भौगोलिक आणि पर्यावरणविषयक घटना / प्रश्नमंजुषा (66)
- 23 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 485 Views
- 0 Shares
देशातील पहिला जल बोगदा
डिसेंबर 2020 मध्ये राजस्थानमध्ये देशातील पहिला जल बोगदा वापरासाठी सज्ज झाला. झालावाड, बारा, कोटा जिल्ह्यांत सिंचन व पेयजल सुविधेसाठी खानपूर भागातील अकावदा कला गावात परवन नदीवर बंधारा आहे. या बंधार्यातून नहरीपर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी 8.7 किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात आला. डोंगर पोखरून तो तयार केला आहे. सिंचनासाठी दोन कालवे असून सदर बोगदा बंधार्याच्या उजव्या मुख्य कालव्याजवळ आहे.
जल बोगद्याची वैशिष्ट्ये -
• बोगद्याद्वारे बंधार्यातून आलेल्या पाण्यामुळे 2.12 लाख हेक्टर जमिनीचे सिंचन
• 1821 गावांना पेयजल सुविधेचा लाभ
• 637 गावांत सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध
• जल बोगद्यासाठी झालेला खर्च सुमारे 300 कोटी रु.
व्ही. एस. राजू समिती व श्रीराम जन्मभूमी मंदिर
22 डिसेंबर 2020- अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराची पायाभरणीची रचना निश्चित करण्यासाठी नेमलेल्या टॉप 8 टेक्नॉक्रॅट सदस्यांच्या समितीने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला आपला अहवाल सोपवला. दिल्ली आयआयटीचे माजी संचालक व्ही. एस. राजू समितीचे अध्यक्ष आहेत.
• श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या तज्ज्ञ समितीचे सदस्य -
1) अध्यक्ष प्रा. व्ही.एस राजू (माजी संचालक, आयआयटी दिल्ली),
2) संयोजक प्रा. एन. गोपालकृष्णन (संचालक, सीबीआरआय, रुरकी)
3) प्रा. एसआर गांधी
4) प्रा. टीजी सीताराम
5) प्रा. बी. भट्टाचार्जी
6) ए. पी. मूल,
7) प्रा. मनू संथानम,
8) प्रा. प्रदीपता बॅनर्जीं
• ट्रस्टच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष - नृपेंद्र मिश्र
• ट्रस्टचे कोषाध्यक्ष - गोविंददेव गिरी
या अहवालातील शिफारशी -
1) व्हायब्रोस्टोन कॉलम व कंटिन्युअस राफ्ट स्टोन या दोन तंत्रज्ञानाद्वारे पायाबांधणीची सूचना
2) श्रीराम जन्मभूमी मंदिराची पायाभरणी 1200 भूमिगत खांबांऐवजी प्राचीन पद्धतीने करावी.
3) भूमिगत खांबांसाठी केलेले संशोधन पाया रचनेत स्थैर्य आणण्यास उपयुक्त
कंटिन्युअस राफ्ट स्टोन तंत्रज्ञान-
1) सध्या धरणे व उंच इमारतींचा पाया भक्कम करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो.
2) यात 10 मिमी ते 80 मिमी दगडांचा उपयोग केला जातो.
3) यात ठराविक खोलीपर्यंत खोदकाम होते. त्यानंतर दगड,वाळू व चुन्याचे थर टाकले जातात.
4) प्रत्येक थराला ठराविक पद्धतीने दबाव टाकून स्थिरता व मजबुती दिली जाते.
5) त्यावर प्लॅटफॉर्म तयार करून मंदिराचे बांधकाम करतात.
6) हे काम शास्त्राशी सुसंगत असावे यासाठी दगडासोबत चुना व औषधांचे मिश्रणही वापरले जाते.
7) या तंत्राद्वारे प्राचीन काळात दगडांपासून भव्य मंदिरे, किल्ल्यांचा पाया रचला जायचा. सध्या आधुनिक यंत्रांद्वारे पाया तयार होतो.
व्हायब्रोस्टोन कॉलम -
1) यात जमिनीच्या खालून दगडांचे स्तंभ रचनेच्या विशेष पॅटर्नमध्ये जमिनीवर आणले जातात.
2) पृष्ठभाग भूकंप आणि भूजलापासूनही सुरक्षित रहावा, इतका हा पृष्ठभाग मजबूत करण्यात येतो. वर राफ्ट तयार केली जाते.
देशातील पहिली रेल्वेमालगाडी
16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान देशात पहिल्यांदा धावली इतिहासात असे नमूद आहे. 1 तासात ही रेल्वे अंदाजे 32 किमी अंतर धावली होती. पण त्यापूर्वीही भारतात रेल्वे धावल्याचा उल्लेख आढळतो. अथार्र्त ती रेल्वेमालगाडी होती.
• 22 डिसेंबर 1851 रोजी एका ब्रिटीश अधिकार्यामुळे देशात पहिली रेल्वेेमालगाडी रुरकी ते पिरान काळीयार दरम्यान सुमारे 5 किलोमीटर धावली होती. तत्कालीन उत्तर पश्चिम प्रांतामध्ये जो दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळ निवारणप्रसंगी पहिल्यांदा ब्रिटीशांनी रेल्वेमालगाडी चालवली होती.
• हरिद्वार ते कानपूर दरम्यान 500 किलोमीटर लांबीचा गंगा कालवा बनविणारे तत्कालीन अभियंता कर्नल प्रो. बी.टी. कॉटल यांनी गंगा नहारवर लिहिलेल्या गंगा नहार वर्गावरील अहवाल या अहवालात याबद्दल माहिती आहे. हा अहवाल भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), रुरकीच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे.
गंगानहरचे काम आणि रेल्वेद्वारे गाळाची वाहतूक -
• 1837-38 मध्ये उत्तर पश्चिम प्रांतात (उत्तर प्रदेश) तीव्र दुष्काळ पडला होता. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीला मदत कार्यासाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करावा लागला होता. अशा परिस्थितीत तत्कालीन सरकारने गंगेतून कालवा काढण्याचा निर्णय घेतला. कर्नल प्रो. बी.टी. कॉटल यांच्यावर ही जबाबदारी सोपविली गेली होती.
• कॉटल यांच्यापुढे रुरकी जवळून वाहणारी सोलानी नदीच्या मधून कालवा कसा काढायचा हे मोठे आव्हान होते. हा कालवा पूर्ण झाल्यावर त्यावर पूल बांधण्यासाठी नदीत खांब उभारण्यासाठी खोदकाम करायचे होते. घोडा व खेचरांकडून हे काम केल्यास त्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्यामुळे कॉटल यांनी त्यासाठी रेल्वे ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी लंडनहून उपकरणे मागवली आणि तज्ज्ञांकडून रुरकीमध्ये रेल्वे इंजिनची बांधणी केली. उत्तर-पश्चिम प्रांताचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर सर जेम्स थॉमसन यांचे नाव या इंजिनला देण्यात आले होते. या वाफेवर चालणार्या इंजिनच्या मदतीने एकाच वेळी दोन वॅगनमध्ये 180 ते 200 टन गाळ वाहून नेला गेला.
• सर जेम्स थॉमसन रेलवे इंजिन - या रेल्वे इंजिनचा वेग ताशी 6.4 किलोमीटर होता आणि संपूर्ण वर्षभर (1852) ते ट्रॅकवर धावत होते. दोन वर्षांनंतर, 1854 मध्ये गंगानहरचे बांधकाम पूर्ण झाले. हा कालवा बांधण्यास 12 वर्षे लागली होती.
• भारतीय रेल्वेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2003 मध्ये रुरकी रेल्वे स्थानकात सर्वात जुन्या जेनी लिंड इंजिनचे मॉडेल बसविण्यात आले. अमृतसरमधील रेल्वे कारखान्यात तयार केलेले हे मॉडेल काही वर्षांपूर्वी प्रत्येक शनिवार व रविवारी संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत चालविले जाई. पण सध्या देखभाल न केल्याने ते बंद अवस्थेत आहे.
स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018
21 डिसेंबर 2020-भारतात वाघांसोबतच बिबटयांची देखील गणना केली जात असून बिबटयांच्या संख्येत महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, महाराष्ट्रात 1690 बिबटे आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी हा अहवाल तयार केला.
• वाघांचा अधिवास असणार्या संरक्षित वनक्षेत्रात आणि काही ठिकाणी शेतजमिनीवरही ही गणना करण्यात आली. संरक्षित वनक्षेत्रात बिबटयांची गणना करण्यात आली.
• गेल्या काही वर्षांत वाघ, सिंह तसेच बिबट्यांच्या संख्येत वाढ झाली असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच कर्नाटकात त्यांची संख्या अधिक आहे. व्याघ्र संवर्धनासाठी उचलण्यात आलेल्या महत्त्वाच्या पावलांमुळे पर्यावरणीय साखळीत महत्त्वाची भूमिका असलेल्या बिबट्यासारख्या प्राण्यांचे संरक्षण झाले आहे.
• अहवालातील नोंदी-
1) 2014 च्या तुलनेत 2018 साली देशात बिबटयांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली.
2) 2014 मध्ये देशातील बिबट्यांची संख्या 7,910 होती. 2018 मध्ये ही संख्या 12,852 इतकी झाली.
3) बिबटे हा गावाच्या सीमेलगत राहणारा प्राणी असल्यामुळे त्यांची एकूण संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. संरक्षित क्षेत्राशिवाय शेतशिवारात बिबटयांचा वावर मोठया प्रमाणात आहे.
4) महाराष्ट्र बिबटयांच्या संख्येत तिसर्या क्रमांकावर असला तरी 2018 च्या तुलनेत 2019 वर्षी बिबटयांचे मृत्यू अधिक आहेत. सुमारे 175 बिबटयांचा मृत्यू झाला.
5) बिबटयांच्या माणसांवरील हल्ल्यात देखील वाढ झाल्याने बिबटयांच्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येणार.
• बिबटयांची संख्या -
1) मध्यप्रदेश : 3, 421
2) कर्नाटक : 1, 783
3) महाराष्ट्र : 1, 690
4) कर्नाटक, तामिळनाडू, गोवा, केरळ : 3, 387
5) उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार : 1, 253
राज्य वन्यजीव मंडळ
2020 हे वर्ष जंगल आणि वन्यजीवांसाठी पूर्णपणे वेगळे आणि कलाटणी देणारे, अनेक पर्यावरणपूरक निर्णयांचे वर्ष ठरले. हे निर्णय वन्यजीव, जंगल आणि माणसांसाठीसुद्धा तेवढेच हितकारक आहेत.
• 1990 च्या दशकात राज्य वन्यजीव मंडळ निर्माण झाले. 2019 मध्ये मंडळाची पुनर्रचना झाली. मंडळाचे अध्यक्षपद हे मुख्यमंत्र्यांकडे असते. यावेळी पहिल्यांदा राजकारणाच्या पलीकडे जाऊन आणि मुख्यमंत्रिपद दूर ठेवून मंडळाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले. जंगल आणि वन्यजीव संवर्धनाला प्राधान्य देणार्या सदस्यांची निवड केली. ओळखीपेक्षा गुणवत्तेच्या निकषांवर हा बदल घडवून आणला.
• राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठका दर तीन महिन्यांनी होणे अपेक्षित असते. 2020 या वर्षांत दोन बैठका पार पडल्या. ऑगस्ट 2020 मध्ये मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवाद पद्धतीने राज्य वन्यजीव मंडळाची बैठक बोलावली. नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा मंडळाची दुसरी बैठक पार पडली. राज्य वन्यजीव मंडळाच्या या दोन बैठकांमध्ये पर्यावरणहिताचे, तसेच जंगल आणि वन्यजीव संवर्धनासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
• महत्त्वाचे निर्णय -
1) राज्य वन्यजीव मंडळाने दहा संवर्धन राखीव क्षेत्रांची घोषणा केली.
2) वन्यजीव संवर्धन राखीव क्षेत्रासाठी आजतागायत स्वतंत्र निधीची तरतूद नव्हती, ती केली गेली.
3) वन्यजीव संवर्धन निधी आणि त्यासाठी उभारले जाणारे न्यास यांमुळे वन्यजीव संवर्धनाचा मार्ग सुकर होईल.
4) सर्व 11 वनवृत्तांमध्ये ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर- मानव-वन्यजीव संघर्षांत वन्यजीव जखमी झाला तर त्याला 100 ते 200 किलोमीटर प्रवास करून आणावे लागते. कित्येकदा असा लांबचा प्रवास जखमी वन्यजीवांस सोसवत नाही आणि ते मृत्युमुखी पडतात. भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपुरात सुरु झाले होते. अत्याधुनिक अशा या केंद्राने अनेक वन्यजीवांना जीवदान दिले. उपचारानंतर त्यांना त्यांचा अधिवास परत मिळवून दिला. याच धर्तीवर राज्यातील सर्व 11 वनवृत्तांमध्ये तातडीने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ पशुवैद्यक नेमण्याचा निर्णय बैठकीत झाला.
5) पक्षी सप्ताह - गेल्या चार दशकांपासून राज्यात पक्षिमित्र संमेलन आयोजित केले जाते. पक्षीतज्ज्ञ दिवंगत डॉ. सालीम अली आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे जन्मदिन आठवड्याच्या अंतराने असल्याने तो पक्षी सप्ताह साजरा करण्यास 2020 मध्ये सुरुवात झाली.
6) वन्यजीव संवर्धन कार्याचे विकेंद्रीकरण करण्यात आले. स्थानिक प्रश्नांची जाण असणार्या त्या त्या क्षेत्रातील मंडळींचे अभ्यासगट तयार करून संबंधित प्रश्न सोडवावेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
7) लोणार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा - जगभरात बेसॉल्ट खडकात तयार झालेले दोनच विवर आहेत. त्यातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे एक. जगभरातील संशोधक या ठिकाणी संशोधनासाठी येत असतात, त्यास रामसर स्थळाचा दर्जा मिळणे अपेक्षित होते. इराणमधील रामसर येथे कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स या 1971 सालच्या जागतिक परिषदेत पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार, सहभागी राष्ट्रांकडून आपापल्या देशातील जागतिकदृष्टया महत्त्वाच्या पाणथळ जागा शोधून त्यांच्या संवर्धनकार्यासाठी त्यांना रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो. लोणारबाबत तसा प्रस्ताव पाठवण्याची तसदी घेतली गेली नव्हती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दृष्टीने पाठपुरावा केला व लोणार सरोवराला रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झाला.
जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय
22 डिसेंबर 2020 - गुजरातमधील जामनगर येथे येत्या दोन वर्षात जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणार आहे.
1) प्राणीसंग्रहालय प्रकल्पाचे नाव - ग्रीन्स जिऑलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन किंग्डम
2) हे प्राणीसंग्रहालय जामनगरच्या मोती खवडी जवळील रिलायन्स रिफायनरी प्रकल्पाजवळ 300 एकर जमिनीवर उभारण्यात येणार.
3) या प्राणीसंग्रहालयात सुमारे 100 हून अधिक प्रकारचे प्राणी आणि पक्षी - आशियाई सिंह, वाघ, बिबट्यांशिवाय आफ्रिकी वाघ, चित्ता, कोल्हा, आशियाई वाघ, पिग्मी हिप्पो, ओरंगुटन, बंगाल टायगर, गोरिला, झेब्रा, जिराफ, आफ्रिकी हत्ती, कोमोडो ड्रॅगन, बार्किंग डियर्स, फिशिंग कॅट्स, स्लोथ बीयर्स, लांडगे, सारंग.
4) या प्राणीसंग्रहालयात नाइट सफारीही करता येणार
5) या संग्रहालयातील वेगवेगळे विभाग - फ्रॉग हाऊस, ड्रॅगन लँड, मार्शेस ऑफ वेस्ट कोस्ट, इंडियन डेजर्ट एंड एक्जोटिक आयलँड, लँड ऑफ रोडेन्ट, इन्सेक्टोरियम, अॅक्वेटिक किंग्डम.
6) फ्रॉग हाऊसमध्ये 200 विविध प्रकारचे बेडूक आणि अॅक्वेटिक किंगडममध्ये 350 प्रकारचे मासे
7) या संग्रहालयात विविध जातीचे प्राणी, चिमण्या, पक्षी आणि सरपटणारे जीव ठेवण्यात येणार
• गुजरातचे वैशिष्ट्य-
1) जगातील सर्वात मोठा पुतळा - स्टॅच्यू ऑफ युनिटी
2) जगातील सर्वात लांब सिंचन कालवा - नर्मदा कालवा
3) जगातील सर्वात मोठा विद्युत प्रकल्प असलेले धरण - सरदार सरोवर
4) जगातील सर्वात मोठा नूतनीकरणयोग्य अक्षय ऊर्जा प्रकल्प
5) जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय
पुण्यातील गव्याचे प्रकरण
मानव-वन्यजीव संघर्षांत बहुतांशी वन्यजीवच मृत्यूमुखी पडतो असे आढळून येते. 9 डिसेंबर 2020 रोजी पुण्यातील कोथरुडच्या कर्वे रोडवर आलेला रानगवा, माणसांच्या जमावाला भेदरुन सतत 5 तास पळून पळून दमल्याने मृत्युमुखी पडला.
• वन्य जीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार 2015 मध्ये केंद्र व राज्य सरकारनं वन्य प्राणी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आल्यास परिस्थिती कशी हाताळावी, याच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे पालन यावेळी झाले नाही. मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही केल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवून, वन्य प्राणी आणि माणसं जखमी होणार नाहीत किंवा त्यांचा जीव जाणार नाही याची दक्षता घेऊन, वन्य प्राण्याला पकडता येतं. पण या वेळी सर्वच सरकारी यंत्रणांनी त्याचं योग्य पालन न केल्यानं रानगव्याला प्राणास मुकावं लागलं. यात केवळ वन विभागच नाही, तर पोलिस, महसूल विभागाबरोबरच ज्यांची प्रथम जबाबदारी आहे, त्या महानगर पालिकेनंही मार्गदर्शक सूचनांचं पालन केलं नाही. वन आणि वन्यजीव विभागात समन्वय नसल्यानंही हे सर्व घडलं. वन्य प्राण्यांना बेशुद्ध करण्याचं आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना पुण्यात आलेल्या गव्याला पकडण्यासाठी दोर आणि जाळीचा वापर करणं टाळायला हवं होतं. जाळीचा वापर केवळ लहान आकाराच्या प्राण्यांना पकडण्यासाठी करावयाचा असतो. रेस्क्यू टीमला आवश्यक अनुभव आणि प्रशिक्षण नसल्यास हेच होणार.
• स्वत:चा जीव वाचविण्यासाठी वन्य प्राणी माणसांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या अगदी उलट, माणसं वन्य प्राण्यांच्या मागं पळत स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि वन्य प्राण्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतात.
• वन विभाग-
1) वन विभागाअंतर्गत जे अनेक उपविभाग आहेत, त्यांत वन आणि वन्यजीव विभाग हे दोन महत्त्वाचे विभाग आहेत. राज्यातील संरक्षित क्षेत्राचे अधिकार वन्यजीव विभागाला आहेत, तर त्याच्या बाहेर असलेल्या इतर वन क्षेत्रात किंवा खासगी क्षेत्रात अशी घटना घडल्यास त्याची जबाबदारी वन विभागावर येते.
2) राज्यात 20 टक्के वनक्षेत्र आहे. त्यापैकी फक्त 3 टक्के क्षेत्र वन्यजीव विभागाकडं आहे. उर्वरित क्षेत्र वन विभागाकडं आहे. पण आतापर्यंत अशी परिस्थिती हाताळण्यासाठी वन्यजीव विभाग वन विभागापेक्षा अधिक सक्षम आहे. त्यामुळं वन विभागाच्या कार्यक्षेत्रात अशी घटना घडल्यास त्यांना वन्यजीव विभागाची मदत घेणं क्रमप्राप्त ठरतं. दोन विभागांत समन्वय असला तर हे अवघड नाही; पण काही वेळा या सुविधा त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात असल्यानं मदत पोहोचण्यास वेळ लागतो. म्हणूनच आता अशी व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे.
3) महसूल विभाग, तसंच महानगरपालिका, नगरपालिका यांनी स्वतंत्र व्यवस्था निर्माण केल्यास वन विभागावर अतिरिक्त ताण येणार नाही.
4) मानव - वन्य प्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वन्यजीव व्यवस्थापन या विषयाची व्याप्ती गेल्या दशकात प्रचंड वाढली आहे. व्यवस्थापनदेखील गुंतागुंतीचं बनत चाललं आहे. अशा परिस्थितीत केवळ राज्यातच नाही, तर संपूर्ण देशात वन धोरणाप्रमाणेच स्वतंत्र वन्यजीव धोरण तयार करण्याची नितांत गरज आहे.
पुणे परिसरातील काही घटना -
• 9 डिसेंबर 2020 ला पुण्यात कर्वे रोडवर आलेला रानगवा (5 तास पळून पळून दमल्याने मृत)
• 2006 मध्ये पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात आलेला बिबट्या (पळून पळून दमल्याने मृत)
• 4 जानेवारी 2000 ला भारती विद्यापीठात आलेला रानगवा
• 3 डिसेंबर 1999 ला पुण्यातील नळ स्टॉपजवळ आलेला बिबट्या
प्रश्नमंजुषा (66)
1) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) भारतातील पहिले ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर नागपुरात सुरु झाले होते.
2) जगभरात बेसॉल्ट खडकात तयार झालेले दोन विवरे आहेत.
3) पक्षी सप्ताह साजरा करण्यास 2020 मध्ये सुरुवात झाली.
4) बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे चुनखडी खडकात तयार झालेले आहे.
2) ग्रीन्स जिऑलॉजिकल रेस्क्यू अॅण्ड रिहॅबिलिटेशन किंग्डम संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) हा जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय प्रकल्प आहे.
ब) तो रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतर्फे उभारण्यात येणार.
क) तो जामनगरच्या मोती खवडी जवळील 300 एकरात विकसित करण्याचे नियोजन.
ड) तो पाणथळ क्षेत्रातील महत्त्वाचा प्रक्ल्प आहे.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
3) रुरकी जवळून वाहणारी नदी कोणती ?
1) परवन
2) शरयू
3) सोलानी
4) गोमती
4) रामसर स्थळा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) 1971 च्या जागतिक करारानुसार संवर्धन केलेली पाणथळ जागा
ब) इराणमधील रामसर येथे कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स मान्य करण्यात आले.
क) महाराष्ट्रात 2 रामसर स्थळे आहेत.
ड) महाराष्ट्रात लोणार सरोवराला सर्वप्रथम रामसर स्थळाचा दर्जा मिळाला.
इ) बेसॉल्ट खडकात तयार झालेली दोन्ही विवरे रामसर स्थळे आहेत.
फ) पाणथळ जागा शोधून त्यांच्या संवर्धनकार्यासाठी त्यांना रामसर स्थळाचा दर्जा दिला जातो.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि इ वगळता सर्व
3) ब वगळता सर्व
4) ड आणि फ वगळता सर्व
5) सध्या धरणे व उंच इमारतींचा पाया भक्कम करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर केला जातो ?
1) व्हायब्रोस्टोन कॉलम
2) कंटिन्युअस राफ्ट स्टोन तंत्रज्ञान
3) भूकंपरोधी तंत्रज्ञान
4) वॉटरबाऊंड मेकॅडम
6) स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018नुसार खालील जोड्या अचूक जुळवा ः
स्तंभ अ (राज्य ) स्तंभ ब (बिबट्यांची संख्या)
अ. 1253 I. मध्यप्रदेश
ब. 1690 II. महाराष्ट्र
क. 1783 III. कर्नाटक
ड. 3421 IV. उत्तरप्रदेश, उत्तराखंड व बिहार
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) II III I IV
2) II I III IV
3) III II IV I
4) IV II I III
7) 22 डिसेंबर 1851 रोजी एका ब्रिटीश अधिकार्यामुळे देशात पहिली रेल्वेेमालगाडी रुरकी ते पिरान काळीयार दरम्यान सुमारे 5 किलोमीटर धावली होती. ?
1) सर जेम्स थॉमसन
2) लॉडर्र् डलहौसी
3) कर्नल प्रबी.टी. कॉटल
4) वरील सर्व
8) देशात पहिल्यांदा धावलेल्या रेल्वेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी धावली.
ब) ही रेल्वे 2 तासात अंदाजे 32 किमी अंतर धावली होती
क) या रेल्वेच्या इंजिनाचे नाव - सर जेम्स थॉमसन रेल्वे इंजिन
ड) ही रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
9) अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराची पायाभरणीची रचना निश्रि्चत करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
1) प्रा. एन. गोपालकृष्णन
2) प्रा. व्ही.एस राजू
3) प्रा. एसआर गांधी
4) प्रा. प्रदीपता बॅनर्जीं
10) देशातील पहिल्या रेल्वेमालगाडी संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) रुरकी येथे तिच्या रेल्वेइंजिनची बांधणी केली गेली.
ब) 22 डिसेंबर 1851 रोजी पहिली रेल्वेेमालगाडी धावली.
क) नदीएतील गाल वाहून नेण्यासाठी तिचा वापर केला गेला.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
11) व्हायब्रोस्टोन कॉलम तंत्रज्ञानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) पृष्ठभाग भूकंप आणि भूजलापासूनही सुरक्षित रहावा, इतका हा पृष्ठभाग मजबूत करण्यात येतो.
ब) जमिनीच्या खालून दगडांचे स्तंभ रचनेच्या विशेष पॅटर्नमध्ये जमिनीवर आणले जातात.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
12) देशातील पहिला जल बोगदा कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) पंजाब
3) राजस्थान
4) तामीळनाडू
13) महाराष्ट्रातील वना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यात 20 टक्के वनक्षेत्र आहे.
ब) राज्यातील एकूणापैकी 3 टक्के क्षेत्र वन्यजीव विभागाकडं आहे.
क) राज्यातील एकूणापैकी 97 क्षेत्र वन विभागाकडं आहे.
ड) राज्यातील एकूणापैकी 5 टक्के क्षेत्र खाजगी क्षेत्राकडं आहे.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
14) कोणत्या वर्षी केंद्र व राज्य सरकारन्र वन्य प्राणी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी आल्यास परिस्थिती कशी हाताळावी, याच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या ?
1) 1972
2) 1999
3) 2015
4) 2020
उत्तरे : प्रश्नमंजुषा (66)
1-4
2-1
3-3
4-2
5-2
6-4
7-1
8-3
9-2
10-2
11-3
12-3
13-1
14-3