प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्नमंजुषा (45)
- 08 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 342 Views
- 1 Shares
मासातोशी कोशिबा
3 डिसेंबर 2020 - विश्वातील न्यूट्रिनो कणांचे अस्तित्व सांगणारे ज्येष्ष्ठ वैज्ञानिक मासातोशी कोशिबा यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. कोशिबा हे उत्तम प्राध्यापक होते. ते टोकियो विद्यापीठात प्राध्यापक होते. तरुणांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी सायन्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. नोबेल पुरस्कारातून मिळालेला पैसा या संस्थेसाठी खर्च केला.
1) मध्य जपानमधील तोयोहाशी हे त्यांचे मूळ स्थान. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण टोकियो विद्यापीठात झाले व नंतर त्यांनी अमेरिकेत जाऊन अभ्यास केला. अमेरिकेतून ते 1958 मध्ये जपानला परत आले व देशासाठी विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
2) क्ष किरण दुर्बिणीतून विश्वाच्या प्रतिमा घेऊन न्यूट्रिनो कणांचे अस्तित्व वर्तवणार्या इटालियन वैज्ञानिक रिकाडरे यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली.
3) 2002 मध्ये त्यांना पेनसिल्वेनिया विद्यापीठाचे दिवंगत वैज्ञानिक रेमंड डेव्हिस ज्युनियर यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक नोबेल मिळाले होते.
4) न्यूट्रिनो कण शोधण्यासाठी लागणार्या शोधक उपकरणे लागतात त्यावर कोशिबा यांनी काम केले. मध्य जपानच्या डोंगराळ भागातील वेधशाळेत त्यांचे कॅमीओकांडे न्यूट्रिनो शोधक यंत्र बसवण्यात आले. जमिनीत 1000 मीटर खोलीवर जस्त व शिशाच्या खाणीत ही न्यूट्रिनो शोधक प्रयोगशाळा आहे. या वेधशाळेचा वापर करून त्यांचे शिष्य ताकाआकी काजिता यांनी न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते हा शोध त्यांनी लावला होता. त्याबद्दल यांना 2015 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल मिळाले.
► न्यूट्रिनो कण -
1) सूर्यावर ज्या घडामोडी होत असतात त्यांचा वेध अप्रत्यक्षपणे न्यूट्रिनो कणांच्या मदतीने घेता येतो.
2) सूर्याच्या केंद्रस्थानी न्यूट्रिनो कणांची निर्मिती झाल्यामुळे सूर्य प्रकाशमान दिसतो.
3) न्यूट्रिनो कणांना वस्तुमान असते.
4) अतिनवतार्यांच्या स्फोटातून न्यूट्रिनो बाहेर पडतात. विश्वातील सर्वात प्रकाशमान वस्तूंपैकी एक म्हणजे अतिनवतारे.
महाशय धरमपाल गुलाटी
3 डिसेंबर 2020 - देशातील एमडीएच मसाले व्यापारी ब्रँडचे प्रमुख धर्मपाल गुलाटी यांचे 98 व्या वर्षी निधन झाले. 2019 साली त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मभूषणने सन्मानित केलं होतं.
1) 27 मार्च, 1923 रोजी महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये झाला होता. पाचवीत शाळा सोडल्यानंतर त्यांनी हार्डवेअर, कधी तांदळाच्या, कधी वस्रोद्योग कंपन्यांत काम केले. तसेच वडिलांच्या मसाल्याच्या दुकानातही काम केलं. वयाच्या 18 व्या वर्षी धर्मपाल यांचा विवाह झाला.
2) 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर ते भारतात आले व त्यांना कुंटुंबाच्या भरणपोषणासाठी टांगा चालवावा लागला.
3) 1959 साली त्यांनी दिल्लीतील करोल बाग येथील अजमल खां रोडवर मसाल्याचे एक दुकान उघडले. त्याचं नाव त्यांनी महाशिया दी हट्टी सियालकोटवाले असं ठेवलं. खारी बावलीमध्ये जम बसल्यावर दिल्लीच्या इतर भागांमध्येही त्यांची दुकानं झाली. एक दुकान गफ्फार मार्केटमध्येही सुरू केलं. गफ्फार मार्केट सरहद्द गांधी खान अब्दुल गफ्फार खान यांच्या नावानं तर खान मार्केट त्यांचे भाऊ खान अब्दुल जब्बार खान यांच्या नावानं सुरू करण्यात आलं होतं.
4) प्रामाणिकपणा आणि दर्जाच्या जोरावर एमडीएच मसाला ब्रँडची उत्तरोत्तर प्रगती झाली. भारतात तसेच दुबईमध्ये त्यांच्या एमडीएच मसाल्याच्या 18 फॅक्टरी आहेत. एमडीएच मसाल्याचे 62 प्रोडक्ट्स असून उत्तर भारतातील सुमारे 80 टक्के मसाले बाजारावर त्यांचा ताबा आहे.
5) गुलाटींना जगातील सर्वांत वयस्कर ऍड स्टार असं म्हणून संबोधलं जाते. ते आपल्या उत्पादनांच्या जाहीराती स्वत:चं करायचे.
6) युरोमॉनिटरच्या रिपोर्टनुसार, ते एफएमसीजी सेक्टरमधील सर्वांत अधिक कमाई करणारे सीईओ होते. 2018 मध्ये त्यांना जवळपास 25 कोटी रुपये इन-हँड सॅलरी मिळाली होती. आपल्या सॅलरीतील 90 टक्के भाग गोरगरिबांना दान करायचे. ते 20 शाळा आणि 1 हॉस्पिटल चालवायचे.
7) 2019 मधील कंपनीची उलाढाल 1 हजार कोटींपेक्षा जास्तहोती, तर स्वतः धर्मपाल गुलाटी यांची कमाई 500 कोटींच्या घरात होती.
8) त्यांचे आत्मचरित्र - टांगेवाला कैसे बना मसालोंका शहेनशाह?
► एमडीएच नाव कसं पडलं-
एमडीएच हे नाव महाशिया दि हट्टी यावरून आलं आहे. पंजाबी लोक दुकानाला हट्टी म्हणतात. गुलाटी यांच्या वडिलांचे सियालकोट येथे मसाल्याचे दुकान होते, त्याचे नाव महाशिया दी हट्टी होते. यामुळेच गुलाटींच्या मसाल्याच्या ब्रँडचे नाव एमडीएच पडले.
न्या. सी. एस. कर्णन
3 डिसेंबर 2020 - सर्वोच्च न्यायालय व मद्रास उच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांविरोधात, महिला कर्मचार्यांविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांना, चेन्नईत त्यांचा राजकीय पक्ष अँटी करप्शन डायनॅमिक पार्टीच्या कार्यालयात, अटक करण्यात आली.
► ऑक्टोबर 2020 महिन्यात न्या. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील काही आजी-माजी न्यायाधिशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते व त्यांच्याविरोधात अपशब्द उच्चारले होते. त्यावरून चेन्नईतील एका वकिलाने चेन्नई सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कर्णन यांच्याविरोधात आयपीसी कलम 153 व 509 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
► 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी माजी न्या. कर्णन यांना दोषी ठरवले होते व त्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला होता. देशाच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला तुरुंगात पाठवण्याच्या घटनेची त्यावेळी नोंद झाली होती.
► न्यायाधीशांवर व महिलांवर आरोप केल्यानंतर कर्णन यांच्याविरोधात चेन्नई पोलिसांनी गुन्हे दाखल करुनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, यावरून तामिळनाडू-पुड्डूचेरी बार कॉन्सिलने न्यायालयात याचिका दाखल केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने पोलिस महानिरीक्षक व पोलिस आयुक्तांना या प्रकरणासंदर्भात 7 डिसेंबरला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितल्यानंतर कर्णन यांना अटक करण्यात आली. कर्णन यांच्याविरोधातली ही तक्रार सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे पाठवण्यात आली होती.
पापा बौबा डिऑप
3 डिसेंबर 2020 - सेनेगेलचा फुटबॉल खेळाडू पापा बौबा डिऑपचे वयाच्या 42 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या कामगिरीमुळेच, सेनेगल हा फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा (2002) आफ्रिकेतील कॅमेरून (1990) नंतरचा दुसरा देश ठरला. यामुळे डिऑपला महान फुटबॉलपटूचा दर्जा मिळाला. त्याच वर्षी सेनेगलने आफ्रिकन देशांच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया केली.
► सेनेगलची राजधानी डकारमध्ये जन्मलेल्या डिऑपने वयाच्या 21 व्या वर्षीपासून देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांने 2001 ते 2008 या कालावधीत 63 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सेनेगलकडून खेळताना 11 गोल लगावले. चारदा आफ्रिकन नेशन्स चषक स्पर्धेत त्याने 2002 मध्ये सेनेगलला अंतिम फेरी गाठून दिली.
► त्यांने कारकीर्दीच्या सुरुवातीला एएससी डायरफचे प्रतिनिधित्व केले. नंतर तो स्वित्झर्लंडच्या क्लबकडून खेळला.
► 2002 मध्ये फ्रेंच लीग फुटबॉलमध्ये लेन्सकडून खेळणार्या डिऑपला फिफा विश्वचषकामुळे खर्या अर्थाने ओळख मिळाली. 2004 साली फुलहॅममध्ये सामील झाल्यानंतर मधल्या फळीतील आपल्या दमदार खेळाने त्याने इंग्लिश प्रीमियर लीगच्या महान खेळाडूंत स्थान मिळवले.
► त्याच्या कामगिरीमुळेच 2002 च्या फिफा विश्वचषकात फ्रान्सला सलामीलाच पराभवाचा धक्का बसल्याने त्यांचे आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले होते.
► 2007 मध्ये पोर्टमाऊथशी करारबद्ध होऊन, 2008 साली एफए चषक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वेस्ट हॅम युनायटेड आणि बर्मिगहॅम सिटीमध्ये फार काळ न टिकलेल्या डिऑपने 2013 मध्ये व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती पत्करली.
अक्षता मूर्ती
ब्रिटनमधील ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर असणार्या ऋषी सुनाक यांची पत्नी अक्षता मूर्ती या ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत आहेत. ब्रिटनच्या राणीची खासगी संपत्ती ही 350 मिलियन ब्रिटीश पौंड म्हणजेच अंदाजे 3,400 कोटी रुपये, तर अक्षता मूर्ती यांची संपत्ती ही 430 मिलियन ब्रिटीश पौंड इतकी म्हणजे अंदाजे 4,200 कोटी रुपये इतकी आहे.
► अक्षता मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि इन्फोसिस फाउण्डेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. अक्षता आणि ऋषी हे स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये एकाच वर्गात होते. 2009 साली या दोघांचं लग्न झालं. या दोघांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुलं आहेत.
► युकेमधील व्हेंचर कॅपीटल फर्म कॅटामारेन व्हेंचर्स या कंपनीची मालकी अक्षता यांच्याकडे आहे. त्यांच्या नावे युकेमधील किमान सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून त्यामध्ये अॅमेझॉन इंडियासोबत केलेल्या 900 मिलियन ब्रिटीश पौंडच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
► ऋषी सुनाक हे लंडनमधील एका गुंतवणुकीसंदर्भात काम करणार्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. ही कंपनी जगभरातील गुंतवणुकदारांना ब्रिटनमधील उद्योगांमध्ये पैसे गुंतवण्यास मदत करते.
► 2015 साली ऋषी हे रिचमॉन्ड येथून खासदार म्हणून निवडून आले. 2017 आणि 2019 मध्येही त्यांनी विजय मिळवला. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांना सरकारी तिजोरीचे मुख्य सचिव पदी नियुक्त करण्यात आलं. हे पद ब्रिटनमधील अर्थमंत्र्याच्या दर्जाचे पद आहे.
प्रश्नमंजुषा (45)
1) न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई कोणत्या कायद्यानुसार केली जाते ?
अ) आयपीसी कलम 153
ब) सीआरपीसी 509
क) सीआरपीसी कलम 153
ड) आयपीसी कलम 509
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ आणि ड
4) वरील सर्व
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) सेनेगल हा फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा आफ्रिकेतील कॅमेरून नंतरचा दुसरा देश आहे.
ब) डकार ही कॅमेरुनची राजधानी आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : विश्वातील सर्वात प्रकाशमान वस्तूंपैकी एक म्हणजे अतिनवतारे होत.
कारण (र) : अतिनवतार्यांच्या स्फोटातून न्यूट्रिनो बाहेर पडतात.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
4) माजी न्या. सी. एस. कर्णन यांच्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
a) ते अँटी करप्शन डायनॅमिक पार्टी या राजकीय पक्षाचे नेते आहेत.
b) 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवले.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
5) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) सूर्यावर ज्या घडामोडी होत असतात त्यांचा वेध अप्रत्यक्षपणे न्यूट्रिनो कणांच्या मदतीने घेता येतो.
ब) सूर्याच्या केंद्रस्थानी न्यूट्रिनो कणांची निर्मिती झाल्यामुळे सूर्य प्रकाशमान दिसतो.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
6) न्यूट्रिनो कणांचे अस्तित्व सांगणारे ज्येष्ष्ठ वैज्ञानिक मासातोशी कोशिबा यांचे डिसेंबर 2020 मध्ये वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याबाबत चुकीचे विधान शोधा.
1) त्यांनी न्यूट्रिनो कण शोधण्यासाठी कॅमीओकांडे न्यूट्रिनो शोधक यंत्र तयार केले.
2) 2015 मध्ये त्यांना पेनसिल्वेनिया विद्यापीठाचे दिवंगत वैज्ञानिक रेमंड डेव्हिस ज्युनियर यांच्यासमवेत भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक नोबेल मिळाले होते.
3) ते टोकियो विद्यापीठात प्राध्यापक होते.
4) त्यांनी सायन्स फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली.
7) अक्षता मूर्ती यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) त्यांनी स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
ब) त्या न्फोसिस फाउण्डेशनच्या उपप्रमुख आहेत.
क) त्या ब्रिटनमधील ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर असणार्या ऋषी सुनाक यांची पत्नी आहेत.
ड) ब्रिटनच्या राणीपेक्षाही त्यांची संपत्ती जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) अ आणि ब
3) अ, क आणि ड
4) फक्त क आणि ड
8) डिसेंबर 2020 मध्ये फुटबॉलपटू पापा बौबा डिऑपचे वयाच्या 42 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले, त्यांने कोणत्या देशाचे / क्लबचे प्रतिनिधीत्व केले नाही ?
1) स्वित्झर्लंड क्लब
2) सेनेगेल
3) बर्मिगहॅम सिटी
4) फ्रान्स
9) महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या बाबतची खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा :
अ) 2020 साली त्यांना पद्मभूषणने सन्मानित केलं गेलं होतं.
ब) त्यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये येथे झाला होता.
क) टांगेवाला कैसे बना मसालोंका शहेनशाह? हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे.
ड) ते जगातील सर्वांत वयस्कर अॅड स्टार म्हणून ओळखले जात.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
10) देशाच्या न्यायालयीन इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाला तुरुंगात पाठवले होते, ते माजी न्यायमूर्ती सी. एस. कर्णन कोणत्या उच्च न्यायलयाचे न्यायाधीश होते ?
1) दिल्ली उच्च न्यायालय
2) केरळ उच्च न्यायालय
3) मुंबई उच्च न्यायालय
4) मद्रास उच्च न्यायालय
उत्तरे : प्रश्नमंजुषा (45)
1-3
2-1
3-1
4-1
5-3
6-2
7-3
8-4
9-2
10-4