दिल्लीतील वायुप्रदूषण व शेतकचरा / प्रश्नमंजुषा (33)
- 28 Nov 2020
- Posted By : Study Circle
- 226 Views
- 0 Shares
दिल्लीतील वायुप्रदूषण व शेतकचरा
गेल्या काही वर्षांत नवी दिल्लीतील वायुप्रदूषण चर्चेचा व चिंतेचा विषय बनला आहे. दिल्ली शेजारची पंजाब व हरियाणा ही राज्ये देशाची धान्यकोठारे बनली असली तरी दिल्लीतील वायुप्रदूषणास त्या राज्यातील पीकपद्धती कारणीभूत आहे. भारतातील टाकाऊ शेतमालाचे प्रमाण 2030 अखेरपर्यंत तर ते 86.8 कोटी टन होईल, असा अंदाज आहे. 2020 मध्ये ते 55.6 कोटी टन असून 2025 अखेरीस ते 70.08 कोटी टनांच्या घरात जाईल. यांपैकी 17 टक्के शेतकचरा हा शेतात पेटवून दिला जातो.
► पंजाब व हरियाणातील पीकपद्धती -
1) स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या दोन दशकांत पंजाब व हरियाणा राज्यात मका, डाळी आणि तेलबिया यांचे उत्पादन घेतले जाई. हरितक्रांतीनंतर या राज्यांतील पाण्याच्या उपलब्धतेमुळे या पीकपद्धतीत बदल झाले. सध्या शेतजमीन मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली आल्याने या राज्यात खरीप हंगामात भात आणि रब्बीत गहू ही पीके प्रामुख्याने घेतली जातात.
2) किमान आधारभूत किमतीच्या हमीची भर पडल्याने पंजाब व हरियाणाचे शेतकरी गहू व तांदळाकडे वळले.
3) 1990 च्या दशकात, पारंपरिक भातपिकाच्या 4 महिन्यांच्या चक्राऐवजी 2 महिन्यांत काढणीला येणारी तांदळाची जात विकसित झाल्याने एका हंगामात दोनदा भात घेण्याची संधी मिळाली. मात्र त्यातून भूगर्भातील पाणीपातळी झपाट्याने घसरू लागली.
► दिल्लीतील वायुप्रदूषणास पीकपद्धतीची पार्श्वभूमी -
खालील कारणामुळे पीककाढणीनंतर रब्बीच्या तयारीपूर्वी भाताचा शेतकचरा पेटवून दिला जातो -
1) 2008 मध्ये पंजाब सरकारने वटहुकूम काढून खरीप हंगामात 10 जूनपूर्वी भातलागवड करण्यास शेतकर्यांना मनाई केली. त्यामुळे खरीप हंगाम 2 महिन्यांनी पुढे गेला. तसेच शासकीय मुदतीआधी लागवड केल्यास दंडात्मक कारवाई होऊ लागली. शेतकर्यांच्या दृष्टीने हे बदल आर्थिक झळ देणारे होते.
2) पूर्वीपेक्षा उशिरा हंगाम सुरू झाल्यामुळे पिकावर कीडनाशकाची फवारणी वाढली.
3) भात आणि गहू यांच्यामध्ये बटाटा लागवड करणार्या शेतकर्यांना त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.
4) भाताचे पिंजार जनावरांना चारा म्हणून विकण्यासाठी किंवा स्वतः वापरण्यासाठी, तसेच साठवून ठेवण्यासाठी शेतकर्यांना वेळ कमी पडू लागला आणि गव्हाच्या काढांचा पर्यायही उपलब्ध होऊ लागल्याने भाताच्या पेंढ्यांना चारा म्हणून मागणी कमी झाली.
5) हा शेतकचरा पेटवून दिल्याने त्याचा धूर दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता वाढवित गेला आहे.
► शेतकचरा आणि प्रदूषण -
1) 1 टन शेतकचरा जाळला गेला, की त्यातून 5.5 किलो नत्र, 2.3 किलो स्फुरद, 2.5 किग्रॅ. पोटॅशियम आणि 1 किलोहून अधिक सल्फर या जमिनीचा पोत टिकवणार्या पोषक घटकांची हानी होते.
2) शेतकचरा जाळणे वायुप्रदूषणालाच नव्हे, तर शेतीलाही हानिकारक आहे.
3) शेतकचरा पेटवून दिला जाणे ही पंजाब किंवा हरियाणापुरता नव्हे, तर संपूर्ण देशातील समस्या आहे.
4) शेतकचर्यातून इंधननिर्मितीचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
► दिल्लीतील वायुप्रदूषण -
1) ‘जागतिक आरोग्य संघटने’ने पाहणी केलेल्या जगातील प्रमुख शहरांत दिल्लीचा क्रमांक 2019 मध्ये पहिला होता.
2) 2019 च्या मध्यकाळात टाळेबंदीमुळे प्रदूषणपातळी घटली होती. ती 15 ऑक्टोबर 2020 ला अतिचिंताजनक पातळीपलीकडे गेली आणि सप्टेंबरातील पीककाढणीनंतर शेतकचरा पेटण्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला.
3) ‘आयआयटी’ कानपूरच्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील वायुप्रदूषणाला कारणीभूत 17 ते 26 टक्के घटक हे जैवभार पेटवून देण्याच्या परिणामी हवेत तरंगतात. शेतकचरा पेटवून दिला जाण्याचा काळ साधारणतः 45 दिवसांचा असतो. त्याचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या काळात तर हवेतील प्रदूषणकारी घटकांमध्ये त्याचे प्रमाण तर 40 टक्क्यांपर्यंत गेले होते.
► दिल्लीतील वायुप्रदूषणावरील उपाय -
1) शेतकचर्यापासून संपीडित जैववायू निर्मिती करता येते. शेतकचरा पेटवून समस्या निर्माण करण्याऐवजी इंधननिर्मितीसाठी जैवभार म्हणून त्याचा वापर करण्याचा पर्याय या तंत्रज्ञानांमुळे उपलब्ध झाला आहे.
2) भारतात ‘प्राज इंडस्ट्रीज’ने पुढाकार घेऊन भारतीय तेलकंपन्यांशी करार करून शेतकचर्यापासून इथेनॉल निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान विकसित करुन प्रकल्प उभारणीसाठी भारतीय तेलकंपन्यांशी करार केले आहेत.
3) देशातील तेलउत्पादक कंपन्यांनी इथेनॉलवर आधारित जैवऊर्जा प्रकल्पांसाठी वार्षिक 1.50 लाख टन जैवभाराची गरज राहणार आहे.
4) कचर्यातून इंधनसंपत्ती संपत्ती निर्माण केल्यास खनिज इंधनांच्या आयातीवर अवलंबून राहणार्या आणि त्यामुळे परकी चलनाची गंगाजळी आटवणार्या प्रक्रियेला प्रतिबंध घालता येतो. तसेच हरितवायूउत्सर्ग, तापमानबदल अशा अनेक विनाशकारी दिशांनी जाण्यास कारणीभूत ठरणार्या पर्यायाला त्यामुळे अटकाव घालता येतो.
5) शेतातील कचरा ते ऊर्जाप्रकल्पांसाठीचा जैवभार हा प्रवास पूर्ण करण्यात शेतकरी महत्त्वाचा दुवा आहे. शेतकचरा पेटवून देण्याऐवजी तो शेतातच जिरवण्यासाठी एकरी 2500 रुपये अनुदान देण्याची घोषणा पंजाब व हरियाना सरकारांनी केली होती. परंतु हे अनुदान फक्त त्यासाठीचे यंत्र खरेदी करण्याएवढाच खर्चाचा बोजा हलका करणारे आहे. त्याचा वापर आणि देखभाल यांसाठीचा खर्च, ऐन हंगामात त्यावर द्याव्या लागणार्या वेळेचा खर्च यांचा शेतकर्यावर पडणारा बोजा त्यात गृहित धरलेला नाही.
6) ऊर्जा सुनिश्चितता हे केंद्राचे धोरण आहे, शेतकरी हा इंधनासाठीचा कच्चा माल पुरवू शकणार आहे. त्याद्वारे शेतीपलीकडील अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम करण्याची भूमिका तो बजावू शकतो.
प्रश्नमंजुषा (33)
1) दिल्लीतील वायुप्रदूषणाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) पंजाब व हरियाणा राज्यात शेतकचरा पेटवून दिल्याने त्याचा धूर दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता वाढवितो.
ब) या वायुप्रदूषणास दिल्ली शेजारील सर्व राज्यातील पीकपद्धती कारणीभूत आहे.
क) शेतकचरा पेटवून दिल्यानंतर त्यातील धूर दिल्लीतील प्रदुषणाची तीव्रता 45 दिवस प्रभावित करतो.
ड) दिल्लीतील हवेतील प्रदूषणकारी घटकांमध्ये शेतकचर्याचे प्रमाण 50 टक्क्यांपर्यंत आहे.
इ) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2019 मध्ये वायूप्रदुषणात जगातील प्रमुख शहरांत दिल्लीचा क्रमांक पहिला होता.
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) ब वगळता सर्व
4) क आणि ड वगळता सर्व
2) पंजाब व हरियाणा सरकारद्वारे शेतकचरा पेटवून देण्याऐवजी तो शेतातच जिरवण्यासाठी शेतकर्यांना किती अनुदान दिले जाते ?
1) एकरी 1500 रुपये
2) एकरी 3500 रुपये
3) एकरी 2500 रुपये
4) एकरी 5000 रुपये
3) शेतकचर्यापासून इथेनॉल निर्मितीसाठीचे तंत्रज्ञानासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
अ) ‘प्राज इंडस्ट्रीज’ने भारतीय तेलकंपन्यांशी याबाबत करार केले आहेत.
ब) ‘आयआयटी’ कानपूरने हे तंत्रज्ञान भारतात वकसित केले आहे.
क) इथेनॉलवर आधारित जैवऊर्जा प्रकल्पांसाठी देशातील तेलउत्पादक कंपन्यांची वार्षिक गरज 1.50 लाख टन जैवभार इतकी आहे.
ड) ‘प्राज इंडस्ट्रीज’ने हे तंत्रज्ञान भारतात वकसित केले आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) विधाने अ, ब आणि क बरोबर
(2) विधाने ब, क आणि ड बरोबर
(2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
(4) विधाने अ, क आणि ड बरोबर
4) पंजाब व हरियाणा राज्यात, भाताच्या पेंढ्यांना चारा म्हणून असलेली मागणी का कमी झाली ?
अ) गव्हाच्या काढांचा पर्याय उपलब्ध झाल्याने
ब) खरीप हंगाम 2 महिन्यांनी पुढे गेल्याने
क) भाताचे पिंजार साठवून ठेवण्यासाठी शेतकर्यांना वेळ कमी पडू लागल्याने
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
5) 1 टन शेतकचरा जाळल्याने जमिनीचा पोत टिकवणार्या पोषक घटकांची जी हानी होते, त्याबाबत योग्य जोड्या जुळवा ः
स्तंभ अ (पोषक घटक) स्तंभ ब (हानीचे प्रमाण )
अ. स्फुरद I. 5.5 किग्रॅ.
ब. सल्फर II. 2.5 किग्रॅ.
क. पोटॅशियम III. 2.3 किग्रॅ.
ड. नत्र IV. 1 किग्रॅहून अधिक
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) III IV II I
(3) I III IV I
(4) IV III I II
6) कोणत्या सरकारने 2008 साली वटहुकूम काढून खरीप हंगामात 10 जूनपूर्वी भातलागवड करण्यास शेतकर्यांना मनाई केली आहे ?
अ) हरियाणा
ब) पंजाब
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
7) स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन दशकांत पंजाब व हरियाणा राज्यात कोणत्या पीकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जात असे?
a) डाळी
b) कापूस
c) मका
d) भात
e) गहू
f) तेलबिया
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (b), (c), (e)
3) (a), (d), (e), (f)
4) (a), (c), (f)
8) जैवभार पेटवून दिल्याने दिल्लीतील वायुप्रदूषणाला कारणीभूत ठरणारे 17 ते 26 टक्के घटक हवेत तरंगतात, हा अहवाल क़ोणाचा अहे ?
a) जागतिक आरोग्य संघटना
b) ‘आयआयटी’ कानपूर
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
उत्तरे : प्रश्नमंजुषा (33)
1-4
2-3
3-4
4-3
5-2
6-2
7-4
8-2