प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (35)

  • प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (35)

    प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (35)

    • 30 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 307 Views
    • 0 Shares

    प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे

     
    दिएगो मॅराडोना
    25 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 30 ऑक्टोबर 1960 रोजी ब्युनॉस आयर्समध्ये एका गरीब कुटुंबात मॅराडोनाचा जन्म झाला. वयाच्या तिसर्‍या वर्षी फुटबॉल खेळायला सुरू करणार्‍या मॅराडोनाचे दोन छोटे भाऊ ह्युगो व रॉल व्यावसायिक फुटबॉलपटू होते. 

    मॅराडोनाचा अल्प परिचय -
    • नाव : दिएगो अरमँडो मॅराडोना
    •• जन्म : 30 ऑक्टोबर 1960
    •• स्थळ : ब्युनॉस आयर्स, अर्जेंटिना
    •• मृत्यू : 25 नोव्हेंबर 2020
    •• स्थळ : ब्युनॉस आयर्स, अर्जेंटिना
    •• खेळाडू : मिडफिल्डर, सेकंड स्ट्रायकर
    •• वर्ल्डकप विजय : 1986

    मॅराडोनाला मिळालेले बहुमान -
    •• फिफा वर्ल्ड कप गोल्ड बॉल 1986
    •• फिफा वर्ल्ड कप ऑल टाइम टीम 1994
    •• बेलेन डि ओर 1995
    •• 20 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट संघ 1998
    •• 20 व्या शतकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू 1999
    •• फिफा प्लेअर ऑफ द सेंच्युरी 2000
    •• फिफा गोल ऑफ द सेंच्युरी 2002
    •• फिफा 100 ग्रेटेस्ट लिव्हिंग प्लेअर 2004
    •• इटालियन फुटबॉल हॉल ऑफ फेम 2014

    मॅराडोनाची व्यावसायिक कारकीर्द -
    1) मॅराडोनाने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस अर्जेंटिना ज्युनिअरकडून सुरुवात केली. त्याने 1976 मध्ये आपल्या 16 व्या जन्मदिनाच्या 10 दिवस आधी व्यावसायिक पदार्पण केले. या क्लबकडून खेळताना मॅराडोना 16 नंबरची जर्सी वापरावयाचा. या क्लबकडून मॅराडोना 1976 ते 1981 दरम्यान पाच वर्षे खेळला. या दरम्यान त्याने 167 सामन्यांत 115 गोलांचा पाऊस पाडला. 
     
    2) 20 फेब्रुवारी 1981 रोजी मॅराडोना बोका ज्युनिअर्सशी करारबद्ध झाला. मॅराडोनाच्या खेळामुळे बोका ज्युनिअर्ससाठी हे वर्ष फारच चांगले गेले. 
     
    3) 1982 मध्ये झालेल्या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर मॅराडोनाने बार्सिलोनाकडून खेळण्यास सुरुवात केली.

    4) 1983 मध्ये मुख्य प्रशिक्षक सिझर लुईस मेन्नोट्टी यांचे मार्गदर्शन व मॅराडोनाच्या शानदार खेळाच्या बळावर बार्सिलोनाने स्पेनमधील वार्षिक कोपा डेल रे चषक स्पर्धा जिंकली. 
     
    5) मॅराडोना अर्जेंटिनाकडून 91 सामने खेळला व 34 गोल केले. तो 4 विश्‍वचषक खेळला. 
     
    6) मॅराडोना बार्सिलोना ज्युनिअर, नापोली यासारख्या 7 क्लबकडून खेळला व 8 संघांना मार्गदर्शन केले. 
     
    7) 1986 मध्ये जागतिक विजेता बनवल्यानंतर मॅराडोना अर्जेंटिनाचा आयकॉन बनला होता. 
     
    8) क्लासिक 10 क्रमांकाची जर्सी घालणारा मॅराडोना ड्रिबलिंग स्किल व गोल बनवण्याच्या क्षमतेमुळे संघात नेहमी प्लेमेकरची भूमिका बजावत होता. 
     
    9) 5 फूट 5 इंच अशी कमी उंची असलेला खेळाडू मॅराडोना फुटबॉलच्या जगात आपल्या 2 गोलमुळे नेहमी चर्चेत राहिला. हे दोन्ही गोल त्याने 1986 च्या विश्‍वचषकात इंग्लंडविरुद्ध केले. तो क्वार्टर फायनल सामना अर्जेंटिनाने 2-1 ने जिंकला होता. त्या सामन्यात मॅराडोनाच्या एक गोलला हँड ऑफ गॉड व दुसर्‍याला फिफाने गोल ऑफ द सेंच्युरी म्हटले. मेक्सिकोमध्ये झालेल्या विश्‍वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने प. जर्मनीला 3-2 ने हरवले होते. त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूला गोल्डन बूट मिळाला.
     
    10) मॅराडोना कोणत्याही संघाकडून खेळत असला तरी प्रतिस्पर्धी संघाकडून अकरापैकी सहा ते सात खेळाडू फक्त त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नेमले जात. इतक्या खेळाडूंचे चक्रव्यूह भेदून मॅराडोना गोल पोस्टपर्यंत लीलया बॉल घेऊन जात असे. 

    •• 1982 मध्ये खेळला पहिला वर्ल्डकप -
     
    • वयाच्या 22 व्या वर्षी पहिल्यांदा 1982 च्या विश्‍वचषकात तो उतरला. यावेळी त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र, या विश्वचषकाचे सर्व पाच सामने तो अखंडपणे, विश्रांती (सबस्टिट्यूट) न घेता खेळला. यावरून त्याच्या शारीरिक क्षमतेचा प्रत्यय आला. मॅराडोनाने या स्पर्धेत हंगेरीविरुद्ध 2 गोल नोंदविले.
     
    • 1986 मध्ये अर्जेंटिनाने वर्ल्डकप जिंकला -
    • मेक्सिकोमध्ये झालेल्या 1986 च्या विश्वचषकावर त्याने  अर्जेंटिनाचा कॅप्टन या नात्याने आपले नाव कोरले. या सामन्यांच्या उपउपांत्य फेरीत अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-1 गोलने मात दिली. यात मॅराडोनाने कानाच्या उंचीवर आलेला बॉल गोलमध्ये ढकलताना हाताचा वापर केला होता, तरीही तो गोल ग्राह्य मानला गेला. हाच तो हँड ऑफ गॉड. त्यावरून जगभरात वाद झाला. फायनलमध्ये अर्जेंटिनासमोर पश्‍चिम जर्मनीचे तगडे आव्हान होते. अ‍ॅझटेझा येथे झालेल्या या सामन्यात सुमारे 1.15 लाख प्रेक्षकांच्या साक्षीने अर्जेंटिनाने पश्‍चिम जर्मनीचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव करीत विश्वचषक स्पर्धा जिंकली.  
     
    • 1990 वर्ल्डकप -
    • इटलीमध्ये 1990 मध्ये विश्वचषक स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठीही कर्णधारपदाची जबाबदारी मॅराडोनावरच होती. घोट्याच्या दुखापतीचा परिणाम मॅराडोनाच्या वर्ल्डकपमधील कामगिरीवर झाला. तरीही अर्जेंटिनाला त्याने फायनलपर्यंत पोहोचविले. या विश्वचषकात तो फक्त 2 गोल करू शकला. पश्रि्चम जर्मनीकडून अर्जेंटिनाला 1-0 ने पराभव पत्करावा लागला.
     
    • 1994  वर्ल्डकप -
    • अमेरिकेत झालेली ही स्पर्धा मॅराडोनाच्या कारकिर्दीतील शेवटची वर्ल्डकप स्पर्धा ठरली. या स्पर्धेत मॅराडोना सुरुवातीचे 2 सामने खेळला. ग्रीसविरुद्धच्या सामन्यात मॅराडोनाने एक गोल नोंदविला. दुसर्‍या लढतीत अर्जेंटिनाने नायजेरियाला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. हा सामना मॅराडोनाच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. यावेळी त्याची डोप चाचणी घेण्यात आली वती पॉझिटिव्ह आली. ड्रग्ज घेतल्याच्या आरोपावरून त्याला खेळातून बाहेर पाठविण्यात आले. 

    •• अर्जेंटिना, ब्राझील, इंग्लंड, जर्मनी यांच्यासारखे फुटबॉलवेडे देश दर चार वर्षांनी विश्वकरंडकाच्या निमित्ताने आमने-सामने उभे राहतात.
    •
    • फुटबॉलच्या दुनियेत विसाव्या शतकातील जादूगार - ब्राझीलचा एडसन अ‍ॅरान्तेस दो नासिमेंतो ऊर्फ पेले, मॅराडोना आणि लिओनेल मेस्सी.
    •
    • फुटबॉलच्या लोकप्रियतेत भर घालण्यासाठी मॅराडोनाने जगभ्रमण केले. 2008 मध्ये तो भारतात आला होता.
    •
    • जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणून फुटबॉलला मान्यता आहे; पण भारतात क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉलला कमी स्थान असल्यामुळे विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही भारतीय संघ कधी यशस्वी होऊ शकला नाही. 
     
    • सय्यद अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखाली 1951 आणि 1962 च्या आशियाई खेळांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते. प. बंगाल, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात फुटबॉल खेळला जातो. 
    •
    • शारीरिक क्षमतेचा कस पाहणार्‍या या खेळात सलग 90 मिनिटे धावण्याची मूलभूत क्षमता लागते. बायचुंग भुतिया, सुनील छेत्री, गुरप्रीतसिंग संधू हे भारतीय फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत.
     
     
     
     
    फकीर चंद कोहली 
     
    26 नोव्हेंबर 2020 रोजी भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पितामह म्हणून परिचयाचे असलेले फकीर चंद कोहली यांचे वयाच्या 96 व्या वृद्धापकाळानं निधन झालं. टीसीएसचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी देशाला 100 अब्ज डॉलर्सचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योग तयार करण्यात योगदान दिले.
     
    1) देशातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे ते संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
     
    2) 19 मार्च 1924 रोजी फकीर चंद कोहली यांचा जन्म पेशावरमध्ये झाला. 
     
    3) 1948 मध्ये त्यांनी कॅनडातील क्विन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बीएससी शिक्षण पूर्ण केलं. 
     
    4) 1951 मध्ये ते टाटा इलेक्ट्रिक कंपनीत रुजू झाले आणि सिस्टिमच्या संचालनासाठी आवश्यक लोड डिस्पॅचिंग सिस्टम स्थापित करण्यास त्यांनी मदत केली. 
     
    5) 1970 मध्ये फकीरचंद कोहली यांच्या खांद्यावर टाटा इलेक्ट्रिक कंपन्यांच्या संचालक पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर टीसीएसच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा त्यांच्यावर सोपवण्यात आली. 
     
    6) 1991 मध्ये टाटा-आयबीएमचा भाग म्हणून आयबीएमला भारतात आणण्याच्या निर्णयामध्ये कोहली सक्रियपणे सहभागी होते. हा भारतातील हार्डवेअर उत्पादनाच्या संयुक्त उपक्रमाचा एक भाग होता. 
     
    7) 1999 मध्ये वयाच्या 75 व्या वर्षी ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते टीसीएसचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. 
     
    8) 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
     
     
     
     
    टी. बी. सोळबक्कणवार
     
    अनेक शिल्पकलाकृती घडवणारे टी. बी. सोळबक्कणवार यांचे 19 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांनी उभारलेले शिल्पसमूह समकालीन लोक-शिल्प म्हणून ओळखले जातात. ऑइलपेंट (एनॅमल) वापरून रंगवलेली त्यांची अनेक शिल्पे सिमेंटची आहेत. जक्कूर येथील महात्मा गांधी ग्रामीण ऊर्जा व विकास संस्थेच्या (एमजी आरआयडी) आवारातील विकसित गावाचे कल्पनाशिल्प, हे त्यांचे अखेरचे काम ठरले.
     
    • 1947 साली हावेरी जिल्ह्यातील गोटागुडी येथे टी. बी. सोळबक्कणवार जन्मले. तेथेच ते शिकले आणि धारवाडला डी. व्ही. हळभावी यांच्या कलासंस्थेत शिकून मुंबईच्या सर ज जी कला महाविद्यालयातून इंटीरिअर डिझाइनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 
     
    • कन्नड चित्रपट क्षेत्रात सेट-उभारणी, कन्नड नियतकालिकासाठी चित्रे काढणे अशी कामे केल्यानंतर त्यांनी दावणगिरीच्या कलाशाळेत अध्यापकाची नोकरी (1972 ते 90) पत्करली.
     
    • बैलाटा व दोड्डाटा या नावांनी ओळखले जाणारे यक्षगानसदृश लोकनाट्य कलाप्रकार जतन व्हावेत, म्हणून त्यांनी प्रयत्न  केले. 

    टी. बी. सोळबक्कणवार  यांच्या शिल्प कलाकृती-
     
    1) ग्रामसंस्कृती पार्क - पुण्याच्या पाषाण भागात
     
    2) मॉडेल व्हिलेज - बेंगळूरुच्या जक्कूर भागात 
     
    3) उत्सव गार्डन - हावेरी जिल्ह्यातील गोटागुडी येथील 30 एकरांच्या जमिनीवरील कलाग्राम. येथे हजाराहून अधिक लहानमोठी शिल्पे असून गावची जत्रा मा शिल्पसमूहात सुमारे 300 मानवशिल्पे आहेत.
     
    4) हुबळी, हावेरी, शिमोगा, बेळगाव, बागलकोट येथील उत्सव गार्डन, आलमट्टी गार्डन, कृष्णा पार्क, लव-कुश पार्क  या शिल्पाकृती प्रसिद्ध आहेत.
     
     
     
     
    जेम्स वूल्फेन्सन
    जागतिक बँकेचे अध्यक्ष जेम्स वूल्फेन्सन यांचे  25 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. 1995 ते 2005 या काळात ते जागतिक बँकेचे अध्यक्ष होते. 
     
    • 1933 साली ऑस्ट्रेलियात जेम्स वूल्फेन्सन यांचा जन्म झाला. त्यांनी ऑस्ट्रेलियात वकील आणि बँकर म्हणून कारकीर्द करताना, मायदेशाचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी या खेळात केले होते. 
     
    • खासगी बँकिंग व वित्तीय क्षेत्रात दाखवलेल्या धडाडीमुळे ते ऑस्ट्रेलियातून लंडनला गेले, तिथे एका खासगी बँकेत असताना क्रिसलर या 1980 च्या दशकाअखेर डबघाईस आलेल्या कंपनीस वित्तपुरवठ्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि अमेरिकेत, बेन बर्नान्के यांचे चेले म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 
     
    • जागतिक बँक अध्यक्षपद मिळाल्यानंतर वूल्फेन्सन यांनी या संस्थेचा अमेरिकी चेहरा बदलण्याचा प्रयत्न  केला. त्यासाठी चीन, भारत, थायलंडसारखे देश कणखर अर्थसत्ता झाले पाहिजेत, या दृष्टीने त्यांचे निर्णय मोलाचे ठरले. मात्र आशियाई वित्तसंकट किंवा ‘9/11’ नंतर अमेरिकेने लादलेले वॉर ऑन टेरर यामुळे हे बिगर अमेरिकीकरणाचे त्यांचे प्रयत्न फसले. 
     
    स्ट्रक्चरल अ‍ॅडजस्टमेंटच्या सक्तीला दारिद्रय निर्मूलनाचा नवा चेहरा देण्याचे कार्य त्यांनी केले,  त्यासाठी त्यांनी बँकेत स्वयंसेवी संस्थांची सल्ला-समिती नेमली होती.
     
     
     
     
    डीपस्पॉट : सर्वात खोल स्वीमिंग पूल 
     
    26 नोव्हेंबर 2020 रोजी पोलंडमध्ये डीपस्पॉट नावाचा जगातील सर्वात खोल स्वीमिंग पूल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. त्याची खोली 45.5 मीटर म्हणजेच 150 फूट आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या स्वीमिंग पूलची खोली 25 मीटर असते. 
     
    • हा पूल तयार करण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागला व 78 कोटी रुपये खर्च आला. 
    •
    या पूलमध्ये 8 हजार घनमीटर पाण्याची क्षमता असून तो ऑलिम्पिक साईजच्या 27 स्वीमिंग पुलांच्या आकाराचा आहे. या पुलाचे तापमान 32 ते 34 अंशांपर्यंत राहते. 
     
    • याठिकाणी डायव्हर्सना प्रशिक्षणही दिले जाते. डायव्हिंग शिकण्यासाठी या ठिकाणी अंडरवॉटर टनेल्स आहेत. 
     
    • यापूर्वीचा सर्वात खोल स्वीमिंग पूलचा विक्रम इटलीच्या मोंटेग्राटो पुलाच्या नावावर होता. हा पूल 42 मीटर खोल आहे. सध्या ब्रिटनमध्ये 164 फूट खोलीचा स्वीमिंग पूल बनवला जात आहे.

     

    प्रश्‍नमंजुषा (35)
     
    1) भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पितामह म्हणून परिचयाचे असलेले जाते ?
    1) किरण कर्णिक
    2) डॉ. विजय भटकर
    3) जेआरडी टाटा
    4) फकीर चंद कोहली 
     
    2) मॅराडोनाने कोणत्या सामन्यात केलेल्या 2 गोलपैकी  एक गोलला हँड ऑफ गॉड व दुसर्‍याला फिफाने  गोल ऑफ द सेंच्युरी असे म्हटले होते?
    1) 1986 च्या विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध प.जर्मनी मधील फायनल
    2) 1990 च्या विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी मधील फायनल
    3) 1986 च्या विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड मधील  उपउपांत्य सामना
    4) 1994 च्या विश्वचषकातील अर्जेंटिना विरुद्ध ग्रीस मधील सामना
     
    3) जेम्स वूल्फेन्सन  यांच्या संदर्भात खालीलपैकी  कोणते/कोणती विधान/विधाने चूक आहे/आहेत ?
    अ) त्यांनी ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजी या खेळात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते.
    ब) 1995 ते 2005 या काळात ते  जागतिक बँकेचे अध्यक्ष होते. 
    क) ते जॉर्ज सोरोस व बेन बर्नान्के यांचे शिष्य होते.
    ड) स्ट्रक्चरल अ‍ॅडजस्टमेंटच्या सक्तीला दारिद्रय निर्मूलनाचा नवा चेहरा देण्यासाठी त्यांनी जागतिक बँकेत स्वयंसेवी संस्थांची सल्ला-समिती नेमली होती.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) फक्त क
     
    4) भारतीय फुटबॉाल संबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) प. बंगाल, गोवा, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने फुटबॉल खेळला जातो. 
    b) सय्यद अब्दुल रहीम यांच्या नेतृत्वाखाली 1951 आणि 1962 च्या आशियाई खेळांमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले होते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    5) टी. बी. सोळबक्कणवार यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ते प्रसिद्ध लोकशिल्पकार म्हणून ओळखले जात. 
    ब) त्यांची अनेक शिल्पे ही सिमेंटची असून ती ऑइलपेंट (एनॅमल) वापरून रंगवलेली आहेत.
    क) मुंबईच्या सर ज जी कला महाविद्यालयातून त्यांनी शिल्पकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.  
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    6) खालीलपैकी कोणास फुटबॉलच्या दुनियेत विसाव्या शतकातील जादूगार म्हणून ओळखले जाते ? 
    a) अर्जेंटिनाचा दिएगो मॅराडोना 
    b) ब्राझीलचा रोनाल्डो
    c) अर्जेंटिनाचा  लिओनेल मेस्सी
    d) ब्राझीलचा एडसन अ‍ॅरान्तेस दो नासिमेंतो ऊर्फ पेले
    e) इटलीचा सिझर लुईस मेन्नोट्टी
    पर्यायी उत्तरे  :
    1) (a), (b), (c)
    2) (b), (c), (e)
    3) (a), (d), (e)
    4) (a), (c), (d)
     
    7) खालीलपैकी कोणता यक्षगानसदृश लोकनाट्य कलाप्रकार आहे?
    अ) दोड्डाटा 
    ब) बैलाटा 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    8) जगातील सर्वात खोल स्वीमिंग पूल पर्यटकांसाठी कोणत्या देशात खुला करण्यात आला ?
    1) ब्रिटन
    2) इटली
    3) पोलंड
    4) शांघाय
     
    9) टी. बी. सोळबक्कणवार यांच्या शिल्प कलाकृतीबदालची योग्य जोडी शोधा.
    अ) मॉडेल व्हिलेज - जक्कूर, बेंगळूरु 
    ब) विकसित गावाचे कल्पनाशिल्प - जक्कूर, बेंगळूरु
    क) उत्सव गार्डन :30 एकरांच्या जमिनीवरील कलाग्राम - गोटागुडी, हावेरी
    ड) ग्रामसंस्कृती पार्क - पाषाण, पुणे
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब, क आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    उत्तरे ः प्रश्‍नमंजुषा (35)
    1-4
     
    2-3
     
    3-4
     
    4-3
     
    5-2
     
    6-4
     
    7-3
     
    8-3
     
    9-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 307