म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुका / प्रश्नमंजुषा (22)

  • म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुका / प्रश्नमंजुषा (22)

    म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुका / प्रश्नमंजुषा (22)

    • 20 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 239 Views
    • 0 Shares

     म्यानमारमधील सार्वत्रिक निवडणुका

    8 नोव्हेंबरला म्यानमारमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) पक्षाने दुसर्‍यांदा बहुमत मिळवले. 
    1) एनएलडीने संसदेच्या दोन्ही सभागृहांत 346 जागा जिंकल्या. बहुमतासाठी 322 हा आकडा आवश्यक होता. 
    2) लष्कराचे समर्थन असलेल्या युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलमेंट पार्टीने (यूएसडीपी) 25 जागा जिंकल्या.
    3) अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणार्‍या शान नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने 15 जादा जिंकल्या. हा पक्ष अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा देशातला सर्वात मोठा व प्रभावी पक्ष आहे.
    4) या निवडणुकांत अल्पसंख्याक मुस्लिम रोहिंग्याना मतदानापासून वंचित ठेवल्याबद्दल अनेक मानवाधिकार संघटनांनी सरकारचा निषेध केला.

     गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभा निवडणुका
    पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान नोव्हेंबर 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांत 23 जागांपैकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाने 10 जागा जिंकल्या.  पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाने 2, जमियत उलेमा-ए-इस्लाम फडल व मजलिस वहदतुल मुस्लिमीन यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली. 7 अपक्ष उमेदवार निवडून आले असून या अपक्षांच्या मदतीने इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष सत्ता स्थापन करू शकतो. पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी निवडणुकांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.   पाकिस्तानने गिलगिट-बाल्टीस्तान प्रदेश कब्जा केला असून अशा निवडणुका घेऊन पाकिस्तान या प्रदेशांवर राजकीय व भौगोलिक अंकुश ठेवत असल्याचा आरोप भारताने केला होता.

    अझरबैजान व नखचिवन 
    अझरबैजानचं नखचिवन हे स्वायत्त गणराज्य ट्रान्स कॉकेशियन पठारावर स्थित आहे. या देशाच्या आजूबाजूला आर्मेनिया, इराण आणि तुर्कस्थान हे देश आहेत. अझरबैजान आणि नखचिवन राज्य यांच्यामध्ये 80-130 किलोमीटरचा आर्मेनियाचा पट्टा असून तो या दोघांना अलग करतो. सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तेव्हा सगळ्यात आधी नखचिवन इथे स्वातंत्र्याची घोषणा झाली होती. मात्र 15 दिवसांनी हा भाग अझरबैजानमध्ये समाविष्ट झाला. उत्तर कोरियाप्रमाणेच अझरबैजानचे हे भूवेष्टीत स्वायत्त गणराज्य आर्थिकदृष्ट्या कोणत्याही बाहेरच्या देशावर, कोणाच्या मदतीवर किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून नाही.
    1) नखचिवन हा शब्द जुन्या फारसीच्या दोन शब्दांपासून बनला आहे, नख (नोहा) आणि चिवन (स्थान) ज्याचा अर्थ होतो ’नोहा यांचं ठिकाण’. अर्मेनियन भाषेत नखचिवन हा शब्दाचा अर्थ - वंशजांची जागा - असा आहे.  
    2) नखचिवन हा जगातला सगळ्यांत मोठा भूवेष्टीत प्रदेश असून इथली लोकसंख्या अंदाजे 4.50 लाख आहे. 
    3) या प्रदेशाचं क्षेत्रफळ बालीइतकं आहे. इथे सोन्याने मढवलेल्या घुमटांच्या मशिदी आहेत. गेल्या 7500 वर्षांत इथल्या लोकांवर पर्शियन, ऑटोमन आणि रशियन साम्राज्यांनी राज्य केलेलं आहे.
    4) येथे लोखंडाचा गंज असतो तशा लालसर रंगाचे डोंगर आहेत. डोंगरावर बनवलेल्या एका मध्ययुगीन किल्ल्याला लोनली प्लॅनेटने ’युरेशियाचं माचूपिचू’ असं म्हटलं होतं. 
    5) नखचिवनची राजधानी नखचिवन सिटी अतिशय स्वच्छ शहर आहे. या शहरात प्रेषित नोहा यांना दफन केले गेलेले आहे.  
    6) आरस नदीवर बनवलेल्या दोन पुलांनी नखचिवन इराण आणि तुर्कस्तानशी जोडले गेले आहे.
    आर्मेनियाशी युद्ध -
    1) 1988 मध्ये सोव्हिएत संघाची ताकद कमी होत होती तेव्हा दक्षिण-पश्चिम अझरबैजानमध्ये नखचिवनच्या जवळ नागोर्नो-कारबाखमध्ये आर्मेनियातल्या वांशिक समुहांनी अझरबैजानशी युद्ध पुकारलं. 1994 मध्ये हे युद्ध थांबेपर्यंत जवळपास 30,000 लोकांचा मृत्यू झाला होता. या युद्धाचा परिणाम म्हणून आर्मेनियाने नखचिवनचे अझरबैजानकडे जाणारे रस्ते, रेल्वेमार्ग सगळं बंद केलं आणि नाकाबंदी केली. या नाकाबंदीमुळे नखचिवनमध्ये राहाणार्‍या लोकांनी आर्थिकदृष्ट्या आपल्या शेजार्‍यांच्या मदतीवर अवलंबून राहाण्यापेक्षा अन्नधान्यात स्वयंपूर्ण व्हायचं ठरवलं. 2005 मध्ये कच्च्या तेलामुळे अझरबैजानचं उत्पन्न आणि जीडीपी वाढला तेव्हा नखचिवनमध्ये गुंतवणूक वाढली.
    आरोग्यदायक अन्न -
    1) 1981 सुमारास नखचिवनने अन्नधोरण ठरवलं. शेतीत कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घातली आणि संपूर्णपणे ऑरगॅनिक खाणं स्वीकारलं. लोकांना आरोग्याविषयी जागरूक केलं गेलं.  पर्वतांच्या जवळ असणार्‍या जंगलांमधून हिरव्या भाज्या आणि मसाले येतात. 
    2) देशातला समुद्रकिनारा नसल्याने इथलं मीठही इथल्या स्थानिक भूमिगत गुहांमधून येतं. राजधानीपासून 14 किलोमीटर अंतरावर डजडाग नावाची एक गुहा आहे, तिथल्या मीठाच्या खाणीत उपचारकेंद्र (केव्ह थेरेपी) आहे. हे नैसर्गिक खनिज मीठ दम्यापासून ब्राँकायटिसपर्यंत अनेक श्वसनाचे विकार दूर करते.

    प्रश्नमंजुषा (22)
    1) म्यानमारमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकाबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) आंग सान सू की यांच्या शान नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाने दुसर्‍यांदा बहुमत मिळवले. 
    ब) म्यानमार लष्कराने युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलमेंट पार्टीला (यूएसडीपी) समर्थन दिले. 
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) म्यानमारमधील कोणता राजकीय पक्ष अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात मोठा  पक्ष आहे ?
    1) नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी)
    2) मजलिस वहदतुल मुस्लिमीन 
    3) शान नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी
    4) युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलमेंट पार्टीला (यूएसडीपी) 
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानच्या विधानसभेतील सदस्यांची संख्या 25 आहे. 
    ब) सदर विधानसभेतील अपक्ष सदस्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नाव काय ?  
    1) पाकिस्तान मुस्लिम लीग 
    2) जमियत उलेमा-ए-इस्लाम 
    3) पाकिस्तान मुस्लिम लीग - इम्रान
    4)  तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)
     
    5) ट्रान्स कॉकेशियन पठारासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    a) या पठारी प्रदेशातील नखचिवन हे राज्य इराण आणि तुर्कस्तानशी आरस नदीवरील दोन पुलांनी जोडले गेलेले आहे.
    b) आर्मिनियातील डोंगरावर बनवलेल्या एका मध्ययुगीन किल्ल्याला ’युरेशियाचं माचूपिचू’ असं म्हटले जाते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    6) कोणत्या देशाचा भाग अझरबैजान आणि नखचिवन राज्य या दोघांना अलग करतो ?
    1) इराण 
    2) तुर्कस्तान
    3) आर्मेनिया
    4) रशिया
    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (22)
    1-2
    2-3
    3-4
    4-4
    5-1
    6-3

Share this story

Total Shares : 0 Total Views : 239