कंपनी सनोफीची लस फॉल्स एचआयव्ही पॉझिटिव्ह रिझल्ट देत असल्याने रद्द करावी लागली.
• 14 डिसेंबर 2020 : दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये चीनच्या सिनोफार्म कोव्हिड 19 लसीची चाचणी थांबवली.
• 15 डिसेंबर 2020 : केंद्र सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.
• डिसेंबर 2020 : ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका कंपनीने, ”लॅन्सेट” जर्नलमध्ये तिसर्या टप्प्यातील चाचणीचे तपशीलवार परिपूर्ण विश्लेषण प्रसिद्ध केले. अशाप्रकारची तपशीलवार विश्लेषण जगासमोर आणणारी ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका ही पहिलीच कंपनी ठरली.
लस निर्मिती
लस म्हणजे निष्क्रिय किंवा मृत व्हायरसचा वापर करून आपल्या प्रतिकारशक्तीला जिवंत व्हायरसशी कसे लढायचे याचे ट्रेनिंग देणारी यंत्रणा. लस शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेस विषाणूचा रोग निर्माण करणारा भाग ओळखण्यासाठी प्रशिक्षण देते.
1) लस आणि औषध हे वेगळे प्रकार आहेत. लस आणि औषध आपली प्रतिकारशक्ती वाढवतही नाहीत आणि कमीही करत नाहीत, लस प्रतिकारशक्ती तयार होण्यास मदत करते तर औषध ठरावीक आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रतिकारशक्तीला मदत करते.
2) जगामध्ये सध्या विविध आजारांसाठी 40 च्या आसपास लसी उपलब्ध आहेत तर 20 हजारपेक्षा जास्त प्रकारची औषधे उपलब्ध आहेत.
3) लस ही एखादा ठरावीक आजार भविष्यात होऊ नये म्हणून दिली जाते, औषध (मेडिसिन) मात्र एखादा आजार झाल्यानंतर तो आजार बरा करण्यासाठी देतात, कोणतेही औषध तो आजार तात्पुरता बरा करते. औषधांचे आयुर्मान हे 8 ते 72 तासापर्यंत असते, काही औषधांचे त्याहीपेक्षा अधिक असते. लसींचे आयुर्मान मात्र 10 ते 20 वर्षांपासून अगदी जिवंत असेपर्यंत असते. आयुर्मान म्हणजे कितीवेळ हे औषध किंवा लस शरीरामध्ये कार्यक्षम असेल. उदा. घटसर्पाच्या लसीचे आयुर्मान 10 वर्षे आहे तर हिपॅटायटीस बी लसीचे आयुर्मान 20 वर्षे आहे.
4) लस शरीरातील प्रतिकारशक्तीला विशिष्ट आजाराला विरोध करण्यासाठी तयार करते. औषध मात्र ठरावीक आजार काही दिवसांसाठी आपल्या शरीरातून काढून टाकते, पण तो आजार भविष्यात होणारच नाही अशी खात्री औषध देत नाही. उदा. पोलिओची लस घेतल्यानंतर पोलिओ होत नाही हे सिद्ध झाले, पण सर्दी किंवा तापावरील औषध घेतल्यानंतर काही दिवसानी ते आजार पुन्हा होतात.
5) काही लसी या फक्त एकदा घेऊन त्याचा परिणाम दाखवत नाहीत, त्यासाठी त्या ठरावीक अंतराने पुन्हा घ्याव्या लागतात. उदा. पोलिओची लस एकदाच घेऊन योग्य तो परिणाम दाखवत नसल्याने पोलिओ लसीकरण 1 ते 5 वर्षाच्या बालकांमध्ये पुन्हा पुन्हा केले जाते.
6) कोरोनाची साथ आटोक्यात यावी म्हणून अनेक देशांमधील संशोधक लस तयार करत आहेत लशीमार्फत मानवी शरीरातील प्रतिकारशक्तीला कोविड-19 विषाणूचा परिचय करून दिला जातो. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग एखाद्याला झाला तर त्याला जखडून टाकणारी यंत्रणा शरीरात सज्ज होते. लशीमुळे सक्षम प्रतिप्रथिने (अँटिबॉडीज्) शरीरात निर्माण झाल्याने कोव्हिडची साथ शरीरात किंवा अन्यत्रही पसरणार नाही.
► लस की औषध हे कसे ठरवायचे?
1) कोणत्या आजारासाठी लसीला प्राधान्य द्यायचे की औषधाला हे तो कोणत्या प्रकारचा आजार आहे आहे आणि त्याचे मूळ उगम कशात आहे यावर ठरते, तसेच त्या आजारासाठी लस परवडेल का औषध परवडेल यावर सुद्धा ठरते.
2) जे आजार व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून येतात आणि कमी वेळात मोठ्या लोकसंख्येला संसर्ग करतात तेव्हा असे संसर्गजन्य आजार भविष्यात पुन्हा येऊ पसरू नये म्हणून लस तयार करण्याला प्राधान्य देतात.
3) लसी संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी असतात. तसेच त्या हर्ड इम्युनिटी (कळप रोग प्रतिकारशक्ती) तयार करून संसर्गजन्य आजाराचे समूळ नष्ट करतात.
4) औषधे एखाद्या रोगाचा उपचार, निदान किंवा प्रतिबंध करण्यासाठी दिली जातात. औषधे सामान्यत: एका व्यक्तीच्या आरोग्याच्या फायद्यासाठी असतात, म्हणजेच औषधे संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करू शकत नाहीत.
5) जेे आजार संसर्गाने पसरत नाहीत त्या आजारांना औषधाचा पर्याय निवडतात. काहीवेळा लसीपेक्षा औषध शोधणे आणि ते सर्वांपर्यंत कमी वेळेत पोहोच करणे सोपे जाते. काही आजार संसर्गजन्य असूनसुद्धा त्याना औषधाचा पर्याय दिला जातो कारण तोच सर्वोत्तम पर्याय असतो. उदा. पावसाळ्यात किंवा ऋतू बदलताना ताप येतो, हा ताप काही वेळा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा वातावरणातील बदलामुळे येतो, आणि तो एकाच वेळेला खूप लोकांना येतो तरीसुद्धा यासाठी लस शोधण्यापेक्षा औषध दिले जाते, कारण या तापाचे नक्की एक कारण नसते आणि अशा वेळेला लसीपेक्षा औषध सर्वोत्तम पर्याय ठरतो.
6) काही संसर्गजन्य आजाराला लस तयार करण्यापेक्षा औषध शोधणे सोपे असते, उदा. एड्स हा आजार व्हायरसने होणारा संसर्गजन्य असूनसुद्धा त्यावर औषध शोधले गेले, लस नाही. कारण जवळपास 30 वर्षे संशोधन करून एड्सवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाले तर लसीचे अयशस्वी झाले.
7) कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचा आपल्या शरीरातच मंद गतीने उगम होतो, तसेच हे संसर्गजन्यसुद्धा नाहीत, त्यामुळे अशा आजारांना लसीपेक्षा औषधच उपयोगी पडतेय. सध्या कॅन्सरवर लस शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत पण अशी लस तयार होण्यासाठी कमीत कमी पुढील 10 ते 20 वर्षे लागतील आणि ती सुद्धा शक्यता धूसर आहे.
लसीचा शोध
1) लस संशोधन सर्वात प्रथम विद्यापीठ किंवा सरकारी प्रयोगशाळेत होते, काही खाजगी प्रयोगशाळा पण संशोधन करतात पण ते मर्यादित आणि त्यांचा फायदा असेल तरच करतात.
2) व्हायरसवर संशोधन करणारी संस्था ही आंतरराष्ट्रीय नियमानुसार असावी लागते आणि त्यासाठी बर्याच आंतरराष्ट्रीय परवाने घ्याव्या लागतात, भारतामध्ये अशी एकच सरकारी संस्था आहे. त्यामुळे व्हायरस वर संशोधन करून लस तयार करणे अवघड जाते.
3) एका प्रयोगशाळेत तय्यार झालेली लस-औषध जगातील दुसर्या देशातील प्रयोगशाळेत त्याच प्रकारचे गुणधर्म आणि परिणाम (Results) दाखवत असेल तरच त्यावरील संशोधन पुढे जाते. अशा प्रकारचे संशोधन आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये (जर्नल) प्रकशित केले जाते किंवा त्याचे पेटंट घेतले जाते.
4) प्रयोगशाळेतील लसीचा शेवटचा टप्पा म्हणजे त्या लसींचे प्राण्यावर प्रयोग करून त्याच्या तीव्रतेचे प्रमाण पाहणे, किंवा त्या लसीमुळे प्राण्यांच्या (उंदीर, ससा किंवा माकड) आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहणे. यानंतर या प्रयोगांची सगळी माहिती सरकारी यंत्रणेला सादर करून, मानवी चाचणीसाठी मान्यता घेतली जाते.
उबदार लस प्रकल्प
भारतातील अनेक भागांत उष्ण तापमान असते. तेथे लस सामान्य तापमानातही पूर्ण क्षमतेने दीर्घकाळ टिकणारी पाहिजे. पुढील संस्थांतील संशोधकांनी उबदार लस हा प्रकल्प सुरू केला असून सामान्य किंवा उबदार तापमानाला टिकणारी लस भारतात तयार होण्याची शक्यता आहे -
1) आयआयएस (बंगळूर)
2) आयसर (तिरुअनंतपूरम)
3) टीएचएसटी - ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (फरिदाबाद)
4) आयआयएससी इन्क्युबेटेड स्टार्ट-अप मायनव्हॅक्स
• कोव्हिड विरोधी लशीमधील मुख्य घटक म्हणजे विषाणूचा वैशिष्ट्यपूर्ण (बोथट) काटे बनवणारा एम-आरएनए. त्याने घडवलेल्या प्रथिनांच्या विरुद्ध मानवी शरीरातील प्रतिकारशक्ती जोरदार लढा देते. त्यामुळे विषाणूंचा शरीरभर होणारा संभाव्य फैलाव रोखला जातो. एमआरएनएची रासायनिक जडणघडण आजूबाजूच्या तापमानाला अत्यंत संवेदनक्षम असते. ती रचना बिघडू नये म्हणून उणे 70 अंश तापमानाला लशींचा साठा राखून ठेवावा लागतो. लस तयार झाल्यावर एखाद्या व्यक्तीला टोचेपर्यंत तिचा प्रवास आणि हाताळणी अतिशीत अवस्थेत होते. याला शीत साखळी म्हणतात. काही कारणांमुळे लशीचे तापमान पुरेसे थंड राहिले नाही, तर एम-आरएनएची रचना बिघडून लशीची परिणामकारकता कमी होते.
• कोविड-19 विरोधी काही भारतीय लशींच्या परिणामकारकतेसाठी अतिशीत तापमानाची गरज नसते. त्यांची कार्यक्षमता 2 ते 8 अंश तापमानाला पुरेशी असते. उबदार हवेतही ही लस टिकण्यासाठी एम-आरएनएऐवजी त्याच्या योगे बनणार्या 200 अमिनो आम्लांची साखळीच तयार करण्याचे प्रयत्न भारतीय संशोधकांनी केले. ही साखळी अतिशीत स्थितीत हवा काढून टाकलेल्या पेटीत ठेवली, तर ती कोरडी होऊन तिचा त्रिमितीयुक्त आकार उबदार हवेतही दीर्घकाळ जसाच्या तसा राहतो. याला फ्रीझ-ड्राइंग म्हणतात. ही लस 100 अंश सेल्सिअस तापमानातही किमान 1 सेकंदासाठी स्थिर राहते.
• परदेशी कंपन्यांनी कोविड-19 विषाणूपासून 90 ते 94.5 टक्के बचाव होईल अशा लशी तयार केल्या. मात्र या लशी एखाद्या व्यक्तीला टोचेपर्यंत उणे 68 ते उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या अतिशीत तापमानात सुरक्षित ठेवाव्या लागतात, कारण, या लशी एम-आरएनए (मेसेंजर आरएनए) वर आधारलेल्या आहेत. तसेच या लशी 21 दिवसांच्या अंतराने दोनवेळा लस टोचून घ्याव्या लागतात.
• कोविड-19 विषाणूवरील बोथट काटेरी आवरण ज्या प्रथिनाचे बनलेले असते, ते एकमेकांशी जोडलेल्या 1300 अमिनो आम्लांच्या माळेने तयार झालेले असते. त्या प्रथिनाच्या 250 अमिनो आम्लांची छोटीशी त्रिमितीयुक्त माळ घडविण्याची माहिती या एम-आरएनएकडे असते. हा भाग शरीरातील विशिष्ट पेशींना विशिष्ट जागीच तंतोतंत संलग्न होतो. याला रिसिप्टर बायडिंग डोमेन म्हणतात. संशोधकांनी पेशींवरील ही जागा शोधली, त्याला रिसिप्टर साइट म्हणतात. ही रिसिप्टर साइट म्हणजे अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम, नावाचे एक महत्त्वाचे प्रथिन असते. कोविड-19चा विषाणू पेशीवरील रिसिप्टर साइटला संलग्न होऊन झपाट्याने वाढतो आणि त्यांची संख्या बेसुमार वाढते.
लस चाचणी
अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांना लसीकरण करण्याआधी औषध कंपन्यांना ट्रायल करणं आवश्यक आहे. त्यावेळी मोजक्या स्वयंसेवकांना लस दिली जाते आणि त्याचे काही दुष्परिणाम आहेत हा का याची पहाणी केली जाते. लसीच्या मानवी चाचण्या मुखत्वेकरून मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करणार्या कंपन्या करतात. याचे मुख्य 3 ते 4 विभाग केले जातात.
1) पहिला टप्पा (फेज 1) :
1-10 निरोगी स्वयंसेवक घेऊन, त्यांच्या आरोग्यावर कोणता परिणाम तर होत नाहीना हे पाहिले जाते. या टप्प्यात या औषधाची सुरक्षितता तपासली जाते. म्हणजे लस म्हणून ते उपयोगी असेल/नसेल; पण निदान ते जीवघेणे तरी नाही ना याची खातरजमा केली जाते.
2) दुसरा टप्पा (फेज-2) :
निरोगी स्वयंसेवकांची संख्या 100 ते 500 पर्यंत वाढवली जाते आणि पहिल्या टप्प्यासारखेच आरोग्य परिणाम पहिले जातात. या टप्प्यात लशीमुळे ती घेणार्याच्या शरीरात प्रतिपिंडे तयार होऊन प्रतिकारशक्ती निर्माण होते का, याची नोंद केली जाते.
3) तिसरा टप्पा (फेज-3) :
वरील दोन्ही टप्पे लक्षात घेऊन चाचणीतील घटक संभाव्य लस म्हणून वापरता येईल का हे तपासले जाते. हा टप्पा पूर्णतः वेगळा आणि लसीच्या कार्यक्षमता पाहण्यासाठी महत्त्वाचा असतो. निरोगी लोकांना लस देऊन त्याना रोगी लोकांच्यात पाठवले जाते आणि लस दिल्यावर या लोकांना हा आजार होतो का हे पाहिले जाते.
या टप्प्यावरील चाचणी ही वैज्ञानिक नियमानुसार ”डबल ब्लाइंड” पद्धतीची असते, म्हणजेच रुग्णाला आणि प्रयोग करणार्याला माहीत होऊन दिले जात नाही की नक्की कोणत्या व्यक्तीला लस-औषध दिले आहे. यामध्ये प्लासिबोचा पण वापर केला जातो म्हणजे रुग्णाची चिंता शमवण्यासाठी औषध म्हणून परंतु औषध नसलेले असे काहीतरी दिले जाते.
याच टप्प्यात नंतर काही आजार असणारे (कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब) स्वयंसेवक घेतले जातात.
या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या वांशिकतेचे स्वयंसेवक घेतले जातात. उदा. अमेरिकेत चाचणी सुरु असेल तर आफ्रिकन, भारतीय, चायनीज, युरोपियन अशा लोकांचा समावेश असतो. तसेच महिला, लहान मुले, वृद्ध यांचा सुद्धा समावेश केला जातो. जर लस लहान मुलांसाठी तयार करायची असेल तरुण, किंवा वृद्ध लोकांचा समावेश केला जात नाही.
साधारणपणे वरील सर्व मापदंड वापरून जी माहिती तयार होते ती छाननी करून विश्लेषित केली जाते. तज्ज्ञ समिती औषध नियंत्रकांना याबाबतचा अहवाल देते आणि मग सदर औषध हे लस म्हणून बाजारात आणू द्यायचे किंवा काय, याचा निर्णय घेतला जातो. ज्या देशांमध्ये ती लस विकायची असेल त्या देशातील सरकारी आरोग्य खात्याची किंवा औषध प्रशासनाची मान्यतेसाठी दिली जाते. पूर्वी लस तयार करणार्या कंपन्या स्वतः तयार केलेली माहिती देत होत्या, आत्ता मात्र सर्व सरकारी यंत्रणा एकाच म्हणजे क्लिनिकल डेटा इंटरचेन्ज स्टँडर्ड्स कॉन्सोर्टियम (CDISC) ने ठरवून दिलेल्या स्वरूपामध्ये घेतात.
कोव्हिड लसीची चाचणी
1) एखादी लस तयार करणारी कंपनी जेव्हा जाहीर करते कि त्यांची लस 90 टक्के कार्यक्षम आहे, त्यावेळी 90 टक्के या अंकामागे मात्र खूप माहिती लपलेली असते किंवा खूप प्रक्रिया करून जाहीर केलेली असते. उदा. ऑक्सफर्ड/अॅस्ट्रा झेनेका यांनी त्यांच्या ब्रिटनमधील तिसर्या टप्प्यातील लस चाचणीबाबतचे 3 हजार स्वयंसेवकावर केलेले निष्कर्ष जाहीर केले, यासाठी त्यांच्याकडे जवळपास 5 लाख पानांची कच्ची माहिती गोळा झाली होती. या माहितीचे वेगवेगळ्या पध्दतीने व प्रकारे वर्गीकरण व विश्लेषण केले जाते. उदा: स्वयंसेवकाचे वय आणि लिंग, वजन आणि उंची, वांशिकता, मेडिकल इतिहास (जुने आजार, सर्जेरी झाली आहे का, आधी कोणत्या लसी दिल्या आहेत का, सध्या कोणती औषधे चालू आहेत का) किंवा स्वयंसेवकावर काही प्रतिकूल घटना झाली का, अशा अनेक विभागामध्ये हि माहिती प्रक्रिया केली जाते. या सर्व माहितीच्या विश्लेषणासाठी डेटा सायन्सचे टूल्स वापरले जातात आणि सगळी माहिती योग्य त्या संस्थेकडे जमा केली जाते.
2) लसीच्या इतिहासामध्ये अशी माहिती पूर्वी गुप्त ठेवली जात होती आणि ती फक्त लस तयार करणारी कंपनी आणि सरकारी यंत्रणा यांनाच माहिती असे. ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेकाने यावेळी मात्र जगभरात विविध देशामध्ये केलेल्या तिसर्या टप्प्यातील चाचणीचे तपशीलवार परिपूर्ण विश्लेषण जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल ”लॅन्सेट” मध्ये 8 डिसेंबर 20202 रोजी प्रसिद्ध केले होते. अशा प्रकारची तपशीलवार विश्लेषण जगासमोर आणणारी ऑक्सफर्ड-अॅस्ट्रा झेनेका ही पहिलीच कंपनी ठरली.
स्पुटनिक-5, फायझर-बायोएनटेक, मॉडर्ना - या सर्वांनी त्यांची लस 90 टक्क्यांहून जास्त प्रभाव असल्याचा दावा केला होता.
भारतात तयार होणारी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लस - 70 टक्के प्रभावी असल्याचे आढळले.
3) अशा माहितीचे पुन्हा विश्लेषण सरकारी यंत्रणेकडून केले जाते, काही अजून माहिती हवी असेल तर त्याच्या सूचना दिल्या जातात, किंवा काही बदल करून नवीन चाचण्या घेतल्या जातात. उदा. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका कंपनीच्या कोविड लसीच्या कार्यक्षमतेच्या माहितीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये पुन्हा काही चाचण्या घेतल्या.
4) सरकारी यंत्रणेची परवानगी मिळाल्यावर कंपन्या मोठ्या प्रमाणात लस उत्पादित करून लसीकरणाला सुरुवात केली जाते. काही वेळेला सरकारी लसीकरण कार्यक्रम राबवला जातो (उदा: पोलिओ लसीकरण) तर काही वेळेला खाजगी विक्रीसाठी सुद्धा लस ठेवली जाते (उदा : प्रवास करताना घेतली जाणारी लस).
5) या प्रक्रियेला काही वर्षांचा वेळ लागतो. कोविडची लस मात्र कमी वेळात आली याचे मुख्य कारण म्हणजे सर्वच कंपन्यांनी आणि लस विकसित करणार्या संशोधन संस्थांनी पहिल्या दिवसापासून त्या त्या देशांतील सरकारी यंत्रणेबरोबर काम केले, प्रत्येक टप्प्यातील सर्व माहिती लगेच यंत्रणेला दिली.
6) जगातील बहुतेक देशांचा लस किंवा औषासांठी असणारा आणीबाणी वापर प्राधिकृतता (Emregncy Use Authorization EUA) हा कायदा. या कायद्यामुळे आरोग्य आणीबाणीप्रसंगी लस किंवा औषध जलदगतीने (Fast Track) सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये लसीकरणासाठी नियमित केले जाते.
► लस चाचणी व लसीकरणाला मंजुरी देणारी यंत्रणा -
1) भारतीय औषध नियंत्रक किंवा डीजीसीआय यंत्रणा, भारतात लसीच्या उपयुक्ततेबाबत अंतिम निर्णय घेते. लसीला मंजुरी मिळविणे ही एक दीर्घ प्रक्रिया असते.
2) 9 डिसेंबर 2020 : सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) च्या विषय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक यांच्या आपत्कालीन लस वापर परवानगी अर्जांचा आढावा घेऊन ते नाकारण्यात आले. भारत बायोटेक आणि सीरम या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनास लस दर्जा देण्यासाठी दिलेली माहिती, नमुना संख्या पुरेशी नाही, असा नि:संदिग्ध निर्वाळा या समितीने देऊन या कंपन्यांना नव्याने माहिती सादर करण्यास सांगितले. या समितीसमोर फायझरचा अर्ज सादरच झाला नाही. त्यामुळे त्या लशीस परवाना देण्याचा विचार या समितीने केला नाही.
3) ब्रिटन आणि बहारिनमध्ये मान्यता मिळाल्यानंतर फार्मा कंपनी फायझरने भारतात मंजुरीसाठी अर्ज केला होता.
4) हैदराबादस्थित भारत बायोटेक कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी डीसीजीआयकडे अर्ज करणारा तिसरीब लस उत्पादक कंपनी आहे.
5) डिसेंबर 2020 मध्ये फायझरची लस देण्यास इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असली तरी ब्रिटनच्या आरोग्य नियंत्रकांनी लशीबाबत सावधानतेचा इशारा दिला.
6) 9 डिसेंबर रोजी झालेल्या केंद्रीय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत सीरम इन्स्टिटयूटला दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील भारतातील चाचण्यांचा अहवाल देण्यास सांगण्यात आले. तसेच या लशीबाबत इंग्लंडच्या औषध नियंत्रकांचा अहवालही सीरमने सादर करावा असे या समितीने स्पष्ट केले. सीरम कंपनीच्या तिसर्या टप्प्यातील चाचण्या नोव्हेंबरच्या मध्यात सुरू झाल्या आणि फेब्रुवारी 2021 पर्यंत त्या चालणे अपेक्षित आहे. सीरमने आपल्या लशीचा इंग्लंड, ब्राझील, दक्षिण अफ्रिका येथील चाचण्यांचा तपशील समितीस सादर केला. मात्र या कंपनीने स्वत: घेतलेल्या चाचण्यांची नमुना संख्या फक्त 1600 इतकी होती. याच्या बरोबरीने फायझरने आपल्या कंपनीच्या लशींच्या चाचण्यांचा आग्रह भारताने धरू नये, अशी विनंती केली होती. या कंपनीच्या लशीस इंग्लंडने मान्यता दिलेली असल्याने पुन्हा नव्याने चाचण्यांची काय गरज असा या कंपनीचा युक्तिवाद होता.
• फ्रेंच कंपनी सनोफी व ब्रिटनची बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी जीएसकेच्या म्हणण्यानुसार त्यांची कोरोना लस 2021 च्या अखेरीस तयार होण्याची शक्यता आहे. ही घोषणा लसीचे अंतिम परीक्षण करण्यात आल्यानंतर झाली.
लशींची आवश्यकता व खर्च
अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक करोनाचा संसर्ग फैलाव झाला. त्यामुळे भारतात करोनाला अटकाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मोठा खर्चही अपेक्षित आहे.
2) जागतिक आरोग्य संघटनेच्या गावी वॅक्सीन अलायन्स (GAVI) या संस्थेच्या माहितीनुसार, भारताला करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 103 अब्ज ते 132 अब्ज रुपये खर्च करावे लागणार आहेत.
3) अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक करोनाबाधिते आहेत. भारतात आगामी सहा ते 8 महिन्यांत 30 कोटी लोकांना लशीचे डोस देण्याची तयारी सुरू आहे. ब्रिटनची एस्ट्राजेनका, रशियाची स्पुटनिक, जायडस कॅडिला आणि भारताच्या बायोटेक या लशींकडून मोठी अपेक्षा आहे. भारताला लोकसंख्येच्या मानाने लसीकरणासाठी किमान 60 कोटी डोसची आवश्यकता आहे.
4) भारताला कोवॅक्स फॅसिलिटीच्या माध्यमातून 19 ते 25 कोटी डोस उपलब्ध झाले तरी इतर डोसच्या खरेदीसाठी सरकारला 103 अब्ज रुपये खर्च करावे लागतील. मात्र 9.5 कोटी ते 12.5 कोटी डोस उपलब्ध झाल्यास उर्वरीत डोसच्या खरेदीसाठी 133 अब्ज रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.
► कोवॅक्स -
1) जगभरातील विविध आजारांच्या लशींच्या समन्वयाचे काम करणार्या गावी वॅक्सीन अलायन्सने लशीच्या किंमती ठरवण्याबाबत पुढाकार घेतला. जगभरात लशींचे वितरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कोवॅक्स केंद्राची स्थापना करण्यात आली.
2) करोनाविरोधातील लशीकरण मोहिमेतून गरीब, विकसनशील देश वंचित राहू नये यासाठी कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली. कोवॅक्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील 60 टक्के बालकांसाठी लशीकरण मोहीम राबवणारी GAVI सह सार्वजनिक-खासगी संस्था आदींचा सहभाग आहे. गावी या संस्थेला बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येतो.
कोरोना लसीचा पुरवठा
• कोरोनाची संक्रमण चेन तुटेल इतक्या लोकांना सुरुवातीला कोरोनाची लस देण्यासाठी भारताने जगभरातील विविध कंपन्याकडे कोरोना लसीचे जास्तीत जास्त डोस विकत घेण्यासाठी नोंदणी केली आहे. सध्या हा आकडा 1.6 बिलियन इतका आहे. याद्वारे (प्रती व्यक्ती 2) भारताची 59 टक्के लोकसंख्या कव्हर होते. अमेरिकेतील ड्युक विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार लसीचे डोस खरेदी करण्यात धनाढ्य आणि विकसनशील देश यांच्यात मोठी दरी आहे. धनाड्य देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या अनेक पटीने लसीचे डोस विकत घेऊन ठेवले आहेत. त्यामुळे विकसनशील आणि अविकसित देशांकडे सर्वांनी पुरतील असे लसीचे डोस नाहीत. अनेक धनाढ्य देशांनी त्यांच्या लोकसंख्येच्या चार ते पाच पट जास्त डोस विकत घेऊन ठेवले.
डिसेंबर 2020 मधील याबाबतची आकडेवारी (अमेरिकेतील ड्युक विद्यापीठाच्या अभ्यासानुसार) -
1) लसीचे डोस विकत घेण्याची मागणी नोंदविण्यात भारत अग्रेसर-1.6 बिलियन (160 कोटी) डोस
2) युरोपियन युनियन - 1.36 बिलियन (136 कोटी) डोस - लोकसंख्येच्या 244 टक्के
3) अमेरिकेका - 10 कोटी डोस - लोकसंख्येच्या 443 टक्के
4) कॅनडा - लोकसंख्येच्या 601 टक्के.
5) युके - लोकसंख्येच्या 418 टक्के.
6) ऑस्ट्रेलिया - लोकसंख्येच्या 266 टक्के
7) मेक्सिको - लोकसंख्येच्या 84 टक्के
8) ब्राझील - लोकसंख्येच्या 46 टक्के
9) कझाकिस्तान - लोकसंख्येच्या 15 टक्के
10) फिलिपिन्स - लोकसंख्येच्या 1 टक्के
कोरोना लसीकरण मोहीम
14 डिसेंबरला केंद्र सरकारने कोरोना सार्वजनिक लसीकरण नियमावली जाहीर केली. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं नियोजन आहे. तसेच ऑगस्ट 2021 पर्यंत 60 कोटी लोकांना लस दिली जाईल.
भारतामध्ये कोव्हिड 19 वरच्या कोणत्याही लशीला मान्यता देण्यात आलेली नाही. पण मान्यता मिळून लशीचे डोस उपलब्ध झाल्यावर ही लसीकरण मोहीम कशी राबवायची यासाठीचे नियोजन (डिसेंबर 2020) केले गेले आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा स्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुका स्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे. मुंबई महापालिकेने एक स्वतंत्र टास्क फोर्स उभारलेला आहे.
लसीकरणावर देखरेख करणारी यंत्रणा -
1) राज्यस्तरीय सुकाणू समिती
2) राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष
3) जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष,
4) तालुकास्तरावर तालुका कृती दल, तालुका नियंत्रण कक्ष
राज्यस्तरीय सुकाणू समिती
• कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन. या समितीमध्ये शासनाच्या विविध 18 विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव सदस्य असून जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, युएनडीपी, जॉन स्नो इंटरनॅशनल, क्लिटंन हेल्थ क्सेस इनिशिएटीव्ह, रोटरी इंटरनॅशनल, लायन्स क्लब, डिफेन्स इस्टॅबलिशमेंट आणि रेल्वे यांचा विकास भागीदार म्हणून समावेश आहे.
• लसीकरणासाठी प्राधान्यक्रम -
राज्यातल्या 12 कोटीपैकी 3 कोटी लोकांना पहिल्या टप्प्यामध्ये लस देण्याचे नियोजन -
1) पहिला गट : शासकीय आणि खासगी दवाखान्यातील आरोग्यसेवक कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार आणि एकात्मिक बालविकास प्रकल्पातील कर्मचारी यांचा या गटात समावेश करण्यात आला आहे. आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी नऊ गटात वर्गीकरण करण्यात आलंय.
2) दुसरा गट : फ्रंटलाईन वर्कर्स. यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचार्यांचा समावेश करण्यात आलाय.
3) तिसरा गट : 50 वर्षावरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत अशा 50 वर्षाखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.
► केंद्र /महाराष्ट्र सरकारने लस देण्यासाठी ठरविलेला लाभार्थींचा प्राधान्यक्रम-
1) आरोग्य क्षेत्रात काम करणारे मनुष्यबळ (देशात 1 कोटी लाभार्थी)
2) पोलिस व सशस्त्र दल
3) 50 वर्षांच्या पुढचे लोक - प्राधान्य वयोगट निश्चित करण्यासाठी अलीकडच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतदारयाद्यांचा आधार.
4) ज्यांना अनेक व्याधी आहेत अशा 50 वर्षाच्या आतले लोक
5) या सर्वांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच सर्वसामान्य नागरिकांना उपलब्धतेनुसार लस
► लशीसाठी नोंदणी -
1) देशभरात लसीकरणासाठीची नोंदणी मतदार याद्यांच्या धरतीवर. त्यांचा वापर करून विविध वयोगटातली लोकं शोधून त्यांची नोंदणी को-विन म्हणजे कोव्हिड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. फक्त यावर नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल. ऑन द स्पॉट नोंदणी केली जाणार नाही.
2) डिजीटल प्लॅटफॉर्मवर लसीकरणासाठी नोंदणी करताना छायाचित्र असलेल्या 12 ओळखपत्रपैकी एक ओळखपत्र आवश्यक - मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तिवेतन कागदपत्रे, इत्यादी.
3) लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी निवडणूक मतदान प्रक्रियेच्या धर्तीवर केली जाणार.
4) कोरोना लसीकरणामुळे राज्यातील नियमित लसीकरण मोहिमेला बाधा येणार नाही याची खबरदारी घेऊन कोरोनाच्या लसीकरण मोहिमेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येणार.
► भौतिक यंत्रणा -
1) शीतगृहांची उपलब्धता - महाराष्ट्रात राज्यस्तरीय 1, विभागीय स्तरावर 9, जिल्हास्तरावर 34, महामंडळांचे 27 शीतगृहे. शिवाय 3 ,135 साखळी केंद्र उपलब्ध.
2) लसीकरण बूथमध्ये लसीकरणाच्या यादीत नाव असलेल्या आरोग्य कर्मचार्याला ओळखपत्र तपासून प्रवेश.
लसीकरणानंतर व्यक्तीच्या मोबाईलवर संदेशासहित क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र पाठविणार.
3) लस असलेला बॉक्स, बाटली किंवा आईस-पॅक थेट सूर्यकिरणाच्या संपर्कात येऊ नये, यासाठी उपाययोजना.
4) लाभार्थी लसीकरणासाठी केंद्रावर येईपर्यंत, लस आणि तीव्रता कमी करणारे द्रव (डायल्युअंट) हे लसवाहकामध्ये (व्हॅक्सिन कॅरिअर) झाकणबंद अवस्थेत.
5) लशीच्या कुप्यांवर संरक्षण करणारे व्हीव्हीएम आणि लेबलवर वैधता मुदत नमूद केलेली नसली तरी अशा लशीचा वापर करता येणार.
6) लसीकरण सत्राच्या अखेरीस सर्व शीतपेट्यांसह लस वाहक आणि लसीच्या न उघडलेल्या कुप्या वितरण करणार्या केंद्राकडे परत पाठवणार.
7) लस टोचून घेण्यासाठी व्यक्ती आल्यानंतरच लस साठवलेल्या ठिकाणाहून बाहेर काढली जाईल.
8) लसीकरण केंद्रात प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण केंद्र, जास्त व्यक्तींना थांबण्याची व्यवस्था.
मुंबईतील कोरोना लसीकरण -
1) मुंबईत लसीकरणासाठी एक स्वतंत्र टास्क फोर्स.
2) लसीकरण करण्यासाठी पाचजणांचे एक, याप्रमाणे मुंबईत सुमारे 500 पथके
3) ज्या लोकांचं लसीकरण होणार त्यांना त्यांच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर मेसेज
4) कांजूरमार्ग येथे एक सुमारे 5,000 चौरस फुटांचे प्राादेशिक लस भांडार - Regional Vaccine Store.
5) या टास्क फोर्सचे प्रमुख - सुरेश काकाणी
कोव्हिड व्हॅक्सीन ऑपरेशनल गाईडलाईन्स -
1) कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीच्या लशी उपलब्ध होतील, त्यानुसार नियोजन. लशींची सरमिसळ होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात शक्यतो एकाच उत्पादकाच्या लशीचे डोस.
2) दर दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांनाच लस.
3) एकावेळी एकाच व्यक्तीला लस.
4) प्रत्येक दिवशी एका सत्रात 100 ते 200 लोकांचे लसीकरण
5) लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम पाहण्यासाठी 30 मिनिटे देखरेख
6) जर एका केंद्रावर 200 जणांना लस देण्यात येणार असेल तर, 1 अतिरिक्त अधिकारी.
7) लसीकरण पथकामध्ये 5 सदस्यांचा समावेश
8) आरोग्य कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर व्यवस्था करण्यात येणार असून एका ठिकाणी 100 जणांना लसीकरणाची व्यवस्था.
► लसीकरणासाठीची तयारी (डिसेंबर 2020) -
1) शासकीय आरोग्य संस्थेतील 99 टक्के आरोग्य कर्मचार्यांचा डेटा पूर्ण
2) खासगी आरोग्य संस्थेतील कर्मचार्यांचा डेटा 78 टक्के पूर्ण
3) लस टोचण्यासाठी 16, 245 कर्मचार्यांची को-विन पोर्टलवर नोंदणी
4) को-विन पोर्टलवर 90 हजारांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी
5) सुमारे 2.60 लाख शासकीय आरोग्य कर्मचार्यांना लसीकरण नियोजित
► भारतात वापरल्या जाणार्या लशी -
1) सीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकॉव्ह बी आणि रशियाची स्पुटनिक 5 या चार लशी भारतात उपलब्ध होतील कारण या चार लशी साठवण्यासाठी हे तापमान सुयोग्य आहे.
4) फायझरच्या आणि मॉडर्नाच्या लशी साठवण्यासाठी अति-थंड तापमानाची गरज आहे. 2021 च्या दुसर्या सहामाहीपर्यंत मॉडर्ना किंवा फायझरच्या लशींचा भारताला पुरवठा होणे अपेक्षित नाही.
3) भारतामध्ये लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात येत असून इथे 2 ते 8 अंश सेल्शियस तापमानामध्ये लशी साठवून ठेवता येणार.
► लसीकरणाची सुरुवात -
1) पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट भारतामध्ये ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचं उत्पादन करते आणि या लशीच्या चाचण्या घेते. लशीला मान्यता मिळण्यासाठी त्यांनी भारतातल्या नियामकांकडे अर्ज केलेला आहे.
2) नियंत्रकांनी परवानगी दिली तर भारताची लसीकरण मोहीम जानेवारी 2021 मध्ये सुरू होईल.
लसीकरणाचे दुष्परिणाम हाताळण्याची भारताची योजना
► कोव्हिड लसीकरणाच्या संभाव्य दुष्परिणाम हाताळण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा आराखडा -
1) सौम्य, मध्यम आणि गंभीर दुष्परिणामांच्या नियोजनासाठी तयारी करणे.
2) ब्लॉक पातळीवर किमान 1 एइएफआय केंद्र -लसीकरणानंतर उद्भवणारे दुष्परिणाम हाताळण्यासाठीचे केंद्र (AEFI - Adverse Effects Following Immunisation Centre )
3) एइएफआय केंद्राचे ठिकाण - प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, खासगी दवाखाने किंवा वैद्यकीय तसंच निमवैद्यकीय कर्मचारी असलेले ठिकाणी
4) प्रत्येक लसीकरण केंद्र एका एइएफआय केंद्राशी संलग्न
5) कोणत्याही दुष्परिणामांची माहिती को-विन (Co-WIN) मार्फत
► कोव्हिड लशींच्या चाचण्यांदरम्यान आढळलेले दुष्परिणाम -
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने फायझर-बायोएनटेकच्या लशीचे जाहीर केलेले संभाव्य दुष्परिणाम-
1) लस टोचलेल्या ठिकाणी सूज येणे
2) थकवा
3) डोकेदुखी
4) स्नायूदुखी
5) हुडहुडी भरणे
6) सांधेदुखी
7) ताप
हर्ड इम्युनिटी -
1) जर अनेक लोकांना लस मिळाली तर आपोआपच ज्यांना मिळाली नाही ते पण सुरक्षित होतात.
2) जर मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली गेली तर व्हायरसला पसरण्यापासून रोखता येतो.
प्रश्नमंजुषा (61)
1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) फायझरया अमेरिकन कंपनीची कोरोना लस जर्मनीमध्ये विकसित करण्यात आली.
ब) मॉडर्ना या जर्म्न कंपनीची कोरोना लस अमेरिकेत विकसित करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
2) सामान्य किंवा उबदार तापमानाला टिकणारी कोरोना लस विकसित करण्याचे संशोधन येथे सुरु आहे -
अ) आयआयएस (बंगळूर)
ब) टीएचएसटी - ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (फरिदाबाद)
क) आयसर (पुणे)
ड) भारत बायोटेक (हैद्राबाद)
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ड
2) फक्त अ आणि ब
3) फक्त क आणि ड
4) वरील सर्व
3) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : कॅन्सर, मधुमेह व उच्च रक्तदाब अशा आजारावर लसीपेक्षा औषध उपयोगी पडते.
कारण (र) : हे रोग संसर्गजन्य नसून त्यांचा मानवी शरीरात मंद गतीने उगम होतो.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
4) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) लसींचे आयुर्मान 10 वर्षांपासून ते व्यक्ती जिवंत असेपर्यंत असते.
2) घटसर्पाच्या लसीचे आयुर्मान 10 वर्षे आहे
3) हिपॅटायटीस बी लसीचे आयुर्मान 5 वर्षे आहे.
4) पोलिओ लसीकरण 1 ते 5 वर्षाच्या बालकांमध्ये पुन्हा पुन्हा केले जाते.
5) खालीलपैकी कोणत्या कोरोना लशींची निर्मिती चाचणी भारतात होत आहे ?
a) चिनी कंपनी सायनोव्हॅकची कोरोनाव्हॅक लस
b) रशियन कंपनी गेमालये रिसर्चची गॅमकोव्हिडव्हॅक/स्पुटनिक -5 लस
c) जर्मन कंपनी बायोएनटेकची टोझिनामेरान लस
d) चिनी कंपनी सिनोफार्माची बीबीआयबीपी कोरोव्हॅक लस
e) फ्रेंच कंपनी सनोफीची लस
f) अमेरिकन कंपनी नोव्हावॅक्सची कोविड -1 लस
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (b), (f)
3) (b), (e) (f)
4) (b), (c), (f)
6) जगात सर्वप्रथम कोणत्या देशात कोरोना लसीकरण करण्यात आले?
1) फ्रान्स
2) जर्मनी
3) इटली
4) ब्रिटन
7) लस आणि औषध यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) लस आणि औषध प्रत्यक्षात प्रतिकारशक्ती वाढवतही नाहीत आणि कमीही करत नाहीत.
ब) लस प्रतिकारशक्ती तयार करण्यास मदत करते.
क) जे आाजार संसर्गाने पसरत नाहीत त्या आजारांना लसीचा पर्याय निवडतात.
ड) औषध ठरावीक आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी अप्रत्यक्षपणे प्रतिकारशक्तीला मदत करते.
इ) औषधे एखाद्या रोगाचा उपचार, निदान किंवा प्रतिबंध करण्यासाठी दिली जातात.
फ) एखादा ठरावीक आजार भविष्यात होऊ नये म्हणून लस दिली जाते.
ग) लसी संपूर्ण लोकसंख्येचे रक्षण करण्यासाठी असतात.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) क वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
8) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) कोरोनाविरोधी संपूर्ण रोग प्रतिकारशक्तीसाठी कोणत्याही लशीचे 2 डोसेस घेणे गरजेचे आहे.
2) फायजर लस निर्मितीसाठी एमआरएनए तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
3) मॉडर्ना लस निर्मितीसाठी डीएनए रिकाँबिनण्ट तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
4) झायडस कॅडिलाची लस ही स्वदेशी म्हणजे भारतात (अहमदाबाद) विकसित झालेली आहे.
9) भारतामध्ये कोविशील्ड या लसीच्या विकासामध्ये खालीलपैकी कोणत्या संस्था सहभागी आहेत ?
अ) रेड्डीज लॅबोरेटोरीज
ब) अॅस्ट्रॅजेनेका
क) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी व सीरम इंडिया
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क
10) कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन) हे काय आहे?
1) भारतात कोव्हिड लसीकरणासाठी नोंदणी करणारी डिजिटल यंत्रणा
2) जागतिक आरोग्य संघटनेची कोव्हिड लसीकरणासाठी नोंदणी करणारी डिजिटल यंत्रणा
3) मोफत कोव्हिड लसीकरणासाठी नोंदणी करणारी सिरम इंडियाची डिजिटल यंत्रणा
4) भारतात कोव्हिड लसीकरण चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी करणारी आयसीएमआरची यंत्रणा
11) कोव्हॅक्सिन लशी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) ही लस नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ व्हायरॉलॉजीने (एनआयव्ही) विभक्त केलेल्या कोरोना व्हायरसच्या भागापासून विकसित केली गेली आहे.
ब) या लस निर्मितीसाठी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मदत केली.
क) ही लस हैद्राबादच्या भारत बायोटेकने उत्पादित केली आहे.
ड) या लसीच्या निर्मितीसाठी एमआरएनए तंत्रज्ञान वापरले गेले आहे.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
12) एड्स हा आजार व्हायरसने होणारा संसर्गजन्य रोग असूनसुद्धा त्यावर औषध शोधले गेले, लस नाही. कारण ....
a) एखाद्या आजाराच्या प्रसाराचे एकच कारण नसते, त्यावेळेला लसीपेक्षा औषध सर्वोत्तम पर्याय ठरतो.
b) 30 वर्षे संशोधन करून एड्सवरील औषधांचे प्रयोग यशस्वी झाले तर लसीचे अयशस्वी झाले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
13) भारतीय संशोधकांनी कोणते तंत्रज्ञान वापरुन उबदार हवेतही कोरोना लस टिकण्यासाठी एम-आरएनएऐवजी त्याच्या योगे बनणार्या 200 अमिनो आम्लांची साखळी तयार केली?
1) ड्राय-फ्राइंग
2) फ्रीझ-ड्राइंग
3) टी-आरएनए
4) कोल्ड चेन
14) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (लसीचे नाव) स्तंभ ब (निर्माण करणारी कंपनी)
अ. कोव्हॅक्सिन I. कॅडिला हेल्थकेअर
ब. कोविड -1 II. नोव्हावॅक्स
क. कोविशील्ड III. भारत बायोटेक
ड. झायकोव्हॅक IV. सीरम इंडिया
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III I II
15) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : फायझर लशींचा साठा उणे 70 अंश तापमानाला राखून ठेवतात.
कारण (र) : तापमान पुरेसे थंड नसेल एम-आरएनएची रचना बिघडून लशीची परिणामकारकता कमी होते.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
16) खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा.
अ) ब्रिटनमध्ये कोरोना सार्वजनिक लसीकरणास सुरुवात.
ब) संयुक्त अरब अमिरातीमध्ये चीनच्या सिनोफार्म लसीची चाचणी यशस्वी.
क) कोरोना लसींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदाबाद, हैदराबाद व पुणे येथील प्रयोगशाळांना भेट
ड) दक्षिण अमेरिकेतील पेरू देशामध्ये चीनच्या सिनोफार्म कोव्हिड 19 लसीची चाचणी थांबवली गेली.
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड
2) क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - क
4) क - ब - अ - ड
उत्तरे : प्रश्नमंजुषा (61)
1-1
2-2
3-1
4-3
5-2
6-4
7-3
8-1
9-3
10-1
11-1
12-2
13-2
14-3
15-1
16-4