मार्कोस-गरुड कमांडो / प्रश्नमंजुषा (39)

  • मार्कोस-गरुड कमांडो / प्रश्नमंजुषा (39)

    मार्कोस-गरुड कमांडो / प्रश्नमंजुषा (39)

    • 03 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 367 Views
    • 0 Shares

    मार्कोस-गरुड कमांडो

    चीनने भाारतीय भूप्रदेशात अतिक्रमण केल्याने एप्रिल 2020 पासून भारतीय व चिनी सैन्य लडाखच्या विविध  भागात आमने-सामने आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय नौदलाने पूर्व लडाखमध्ये पँगाँग तलावाच्या परिसरात मार्कोस कमांडो तैनात केले. येथे हवाई दलाचे गरुड कमांडो व निमलष्कराचे विशेष दल आधीपासूनच तैनात आहे.
     
    मार्कोस कमांडो
     
     
     
    जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारतीय नौदलाने वुलर लेक भागात सुरुवातीला मार्कोस दल तैनात केले गेले होते. 
    अमेरिकी सैन्यातील नेव्ही स्लीपर्सप्रमाणेच भारताच्या मार्कोसचे कार्य चालते. ते जगभरातील विशेष दलासोबत अनेक संयुक्त सराव करतात. 2011 मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनचा खात्मा करणार्‍या मोहिमेत यूएस नेव्ही सील्स सहभागी होती.
    • मार्कोस नावाच्या मरीन कमांडो फोर्सची स्थापना 1987 मध्ये झाली. मार्कोस हे दाढीवाले फोर्स म्हणून देखील ओळखले जाते. 
    • उद्दिष्ट : सागरी शत्रूंना घुसखोरीपासून रोखणे आणि दहशतवाद्यांचा बीमोड करणे.
    • ब्रीदवाक्य The Few, The Fearless

    मार्कोस कमांडोची वैशिष्ट्ये-
     
    1) मार्कोससाठी विशेष सैनिकांची निवड केली जाते. त्यात बहुतेक 20 वर्षीय सैनिक असतात. त्यांचे बहुतांश प्रशिक्षण आयएनएस अभिमन्यू मुंबई येथे होते. सागरी मोहिमांत ते तरबेज असतात.
     
    2) मार्कोससाठी निवड झाल्यानंतर कमांडोला 3 वर्षांचे कठोर प्रशिक्षण दिले जाते. प्राथमिक प्रशिक्षण 6 महिन्यांचे असते. पहिल्या दोन महिन्यांत योग्य कमांडोजची निवड होते. त्यानंतर एक महिना कठोर शारीरिक चाचणी होते. 
     
    3) त्यानंतर 9 महिने विविध प्रकारची शस्त्रे चालवणे, विशेष युद्धकुशलता, जगभरातील गोपनीय माहिती गोळा करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात युद्ध, दहशतवाद्यांशी चकमक, ओलिसांची सुटका इत्यादी. हे प्रशिक्षण 90 टक्के पूर्ण करू शकत नाहीत. या प्रशिक्षणामध्ये डेथ क्रॉल नावाचा एक भाग असतो. त्यात सैनिकांना मांड्यांपर्यंत असलेल्या चिखलातून वेगाने पळायचे असते. 
     
    4) मार्कोस कमांडो विनाऑक्सिजन समुद्रात 55 मीटर खाली किमान 15 मिनिटे लढू शकतात.
     
    5) 8 किमी उंचीवरून उडी मारणे, 10 ते 15 सेकंदात पॅराशूट सुरू करू शकतात.
     
    6) चाकूपासून स्नायपर, रायफल चालवण्याचे प्रशिक्षण. पाठीवर 25 किलो वजन व शस्त्रे असतात. तसेच ते हातपाय बांधले तरी पोहू शकतात.

    • मार्कोस कमांडोंची कामगिरी-
      
    1) ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो : 2008 साली मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर मार्कोसने ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 
     
    2) ऑपरेशन पवन श्रीलंका : 1987 मध्ये लिटेच्या विरोधातील मोहिमेदरम्यान मार्कोसने भारतीय शांती सेनेच्या रूपात श्रीलंकेला मदत केली होती. त्यांच्या मदतीने श्रीलंकेच्या सैन्याने जाफना, त्रिनकोमाली बेटावर ताबा मिळवला होता. यादरम्यान मार्कोसने 12 किमी पोहून टार्गेट उध्वस्त केले होते. यादरम्यान जोरदार गोळीबार झाला आणि बॉम्बस्फोटही झाले होते. परंतु मार्कोस मोहिमेत यशस्वी झाले होते.
     
    3) ऑपरेशन कॅक्टस, मालदीव : 1988 मध्ये मार्कोसने राष्ट्रपती मौमून अब्दुल गय्युम सरकारच्या तख्तपालटाचे षड्यंत्र उलथवून टाकले होते. दोन्ही देशांतील करारानुसार ही कारवाई झाली होती. त्याशिवाय श्रीलंकेतील अपहरण प्रकरणात प्रवाशांची दोन दिवसांत सुटका करण्यात आली होती. या दरम्यान 47 अपहरणकर्त्यांना शरण यावे लागले होते.
     
    गरुड कमांडो
     
     
     
    लडाखमध्ये लाइन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोलवर (एलओसी) लष्कराचे पॅरा स्पेशल फोर्सेस व विशेष फ्रंटियर फोर्स  तसेच  हवाई दलाचे गरुड कमांडो तैनात आहेत. 2001 मध्ये काश्मीरात दहशतवाद्यांनी एअर बेसवर हल्ला केला होता. त्यामुळे हवाई दलाने एअर बेसच्या सुरक्षेसाठी गरुड कमांडो फोर्सची स्थापना केली.

    • गरुड कमांडो फोर्स भारतीय वायुसेनेचे विशेष दल आहे. त्याची स्थापना सप्टेंबर 2004 मध्ये झाली. सध्या भारतीय वायुसेनेत जवळपास 2 हजार गरुड कमांडो आहेत.
    • आपत्तीच्या काळात गरूड कमांडो फक्त जमीनीवरच नाही तर आकाशात आणि पाण्यातही कोणतीही मोहीम फत्ते करून शत्रुला त्याच्या घरात घुसून ठार करतात.
    • मुख्यालय: हिंडोन एयर फोर्स स्टेशन, गाझियाबाद
     
    1) हवाई दलाच्या विशेष गरुड कमांडो रणनीतिकदृष्ट्या भारत चीन सीमेवरील महत्त्वाच्या शिखरावर तैनात असून हे कमांडो आयजीएलए IGLA एअर डिफेन्स सिस्टिमसह सुसज्ज आहेत. 29-30 ऑगस्ट 2020 रोजी सैन्य दलाने गरुड कमांडो दलाच्या मदतीने एलएसीवरील महत्त्वपूर्ण शिखरांवर ताबा मिळवला होता.  
     
    2) IGLA ही चिनी लढाऊ विमान किंवा इतर विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करु नये यासाठी उपयुक्त अशी शोल्डर फायर्ड  सिस्टिम आहे. हे अस्त्र खांद्यावर ठेवून शत्रू विमानांना लक्ष्य केले जाऊ शकते.
     
    4) 2016 च्या पठाणकोट हल्ल्यानंतर हवाई दलाने गरुड कमांडोना काश्मीर खोर्‍यात तैनात करण्यास सुरुवात केली गेली. 2016 मध्ये पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. गरुड टीमने काश्मीरमध्ये तैनात झाल्यानंतर दहशतवाद्यांचा एक पूर्ण गट नष्ट केला. मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सामील झहीर उर रेहमान लखवीचा पुतण्या या दहशतवादी गटाचे नेतृत्त्व करत होता. 
     
    5) दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या या ऑपरेशनसाठी गरुड फोर्सला एक अशोक चक्र, तीन शौर्य चक्र आणि इतर अनेक शौर्य पुरस्कार प्राप्त झाले. 
     
    • रूड कमांडोची ट्रेनिंग : गरूड कमाडो बनण्यासाठी अडीच वर्षाची कडक ट्रेनिंग देण्यात येते. या ट्रेनिंगमध्ये कमांडोंना उसळती नदी, भडकलेल्या आग्नीच्या ज्वाळांमधून जावे लागते. तसेच कोणताही सहारा न घेता डोंगरावर चढाई करावी लागते. याशिवाय मोठ्ठे ओझे घेऊन अनेक किलोमीटरपर्यंत पळणे आणि जंगलात रात्र घालवणे यासारखे टास्क पूर्ण करावे लागतात. 
     
    • स्पेशल ऑपरेशन्स ट्रेनिंग :  गरुड कमांडोजचे हे सर्वात कठीण प्रशिक्षण असते. दहशतवाद्यांबरोबर मुकाबला करण्यासाठी काश्मीरमध्ये लष्करासोबत हवाई दलाच्या गरुड फोर्स कमांडोना 2 आठवडे एअरबॉर्न ऑपरेशन्स, एअरफिल्ड सीजर आणि काउंटर टेररिजमचे प्रशिक्षण दिले जाते. याद्वारे अत्याधुनिक हत्यारांसह या कमांडोंना हवाई क्षेत्रात हल्ला करणे, शत्रुचा छडा लावणे, हवाई आक्रमण करणे यासह स्पेशल कॉम्बॅट आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी तयार करण्यात येते.
      
    • हल्ला करण्याचे तंत्र : सामान्यत: चार गरूड कमांडो मिळून एक छोटा ग्रुप बनवतात. याला ट्रॅक असे म्हणतात. चार-चार कमांडो मिळून असे तीन ट्रॅक बनवण्यात येतात. पहिला ट्रॅक शत्रुंवर हल्ला करतो, यावेळी कमान नंबर दोन कडे असते. तेवढ्यात नंबर तीनवर असेला ग्रुप टेलिस्कॉपिक गनने हल्ला करतो. तर शेवटचा ग्रुप आत्याधुनीक शस्त्रांसह हल्लाबोल करतात. ही युद्धात पुढे जाण्याची पद्धत असते. या पद्धतीला पिलर असे म्हणतात.

     
     प्रश्नमंजुषा (39)
     
    1) मार्कोस नावाच्या मरीन कमांडो फोर्सची स्थापना कधी झाली ?
    1) 2001
    2) 2007
    3) 2004
    4) 1987
     
    2) खालील जोड्या जुळवा :
    स्तंभ अ (मार्कोसचे ऑपरेशन) स्तंभ ब (स्थळ)
    अ. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो : I. मालदीव  1988 
    ब. ऑपरेशन पवन श्रीलंका II मुंबई 2008
    क. ऑपरेशन कॅक्टस, मालदीव III श्रीलंका 1987 
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I
    (2) II I III
    (3) III II I
    (4) I III II
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) गरुड कमांडो फोर्स भारतीय लष्कराचे विशेष दल आहे. 
    ब) मार्कोस कमांडोचे मुख्यालय हिंडोन एयर फोर्स स्टेशन, गाझियाबाद येथे आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) खालील विधाने विचारात घ्या :
    a) मार्कोस कमांडो दल हे दाढीवाले फोर्स म्हणून देखील ओळखले जाते. 
    b) गरुड कमांडो फोर्स ब्रीदवाक्य म्हणजे ''The Few, The Fearless ''   
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a)व (b)दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    5) मार्कोस कमांडो संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) त्यांचे प्रशिक्षण आयएनएस अभिमन्यू येथे होते. 
    ब) श्रीनगर शहरातील वुलर लेक भागात मार्कोस तैनात केले गेले होते. 
    क) त्यांचे कार्य अमेरिकी सैन्यातील नेव्ही सीलप्रमाणे चालते. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (39)
     
     
    1-4
     
    2-1
     
    3-4
     
    4-1
     
    5-4

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 367