राज्य पक्षी सप्ताह : 5 ते 12 नोव्हेंबर
पक्षी निरीक्षण व संवर्धनाबाबत डॉ. सलीम अली आणि साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचे मोठे योगदान आहे. साहित्यिक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन 5 नोव्हेंबर आणि जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन 12 नोव्हेंबर. त्यामुळे राज्य शासनातर्फे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हा सप्ताह ‘राज्य पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
1) 1924 सालापासून डॉ. सलीम अली यांनी पक्षी निरीक्षणास सुरुवात केली. त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्राचे प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्येही काम केले. त्यांनी भारतात सुगरण पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. त्यांनी 1943 मध्ये लिहिलेले ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस’ हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे मानले जाते. त्यात पक्षांच्या सवयी, राहणी, जाती, उपजाती, मानवी हस्तक्षेपांमुळे पक्ष्यांचे बदलते जीवन यावर शास्त्रीय लिखाण केले. भरतपूर येथील केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान व केरळमधील सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात हानिकारक प्रकल्पाला सलीम अलींनी विरोध करताना ‘ताजमहाल नष्ट झाला, तर परत बांधता येईल; पण सायलंट व्हॅलीसारखे जंगल नष्ट झाले तर परत उभारता येणे केवळ अशक्य आहे,’ हे भारत सरकारला ठणकावून सांगितले. अखेर पर्यावरणाचे महत्त्व जाणून त्यावेळच्या इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने हे प्रकल्प स्थगित केले.
2) मारुती चितमपल्ली यांनी वनाधिकारी म्हणून 36 वर्षे नोकरी केली. 65 वर्षे जंगलात राहून जंगलातील वन्यजीवांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ‘जंगलाच देणं’ व ‘केशराचा पाऊस’ या साहित्यातून जंगलातील प्राणी, मानवी जीवन व पक्ष्यांचे मनोभावे दर्शन घडते. या दोन महान व्यक्तींच्या जन्मदिनी हा राज्य पक्षी सप्ताह साजरा होत आहे. ही शासनाची दूरदृष्टी महत्त्वाची आहे.
3) जंगलात मानवी हस्तक्षेप वाढून जंगलातील अन्न साखळी नष्ट झाल्याने पशु, पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली. जंगल, वने, डोंगर, टेकडी, दरी भागात 1972 च्या दुष्काळी परिस्थितीनंतर विदेशी झाडांची घुसखोरी झाली आणि त्यांचा पसारा वाढला. शिवाय जंगलतोड, रस्ते विकास यामुळे पशु पक्ष्यांचे स्थलांतर झाले. हे स्थलांतर परिसंस्थेच्या विनाशाला कारणीभूत ठरले.
4) पर्यावरणासाठी देशी पद्धतीची व आयुर्मान जास्त असलेली, खोलवर रुजणारी झाडे लावण्याबाबत जनजागृती झाली पाहिजे. अंगणात तुळस सोडली तर सारी रोपटी विदेशी असतात. त्यामुळे अंगणात फुलपाखरे व लहान पक्षी बागडत नाहीत.
5) परदेशी झाडांवर कधीही पक्षी बसत नाहीत आणि घरटी करीत नाहीत. विदेशी झाडांना फळे व फुले लगडत नाहीत, त्यामुळे पोपट, मैना, साळुंकी, सुतार पक्षी, धीवर, घुबड, घार, ससाणा, बगळे, माळढोक, पावश्या असे पक्षी हळूहळू नाहीसे होत आहेत.
6) शेतात व शेत बांधावर तणनाशक मारल्याने अनेक प्रकारची जैवविविधता नष्ट झाली. त्यामुळे यावर टिकणारे कीटक, फुलपाखरे, पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले व शेतावरील पक्षी अदृश्य झाले.
7) सन 1972 नंतरच्या वनीकरण कार्यक्रमातून परदेशी झाडांचे रोपण होत असताना जुनी झाडे, काटेरी झुडपेही नष्ट झाली. यात वनौषधीही होत्या. त्यास रंगीबेरंगी फुले असत. या फुलांवरून मधमाशी मध गोळा करत असे. त्यामुळे डोंगरदर्यात हमखास मध मोहळ दिसत असे. परदेशी झाडांना ना फुले, ना फळे. त्यामुळे मधमाश्यांच्या जीवनावरही परिणाम झाला आहे. मधमाश्या नाहीशा होणे हे मानवासाठी हानिकारक आहे.
8) सतत वणवे लागल्याने फूल येणारे तृण नाहीसे झाले. त्यामुळे फुलपाखरेसुद्धा अदृश्य झाली आहेत.
9) पक्ष्यांना स्वतःचे असे अंगभूत ज्ञान असते. कुठे घरटे बांधायचे, अन्न शोधणे, फिरून घरट्याकडे येणे हे त्यांचे निश्चित असते. परंतु, वनतोडीमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आहे. लहान पक्ष्यांचे व सरपटणार्या प्राण्यांचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून काटेरी झुडपे, गवत, पाणवठे, फुले, फळे देणारी झाडे यांची निवड करून त्यांची लागवड केली पाहिजे.
प्रश्नमंजुषा (13)
1. ‘ताजमहाल नष्ट झाला, तर परत बांधता येईल; पण सायलंट व्हॅलीसारखे जंगल नष्ट झाले तर परत उभारता येणे केवळ अशक्य आहे,’ हे भारत सरकारला कोणी ठणकावून सांगितले होते ?
a ) मारुती चितमपल्ली
b) इंदिरा गांधीं
c) डॉ. सलीम अली
पर्यायी उत्तरे -
1) (a)
2) (b)
3) (c)
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2. काटेरी झुडपे, गवत, पाणवठे, फुले, फळे देणारी झाडे यांची लागवड केल्यास काय होईल ?
a) विदेशी झाडांची घुसखोरी थांबेल
b) लहान पक्ष्यांचे व सरपटणार्या प्राण्यांचे संवर्धन
c) जैवविविधता नष्ट होणार नाही.
पर्यायी उत्तरे -
1) विधाने (a) आणि (b) बरोबर, (c) चुकीचे.
2) विधाने (b) आणि (c) बरोबर, (a) चुकीचे
3) विधाने (a) आणि (c) बरोबर, (b) चुकीचे
4) सर्व विधाने बरोबर आहेत.
3. मारुती चितमपल्ली यांच्याबाबत चुकीचे विधान शोधा-
a) त्यांनी ‘जंगलाच देणं’ व ‘केशराचा पाऊस’ हे ग्रंथ लिहिले.
b) त्यांनी 65 वर्षे जंगलात वास्तव्य केले.
c) त्यांच्या जन्मदिनी राज्य पक्षी सप्ताह सुरु होतो.
d) त्यांनी सुगरण पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला.
e) त्यांनी वनाधिकारी म्हणून 36 वर्षे नोकरी केली.
f) त्यांच्या जन्मदिनी राज्य पक्षी सप्ताहाचा समारोप होतो.
पर्यायी उत्तरे :
1) (c) फक्त
2) (c), (f) फक्त
3) (d), (f) फक्त
4) (f) फक्त
4. भारतात कशामुळे विदेशी झाडांची घुसखोरी झाली आणि त्यांचा पसारा वाढला?
a) 1972 नंतरच्या वनीकरण कार्यक्रमामुळे
b) 1972 च्या दुष्काळी परिस्थितीनंतर
c) 1986 च्या वन कायद्यामुळे
पर्यायी उत्तरे -
1) (a)
2) (b)
3) वरील दोन्ही
4) वरीलपैकी कोणतेही नाही
5. डॉ. सलीम अली यांच्यांशी संबंधित घटनांचा योग्य क्रम लावा-
a) ‘द बुक ऑफ इंडियन बर्डस’ ग्रंथाचे लेखन
b) पक्षी निरीक्षणास सुरुवात
c) जर्मनीमध्ये पक्षीशास्त्राचे प्रशिक्षण
d) इंग्लंडमध्ये नोकरी
पर्यायी उत्तरे :
1) (b), (c), (a), (d)
2) (b), (c), (d), (a)
3) (c), (b), (d), (a)
4) (c), (a), (b), (d)
6. खालील जोड्या जुळवा ः
स्तंभ अ (प्रक्रिया) स्तंभ ब (परिणाम)
अ. पशु पक्ष्यांचे स्थलांतर I. मधमाश्यांच्या जीवनावर परिणाम झाला.
ब. शेतात व शेत बांधावर तणनाशक फवारणी ~ II. फुलपाखरे अदृश्य झाली.
क. परदेशी झाडांचे रोपण III. जैवविविधता नष्ट झाली.
ड. वनातील सततचे वणवे IV. परिसंस्थेच्या विनाशाला कारणीभूत
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) IV III II I
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III I II
1-3
2-2
3-3
4-3
5-2
6-4