१२ मे : जागतिक परिचारिका दिन
- 13 May 2021
- Posted By : study circle
- 300 Views
- 0 Shares
१२ मे : जागतिक परिचारिका दिन
♦ फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक आणि संख्याशास्त्रज्ञ होत्या. त्यांच्या हातातील कौशल्य आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून रुग्णसेवा केल्यामुळे परिचार्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
♦ त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या, त्या सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. त्यांच्या नावाने लंडन मध्ये नर्सिंग स्कुल उघडण्यात आले. त्यांना रॉयल रेड क्रॉस (१८८३), ऑर्डर ऑफ मेरीट (कॉमनवेल्थ -१९०७) या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
♦ फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शुश्रूषाशास्त्राची मुहूर्तमेढ रचण्याचे श्रेय दिले जाते. सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालये या विषयातील त्या तज्ज्ञ मानल्या जातात. त्यांनी समाजसुधारणेसाठी संख्याशास्त्राचा उपयोग केला. त्यांना लहानपणापासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करण्यासाठी विल्यम फेफेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृती सारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वत: काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या आणि कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला होता.
♦ १९६५ साली इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ नर्सेस यांच्याकडून नर्सेस डे साजरा करण्याचे ठरवण्यात आले, परंतु १९७४ पासून तो साजरा करण्यात येत आहे.
♦ ६ मे ते १२ मे : नर्सिंग आठवडा म्हणून साजरा होतो.
♦ ८ मे हा दिवस १९९८ पासून जागतिक विद्यार्थी परिचारिका दिवस साजरा केला जातो.
♦ २०२० हे वर्ष फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिन २०० वर्षे पूर्ण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने पारिचारिका व मिडवाईफ इयर म्हणून साजरे केले.
नर्सेस डे ची थीम -
- २०२१ - नर्सेस : व्हॉईस टू लीड - ए व्हिजन फॉर फ्युचर हेल्थकेअर.
- २०२० - नर्सेस : व्हॉईस टू लीड - नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ
- २०१९ - नर्सेस : व्हॉईस टू लीड - हेल्थ फॉर ऑल
- २०१८ - नर्सेस : व्हॉईस टू लीड - हेल्थ इज ह्यूमन राइट
- २०१७ - नर्सेस : व्हॉईस टू लीड - अचिव्हिंग द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स
- 2016 - Nurses: A Force for Change: Improving Health Systems' Resilience
- 2015 - Nurses: A Force for Change: Care Effective, Cost Effective
- 2014 - Nurses: A Force for Change - A vital resource for health
- 2013 - Closing The Gap: Millennium Development Goals
- 2012 - Closing The Gap: From Evidence to Action
- 2011 - Closing The Gap: Increasing Access and Equity
परिचारिका -
♦ १८८५ मध्ये ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या लेडी डफरिन फंडाद्वारे अनेक नर्सिंग रुग्णालये उघडली गेली होती. त्यामध्ये भारताच्या महिला परिचारिकांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता.
♦ १९४४ मध्ये भारतातील पहिले नर्सिंग स्कूल मद्रास येथे सुरु झाले. त्यानंतरचे नर्सिंग स्कूल १९६० मध्ये मुंबईला सुरू झाले.
♦ जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक हजार व्यक्तींमध्ये तीन परिचारिका असणे अपेक्षित आहे; परंतु भारतामध्ये हे प्रमाण १.७ इतके आहे. देशात गरजेच्या प्रमाणात परिचारिका निम्म्याच आहेत.
♦ महाराष्ट्रात सुमारे २.५० लाखांहून अधिक परिचारिका आहेत. मात्र, सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा केवळ २३ हजार नर्सेसच्या खांद्यावर आहे. ८० टक्के खासगी रुग्णालयात रुग्णसेवेचे व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रिशिक्षित नर्सेस पार पाडतात. खासगी रूग्णालयांमध्ये अजून किमान वेतन कायदा लागू नसल्याने तुटपुंज्या पगारात नर्सेसना काम करावं लागते.
♦ सुश्रुषा करणारी परिचारिका ही राज्य परिचारिका परिषदेत नोंदणी केलेली असावी लागते.
♦ सरकारने परीचारीकांसाठीही संरक्षण नियम पारित केलेले आहेत.
♦ आधुनिक औषधोपचारांसाठी लागणारे कुशल परिचारिकांचे प्रमाण आणखी कमी आहे. मनुष्यबळाचा तुटवडा असतानाही २०२०-२१ च्या कोव्हिड -१९ साथीमध्ये भारताचा रिकव्हरी रेट वाढवण्यात परिचारिकांचे लक्षणीय योगदान असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल
♦ १२ मे १८२० रोजी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्यांचा फ्लॉरेन्स (इटली) येथे जन्म झाला. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी आणि मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. त्यांचे शिक्षण घरीच झाले. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषांखेरीज त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान व गणित हेही विषय शिकविले.
♦ १८४४ साली त्यांनी घरातून झालेला प्रचंड विरोध झुगारून रुग्णसेवेचा व समाजसेवेचा स्वतंत्र निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे रुग्णसेवेसाठी समर्पित करण्याचे जाहीर केले.
♦ १८५० साली कैसर्सव्हर्ट (जर्मनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्याविषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला.
♦ १८५३ मध्ये लंडनच्या प्रसिद्ध हार्ले रस्त्यावरील एका छोट्या रुग्णालयात (इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ सिक जंटलवुइमेन इन डीस्ट्रेस्ड सरकमस्टन्सेस) त्यांची अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. या संस्थेतील त्यांची कारकीर्द फार यशस्वी ठरली.
♦ १८५४ साली ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी रशियाविरुद्ध क्रिमियन युद्ध सुरू झाल्यावर नाइटिंगेल यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. त्याप्रमाणे २१ ऑक्टोबर १८५४ रोजी ३८ परिचारिकांसह त्यांनी क्रिमियाला प्रयाण केले. हर्बर्ट यांनी तुर्कस्तानातील सर्व सैनिकी रुग्णालयांतील रुग्णपरिचर्याविषयक व्यवस्थेची जबाबदारी नाइटिंगेल यांच्याकडे सोपविली.
♦ १८५४ नोव्हेंबरमध्ये त्या तुर्कस्तानातील स्कूटारी (आजचे ऊस्कूदार) येथील सैनिकी रुग्णालयात पोहोचल्या. हे रुग्णालय अतिशय गलिच्छ व आरोग्य दृष्ट्या दुर्लक्षिलेले होते. साधनांचाही मोठा अभाव होता व रोग्यांची संख्याही मोठी होती. नाइटिंगेल यांनी तेथे कामास ताबडतोब प्रारंभ केला. नंतर त्यांनी इंग्लंडमधून जादा परिचारिका बोलावून घेतल्या व जरूर ती साधनसामग्रीही मागवून घेतली. लष्करी अधिकारी व डॉक्टरांचा विरोध न जुमानता त्यांनी आपल्या पथकाकडून रुग्णसेवी करवून घेतली. भर लढाईतल्या रुग्णसेवेत येणार्या अडचणींचा समर्थपणे सामना केला. त्यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आरोग्यविषयक विज्ञानाची तत्त्वे लागू केली. या व्यवस्थापनाचा परिणाम म्हणून, युद्ध रुग्णालयात मृतांचा आकडा ४२ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी झाला.तेथील जखमी व आजारी सैनिकांच्या व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून मृत्यूचे प्रमाण पुष्कळ कमी केले.
♦ १८५५ मध्ये स्कूटारी सैनिकी रुग्णालयात रुग्णालयात पटकी व प्रलापक सन्निपात ज्वराची (टायफस ज्वराची) भयंकर साथ उद्भवली. इंग्लंडकडे याबाबतीत योग्य त्या सुचना पाठवून स्कूटारीतील स्वास्थ्यरक्षा व्यवस्थापकांना नाइटिंगेल यांनी योग्य ती कारवाई करण्यास भाग पाडले. त्यामुळे या साथी चटकन नियंत्रणाखाली येऊन मोठी हानी टळली.
♦ इंग्लिश कवी लाँगफेलो यांनी त्यांच्यावर कविता रचली आणि गायली. ब्रिटिश सरकारने या शूर महिलेला घरी परत आणण्यासाठी विशेष युद्धनौका पाठवण्याचे आदेश दिले. लंडनने या महिलेच्या शाही स्वागतासाठी तयारी केली. पण ते टाळून त्या वेगळ्याच फ्रेंच जहाजामधून इंग्लंडला घरी पोचल्या.
♦ सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्या रात्री हातात कंदील घेऊन नाईट राउंड घेत असत. रात्री जागून तासोंतास रुग्णांची सेवा करत असत, त्यामुळे त्यांना रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी लेडी विथ द लॅम्प ही उपाधी दिली.
♦ १८५६ मध्ये त्यांनी युद्धात जखमी झालेले आणि त्यामुळे नंतर दगावलेले सैनिक, याची चिकित्सा करणारा अहवाल ब्रिटिश कमिशनकडे सुपूर्द केला. त्यात लष्करी रुग्णालयातील मृत्युदराची हंगामी कारणे मांडण्यासाठी स्वत: काढलेल्या रंगीत ध्रुवीय क्षेत्र रेखाकृतींचा (पोलर एरिया डायग्रॅम) म्हणजेच रोझ तक्त्यांचा वापर केला. या कॉक्सकॉम्ब रेखाकृती म्हणजे आधुनिक वृत्तालेखाचे (पाय आलेख) पूर्वरूप आहे. वेगवेगळ्या रंगांच्या या रेखाकृतींत वर्तुळाचे भाग करून प्रत्येक भागात वर्षांचा एक विशिष्ट कालावधी त्यांनी दाखवला. या भागांतील संख्या त्या रुग्णालयातील वार्षिक मृत्युदर दर्शवीत होत्या, त्यामुळे कालांतराने घडलेले बदल त्यात दिसत होते. संख्याशास्त्रीय सामग्रीचे आलेखीय प्रदर्शन त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे इतरासाठी पथदर्शक बनले.
♦ आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहत असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुर्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले.
♦ १८५७ मध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमण्यात आले. त्यामुळे सैनिकांचे अन्न, निवारा व आरोग्य यांसंबंधी इतिहासात प्रथम शांततेच्या काळात शास्त्रीय दृष्ट्या तपासणी करण्यात आली. त्या रुग्णालय सुधारणांविषयक व स्वास्थ्यरक्षाविषयक सल्ला देत. परदेशी राज्ययंत्रणाही याबाबतींत त्यांचा सल्ला घेत असत.
♦ १८५९ मध्ये भारतातील लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करण्याकरिता एक समिती नेमण्यात आली होती व तिचा अहवाल १८६३ मध्ये नाइटिंगेल यांना सादर करण्यात आला. १८५७ नंतर भारतात नेमलेल्या ब्रिटिश सैनिकांचा मृत्युदर इंग्लंडमधील सैनिकांच्या मृत्युदराच्या तिप्पट, म्हणजे दर हजारी ६९ होता. नाइटिंगेल यांनी त्याचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून सिद्ध केले की, याला कारण भारतातील हवामान कारणीभूत नसून सैनिकांच्या वसतिगृहातील अस्वच्छ वातावरण आहे. त्यांच्या सूचना अमलात आणल्यावर त्याचे चांगले परिणाम दिसून आले.
♦ भारतातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शांततेच्या काळातही वैद्यकीय शुश्रूषा व सार्वजनिक आरोग्यसेवा यांतील सुधारणेसाठी संख्याशास्त्रीय विश्लेषण, कुशल संघटन आणि तत्पर प्रशासन यांवर त्यांनी भर दिला. त्यासाठी त्यांनी समकालीन बेल्जियमचे संख्याशास्त्रज्ञ आणि सामाजिक संख्याशास्त्राचे संस्थापक अॅडॉल्फ क्विलेटयांच्या कल्पना स्वीकारल्या. आरोग्यसेवा, गुन्हे, बालमजुरी, शिक्षण या प्रश्नांवर निव्वळ आकडेवारीने भरलेले संख्याशास्त्रीय अहवाल आणि प्रस्ताव न देता त्यांत रेखाकृतींचा चपखल उपयोग करून त्यांनी सनदी अधिकार्यांना आणि संसदपटूंना आपले विचार पटवून दिले.
♦ १८५९ साली संख्याशास्त्रातील त्यांच्या कार्यामुळे संख्याशास्त्राची पदवी नसतानाही रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नाइटिंगेल निवडून आल्या. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.
♦ १८६० मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रयत्नांमुळे, ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातील पहिली संस्था स्थापण्यात आली. लंडनमधील या नर्सिंग स्कूलमुळे जगभरात परिचारिकांना महत्त्व प्राप्त झाले.
♦ १९०१ च्या सुमारास त्यांना अंधत्व आले.
♦ १९०७ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळविणार्या त्या पहिल्या महिला होत.
♦ १३ ऑगस्ट १९१० रोजी वयाच्या ९० व्या वर्षी त्या लंडन येथे मृत्यू पावल्या.
♦ त्यांनी बरेच ग्रंथलेखन केले असून त्यांपैकी नोट्स ऑन नर्सिंग (१८६०) हा ग्रंथ नावाजलेला आहे. नोट्स ऑन मॅटर्स फेक्टिंग द हेल्थ, एफिशियन्सी अँड हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ द ब्रिटिश आर्मी हा त्यांचा प्रचंड ग्रंथ १८५८ साली प्रसिद्ध झाला.
प्रश्नमंजुषा (१२८)