प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्नमंजुषा (36)
- 30 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 191 Views
- 0 Shares
हिपॅटायटिस सी आणि 2020 चे नोबेल पारितोषिक
वैद्यकीय क्षेत्राचे 2020 चे नोबेल पारितोषिक डॉ. हार्वे आल्टर, डॉ. मायकेल हॉटन आणि डॉ. चार्लस् राइस यांना हिपॅटायटिस सी विषाणूच्या शोधासाठी देण्यात आले. 1963 साली रक्तपेढीत काम करताना डॉ. आल्टर यांनाहिपॅटायटीस सी विषाणूच्या शक्यतेनं पछाडलं होतं. त्यानंतर तेरा वर्षांनंतर 1976 साली हा विषाणू डॉ. हॉटन यांना सापडला आणि 1990 मध्ये त्याच्या निदानाची रक्त चाचणी अमेरिकेत सुरू झाली. ही चाचणी डॉ. हॉटन काम करत असलेल्या कायरॉन कॉर्पोरेशनने बनवून बाजारात आणली होती.
1) 85 वर्षाचे डॉ. हार्वे आल्टर हे अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थमध्ये रक्तविषयक काम करणारे संशोधक आहेत.
2) 71 वर्षाचे डॉ. मायकेल हॉटन हे कॅनडातल्या अल्बर्टा विद्यापीठातले ब्रिटिश विषाणूतज्ज्ञ आहेत.
3) 68 वर्षाचे डॉ. चार्लस् राइस हे रॉकफेलर विद्यापीठात काम करणारे यकृततज्ज्ञ आहेत.
हिपॅटायटिस
► 1912 मध्ये कावीळ हा आजार यकृताचा दाह झाल्यामुळे होत असल्याने त्याला हिपॅटायटिस म्हंटले जाऊ लागले.
► 1960 च्या आसपास यकृतदाह घडवून आणणारे दोन वेगवेगळे विषाणू शास्त्रज्ञांना सापडले - हिपॅटायटीस ए व्हायरस (एचएव्ही) आणि हिपॅटायटीस बी व्हायरस (एचबीव्ही).
► एचएव्ही हा आरएनए विषाणू आहे आणि त्याचा संसर्ग दूषित अन्न व पाण्यावाटे होतो. तर एचबीव्ही हा डीएनए विषाणू आहे व त्याचा संसर्ग रक्तावाटे होतो.
► हिपॅटायटीस ए आणि बीचं निदान करणार्या चाचण्या तयार करण्यात आल्या. रक्तदान करताना एकाच्या रक्तातून दुसर्याला हिपॅटायटिस बीचा विषाणू- संसर्ग होणं सहज शक्य असल्याने रक्त देण्यापूर्वी त्याची हिपॅटायटीस साठी चाचणी केली जात असे.
डॉ. हार्वे आल्टर
अमेरिकेतल्या बेथेस्डा इथं नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थ येथील रक्तपेढीत जमा होणारं रक्त दिल्याने अनेक रुग्णांना यकृतदाह (हिपॅटायटीस) होतो आहे असे आढळल्याने डॉ. हार्वे आल्टर या हिमॅटॉलॉजिस्टवर त्याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
1) हिपॅटायटीस संक्रमणशील आहे की नाही हे शोधताना डॉ. आल्टर यांना 30 ते 60 नॅनोमीटर अकाराचा नवा विषाणू आढळला.
2) रक्तदात्याच्या रक्तात अॅलानिन अमायनोट्रान्सफरेज (आल्ट) या विकराची मात्रा वाढलेली असेल तर त्याला हिपॅटायटीस असण्याची शक्यता असते, हे लक्षात आल्यावर रक्तदानापूर्वी दात्याची ही चाचणी करावी असं आल्टर यांनी सुचवलं. त्यानुसार अमेरिकेत चाचण्या करणं सुरू झालं. परिणामी रक्तदानातून उद्भवणार्या हिपॅटायटीसचं प्रमाण 30 टक्के इतकं कमी झालं.
डॉ. मायकेल हॉटन
1) हिपॅटायटीस सीच्या 25% रुग्णांत हिपॅटायटीस सी आपला आपण बरा होत असे. पण इतरांमध्ये तो एक जुनाट आजार बनून राहतो. बर्याचदा त्याचं रूपांतर यकृताच्या सिर्हॉसिस किंवा कर्करोगामध्ये होते. अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत. त्यामुळे या रोगाची निदान चाचणी, त्यावर लस व औषधं शोधणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी कायरॉन कॉर्पोरेशन या औषध कंपनीचे शास्त्रज्ञ डॉ. मायकेल हॉटन आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेत काम करणारे संशोधक डॉ. ब्रॅडली यांनी 1982 ते 86 या वर्षांत सुमारे अडीच कोटी क्लोन शोधून पाहिले.
2) 1988 साली डॉ. मायकेल हॉटन आणि त्यांच्या सहकार्यांनी नॉन ए- नॉन बी हिपॅटायटीस घडवून आणणार्या जंतूचा क्लोन बनवून त्याला हिपॅटायटीस सी असं नाव दिलं. तसेच त्यांनी रक्तातला हा विषाणू शोधायला एक प्रतिपिंड चाचणी शोधून काढली.
3) जेल इलेक्ट्रोफोरेसीस तंत्रज्ञान वापरुन ते 1989 पर्यंत यावर संशोधन करीत होते. शेवटी त्यांनी हिपॅटायटीस सी विषाणूचा जिनोम सीक्वेन्स शोधून काढला.
डॉ. चार्लस् राइस
1) 1989 साली डॉ. चार्लस् राइस वॉशिंग्टन विद्यापीठात विषाणूशास्त्राचे प्राध्यापक आणि संशोधक म्हणून काम करत होते. त्यांनी रिकॉम्बिनंट डीएनए तंत्राने क्लोनिंग करून, केंद्रकीय आम्लांना शोधून सिंडबिस विषाणू या डासातून पसरणार्या विषाणूचा जनुकीय नकाशा शोधला होता. त्यामुळे या विषाणूची वाढ थोपवणं शक्य झालं होतं. डॉ. राइस यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये यलो फिव्हर, एन्सिफॅलायटीस, डेंग्यू ताप यांसारख्या आरएनए विषाणूंवर काम केलेलं होतं.
2) रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान म्हणजे दोन भिन्न प्रजातींच्या जीवांमधला डीएनए जोडून एका तिसर्या यजमान जीवात त्याचं रोपण करणं. यामुळे त्या यजमानाच्या पेशीत एक नवी जनुकीय सामग्री तयार होऊ लागते. हे तंत्रज्ञान विज्ञान, औषधनिर्माण, शेती या सगळ्याच क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाचं बनलं होतं.
3) हिपॅटायटीस सी निदानाच्या चाचण्या तयार झाल्या तरी शास्त्रज्ञांना अजूनही हा विषाणू प्रयोगशाळेत वाढविण्यात यश मिळालेलं नव्हतं.
4) डॉ. चार्लस् राइसना, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनात विषाणूजन्य हिपॅटायटीसवर संशोधन करणार्या स्टीफन फेनस्टोन यांनी नवं तंत्रज्ञान वापरून येलो फिव्हर विषाणूत जनुकीय बदल करून त्याचा वापर हिपॅटायटीस सी वर लस बनवण्याचे सुचविले.
5) 1997 साली राइसना हिपॅटायटीस सीचा क्लोन वापरून चिम्पांझींत संसर्ग घडवून आणण्यात यश मिळालं.
6) 2001 साली डॉ. राइस न्यूयॉर्कमधील रॉकफेलर विद्यापीठात रुजू झाले. इथं त्यांच्या संशोधन गटाने हिपॅटायटीस सीबाबत महत्त्वाचे शोध लावले. या विषाणूतल्या कुठल्या प्रथिनामुळे त्याला माणसाच्या यकृतपेशीत शिरकाव करून घेता येतो, हे त्यांनी शोधून काढलं.
सोफोसुबुव्हीर (सोव्हाल्डी) औषध
1) 3 मे 1990 रोजी अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने रक्तदानापूर्वी रक्ताची हिपॅटायटीस सी चाचणी करणं सक्तीचं केलं.
2) हिपॅटायटीस सी विषाणूचे चार वेगवेगळे प्रकार- जीनो टाईप्स आढळत होते आणि ते वेगवेगळ्या औषधांना प्रतिसाद देत होते.
3) 1991 सालात एक इंटरफेरॉनवर आधारित औषध बाजारात आलं. नंतर आलं ते रिबाव्हेरीन नावाचं औषध. इंटरफेरॉन आणि रिबाव्हेरीन जोडीने दिलं जाऊ लागलं. पण या औषधांचे बरेच दुष्परिणाम होते. शिवाय ही औषधं एखाद्याच जीनो टाईपवर काम करत.
4) 2011 मध्ये पहिलं विषाणूरोधक औषध बाजारात आलं - प्रोटीएज इन्हिबिटर्स आणि पॉलीमरेज इन्हिबिटर्स. पॉलीमरेज इन्हिबिटर्सने हिपॅटायटीस सीच्या उपचार पद्धतीचे सर्व आयाम बदलून टाकले.
5) 2013 साली आलेल्या जिलियाद या औषध कंपनीच्या सोफोसुबुव्हीर (सोव्हाल्डी) या औषधाने उपचारांत क्रांती घडवली. हे औषध विषाणूच्या चारही जिनो टाईप्सवर परिणामकारक ठरत होतं. 8 आठवडयांत ते रुग्णाला पूर्ण बरं करत होतं. त्यानंतर या प्रकारची अनेक औषधं बाजारात आली आणि हा आजार बरा होण्याचं प्रमाण झपाटयाने वाढू लागलं. रुग्णाच्या रक्तातला विषाणू पूर्णपणे नष्ट होऊन 12 ते 24 आठवडयांत रुग्ण पूर्णपणे बरा होऊ लागला.
6) सध्या हिपॅटायटीस सीच्या लशीवर चाचण्या चालू आहेत. या सगळ्या प्रयत्नांमुळे हिपॅटायटीस सी बरा होण्याचं एकेकाळी केवळ 6% असलेलं प्रमाण 90% वर येऊन पोहोचलं आहे. यामागे डॉ. आल्टर, डॉ. हॉटन, डॉ. राइस आणि त्यांच्या अगणित सहकार्यांचे अथक प्रयत्न आहेत.
हिपॅटायटीस सी आणि भारत
1) 2001 साली म्हणजे अमेरिकेनंतर11 वर्षांनी भारतात रक्तपेढयांना हिपॅटायटीस चाचणी करणं सक्तीचं करण्यात आलं.
2) प्रसिद्ध यकृततज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन यांनी भारतातल्या अनेक रक्तपेढयांचा या संदर्भात 1990 सालापासून अभ्यास करुन रक्त देण्याआधी हिपॅटायटीस सीची चाचणी केली पाहिजे अशी सूचना केली होती.
3) भारतातल्या रक्तपेढया ही चाचणी करायला तयार नव्हत्या. पण एका महिलेने तिला एका रुग्णालयात दिल्या गेलेल्या रक्तातून हिपॅटायटीस सी झाल्याचं सिद्ध केलं आणि त्या रक्तपेढीवर खटला भरला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे भारतातल्या रक्तपेढया हिपॅटायटीस सी चाचण्या करू लागल्या. पण तोवर हिपॅटायटीस सी भारतात पसरू लागलेला होता. र्निजतुकीकरण केलेल्या सुया, सीरिंज न वापरणं, रक्तपेढयांनी चाचण्या न करणं ही त्याची कारणं आहेत.
4) 2013-14 च्या आसपास पंजाब आणि हरियाणा या राज्यांत मोठया प्रमाणात हिपॅटायटीस सी रुग्ण आढळू लागले. काही गावांत तर 80% लोक हिपॅटायटीस सी पॉझिटिव्ह होते. सध्या भारतात हिपॅटायटीस सीचे जवळपास 45 ते 55 लाख रुग्ण आहेत.
5) भारतात आढळून येणार्या हिपॅटायटीस सीवर जिलियाद या अमेरिकन औषध कंपनीने बाजारात आणलेलं सोव्हाल्डी (सोफोस्बुव्हीर) हे औषध अत्यंत प्रभावी आहे. पण अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत सोव्हाल्डीच्या तीन महिन्यांच्या उपचारासाठी 55 ते 65 लाख रुपये ही किंमत इतकी जास्त होती, ती भारतीय रुग्णांना परवडणं अशक्य होतं.
6) भारताच्या पेटंट कार्यालयानं नेक्साव्हर या बायर कंपनीच्या औषधाला किंमत जास्त असल्याने सक्तीचा परवाना मंजूर केला होता. नेक्साव्हरची किंमत होती 3.20 लाख आणि सक्तीचा परवाना दिल्यावर भारतीय जनरिक कंपनी नाटको हे औषध 8.50 हजार रुपयाला विकू लागली होती. याविरोधात बायरने सुप्रीम कोर्टात केलेलं अपील कोर्टाने नाकारलं होतं आणि औषधावरच्या पेटंटपेक्षा सामान्य भारतीय नागरिकाला औषध स्वस्तात मिळणं भारत सरकार जास्त महत्त्वाचं मानतं, हे जगाला सांगितलं होतं.
7) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने तेव्हाचे आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या पुढाकाराने 2018 साली नॅशनल व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम सुरु झाला. याअंतर्गत आता भारतातल्या सर्व सरकारी रुग्णालयांत हिपॅटायटीस सीच्या चाचण्या विनामूल्य केल्या जातात आणि परदेशांत सोन्याच्या भावाने विकलं जाणारं सोफोस्बुव्हीर हे औषध विनामूल्य पुरवलं जातं. त्यामुळे भारतात हिपॅटायटीस रुग्णांत घट व्हायला मोठी मदत झाली आहे.
प्रश्नमंजुषा (36)
1) वैद्यकीय क्षेत्राचे 2020 चे नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
अ) डॉ. हार्वे आल्टर हे अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हेल्थमध्ये रक्तविषयक काम करणारे संशोधक आहेत.
ब) डॉ. स्टीफन फेनस्टोन हे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनात विषाणूजन्य हिपॅटायटीसवर काम करणारे संशोधक आहेत.
क) डॉ. चार्लस् राइस हे रॉकफेलर विद्यापीठात काम करणारे यकृततज्ज्ञ आहेत.
ड) डॉ. मायकेल हॉटन हे कॅनडातल्या अल्बर्टा विद्यापीठातले ब्रिटिश विषाणूतज्ज्ञ आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ, ब आणि क
2) अ , ब आणि ब
3) अ, क आणि ड
4) वरील सर्व
2) प्रसिद्ध यकृततज्ज्ञ डॉ. एस. के. सरीन यांनी भारतातल्या अनेक रक्तपेढयांचाअभ्यास करुन रक्त देण्याआधी ..... ही चाचणी केली पाहिजे अशी सूचना केली होती.
1) हिपॅटायटीस एची
2) हिपॅटायटीस बीची
3) हिपॅटायटीस सीची
4) वरील सर्व
3) खालीलपैकी कोणत्या राज्यात हिपॅटायटीस सी रुग्णांची संख्या जास्त आहे ?
a) महाराष्ट्र
b) पंजाब
c) हरियाणा
d) गुजरात
e) केरळ
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (b), (c)
3) (a), (d), (e)
4) (a), (c), (d)
4) रिकॉम्बिनंट डीएनए तंत्राने क्लोनिंग करून सिंडबिस विषाणू या डासातून पसरणार्या विषाणूचा जनुकीय नकाशा कोणी शोधला होता ?
1) डॉ. मायकेल हॉटन
2) डॉ. चार्लस् राइस
3) स्टीफन फेनस्टोन
4) डॉ. एस. के. सरीन
5) कोणत्या कंपनीचे औषध हिपॅटायटीस सी विषाणूच्या चारही जिनो टाईप्सवर परिणामकारक आहे ?
अ) जिलियाद
ब) फायझर
क) बायर
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
6) भारतामध्ये नॅशनल व्हायरल हिपॅटायटीस कंट्रोल प्रोग्राम कधी सुरु झाला ?
1) 2011
2) 2015
3) 2018
4) 2001
7) रिकॉम्बिनंट डीएनए तंत्रज्ञान संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत ?
अ) दोन भिन्न प्रजातींच्या जीवांमधला डीएनए जोडून एका तिसर्या यजमान जीवात त्याचं रोपण करणं.
ब) हे तंत्रज्ञान विज्ञान, औषधनिर्माण, शेती या सगळ्याच क्षेत्रांत अत्यंत महत्त्वाचं आहे.
क) डॉ. मायकेल हॉटन यांनी हिपॅटायटीस सी विषाणूचा जिनोम सीक्वेन्स या तंत्रज्ञानाद्वारे शोधून काढला.
ड) या तंत्रज्ञानामुळे त्या यजमानाच्या पेशीत एक नवी जनुकीय सामग्री तयार होऊ लागते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ,ब, क आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
8) हिपॅटायटीस सी वरील कोणत्या औषधाने उपचारांत क्रांती घडवली ?
1) नेक्साव्हर
2) इंटरफेरॉन
3) सोफोसुबुव्हीर (सोव्हाल्डी)
4) रिबाव्हेरीन
उत्तरे : प्रश्नमंजुषा (36)
1-3
2-3
3-2
4-2
5-1
6-3
7-4
8-3