इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातील यादवी / प्रश्‍नमंजुषा (37)

  • इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातील यादवी / प्रश्‍नमंजुषा (37)

    इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातील यादवी / प्रश्‍नमंजुषा (37)

    • 02 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 233 Views
    • 0 Shares

    इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातील यादवी

     इथियोपियाच्या उत्तर भागातल्या तिग्रे प्रांतात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. येथे इथियोपियाचे पंतप्रधान अ‍ॅबी अहमद अली आणि  तिग्रे पिपल्स लिबरेशन फ्रंट ही संघटना यांच्यात सशस्त्र संघर्ष सुरु आहे. देशांतर्गत वेगवेगळ्या गटांमधले संघर्ष मिटवण्यासाठी अ‍ॅबी अहमद यांनी ज्या राजकीय सुधारणा आणल्या, त्यास काही गटांनी केलेल्या विरोधाची परिणती तिग्रेमधल्या सशस्त्र संघर्षात झाली.

    • नोबेल पुरस्कार 2019 -
     
    2018 साली अ‍ॅबी अहमद अली इथियोपियाचे पंतप्रधान बनले. यांनी शेजारील देश एरिट्रियाशी इथियोपियाचे संबंध सुधारण्यावर भर दिल्याने दोन्ही देशांमधला वीस वर्षांपासूनचा संघर्ष मिटला. याच कामगिरीसाठी अ‍ॅबी अहमद यांना 2019 साली नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 

    • तिग्रे संकट -
     
    1) इथियोपियात संघराज्य पद्धतीची व्यवस्था असून त्या अंतर्गत देशातले महत्त्वाचे समुदाय त्यांच्या स्वतःच्या प्रांतांचा कारभार पाहतात.
     
    2) तिग्रे हा इथियोपियाच्या उत्तर भागातला प्रांत असून, तिथे तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (TPLF) या संघटनेची सत्ता आहे. 2018 साली ओमाहा समुदायाचे अ‍ॅबी अहमद पंतप्रधान होईपर्यंत इथियोपियाच्या केंद्र सरकारमध्ये आणि सैन्यातही काळ  (TPLF) वर्चस्व होतं. अ‍ॅबींनी आणलेल्या बदलांचा या संघटनेवर परिणाम झाला. त्यात सप्टेंबर 2020 महिन्यात केंद्र सत्तेला आव्हान देऊन तिग्रेमध्ये निवडणूक झल्याने मतभेदांत भर पडली.
     
    3) अ‍ॅबी अहमद ज्या आघाडीचं नेतृत्व करतात, ती 5 वर्ष सत्तेत असून, देशात ऑगस्ट 2020 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. पण कोव्हिडच्या साथीचं कारण देत, अ‍ॅबी अहमद यांनी देशातल्या निवडणुका पुढे ढकलल्या.
     
    4) अहमद यांचा कार्यकाल संपला असल्याची भूमिका  (TPLF)  ने घेतली आणि त्यांचा निर्णय झुगारत सप्टेंबर 2020 महिन्यात तिग्रे प्रांतात स्थानिक निवडणुका घेतल्या. त्यानंतर अ‍ॅबींनी तिग्रे प्रांतात सैन्य कारवाईचे आदेश दिले. केंद्रीय सैन्यदलाच्या एका तळावरील  हल्ल्यासाठी  (TPLF) जबाबदार असल्याचा आरोप करत ही कारवाई सुरू झाली.
     
    5) 4 नोव्हेंबर रोजी तिग्रे प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली. इंटरनेट आणि फोन लाईन्स बंद करण्यात आल्या आणि बाकीच्या राज्यांशी तिग्रेला जोडणारे रस्ते बंद करण्यात आले.
     
    6) या लष्करी कारवाईचा अखेरच्या टप्प्यात तिग्रे प्रांताची राजधानी मेकेल केंद्रीय फौजांच्या ताब्यात आली असली तरी तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट  (TPLF) ने सरकारविरुद्ध शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. 

    • पूर्व आफ्रिकेत अशांततेचं सावट -
     
    1) युद्धाचं सावट दिसल्याने हजारोजण तिग्रे प्रदेशातून सीमा ओलांडून शेजारच्या सुदानमध्ये आश्रयासाठी गेले. कोव्हिडच्या साथीच्या काळात झालेलं स्थलांतर निर्वासितांसाठी आणखी धोक्याचं आहे.
     
    2) इथियोपियानं सोमालियामधून आपलं सैन्य माघारी बोलावलं. हे सैनिक सोमालियात संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असलेल्या सरकारला अल-शबाब या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेविरूद्धच्या लढाईत मदत करत होते. त्यांच्या नसण्याचा परिणाम म्हणून या प्रदेशात कट्टरतावाद  डोकं वर काढण्याची भीती आहे.
     
    3) इथियोपियातल्या गोंधळाचा इजिप्तला फायदा होऊ शकतो. कारण इथे उगम पावणार्‍या ब्लू नाईल नदीवरील मोठ्या धरणावरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे. या धरणाचा परिणाम इजिप्तमध्ये वाहात येणार्‍या नाईलच्या प्रवाहावर होणार आहे.

    • ’हॉर्न ऑफ आफ्रिका’ व  इथियोपियाचे महत्त्व -
     
    1) आफ्रिका खंडाच्या नकाशात एडनच्या आखाताजवळ गेंड्याच्या शिंगासारख्या आकाराचा जो भूप्रदेश दिसतो, त्याला ’हॉर्न ऑफ आफ्रिका’ म्हणून ओळखलं जातं. इथियोपिया या हॉर्न ऑफ आफ्रिकामधलं महत्वाचं राष्ट्र आहे.
     
    2) हॉर्न ऑफ आफ्रिकाजवळच्या समुद्रातूनच युरोप आणि आशियाला जोडणारा जगातला  अतिशय महत्त्वाचा व्यापारी मार्ग जातो. सुवेझ कालव्यातून तांबड्या समुद्रामार्गे जहाजं एडनच्या आखातातून अरबी समुद्रात येतात. भारताच्या दृष्टीनं म्हणूनच या प्रदेशात शांतता असणं गरजेचं आहे.

    • इथियोपियाची ओळख - 
     
    1) प्राचीन संस्कृती. भारताशी इथियोपियाचं सांस्कृतिक नातं आहे. 
     
    2) कॉफीचा शोध लागला तो देश.
     
    3) जगातील कुठलीही मॅरेथॉन जिंकणार्‍या धावपटूंचा देश 
     
    4) आफ्रिकन युनियनचं मुख्यालय इथियोपियातच आहे.
     
    5) या देशात हजारो भारतीय नागरीक आणि भारतीय वंशाचे लोक राहतात. 
     
    6) पूर्व आफ्रिकेतला प्रादेशिक सत्ता आणि जागतिक व्यापाराच्या दृष्टीन महत्त्वाचं प्रगतीशील राष्ट्र
     
    7) जागतिक आरोग्य संघटनेचे विद्यमान अध्यक्ष टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस हे इथियोपियाच्या तिग्रे प्रांतातले आहेत. 

     
    प्रश्‍नमंजुषा (37)
     
    1) इथियोपियाचे पंतप्रधान अ‍ॅबी अहमद अली संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    अ) 2018 साली अ‍ॅबी अहमद अली इथियोपियाचे पंतप्रधान बनले.
    ब) त्यांना 2019 साली नोबेल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आले.
    क) त्यांनी देशात डिसेंबर 2020 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका कोव्हिडच्या साथीचं कारण देत पुढे ढकलल्या.
    ड) त्याना तिग्रे पिपल्स लिबरेशन फ्रंट संघटनेचे समर्थन आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    2) ’हॉर्न ऑफ आफ्रिका’ संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) एडनच्या आखाताजवळ असलेला गेंड्याच्या शिंगासारख्या आकाराचा भूप्रदेश.
    ब) सुवेझ कालवा व तांबड्या समुद्रामार्गे येणारी जहाजं येथून अरबी समुद्रात प्रवेश करतात. 
    क) या भागावर तिग्रे पीपल्स लिबरेशन फ्रंट (ढझङऋ)  या संघटनेची सत्ता आहे. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    3) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) जागतिक आरोग्य संघटनेचे ध्यक्ष टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस हे तिग्रे समुदायाचे आहेत.
    ब) इथियोपियाचे पंतप्रधान अ‍ॅबी अहमद अली ओमाहा समुदायाचे आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) ब्लू नाईल नदीचा उगम कोणत्या देशात होतो ?
    1) इजिप्त
    2) एरिट्रिया
    3) इथियोपिया
    4) सुदान
     
    5) इथियोपियाबाबतची खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा :
    अ) आफ्रिकन युनियनचं मुख्यालय या देशात आहे.
    ब) या देशात कॉफीचा शोध लागला.
    क) इथियोपियाच्या शेजारील देश - इजिप्त, एरिट्रिया, सोमालिया,सुदान
    ड)  अल-शबाब ही इस्लामिक कट्टरतावादी संघटनेचे मुख्यालय या देशात आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    2) विधाने अ आणि ब बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (37)
    1-2
     
    2-2
     
    3-3
     
    4-3
     
    5-2

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 233